http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, May 19, 2018

24 बहुजननामा......! दै. लोकमंथन रविवार –20 मे 2018 माळ्यांनो! षंड झाला आहात काय ???


चोविसावी  खेप......!                      दै. लोकमंथन रविवार –20 मे 2018 
बहुजननामा

 

माळ्यांनो! षंड झाला आहात काय ???

माळ्यांनो.... !

आजचे सदर केवळ माळी समाजासाठी आहे. याचे शिर्षक बर्याच लोकांना आवडणार नाही. काही माळी माझ्यावर रागावतील, काही शिव्याही देतील! काही तोंडदेखले लोक मला समर्थनही करतील! फार छान लिहीले, याची गरज होती अशी तोंडस्तुती करून मला हरभर्याच्या झाडावरही चढवतील! परंतू आज मी या शिर्षकाखाली लिहीतांना कोणाच्या रागाची पर्वा करणार नाही व कोणाच्या स्तुतीसुमनांचीही अपेक्षा करणार नाही.
याचा अर्थ मला प्रचंड राग आला आहे व रागाच्या भरात काही तरी कोणावर तरी लिहीत आहे, असे कोणी वाटून घेऊ नये! चार दशकांपेक्षाही जास्त कालावधी केवळ शुद्ध सामाजिक चळवळीत काम करीत असतांना जे काही अनुभव आलेत, त्यावर कधी लिहीण्याचा विचार मनात आला नाही. असे विचार जीवनातून रिटायर्ड होण्याचे वेध लागतात तेव्हाच येतात. आणी अजून तर मी ‘’तरूण’’च आहे. जो पर्यंत हात-पाय स्यवंचलित आहेत, तो पर्यंत माणूस म्हातारा होत नाही. त्यामुळे जीवनातल्या सायंकाळी लिहीण्याची गोष्ट मी आता आज करणार नाही. परंतू गेल्या दिड-दोन महिन्याच्या कालावधित जे काही मी पाहात आहे, त्यावर मला अवश्य लिहावेसे वाटते आहे. ते लिहीत असतांना मला थोडे इतिहासात शिरावे लागणार आहे.
फार जुन्या इतिहासात जाणार नाही, बस्स 150 वर्षे मागे गेले तरी माळी जातीचा गौरवशाली इतिहास डोळ्यासमोर येतो. संपूर्ण भारत जातीव्यवस्थेच्या काळ्याकुट्ट अंधारात घोरत पडलेला असतांना, तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंच्या असुडाच्या एका फटकार्याने तो जागृत होण्यास सुरूवात झाली. तात्यासाहेबांच्या क्रांतीकारक विचारांचा प्रभाव इतका मोठा होता की, शाहू महाराज व सयाजीराव गायकवाडांसारखे राजेही सत्यशोधकमय झाले होते. माळी समाजातील नारायण मेधाजी लोखंडे, कृष्णराव भालेकर यांनी अनुक्रमे कामगार व शेतकरी वर्गांच्या जातीअंतक-वर्गीय क्रांतीची पायाभरणी केली. मराठा समाजातील विधवा पंडिता ताराबाई शिंदे हिने तर स्त्री-मुक्तीचे महादालनच उघडले. मातंग समाजातील मुक्ता साळवेनेआम्हाला हिंदू धर्मग्रंथ वाचता येत नसतील तर, आमचा धर्म कोणता?’’ असा प्रश्न तत्कालीन वैदिक पंडितांना विचारून उताणे पाडले होते. ब्राह्मणांची पंडिता रमाबाई, पंडित धोंडीराम कुंभार, रामोशी समाजाचे रोडे, वंजारी समाजाचे व्यंकू बाळाजी कालेकार, वैष्णव कुळाचे हैद्राबादचे स्वामी रामय्या अय्यावारू, गवळी समाजाचे डॉ. विश्राम रामजी घोले, तेलगू भाषिक जाया लिंगू, बनिया-वैश्य जातीचे रामचंद्र बापूशेठ उरवणे, मराठ्यांचे गंगारामभाऊ म्हस्के, महार समाजाचे बाबा वलंगकर, मुसलमानातील फातिमा शेख अशा कितीतरी विविध जाती-धर्मातील व विविध भाषा-प्रदेशातून तात्यासाहेबांनी नवं नेतृत्व उभं केलं! साहित्य, पत्रकारिता, प्रिंट मिडिया, संघटना, आंदोलन, शिक्षण, तत्वज्ञान असं एकतरी क्षेत्र सांगा, ज्याची पायाभरणी तात्यासाहेबांनी केली नाही. तत्कालीन सर्वच क्षेत्रात प्रभावी हस्तक्षेप करीत त्यांची दिशाच तात्यासाहेबांनी व त्यांच्या माळी सहकार्यांनी बदलून टाकली. त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा दरारा केशवराव विचारांच्या माध्यमातून 1960 पर्यंत कायम होता व त्याने कॉंग्रेस वगैरेसारख्या बलाढ्य संघटनांना जेरीस आणले होते.
या सर्व क्रांतीचे नेतृत्व माळी समाजाने केले. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरूषाने तात्यासाहेबांना गुरू मानले, यातच सर्वकाही आले. इतका गौरवशाली इतिहास असलेल्या माळीसमाजाला आज काय झाले आहे? तो असा सुस्त का झाला आहे? मध्यंतरी भुजबळसाहेबांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने माळी समाज एकत्र येतांना दिसत होता. त्यांच्या अनुकरणातून सर्वच ओबीसी जातीतून नेते निर्माण व्हायला सुरूवात झाली होती. त्यावेळी काही आशेचा किरण दिसत असतांना शंकाही निर्माण होत होत्या. लाखांची गर्दि आपापल्या जातीच्या नेत्यांच्या वाढदिवसाला जमत होती. या गर्दिला विचारांची दिशा मिळावी, म्हणून प्रा. हरि नरकेंसारखे काही प्रमाणिक विचारवंत व कार्यकर्ते प्रयत्नही करीत होते. पण गर्दी ही गर्दीच राहीली आणी भ्रमाचा भोपळा फुटला.
भुजबळसाहेबांना अटक झाली आणी सगळीकडे सन्नाटा पसरला! गर्दी जमविणारे सगळे उप-नेते गायब! कोणी परदेशात पळाले, कोणी बिळात लपलेत तर काही पक्षांतर करून पसार झालेत. माळ्यांनो! तुम्ही नेत्यांच्या मागे मेंढरं म्हणून गर्दी करीत होते. आणी या मे॑ढरांना गोळा करून आणणारे केवळ हमालहोते. त्यांना त्यांच्या हमालीची वसूली(?) होण्याशी मतलब! तुम्हाला ते केवळमाळीम्हणून हाकत होते आणी तुमचं काय…. ‘जय जोती बोलो, किधर भी चलो!’’ तात्यासाहेबांचे जातीय वारसदार म्हणून नाही तर, वैचारिक वारसदार म्हणून एकत्र आले असते तर, समाजाला असे षं॑ढ बनून नामुष्कीचे जीणे जगावे लागले नसते. देशातील 52 टक्क्यांच्या ओबीसींच्या नेत्याला जेलमध्ये टाकले जाते आणी रस्त्यावर निषेधासाठी एक कुत्रंही नाही? माळी समाजाच्या अखिल भारतीय अध्यक्षाला भर रस्त्यावर मारहाण होते आणी समाज षंढासारखा सुस्त पडून राहतो?
भुजबळसाहेबांना जेलमधून बाहेर काढायचे असेल तर आंदोलन ओबीसी विषय घेऊनच झाले पाहिजे, हे आम्ही अनेक कार्यक्रमातून अनेक संघटनांना सांगीतले. पण ऐकतो कोण? शेवटी आम्हीच राज्यस्तरीय ओबीसी जनगणना अभियान सुरू केले. भुजबळांना जेलमध्ये भ्रष्टाचारी म्हणून नाही टाकलेले. 2010 साली ओबीसी जणगणनेच्या क्रांतीकारक विषयावर ब्राह्मणी पार्लमेंटला झुकविले या एकमेव कारणास्तव भुजबळांना जेलमध्ये टाकलेले आहे. हाच क्रांतिकारक विषय घेऊन राज्यभर आंदोलन केले तरच भुजबळसाहेब जेलमधून बाहेर येतील, याची आम्हाला खात्री होती. ओबीसी जनगणनेचे अभियान एप्रिल-मे महिन्याच्या कडक उन्हात राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात गेले. शेवटची समापनाची सभा 11 मे रोजी आझाद मैदानावर ठरलेली होती. ही सभा भुजबळसाहेबांच्या अध्यक्षतेखाली घ्यायची हेही ठरलेले होते. 11 मे पर्यंत भुजबळसाहेब जेलमधून बाहेर आले नाहीत तर, त्यांची अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी ठेऊन आझाद मैदानावर समापनाची सभा घेण्याची धमकी आम्ही दिल्यावरच घाई-घाईने भुजबळांना सोडण्यात आले. जेलमधून बाहेर आल्यावर त्यांचे जंगी स्वागत करावे व त्यांनाओबीसी योद्धापद्वी देऊन गौरवावे यासाठि आम्ही नियोजन केले. मात्र भुजबळांच्या वाढदिवसाला लाखांची गर्दी करणारा हा माळी समाज त्या दिवशी 11 मे 2018 रोजी षंढ बनून घरात झोपून राहिला. जे थोडेफार जागृत होते त्यांनी आपापल्या गल्लीत महात्मा दिन साजरा केला. महत्वमहात्मादिनसाजरा करण्याला नाही, तो तुम्ही कोठे साजरा करीत आहेत, याला महत्व आहे.
महापुरूषांच्या जयंत्या-मयंत्या साजरा केल्याने काहीही निष्पन्न होत नाही. आपल्या जातीच्या एकाही महापुरूषाची जयंती साजरी न करणारे ब्राह्मण लोक आज सत्ताधारी आहेत. आणी आपल्या जातीच्या महापुरूषाची जयंती जगभर भव्य स्वरूपात साजरी करणारे बौद्ध लोक अजूनही भींतीवरच ‘’सत्ताधारी’’ होण्याचे स्वप्न रंगवित आहेत. कोणत्या वेळेस कोणती कृती केली म्हणजे समाजाचे भले होईल, याची अक्कल येणे म्हणजेजागृतीहोय! 11 मे रोजी सर्वकामे सोडून मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जमले असते तर ओबीसी जनगननेसाठी केंद्रसरकारला झुकावे लागले असते व आपल्या नेत्याचे जंगी स्वागत केले; म्हणून नेताही दुप्पट वेगाने कामाला लागला असता. पण तुम्हाला नेता स्वार्थासाठी हवा आहे. जोपर्यंत नेता सत्तेवर होता तोपर्यंत तुम्ही केवळ व्यक्तीगत स्वार्थापोटी त्याच्या आजूबाजूलागर्दीकरीत होते.
याला जबाबदार केवळ मध्यमवर्गीय माळी लोक आहेत. हे लोक समाजात कर्मचारी, अधिकारी, प्रोफेसर, वकील, डॉक्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, नगरसेवक म्हणून मिरवितात. नोकरी, बढती, कॉंन्ट्रॅक्ट, पक्षाचं तिकीट, कमिशन-दलाली एवढाच यांचा स्वार्थ! आणी या स्वार्थासाठी यांना जातीचा नेता लागतो. माळी प्राध्यापकांचा व्हाट्सप गृप स्थापन होऊन एक वर्ष झाले. आतापर्यंत फक्त एकचजेवणा-खावण्याचाकार्यक्रम संपन्न झाला आहे. प्राध्यापक-शिक्षक या नात्याने समाजाचे एखादे शिबीर घ्यावे, खेड्या गावांमध्ये जाऊन समाजाची जागृती करावी, आदि कामे यांच्या गावीही नाहीत. असा स्वार्थी व भ्रष्ट बुद्धीजीवी वर्ग ज्या समाजात असेल तो समाज षंढच राहणार! दिडशे वर्षांपूर्वी तात्यासाहेबांच्या नेतृत्वाखाली समाजक्रांती करणारा हा माळी समाज पुन्हा एकदा उठून उभा राहील का? षंढपणा सोडेल काय? वाट पाहू या, तोपर्यंत  जयजोती! जयभीम!!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270