http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, November 24, 2019

VBA Fall 41 to 25 November 1st 2019



वंचित बहुजन आघाडीः 41 ते 25

------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

     महाराष्ट्र विधानसभा-2019 चा निकाल जाहीर झाल्यापासून केवळ पुरोगामी वर्तुळातच नव्हे तर, प्रतिगाम्यांच्या कळपातही जोरात चर्चा सुरू आहे, ही चांगली बाब आहे. बरेच आक्षेप मांडले गेलेत. काही वैचारिक तर काही व्हल्गर! वैचारिक पातळीवरच्या आक्षेपांना माझ्यासकट अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. मी वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी वा सदस्य नाही. त्यामुळे मी त्यांचा अधिकृत प्रवक्ताही नाही. आणी असे जखडून घेणे, मला माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा वाटते. परंतू तरीही केवळ जात्यंतकच्या भुमिकेतून मी वंचित बहुजन आघाडीसाठी लिहीत असतो. आज ही पोस्ट लिहीण्याचा एकच उद्देश आहे. वंबआ वर ज्या अनेक मुद्द्यांवर आक्षेप व टिका केली गेली, त्यात अत्यंत महत्वाचा एक मुद्दा असा आहे की, वंबआने लोकसभेला 41 लाख मते घेतलीत, ती विधानसभेत वाढली पाहिजे होती. परंतू प्रत्यक्षात 25 लाख मते मिळालीत. या एकाच मुद्द्यावर मी आज लिहीणार आहे, कारण या मुद्याचे समाधानकारक विश्लेषण कोणीच करू शकलेले नाहीत. आणी म्हणून मला हस्तक्षेप करून उत्तर द्यावे लागते आहे......
महाराष्ट्रात माझ्यासारखे गल्ली-बोळात काम करणारे असंख्य ओबीसी कार्यकर्ते आहेत. ते अनेक वर्षांपासून अथकपणे प्रबोधन, संघटन चे कार्य करीत आहेत. परिणामी ओबीसी मोठ्या संख्येने भाजपा-कॉंग्रेसविरोधी झाला आहे. सरंजाम जातीची दहशत व पेशवाईच्या पार्श्वभूमीवर वंबआचा फुले-आंबेडकरी राजकीय पर्याय दिसताच जागृत ओबीसी वंबआकडे सरकला. हा जागृत ओबीसी केवळ फुले-शाहू-आंबेडकरी विचारांनी जागृत झालेला असल्याने तो जात्यंतक वंबआचाच स्वीकार करणार, तो मनसे वगैरे सारख्या पर्यायाकडे जाणे शक्यच नव्हते. वंबआने ओबीसीमधील छोट्या-छोट्या जातींना तिकीटे देऊन ब्राह्मण-मराठ्यांच्या तिकीटांवरील मक्तेदारीला धक्का दिला. लोकसभेला एकाही मराठा-ब्राह्मणाने वंबआकडे तिकीट मागीतले नाही, ही सुद्धा ओबीसींसाठी चांगली सूचक बाब होती. वंबआ हा पक्ष खरोखरच दलित-ओबीसी ऐक्याचे जात्यंतक मॉडेल ठरेल, याची ही ग्वाही होती. धनगर, माळी वगैरे जाती बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मान्य करीत राजकारणात उतरले. त्यामुळे लोकसभेत दलित व ओबीसी अशी शूद्ध जात्यंतक एकजूट मोठी आशादायी ठरली. त्यामुळेच 41 लाखावर मते वंबआला मिळाली.
परंतू विधानसभेत मात्र अनेक चूकांपैकी एकच चूक गंभीर ठरली आणी वंबआची घसरण 41 लाखावरून 25 लाखावर येऊन थांबली. ओबीसीमधील मोठा भाऊ म्हणून गणला गेलेला माळी समाज मोठ्या प्रमाणात उघडपणे वंबआशी जोडला गेला आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा ‘माळी सत्तासंपादन’ मेळावे संपन्न झालेत. माळी जातीचे बळीराम शिरस्कर गेल्या 10 वर्षांपासून आमदार असल्यामुळे दलित-ओबीसी ऐक्याला गती मिळाली होती. विद्यमान (सीटिंग) आमदार असतांना त्यांचे तिकिट बाळासाहेब आंबेडकरांनी कापले. याचा धक्का माळी समाजाला मोठ्या प्रमाणात बसला. बळीराम शिरस्कर यांचे तिकीट कापून ते दुसर्‍या कोणत्याही ओबीसी कार्यकर्त्याला दिले गेले असते तर, नाराजीचे प्रमाण कमी झाले असते. मात्र ओबीसीचे तिकीट कापून ते अशा मराठ्याला दिले गेले की, जो लाखांच्या मोर्च्यातील सहभागी मराठा होता. म्हणजे हा मराठा उमेदवार उघडपणे दलित-ओबीसीविरोधी होता, हे स्पष्ट होते. ही घटना ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. कदाचित याचाच राग येऊन बळीराम शिरस्करांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढायचे ठरवले. मी यावर लगेच शिरस्कारांना अनावृत्त पत्र पाठवीले व वंबआविरोधात बंडखोरी करू नका म्हणून विनवले. हे अनावृत्त पत्र आमच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी इतके व्हायरल केले की, त्यातून शिरस्करांवर दबाव आला व त्यांनी बंडखोरीचा निर्णय रद्द केला. या लेखातून मी त्यांचे जाहीर आभार मानतो. परंतू वैचारिक जागृती झालेला समस्त माळी समाज प्रचंड दुखावला गेला. माळी उमेदवारासोबत असे घडू शकते, तर उद्या आपल्याही जातीच्या उमेदवारासोबत घडू शकते, या शंकेने बाकीच्या ओबीसी जातीही कन्फ्युझ झाल्यात. जात-येडेपणा किती घातक असतो, याचा नुकताच ताजा अनुभव महाराष्ट्राला आलेला आहे. शरद पवार यांच्या ED प्रकरणामुळे मराठा जातीचा ईगो जागृत झाला व मरगळ आलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला मोठा बुस्ट मिळाला. मराठ्यांचा जातयेडेपणा फडणवीसांनी भडकावला आणी त्यामूळे त्यांचं स्वतःचच CM पद धोक्यात आलं !! आहे की नाही जातयेडेपणा विघातक? डिवचल्या गेलेल्या ओबीसींमधील हा जातयेडेपणा कमी करण्यासाठी मी स्वतः मैदानात उतरून प्रचार सभा घेतल्यात. डॅमेज कंट्रोल करण्याचा मी बराच प्रयत्न केला.
अर्थात काही अभ्यासकांनी MIM शी युती तुटल्याने मते कमी झालीत, असे मांडले आहे. परंतू मुस्लीमांनी लोकसभेत वंबआऐवजी कॉंग्रेसलाच मते दिलीत, हे खुद्द बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनीच सिद्ध केलेले आहे. मी सुद्धा यावर एक लेख लिहीलेला आहेच. MIM ला विधानसभेत फक्त 7 लाख मते मिळाली आहेत. आणी वंबआच्या लोकसभेतील 41 लाख व विधानसभेतील 25 लाख यात 16 लाखांचा फरक आहे, हे लक्षात घेता ओबीसी नाराजीमूळेच हा टक्का घसरला, हे सिद्ध होते.
वंबआची 41 लाखावरून 25 लाखावर घसरलेली मते ही एक गंभीर घटना समजून त्याचे पक्षपातळीवर विश्लेषण झाले पाहिजे असे, मला वाटते.
(लेखनः 31 ऑक्टो, प्रकाशनः 1 नोव्हे. 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- मी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

92 BahujanNama EVM Silence 15Nov19


बहुजननामा-92
EVM: शांतता का?

बहुजनांनो.... !
-1-
            महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर मी ईव्हिएमवरील चर्चा सुरू ठेवणारी पोस्ट टाकली होती. पण ईव्हिएमवर चर्चा करायला कोणालाच वेळ नव्हता. सगळ्यांचे लक्ष ‘कोण होणार मुख्यमंत्री’ या एकाच प्रश्नाभोवती फिरत आहे.
मी दिड वर्षांपूर्वी ‘EVM-2019’ या नावाची पुस्तिका लिहीली व गेल्या एक वर्षात EVM वर एकूण 7 लेख लिहीले आहेत. यातून मी ज्या महत्वपूर्ण मुद्यांची मांडणी केली आहे, त्यापैकी 3 मुद्दे या विधानसभा निवडणूकीत सिद्ध झालेले आहेत. त्यापैकी पहिला मुद्द हा आहे की, EVM चा उपयोग 10 टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही.
मिडियाशी बोलतांना काल (13नोव्हेंबर) रोजी अजित पवारांनी संभाव्यपणे विकल्या जाणार्‍या आमदारांना दम दिला की, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी (शि.कॉं.रा.) पक्षाचा जो आमदार भाजपकडे विकला जाईल, त्या आमदाराच्या विरोधात पुढील ईलेक्शनमध्ये (शि-कॉं-रा) या तिनही पक्षांकडून एकच उमेदवार दिला जाईल व त्याला हर प्रकारे पराभूत करण्यात येईल.’’ अजित पवारांची ही दमबाजी सत्यावर आधारित होती व आहे. सत्य हे सिद्ध झाले आहे कि, लोकसभा निवडणूकी आधी जी मेघाभरती भाजपमध्ये झाली, त्यात सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादीचे होते व त्या खालोखाल कॉंग्रेसचे होते. हे आमदार पैसे देऊन विकत घेतले गेले नाहीत. केवळ EVM च्या भरवशावर या लोकांनी आपापल्या पक्षांशी गद्दारी करून भाजपामध्ये गयाराम केले होते. त्यांचाच काय सर्वच बुद्धिमानांनी असा सोपा गैरसमज करून घेतला आहे की, ‘EVM घोटाळा भाजपच करतो आहे. भाजपचे तिकीट मिळाले की, आपण हमखास आमदार म्हणून निवडून येतो.’ पण हा फुगा फुटला. विधानसभेचा निकाल लागला आणी त्यासोबत EVM बद्दलचा उपरोक्त गैरसमजही निकाली निघाला. कारण मेघा भरतीतील 25 गयाराम आमदारांपैकी 19 आमदार सपशेल पराभूत झालेत. यातून माझे दोन मुद्दे सिद्ध होतात. एक म्हणजे EVM चा वापर 100 टक्के करता येत नाही. त्याचा फक्त 10 टक्केच वापर करता येतो व दुसरा EVM घोळ करुनही ईच्छित उमेदवार निवडून येईलच याची खात्री देता येत नाही. तिसरे म्हणजे EVM घोटाळा भाजपच काय कॉंग्रेसवगैरे पक्ष करीत नाहीत.
हे मी दोन वर्षांपूर्वी दिल्लीत प्रकाशित झालेल्या माझ्या EVM-2019 या पुस्तकात नोंद केले आहे. EVM-घोटाळा हा पोटनिवडणूका वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये केला जात नाही, हेही मी याच पुस्तकात सांगीतले आहे. देशात ज्या अनेक पोटनिवडणूका व स्थानिक पंचायतराज निवडणूका झाल्यात त्यात हा मुद्दा सिद्ध झालेला आहे. हा मुद्दा मी लोकसभा निवडणूकीनंतर लिहीलेल्या बहुजननामाच्या EVM सिरिज मध्ये पुराव्यानिशि व आकडेवारीसह सिद्ध केलेला आहे.
EVM शी संबंधित माझा हाच मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत सिद्ध झाला व भाजपाविरोधकांच्या मनातील EVM ची दहशत एकदम कमी झाली. त्या आधारावरच अजित पवार हे उपरोक्त दमबाजी करू शकलेत. सर्व जाती-धर्माच्या मतदारांनी जर सामान्यपणे वोटींग केलं तरच EVM चा घोटाळा फलदायी ठरतो. आणी जर एक किंवा दोन जाती-धर्माच्या घटकांनी असामान्यपणे कमी-जास्त वोटींग केलं तर मात्र EVM घोटाळा होऊनसुद्धा तो कुचकामी ठरतो. यासाठी महाराष्ट्र विधानसभा-2019 निवडणूकातील धुळे मतदारसंघाचे उदाहरण मी देईल. सर्व राजकीयपक्ष जात-प्रेमात व जात-द्वेषात विसर्जित झाले होते. उघडपणे झालेला दोन जातीतील जातीय-उन्माद, त्याच्या प्रतिक्रियेत झालेली इतर जातीतील उदासिनता व मुसलमानातील धार्मिक-चेव यामुळे EVM घोटाळा होऊनही धुळे मतदारसंघात ओवेसींचा अल्पसंख्यांक मुस्लीम उमेदवार निवडून आला. या उमेदवाराला फक्त 50 टक्के मुस्लीम वगळता इतर कोणीही ओळखत नव्हते. त्याने कधीही जाहीर प्रचार केला नाही, रॅली, मिरवणूकावगैरे भानगडीत तो पडला नाही. कुठेही वर्तमानपत्रात, टिव्ही मेडियावर साधी बातमी नाही की जाहीरातही नाही. सर्व मुसलमानांना हे पक्के ठाऊक होते की, मुसलमानांनी 100 टक्के वोटींग केले तरी आपला मुस्लीम उमेदवार निवडून येऊच शकत नाही. कारण ते अल्पसंख्यांक होते. निवडणूकीचे स्वरूप पक्षीय न राहता जाती-धर्मात उघडपणे झाल्यामुळे ज्या जातीधर्माचे उमेदवार उभे नव्हते ते सर्व उदासीन झालेत व वोटींगसाठी घराबाहेर पडलेच नाहीत. 49 टक्केच वोटींग झाले, तेही एकतर्फी! त्यामुळे अल्पसंख्यांक मुसलमान उमेदवार निवडून आला. असामान्य वोटींग जर झाले तर EVM घोटाळा निरस्त होतो, मी यापूर्वी अनेकवेळा सांगीतले.
महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणूकीत EVM घोटाळा निरस्त का झाला याचे कारण मी बहुजननामा-91 मध्ये विस्ताराने लिहिले आहे. असामान्य वोटींग हेच खरे कारण आहे. शेवटी EVM सेटिंग करतांना काही तर्काधिष्ठीत आडाखे व अंदाज आधी बांधले जातात. कारण हे सर्व 10 टक्क्यांमध्ये बसवायचे असते. आडाखे वा अंदाज चूकला की, EVM घोटाळा निरस्त होतो व अनपेक्षित उमेदवार निवडून येतो. फडणवीसांची 220 च्या वर जागा निवडून येण्याची गॅरंटी EVM वर जेवढी होती, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गॅरंटी त्यांना मराठा आरक्षणाने दिलेली होती. 29 नोव्हेंबर 2018 रोजी विधानसभेत त्यांनी ज्या कु-पद्धतीने मराठा-ओबीसीकरण आरक्षण बील मंजूर करून घेतले, त्याचे फळ त्यांना लोकसभा निवडणूकीत मिळाले होते. 30 टक्के मराठा-कुणबी वोटबँक ज्या भाजापाच्या पाठीशी आहे, त्याला सैतानी बहुमत मिळणे सहज शक्य होते. त्यामुळे ते निश्चिंत होते.
मात्र अतिआत्मविश्वास व त्यातून येणार्‍या मुजोरीने आत्मघात केला. 2014 च्या नवनिर्वाचित विधानसभेच्या वेळी ज्या पवारसाहेबांनी न मागता भाजपाला बाहेरून पाठींबा दिला व पवारांनीच भाजपाचे सरकार 5 वर्षे बिनधास्त चालवले, त्याच पवारसाहेबांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फडणवीसांनी तोड-फोड करून चक्काचूर केला. उपकारकर्त्याच्या विरोधात इतक्या क्रूरपणे जीवघेणे राजकारण करण्याचे धाडस फक्त चाणक्याचे शिष्यच करू शकतात. बहुजनवादी राजकारण इतके क्रूर असल्याचा एकही दाखला इतिहासात नाही. काका-पुतण्यांमध्ये, मामा-भाच्यांमध्ये, बाप-मुलामध्ये मतभेद असू शकतात. पण क्रूरपणे सामाजिक-सांस्कृतिक-राजकिय अस्तित्वच संपविण्याचे नीच कृत्य फक्त परशूरामशिष्य पुस्यमित्रशृंगसारखे हरामखोरच करू शकतात. आणी असे नीच कृत्य केल्याबद्दल ना परशूरामाला पश्चाताप ना फडणवीसाला खंत! त्यांच्यादृष्टिने तर हे फार मोठे ‘धर्मकार्य’ झाले. शंबुकाचा खून केल्यानंतर देवांनी स्वर्गात गर्दी करून रामावर ‘पुष्पवृष्टी’ केली. वेळोवेळी फडणवीसांना संपादकियातून सल्ला देणारे, त्यांची बाजू मांडणारे व वेळप्रसंगी त्यांना फटकारणारे लोकसत्तेच्या कुबेरसाहेबांसारख्या अनेक संपादकांनी फडणवीसांना या नीच ‘धर्मकार्या’पासून रोखले नाही. उलट ते फडणवीसांवर पुष्पवृष्टीच करीत राहीलेत.
गलित-गात्र करून टाकलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा जीवदान देण्याचे उपकार फडणवीसांनी करायचे ठरवले. त्यातुन त्यांचा तार्कीक आडाखा हाच होता की, 5-10 जागांवर येण्याची शक्यता असलेली राष्ट्रवादी जर 30-35 जागांवर निवडून आली तर, आपल्याला पुन्हााहेरून पाठींबा मिळेल व शिवसेनेला नेहमीप्रमाणे दबावात ठेवता येईल. म्हणून त्यांनी खोटीच ईडी नोटीस काढवली व पवारसाहेबांचे वजन वाढवले. त्यातून ‘मराठा ईगो’ जागृत झाला व संपूर्ण मराठा वोटींग कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे फिरले. मराठा-ओबीसीकरण आरक्षणामुळे आधीच ओबीसी वोटबँक फडणवीसांनी गमावली होती, त्यात आता मराठा वोटबँकही गमावली. अशा परिस्थितीत EVM घोटाळाही फडणवीसांना काही मदत करू शकला नाही, कारण त्यालाही मर्यादा आहेत. याप्रमाणे फडणवीसकृत डावपेंच त्यांच्यावरच उलटला.
EVM बाबत बहुतेक सर्वच राजकीय नेत्यांच्या भुमिका संशयास्पद आहेत. खरे म्हणजे 2018 पर्यंत एकही मोठा राजकीय नेता EVM विरोधात भुमिका घेत नव्हता. माझ्या EVM-2019 या हिंदी पुस्तिकेचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले ते माजी खासदार शरद यादव हे स्पष्टपणे म्हणाले की, EVM घोटाळा होणे शक्य नाही.’ मात्र नंतर सहा महिन्याच्या आतच हे सर्व प्रमुख विरोधी पक्षनेते राष्ट्रपतीकडे गेले व EVM बद्दल शंका व्यक्त करून बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यासाठी आग्रह धरला.
भाजपाला देशभर जे अभूतपूर्व यश मिळाले, ते केवळ EVM मुळे नाही. EVM ने तर त्यांच्या यशाला फक्त मदत केली आहे. त्यांनी RSS-संघाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ध्येय-धोरणाशी एकनिष्ठ राहून जे प्रचंड काम उभे केले, त्याच्या परिणामी लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात वोटींग केले. जेथे वोटींग कमी पडले, तेथे EVM ने मदत केली व भाजपा सैतानी बहुमताने दिल्लीत पुन्हा सत्तेवर बसलेत. भाजपाने असे कोणते प्रचंड काम केले की, जेणेकरून लोकांनी त्यांना वोटींग केले? भाजपाने फक्त आपल्या ध्येय-धोरणाशी इमान ठेवून काम केले, हा मुद्दा फार महत्वाचा. हिंदू-मुस्लीम धृवीकरण करण्यासाठी तलाकबंदी, मॉब लिंचिंग, काश्मिर, 307, राममंदिर या सारख्या मुद्दयांना सरकारी पातळीवरून आक्रमकपणे मान्यता मिळवून दिली. परिणामी या मुद्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धी माध्यमातून त्यांनी जनतेचे कु-प्रबोधन मोठ्याप्रमाणात घडवून आणले. दुसरीकडे त्यांनी राज्यस्तारावरच्या क्षत्रिय जातींना आरक्षाच्या मधाचे बोट चाखविले. महाराष्ट्रात त्यांनी 52 टक्के ओबीसींना नाराज करून मराठा ओबीसीकरण आरक्षण ज्या आक्रमकपणे व कु-पद्धतीने मिळवून दिले, त्यामुळे त्यांची क्षत्रियजातींची वोटबँक पक्की झाली. ज्या पक्षाच्या पाठीशी हिंदू वोटबँक व क्षत्रिय वोटबँक भक्कमपणे उभी आहे, त्याला सैतानी बहुमताने निवडून येण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. अशा परिस्थितीत EVM फक्त संकटकाळी वापरण्याचेच साधन म्हणून उपयोगी पडते.
याउलट आता सर्व विरोधी पक्षांची भुमिका पाहू. देशभर प्रमुख विरोधी पक्षांचे जे पानिपत झालेले आहे, ते केवळ EVM मुळे नाही. EVM ने फक्त पानिपत करण्यासाठी मदत केली आहे. विरोधकांचे पानिपत होण्याचे मूळ खरे कारण हो आहे की, तो आपल्या ध्येय-धोरणाशी नेहमीच ‘गद्दारी’ करीत असतात. ही ध्येय-धोरणे जनतेच्या ज्या समाजघटकांच्या हिताशी व जीवन-मरणाशी संबंधित असतात, ते समाज-घटक अशा ‘गद्दार’ पक्षांना वोटींग करतील, हे कसे शक्य आहे. उदाहरण दिल्याशिवाय आमच्या बहुजनांना समजत नाही, म्हणून उदाहरण देतो.
मंडल आयोगाची चळवळ गल्ली-बोळातील कार्यकर्त्यांनी उभी केली. त्यातून ओबीसींची जी जागृत वोटबँक निर्माण झाली, ती कॅश करण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री व्हि.पी. सिंगांनी

निवडणूकीतील अशा विविध गमज्यांवर पुढील बहुजननामात चर्चा करू या, तोपर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन-14 नोव्हेंबर व व प्रकाशनः 15 नोव्हेंबर 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

Tuesday, November 5, 2019

VBA election Adv Thorat and Dipak Borade in Jalna

91 BahujanNama Election Fadanvis 31Oct19


बहुजननामा-91
तेलही गेले, तुपही गेले आणी हाती धुपाटणे आले....
अर्थात- #शरद_पवार_ED_मराठा_ईगो_54_जागा_फडणवीसांचं_CM_पद_धोक्यात!!

बहुजनांनो.... !
-1-
            सर्व प्रकारचे अ-नैतिक, अ-न्यायिक व अ-संवैधानिक मार्ग अवलंबून व सर्व प्रकारची लाज-शरम खुंटीवर टांगून फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने मराठा-ओबीसीकरण आरक्षणाचे बील मंजूर करून घेतले, त्या मागे अनेक उद्देश होते व आहेत, त्यापैकी एक उद्देश होता 30 परसेंट कुणबी-मराठा वोटबँक एक गठ्ठा भक्कमपणे भाजपाच्या मागे उभी करणे. आणी ही एकगठ्टा मराठा वोटबँक खरोखर भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली, लोकसभा-2019 च्या निवडणूकांचा रिझल्ट हेच सिद्ध करतो. 30 टक्के कुणबी-मराठा वोटबँक ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षांची वोटबँक होती. 2014 ला ‘ओबीसी वोटबँक’ लुटण्यासाठी मोदींचा ओबीसी मुखवटा भाजपाने लावला आणी एक पर्याय म्हणून ओबीसींनी भाजपाला केंद्रात व राज्यांमध्ये सत्तेत आणलं. परंतू, नेहमीप्रमाणे इतिहासाची पुनर्रावृत्ती झाली. ओबीसी जे जे पर्याय शोधून काढतो, त्यावर कब्जा क्षत्रिय-जाती करतात व ओबीसींना खड्डयात घालतात. भाजपातील सर्व ओबीसी जातींच्या सक्षम नेत्यांची पद्धतशिरपणे ‘वाट’ लावण्यात आली व ब्राह्मण-मराठ्यांच्या एकतर्फी प्रभावात अधिकृतपणे ‘पेशवाईची स्थापना’ करण्यात आली. या पेशवाइने ओबीसींचे आरक्षण, ओबीसी-दलित विद्यार्थ्यांची शिष्वृती व ओबीसी विद्यार्थ्यांचे मेडिकल-इंजिनिअरिंगसारख्या उचउचशिक्षणातील आरक्षण नष्ट करण्यास सुरूवात केली. ऍट्रॉसीटी ऍक्टच्या विरोधात वातावरण तापवणे सुरू झाले. दुसरीकडे मराठा-ओबीसीकरण आरक्षण लागू करून उरले-सुरले ओबीसीपणही नष्ट केले.
न्यायिक प्रक्रियेला जातीच्या गटारीत आंघोळ घालीत अशक्यप्राय असलेले मराठा-ओबीसीकरण आरक्षण मिळाल्यानंतर 30 टक्के कुणबी-मराठा वोटबँक भाजपाची गुलाम बनली. याचा परिणाम लगेच होणार्‍या लोकसभा निवडणूकीत (24 मे-2019) दिसला. जो मुर्खपणा लोकसभा-2014 ला अखिल भारतीय ओबीसी जातींनी केला, तोच मुर्खपणा केवळ जात-स्वार्थापायी लोकसभा-2019 ला अखिल भारतीय क्षत्रिय जातींनी केला. 2014 लाच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपाला बाहेरून पाठींबा देणारी पार्टी मराठा जातीचीच होती, हा काही योगायोग नव्हता. हा बाहेरून पाठिंबा म्हणजे एक सूचक ईशारा होता की, ज्यातून पेशवाईच्या स्थापनेची दिशा स्पष्ट होत होती. ब्राह्मण व क्षत्रिय जातींच्या सूचक एकजूटीमूळे पेशवाई आपल्या कामाला लागली. दलित ओबीसींच्या आरक्षणाला ‘नख’ लावणे, ऍट्रॉसिटी एक्टच्या विरोधात लाखांचे मोर्चे काढून वातावरण तापविणे, ओबीसी आरक्षणात घुसखोरीला ‘फूस’ देणे, हे प्रकार इतके गंभीर होते की, ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र खालून-वरून ढवळून निघाला. फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या प्रभावात एकमेकांना ‘जात’ विचारण्याचे धाडस महाराष्ट्रात कोणी करीत नव्हते. मात्र लाखांच्या मोर्च्यानंतर खोडोपाडी जातीचे विष इतके भिनले की, लोक एकमेकांना बिनदिक्कत जात विचारायला लागलेत. पेशवाईत यापेक्षा वेगळे काय घडत होते?
-2-
ओबीसींचा एक गौरवशाली इतिहास आहे. ओबीसी अज्ञानात आहे तो पर्यंतच ब्राह्मण-सरंजामदार जातींची मौजमस्ती चालते. ओबीसी जागृत झाला की, वामनशाही-सरंजामशाही नेस्तनाबुत होते, हा बळीराजापासूनचा इतिहास आहे. संघ-भाजप या इतिहासाचे पारायण रोजच करीत असतो, म्हणूनच तो सतत सतर्क असतो व 24 तास डोळे गाडून ओबीसींच्या ‘’गल्ली-बोळातील’’ कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवत असतो. ब्राह्मणाला इतर कोणत्याही घटकाची भीती नाही. तो घाबरतो फक्त ओबीसी घटकाला. तामिळनाडूत रामास्वामी पेरियार यांचा पुतळा फक्त एकदाच तोडला गेला आणी ओबीसींनी किमान 100 ब्राह्मणांची पिटाई भररस्त्यात-भरदिवसा केली. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देशाच्या अनेक राज्यांमध्ये हजार वेळा तोडला गेला, परंतू आजवर कुठेही एकाही ब्राह्मणाची पिटाई झालेली नाही. यावरून ओबीसींच्या ताकदीची पुरेपूर कल्पना यायला हरकत नसावी. पुरोगाम्यांना नाही, परंतू ब्राह्मणांना त्याची पूर्ण कल्पना आहे.
महाराष्ट्रात पेशवाईची पुनर्रस्थापना होताच सर्वप्रथम ओबीसी-जागृतीचे सर्व मार्ग बंद करण्याचा सपाटा लावण्यात आला. त्यात ओबीसी आरक्षण, शिष्यवृत्ती, उच्चशिक्षण ओबीसी महामंडळ वगैरे जागृतीचे मार्ग रोखून धरलेत वा बंद केलेत. या उलट मराठा-जागृतीचे सर्व मार्ग जोरात सुरू करण्यात आले. मराठा आरक्षण, मराठा शिष्यवृत्ती, सारथी, मराठा उद्योजक निर्मीती या सारख्या करोडो रूपये खर्चून अनेक उपाय-योजना करून मराठा-जागृती करण्यात येत आहे. कारण मराठा जितका जागृत होत जातो, तितका तो अधिकाधिक जातीयवादी बनतो व पेशवाईचा संरक्षक बनतो, असा इतिहास आहे.
अशा पद्धतीने पेशवाइचे 5 वर्षीय मनुस्मृतिप्रणित मार्गक्रमण चालू असतांना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लागल्या. निवडणूक केवळ जिंकायची नसते, तर सत्ताही टिकवायची असते वा मिळवायची असते. त्यासाठी काही धोरण बनविले जाते व डावपेंच आखले जातात. 2014 चा अनूभव बघता 2019 ला डावपेचांची आखणी करण्यात आली. 2014ला 288 जागा लढवूनही भाजपाला सत्ता स्थापनेसाठी मराठा पक्षाचा बाहेरून पाठिंबा घ्यावा लागला होता. 2019 ला भाजपा फक्त 164च जागा लढत असल्याने बाहेरून पाठिंबा देणार्‍या मराठा पक्षाची गरज भासणारच! परंतू मराठ्यांचे दोन्ही पक्ष 2019लाही गलित-गात्र झालेले. त्यांना 20 जागा मिळणेही मुश्कील दिसत होते. अशा परिस्थितीत फडणविस चिंतातूर होणे स्भाविक होते. आपल्या संघ-भाजपाच्या गोठ्यात आतल्या खूंटीवर बांधलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस नावाच पक्ष आपल्या हक्काचा एक्का आहे. हा एक्का सत्ता प्राप्तीचा डाव भाजपाला निश्चितच जिंकून देईल, यात कोणतीही शंका नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला बुश्टअप करणे गरजेचे होते. परंतू कॉंग्रेससकट राष्ट्रवादीही मर्तूक-मढे बनून पराभूत मानसिकतेत निवडणूक लढवीत होती. मग ठरले की राष्ट्रवादीला बूश्टअप करण्यासाठी पिछाडीकडून जरा मोठाच दणका देऊन पुढे रेटलं पाहिजे. हा दणका असा असला पाहिजे कि, ज्याची निशाणी उमटेल राष्ट्रवादीच्या पृष्ठावर, परंतू जखम झाली पाहिजे मराठा मतदारांच्या ईगोला. झाले, ठरले आणी घडले. ईडीची नोटीस अशा एखाद्या प्रकरणावर द्यायची की, जी ईडीवरच उलटेल. लव्हासा किंवा सिंचनसारख्या भ्रष्टाचारावरून जर ईडीने नोटीस बजावली असती तर, निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असते. त्यामुळे भाजपच्याच अंगावर डाव उलटला असता. म्हणून जाणीवपूर्वक सहकारी बँकेच्या घोटाळ्यावर ईडीला नोटीस पाठविण्यास सांगीतले गेले. ठरल्याप्रमाणे ती नोटीस ईडीवर उलटली. व पवारसाहेब मराठ्यांच्या जाग्या झालेल्या ईगोवर स्वार झाले आणी त्यांची घोडदौड तुफान वेगात सुरू झाली. मराठ्यांच्या जातयेड्या पावसात पवारसाहेब अक्षरशः ओलेचिंब भिजलेत. मराठ्यांच्या जात-येडेपणाचा अंदाज फडणवीसांना आला नाही. फक्त राष्ट्रवादीलाच बुश्टअप करायचे होते. परंतू कॉंग्रेसही मराठा जातीचीच पार्टी आहे, हे फडणवीस विसरले. जखमी झालेल्या मराठा ईगोने कॉंग्रेसलाही 44 वर नेले व राष्ट्रवादीला 54 वर! आणी परीणामी फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदच धोक्यात आलं. डाव फसला म्हणण्यापेक्षा डाव उलटला आणी शिवसेनेचा वाघ उरावर येऊन बसला!
म्हणजे आधीची 52 टक्के ओबीसींची वोटबॅंक घालवून 30 टक्के कुणबी-मराठा वोटबँक कमवली होती, ती सत्तास्थापनेच्या डावपेचात घालवली. अवघ्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत ज्या मराठा वोटबँकेने भाजपाला भरभरून मते देऊन उपकाराची अंशतः परतफेड केलेली होती. त्याच मराठा वोटबँकेच्या जात-येडेपणाला भडकावून फडणवीसांनी आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतलेली आहे. याला म्हनतात- ‘तेलही गेले, तुपही गेले आणी हाती धुपाटणे आले.’ आणी शिवसेचा वाघ उरावर गुरगुरतो आहे, तो बोनस समझावा!
-3-
विधानसभा निकाल जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया दिली, ती भूजबळसाहेबांनी! भुजबळांची प्रतिक्रीया राजकीय ‘मुद्सद्दीपणाचा’ उत्तम नमूना होता. राजकारणात  शत्रूपक्षामध्ये किंवा शत्रूपक्षांमध्ये फाटाफूट होईल, असा प्रयत्न केला जातो. याला राजकीय मुत्सद्देगिरी म्हणतात. ती भुजबळांनी उत्तमप्रकारे केली. भूजबळांची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगीतले की, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद पाहिजे असेल तर त्यांनी भाजपकडे जावे, आणी जर ‘मुख्यमंत्रीपद’ पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे. भूजबळांच्या या मुत्सद्देगिरीचा चांगलाच परिणाम झाला. शिवसेनेला बळ मिळाले, भाजपाची तारांबळ उडाली. मात्र लगेच पवारसाहेबांनी भाजपाला सावरण्यासाठी भूजबळांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली. पवारसाहेब म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही शिवसेनेबरोबर जाणार नाहीत.’ वास्तविक पाहता राज्यात खर्‍या अर्थाने भाजपाचेच राज्य होते. शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षाचेच काम करीत होती. पाच वर्षात विरोधक म्हणून एकही काम कॉंग्रेस-राष्ट्रवादी करू शकली नाही. मात्र शिवसेनेने विरोधक म्हणून उत्तम काम करून दाखविले. त्यामुळे निवडणूकीत ऍन्टिइन्कंबसी फॅक्टर भाजपाशी निगडीत होता. शिवसेनेच्या बाबतीत नाही. महाराष्ट्रात जनतेचा जो रोष होता तो संपूर्ण सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या विरोधात होता व आहे, शिवसेनेच्या विरोधात नाही. भाजपाने सर्वात जास्त जागा लढविल्यामुळे ते शंभरीपर्यंत पोहोचले आहेत, त्यामागे दुसरे कोणतेही कारण नाही. भुजबळांनंतर कॉंग्रेसच्या थोरातसाहेबांनी शिवसेनेलाच साद देऊन आपले मुद्सद्देगिरीचे उत्तम राजकारण केले. जे थोरात व भूजबळ करू शकतात, ते पवारसाहेब का करू शकले नाहीत? उत्तर सगळ्यांना माहीत आहे. ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही.
हे सर्व सांगण्याचा एकच उद्देश आहे की, जर तुम्ही खरोखर जनतेशी प्रामाणिक राहून राजकारण करीत असाल तर भाजपाला सत्तेबाहेर ठेवणे, हे तुमचे परमकर्तव्य आहे. पण ते होणे नाही, कारण येथल्या सरंजाम्यांना पेशवाईच्या गुलामीची चटक लागलेली आहे.    
निवडणूकीतील अशा विविध गमज्यांवर पुढील बहुजननामात चर्चा करू या, तोपर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखनः 30 ऑक्टो व प्रकाशनः 31 ऑक्टो 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)