http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, June 27, 2020

119 BahujanNama BMFA3 Shau Lokmanthan 28June20

बहुजननामा-119
जात्यंतक साम्यवादी क्रांतीच्या पायाभरणीचे प्रणेतेः शाहू राजे (भाग-3)
-1-
‘‘अंगामाढो’’ सिरीजमधील बहुजननामाच्या चार लेखात राजकीय पर्याय उभारण्याचे तत्व मांडतांना मी कॉ. शरद पाटील यांचा संदर्भ घेऊन मार्क्स, बुद्ध, आंबेडकर यांचा समन्वय चर्चेला घेतला. ‘अंगामाढो’चे चारही भाग प्रकाशित झाल्यानंतर आमच्या काही समविचारी मित्रांनी माझे नांव न घेता माझे मुद्दे खोडून काढण्याचे काम सुरू केले. ते माझ्यासाठी स्वागतार्हच होते. मी त्या मित्रांच्या नावांचा सन्माननीय उल्लेख करून त्यांचा प्रतिवाद करणारी लेखमाला बहुजननामाच्या सदरात चालवली. मार्क्सबुद्ध आंबेडकर या बहुजननामाच्या सिरीज मधील माझ्या या तिसर्‍या लेखांकाचे शिर्षक होते- ‘‘मार्क्स व आंबेडकरः स्वीकार आणी नकार’’मात्र माझे बहुजननामा आठवड्यातून एकदाच प्रकाशित होत असल्याने मला रविवार पर्यंत थांबावे लागते. दरम्यानच्या 5-6 दिवसात बर्‍याच उलट-सुलट घटना घडून जात असतात. यावेळेस ते प्रकर्षाने झाले. माझे नाव न घेता माझे मुद्दे खोडण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू झाला. आमचे सन्माननीय मित्र प्रदिप ढोबळे यांनी प्रा. हरि नरकेंचा 14 एप्रिल 2020 चा म्हणजे अडीच महिन्यापूर्वीचा लेख आपल्या फेसबूक वॉलवर पुनर्प्रकाशीत केला. याला शूद्धपणे ‘अंगामाढो’ ची पार्श्वभूमी होती व माझे मुद्दे परस्पर हरि नरकेंच्या नावाने खोडून काढणे हाच एकमेव उद्देश होता. प्रा. नरकेंचा हा लेख करोनाच्या वृत्तपत्रबंदीमुळे मला वाचता आला नव्हता. ढोबळेसाहेबांनी तो पुनर्प्रकाशीत केल्यामुळे मला वाचता आला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
या तिसर्‍या लेखांकात मी नरकेंच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करणार होतो.
पण माझ्याआधीच माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले प्रा. रणजीत मेश्राम व केशव वाघमारे यांनी ते काम केले. त्यामुळे या तिसर्‍या लेखांकाचे नाव मला बदलावे लागत आहे. त्यात आता मी शाहू महाराजांचे नांव समाविष्ट करीत आहे. शाहू राजे हे रूढार्थाने विद्वान, तत्वज्ञानी वगैरे नव्हते. मात्र त्यांची भाषणे व कृती पाहिली तर कोणताही तत्वज्ञानी त्यांच्यासमोर नतमस्तक होतोच! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन हा मुद्दा सिद्ध केला आहे.
शाहू राजेंसमोर विद्वान, तत्वज्ञानीही नतमस्तक होतात, त्याची मूलभूत कारणे आजही दुर्लक्षित आहेत. केवळ आरक्षण देणारा राजा या एकाच मुद्द्याभोवती शाहू राजेंचे क्रांतिकारकत्व केंद्रीत केले गेले. तर, दुसरीकडे ब्राह्मो कम्युनिस्टांनी शाहू महाराजांचे मूल्यमापन ‘इंग्रजांचे हस्तक’ व ‘ब्राह्मणद्वेष्टे’ म्हणून केल्याने खरा ‘फुलेवादी-मार्क्सवादी’ शाहू राजा लोकांसमोर आलाच नाही. रशियात साम्यवादी क्रांती झाल्यानंतर तीचे स्वागत करणारा पहिला भारतीय छत्रपती शाहू महाराज होते. हे महत्वाचे आहेच, परंतू राजा असूनही कामगार क्रांतीचे समर्थन करणे, ही गोष्ट जगात कुठेही घडणे शक्य नाही. एवढ्यावर शाहू राजे थांबले नाहीत. त्यांनी कामगारांच्या सभेत जाहीरपणे ठासून सांगीतले की, भारतातल्या कामगारांनी रशियाप्रमाणे येथे कामगारांचे राज्य स्थापन करावे’. वास्तविक शाहू महाराज हे इंग्रजांचे मांडलिक होते. संस्थानातील त्यांचे क्रांतीकारक जातीअंताचे कृती-कार्यक्रम पाहता दरबारातील ब्राह्मण इंग्रजांचे कान भरत होते. ‘इंग्रजांनी शाहू राजेंना बरखास्त करावे व त्यांच्या जागी दुसरा कोणताही भटाळलेला सरंजाम नेमावा’, यासाठी तमाम महाराष्ट्रातले विद्वान ब्राह्मण व राजकारणी ब्राह्मण कसून प्रयत्न करीत होते. इंग्रज राज्यकर्ते हे भांडवली-साम्राज्यवादाचे जागतिक नेते होते. त्यामुळे ते स्वाभाविकपणे साम्यवादाचे कट्टर शत्रू होते. अशा परिस्थितीत एकीकडे वैदिक ब्राह्मणांच्या चहाड्या-चुगल्या सुरू असतांना साम्यवादविरोधी इंग्रजांच्या राज्यात साम्यवादी क्रांतीचे जाहिर सभेत गुणगान करणे व कामगारांना त्या क्रांतीसाठी आवाहन करणे, हे एक स्वाभिमानी व द्रष्टा राजाच करू शकतो. सर्वात महत्वाचे हे आहे की, त्या काळात साम्यवाद म्हणजे काय व तो कशाशी खातात, याची कवडी इतकीही जाण भारतीय जनतेला नव्हती. त्यावेळी भारतात कम्युनिस्ट पक्ष जन्मालाही आला नव्हता.  
जात्यंतासोबत वर्गांताचीही भाषा शाहू महाराज करीत असतील तर तत्कालीन ब्राह्मणांना ‘घाम’ फुटणे स्वाभाविक होते. शाहू महाराजांचे ऐकूण बहुजन तरूण जर मार्क्सवादाकडे वळलेत तर आपले ब्राह्मणी वर्चस्व नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, हे तत्कालीन ब्राह्मणांनी ओळखले व त्यांनी ताबडतोब दोन कृती-कार्यक्रम हाती घेतले. 1925 साली दोन घटना घडल्या. एकीकडे काही ब्राह्मण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करीत होते व त्याचवेळी दुसरे काही ब्राह्मण भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करीत होते. जणूकाही हे दोघे गट शाहू छत्रपतींच्या मृत्युचीच वाट पाहात होते. आर.एस.एस. ची स्थापना व कम्युनिस्ट पक्षाची स्थापना या दोन परस्परविरोधी घटना वाटत असल्या तरी त्या दोघांचा छुपा अजेंडा सारखाच होता. छुपा अजेंडा हा होता की, ‘या देशातील जातीव्यवस्थेला कोणी धक्का लावू नये. संघाच्या द्वितीय सरसंघचालकांनी कम्युनिस्टांना शत्रूच्या यादीत टाकले असले तरी ती यादी केवळ बहुजनांसाठी होती. काही मूठभर ब्राह्मण कम्युनिस्ट बनून मार्क्सला जाणव्याच्या दोरीने आवळून ठेवत असतील तर ती संघाच्या दृष्टीने आनंदाचीच बाब होती. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे जेथे ब्राह्मण नेते आहेत तेथे बहुजन जाणार नाहीत, याची खात्री गोळवलकरांना होती. दुसरी खात्री ही होती की, ‘ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली कितीही मोठी साम्यवादी क्रांती झाली, तरी ते जातीव्यवस्थेला धक्कासुद्धा लावणार नाहीत.’ खुद्द कॉम्रेड डांगे यांनीच ती खात्री जाहीरपणे देऊन टाकली. कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांनी जाहीरपणे शाहू राजेंना ब्राह्मणद्वेष्टे व इंग्रजांचे हस्तक म्हणून शिक्कामोर्तब केले. एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले दोन ब्राह्मण ‘‘आपण ब्राह्मण आहोत व एकमेकांचे मित्रच आहोत’’ याची खात्री देण्यासाठी अधूनमधून अशी सूचक वाक्ये बोलत राहतात. वर्णजातीचे समर्थन उघडपणे व आक्रमक-कृतीने करणारे बाळ-टिळक हे कम्युनिस्टांचे व संघाचे ‘‘आदर्श’’ होते, मात्र रयतेचे प्राणप्रिय शाहू राजे हे या दोन्ही संघटनांचे ‘‘शत्रू’’ होते. वैचारिक-तात्विकदृष्ट्या ज्या दोन संघटना एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत आणी तरीही त्यांचा ‘‘आदर्श’’ एकच व्यक्ती आहे व शत्रूही एकच आहे. असे अगण्य आश्चर्य जगात कोठेही घडलेले नाही व पुढे घडणारही नाही.
छत्रपती शाहू राजेंनी ना कधी मार्क्सवादाचा अभ्यास केला, ना कोणत्या क्रांतीचा! मात्र त्यांचा ‘द्रष्टेपणा’ हाच त्यांचा गुरू होता. त्यांनी द्रष्टेपणाने हे ओळखले की ‘भारतात जर साम्यवादी क्रांती व्हायची असेल तर त्यासाठी आधी जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे. आणी जातीव्यवस्था नष्ट व्हायची असेल तर त्यासाठी प्रत्येक जातीचे ‘वर्गीय’ धृवीकरण झाले पाहिजे. आरक्षणाच्या कृतीकार्यक्रमातून ‘जातीय’ धृवीकरण व औद्योगिक-भांडवली क्रांतीतून ‘वर्गीय’ धृवीकरण हे एकाचवेळी घडवून आणले तरच जातीअंत व वर्गांत होणे शक्य आहे. भांडवली-औद्योगिक क्रांतीसाठी शाहू राजेंनी पंचसूत्री कार्यक्रम आखला. औद्योगिकरणासाठी ज्या पायाभूत सुधारणा लागतात त्यात जमिन, पाणी, रस्ते आदींसाठि त्यांनी आपली तिजोरी खूली केली. उद्योगांना सरकारी जमिन विनामुल्य उपलब्ध करून दिली. उद्योगासाठी कच्चा माल निर्माण करणार्‍या शेतकर्‍यांना बिन-व्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. कारखाने उभे करण्यासाठी सरकारी तिजोरितील पैसे ‘भांडवल’ म्हणून गुंतवले. सरकारी व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांचा मिलाफ करून नवे संयुक्त उद्योग सुरू करण्याचा त्यांनी सपाटा लावला. जे उद्योग खाजगीवाल्यांनी बुडीत काढलेत, त्या उद्योगांचे ‘राष्ट्रीयकरण’ शाहू महाराजांनी केले. याला तुम्ही साम्यवादाची पायाभरणी करणारी भांडवली लोकशाही क्रांती म्हणणार की नाही?
आता शाहू छत्रपतींची ही भांडवली लोकशाही क्रांती जात्यंतक कशी होती व तीचे पुढे काय झाले, हे पुढील भागात पाहू या!....तो पर्यंत जयजोती जयभीम, सत्य की जय हो!
(लेखनः 27जून2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 28 जून 20)
लेखक-- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27
270
           ब्लॉग लिंक- http://shrwandeore.blogspot.com/


Sunday, June 21, 2020

118 BahujanNama BMFA2 Lokmanthan 21June20


बहुजननामा-118

बुद्ध व मार्क्स: हिंसा-अहिंसा(भाग-2)
-1-
भावबंदकिचे उदाहरण मी यासाठी देत आहे की, कोण हिंसक व कोण शांतता-प्रेमी याचा निर्णय करतांना जो गोंधळ होतो, तो गल्लीपासून जागतिक पातळीवरही कसा सारखा काम करतो व हिंसा-अहिंसा हा विनाकारण महत्वाचा मुद्दा का केला जातो, हे समजून यावे यासाठी हे उदाहरण मी देत आहे.
भावबंधकीचा वाद मिटविण्यासाठी ज्यांना मी न्यायनिवाडा करण्यासाठी गावात बोलावले होते, ते दोघे ‘समाज-न्यायधिश’ आमच्या ‘अ’ गटाशी कोणतीही चर्चा न करताच परतीच्या प्रवासाला निघाले होते. ‘ब’ गटाच्या घरी जेवण करतांना त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली व तटस्थ असलेल्या देवरे गुरूजींनी त्यांना नेमकी काय माहिती दिली असावी, याचा आम्हाला काही बोध होत नव्हता. मात्र तिकडे जेवण घेतल्यावर ते परस्पर परतीच्या रस्त्याला लागले आणी आम्ही बुचकाळ्यातच पडलो. चांगला योगायोग (सुदैव) असा की आमचे घर गावाबाहेर जाणार्‍या रस्त्यावरच होते, त्यामुळे ते परत जात असतांना दिसलेत. तेव्हा मी धावतच त्यांच्यापर्यंत पोहोचलो व त्यांना घरी या म्हणून विनवू लागलो. परंतू ते म्हणाले कि ‘‘आम्हाला घाई आहे, आता वेळ नाही, नंतर केव्हा तरी येऊ’’ पण मी त्यांना म्हणालो की, ‘चहा तयार आहे, फक्त दोन मिनिटांसाठी या व चहा घेऊन निघून जा!’ थोडा वेळ त्या दोघांनी एमेकांकडे पाहिले, तेव्हा मी पुन्हा संधी साधून एक चौकार हाणला. मी त्यांना सांगीतले की ‘‘साहेब हे खेडे गांव आहे. येथील लोक परंपरेला खूप जपतात. आपण आमचे निमंत्रित पाहुणे आहात, जर आपण चहा-पाणी न घेताच परस्पर निघून गेलात तर आमचे बंधू आयुष्यभर स्वतःला दोष देत बसतील व मलाही ते दोष देतील’’ माझ हा चौकार षट्कार ठरला व ते ताबडतोब गाडीतून खाली उतरून माझ्या घराकडे पायीच चालू लागलेत. पण त्यांनी माझ्याकडून वदवून घेतले की, ‘आम्ही फक्त चहाच घेणार व लगेच निघणार! मी फक्त मान डोलावून  होकार दिला. ते घरी आलेत, खाटेवर बसलेत, पाणी घेतले व लगेच चहाही आला. ते चहा पीत असतांना माझा शेतकरी असलेला भाऊ हात पुढे करीत म्हणाला, ‘‘साहेब याच खाटेवर तुम्ही जसे निरागसपणे बसून चहा पीत आहात, तसेच आम्ही तिनही भाऊ खाटेवर बसून सहज गप्पा मारीत होतो. तेव्हा जोरजोराने गल्लीतून आरडा ओरडा ऐकू आला. गल्लीत काय गोंधळ चालला आहे, हे बघण्यासाठी आम्ही घराबाहेर आलो, तर डायरेक्ट आमच्यावर काठीचा वार झाला. आम्ही तिनही भाऊ बेसावध होतो व आमच्या हातात कोणतेही हत्यार नव्हते’’. माझा भाऊ बोलत असतांना मध्येच सराफ साहेबांनी भावाला थांबविले व विचारले की, ‘‘हाणामारी नेमकी कोठे झाली?’’ तेव्हा भाऊ म्हणाले की, ‘‘येथेच आमच्या घराच्या अंगणात झाली.’’ शेतकरी-भाऊचे हे उत्तर ऐकल्याबरोबर ‘सराफ’ साहेब ताडकन उठले व त्यांनी डीके बापूंना ईशारा करीत घराबाहेर नेले. काही अंतरावर जाऊन त्यांनी आपसात कूजबूज केली व बापू तडक ‘ब’ गटाच्या घराकडे जाऊ लागलेत. सराफसाहेब आमच्या घरात आलेत व खाटेवर बसलेत. ते म्हणाले की आम्हाला जेवतांना तटस्थ-अपक्ष देवरे गुरूजींनी अशी माहिती दिली की, तुम्ही सर्व भाऊ फार हिंसक व क्रूर आहात, नेहमी हाणामारीच्या गोष्टी करतात, आतापर्यंत तुम्ही खूप हाणामार्‍या केलेल्या आहेत. आता हे गुरूजीसारख्या सुशिक्षित माणसाने सांगीतल्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास बसला व तुमच्याशी चर्चा न करताच आम्ही निघून जात होतो. परस्पर निघून जाण्याचे आणखी एक महत्वाचे कारण असे की, हाणामारीनंतर ‘ब’ गटाचेच सगळे सदस्य गंभीर जखमी झाले व दवाखान्यात दाखल झालेत. त्यावरून दुसरा मुद्दा हा सिद्ध झाला की, तुम्ही क्रूर आहात व हिंसक होऊन हाणामारी करणे हा तुमचा स्वभाव आहे. त्यावरून आमचा असाही समज झाला की, तुमच्या ‘अ’ गटानेच ‘ब’ गटावर हल्ला केला. परंतू आता तुमच्याशी चर्चा केल्यावर लक्षात आले की, ‘ब’ गटानेच तुमच्या घरी येवून तुमच्यावर बेसावधपणे हल्ला केला आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे परंतू बाकीच्या अवांतर मुद्यांचा आमच्यावर इतका जोराचा मारा करण्यात आला की, मारामारीला सुरूवात कुणी केली व हिंसक बनून कोण धावून आलेत, हे महत्वाचे मुद्दे दडपले गेलेत. मात्र आता सारा मामला आमच्या लक्षात आला आहे.
-2-
सराफ साहेबांकडून अशी प्रतिक्रिया आल्यावर माझे सगळे भाऊ थोडेसे आश्वस्त झालेत. काही वेळ शांतता पसरली, आणी सराफसाहेब पुन्हा विचारते झालेत. ‘‘परंतू तरीही माझ्या मनात एक प्रश्न शिल्लक राहतोच! तुम्ही फक्त 3 भाऊ होते व ते 6-7 सदस्य होते, तरीही त्या सर्वांना तुम्ही कसे काय गंभीर जखमी केले?’ तेव्हा माझे मोठे भाऊ उत्तरले की, ‘‘त्यालाही तेच जबाबदार आहेत’’ भाऊ लढाईचे वर्णन करीत म्हणाले- ‘‘ते जरी 6-7 होते तरी मारामारी करायला येतांना त्यांच्या प्रत्येक दोन सदस्यात एक मिनिटाचे अंतर होते, जो जास्त जोरात धावू शकत होता, तो आधी आमच्यावर वार करायला पोहोचला. आम्ही तिघे असल्याने त्याला आम्ही एका मिनिटातच गारद केला. तो जमिनीवर निपचित पडल्यावर दुसरा आमच्यापर्यंत पोहोचला व त्याला दोन झापड्या अशा काही मारल्या की, तो जीव वाचविण्यासाठी गावाबाहेर जाऊन शेतात लपला. तो पळून गेल्यावर तिसरा आम्हाला भिडला, त्यालाही आम्ही गंभीर जखमी केले. आमच्या जवळ दुसरा काहीच पर्याय नव्हता. आमच्यासाठी तो जीवन मरणाचा क्षण होता. त्यामुळे आम्ही जिवाच्या आकांताने लढलो. गटाचे सदस्य संख्येने जास्त असल्याने ते अतिआत्मविश्वासाने गाफीलपणे लढले. आम्ही जर त्यांना गंभीर जखमी केले नसते, तर ते पुन्हा उठून एकत्रित झाले असते व त्यांनी आमचे मुडदे पाडले असते. किंवा ते येतांनाच सर्वच्या सर्व एकत्रितपणे आले असते तर एकतर्फी मारामारी होऊन आमचे मुडदे पडणे निश्चित होते. कारण आमच्या हातात कोणतेही हत्यार नव्हते व आम्ही बेसावध होतो. आम्ही ही लढाई विना-हत्यार लढलो व जिंकलोत!, परंतू पोलीसांनी केवळ जखमींची संख्या मोजली व आमच्यावर गंभीर गुन्हे नोंदलेत. ब गटावरवर एकही गुन्हा नाही, कारण आमच्या गटाच्या एकाही सदस्याला साधे खरचटलेसुद्धा नाही. आम्ही पोलीसांना सर्व हकीकत सांगीतल्यावरही त्यांनी आम्हालाच गुन्हेगार ठरविण्याचा चंग बांधला आहे.’’ सराफसाहेब मध्येच म्हणाले, ‘‘तटस्थ असलेल्या देवरे गुरूजींनी सांगीतल्याप्रमाणे तुम्ही अ गटवाले जर हाणामारी प्रवृत्तीचे असते, तर तुम्ही धुर्तपणे स्वतःच्याही अंगावर आपल्याच हाताने किरकोळ जखमा करून घेतल्या असत्या, जेणेकरून ‘ब’ गटावरही गुन्हे नोंद झाले असते. परंतू तुम्ही साधी-भोळी माणसं, कायदा आपल्या फायद्याचा कसा करून घ्यावा, हे तुम्हाला माहीतच नाही. त्यामुळेच त्यांनी निवाड्यासाठीची बैठक टाळली, कारण बैठकीत पहिला प्रश्न हा विचारला गेला असता की, ‘मारण्यासाठी कोणकुणाकडे गेले? हाणामारीला सुरूवात कोणी केली व शस्त्रे कोणाकडे होती? या प्रश्नांवर त्यांचे पितळ उघडे पडले असते व त्यांना पोलीस केस मागे घ्यावी लागली असती. परंतू ही पोलीस केसच त्यांच्यासाठी मोठी फायद्याची गोष्ट ठरली आहे. कारण पोलीस, पुरावे व परिस्थिती त्यांच्या बाजून भक्कम आहे. गभीर जखमीमुळे त्यांना मोठी सहानुभूती मिळते आहे, आम्हीही या मुद्यांमुळे फसलो. परंतू आता तुम्ही काहीही चिंता करू नका, मी बरोबर न्याय करतो.’’
आमची सराफसाहेबांबरोबर चर्चा सुरू असतांनाच डी.के. बापू ‘ब’ गटाच्या सदस्यांना घेऊन आलेत. सोबत तटस्थ देवरे गुरूजी होतेच. देवरे गुरूजींना पाहताच आमचे एक भाऊ संतापले व हा गुरूजी बैठकीत नको म्हणून सांगू लागलेत. ‘हाच कळीचा नारद आहे’, असा आरोप लावल्यावर गुरूजी संतापले व बैठकीतून निघून जायला लागलेत. तेव्हा डी.के. बापू व सराफसाहोबांनी त्यांना अडवले नाही. कारण त्यांचीही खात्री झाली होती की आपणास खरी व महत्वाची माहिती या गुरूजीने दिली असती तर केव्हाचाच निवाडा झाला असता व आपल्यावर निवाडा न करताच निघून जाण्याची नामुष्की आलीच नसती.’
बैठक सुरू होण्याआधी आणखी एक महत्वाची घटना घडली. सराफसाहेब माझ्या कानाजवळ येत हळू आवाजात विचारते झाले की, ‘‘तुमच्या ‘अ’ गटात कोणी अद्वातद्वा बोलणारे कींवा शिघ्रसंतापी कुणी आहे काय?’’ ‘‘हो, सर्वात मोठा भाऊ आहे’’ मी उत्तरलो. ‘‘मग त्यांना बैठकीत नका बसू देऊ’’, अशी सूचना मला सराफ साहेबांनी केली. ‘पण तुम्ही सर्वात लहानभाऊ! ते तुमचे ऐकतील का?’, अशी शंका त्यांनी व्यक्त करताच मी म्हणालो, ते करतो मी बरोबर! मग मी माझ्या सर्वात मोठ्या भाऊंना बैठकीत येऊ नका, असे सांगीतले व त्यांनी ते लगेच मान्य केले. सराफसाहेबांनी माझ्या पाठीवर हलकेच शाबासकीची थाप मारली
बैठक सुरू झाल्यावर सराफ साहेबांनी सुरूवीलाच स्वतःचा परिचय करून देतांना म्हणाले की, ‘‘मी तुम्हाला सुटाबुटात दिसत असलो तरी मी नागपूरचा एक नामचीन माफिया-गुंड आहे. आमच्या गँगमध्येही भांडणं व मारामार्‍या होतात. तेव्हा न्यायनिवाडा मीच करतो. मी निवाडा दिल्यावर जर एखाद्या गुंडाने तो मान्य केला नाही, तर माझी माणसे त्याचे हात-पाय तोडून टाकतात. इथे तुमचा न्यायनिवाडा करण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलावलं आहे व तुम्ही दोन्ही गटांनी आम्हाला ‘न्यायधिश’ म्हणून मान्यता दिलेली आहे. इथे जो काही निर्णय होईल तो तुम्हा दोन्ही गटांना मान्य करावाच लागेल, जो कुणी मान्य करणार नाही, त्याचे हातपाय तोडण्यासाठी माझी माणसं 12 तासात येथे येऊ शकतात. आता मुद्यावर येऊ या’’ असे म्हणत सराफसाहेबांनी केक प्रश्न विचारून बैठकीतच सिद्ध करून दिले की ‘ब’ गट हाच आक्रमक-हिंसक व हाणामारी प्रवृत्तीचा आहे. ‘अ’ गटाने स्वसंरक्षणार्थ प्रतिहिंसा केली आहे व ती माफ आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी ‘ब’ गटाला आदेश देत आहे की, याबातची पोलीस केस पूर्णपणे मागे घ्यावी.’’ या प्रमाणे बाकीचे सर्व वादही सराफसाहेबांनी निकाली काढले व ते पूर्ण समाधानी होऊन परतीच्या मार्गाने आपल्या गावाकडे निघून गेलेत.
 (लेखनः 13जून2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 21 जून 20)
लेखक-- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27
27

Saturday, June 13, 2020

117 BahujanNama BMFA1 Daily Lokmanthan 14June20


बहुजननामा-117
बुद्ध व मार्क्स: हिंसा-अहिंसा (भाग-1)
-1-
बुद्ध, मार्क्स, फुले, आणी आंबेडकर या चार महापुरूषांचा विचार एकत्रितपणे मांडण्याची अधिकृत सुरूवात सर्वप्रथम डॉ. रावसाहेब कसबे यांनी केली. या विषयावरचा याच नावाचा त्यांचा महाग्रंथ महाराष्ट्रात फारच गाजला. 1967 साली चिपळूणच्या दलित साहित्य संमेलनात एका परिसंवादात आंबेडकर आणी मार्क्स यांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा रावसाहेबांनी मांडला. त्यावेळी राजाभाऊ ढालेंनी त्याला विरोध केला. परंतू ही चर्चा उत्तरोत्तर वाढतच गेली. प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटलांचा जातीअंताच्या भुमिकेवरून कम्युनिस्ट पक्षाशी असलेला संघर्ष याच काळात उघड झालेला होता. अर्थात या चर्चेची बीजे लगतच्या काळातील घडामोडींमध्येही होतीच! कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा ऐतिहासिक भुमिहिनांचा लढा जागतिक पातळीवर गाजला. त्यावेळी दादासाहेबांना कम्युनिस्ट ठरविले गेले व धोतरवाले म्हणून हिणवीले गेले. या घडामोडीचा प्रभाव तरूण विचारवंत रावसाहेबांवर पडणे स्वाभाविक होते. एका बाजूला दादासाहेब, रावसाहेब, ढसाळ, शपा आणी दुसर्‍या बाजूला बी.सी. कांबळे, ढाले, वर्गवादी-मार्क्सवादी कम्युनिस्ट अशी ही चर्चा किमान तीन पिढ्यांपर्यंत खडाजंगी चालली. याच काळात बाबासाहेबांचे ‘‘बुद्ध व कार्ल मार्क्स’’ हे भाषण ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स’’ असं शिर्षक बदलून प्रकाशित करण्यात आलं.

त्या काळात मतभेदासाठी जे मुद्दे प्रकर्षाने मांडले गेलेत त्यात हिंसा हा कळीचा मुद्दा होता. आज पुन्हा एकदा मी याच महापुरूषांचे संदर्भ घेऊन ‘‘जात्यंतक-वर्गांतक’’ पर्यायी राजकारणाची मांडणी करतो आहे. या भुमिकेला विरोध करण्यासाठी ‘हिंसा-अहिंसा व लोकशाही-हुकूमशाही’ हाच नेहमीचा मुद्दा मांडला जातो आहे. आमचे चळवळीतील जीवा-भावाचे मित्र सुनिल खोब्रागडे यांनी दुसरी बाजू मांडून चर्चेची सुरूवात केली आहे. आजच्या चर्चेत त्यांचा ‘हिंसा-अहिंसा’ हा मुद्दा घेऊ या!
सुनिल खोब्रागडे स्पष्टपणे आपल्या वैचारिक पोस्टमध्ये लिहीतात की, ‘मार्क्सवादी राजवटी हिंसा करूनच स्थापन झाल्या आहेत व प्रचंड कत्तली करून तेथे हुकूमशाही लादली गेली आहे.’ ते पुढे असेही म्हणतात की, मार्क्सच्या हयातीत क्रांतीच झालेली नाही. तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली की, फ्रान्स देशातील पॅरीस कम्युनची क्रांती खूद्द मार्क्सनेच घडवून आणलेली होती व ती लोकशाही मार्गाने निवडणूकीच्या मतपेटीतून आलेली क्रांती होती. ही साम्यवादी क्रांती फसली कारण सत्ता गमावत असलेल्या पराभूत भांडवलदारांनी लष्करी कारवाई करून ती मोडीत काढली. त्यासाठी प्रचंड हिंसाचारही झाला. मार्क्सने तो पर्यंत कुठेही हिंसेचा साधा उल्लेखसुद्धा आपल्या ग्रंथात केलेला नाही. जनतेच्या प्रबोधनातून लोकशाही मार्गानेच निवडणूकांच्या मतपेटीतूनच साम्यवादी क्रांत्या होतील, असा विश्वास बुद्धाप्रमाणेच मार्क्सचाही होता. परंतू बौद्ध राजवटींना 100 वर्षाच्या आतच हिंसेला सामोरे जावे लागले, मार्क्सला मात्र पहिल्याच क्रांतीत हिंसा भेटली आणी त्यानंतर ‘स्वसंरक्षणार्थ प्रति-हिंसा’ हे धोरण म्हणून मार्क्सवादाचा अविभाज्य भाग बनले.
बौद्ध तत्वज्ञानाला मध्यममार्ग का म्हटले गेले? एकीकडे गुलामांवर लादली जात असलेली क्रूर अमानवीय हिंसा व दुसरीकडे जैन महावीराची आत्यंतिक अहिंसा! मच्छराचीही अजाणतेपणे हिंसा होऊ नये म्हणून तोंडाला मास्क बांधणारे जैन! एकीकडे तीव्र शोषण करणारा वैदिक-ब्राह्मणी अध्यात्मवाद व दुसरीकडे चार्वाकाचा शूद्ध भौतिकवाद अशा टोकांच्या भुमिका टाळून बुद्धाने आपले मध्यममार्गी बौद्ध तत्वज्ञान तयार केले. त्यामुळे आवश्यक तेथे हिंसा करायला वा स्वीकारायला बुद्धाने परवानगी दिलेली आहे. जेव्हा मांसव्यतिरिक्त दुसरे कोणतेही अन्न भिक्षा म्हणून मिळत नसेल, तेव्हा भिक्खू संघाला मांसाहाराची परवानगी खुद्द तथागतांनीच दिलेली होती. बौद्ध धम्माला राजाश्रय देणारा एकतरी राजा दाखवा ज्याने सैन्य बाळगलेच नाही. सैन्य म्हणजे हिंसा! मग ती आक्रमणासाठी असो की स्वरक्षणासाठी! तथागत बुद्धाने लष्करातील सैनिकाला भिक्खु संघात प्रवेश का नाकारला? कारण हिंसा करणे हा त्याचा धर्म आहे आणी त्याने तो पाळला पाहिजे, अशीच भुमिका त्यामागे असणार!
सगळ्याच महापुरूषांचे एक फार मोठे दुःखद सत्य (दुर्दैव) आहे आणी ते म्हणजे त्याचा अनुयायी वर्ग! हे अनुयायी आपल्या महापुरूषाच्या तत्वज्ञानातील गाभा कोणता व आवरण कोणते यात प्रचंड गोंधळ माजवून देतात. बुद्धाच्या काळात गणराज्यांमध्ये जी युद्धे होत होती, ती थांबविण्याच्या प्रयत्नातून अहिंसेचे महत्व पुढे आणले. त्याच काळात वैदिक ब्राह्मणांनी यज्ञाच्या नावाने जी प्रचंड प्राणी हिंसा सुरू केली होती, तीला रोखण्यासाठी अहिंसेचे महत्व पुढे आणले. हिंसा-अहिंसेचा मुद्दा बुद्ध तत्वज्ञानाचा अविभाज्य भाग असूच शकत नाही. तसे असते तर एकाही राजाने बुद्ध धम्माला राजाश्रय दिलाच नसता. राजाने बुद्ध धम्म स्वीकारणे म्हणजे त्याने सर्वप्रथम सैन्य बरखास्त करणे व शस्त्रास्त्रांचे कारखाने बंद करणे, जे एकाही बौद्ध राजाने केले नाही आणी तरीही ते बौद्ध राजे म्हणूनच ओळखले जातात. याचा अर्थ स्पष्ट आहे कि अहिंसा हा तत्वज्ञानाचा भाग नाही तर तो केवळ एक प्रासंगिक विषय आहे. परंतू अनुयायांनी मात्र ओढून ताणून अहिंसेच्या मुद्द्याला प्रचंड महत्व दिले. त्याचा परिणाम असा झाला की नंतरच्या ब्राह्मणी प्रतिक्रांत्यांमध्ये बौद्ध राजांची व बौद्ध भिक्खुंची प्रचंड कत्तल झाली.
-2-
वैदिक चाणक्याने शूद्र चंद्रगुप्ताच्या मदतीने कपट कारस्थाने रचलीत व हिंसा करून बौद्ध राजा धनानंदाचा खून केला. त्या काळातील या हिंसक प्रतिक्रांतीला रोखण्यासाठी बौद्ध भिक्खूंकडे काय योजना होती, किमान त्यांची भुमिका तरी काय होती? काहीच नाही. मेलेल्या सैनिकांची प्रेते उचलणे व त्यांचा अंत्यविधी करणे एवढेच ‘अहिंसक’ काम त्यांच्यासाठी उरले होते. अहिंसावादी मार्क्सने लोकशाही मार्गाने क्रांती केली व ती शत्रू असलेल्या भांडवलदारांनी लष्कर टाकून कापून काढली, तेव्हा मार्क्सने धोरण बदलवले व ‘स्वसंरक्षणार्थ’ हिंसेला आपल्या धोरणाचा भाग बनविला. क्रांतीच्या रक्षणासाठी सशस्त्र कार्यकर्त्यांची फौज उभी केली पाहिजे, हे मार्क्सने सांगीतले. बुद्धाच्या मृत्युनंतर 100 वर्षांच्या आतच वैदिक चाणक्याने बौद्ध राजाला हिंसा करून कपटाने मारले. त्यावेळेस तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जीवंत असते तर त्यांनी ताबडतोब भिक्खु संघाची संगिति बोलावली असती व भिक्खुसंघाचे त्वरीत विभाजन करण्याचा ठराव मांडला असता. धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘प्रबोधक भिक्खूसंघ’ व धम्माच्या रक्षणार्थ सशस्त्र भिक्खुंचा ‘हिंसक’ भिक्खूसंघ असे दोन वेगळे भिक्खूसंघ स्थापन करण्याचा ठराव तथागताने संगितीत मंजूर करवून घेतला असता. पण हा क्रांतिकारी निर्णय घेणार कोण? बुद्ध तर जीवंत नव्हते व अनुयायी ‘भक्त’ बनून सुस्त झालेले. भक्तांकडे क्रांतिकारी निर्णय घेण्याची क्षमता नसते. त्याच काळात भिक्खूंचे सशस्त्र सैन्य उभारले गेले असते तर पुष्यमित्र शृंगाची हिंसक प्रतिक्रांती करण्याची हिम्मतच झाली नसती व आज देशाचा वेगळाच इतिहास वाचायला मिळाला असता.
मार्क्सच्या हयातीतच क्रांती झाली व शत्रूने ती हिंसक मार्गाने नष्ट केली. त्यामुळे मार्क्सने अहिंसेचे धोरण बदलून हिंसेचे धोरण स्वीकारले. त्यामुळेच अर्ध्या जगात साम्यवादी क्रांत्या झाल्यात व त्या क्रांत्यांनी मानवाच्या पुढील विकासाची वाट मोकळी करून दिली.
-3-
आता कोणती हिंसा योग्य व कोणती हिंसा अयोग्य, कोणता हिंसक चूक व कोणता हिंसक बरोबर, हे कोण ठरविते? आता या बाबतीतले एक प्रत्यक्षदर्शी म्हणून माझ्याच भावबंधकीचे उदाहरण देतो. माझ्या जन्मगावी देवरेंचे बरेच प्रस्थ आहे. ‘अ’ गटातील देवरेबंधू व ‘ब’ गटातील देवरेबंधू यांचा शेतावरून वाद होता. अधूनमधून कुरबुरी सुरूच असायच्यात. अनेकवेळा हमरीतुमरिवर आलेत. ‘ब’ गटाच्या देवरेंची संख्या थोडी जास्त होती व ते दबंगही होते. त्यांनी ठरविले की या भांडणाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. या देवरे युद्धाचा परिणाम असा झाला की, ‘ब’ गटाचे बहुतेक सर्वच सदस्य गंभीर जखमी अवस्थेत दवाखान्यात दाखल करावे लागलेत. गावातील बरेच लोक ‘‘इतकं मारायचं असतं का?’’ अशी हळहळ जखमी व्यक्तींबद्दल व्यक्त करीत होते व ‘अ’ गटाला दोषी ठरवित होते. कारण ‘अ’ गटाचा एकही सदस्य दवाखान्यात नेण्याइतका जखमी झालेला नव्हता. पोलिस स्टेशन, एफ.आय.आर. वगैरे सर्व प्रक्रिया पार पडली. मात्र खेडे गावात पोलीस, कोर्टकचेरीवर अवलंबून राहून निवाडे होत नाहीत. जातपंचायतच लागते. आता या जातपंचायतीचे स्वरूप बदलले आहे. आता जातसंघटना हे काम करतात. मी दोन्ही गटात समझौता करावा म्हणून माळी महासंघाच्या अध्यक्षांना भेटलो. सुप्रसिद्ध उद्योजक बापूसाहेब डी. के. माळी हे त्यावेळी माळी महासंघाचे अध्यक्ष होते. शांत स्वभावाचे डी.के. बापू एक आदरणीय व्यक्तीमत्व आहेत. त्यामुळे त्यांचा शब्द सहसा कोणी टाळत नाहीत. त्याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डी.के. बापू हे ‘ब’ गटाचे जवळचे नातेवाईक होते. त्यामुळे सर्वांनीच त्यांचा न्यायधिश म्हणून स्वीकार केला.
निवाडा करण्यासाठी जेव्हा बापू गावात आलेत तेव्हा ते साहजिकच ‘ब’ गटाच्या नातेवाईकांकडे गेलेत. त्यांचेसोबत नागपूरचे ‘सराफ’ नावाचे हुशार गृहस्थ होते. त्यांनी ‘ब’ गटाच्या घरी जेवण घेतले तेव्हा अपक्ष असलेल्या देवरे गुरूजींनाही त्यांनी बोलावून घेतले. तेथच त्यांची काहितरी चर्चा झाली व न्यायधिश न्यायनिवाडा न करताच गाडीत बसून परतीच्या रस्त्याला लागलेत.
आता या सत्यकथेचा शेवट आपण पुढील भागात करू या! तो तोपर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 13 जून 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 14 जून 20)
लेखक-- प्रा. श्रावण देवरे
 Mobile – 88 301 27
270

Saturday, June 6, 2020

116 BahujanNama cream-3 Daily Lokmanthan 7 June 2020

बहुजननामा-116
क्रिमी लेयरः लांडगा आणी बगळा (अंतिम भाग-3)
-1-
क्रिमी लेयर (दुधावरची साय) केवळ अट नसून ते शोषणाचे तत्व कसे आहे, हे आपण क्रिमी लेयरच्या पहिल्या लेखांकात (बहुजननामा-114) पाहिले, दुधावर साय (क्रिम) कसे तयार होते व ते तयार होतांनाच का व कसे नासवीले जाते, हे आपण दुसर्‍या लेखांकात (बहुजननामा-115) पाहिले. आता आपण या तिसर्‍या अंतिम लेखांकात क्रिमी लेयर तत्वाच्या मागे नेमके काय तर्कशास्त्र आहे, त्याचे समर्थन कशा पद्धतीने केले जाते व ते तत्व कसे नष्ट केले जाऊ शकते, ते आता पाहू या!
शासक व शोषक ‘‘पुरूषी जात-वर्ग’’ त्यांच्या हिताचे सिद्धांत व तत्वज्ञान जनतेवर लादत नसते, तर ते पद्धतशीरपणे गळी उतरविले जाते. त्यांना माहित असते की आपला हा सिद्धांत मूळात ‘वाईट’च आहे. त्याला असाच्या असा जनतेसमोर मांडला तर आपण उघडे-नागडे होऊ. त्यासाठी ते आपल्या सिद्धांताला सुंदर आकर्षक रंगी-बेरंगी कपडे घालून जनतेसमोर सादर करतात. त्यांना एक माहित असते की, सर्व-सामान्य जनता शिक्षित-अशिक्षित असली तरी ती भोळी व अंधश्रद्ध असते. सर्वसामान्य जनतेतल्या काही मुठभर हुशार लोकांना हे षडयंत्र लक्षात येते, परंतू अशा मूठभर लोकांवर आधीच ‘‘ब्राह्मणद्वेष्टा-मराठाद्वेष्टा’’ असा शिक्का मारलेला असतो त्यामुळे त्यांचे कुणीही ऐकत नाहीत. आपल्या सर्व महापुरूषांची अवस्था अशीच आहे. महापुरूष मेल्यावर मग त्यांचा जयजयकार केला जातो, परंतू तो पर्यंत शासक-शोषकांचा उद्देश सफल झालेला असतो.
या क्रिमी लेयरच्या कडू गोळीला वरून ‘गोड व सुंदर’ आवरण लावलेले असते. वरवर गोड लागले की ती गोळी सरळ पोटात जाते व वीष पसरविण्याचे काम फत्ते होते. क्रिमी लेयरच्या तत्वाचे असेच गोड समर्थन केले गेले. ‘‘आरक्षणाचा लाभ खर्‍या गरीब लोकांनाच मिळाला पाहिजे, त्यासाठी ओबीसीतील श्रीमंतांना आरक्षणाचा लाभ घेण्यापासून वगळले पाहिजे’’, अशी भुमिका घेत सुप्रिम कोर्टाने क्रिमी लेयर तत्व अस्तित्वात आणले. आता गरीब शब्द कानावर पडताच सर्वसामान्य माणूस लगेच ‘दयाळू’ बनतो. रस्त्यावर कुणी गरीब भिखारी दिसला कि, बरेचसे लोक पटकन खिशात हात घालतात व दोन-चार आणे देऊन टाकतात. ही मानवतावादी भुमिका उदात्त असते. त्यामुळे त्या काळात अनेक विचारवंत व नेत्यांनी सुप्रिम कोर्टाच्या क्रिमी लेयर तत्वाचे ‘चांगली अट’ म्हणून स्वागत केले.  या सर्व उदार लोकांनी पटकन ओबीसींच्या खिशात हात घातला व दोन-चार आणे देऊन टाकले. त्यामुळे या बुद्धिवंतांवर या क्रिमी लेयर अटीचे वैचारिक विश्लेषण करण्याची जबाबदारी आलीच नाही. या विचारवंतांनी क्रिमी लेयरला एक ‘तत्व’ म्हणून समजून घेतले असते तर त्यांना त्याचे वैचारिक विश्लेषण करण्याची गरज भासली असती.
कोणीही डावी वा पुरोगामी व्यक्ती (अपवाद वगळता) नेहमीच विशलेषण करतांना शोषक-शोषिताची भाषा वापरते. परंतू जातीचा संदर्भ आला की यांची भाषाच बदलते. शोषक-शोषित ऐवजी ते ‘‘गरीब-श्रीमंत’’ अशी भाषा वापरायला लागतात. वास्तविक जगाच्या पाठीवर कुठेही ‘गरीब-श्रीमंत’ असा भेद अस्तित्वाच नाही. शोषणाच्या व्यवस्थेतून वर्ग भेद, जातीभेद वा वंशभेद निर्माण होतात, गरीब-श्रीमंत भेद नाही. गरीबी वा श्रीमंती हे शोषणाचे परिणाम आहेत, शोषणाचे कारण नाहीत. एखादी व्यक्ती गरीब का आहे, तर तीच्याजवळ शोषणासाठी उत्पादन साधनांची मालकी नाही म्हणून! एखाद्या गरीबाला अचानक सट्टा-लॉटरी लागली तर त्याला आपण ‘श्रीमंत’ झाला असे म्हणतो. परंतू ते खरे नाही. सट्टा-लॉटरीच्या स्कीममध्ये असंख्य लोक आपली कमाई गमावतात व मूठभर लोक पैसे कमावतात. सट्टा-लॉटरी ही शोषणाची स्कीम आहे व श्रीमंती-गरीबी हे त्या शोषणाचे परीणाम आहेत.    
त्यामुळे जगात कोठेही गरीब-श्रीमंत असे वर्गभेद वा जातीभेद वा वंशभेद अस्तित्वात नाहीत. एखादा माणूस श्रीमंत का आहे, कारण तो सरंजामदार आहे कींवा भांडवलदार आहे म्हणून! एखादी व्यक्ती भांडवलदार का आहे, कारण त्याचेजवळ उत्पादन साधनांची मालकी आहे म्हणून! एखादा माणूस सरंजामदार का आहे, कारण त्याचे जवळ शेकडो एकर जमिनीची मालकी आहे म्हणून! ज्यांचेजवळ उत्पादन साधनांची मालकी नाही ते सर्व आपोआपच कूळ, कामगार, मजूर वा कर्मचारी बनतात व परिणामी तुलनेने गरीब राहतात.
हे सर्व विश्र्लेषण करण्याचा एकच उद्देश आहे की, क्रिमी लेयरचे तत्व हे गरीब-श्रीमंत भेदावर उभे नाही. कारण असा भेद जगात कुठेच अस्तित्वात नाही. जगात फक्त वर्गभेद, जातीभेद व वंशभेद हेच अस्तित्वात आहेत. त्यामुळे ओबीसी कॅटिगिरीचीच नव्हे तर दलित, आदिवासी सकट कोणत्याच काटिगिरीची विभागणी करतांना क्रिमी लेयर व नॉन क्रिमी लेयर (गरीब-श्रीमंत) अशी करता येणार नाही. ओबीसी कॅटिगिरीची विभागणी मंडल कमिशनचे एक सदस्य एल. आर. नाईक यांनी केली होती. त्यांची डिसेंट नोट मंडल आयोगाच्या अहवालातच जोडलेली आहे. नाईकांनी स्पष्टपणे जातीच्याच आधारावर ओबीसी कॅटिगिरीची व ओबीसी आरक्षणाची विभागणी करण्याची शिफारस केली होती.  जातीव्यवस्था ही उतरंडीची व्यवस्था असल्याने त्यात प्रत्येक जात ही तीच्या कॅटिगिरीतील वरच्या जातीपेक्षा जास्त मागास असते व खालच्या जातीपेक्षा कमी मागास असते.
उदाहरण दिले तर माझ्या शूद्रादिअतिशूद्र बांधवाला लवकर समजेल. खानदेशात आदिवासी कॅटिगिरीत कोकणी आदिवासी जमातीपेक्षा भील्ल आदिवासी जमात जास्त मागासलेली आहे. दलित कॅटिगिरीत महार जात ही इतर जातींपेक्षा जास्त पुढारलेली आहे. ओबीसी कॅटिगिरीत कुणबी, माळी जाती या इतर ओबीसी जातींपेक्षा पुढारलेल्या आहेत. सवर्ण कॅटेगिरीत ब्राह्मणजात ही क्षत्रियजाती+वैश्य-जातींपेक्षा जास्त पुढारलेली आहे. भटके-विमुक्त कॅटिगिरीत धनगर जात ही इतर भटक्या जातीपेक्षा जास्त पुढारलेली आहे. त्यामुळे मागास जातींच्या आरक्षणाची विभागणी ‘‘तुलनेने अधिक मागास जाती व तुलनेने कमी मागास जाती’’ या तत्वावरच झाली पाहिजे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी मागासलेल्या शूद्रादिअतिशूद्र जाती व पुढारलेल्या ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य जाती अशी विभागणी केली होती. ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य जाती म्हणजेच भटजी+शेटजी+लाटजी जाती, असा त्याचा अर्थ होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तात्यासाहेबांच्या या सिद्धांताचा विकास केला. तात्यासाहेबांची ही जातीय विभागणी अधिक काटेकोर करीत बाबासाहेबांनी ‘‘एस.सी.+एस.टी.+ओबीसी विरूद्ध ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य जाती ’’ अशी परिपूर्ण व रास्त जातीय विभागणी केली. यात कुठेही ‘‘गरीब-श्रीमंत’’ अशी विभागणी नाही. आणी तरीही सुप्रिम कोर्ट व त्यांचे सत्ताधारी मालक क्रिमी-नॉन क्रिमीच्या नावाने गरीब-श्रीमंत असा अप्रस्तूत भेद मागास जातींवर का लादत आहेत?
आरक्षण हे गरीबांनाच मिळाले पाहिजे, असे जेव्हा सत्ताधारी जाती म्हणतात, तेव्हा ते शूद्रादीअतिशूद्र जातीतील गरीबांची काळजी घेत आहेत, असे चित्र उभे राहते. या उच्च जातीय सत्ताधार्‍यांना मागास जातीतील गरीबांची एव्हढीच काळजी होती, तर मग त्यांच्या आरक्षणासाठी किती टिळक, किती गांधी, किती नेहरू व किती अटलबिहारी लढलेत? फुले-शाहू-आंबेडकर या शूद्रादिअतिशूद्र जातीतील नेत्यांनाच का लढावे लागले? उच्चजातीय सत्ताधार्‍यांना मागास जातीतील गरीबांची आठवण केव्हा येते? जेव्हा त्यांना आरक्षण मिळायला लागले तेव्हा! त्या आधी ते एकूणच मागास जातीच्या आरक्षणाला विरोध करीत होते. तेव्हा त्यांना मागास जातीतील गरीबांची काळजी का वाटली नाही?
मागास जातीतील आरक्षणाचा लाभ घेऊन जो एक सुशिक्षित मध्यम वर्ग निर्माण होत आहे, तो सत्ताधारी जातींसाठी फार मोठा धोका आहे, ही बाब ते एक मिनिटभरसुद्धा विसरायला तयार नाहीत. या शिक्षित मध्यमवर्गाला शाळा-कॉलेजातून ब्राह्मणी शिक्षण देऊन नासविले असले, तरी त्यातील बरेचसे लोक स्व-अभ्यासातून क्रांतिकारी बनतातच! त्यासाठी ते मागास जातीतून मध्यमवर्गाचे विद्रोही ‘क्रिम’ तयारच होणार नाही, अशी तत्वे अमलात आणतात. त्यापैकी एक तत्व आहे ‘क्रिमी लेयर वगळण्याचे तत्व’ होय! प्रतिनिधित्व (आरक्षण) तत्वाचा लाभ घेण्यापासून क्रिमी लेयरला वगळणे म्हणजे त्याला आपल्या जन्मदात्या मागासजातीतून ‘अलग’ पाडणे. क्रिमी लेयर कॅटिगिरीत ढकलला गेलेला माणूस असा हवेत टांगला जातो की, त्याचा मागास जातीचा आधार तुटतो व वरच्या जातीचा आधार मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा प्रकारे त्याला क्रांतीपासून तोडले जाते व अप्रत्यक्षपणे तो प्रतिक्रांतीला मददगार ठरतो.
क्रिमी लेयर तत्वामागे एकूणच आरक्षणाचे तत्व नष्ट करण्याचे षडयंत्र आहे. त्यासाठी एक ईसापनीतीचे उदाहरण देतो. एकदा लांडगेदादाने बगळेआण्नाला जेवणाचे निमंत्रण दिले. बगळेआण्णा खूश झालेत. बगळेआण्णा लांडगेदादाच्या घरी पोहोचलेत तेव्हा त्यांचे जंगी स्वागत झाले. पातेल्यातील गोड खीरीचा खमंग वास पसरलेला होता. जेवणाचे ताट तयारच होते. लांडगेदादाने ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असा श्र्लोक म्हणून जेवणाला सुरूवात केली. भरपेट जेवण झाल्यावर त्याने बगळेआण्णांकडे पाहिले, बगळे आण्णा जेवण न करताच निघून गेले होते व त्यांच्या ताटातील खीर जशीच्या तशी पडलेली होती. लांडगेदादाने ‘त्या’ ताटातील खीरही फस्त केली व वामकुक्षीला निघून गेला. बगळे आण्ना जेवण न करताच का निघून गेला? कारण लांडग्याने बगळे आण्णाला ज्या ताटात खीर वाढलेली होती ते ताट पसरट होते, त्यामुळे त्याची लांब-लांब चोच खीरमध्ये बुडतच नव्हती, तर खीर खाणार कसा? लांडग्याला मात्र पसरट भांड्यातील खीर खाता येत होती.
परंतू बगळेआण्णाही हुशार होते. काही दिवसांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा बगळेआण्णांनी लांडगेदादांचे जेवण दिल्याबद्दल आभार मानले. परतफेड म्हणून बगळेआण्णांनी लांडगेदादाला जेवणाचे आमंत्रण दिले. लांडगेदादा जेवणासाठी बगळेआण्नांच्या घरी पोहोचलेत, जंगी स्वागत झाले. जेवणाचे ताट तयारच होते. बगळेआण्णा भराभर जेवण करून ढेकर देऊ लागले. परंतू लांडगेदादा जेवण न करताच निघून गेले होते, कारण बगळेआण्णांच्या घरी जेवणासाठी जे भांडे होते ते उभट होते व त्याचे तोंड अरूंद होते (गडू वा तांब्या). त्या अरूंद भांड्यात लांडगेदादाचे तोंड घुसतच नव्हते व त्याला खीर खाताच येत नव्हती. लांडगेदादांना अद्दल घडविल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.
ही कथा सांगण्याचा उदेदेश असा की, आरक्षणाची खीर श्रीमंताला खाता येत नाही, कारण त्याला क्रिमी लेयर म्हणून आधीच पंक्तीतून हाकलून दिलेले आहे. आणी गरीबालाही ती खाता येत नाही, कारण त्या गरीबाची चोच त्या आरक्षणापर्यंत पोहोचतच नाही. आरक्षणाची खीर तशीच ताटात पडून राहते. ‘‘खीर खाण्यासाठी मागास वर्गातून पात्र उमेदवार मिळालेच नाहीत’’, असे कारण दाखवून ती खीर लांडगे-कोल्हे-कुत्रे खाऊन फस्त करतात.
क्रिमी लेयर तत्वाचे विश्लेषण करणारे आणखी असे अनेक मुद्दे आहेत. अभ्यासकांनी ‘क्रिमी लेयर’’च्या अभ्यासासाठी माझे 1993 साली प्रकाशित झालेले ‘‘मंडल आयोग व आधुनिक पेशवाई’’ हे पुस्तक वाचावे, अशी विनंती करतो. पुढच्या बहुजननामात नवा विषय घेऊन पुन्हा भेटू या!
तो तोपर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 6 जून 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 7 जून 20)
------- प्रा. श्रावण देवरे
 Mobile – 88 301 27
270