http://shrwandeore.blogspot.in/

Monday, July 30, 2018

34 BahujanNama 29 July 18 Lokmanthan आडोसा!


चौतिसावी खेप ......!   दै. लोकमंथन रविवार – 29 जुलै 2018 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-34
आडोसा!
बहुजनांनो.... !
   माझे मोठे भाऊ शेतकरी होते. मी लहान असतांना मला ते आडव्या-तिडव्या कामासाठी नेहमीच शेतात न्यायचे! एकदा शेतात काम करतांना लांबूनच एक लांडगा येतांना दिसला व भाऊने पटकन माझे बखोटे धरून मला आडोशाला नेले. लांडगा आला व शेताचे थोडे नुकसान करून निघून गेला. संध्याकाळी आजूबाजूचे शेतकरी एकत्र जमायचे व घरच्या वाटेवर चर्चा करायचे. प्रत्येजणमी कसा आडोशला गेलो व कसा जीव वाचविलायाचे रसभरीत वर्णन करीत असे. मी माझ्या भावाला एकदा म्हणालो की, किती दिवस तुम्ही अशा आडोशाला जात राहणार व तात्पुरता जीव वाचवित राहणार? ‘मग काय करू?’ भावाचा प्रतिप्रश्न. ‘जा की एकदा सामोरे आणी निकाल लावून टाका एकदाचा त्या लांडग्याचा!’ माझे उत्तर. ‘अरे, मला काय जीव स्वस्त झाला काय? मी एकटा समोर गेलो तर मरेलच!’ मी त्याला म्हणालो की, ‘या भागातल्या सर्व शेतकर्यांनी एकत्र येऊन त्याचा फडशा पाडला पाहिजे!’
एकूण निष्कर्ष असा होता की, लांडग्याशी सामना करण्यासाठी जी मानसिकता व एकजूट
आवश्यक होती, ती त्या शेतकर्यांमध्ये नव्हती. त्यामुळे लांडगा आला की कुठल्या तरी आडोशला जायचे व तात्पुरता जीव वाचवायचा हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे असायचा! वर्षोनुवर्षे हा सिलसिला चालू आहे. आडोसा घेणे ही एक ही एक मनोवृत्ती असते. आपण कमजोर व हतबल असल्याचा जबरदस्त न्युनगंड! शक्य गोष्टी व अशक्य गोष्टी अशा वर्गीकरणात अशक्यतेचे खाते भरभरून वाहत असते व शक्यता असलेल्या खात्यात दुष्काळच दुष्काळ! आपला व्यवसाय, आपली पोरं-बाळं व 2-4 किलोमिटर परिघातील आपले जवळचे नातेवाईक हेच त्याचं विश्व! व्यवसाय बदलेल, प्रदेश बदलेल, राजा बदलेल, सरदार बदलेल, काळही बदलेल पण यांचा न्युनगंड अढळच राहणार! ना कोणत्या नाविन्याचे आकर्षण, ना उत्सुकता, ना उत्सफुर्तपणा, ना कोणती महत्वाकांक्षा! शेकडो वर्षे ही मानसं जातीच्या कोषात, धर्माच्या गुंगीत व रूढी परंपरांच्या बंधनात बंदिस्त आहेत. आणी या सर्वांचे एकच कारण ते म्हणजे, ‘ते अस्थिर-असुरक्षित होताच कोणत्या तरी आडोशला जाऊन उभे राहायचे व आपला जीव तात्पुरता वाचवायचा!’
असा हा आमचा दलित-ओबीसी-आदिवासी माणूस! तात्पुरता आडोसा घेऊन काम भागवणारा! तात्यासाहेब महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळ उभारून जागृत करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षाचे धडे दिलेत, राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण दिलं, राज्यघटनेने विकासाचं आरक्षण व कायद्याचं संरक्षणही दिलं, स्वामी पेरियार, कांशिराम, व्हि.पी. सिंग अशी असंख्य महापुरूषांची रांगच खपली. तरी हा माणूस आजही आडोशाला जाऊनच आपलं काम भागवितो. यांची ही प्रवृत्ती पाहून आजच्या हुशार उच्चजातीयांनी याच्या शेतात 2-3 आडोसे उभे करून दिलेले आहेत, जेणे करून हा आडोशाला लपत राहील व लांडगा येऊन याचे शेत फस्त करीत राहील. 2-3 आडोसे यासाठी की एकाच आडोशाला जाऊन माणूस कंटाळतो. त्या एकच आडोशात मग अनेक डांस, मच्छर, विंचू येऊन याचं रक्त पिण्याचे काम करतात. मग पुढच्या वेळेस हा आडोसा बदलतो. तिथंही त्रास व्हायला लागला की मग तो तिसर्या आडोशाला जातो. तिथंही त्याचे रक्त पिणारे डांस, मच्छर, विंचू वगैरे आधिच येऊन बसलेले असतात. मग तो पुन्हा पहिल्या जुन्या आडोशाला जातो, कारण तो पर्यंत पहिला आडोसा रंग-रंगोटी करून, पावडर-लिपस्टिक लावून तयार करून ठेवलेलाच असतो.
आमचे धुळ्याचे एक ओबीसी कार्यकर्ते होते, गुलाबराव पाटील, प्युवर व खरेखुरे ओबीसी! समाजाच्या एका मिटिंगमध्ये आले नि तावाताने भाषण करू लागलेत. ‘’मी माझ्या पक्षाच्या कालच्या मिटिंगमध्ये दम देऊन आलो आहे की, ‘जर मला यावेळी पक्षाने नगरसेवकचं तिकीट दिले नाही तर मी हा पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे.’’ मिटींगमध्ये मी त्यांना एव्हढंच म्हणालो कि, तुमच्या सेवेमुळे बाळासाहेब खुश झाले आहेत, हे जेव्हा मोठ्यासाहेबांना कळले, तेव्हा त्यांनी तुमची मागणीच केली. आता इतके दिवस तुम्ही या साहेबांची सेवा केली, तशीच सेवा आता तिकडच्या पक्षात जाऊन मोठ्या साहेबांची करावी, अशी इच्छा दोघा साहेबांची आहे. मोठेसाहेब तुमची सेवा घेऊन कंटाळले कि ते तुम्हाला सांगतील, ‘’जा आता काही दिवस राहूलसाहेबांची सेवा करून या!’’ आणी मग तुमच्या राजीनाम्याची वाट न पाहता तुमची हकालपट्टी कॉंग्रेमध्ये करणायात येईल.
माझ्या या टिका-टिपणीवर मिटिंगमध्ये हास्यांचे फवारेच उडाले! पण हा प्रकार गांभिर्याने घेण्याची गरज आहे. 1885 साली आपल्या बहुजनांच्या शेतात पहिलाच आडोसा उभा केला गेला. परंतू तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले म्हणाले, ‘हा आडोसा शुद्रादिअतिशुद्रांच्या हिताचा नाही.’ याच आडोशाबद्दल बाबासाहेबही म्हणाले होते की, ‘हे जळते घर आहे, याच्या आडोशाला दलित-बहुजनांनी जाऊ नये, अन्यथा जळून खाक व्हाल!!’ बाबासाहेब पुढे म्हणाले, ‘’झोपडी जरी असली तरी, ती आपली स्वतःची असावी.’’ बाबासाहेब जेव्हा स्वतःची झोपडी बांधायला सांगतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, युद्धभुमीवरील विभाजक रेषेच्या (एल..सी. च्या) अलिकडे आडोसा उभा करणे. म्हणजे युद्ध सुरू असतांना तुमचा जीव धोक्यात आला तर तात्पुरता आडोसा तुमचा स्वतःचा असला पाहिजे जेणे करून जीवही वाचेल व पुढची लढाई नव्या जोमाने लढताही येईल. शत्रूने उभे केलेले आडोसे हे एल..सी. च्या तिकडच्या बाजूला असतात. त्या आडोशाला जाणे म्हणजे शरण जाणे किंवा आश्रयाला जाणे. आणी शत्रूंच्या आडोशाला जाणे म्हणजे शत्रूच्या राजमहालाबाहेरीलआऊट हाऊसमध्ये सुस्त पडणे. ऐन निवडणुकीच्या काळात (युद्धात) तुमच्या हातात हत्तीचे चित्र असलेला निळा झेंडा दिला जातो व लुटुपुटुची लढाई लढून तुम्ही आपल्या जनतेला मुर्ख बनवीतात.
बाबासाहेबांच्या स्वप्नातील अशीच स्वतःची एक झोपडी बांधण्यासाठी मान्यवर कांशिराम साहेबांनी आपले आयुष्य खर्ची केले. पण एक मिश्रा नावाचा शत्रू सर्वजन-मित्राचे रूप घेऊन या आपल्या झोपडीत घुसला आणी तो सर्वकाही उध्वस्त करीत आहे. 21 खासदारांच्या सख्येवरून शून्य झालेत. असे स्वतंत्र झोपडीचे प्रयत्न ओबीसी नेत्यांनीही केलेत. पण या सर्व झोपड्या भाऊबंधकी झगड्याने ग्रस्त आहेत. एकाच जातीची झोपडी सर्व बहुजनांना सामावून घेऊ शकली नाही. या सर्व एकजातीय झोपड्या केवळ सत्तेच्या बेरजेत मश्गुल राहिल्यात. फुले-आंबेडकरांनी दिलेला जातीअंताची पाया या झोपड्यांना प्राप्त झालाच नाही. त्यामुळे त्या 2014 च्या ‘’ओबीसी लाटेत’’ कुठल्याकुठे वाहूत गेल्यात.
आता तुमच्या शेतात दोनच झोपड्या (आडोसे) शिल्लक राहीलेले आहेत, आणी ते दोघे आडोसे एल..सी.च्या विरूद्द दिशेला आहेत. दोन्ही झोपड्यांचा मालक एकच आहे. त्याचे असे म्हणणे आहे कि, 5 वर्षांसाठी आमच्या ‘’’’ झोपडीत आश्रय घ्या! या झोपडीत 5 वर्षात अनेक डास मच्छर येतील व तुमचे रक्त शोषतील. तेव्हा तुम्हाला ‘’’’ झोपडीत संरक्षण मिळेल. या नव्या झोपडीतही अच्छे दिनाच्या इंतजारमध्ये तुमचे लचके तोडणारे असंख्य वाघ-सिह व रानटी क्रूर प्राणी तुमचे लचके तोडतील, पण तुम्हाला तेथे 5 वर्षे थांबावेच लागेल. कारण तुमच्या अविश्वास प्रस्तावाचे अस्त्र परतावून लावण्यासाठी आमचे दलाल-बहुजन सैन्य तयार आहे. तुमचेच भाऊबंद फितूर व गद्दार झालेले आहेत, ते आमच्या राजमहालाच्या आऊट हाऊसच्या आडोशातून लढतील व आमचा ‘’’’ राजमहाल किमान 5 वर्षांसाठी सुरक्षित ठेवतील. पाच वर्षानंतर तुम्ही पुन्हा ‘’’’ आडोशाला जाऊ शकतात. त्याला आम्ही रंग-रंगोटी करून व पावडर-लिपस्टिक लाउन सजवून ठेवले आहे.
हे ‘’’’ राजमहालात राहणारे आमचे राजपूत्र जरा जास्तच हिंसक आहेत. ते लिंचिंग करून मुसलमान, भटके-विमुक्त, गोसावी, मातंग-महार, माली-तेली-नाभिक कोणालाच सोडत नाहीत. आमच्या लाडक्या-लांडग्या सुपुत्रांना आम्ही मोकाट सोडले आहे. त्यांच्या भयंकर रानटी हल्ल्याला तुम्ही घाबरणार व सरळ आमच्याच ‘’’’ राजमहालात आश्रयाला जाणार, अशी आम्ही तजवीज करून ठेवली आहे. कारण तुमचे स्वतंत्र झोपडीवाले नेतेच तुम्हाला समजावू सांगतील की, वेगवेगळ्या जातींच्या झोपड्यात जाऊन आश्रय घेतला तर मतविभागणी होईल व पुन्हा त्या ‘’’’ राजमहालातच सत्तेचे पीक जाईल. त्यापेक्षा हा आधीचा ‘’’’ राजमहालच बरा. कारण तो शोषण करेल पण रक्त दिसू देत नाही. किमान तो लचके तरी तोडत नाही. फक्त चावतो.
शत्रूच्या बुद्धिमान चाणक्यांचा आदेश आहे की, जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी लिंचिंग वाढवा, अधिका-अधिक लोक त्रस्त व भीतीग्रस्त झाले पाहिजेत, जेणेकरून ते स्वतःचे आडोशे मतविभाजनाच्या भीतीने एकत्र करून आमच्या ‘’’’ राजमहालाच्या तटबंदीत आणून ठेवतील. या ‘’’’ राजमहालात 5 वर्षे अत्यंत शांततेत व कायदा-सुव्यवस्थेत तुमचे भरपूर शोषण होईल. तो पर्यंत आम्ही आमचा ‘’’’ राजमहाल रंग-रंगोटी करून व पावडर-लिपस्टीक लावून सजवून ठेवणार. 2019 सालच्या निवडणूकीत नवनवे जुमले तुमच्यासमोर ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला भयग्रस्त केले की तुम्ही आपोआपच आमच्या ‘’’’ किंवा ‘’’’ राजमहालाच्या आऊट-हाऊसमध्ये गर्दी करणार! तुम्ही घाबरून एकदा ‘’’’ नंतर ‘’’’ राजमहालाच्या आऊट हाऊसमध्ये संरक्षणासाठी यावे म्हणून तुमच्या मागे आता लांडगे सोडण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःच एकमेकांचे लचके तोडणार आहेत व निवाड्यासाठी आमच्याकडे येणार आहेत. मराठा-जाट वगैरेंना ओबीसीच्या पाठीमागे लावले आहे. धनगरांना आदिवासींच्या विरोधात उभे केले आहे. तेली-धोबी वगैरे दलित कॅटेगिरीत घुसण्याची मागणी करीत आहेत. मातंग बौद्धांच्या विरोधात आक्रमक होत आहेत. तिकडे ओवेशी छानपणे हिंदू-मुस्लीम विभाजन घडवून आणत आहे. ओबीसींचे व दलितांचे ‘’अबकड’’ होत असल्यामुळे तुम्ही आपसातच जाती-युद्ध करीत राहनार व आम्ही आमच्या  ‘’’’ वा ‘’’’ राजमहात बसून बिनधास्तपणे तुमच्यावर राज्य करीत राहणार आहेत. हा आहे ‘’ब्राह्मणी अजेंडा.
बहुजनांनो, ठरवा तुम्ही आता काय करायचे ते. ब्राह्मणांच्या राजमहालाच्या आऊट हाउसमध्ये राहून ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यांची भांडी घासायची की स्वतःची झोपडी भक्कम करून स्वाभिमानाचे जीवन जगायचे? स्वतःचा पर्याय उभा केल्याशिवाय तुमची मुक्ती होणे शक्य नाही. आणी हा पर्याय तिसरी-चौथी आघाडीसारखा नंबरवाला नसावा, तर तो स्पष्टपणे ‘’जात्यंतक-वर्गांतक’’ आघाडीचा असावा. त्यासाठी आपल्या वर्ग-जातवार असलेल्या वेगवेगळ्या झोपड्या या आघाडीत सामील करून शत्रूविरोधात लढले पाहिजे. स्वतंत्र अस्तित्व असेल तरच तुमचीनिर्णयशक्तीव हस्तक्षेप करण्याची शक्यता जीवंत राहील. अन्यथा शत्रूच्या राजमहालांमधील आऊटहाऊसमध्ये राहून ब्राह्मणी-हिंदू राष्ट्राचे गाडगे-मडके तुमच्या तोंडाला व ढुंगणाला बांधले जाणारच आहे. चला तर एकमेकांना कडक जयभीम करीत नव्या जात्यंतक-वर्गांतक पर्यायासाठी काम सुरू या!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
                                      Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
                                       Email- s.deore2012@gmail.com

33 BahujanNama 22 July 18 Lokmanthan सद्सद्विवेकबुद्धी! सद्सद्विवेकबुद्धी!


तेहतिसावी खेप ......!   दै. लोकमंथन रविवार – 22 जुलै 2018 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-33
सद्सद्विवेकबुद्धी!
बहुजनांनो.... !
    सद्सद्विवेकबुद्धी हा मानवी जीवनप्रवाहातील सर्वात मोठा चमकदार व अमुल्य असा दागीना होय! यासाठी मानवाला हजारो वर्षांचा प्रवास करीत पुढे यावे लागले. इतर प्राण्यात व मानव प्राण्यातील ही सर्वात मोठी अमिट अशी विभाजक रेषा! ती फार कमी लोकांना स्पर्श करीत पुढे जाते. आजही बहुसंख्य लोक सर्वकाही संधी-सवलती-संपत्ती असूनही सद्सद्विवेकबुद्धीला पात्र ठरत नाहीत, यावरून लक्षात येते की हा सद्गुण प्राप्त करण्यासाठी माणसाला किती संघर्ष व त्याग करावा लागतो! तिच्या प्रभावाचा व अभावाचाही प्रत्यय वारंवार येतो. काल तो प्रत्यय देशपातळीवर आला व सर्वोच्च सभागृहात प्रतिबिंबितही झाला!
     काल लोकसभेत आर.एस.एस प्रणित भाजपा सरकारवरील अविश्वास ठराव फेटाळला गेला. अशावेळी सर्व राजकिय पक्ष(श्रेष्ठी) आपापल्या खासदारांसाठीव्हिपकाढतात व त्याप्रमाणे खासदार आपलेमतनोंदवितात. त्याची मोजणी होऊन बहुमतवाल्या पक्षाचा विजय होतो. त्याप्रमाणे सरकार पडते वा राहते. लोकशाहीचे हे गृहितक आहे, जे सर्वांना मान्य असते. पण काय गृहितक कधीच बदलत नाही का? माणूसच नियम बनवितो. राज्य व सुव्यवस्था, शांतता व विकास अशा मानवी मुल्यांच्यासाठी कायदा वा नियम बनवावे लागतात व ते पाळण्यासाठी सर्व सुज्ञलोक आग्रही असतात. पण काही लोक अचानक पुढे येतात व कायदा भंग करायला सांगतात, अव्यवस्था निर्माण करायला सांगतात. कायदाभंगसविनयकेलेला असो कीबॉम्बटाकून केलेला असो, त्यांना गुन्हेगार ठरविले जाते, जेलमध्ये कोंबले जाते व फासावरही लटकाविले जाते. कालांतराने मग हे लोक विद्रोही, असंतोषाचे जनक, बंडखोर, हुतात्मा वा महात्मा वगैरे भुषणांनी सन्मानित केले जातात. हे फार थोड्याच लोकांच्याबाबतीतच का होत असते? कारण रानटीप्राणी व मानवप्राणी यांच्यातील सद्सद्विवेकबुद्धीची विभाजक रेषा फार थोड्या लोकांना स्पर्श करून पुढे जात असते. तेच हे लोक ज्यांना आपण मोठे सुज्ञ, मसिहा, महापुरूष वगैरे म्हणतो!
     असाच एक मसिहा 1990 साली प्रधानमंत्री झाला! त्याला देशातील 52 टक्के लोकांना अधःकारमय जीवनातून बाहेर काढायचे होते, प्रकाशाकडे न्यायचे होते. मात्र अधःकारावर पोट भरणार्या लोकांना वाईट वाटले. कारण 52 टक्के लोक जागृत झालेत तर हे अंधाराचे पुजारी उपासमारीने मरतील अशी भीती होती. म्हणून मग या अधःकार-प्रिय लोकांनी सर्वमान्य असलेल्या लोकशाही नियमांचा आधार घेऊन मसिहालाच गाडायचे ठरविले. पार्लमेंटमध्ये अविश्वास ठराव आला. चर्चा-महाचर्चा सुरू झाल्यात! आवाहने-प्रतिआवाहने सुरू झालीत. गुणवत्ता-दुणवत्तावर भरभरून लिहीले गेले. टिव्ही, प्रिंट मिडीया सुसाट वेगाने एकतर्फी प्रचार करू लागलेत. जाळून घेणे, जाळून टाकणेस्वस्तझाले. असे करणे लोकशाही मुल्ये ठरू लागलीत. राज्यघटनेत लिहिल्याबरहुकुम अविश्वास ठराव आला व व्हिपच्या पताका फडफडू लागल्यात. पार्टी-लाइन, पक्षश्रेष्ठी वगैरे शब्द घुमू लागलेत. लोकशाहीचाच वापर करून 52 टक्के लोकांचा गळा आवळायला निघालेले हे लोक हुकुमशाहीची पायाभरणी करीत होते. मसिहाला हे स्पष्ट दिसत होते. अशा कठिणसमयी त्याने मानवतेचे सर्वोच्च मुल्य असलेल्या सद्सद्विवेकबुध्दीचा उपयोग केला. सर्व आरोप-प्रत्यारोप ऐकूण झाल्यावर तो पार्लमेंटमध्येरिप्लायसाठी उठला आणी म्हणाला की, ‘’नो पार्टीलाईन, नो व्हिप, ना कोणी राजा, ना कोणी पक्षश्रेष्ठी! मोडून काढा ही लोकशाहीची गृहितके! फक्त आपली सद्सद्विवेकबुध्धी जागृत करा आणी अविश्वासदर्शक ठरावावर आपले मतनोंदवा!’’
     सेम घटना घडत होती परवाच्या दिवशी! 1990 ला पार्लमेंटमध्ये ज्यांनी सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेऊन हुकुमशाहीचा पाया रचला, तेच लोक आज त्याच पार्लमेंटमध्ये सत्ताधारी बाकांवर बसले होते. लोकशाहीच्याच वीटा वापरून हुकुमशाहीचा महाल बांधणारे हे लोक सत्ता टिकविण्यासाठी व्हिप काढत होते, उपस्थित राहण्याचे आदेश देत होते. पार्टीलाइनचा जयघोष करीत होते. 1990 आणी 2018. फरक एक होता आणी तोच अत्यंत महत्वाचा होता. 1990 ला सद्सद्विवेकबुद्धी जागृत करण्याचे आवाहन करणारा एकमेव मसिहा होताव्हिपी सिंग’! आज पार्लमेंटमध्ये असे आवाहन करण्याची क्षमता व पात्रता ना विरोधकात होती ना सत्ताधार्यात! सगळेच्यासगळे गुलामबुद्धिचे धनी! जे 1990 साली घडले तेच 2018लाही!
     सद्सद्विवेकबुद्धी जागविण्याची किंमतही चुकवावी लागते. 2009 2010 ला काही ओबीसी खासदारांनी पार्टीलाइन झिडकारून, पक्षश्रेष्ठींना खुंटीवर टांगून ओबीसी जनगणनेची मागणी केली. केवळ एवढेच करून ते थांबले असते तर फार काही झालेही नसते. मात्र या खासदारांनी लोकसभेला झुकवलं, ही सगळ्यात मोठी व महत्वाची घटना होती. परंतू त्यामुळे जात-श्रेष्ठींचा अहंकार दुखावला. जातश्रेष्ठी सतर्क झाले व त्यांनी 2018 पर्यंत ‘’ओबीसी जनगणनावादी’’ एकही खासदार पार्लमेंटमध्ये शिल्लक ठेवला नाही. त्यातील काहींना पार्लमेंटमधून हद्दपार केले तर काहींना जीवनातूनच हद्दपार केले, उरलेल्यांना जेलमध्ये डांबलं व दुसर्याला राजकारणातून उठविलं. किंमत तर चुकानी पडती है, फोकट मे कुछ नही मिलता!
     काल पार्लमेंटमध्ये 150 च्यावर ओबीसी खासदार उपस्थित होते. 100 खासदार दलित-आदिवासीतून होते. त्यांचीसद्सद्विवेकबुध्धीजागृत करणारा एकही मसिहा आज नाही. एक सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्ता म्हणून हे काम आपण केले पाहिजे, असे मला वाटले. आम्ही सोशल मिडियातून आवाहन केले की, ‘पार्टीलाइन झिडकारा, पक्षश्रेष्ठींना बाजूला सारा व 85 टक्के बहुजन-मुस्लीमांचे मरण असलेल्या पक्षाला ‘’अविश्वास’’ दाखवून गाडा! परंतू कधी पुतळे उभारून तर कधी बदनामीची पुस्तके लिहून महापुरूषालाच गाडायला निघालेले हे लोक सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काय ऐकणार?? कोणाची सद्सद्विवेकबुद्धी कशी समजून घेणार? पण लक्षात ठेवा सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या लोकांबरोबर राहाल तरच माणूस म्हणून स्वाभिमानाने जगू शकाल! अन्यथा जनावरांपेक्षाही वाइट हाल करणारे जीवन या देशात लाखो लोक शेकडो वर्षांपासून जगतच आहेत. त्यातील काही लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रबुद्ध महापुरुषाची वाट धरली आणी त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झाली. आज ते सन्मानाचे जीवन जगत आहेत. ओबीसी जनतेलाही सुबद्ध व्हावेच लागेल. तरच तुमच्यातील सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेली व्यक्ती ओळखू शकाल! या प्रबुद्ध व्यक्तीला फॉलो केले तर भुलभुलैय्या करणारे नेते कुठल्याकुठे उडून जातील. हा प्रबुद्ध माणूसच तुम्हाला अधःकारमय जीवनातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल!
फुले-आंबेडकरी शिक्षणामुळे आज प्रत्येक जातीत विद्वान निर्माण झाले आहेत. हे विद्वान समाजाने ओळखले तर पूर्ण समाजच बुद्धिमान होऊन अन्यायाविरूद्ध संघर्षास तयार होईल. मात्र या विद्वानांना झाकून ठेवण्यासाठी व त्यांच्या जातीला विद्वानांपासून लांब ठेवण्यासाठी अक्कलशून्य नेते प्रत्येक जातीत निर्माण केले जात आहेत. त्यांना भरपूर प्रसिद्धी देऊन, साधने-सवलती देऊन ‘’मोठा’’ बनविले जाते, परिणामी समाजास योग्य मार्गदर्शन करणार्या बुद्धिमानाला आयसोलेशनमध्ये टाकले जाते. महार जातीने आपल्यातील प्रबुद्धाला बरोबर ओळखले म्हणूनच ते आज सर्वच्या सर्व ‘’प्रबुद्ध’’ होऊन तुलनेने सन्मानाचे जीवन जगत आहेत.
महारांपेक्षा माळी वगैरे तत्सम ओबीसी जातींना अशी प्रबुद्ध होण्याची संधी 100 वर्षे आधीच प्राप्त झाली होती-1848 साली! मात्र या ओबीसी जातींनी आपल्यातलाप्रबुद्धमाणूस ओळखलाच नाही, परिणामी ते अंधारातच राहिलेत. त्यांचा उध्दार करणारी सत्यशोधक चळवळ मराठ्यांनी पळवीली, ती ब्राह्मणांना विकली व त्याबदल्यात राज्यसत्ता मिळविली. कोणताही संघर्ष न करता आयत्या मिळालेल्या सत्तेचे महत्व त्यांना कधी समजलेच नाही. त्यांच्यादृष्टीने सत्ता म्हणजे ‘’आमदार-खासदार होणे, एखादा साखर कारखाना वा शिक्षणसंस्था स्थापन करणे, त्यात आपल्या नातेवाईकांची सोय लावून यथेच्छ लुट करणे’’ एवढाच! त्यामुळे यांच्या खोट्या राजकीय झगमगाटात मराठा समाजातील प्रबुद्ध लोक झाकोळले गेलेत. परिणामी आज त्यांच्यावर आरक्षण मागायची वेळ आली. आजही प्राच्यविद्यापंडित डॉ. .. साळुंखे, न्यायमुर्ती कोळसे पाटील व न्यायाधिश पी.बी. सावंतांसारखे प्रबुद्ध लोक मराठा समाजाच्या बैठकांमधून अपमानास्पद पद्धतीने बाहेर हाकलले जातात. यावरून इतकी वर्षे सत्तेत राहूनही या लोकांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झालीच नाही. त्यामुळे ते आपल्या हातातील सत्ता ब्राह्मण व वैश्यांच्या हितासाठीच राबवित राहिलेत. गरीब व वंचित जनता अधिकच गरीब होत गेली. स्वतःच्या मराठा जातीतील गरीबांनाही त्यांनी वार्यावर सोडले, परिणामी मराठा-आरक्षणाची मागणी पुढे आली.
     सद्सद्विवेक ही काही बाजारात मिळणारी वस्तू नाही. शरीर जसे सततच्या व्यायामातूनच कमवले जाऊ शकते, तसेच सद्सद्विवेकबुद्धी ही सततच्या अभ्यासातून, संघर्षातून व मानवतेवरील अढळ निष्ठेतूनच प्राप्त होऊ शकते. यात मानवतेवरची निष्ठा हा शब्द फार महत्वाचा आहे. निष्ठेअभावी तुम्ही कितीही अभ्यास करा वा संघर्ष करा, त्यातून सद्सद्ऐवजी कुबुद्धीच निर्माण होते, जी आज ब्राह्मण व तत्सम क्षत्रिय-वैश्य जातींकडे भरपूर आहे. लहानपणापासूनच सद्सद् वा कुबुद्धिचा पाया भक्कम होत असतो. आपल्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या नंतरच्या पिढ्या सद्सद्विवेकबुद्धीच्या नेतृत्वाअभावी अधःपतीत झाल्या आहेत. आता नव्याने काही कार्यक्रम हाती घेऊन पुढच्या पिढीला सद्सद्विवेकबुद्धीचे नेतृत्व मिळवू दिले पाहिजे. चला तर…. त्यासाठी एकमेकांना कडक जयभीम-जयजोती घालत नवे कार्यक्रम सुरू करू या !!!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
                                      Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
                                       Email- s.deore2012@gmail.com