http://shrwandeore.blogspot.in/

Friday, September 27, 2019

Pune Progr on Satyashodhak Samaj 24 Sept 2019

Satyashodhak samaj day was observed in Pune at Savitrimai Smarak Hall on 24Sept2019. I was chief speaker of the progr. A half minute cliff of my lecture, I  emphasized   a very imp point.....

Monday, September 23, 2019

88 BahujanNama AranMali 20 Sept 2019


बहुजननामा-88                                               (प्रकाशनः 20 सप्टेंबर 2019)        


सावधान! माळी समाज ‘फुले-महामार्गावर’ येत आहे.....

बहुजनांनो.... !
-1-
माळी समाजाचे एकूण दोन ‘सत्ता संपादन मेळावे’ गेल्या रविवारी व सोमवारी संपन्न झालेत. रविवारी 15 सप्टेंबरला गडकरींचा संघभाजप-प्रणित माळी-मेळावा नागपूरला संपन्न झाला व सोमवारी 16 सप्टेंबरला बाळासाहेब प्रकाश आंबेडकर-प्रणित माळी-मेळावा अरण गावी संपन्न झाला. या मेळाव्यांमध्ये काही समान मुद्दे ठळकपणे दिसत होते.
1)     हे दोन्ही मेळावे ‘सत्ता-संपादन’ मेळावे होते व ते माळी जातीचे होते.
2)     दोन्ही मेळाव्यात जमलेले माळी एक विशिष्ट ‘मेरीट’ चे होते. म्हणजे बाजार-बुणगे वा मेंढरं नव्हती.
3)     दोन्ही मेळाव्यात जमलेल्या लोकांची संख्या मर्यादित असली तरी ती जागृत माळ्यांची संख्या होती.
एवढे तीन साम्य सोडले तर या दोन्ही मेळाव्यात ब्राह्मणी-अब्राह्मणीइतका प्रचंड मोठा फरक होता. तो फरक आता आपण पाहू.....
1)     नागपूरचा माळी मेळावा हा ‘पेशव्यांसाठी सत्ता संपादन’ मेळावा होता. तर, अरणचा मेळावा हा माळ्यांसकट सर्वच ‘ओबीसी-दलितांसाठी सत्ता संपादन’ मेळावा होता.
2)     नागपूरच्या मेळाव्यात वामन-अवतारी पेशवे हे मुख्य मार्गदर्शक होते, जे तात्यासाहेब महात्मा फुलेंवर जीवंतपणी जीवघेणा शारिरीक हल्ला करीत होते व त्यांच्या मृत्युनंतरही त्यांच्या विचारांवर हल्ला करीत आहेत. तर, याउलट अरण येथील माळी मेळाव्यात तात्यासाहेबांचे वैचारिक शिष्य असलेल्या बाबासाहेबांचे नातू माननीय प्रकाश आंबेडकर मुख्य मार्गदर्शक होते, ज्यांच्या समाजाने घरोघरी तात्यासाहेबांचे फोटो लावून व ग्रंथ वाचून त्यांना भौतिक व वैचारिकदृष्ट्या जीवंत ठेवले आहे.
3)     नागपूरच्या मेळाव्यात जमलेले माळी जागृत असले तरी ते लाचार, लाळघोटे व पेशव्यांचे गुलाम होते, तर अरणला जमलेले माळी स्वाभीमानी, ताठ मानेचे व पेशव्यांना लाथाडणारे होते.
नागपूरच्या मेळाव्यात समोर माळी समाज बसलेला असतांना व पाठीमागे तात्यासाहेब महात्मा फुलेंचा फोटो असतांना गडकरींनी आपली ‘फुले-मारेकर्‍या’ची भुमिका सोडली नाही. भाषणात त्यांनी फुले-विचारांवर विषारी हल्ला चढविला. गडकरी म्हणाले, आरक्षणाने काहीही प्रगती होत नाही. नागपूरात माझ्या जातीची 5-10 घरे आहेत, तरीही मी निवडून येतो व मंत्रीही होतो.’ गडकरींच्या भाषणाचा सरळ मतितार्थ असा होता की, तुम्ही संख्येने कितीही जास्त असा. शेवटी तुम्ही मेंढरं ते मेंढरंच राहणार आहात. आरक्षण नसतांनाही आम्ही प्रगतीपथावर आहोत, सत्ताधारी आहोत, आणी तुम्ही माळी लोक आरक्षण असूनही माझ्यासारख्या अल्पसंख्य ब्राह्मणासमोर ‘लाचार’ म्हणून बसलेले आहात.
नागपूरला उपस्थित माळी लोक व्यक्तीगत स्वार्थापूरते जागृत आहेत. त्यांच्यापैकी कुणाच्या सहकारी बँका आहेत, शिक्षण संस्था आहेत, सोसायट्या आहेत. या संस्था टिकवून ठेवण्यासाठी सत्ताधार्‍यांच्या पायाशी लोळण घ्यावीच लागते, हे मी समजू शकतो. परंतू त्यासाठी सत्ताधार्‍यांचे पाय चाटण्याचा कार्यक्रम जाहीरपणे व तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या साक्षीने साजरा करू नका. तुम्ही नासला आहात, तसे इतरही माळ्यांना नासवू नका. तुम्हाला काय लाळघोटेपणा करायचा असेल तो गडकरींच्या केबीनमध्ये जाऊन, बँडवाजा लावून साजरा करा. तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या साक्षीने त्यांच्या विचारांचा कार्यक्रम करण्यासाठी किमान प्रामाणिकपणा लागतो. नागपूर मेळाव्यात जमलेले माळी शरिराने ‘लखवाग्रस्त’ होते व मेंदूने ‘बधीर’! नागपूरला उपस्थित माळ्यांमध्ये एक जरी माणूस तात्यासाहेब महात्मा फुलेंवर प्रेम करणारा असता तर त्याने गडकरींचा निषेध केला असता. आरक्षणाच्या सिद्धांताचे जनक असलेल्या तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या फोटोसमोर व माळ्यांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या विरोधात बोलण्याची हिम्मतच कशी होऊ शकते? गडकरी अशी हिम्मत करू शकलेत कारण, शेकडो वर्षे एकतर्फी 100 टक्के आरक्षण जातनिहाय होते. मनुस्मृतीप्रमाणे सर्व कष्टमय-यातनादायी-सेवाधर्मी’ व्यवसायांचे 100 टक्के आरक्षण शुद्रादिअतिशूद्रांच्या माथी मारून व ‘भोगमय-आरामदायी-नफाधर्मी’ व्यवसाय ब्राह्मण-क्षत्रिय(?)-सरंजामदार-वैश्यांसाठी 100 टक्के राखीव ठेवून शतकानुशतके जी सत्ता उपभोगत आहेत, त्यातून आलेली ही गुर्मी आहे. या गुर्मीमुळेच ‘फुले-विचार’ मारण्याचे धाडस गडकरी करू शकलेत.
-2-
जातीव्यवस्थेच्या अनेक वैशिष्ट्यांसोबत एक वैशिष्ट्य हे आहे की, प्रत्येक जातीला आपला नेता वरच्या जातीतून अथवा वरच्या जातीच्या मान्यतेतून आलेला पाहिजे असतो. संघटना जातीय असो कींवा वर्गीय, त्या संघटनेचा नेता सवर्ण जातीय अथवा त्यांच्या मान्यतेचाच लागतो. शेतकरी हे सर्वच्या सर्व शूद्रच आहेत, पण त्यांच्या वर्गीय संघटनेचा नेता शरद जोशी (ब्राह्मण) अथवा जाट-सरंजामदार टिकैतच असतो. कामगारवर्गात मोठ्या संख्येने शूद्रादिअतिशूद्रच असतात, परंतू त्यांना नेता म्हणून दत्ता सामंत, डांगे, राव सारखे ब्राह्मणच लागतात. शासकीय कर्मचार्‍यांमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक असतात, पण त्यांना नेता म्हणून मुसलमान-दलित चालत नाहीत, तिथे नेता कर्णिक (ब्राह्मणच) लागतात. जातनिहाय संघटनांचं सूत्र यापेक्षा वेगळे नाही. माळ्यांचा नेता किंवा ओबीसींचा नेता कोण होऊ शकतो? ज्याच्या डोक्यावर गडकरी-ठाकरेंचा आशिर्वाद आहे किंवा ज्याच्या खांद्यावर पवारांचा हात असेल, तोच माणूस माळ्यांचा किंवा ओबीसींचा नेता होऊ शकतो. तेली, कोळी, सुतार, लोहार, कुंभार, नाभिक-धोबी-परीट वगैरे सर्व जातींची हीच कहाणी आहे. फरक एवढाच आहे की, माळी, तेली सारख्या मोठ्या जातींचे नेते स्वतः पवारसाहेब नियुक्त करतात व नाभिक-धोबीसारख्या छोट्या जातीतील नेत्यांची नियुक्ती आर.आर.आबांसारखे दुय्यम नेते करतात. एकतर ब्राह्मण-मान्यता हवी किंवा मराठा-मान्यता पाहिजे. एकमेव बौद्ध समाज असा आहे कि, त्यांचे नेते भुमिहिनांच्या वर्गीय व नामांतरासारख्या जातीय-संघर्षातून निर्माण झालेले आहेत. परंतू अशा संघर्षशिल नेत्यांना आमदार-खासदार-मंत्री होण्यासाठी सरंजामदार्‍यांच्या किंवा पेशव्यांच्या पायाशी लोळण घ्यावीच लागते. त्याशिवाय ते मान्यताप्राप्त दलित-नेते होतच नाहीत. वामन मेश्राम, बोरकर, माने-मानकर हे दलितांचे नेते होऊ शकत नाहीत, कारण त्यांना अजून पेशव्यांचा आशिर्वाद लाभलेला नाही किंवा मराठा-सरंजामदारांकडून शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडलेली नाही.
त्याचप्रमाणे कोणाच्या सभेला जायचे आणी कोणाच्या सभेला नाही जायचे, हे सूत्रसुद्धा
याच पद्धतीचे असते. मंडल आयोगासाठी आयुष्यभर चळवळ करणार्‍या व ओबीसी आरक्षणाला मराठ्यांपासून वाचविणार्‍या श्रावण देवरेंच्या सभेला मोठ्या संख्येने लोक येत नाहीत, परंतू भुजबळ फॉर्मवर रोजच जत्रा भरते! त्याचे साधे कारण हे आहे कि, श्रावण देवरेला गडकरी-ठाकरे-पवारांनी गो-मूत्र शिंपडून पवित्र करून घेतलेले नाही. अशा ‘अपवित्र’ श्रावण देवरेला नेता कसे मानणार, असा प्रश्न माळ्यांना व इतर ओबीसी जातींना पडलेला असतो. हे पेशवा व सरंजामदार केवळ ओबीसी-दलित नेत्यांवरच गोमूत्र शिंपडतात असे नाही तर, दलित-ओबीसी जातीतील विचारवंत, साहित्यिक, बुद्धिवंत आदि तज्ञ लोकांवरही गोमूत्र शिंपडतात. त्याशिवाय या बुद्धिवंतांना साहित्य महामंडळाचे सदस्य वा अध्यक्ष बनता येत नाही. भांडारकर संशोधन संस्थेचे डायरेक्टर होणे म्हणजे किती मोठे मानाचे पद. पण त्यासाठीसुद्धा पेशव्यांच्या पायावर ‘डोके’ ठेवावे लागते. त्यानंतरच ते गोमूत्र शिंपडतात व पवित्र करून घेतात.
-3-
तर सांगायचा उद्देश असा की, सभेला जातांना सुद्धा लोक असा विचार करतात की, या सभेचा मुख्य नेता गोमूत्र शिंपडलेला आहे की नाही. सभेचा प्रमुख पाहूणा पेशवा किंवा सरंजामदार असेल तर, हे ओबीसी-दलित लोक डोळे झाकून सभेला जातात. नागपूरच्या माळी मेळाव्यात हेच पेशवा-सूत्र काम करीत होते. नागपूरच्या मेळाव्यात माळ्यांचे अधःकारमय भविष्य व भयानक वर्तमान स्पष्टपणे दिसत असतांना अरणच्या माळी मेळाव्याने मात्र आशेचा किरण दाखवीला. जातीतून बाहेर पडून ‘जात्यंतक’ राजकारण काय असते, ते अरणला जमलेल्या माळ्यांनी दाखवून दिले. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर होते, ही एक तत्वज्ञानात्मक परिवर्तनाची दिशा आहे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंनी एखाद्या राजा-महाराजाला, जमिनदार-सरंजामदाराला वा ब्राह्मण-पेशव्याला गुरू नाही मानले. किंवा संत सावता माळ्यालाही गुरू नाही मानले. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंनी मातंग जातीतील क्रांतीवीर लहूजी साळवेंना गुरू-मार्गदर्शक मानले. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी संत चोखा महाराला गुरू नाही मानले. परजातीय-परधर्मीय बुद्ध, कबीर, फुलेंना मार्गदर्शक मानले. या महापुरूषांच्या पावलावर पाऊल ठेवत अरणला जमलेल्या माळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षशील नातवाला मार्गदर्शक मानले, हाच आहे खरा ‘फुले-महामार्ग’, अशी असते परिवर्तनाची दिशा, हे या माळ्यांनी सिद्ध केले आहे. आपण नागपूरच्या दिशेने जाऊन गडकरीसारख्या ‘फुलेंच्या शत्रू’ला डोक्यावर घ्यायचे की अरणच्या दिशेने जाऊन ‘फुले-प्रेमी’ प्रकाश आंबेडकरांना नेता मानायचे, हे ठरविण्यासाठी मेंदू ‘बधीर’ असून चालत नाही. तो मेंदू वैचारिकदृष्ट्या तल्लख व सतर्क असला पाहिजे, तरच योग्य व अचूक दिशा सापडते.  
याच्या उलटी आणखी एक दिशा आहे, ती समजल्याशिवाय अरणच्या माळ्यांचे ‘फुले महामार्गावर’ येणे किती क्रांतीकारक आहे, हे लक्षात येणार नाही. आमच्या बहुजन हुशारांना एखादा चांगला मुद्दा समजून सांगायचा असेल तर, केवळ सिद्धांत सांगून समजत नाही. त्यासाठी एखादे उदाहरणच द्यावे लागते, किंवा तुलनात्मक फरक स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे द्यावी लागतात. म्हणून मला नाइलाजास्तव मराठा समाजाचे उदाहरण तुलना करण्यासाठी द्यावे लागते आहे. परंतू पुढच्या बहुजननामात.......
तत्पूर्वी आण्णासाहेब शंकरराव लिंगे व तरूण तडफदार नेते शाहीर सचिन माळी यांनी महाकष्ट घेऊन हा अरणचा मेळावा यशस्वी केला, याबद्दल त्यांचे नाव ‘जात्यंतक’ चळवळीच्या इतिहासात निश्चितच नोंदले जाईल. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
या विषयाशी निगडीत अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर आपण पुढील बहुजननामात चर्चा करीत राहू........तो पर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 19 सप्टेंबर व प्रकाशनः 20 सप्टेंबर 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

Tuesday, September 17, 2019

87 BahujanNama Dhobi 13Sept 2019


बहुजननामा-87


नव्या पेशवाइचा राष्ट्रीय अजेंडाः ‘देणं व्हई ते भ्याणं व्हई’

बहुजनांनो.... !
-1-

धोबी समाजाचे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी माननीय रंगनाथ शिरसाठ हे ओबीसी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी माझ्याशी नेहमी संपर्कात असतात. ते समाज कल्याण अधिकारी असतांना खोट्या कुणब्यांना त्यांनी ज्या पद्धतीने खोटे ओबीसी सर्टिफिकेट नाकारलेत तो खरोखरच एक मर्दानगीचा अविष्कार होता. शिरसाठसाहेबांनी त्यावेळी जे मर्दानी धैर्य दाखवीले ते अजून एकाही ओबीसी वा बहुजन अधिकार्‍यात आढळून आलेले नाही, हा माझा जीता-जागता अनुभव आहे. जातीव्यवस्थेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक जे आहे, ते ‘‘जातीय’’ दहशतीचे आहे. तुमच्यासमोर तुमच्या जातीपेक्षा वरच्या जातीतील माणूस येऊन बसला की, तुमच्या मनात आपोआपच एक न्युनगंड तयार होतो. या न्युनगंडातून भीतीचा अविष्कार होतो. आणी तुमच्यासमोर जर खालच्या जातीचा माणूस येऊन बसला तर, तुमच्यात लगेच अहंगंड निर्माण होतो. आणी तुम्ही आपोआपच माजूर्डे बनतात. आणी मग तुमचे काया-वाचा-मन त्याच्याभोवती दहशतीचे जाळे विणायला सुरूवात करते.
या जातीय अहंगंडावर व न्युनगंडावर जर मात करायची असेल तर त्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा स्वीकारलेली असली पाहिजे. कारण हे विचार जात-दांडग्या, धनदांडग्या जातींसमोर व कु-बौद्धिक पेशव्यांसमोर ताठ मानेने उभे राहण्याची प्रेरणा देतात. परंतू शिरसाठसाहेब ना फुले-आंबेडकरवादी आहेत, ना पुरोगामी! ते रूढ अर्थाने एक पारंपरिक हिंदू-धोबी आहेत. प्रशासनात त्यांना ज्याप्रमाणे सरंजामदारांनी छळले, त्याचप्रमाणे दलित कर्मचारी व कार्यकर्त्यांकडूनही त्यांना भरपूर त्रास झालेला. पण तरीही त्यांनी आपले मानसिक व नैतिक संतूलन बिघडू दिले नाही व आपली शासकीय सेवा ईमाने-ईतबारे केली. कोणताही वैचारिक ‘इझम’ डोक्यात नसतांना जे लोक निःपक्षपातीपणाने चूकीच्या गोष्टी नाकारतात व त्यासाठी लढतात, ते लोक केवळ आपल्या ‘इन्स्टिंक्ट’ कडून प्रेरणा घेतात व सहजपणे पुरोगामी कृती करून जातात. शिरसाठ साहेब त्यापैकी एक! कोणतेही औपचारिक शिक्षण-प्रशिक्षण नसतांना, कोणतेही अक्षरज्ञान नसतांना व कोणाताही रूढ गुरू नसतांना संतश्रेष्ठ गाडगे महाराजांनी ज्या सहजपणे समाजपरिवर्तानाचे महान कार्य केले, त्या गाडगे महाराजांचे खरेखूरे वारसदार शिरसाठ साहेब ठरतात.
-2-
रंगनाथ शिरसाठ यांचा नेहमी प्रमाणे फोन आला. परंतु यावेळी त्यांचा सूर खूपच चिंतातूर वाटला. धोबी समाजाला एस्सी (SC) कॅटेगिरीत समाविष्ट केल्याच्या बातम्या टि.व्ही., प्रिंट मिडिया व सोशल मिडियावरून प्रसारित होताच पुन्हा एकदा त्यांच्यातला सत्य-शोधक शासकीय अधिकारी जागृत झाला. त्यांनी या धोबी एस्सीकरणाचा मूळात जाऊन शोध घेतला. विविध फाइल्स, पत्रव्यवहार व समितीचे रिपोर्टही तपासले. आणी शेवटी ते या निष्कर्षावर आले की, कॅटेगिरी बदलण्यासंदर्भात ज्याप्रमाणे काही ओबीसी व भटक्या जातींची फसवणूक सुरू आहे, त्यासोबत आता धोबी जातीचीही फसवणूक सुरू झालेली आहे. चर्चेत त्यांनी जे महत्वाचे मुद्दे मांडलेत ते खरोखरच धोबी समाजातील सुबुद्ध कार्यकर्त्यांनी विचारात घेण्यासारखे आहेत.
1)     रंगनाथ शिरसाठ हे धोबी जातीचे आहेत किंवा विशिष्ट वैचारिक इझमचे अनुयायी आहेत, हे आधी डोक्यातून काढून टाका.
2)     मी या देशाचा एक प्रामाणिक नागरिक आहे, एवढेच मी मानतो.
3)     माझ्या देशातील एखाद्या नागरिकाची वा नागरिकांच्या एखाद्या वर्ग-जात समुहाची फसवणूक होत असेल तर, ते उघडकीस आणणे माझे परमकर्तव्य आहे. याच भुमिकेतून मी खोट्या कुणब्यांना घरचा रस्ता दाखवीला आहे.
4)     धोबी समाज हा इतर बारा-बलुतेदार जातींप्रमाणेच भोळा व अंधश्रद्ध आहे.
5)     याचा फायदा ज्याप्रमाणे सवर्ण जातींनी घेतला, तसा तो धोबी नेतेही घेत आहेत.
6)     आता शासनानेही निवडणूकीच्या तोंडावर केवळ धोबी वोटबँकेवर डोळा ठेवून त्यांची फसवणूक सुरू केलेली आहे. ही फसवणूक कशी आहे, हेही त्यांनी फोनवरील प्रदिर्घ चर्चेत मला समजावून सांगीतले.
7)      धोबी समाजातील काही नेत्यांनी मागणी केली कि, काही राज्यात धोबी-परीट जात एस्सी कॅटेगिरीत आहे, आणी म्हणून महाराष्ट्रातील धोबी जातसुद्धा एस्सी कॅटेगिरीत टाकली पाहिजे.
8)     अशी मागणी होताच विधानसभेत कोणीतरी आमदाराने ती मागणी पुढे केली.
9)     विधानसभेत अशी मागणी होताच हा विषय ‘बार्टी’कडे सोपविला.
10)  बार्टीने त्वरीत रिपोर्ट दिला की, धोबी जात अस्पृश्य नसल्याने तीला एस्सी स्टेटस देता येणार नाही.
11)  नंतर भांडे नावाच्या एका माजी आमदाराची एक सदस्यीय कमेटी नेमून खोटा रिपोर्ट लिहून घेतला गेला की, धोबी जातीला एस्सी कॅटेगिरीत समाविष्ट केले जाउ शकते.
12)  दरम्यान धोबी जातीचे नेते आपापल्या धोबी कार्यकर्त्यांना घेऊन मोर्चे काढणे, धरणे देणे, निवेदने देणे वगैरे आंदोलने करीत होती. मंत्र्यांकडे खेटे घालणे, मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळे नेणे आदि प्रकार सुरूच होते.
13)  आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर मुख्य सचिवाने एक साधे पत्र केंद्र सरकारकडे पाठवून धोबी समाजाला एस्सी कॅटेगिरीत समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे.
असे पत्र शासनाने पाठवीताच धोबी समाजाच्या नेत्यांनी असा काही जल्लोश सुरू केला की, ते जणूकाही फार मोठी लढाइ जिंकले आहेत. वास्तविक असे पत्र पाठवून कोणतीही एखादी जात कोणत्याही एका कॅटेगिरीत टाकणे अथवा काढणे शक्य नसते. जर ते एवढे सोपे असते तर, मराठा समाजाला ओबीसी कॅटेगिरीत टाकण्यासाठी लाखांचे मोर्चे काढावे लागले नसते व त्यासाठी 30 वर्षे थांबावे लागले नसते.. इतका कॉमन सेन्स जर धोबी समाजाच्या शिकल्या-सवरल्या लोकांना नसेल तर, काय डोकं फोडून घ्यायचं का? शिरसाठसाहेबांचा हा त्रागा मला खूपच अस्वस्थ करून गेला. एका सरकारी पत्रालाच विजय समजून जल्लोश करणे म्हणजे आपल्या जातीच्या सामायिक मूर्खपणावर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे.
     शिरसाठसाहेब केवळ त्रागा करून थांबले नाहीत तर त्यांनी ताबडतोब एक पत्र मुख्य सचिवांच्या नावाने ड्राफ्ट केले व माझ्याकडे चर्चेसाठी पाठवीले. मी त्यांना समजावुन सांगत होतो की, तुमच्या या पत्राचा काही एक उपयोग होणार नाही. पाठवू नका. पण त्यांच्यातला प्रामाणिक ऑफिसर स्वस्थ बसे ना! मुख्य सचिवाला लिहीलेल्या पत्रात ते स्पष्टपणे लिहीतात की, ‘कोणत्याही एखाद्या जातीला ज्या कॅटिगिरीत टाकायचे आहे, त्या कॅटेगिरीच्या राज्य व केंद्रीय आयोगाकडे हा विषय सोपवावा लागतो. या आयोगाच्या अहवालावरून हे ठरते की, संबंधित जातीला त्या कॅटेगिरीत समाविष्ट करता येईल अथवा नाही. संविधानकृत असलेला कोणताही मार्ग न अवलंबता केवळ लोकांना खूश करण्यासाठी पक्के अज्ञानी असलेल्या माजी आमदाराची एक सदस्यीय समिती नेमली जाते व या घटनाबाह्य समितीचा आधार घेऊन केवळ 4-5 ओळीचे एक शिफारसपत्र मुख्य सचिवांच्या सहीने केंद्राकडे पाठवीले जाते.’ हा मुर्खपणाचा नव्हे तर धूर्तपणाचा कळस झाला. आणी मुर्खपणाचा कळस धोबी जातीतील शहाणे लोक डोक्यावर घेऊन मिरवीत आहेत.
 -3-
खरे म्हणजे या विषयावर मी पूर्वीच दोन वेळा लिहिले आहे आणी एकदा आझाद मैदानावरील धनगर समाज मेळाव्यात भाषणही केले आहे. मी धनगर समाजाला जाहिर भाषणातून आवाहन केले की, ‘‘तुम्ही जो पर्यंत ओबीसींच्या जातनिहाय जणगणनेसाठी लढत नाहीत, तो पर्यंत तुमचे हे कॅटेगिरी-बदल आंदोलन यशस्वी होत नाही. असे समजून चला की, शासनाने वोटबँकेपायी तुम्हाला कॅटेगिरी-बदल करून दिली, तरी हे प्रकरण हायकोर्ट-सुप्रिम कोर्टाकडे द्यावेच लागणार आहे. आरक्षणाची कोणतीही बाब न्यायालयात गेली की तेथे दोनच बेसिक प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्नः ‘तुमच्या जातीची लोकसंख्या काय?’ आणी दुसरा प्रश्नः ‘तुमच्या जातीचा शैक्षणिक, समाजिक स्टेटस व प्रशासकीय नोकर्‍यांचा डेटा काय?’ आणी असा कोणताही डेटा एकाही ओबीसी वा भटक्या जाती-जमातीचा शासनाकडे उपलब्ध नाही. आणी केवळ या दोन मुद्द्यांवरच धनगर, धोबी वगैरे जातींचे हे ‘कॅटेगिरी-बदल’ आरक्षण रद्द करण्यात येईल.’’
मी इतके स्पष्टपणे समजावून सांगीतल्यावरही धनगर समाजाची आक्रमक भाषणे सुरूच राहीलीत. व या मुर्खांना राजकीय सपोर्ट देण्यासाठी दोन्ही माजी चव्हाण मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. माझ्या सत्य बोलण्यावर धनगरांचा विश्वास बसला नाही, याचे आणखी एक कारण असे की, लोकसभेच्या तोंडावर अनेक राजकीय पक्षांनी धनगरांचे मेळावे घेऊन ‘तुम्हाला आदिवासीत टाकणारच’ असे जाहीर आश्वासने दिले गेले. असे खोटे आश्वासन देण्याच्या स्पर्धेत एक आंबेडकरवादी पक्ष सर्वात पुढे होता. जर धनगर समाजासारख्या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जातीला आपली होत असलेली फसवणूक समजत नसेल तर न्हावी, धोबी जातींना ती समजणे फार दुरची गोष्ट!
पेशवाइ सरकार अशी धडधडीत खोटी आश्वासने ओबीसी-भटक्यांनाच का देत आहे? कारण स्पष्ट आहे. पेशवाई सरकारचे राष्ट्रीय धोरणच आहेः देणं व्हई ते भ्यानं व्हई! म्हणजे, काही द्यायचंच नसेल तर आश्वासन द्यायला घाबरायचं कशाला?
या विषयाशी निगडीत अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर आपण पुढील बहुजननामात चर्चा करीत राहू........तो पर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 13 सप्टेंबर व प्रकाशनः 14 सप्टेंबर 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)


Thursday, September 5, 2019

86 BahujanNama Pawar 4 Sept 2019


बहुजननामा-86


शूद्र शरद पवारसाहेब व श्रीमंत पेशवे फडणवीस! (भाग-1)

बहुजनांनो.... !
-1-
बहुजननामा वाचकांचे आजही (3Sept19) असे काही फोन आलेत की ज्यात चिंतातूरता ठासून भरलेली होती व कळकळ बेंबीच्या देठापासून येत होती. नॉनस्टॉप  अर्धा तास बोल असतांना एकाच मुद्द्यावर गाडी अडकत होती. ‘‘आता कोणीतरी भक्कम नेता निर्माण झाला पाहिजे. मजबूत संघटन झाले पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही.’’ असेच काहीतरी भरभरून बोलत होते. मी त्यांना मध्येच थांबवीत एक प्रश्न विचारला की, ‘भक्कम नेता कुठून, आकाशातून येईल काय?’ ते तेवढ्याच त्वरेने म्हणाले की, ‘‘आकाशातून कशाला, जनतेतूनच येईल. जसे फुले, शाहू, आंबेडकर निर्माण झालेत... आता बहुजन जनता अवतार कल्पना मानीत नाही.’’
यावर बरीच चर्चा झाली. इंग्रजांच्या शेवटच्या 100 वर्षांच्या काळात फुले, शाहू, गांधी, आंबेडकरांसारखे असंख्य महान-लहान नेते निर्माण झालेत. मात्र स्वातंत्र्याच्या 70 वर्षांच्या काळात एकही बहुजन-मान्य महान व भक्कम नेता का निर्माण झाला नाही? त्याचं मूळ जातीव्यवस्थेच्या वैशष्ट्यात आहे. जातीव्यवस्थेमुळे आपले सर्वांचे मेंदू इतके बधीर झाले आहेत की, साधा कॉमन सेन्सही राहीला नाही. आपलं भलं करू ईच्छिणार्‍याला आपण नेता मानला पाहिजे, असा विचार चूकूनही त्याच्या मनाला शिवत नाही. बहुतेक सर्वच बहुजन जातींना सत्ताधार्‍याच्या वा राज्यकर्त्याच्या गुलामीत राहणेच आवडते. त्यामुळे आपल्याला अन्यायातून मुक्ती देणार्‍याला नेता मानणे, हा त्याचा जात-स्वभावच नाही. आता हे झालं मोघम. फोनवरून मला काही उदाहरणे द्यावी लागलीत तेव्हा कुठे थोडंसं समोरच्यां डोक्यात घुसलं.
मी पहिलं उदाहरण दिलं तात्यासाहेब महात्मा फुलेंचं! बहुजन समाज तात्यासाहेबांचे विचार केव्हा व का मानू लागलेत? त्यांनी मुलींची शाळा काढली म्हणून का? विधवा महिलांसाठी आश्रम काढले म्हणून का? अजिबात नाही. जेव्हा राज्यकर्त्या इंग्रजांनी तात्यांच्या महान कार्याचा गौरव करीत त्यांच्या खांद्यावर ‘शॉल’ टाकली, तेव्हा बहुजनातील लोकांना कळले की, ‘‘अरे...! हा जोती तर फारच मोठा माणूस आहे.’ आणी त्यानंतर ब्राह्मणही जोतीरावांना घाबरायला लागले व बहुजनांवरची ब्राह्मणी दहशतही त्यामुळे कमी झाली. त्यानंतर त्यांच्याभोवती सर्वजातीय व सर्वधर्मीय ‘सज्जन’ माणसं जमा होऊ लागलीत. त्या काळात बहुतेक सर्वच सामाजिक सुधारकांना व सामाजिक क्रांतीकारकांना इंग्रज राज्यकर्त्यांनी ‘मान्यता’ व ‘संधी’ दिली. त्याच्या परिणामी सुधारणाही झाल्यात व काही क्रांतिकारक बदलही झालेत. या सर्वांना ‘नेता, महापुरूष वा महात्मा’ म्हणून मान्यताही मिळाली.
-2-
स्वातंत्र्योत्तर काळात फुले-शाहू-आंबेडकर-गांधींपेक्षा अनेक मोठी माणसं निर्माण झालीत, मात्र त्यांच्या खांद्यावर मान्यतेची ‘शॉल’ टाकणारे राज्यकर्ते वा सत्ताधारी नसल्याने ते बहुजनमान्य झाले नाहीत. स्वामी पेरियार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, कर्पूरी ठाकूर, शहिद बाबू जगदेव प्रसाद कुशवाह, रामस्वरूप वर्मा, त्यागमूर्ती चंदापूरी, कर्मवीर एड. जनार्दन पाटील, व्हि.पी. सिंग, लालू प्रसाद, लोहिया, कांशिराम अशी कितीतरी नांवे घेता येतील. परंतू स्वातंत्र्योत्तर काळात उदारमतवादी परकीय राज्यकर्ते (मुस्लीम व इंग्रज) नसल्यामुळे यापैकी एकही नेता महापुरूष वा महात्मा म्हणून जनमान्य होऊ शकला नाही. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचे सर्वंकष सत्ताधारी ब्राह्मण झालेत. ब्राह्मण हे स्वतःच्या जातीतूनही ‘व्हॉल्टेयर’ निर्माण होऊ देत नाहीत व इतर जातीत कुणी ‘महात्मा’ निर्माण झाला असेल तर त्याचा इतिहास तोड-मोड करून विकृत बनवून त्याला बदनाम केले जाते. एवढ्यावर भागत नसेल तर त्याला ‘प्रातःस्मरणीय’ बनवून आपल्या छावणीत ओढून घेतले जाते. आणी सगळ्यात शेवटचा जालीम उपाय म्हणजे त्याला नंबर देऊन ‘अवतार’ बनवणे. ‘महापुरूष तुमचा...पाया पडतो आमचा’! छत्रपती शिवराय हे रामदासाच्या पायावर झुकलेले आहेत, असा फोटो असलेले कॅलेंडर आतापर्यंत निघत होते. आणी हे कॅलेंडर मोठ्या अभिमानाने बहुजनांच्या घरी भींतीवर लावले जात होते.
ब्राह्मणी संस्कृतीचं एक मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ते स्वतः कुठेही युद्ध करीत नाहीत, मैदानी संघर्षही करीत नाहीत. जेथे कुठे अशी युद्ध झाली असतील वा संघर्ष झाले असतील, त्याचा इतिहास लिहीण्याचे एकमेव काम ते करतात. ते मैदानात येऊन लढत नाहीत, ते लढतात इतिहासाच्या पानांवर की जेथे त्यांना अडवणारा कोणीच बहुजन योद्धा नसतो. पुराण-इतिहासात जर कोणी महाबली बळीराजा पराक्रमी होऊन गेला तर त्याचा इतिहास (पुराणातील भाकडकथा) लिहीतांना ते एवढाच संदेश देतात की. ‘‘तुमच्या महाबली बळीराजाला आम्ही फक्त तीन लाथा घालून जमिनीत गाडलं. तुमच्या छत्रपती शिवरायांनी तलवार गाजवून ‘स्वराज्य’ स्थापन केलं, मात्र त्यांचे ‘गुरू’ रामदास व कोंडदेव होते, हे विसरू नका. आणी गुरूदक्षिणा म्हणून शिवाजी ाजाने हे स्वराज्य रामदासाच्या झोळीत टाकलं होतं.’’ पुराण काळात व इतिहास काळात जेवढेही महापुरूष बहुजनातून निर्माण झालेत त्यांचे बाप बदलणे, त्यांचा इतिहास विकृत करणे, त्यांना आपल्या छावणीत ओढून अवतार बनवणे व आपल्या छावणीची भांडी घासायला लावणे, असे सर्व प्रकार ते करतात. ‘‘महापुरूष तुमचा, पाया पडतो आमचा!’’ अशी एक टॅगलाईन ब्राह्मणवाद्यांची आहे. यातून ते एकच सिद्धांत बहुजनांवर बिंबवतात, तो सिद्धांत म्हणजे तुम्ही कितीही करा, काहीही करा, शेवटी आम्ही तुमचे बाप आहोत, भुदेव आहोत आणी सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही या देशाचे मालक आहोत, सर्वेसर्वा आहोत.
परंतू हे काही आपोआप होत नाही. त्यासाठी सतत सतर्क राहावे लागते, मेंदू सतत तेज ठेवावा लागतो, डोळे रात्रंदिन उघडे ठेवून ‘जागते’ राहावे लागते, आपले हात बांधून ठेवून बहुजनांच्या हातांना कामे ‘वाटप’ करावी लागतात, आपण स्वतः एके ठिकाणी उभे राहून बहुजनांच्या पायांना सतत ‘धावत’ ठेवावे लागतात. या बहुजनांना कुठल्याना कुठल्या व्रत-वैकल्यात, विधी-कर्मकांडात, पुजा-पाठात, मंदिर-मठात, पोथ्या-पुराणात, सण-उत्सवात, यात्रा-जत्रात ‘गुंतवून’ ठेवावे लागते. गुंतवून ठेवणे म्हणजे बारोही मास-चोबीसो तास त्यांना गुंगीत ठेवणे. म्हणजे बहुजन जे उत्पादनाचे काम करतो, ते धार्मिक गुंगीत असतांनाच करतो. म्हणजे शेतकरी आपल्या जमिनीला ‘सीता-माता’ म्हणूनच कसतो व उत्पादन काढतो. या शेतीला तो ‘औद्योगिक’ दर्जा कधीच देत नाही. त्यामुळे ही शेती कधीच नफ्यात नसते, तोट्यातच असते आणी एक दिवस हा तोटा असह्य झाला की, शेवटी तो आत्महत्त्या करून मोकळा होतो. ब्राह्मण-पुजारी, काजी, भिक्खु-भन्ते, पादरी, जंगम अशा कोणत्यातरी मठाधिपतीने मान्यता दिल्याशिवाय यांचं कोणतंही शुभ-अशुभ कार्य पार पडतच नाही. तुमचा धर्म-धम्म-पंथ कोणताही असो, ते तुम्हाला ब्राह्मणी पाशातून सोडतच नाहीत, किंवा बहुजनाला त्यांच्या ब्राह्मणी पाशात राहूनच आपल्या धर्म-धम्म-पंथाचे पालन करणे आवडते. बारोही मास-चोबिसो तास आपण ब्राह्मणी गुंगीतच!
या ब्राह्मणी गुंगीचा एक परिणाम असा होतो की, आपण आपल्या शत्रूला आदर्श मानायला लागतो, त्याची पुजा बांधायला लागतो, त्याचे पायावर लोटांगण घालायला लागतो. त्याला आपल्या घरी बोलावून दान-दक्षिणा दिल्याशिवाय चैनच पडत नाही. जेव्हा आपण ब्राह्मणाचा पाया पडतो, तेव्हा आपण त्याला पुज्य, भुदेव म्हणून त्याचा पाया पडतो. परंतू आपण त्याचा पाया पडत असतांना तो आपल्याला भक्त, अनुयायी, शिष्य समजत नाही. तो आपल्याला शत्रूच समजतो. शेवटी आपण या बहुजनाला ‘शरण’ आणलेच, आणतच राहीले पाहिजे, आणखीन जास्तीत-जास्त झुकवत ठेवले पाहिजे, त्यासाठी कोणती नवी पोथी लिहली पाहिजे, बारोही मास-चोबिसो तास तो असाच कु-विचार करीत असतो. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ब्राह्मण आपल्या शत्रूला कधीच माफ करीत नाही, मग तुम्ही त्याच्या कितीही पाया पडा, त्याला दान-दक्षिणा द्या, त्याला भुदेवाचा दर्जा द्या, तुम्ही त्याची कितीही सेवा करा, तो तुम्हाला शत्रूच समजतो व कायम पायाशी ठेवण्याचा प्रयत्न करतो. याचे एक ताजे उदाहरण सांगतो. कारण उदाहरण दिल्याशिवाय आमच्या बहुजनांच्या मेंदूत काही शिरतच नाही.
-3-
उदाहरण द्यायचे तर सोम्या-गोम्याचे देऊन चालत नाही, ते दिग्गज माणसाचे दिले तरच त्याला वेटेज प्राप्त होते. म्हणून मी आज तुम्हाला महाराष्ट्राचे आजचे एकमेव भाग्यविधाते व राज्याचे एकमेव साहेब असलेल्या माननीय-वंदनीय शरद पवारसाहेबांचे उदाहरण देतो. 2014च्या विधानसभा निवडणूकीत भाजप-सेना युती तुटली व नंतर भाजपच्या पेशव्यांचे लंगडे सरकार स्थापन झाले. ते सरकार पडणारच होते, कारण शिवसेनेने या पेशव्यांना ‘औरंगजेबाची औलाद’ म्हणून जाहीर केलेले होते. आपले भुदेव असलेल्या पेशव्यांचे सरकार संकटात आहे, असे दिसताच माननीय शरद पवारसाहेबांनी क्षत्रिय रामाचा अवतार धारण केला व ब्राह्मणांच्या दुसर्‍या पेशवाई सरकारला जीवदान दिले. दोनशे वर्षापूर्वीची पहिली पेशवाई ओबीसी योध्यांमुळे धोक्यात आली असतांना तत्कालीन सरंजामदार जे स्वतःला वतनदार-क्षत्रिय(?) समजत होते, ते पेशव्यांच्या मदतीला धावुन गेले व शिवरायांच्या खून्यांना जीवदान दिले. पाच हजार वर्षांपूर्वी ब्राह्मणाच्या मेलेल्या मुलाला जीवदान देण्यासाठी क्षत्रिय रामाचा अवतार धावून आला व शूद्र शंबुकाचा वध(?) करून ब्राह्मणाचा मुलगा जीवंत केला.
पवारसाहेबांनी पेशव्यांची सेवा पाच वर्षे इमाने-इतबारे केली. पेशव्यांनी आपली पेशवाई शूद्रादिअतिशूद्रांच्या विरोधात यथेच्छ राबवीली. पेशवा सरकारप्रणीत लाखांचे मराठा मोर्चे काढून दहशत माजवीली, मराठा विरुद्ध दलित दंगली पेटवील्या, ओबीसी आरक्षणात मराठ्यांना घुसवून ओबीसींचा सत्यानाश सुरू आहे, ओबीसी आरक्षण, ओबीसी शिष्यवृत्ती, दलित-आदिवासी शिष्यवृत्ती आदि सर्व खतम झालेले आहे. आदिवासींवर होणारे अत्याचार अजून मुंबईच्या वेशीवर टांगलेच गेलेत नाही. असा सर्व पेशवाचा नंगानाच सुरू असतांना या सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे एक क्षणभरही पवारसाहेबांच्या मनात आले नाही. केवढा मोठा उदारपणा. पवारसाहेबांचे हिमालयाएवढे उपकार भाजपावर असतांना त्यांना किमान ‘राष्ट्रपती’पद दिले गेले पाहिजे होते. तशी मागणीही झाली होती. नाही राष्ट्रपतीपद तर, किमान ‘भारतरत्न’ तर हवेच होते. उपकाराची परतफेड केली पाहिजे, असा विचार बहुजन करतो, कारण तो भोळा आहे. तो शत्रूला भूदेव समजून पयावरच लोटांगण घालतो. मात्र याच्या नेमका उलट विचार मनु-महाराज करतात. शूद्र हा कितीही महान असला, ज्ञानी असला, उपकारकर्ता असला तरी तो शूद्रच असतो, शत्रूच असतो, ब्राह्मणांच्या पायाशीच त्याची जागा, असे मनूने लिहूनच ठेवले आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या उपकाराची परतफेड करणे म्हणजे मनू महाराजांशी बंडाळी करणे होय, जगात एकमेव पवित्र व शूद्ध असलेल्या आर्य-वंशाला कलंक लावून घेणे होय!. शत्रू हा शत्रूच असतो, मग त्याने आपल्यावर कितीही उपकार केले तरी... आपला आर्य-बाणा खाली पडणार नाही, याची ते नेहमीच काळजी घेतात. ब्राह्मणाच्या मुलाला जीवंत करण्यासाठी शूद्र रामाची मदत घ्यावी लागली, हा फार मोठा बट्टा आर्य वंशाला लागला होता. आणी असा बट्टा लावण्याचे पाप रामाने केले, म्हणून त्याला आत्महत्या करून जीव द्यावा लागला. होळकरांसारख्या ओबीसी योद्ध्यांमुळे पेशवाई संकटात आली असतांना तीला वाचविण्यासाठी मराठा सरंजामदार मदतीसाठी धावून आले. शूद्र मराठ्यांची मदत घेऊन पेशवाई वाचवावी लागली, हा फार मोठा बट्टा आर्यवंशाला लागला. आणी असा बट्टा लावण्याचे पाप या मराठा सरंजामदारांनी केले, म्हणून त्यांना जेलमध्ये टाकणे, वेडा ठरवून ठार करणे आदि शिक्षा देण्यात आल्यात. पेशवाई नष्ट करायला निघालेल्या यशवंतराव होळकरांना ते शिक्षा करू शकले नाहीत, कारण होळकर ओबीसी होते, योद्धे होते, आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ते ‘मर्द’ होते.
महाराष्ट्रातील फडणवीसांची दुसरी पेशवाई वाचविण्यासाठी शूद्र सरंजामदारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मदत घ्यावी लागली, हा फार मोठा कलंक आर्य वंशावर लागला, हा कलंक पुसून टाकण्यासाठी या शूद्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला खतमच केले पाहिजे. आणी मनुमहाराजांचे आदेश पाळत श्रीमंत पेशवे फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस 15 दिसात खतम करून टाकली.
शब्दमर्यादेच्या बाहेर आपण जात आहोत, म्हणून मी येथेच थांबतो..... जगलो-वाचलो तर भेटूच पुन्हा... तो पर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 3-4 सप्टेंबर व प्रकाशनः 4 सप्टेंबर 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)