http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, October 28, 2018

47 BahujanNama Lokmanthan 28 Oct 18 Chala! kamala laga!!


बहुजननामा-47
चला! ...... कामाला लागा!!
बहुजनांनो.... !   
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, निवडणूका या सामाजिक प्रबोधनाचे उत्तम साधन असतात. निवडणूकांच्या काळात सभा-समेलनं, जाहिराती-लेख, जाहिरनामे-अभिवचने    , सूचक ईशारे-उघड गुपिते, असा सगळा माहोल असतो. या काळात लोक अधिक सतर्क होतात. बहुतेक सर्वच नेत्यांच्या सभांना गर्दी करतात, ते काय बोलतात ते कान देऊन ऐकतात. वर्तमानपत्रे-साप्ताहिके काळजीपूर्वक वाचतात. कार्यालयात, चौकात, हॉटेलात, पान ठेल्यावर त्यावर खडाजंगी चर्चाही करतात. सोशल मिडिया तर भरभरून वाहत असतो. अशा काळात सामाजिक वैचारिक जनजागृती नाही करायची, तर कोणत्या काळात करायची?
बाबासाहेबांच्या सिद्धांताचा पूरेपूर उपयोग आर.एस.एस.-भाजपा करते आहे. 1991 पासूनच्या सर्वच निवडणूकीत भाजपाने राममंदिर-बाबरी मशिदिच्या नावाने भरपूर (कु) प्रबोधन केलं. त्या कुप्रबोधनाच्या परिणामी देशभर धार्मिक दंगलीही घडवून आणल्यात! म्हणजे ते केवळ वैचारिक कु-प्रबोधन करून थांबत नाहीत, तर दंगलींचा कृती-कार्यक्रमही राबवितात. परिणामी त्यांचे सत्तेवर येणे अटळ असते.
1991 च्या निवडणूकीत मसिहा व्हि.पी. सिंग यांनी ‘मंडल आयोगावर’ भरपूर प्रबोधन
केलं. मंडल आयोगाची एक शिफारस लागू करून कृती कार्यक्रम आधिच सुरू केलेला असल्याने त्यांच्या वैचारिक प्रबोधनाला भारदस्तपणाही होता. मात्र ज्या सरदारांच्या सोबतीने ते ही निवडणूक लढवीत होते, ते या लढाईत कमी पडलेत. परिणामी केंद्रात पराभूत झालेत. परंतू, तरीही व्हि.पी. सिंगांचे प्रबोधन कामी आलेच! नंतरच्या काही राज्यातील निवडणूकांमध्ये याच सरदारांचे दलित-ओबीसी पक्ष सत्तेवर आलेत. ती केवळ आणी केवळ मसिहा व्हि.पी. सिंगांची ‘’पुण्याई’’ होती. हे दलित-ओबीसी पक्ष अनेकदा आलटून पालटून सत्तेवर आलेत, परंतू मंडल आयोगाची एकही शिफारस आपल्या राज्यात लागू करू शकले नाहीत. मंडल आयोगावर एकही सभा-परिषद-मेळावा घेऊ शकले नाहीत. मंडल आयोग लागू करण्यासाठी ज्या प्रधानमंत्र्याने सत्ता कूर्बान केली व राजकीय करियर बरबाद झालं, त्या व्हि.पी. सिंगांचे स्मारक-पुतळा उभारला नाही व जयंती-पुण्यतिथीही साजरी केली नाही. कॉंग्रेस-भाजपाच्या मदतीने अल्पकाळाचे प्रधानमंत्रीपद आपल्याकडे चालून येऊ शकते या खोट्या आशावादापोटी मायावती, लालू, मुलायम, नीतीश वगैरे नेते मंडल आयोगाच्या पुढील शिफारशी लागू करीत नव्हते. कारण मंडल आयोगाची अंलबजावणी केली तर कॉंग्रेस-भाजपा-आर.एस.एस. हे नाराज होतील व आपले संभाव्य प्रधानमत्रीपद धोक्यात येईल, अशी त्यांना भीती वाटत होती. व्हि.पी. सिंगांच्या पुण्याईवर सत्ता भोगणारे हे सर्व दलित-ओबीसी पक्ष कृतघ्न निघालेत, आणी म्हणूनच दलित-ओबीसी मतदारांनी या गद्दारांना 2014 साली चितपट करून सातवं आसमान दाखविलं.
भारतात निवडणूका जवळ आल्यात की फक्त धार्मिक प्रबोधनच होत असतं व फक्त दंगलींचाच कृती-कार्यक्रम राबविला जातो. स्वतःला फुले-आंबेडकरवादी, लोहियावादी, मार्क्सवादी लेबलं लावून मिरविणारे पक्ष कधीच सामाजिक विषय घेऊन प्रबोधन करीत नाहीत. प्रत्येक निवडणूकीत यांचा एकच अजेंडा असतो. मागील निवडणूकीत ‘’कॉंग्रेस नको’’ चा अजेंडा होता, आता 2019 च्या निवडणूकीत ‘’मोदी नको’’ चा अजेंडा आहे. 2024 लाही असाच काहीतरी अदला-बदलीचा अजेंडा असणार आहे. भाजपा सत्तेवर आला तर तो कपडे काढून झोडपतो, कॉंग्रेसवाले झोडपतांना निदान कपडे तरी काढून घेत नाहीत, एवढाच काय तो फरक!
सर्व पुरोगामी म्हणविणार्‍या पक्षांनी सत्तेवर येताच केवळ मंडल आयोग व फुले-आंबेडकरी प्रबोधन या दोनच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले असते, तर 20 वर्षांपूर्वीच कॉंग्रेस-भाजपा-आर.एस.एस. खतम झाली असती व देशात-राज्यात आलपटून-पालटून दलित-ओबीसी पक्षच सत्तेवर येत राहिले असते. सत्तरीच्या दशकातच तामिळनाडूतील पुरोगामी पक्षांनी तेथील ओबीसी जागृत केला व ब्राह्मणी पक्ष खतम करण्याची क्रांती केली. त्यांच्या निवडणूकांच्या प्रबोधन अजेंड्यात दोनच मुद्दे असायचे! एक ओबीसी-दलित आरक्षणाचा व दुसरा स्वामी पेरियारांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रचार-प्रसार! गेल्या 45 वर्षांपासूनचे ओबीसींचे यशस्वी क्रांतीकारी तामिलनाडू-मॉडेल समोर असतांनाही, जर देशातील दलित-ओबीसी पक्ष त्याकडे दुर्लक्ष्य करीत असतील, तर त्यांना ‘गद्दार’पेक्षा आणखी कोणती कडक उपमा असेल तर तीही अपूर्ण पडेल.
हे सर्व पुरोगामी म्हणविणारे पक्ष ढोंगी असतात, हे सर्वांनाच माहित असते. परंतू आपले ढोंग उघडकीस येऊ नये म्हणून ते नवीन काही तरी ढोंग शोधून काढतात व त्यावर निवडणूका लढवितात. आता ‘’संविधान बचाव’’ चे नवे कातडे अंगावर घेऊन ते निवडणूकीला सामोरे जात आहेत. आणी या संविधान बचाव मोहिमेचं नेतृत्व कोण करतंय? ज्या पक्षांनी गेल्या 65 वर्षात संविधानाची प्रचंड मोडतोड केली त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोक या मोहीमेचं नेतृत्व करणार व त्यांच्या मागे सर्व पुरोगामी म्हणविणारे दलित-ओबीसी-कम्युनिस्ट पक्ष फरफटत जाणार! वास्तविक या पुरोगामी पक्षांना आपले स्वतःचे अजेंडे आहेत. दलित-ओबीसी पक्षांजवळ जातीअंताचा अजेंडा आहे. ऍट्रॉसिटी एक्टचा मुद्दा आहे. ओबीसी जनगणना वा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आहे. शबरीमला, पडदा पद्धत, तीन तलाक आदि स्त्री-मुक्तीचे मुद्दे आहेत, विद्यार्थी शिष्यवृती वगैरे मुद्दे आहेत. कम्युनिस्टांचा स्वतःचा वर्गीय अजेंडा असतो. पण नाही. आपलं स्वतःचं कमरेचं सोडून दुसर्‍याची लंगोटी घेऊन लाज झाकण्याचा हा प्रकार आहे. हमाम मे सब नंगे!
बरे, ‘संविधान बचाव’ चा मुद्दा तरी प्रामणिक आहे काय? म्हणजे हा प्रश्न मी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला नाही विचारीत! मी हा प्रश्न फुले-आंबेडकरवादी व मार्क्सवादी लेबल लावलेल्या पक्षांना विचारत आहे. संविधानाचं काय प्रबोधन आहे यांच्याकडे? कोणता कृती कार्यक्रम आहे यांच्याकडे? 5-25 डोक्यांचा एकच धरणे कार्यक्रम सोडला तर, यांच्याकडे सांगण्यासारखं काय आहे? म्हणून आजच्या बहुजननामा तर्फे मी एक कृती कार्यक्रम या ‘संविधान बचाव’वाल्यांना देत आहे.
निवडणूका जवळ आल्यात की सर्वच उमेदवारांची लगबग सुरू होते. पक्षश्रेष्ठी 6 महिने आधीच आदेश देतात, ‘’कामाला लागा!’’ पण कोणते काम? एकच काम- दररोज आपलं थोबाड वर्तमानपत्रात छापून आलं पाहिजे, चौकाचौकात फ्लेक्सबोर्ड झळकले पाहिजेत, यासाठीची धडपड म्हणजे कामाला लागणे. त्यासाठी ते काहीही फंडे करायला तयार असतात. निवडणूकीच्या शेवटच्या 10 दिवसात करोडो रूपयांचा अक्षरशः चुराडा करीत जिंकतात किंवा हरतात.
मी देत असलेला कृती कार्यक्रम अत्यंत सोपा व सहज करता येण्यासारखा आहे. आम्ही फुलेआंबेडकर विद्यापीठ संचलित सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठातर्फे या वर्षी ‘भारताचे संविधानः जसेच्या तसे’ या अभ्यासग्रंथावर परीक्षा आयोजित केलेली आहे. या अभ्यासग्रंथात भारताचे संविधान सर्व दुरूस्त्यांसह जसेच्या तसे छापलेले आहे. शिवाय संविधान समजून सांगणार्‍या तज्ञांचे लेख आहेत. न्यायमुर्ती पी. बी. सावंतांची प्रस्तावना आहे. संविधानाची जडण-घडण उकलणार्‍या चर्चा व संविधान सभेतील बाबासाहेबांची भाषणेही मराठीत छापली आहेत. केद्र सरकार व राज्य सरकारे संविधान छापतांना त्यातील फक्त 395 कलमे छापते. आणी तरीही सरकार हा ग्रंथ 400 ते 500 रूपयाला विकते. केवळ कलमे वाचून संविधान अजिबात समजत नाही. आम्ही जो संविधानाचा अभ्यासग्रंथ छापला आहे, तो वाचून संविधान पूर्णपणे समजते. असा हा परिपूर्ण ग्रंथ बाजारात 500 ते 600 रूपयात विकला जाऊ शकतो. परंतू संविधान गौरव परिक्षा देणार्‍या व्यक्तींना हा ग्रंथ आम्ही फक्त 200 रूपयात घरपोच देणार आहोत. 20 हजार संविधान ग्रंथ छापून त्यावर किमान 50 हजार परीक्षार्थी बसविण्याचा आमचा मानस आहे.
तर, 2019 च्या निवडणूका लढविणार्‍या प्रत्येक पुरोगामी उमेदवाराने आपल्या मतदारसंघातील 5 ते 10 कॉलेजेस निवडावीत. विधानसभा मतदारसंघ असेल तर किमान 5 कॉलेज व लोकसभा मतदारसंघ असले तर किमान 10 कॉलेज निवडावेत. प्रत्येक कॉलेजमधील 18 वर्षे व त्यावरील वयाची 1,000 मुलं-मुली निवडायची! त्यांना आपल्या विद्यापीठाने छापलेले 500 संविधानग्रंथ सप्रेम भेट द्यायचे! एका ग्रंथावर दोन परिक्षार्थी अभ्यास करतील व परीक्षा देतील. एका कॉलेजला 500 ग्रंथ तर पाच कॉलेजांसाठी 2,500 ग्रथ उमेदवारास विकत घ्यावे लागतील. लोकसभा मतदार संघासाठी 10 कॉलेजांना 5,000 ग्रंथ लागतील. 5 किंवा 10 लाख रूपयांच्या या कार्यक्रमात पुढील फायदे होऊ शकतात. आपल्या मतदारसंघासाठी जो संविधान अभ्यासग्रंथ छापला जाईल, त्या ग्रंथाच्या शेवटच्या कव्हरपानावर उमेदवाराचा रंगीत फोटो छापला जाईल व त्याचे कार्य-परीचय ठळकपणे छापले जाईल. या प्रकल्पाचे फायदे पुढीलप्रमाणे--------
1)  निवडणूकपूर्व मशागत आपल्या मतदारसंघाची होते.
2)  प्रत्येक कॉलेजात ग्रंथ वाटप समारंभ मोठ्या थाटामाटात करता येईल व त्यास प्रसिद्धी मिळेल.
3)  परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची परिक्षापूर्व तयारी करून घेण्यासाठी किमान दोन शिबीरे आयोजित करता येतील व त्यातून तुमची प्रसिद्धी होईल.
4)  परीक्षेच्या दिवशी तुमच्या हस्ते सीलबंद प्रश्नपत्रिकेची पाकीटे फोडून उद्घाटन होईल.
5)  परीक्षा झाल्यावर भला-मोठा बक्षीस वितरण व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करता येईल व या कार्यक्रमास पक्षश्रेष्ठींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावता येईल. विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या प्रमाणपत्रांवर आपला फोटो असेल.
6)  एवढे सर्व कार्यक्रम जर निवडणूक जाहीर होण्याआधीच संपन्न झालेत, तर तो खर्च आपल्या निवडणूक खर्चात येणारच नाही.
7)  याच तरूण विद्यार्थ्यांमधून तुम्हाला वैचारिक कार्यकर्ते मिळतील व ते तुमचा प्रचार करतील
8)  हा प्रकल्प जर राबविला तर तुमचे 5 ते 7 टक्के मतदान पक्के समजायचे.
असा संविधान बचाव मोहिमेचा कृती कार्यक्रम राबविला तर खर्‍या अर्थाने आपण लोकशाही निवडणूक लढवीली असे, म्हणता येईल.
चला तर, कामाला लागू या!...........
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
पुढील लिंकवर क्लीक करा....

Sunday, October 21, 2018

46 BahujanNama, Shram-Shramik, 21 Oct 18, Lokmanthan


बहुजननामा-46
श्रम व श्रमिकाची प्रतिष्ठा!
   बहुजनांनो.... !   
     सृष्टीच्या विकासाचे अनेक लहान-मोठे, मुख्य आणी उप असे विकासाचे विविध टप्पे असतात. या विकासात अनेक बदल होत असतात. काही मोठे होतात. काही लहान आणी काही नामशेष होतात व काही नवेही जन्म घेतात. सृष्टीचाच एक लहानसा परंतू महत्वाचा एक घटक असलेला हा मानव प्राणी! शारिरिक श्रम व बौद्धिक श्रमाच्या सुंदर संयोगातून रानटी मानव हा ‘’माणूस’’ बनला. जो पर्यंत शारिरिक श्रम व बौद्धीक श्रम यांच्यात तणाव नव्हता, तो पर्यंत तो ‘मानवतावादी’ होता. या दोन श्रम प्रकारात जसजसा तणाव वाढत गेला तसतसा त्याच्यातील मानवतावाद घटत गेला.
अन्नासाठी वण वण भटकणार्‍या मानव प्राण्यांच्या टोळ्या या इतर रानटी
प्राण्यांइतक्याच रानटी होत्या. कारण सर्जनशिल विचार-प्रक्रिया निर्माणच झाली नव्हती. अन्नाचं कृत्रिम पद्धतीने पुनरुप्तादन करण्याचा विचार सर्वप्रथम स्त्रियांच्या डोक्यात आला. याचं कारण मानवी समाजाचं पुरूत्पादन स्त्रिया करीत होत्या व त्यासाठी लागणारे शारिरिक कष्टही त्याच घेत होत्या. पोटात गर्भाशयात जीवाचं पुरुत्पादन व त्यानंतरच्या 9 महिन्यातील गर्भ विकासाचे श्रम, आणी सगळ्यात शेवटी जीवघेण्या प्रसव-वेदना. एवढे सारे श्रम-कष्ट करून स्त्री मानवाचं पुरूत्पादन करीत असते, म्हणूनच सर्वप्रथम तिच्या मेंदूत अन्न-धान्याचं कृत्रीम पुनरूत्पादन करण्याचा विचार आला व प्रत्यक्ष कृतीतून तीने शेतीचा शोध लावला. शेती करतांना शारिरिक श्रम व बौद्धिक श्रमाचा तीने सुंदर मिलाफ घडवून आणला.
अन्न-धान्याच्या पुनरूत्पादनाची व्यवस्था निर्माण करण्यातून तीने गणसमाजव्यवस्था उभी केली. त्याच्या पायाशी लागणारी अर्थव्यवस्थाही निर्माण केली जी समतेवर आधारित होती. गण सभासदांना धान्याचे समान वाटप करण्याचे तीचे धोरण होते. जरी पुरूष शेतीत श्रम करू शकत नव्हते, समाजव्यवस्थेत त्यांचे स्थान दुय्यम असले तरी त्यांचे ‘शोषण’ होत नव्हते. स्त्री-पुरूष भेद नैसर्गिक असतांना व तो पुढील समाजविकासात ‘’क्षत्र व ब्रह्मण’’ या द्वै-वर्णव्यवस्थेत दृढ झाल्यावरही तो शोषणाचा आधार बनला नाही. याचे कारण एकतर ‘वरकड’ उत्पादन होत नव्हतं व दुसरं कारण उत्पादनाची साधनं गणराज्याच्या मालकीची होती. आणी तिसरे धान्याचे समान वाटप. या तीन कारणांमुळे क्षत्र व ब्रह्मण द्वै-वर्णव्यवस्थेत हे दोन्ही वर्ण अशत्रूभावी राहीलेत.
समाजविकासाच्या पुढील टप्प्यात उत्पादनाची साधने विकसित झालीत. ‘स्फ्य’ काठीच्या ठिकाणीं ‘नांगर’ आला व या नांगराला ओढण्यासाठी पाळीव रानटी प्राणी जुंपला गेले, तेव्हा समाजव्यवस्थेने ‘कूस’ बदलली. या नव्या विकसित उप्तादन साधनांचा जनक पुरूष असल्याने तो ‘कर्ता’ झाला. क्षत्र म्हणजे शेती स्त्रीयांच्या नियंत्रणातून निघून गेल्याने स्त्रीया ‘वर्णहीन’ झाल्यात. ब्रह्मण वर्ण पुरूषांचा होता तोही विभाजित होऊन त्यातून ‘दास’ वर्णाची निर्मिती झाली. बौद्धिक श्रम ‘ब्रह्मण’ वर्णाची मक्तेदारी झाली व शारिरीक श्रम दास व पाळीव प्राण्यांच्या वाट्याला आलेत. बौद्धिक श्रम व शारिरीक श्रमाची विभागणी होऊन त्यात तणाव निर्माण होताच माणसाच्या ‘मानवतावादाला’ तडा गेला. शोषण व्यवस्थेचा जन्म झाला.
जी स्त्री समतेची पुरर्स्कर्ती होती होती ती नव्या पुरूषसत्ताक त्रैवर्ण्यिक गणराज्यात वर्णहीन झाली, दुय्यम झाली व घरात कायमची कोंडली गेली. परंतू कोणतेही परिवर्तन शांततामय मार्गाने होत नाही. समाजव्यवस्थेचा गाडा स्त्रीयांच्या नियंत्रणातून निघून पुरूषांच्या ताब्यात येत असतांना काही रक्तमय संघर्ष घडणे स्वाभाविक होते. याच स्त्री-पुरूष संघर्षाचे प्रतिबिंब ‘’दुर्गा-महिषासूर’’ लढाईत स्पष्टपणे दिसते. मात्र हे संघर्ष नंतर मिथके बनतात व प्रत्येक युगात प्रस्थापितांच्या हितासाठी या मिथकात तोड-फोड केली जाते. दुर्गा व महिषासूरातील संघर्ष हा क्षत्र-ब्रह्मण संघर्षाचा भाग होता व तो क्षत्र-शेती नियंत्रणासाठीचा होता. राम-ताटका व लक्ष्मण-शूर्पणखा या लढाईत तो अधिक स्पष्ट होतो. रामाचा वनवास हा एक बकवास आहे. मुळात रामाची ती युद्ध मोहीम होती.
तत्कालीन ब्रह्मण ऋषींच्या मार्गदर्शनाखाली रामाने क्षत्र (स्त्री) वर्णाविरूद्ध युद्ध पुकारले व ते भारतव्यापी करण्यासाठी तो उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाला होता. या युद्ध मोहीमेचा मुख्य उद्देश होता चातुर्वर्ण्यक पुरूषस्त्ताक गणसमाज निर्माण करणे. त्यामुळे रस्त्यात त्याला जी गणराज्ये स्त्री-सत्ताक वा मातृवंश-सत्ताक असलेली दिसलीत ती त्याने युद्ध करून नष्ट केलीत. ही गणराज्ये मागास उत्पादन-साधनाने शेती उत्पादन करीत होत्या. त्यामुळे ती युद्धात हरणे स्वाभविक होते. रामाने तेथे विकसित उत्पादन साधनांची पुर्तता केली ज्यातून पुरूषसत्ताक चातुरवर्ण्य समाज निर्माण झाला. दण्डकारण्यात शूर्पणखेचं स्त्रीसत्ताक गणराज्य होतं. रावण या दण्डकारण्यात ‘ब्रह्मण’ म्हणून दुय्यम स्थानावर होता. त्याला शूर्पणखेच्या जागी राजा होता येत नव्हतं. कारण ते स्त्रीराज्य होतं. म्हणून रावण श्रीलंकेला निर्यात झाला. तेथे मंदोदरीचं मातृवंशसत्ताक राज्य होतं. या गणसमाजात स्त्रीराणीशी जो लग्न करेल तो ‘राजा’ होत असे. या गणसमाजात रावण ‘ब्रह्मण’च राहीला. परंतू रामाचा गण चातुर्वर्ण्यक पुरूषसत्ताक झालेला असल्याने तेथे पुरूषांचे चारवर्ण स्थापीत झालेले होते. ‘ब्रहमण’ चे ‘ब्राह्मण’ झाले, क्षत्र-शेती धारक ‘क्षत्रिय झालेत व तिसरा वर्ण ‘वैश्य’ व दासांमधून चौथा वर्ण ‘शूद्र’ झाला!
रावण हा ब्रह्मण म्हणूनच लंकेत निर्यात झाला! ते मंदोदरीचं मातृंवंशसत्ताक गणराज्य त्रैवर्णिक होते. ब्रह्मण, क्षत्र व दास! त्यालाही चातुवर्ण्यिक पूर्ण पुरूषसत्ताक गणराज्य बनविण्यासाठी रामाने रावणाशी युद्ध पुकारलं. अशा प्रकारे ताटिकेचे व शूर्पणखेचे स्त्रीसत्ताक गणराज्य, बली व रावणाचे मातृवंशसत्ताक गणराज्य नष्ट करून संपूर्ण भारतात चातुर्वर्ण्यक पुरूषसत्ताक गणराज्ये स्थापन झालीत. मात्र या सर्व विकास प्रक्रियेत एक महत्वाची घटना घडली. बौद्धिक श्रम व शारिरिक श्रमाची पूर्णपणे फारकत झाली व मानव प्राण्याची ‘मानवता’ आटत गेली. दास-शूद्रांच्या गुलामगिरीचे जोखड अधीकाधिक असह्य होत गेले. त्यातून नवे ताण-तणाव निर्माण होऊन विद्रोह झालेत. अनेक गणराज्ये नाहीशी झालीत, नवी उदयास आलीत. महाभारतीय युद्धे झालीत. या विद्रोहाचे मूळ सूत्र होते मानवतावादाची पुनर्स्थापना म्हणजे बौद्धिक श्रम व शारिरिक यांची एकाच देहात पुनर्जोडणी! या समतावादी विद्रोहाचे ज्या ज्या महामानवांनी नेतृत्व केलं ते सर्व या मूळसूत्राचे प्रतिपालक होते.
महामानव बुद्धाने चातुर्वर्णप्रथाक पुरूषसत्ताक समाजव्यवस्थेतील गुलामगिरी नष्ट केली. बौद्ध विद्यापीठांमध्ये एक नियम होता. बौद्ध विद्यापीठातील विद्यार्थी कोणत्याही बौद्धीक क्षेत्रात पारंगत झालेला असो, त्याला किमान एकतरी कष्टाचे काम शिकावेच लागे. सुतारकाम, लोहारकाम, शिल्पकाम, शेतीकाम अशी सर्व समाजोपयोगी कला-कौशल्याची कामे बौद्ध विद्यापीठात शिकवीली जात होती. त्यामुळे त्या समाजात श्रमालाही प्रतिष्ठा मिळाली व श्रमिकालाही मानसन्मान मिळाला. एका जातक कथेत लिहिले आहे. बौद्ध विद्यापीठातून शिकून बाहेर पडलेला सुतार जेव्हा राजाच्या दरबारात प्रवेश करतो तेव्हा राजासकट सगळे दरबारी उठून उभे राहून त्याला प्रणाम करतात. केढा मोठा सन्मान कष्टकर्‍यांचा! त्यावेळचे सर्व कष्टकरी घटक पुग व श्रेणी गटात विभाजित होते व ते श्रेष्ठी म्हणून सन्मानीत होते.
दक्षिणेकडील बसवआण्नाची क्रांती ही सुद्धा समता प्रस्थापित करणारीच होती. जातीजातीत झालेली बौद्धिक व शारिरिक श्रमाची विभागणी नष्ट करणारी ही क्रांती होती. बसवआण्णांच्या अनुभव-मंटपाचा एक काटेकोर नियम होता- ‘प्रत्येकाने स्वतः श्रम करून आपली रोजची भोजनव्यवस्था करावी. काश्मिरच्या एका राजाच्या कानावर अनुभव-मंटपची ख्याती गेली व तो अनुभव-मंठपात दाखल झाला. परंतू प्रवेश द्वारावर त्याला द्वारपालने अडविले व खडसावले की, ‘जेवण फुकटात मिळणार नाही.’ राजा प्रवेश द्वारातूनच परतला, जंगलात गेला, लाकडं गोळा केली, ती बाजूच्या गावात जाउन विकली व मिळालेल्या पैशातून तांदूळ खरेदी करून अनुभव-मंटपात दाखल झाला. ही खरी श्रमाची व श्रमिकाची प्रतिष्ठा!
ब्राह्मणी वैदिक धर्माच्या पुनरूज्जीवनाने पुन्हा बौद्धिक श्रम व शारिरिक श्रम यांची शोषणाधिष्ठीत विभागणी केली, त्यातून जातीव्यवस्था निर्माण झाली. श्रम करणार्‍या जाती हिन झाल्यात, अस्पृश्य झाल्यात! म्हणजे श्रमाचीही प्रतिष्ठा नष्ट केली व श्रमिकाचीही प्रातिष्ठा नष्ट केली गेली. ज्या सुतार-लोहार-कुंभाराला बौद्ध काळात श्रेष्ठी (शेठ) म्हणून मानसन्मान मिळाला, त्याला आज ब्राह्मणी-वैदिकांच्या प्रतिक्रांतीमुळे कुंभारड्या, धोबड्या, न्हावड्या अशी अपमानजनक नावाने हाक मारली जाते. कारण जातीव्यवस्थेत बौद्धीक व शारिरिक श्रमाची शत्रूभावी विभागणी झाली आहे. शोषणाचा मुख्य आधार झाली आहे. कष्टाचे काम निषिद्ध समजणारा ब्राह्मण तुपाशी खातो व कष्टकरी-शेतकरी उपाशी आत्महत्त्या करतो, ही या ब्राह्मणी प्रतिक्रांतीची देण आहे.
पुन्हा एकदा मानवतावादी-समतावादी क्रांतीची दस्तक दरवाज्यावर पडते आहे. तीला साद देण्याची वेळ आलेली आहे. आपण त्यासाठी किती तयार आहोत, ते प्रत्येकाने स्वतःच ओळखायचे आहे व कोणती तरी एक जबाबदारी घेऊन या क्रांती-युद्धात सहभागी व्हायचे आहे. धन्यवाद!
Page-4

------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/


Sunday, October 14, 2018

45 BahujanNama, Daily Lokmanthan, 14 Oct 18, Neta and Panter , नेते आणी पंटर!

बहुजननामा-45
नेते आणी पंटर!
बहुजनांनो.... !   
     काल एका ओबीसी महिला आघाडीच्या अध्यक्षांचा फोन आला. ओबीसी महिला मेळावा घेत आहोत, आपण उपस्थित राहावे, अशी विनंती त्या फोनवरून करीत होत्या. ‘मेळावा महिलांचा आहे, तेथे माझं काय काम?’ -माझा प्रतिप्रश्न! तर मॅडम म्हणाल्या, ‘आपण प्रमुख वक्ते म्हणून या!’ मी म्हटलं, मी किमान एक तास बोलेन! ‘नाही, नाही, एवढा वेळ देता येणार नाही!  -मॅडम! ‘किमान अर्धा तास’ -माझा आग्रह! शेवटी मॅडम म्हणाल्या की, या महिला मेळाव्याला ‘मोठे साहेब’ येत आहेत. त्यामुळे बरेच राजकिय पुढारी येतील, त्यामुळे तुम्हाला वेळ देता येणार नाही! मॅडम ने असे स्पष्टीकरण दिल्यावर मी भडकलोच! त्यांना कडक शब्दात सुनावले. मला काय शोभेचा बाहुला समजलात काय स्टेवर सजवायला? की एखादा लाचार राजकारणी, जो निमंत्रण नसतांनाही मोठ्या साहेबांसमोर मिरविण्यासाठी तडफड करतो? माझे नाव कार्यक्रम पत्रिकेत छापायचे नाही, यापुढे असे फालतू निमंत्रणही द्यायचे नाही.
          मला माझे अनेक मित्र व हितचिंतक समजावून सांगतात की, एवढ्या कडक भाषेत
नका बोलत जाऊ? कार्यकर्ता दुखावतो! परंतू या मित्रांना हे कळत नाही की, किती दिवस प्रेमाने, ओंजारून गोंजारून प्रबोधन करायचे? अलिकडे सामाजिक कार्याची व्याख्या व उद्देशच बदलून गेले आहेत. निवडणूक जवळ आली की सामाजिक संघटनांचे पेव फुटते. दादा, आण्ना, भाऊ यांचे कार्यक्रम होऊ लागतात. गल्ली-बोळातले छपरी पोरं कार्यकर्ते म्हणून मिरवायला लागतात. कार्यक्रम आयोजित करणारे, कार्यक्रमाला गर्दि जमविणारे, प्रमुख पाहुणे, हार-तुरे, नारळ-उपरणी-शाली, फेटे-पगड्या, फूल-गुच्छ असा सर्व धुमाकूळ असतो. मोठ्या साहेबांच्या पायाला लागणारे, साष्टांग नमस्कार घालणारे, पायावर डोके ठेवणारे अशी सर्व लाचार बांडगुळे कार्यक्रमात मिरवून घेत असतात. भाषणात मोठ्यासाहेबांचं गुणगाण किळस आणणारे असते. ‘मोठे साहेब नसते तर हे झाले नसते.... ते झाले नसते.... मोठे साहेब आहेत म्हणून मी ...... झालो!’ वगैरे वगैरे भाषणे लांबत जातात. या सर्व लाचारांच्या फौजेत एखाद्या व्यक्तीला प्रमुख वक्ता म्हणून बोलावले असेल तर तो बिचारा स्टेजच्या एका कोपर्‍यात कुठेतरी अंग चोरून बसलेला असतो व केव्हा आपल्या भाषणाचा पुकारा माईकवरून होईल याची वाट पाहात असतो. मध्येच एखादा पडलेला नगरसेवक सभागृहात आपल्या लवाजम्यासह प्रवेश करतो व कोणालाही न विचारता डायरेक्ट मोठ्या साहेबांजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आधीचे स्टेजवर बसलेले पाहुणे लटकेच या, या म्हणतात, पण जागेवरून इंचभरसुद्दा सरकत नाहीत. ढुंगण वाकडे-तिकडं करून त्याला कशी-बशी जागा करून देतात. सगळी राजकीय भाषणे, उणे-दुणे काढणारी, येत्या निवडणूकीत मोठ्यासाहेबांना लाखांचा लिड देऊ म्हणून गर्जना वगैरे वगैरे! आणी सगळ्यात शेवटी प्रमुख वक्याचं नाव पुकारले जाते. आपण बोलावलेला वक्ता कीती मोठा आहे, हे सांगीतले जाते, विचारवंत वगैरे कौतुकही केले जाते. परंतू कार्यक्रमाला बराच वेळ झाला आहे, मोठे साहेब बोलायचे राहीलेले आहेत, तेव्हा प्रमुख वकत्यांनी आपले भाषण पाच मिनिटात उरकावे, असा आदेशही दिला जातो.
     अशी ही लाचारांची फौज! ‘मोठे साहेब, मोठे साहेब’ म्हणून ज्याला मिरवलं जातं, ते मोठेसाहेब जेव्हा जेलमध्ये डांबले जातात, तेव्हा ही सर्व लाचारांची फौज सैरावैरा पळत फिरते, कोणी बीळांमध्ये लपून बसतं. कोणी परदेशात जाऊन तोंड लपवितं, तर काही अतिहुशार लोक पक्षांतर करून सेफझोनमध्ये पळ काढतात. ही फौज म्हणजे अभ्यासाचा एक स्वतंत्र विषयच आहे. नेत्याच्या अवती-भोवती जी लाचार फौज जमलेली असते, तीचे 5 किंवा 6 कप्पे पाडता येतील. पहिला कप्पा जवळच्या नातेवाईकांचा असतो. यात मुलं-मुली, सुना-जावई, मामे-भाचे, काके-पुतणे वगैरे! हे मोठ्यासाहेबांची चाकरी यासाठी करतात की, कुठलं तरी निवडणूकीचं तिकीट मिळेल व साहेबांच्या कृपेने निवडून येऊन वर्णी लागेल! त्यातही चढण-उतरंड असतेच! जवळचे-लांबचे असतात. कोण किती जवळचा-लांबचा त्यावरून आमदारकी द्यायची की नगरसेवकी द्यायची हे ठरते.
     एका मोठ्यासाहेबांच्या भाच्याने साहेबांना सुरूवातीपासूनच साथ दिली! संकटातही साथ नाही सोडली, साहेबांच्या मुलांना अंगा-खांद्यावर खेळवलं! परंतू साहेबांच्या ज्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं ती मुलं मोठी झाल्यावर आमदार बनतात, खासदार बनतात. सुना मोठ्या नेत्या बनतात! भाचा मात्र कधीच कुठला पदाधिकारी होत नाही. कारण तो जवळच्या नातेवाइक गटातला नाही. तर असा हा कौटुंबिक सत्ता-स्पर्धेचा पहिला कप्पा! दुसरा कप्पा हा जातींच्या कार्यकर्त्यांचा असतो. गावाकडची किंवा शहरातील लहान-मोठी सत्तापदे, संघटनेची लहान-मोठी पदे मिळविण्यासाठी भाऊ-गर्दी करणारे हे लोक! जातीचं मंगल कार्यालय बांधायचं आहे, म्हणून देणगी मागणारे हे लोक! तिसरा कप्पा हा पक्ष कार्यकर्त्यांचा असतो. म्हणजे प्रत्येक पक्षाला मुसलमान सेल, दलित-हरिजन सेल, ओबीसी सेल, आदिवासी सेल, महिला आघाडी वगैरे वगैरे असतात. या सेलमध्ये काम करणारे हे विविध जातीचे लोक केवळ पक्ष म्हणून या मोठ्यासाहेबांच्या अवती-भोवती असतात. या तिसर्‍या कप्प्यातील लोक फार अल्पसंतुष्ट असतात. ‘’मै बडे साहब का कार्यकर्ता हुं! ... सेलका उपाध्यक्ष हूं’’ बस्स! इतक्या छोट्याशा पदानेही तो खूश असतो. छोट्या छोटया मान-सन्मानाचा भुकेला असलेला हा मुसलमान, दलित, ओबीसी माणूस नेमकं कोणाचं प्रतिनिधित्व करतो? हजारो वर्षांपासून प्रतिष्ठेपासून वंचित असलेल्या समाज-घटकांचं प्रतिबिंब या माणसांमध्ये आपल्याला दिसत असतं! मात्र या कप्प्यातील एका उपकप्प्यात काही बनेल लोक असतात. ते दलालीचं काम करतात. बदल्या, बढत्या, नियुक्त्या, टेंडर वगैरेंची दलाली आणणे व ती साहेबांपर्यंत पहोचविण्याचं काम ते करतात.
     या तीन कप्प्यांव्यतिरिक्त आणखी दोन कप्पे असतात, परंतू हे कप्पे हिडन असतात. पहिला हिडन कप्पा असतो पत्रकार, वकील व साहित्यिकांचा! हा फार क्वचितच उजेडात येतो. हा कप्पा बुद्धीमान लोकांचा असतो. साहेबांच्या भानगडी कोर्टात निपटूण काढणे, साहेबांच्या भानगडी मिडियात येणार नाहीत याची काळजी घेणे, साहेबांचे गुणगाण मिडियात फोकस करणे, साहेबांवर लेख लिहिणे वगैरे कामे ते करतात. साहेबांची एकसष्टी साजरी करण्यासाठी यांची फारच लगबग असते. गौरव समिती, गौरव ग्रंथ, गौरव समारंभ, सन्मान पत्र, जाहीरात, होल्डींग वगैरे सगळी धावपळ करण्याचे काम हा बुद्धिमान वर्गच करतो. आपले मोठे साहेब कसे समाजवादी आहेत, फुले-आंबेडकरवादी आहेत, ते कसे महापुरूषांचे सच्चे अनुयायी आहेत वगैरे पटवून देण्याचे काम ही बुद्धिमान लोकं करतात. त्याबदल्यात त्यांना भरपूर बिदागी मिळते. सरकारी कोट्यातील घरे मिळतात, सरकारी पुरस्कार मिळतात, दर महिन्याला कुठेतरी ‘स्नेहमिलनाच्या’ नावाने ओली पार्टी होते, त्यात यथेच्छ मौजमस्ती करायला मिळते. तर असा हा छुपा-रूस्तम असलेला चौथा कप्पा!
या शिवाय एक छोटासा 3-4 जणांचा कप्पा असा आहे की, ज्याची सविस्तर चर्चा आपण येथे करू शकत नाही. या कप्प्यातील लोक साहेबांच्या अवती-भोवती राहून साहेबांवर लक्ष ठेवण्याचं काम करतात. आज साहेबांना कोण-कोण भेटलेत, काय-काय चर्चा झाली, कीती पेट्या आल्यात व कीती गेल्यात याची सर्व बित्तमबातमी अत्यंत वरच्या जातींच्या साहेबांकडे पहोचविण्याचं काम हे लोक करतात. आपल्या छोट्या जातीच्या मोठ्या साहेबांना हे सर्व माहीत असते. आपल्यावर हेरगिरी करणारे लोक आपल्याच घरात चुलीपर्यंत वावरतात, याची पूर्ण कल्पना असूनही आपले जातीचे नेते चुप राहतात, कारण या हेरांची नियुक्ती अत्यंत वरच्या पाळीवरून झालेली असते. आणी हे फक्त दलित-ओबीसी राजकीय नेत्यांबाबतच घडतं असं नाही तर, जे मोक्याच्या व मार्‍याच्या जागांवर बसलेले दलित-ओबीसी-आदिवासी अधिकारी आहेत, त्यांच्याबाबतही हे घडतं! या छोट्या कप्प्यात फक्त 3-4 लोक असतात. आपल्या छोट्या जातीच्या मोठ्या साहेबांकडे हे लोक ड्रायव्हर म्हणून किंवा पी.ए. म्हणून नोकरी करीत असतात. त्यांची नियुक्ती ‘’थेट वरून’’ केलेली असते. त्यामुळे आपले साहेब त्यांची बदलीही करू शकत नाहीत. काही गुप्त हेर मित्र वा हितचिंतक रूपात ये-जा करीत असतात व थेट चुलीपर्यंत धडक मारीत असतात.
सहावा कप्पा हा पूर्णपणे हिडन असतो. यात भाई लोक व त्यांचे छिचोरे पंटर असतात. साहेबांच्या विरोधकांविरोधात राडा करणे, विरोधकांना धमक्या देणे, एखाद्याला उचलून आणणे, मतदानाच्या आदल्या रात्री वस्त्यांमध्ये जाउन पैसे वाटणे आदि अनेक जोखमीची कामे या कप्प्यातील भाइलोक करतात. त्यातील काही भाईलोकांना नगरसेवक वगैरे पदे मिळतात. बाकीचे पंटर लोक केवळ ‘जामीन मिळाला’ यावरच खूश असतात. नेत्याच्या आशीर्वादाने हे लोक सगळे अवैध धंदे करतात. महापुरूषांच्या जयंतीच्या नावाखाली खंडणी गोळा करणे, दारू-सट्टे, सुपार्‍या अशा सर्व धंद्यात पारंगत असणारे हे लोक सतत जेलमध्ये जाण्याच्या भीतीखाली जगतात. कारण एखादा कडक पोलीस अधिकारी आला तर तो नेत्यांचे ऐकतही नाही. पोलीस अधिकारी खूपच जड पडायला लागला की, मग नेता त्या अधिकार्‍याची बदलीच करतो. अशा बदल्यांसाठी करोडो रुपये पाण्यासारखे वाहात असतात.
या पाचव्या कप्प्यात मुख्यतः दलित-ओबीसी तरूणांचा भरणा असतो. पाच जेलमध्ये गेले की दुसरे दहा त्यांची जागा घेणारे तयार असतात. या कप्प्यातील दलित-ओबीसींची भरती आटु नये म्हणून देशाच्या अत्यंत वरच्या पाळीवरून धोरणे आखली जातात. दलित-ओबीसींचं आरक्षण पूर्णपणे अमलात आणलं तर कोणी दलित-ओबीसी गुंडगिरीकडे कशाला वळेल? यास्तव आरक्षण अमलात आणायचं नाही, हजारोंचा बॅकलॉग ठेवायचा, क्रिमी लेयरची पाचर मारायची, क्षत्रिय जातींना ओबीसीमध्ये घुसखोरी करायला सांगायची, नोकरी नियुक्ती किंवा बढती दिलेली असतांनाही ती न्यायालयाकडून रद्द करून घ्यायची, अशी सर्व षडयंत्रे यशस्वी करून आरक्षण निकामी करण्याचे उद्योग चालू असतात. त्यामुळे दलित-ओबीसी मधील शिकलेल्या तरूणांना नाईलाजास्तव गुन्हेगारीकडे वळावे लागते. त्यातीलच काही भाई नेते बनतात. अशा प्रकारे जे दलित-ओबीसी मधून नेते निर्माण होतात ते वरच्या जातीच्या ‘जाणत्या नेत्यांची’ मेहेरबाणी असते. त्यांची मेहेरबाणी थांबताच हे दलि-ओबीसी नेते जेलमध्ये डांबले जातात.
दलित-ओबीसींमधून सक्षम नेते निर्माण होत नाहीत, हा खरा रोग आहे. तो नष्ट करून सक्षम असे वैचारिक नेतृत्व स्वतः दलित-ओबीसी समाजांनी निर्माण केले पाहिजे. वरच्या जातीच्या ‘जाणत्या नेत्यांनी’ दलित-ओबीसींमध्ये जे नेते निर्माण करून ठेवले आहेत, त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी कोणते कार्यक्रम कसे घडवून आणले पाहिजे, याची चर्चा पुढच्या बहुजननामात कधीतरी करू या!

------- प्रा. श्रावण देवरे
            Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/


Sunday, October 7, 2018

44 BahujanNama, Lokmanthan, 7 Oct 18 एक ब्राह्मण लाखाला भारी!

बहुजननामा-44
एक ब्राह्मण लाखाला भारी!
बहुजनांनो.... !   
     आपल्या महाराष्ट्रात फडणवीस साहेबांच्या मंत्रीमंडळातील एक जानकार मंत्री म्हणून ‘’नामदार महादेवराव जानकर’’ सगळ्यांनाच माहीत आहेत. काल त्यांनी त्यांच्या भाषणातून बरीच महत्वपूर्ण जानकारी दिली. खरे म्हणजे ती ऐतिहासिक अशीच माहीती होती. त्याहीपेक्षा ती सर्वांना ‘कटू’ वाटणारी असल्याने सगळ्यांची तोंडे वाकडी-तिकडी झाली.
नामदार जानकर आपल्या भाषणात जे काही बोललेत त्यात 8-10 वाक्ये ही वाद्ग्रस्त होती. यातील काही वाक्ये ही ‘घोषवाक्ये’ होती. घोषवाक्ये ही त्या त्या समाजघटकाची वैचारिक प्रतिबिंब असतात. त्यापैकी ज्या घोषवाक्यांना राजाश्रय मिळतो, ती प्रसारमाध्यमातून इतकी बिंबवली जातात की ती सर्वच लोकांच्या मेंदूंचा जबरी ताबा घेतात. जातीयुद्धात ही घोषवाक्ये फार मोठ्याप्रमाणात वापरली जातात. आपल्या फौजेचं मनोधैर्य वाढविण्यासाठी किंवा त्यांची तयारी करून घेण्यासाठी अशी घोषवाक्ये कामाला येतात. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, भारत बौध्दमय करण्याची घोषणा, इडा पिडा जाओ बळीचं राज्य येवो, अशी अनेक घोषवाक्ये सामाजिक युद्धासाठी वापरली जातात. ‘हर हर महादेव’, ‘अल्ला हो अकबर’ या प्रत्यक्ष रणांगणातील ललकार्‍या घोषवाक्येच होती. ‘गर्वसे कहो ….’ वगैरे घोषवाक्य धार्मिक युद्धासाठी आहेत.
याच रांगेतील ’एक मराठा लाख मराठा’ ही अलिकडच्या जातयुद्धातील एक घोषणा होय! या घोषवाक्याला शह देण्यासाठी ओबीसींनी ‘एकच पर्व ओबीसी सर्व’ किंवा दलित मोर्च्यावाल्यांची ‘एक बहुजन करोड बहुजन’ वगैरे घोषणा आल्यात. मात्र त्यांना राजाश्रय मिळाला नाही. परंतू, ब्राह्मणांनी ‘एक ब्राह्मण लाखाला भारी!’ अशी गर्जना करताच त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. आता हे घोषवाक्य सत्ताधारी ब्राह्मणांच्या हिताचे असल्याने त्याला राजाश्रय मिळाला. म्हणून ते मंत्री जानकरांच्या तोंडातून बाहेर पडले. ‘गरीब ब्राह्मणांना आरक्षण दिले पाहिजे’ हे वाक्यही याच पठडीतले. हे वाक्य बहनजीच्या बसपाचे ‘राष्ट्रीय घोषवाक्य’ बनलेले आहे. कालच्या जानकरसाहेबांच्या भाषणात हे महान घोषवाक्यही होतेच. अशा सर्व राजकिय घोषवाक्यांच्या गडबळ-गोंधळात जानकरसाहेब एक ऐतिहासिक सत्य बोलून गेलेत. एक ब्राह्मण लाखाला भारी! ब्राह्मणांचे हे घोषवाक्य संख्यात्मक नाही, तर ते गुणात्मक आहे. आणी म्हणून ते ब्राह्मणांच्या वतीने भाडोत्री फौजेकडून वदवून घेतले जाते. ब्राह्मणांचे शत्रू असलेले रावण, बळी, नरकासूर सारखे बलाढ्य असूर राजे भाडोत्री क्षत्रिय राजांकडून मारून घेण्याचे कसब ब्राह्मणातच आहे. म्हणून- ‘एक ब्राह्मण लाखाला भारी’ हेच सत्य आहे.
एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारा ब्राह्मण परशूराम लाखच काय कोट्यावधी क्षत्रियांना भारी होता की नाही? चाणक्य विरूद्ध बौद्ध नंदराजा, पुष्यमित्र शृंग विरोधी ब्रहद्रथराजा अशी अनेक उदाहरणे आहेत. ही झालीत प्राचिन ऐतिहासिक उदाहरणे. कोकणातल्या मुठभर पेशव्यांनी लाख मोलाचे स्वराज्य कसे सहजपणे घशात घातले? ही होती बावीसावी निःक्षत्रीयकरणाची मोहिम! सत्यशोधक चळवळीने जात्यंतक क्रांतीच्या उंबरठ्यावर आणलेलं महाराष्ट्र राज्य आज पुन्हा पेशवाईत कसं रूपांतरीत झालं? ही झाली यशस्वी 23 वी निक्षत्रियकरण मोहिम!
विसाव्या शतकाच्या उदयाबरोबर इंग्रजांनी भारतीयांना सत्तेत सहभागी करून घेण्याचे ठरविले. मॉंटेग्यु चेम्सफर्ड कमिटीच्या योजना राबवून छोट्या-छोट्या सत्तेचे हप्ते देशी जनतेला देण्यास सुरूवात झाली. असेंब्ली स्थापन करून काही अधिकार दिले जाणार होते. त्यासाठी या असेंब्लीवर निवडून जाणे गरजेचे होते. राजकारण व निवडणूका म्हटले की काही जातींच्या अंगात वारं येतं! त्याकाळी निवडणूका लढविण्यासाठी मराठा समाजाने ताबडतोब ‘’मराठा लीग’’ स्थापन केली! पण टिळकांनी दम भरला की, ‘असेंब्लीत येऊन कुणबटांना काय नांगर हाकायचा आहे काय?’ टिळकांचा दरारा पाहता मराठ्यांच्या लक्षात आले की, ब्राह्मणांच्या विरोधात आपण लढूच शकत नाहीत. मराठा म्हणून आपला निभाव लागणार नाही, तेव्हा त्यांनी तत्कालीन सत्यशोधकांना बरोबर घेऊन ‘ब्राह्मणेतर पक्ष’ स्थापन केला. शूद्रादिअतिशूद्रांना बरोबर घेतले तरच हे तथाकथित क्षत्रिय ब्राह्मणांच्या विरोधात लढू शकतात, अन्यथा यांचे निःक्षत्रियकरण ठरलेलेच असते. पण इतिहासापासून बोध घेतील ते क्षत्रिय कसले? शेवटी गुडघ्यातच! शूद्रअतिशूद्रांच्या मदतीने क्षत्रिय राज्यसत्तेवर येतात, मात्र पुन्हा नेहमीप्रमाणे ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शंबुकवधाचे धडे गिरविणे सुरू करतात! शुद्रअतिशूद्र बाजूला सरकताच क्षत्रियजातींचे शिरकाण करणे ब्राह्मणांना सोपे जाते. यालाच म्हणतात पृथ्वी निःक्षत्रिय करणे. यालाच आजच्या भाषेत म्हणतात- ‘’एक ब्राह्मण लाखाला भारी!’’ जानकर साहेब सत्य वदले! त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांचा निषेध करणे चुकीचे आहे.
गुजराथमध्ये पटेल जातीने एकच मोर्चा काढला आणी गुजराथच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची उफराटी झाली. महाराष्ट्रातल्या मराठायांनी लाखा-लाखांचे अनेक मोर्चे काढलेत, परंतू तरीही फडणवीस साहेबांची खूर्ची एक इंच सुद्धा इकडे-तिकडे सरकली नाही. याला म्हणतात-‘एक ब्राह्मण लाखाला भारी!’ महाराष्ट्र विधानसभेत फक्त 7-8 ब्राह्मण आमदार आहेत व मराठ्यांचे 145 आमदार आहेत. तरीही 145 मराठा आमदार 8 ब्राह्मणांचा ‘’पेशवाइ-रथ’’ आनंदाने ओढत आहेत. याला म्हणतात- एक ब्राह्मण लाखाला भारी!
फुले-शाहु-आंबेडकरांनी संसदिय लोकशाहीचे स्वप्न पाहतांना स्पष्ट केले होते की, संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्यानंतर येथे बहुजनांचे राज्य येईल व निःब्राह्मणीकरणातून समता स्थापन होईल. बिनडोक बहुजन निवडून जाऊ नयेत म्हणून त्यांनी शिक्षणावर भर दिला. सांस्कृतिक चळवळ करण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी शिवजयंती महोत्सव, बळीराजा महोत्सव आदि सांस्कृतिक कार्यक्रम दिलेत. शूद्रादिशूद्रांच्या मदतीने राज्यात सत्तेवर आलेल्या मराठ्यांनी ब्राह्मणांच्या नादी लागून पुन्हा ‘’शंबुक-वधाचा खेळ’’ सुरू केला. मंडल आयोगाला विरोध, एट्रॉसिटी ऍक्ट कायद्याला विरोध वगैरे कारस्थाने ही ब्राह्मणांच्या सांगण्यावरून केलेले ‘शंबुक-वधच’’ आहेत. राज्यसत्ता टिकविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घडवू आणावे लागतात, हे तर मराठ्यांच्या गावीही नाही. त्यामुळे मंत्रालयात सत्यनारायण घालणे किंवा गणपतीची आरती मुख्यमंत्र्यांकडून करून घेणे आदि कार्यक्रम हे धार्मिक आहेत असेच त्यांना वाटत राहीले. परंतू हे कार्यक्रम कोणत्याही अँगलने धार्मिक नाहीत. हे कार्यक्रम सांस्कृतिक आहेत व असे सांस्कृतिक कार्यक्रम हे सत्ता-प्राप्तीच्या युद्धातील फार मोठे हत्यार असतात, हे सत्य सांगणार्‍या फुले-शाहू-आंबेडकरांशी मराठ्यांनी खूप आधीच नाळ तोडून टाकलेली होती व आजही तोडलेलीच आहे. त्यामुळे सत्यनारायणाची पोथी वाचण्याचं निमित्त करून मंत्रालयात घुसलेला ब्राह्मण कधी मुख्यमंत्री होऊन बसला, हे मराठ्यांना कळलेच नाही. त्यामुळे भांबावलेल्या सर्वपक्षीय 145 मराठ्यांना पेशवाइचा रथ आजही गुमान ओढावा लागत आहे. याला म्हणतात-एक ब्राह्मण लाखांना भारी! विधानसभेत आपली संख्या ‘भारी’ असूनही 7-8 ब्राह्मण आपल्यावर भारी का पडत आहेत, असा साधा-सुधा प्रश्न त्यांना कधीच पडत नाही! त्यांना प्रश्न पडतात- ‘गावात मराठा असूनही ओबीसी सरपंच झालाच कसा? दलित असुनही एखादी व्यक्ती ऑफिसर कशी काय होऊ शकते?
एकबोटे व भिडे गुरूजींच्या विरोधात बोलले तर आपली जीभ झडून जाईल, या भीतीपोटी एकही मराठा आमदार तोंड उघडत नाही. मात्र शूद्र जातीत जन्मलेले छत्रपती शिवराय राजे होतात व कुळकर्णी नावाच्या ब्राह्मणाला उभा कापून काढतात, हे सत्य मराठ्यांच्या मेंदूत कधीच शिरू शकत नाही. मात्र आर.एस.एस. ने दिलेली ओबीसी-दलित द्वेषाची शिकवणी त्यांना पटकन समजते. ब्राह्मणांचे सांस्कृतिक राजकारण समजून न घेतल्याने ‘एक ब्राह्मण लाखांना भारी पडतच राहणार व बहुजन गुलामगिरीचे ओझं वाहातच राहणार’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
मान. नामदार जानकर साहेबांचा निषेध करण्याऐवजी त्यांनी सत्य सांगण्याचे धाडस केले, त्याबद्दल त्यांचे आभार माना. त्यांनी सांगीतलेल्या सत्याचा शोध घेत ब्राह्मणवादाच्या मुळाशी जाण्याचे काम करा, अशी विनंती करून थांबतो. जय जोती! जयभीम!!

------- प्रा. श्रावण देवरे
            Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, October 2, 2018

43 BahuajanNama, Lokmanthan, 30 Sept 18, न्यायधिशांची नेणीव!



 बहुजननामा-43
न्यायधिशांची नेणीव!
बहुजनांनो.... !   
     काल सर्वोच्च न्यायालयाने पती-पत्नी विवाहबाह्य संबंधांवर एक निर्णय दिला आणी सगळीकडे स्मशान शांतता पसरली. सगळेच संम्रभावस्थेत गेले आहेत. एरवी अशा इतर वादग्रस्त निर्णयावर तुटून पडणारे विचारवंत या निर्णयावर फारशी खळखळ करतांना दिसत नाहीत. स्त्रीवादी काही बोलत नाहीत. स्वागत वा विरोध काहीच नाही. असा काही निकाल येईल अशी सुतराम शक्यता वाटत नसतांना असा निकाल आलाच कसा, असा प्रश्न बहुतेक सगळ्यांच्याच मनात उद्भवलेला आहे. परंतू निकाल तर आला आहे, त्यावर बोललेच पाहिजे. काल एका टि.व्ही. चर्चेत एका स्त्री-सहभागक ने सांगीतले की यामुळे कुटुंब-व्यवस्था उध्वस्त होईल. काही वर्तमान पत्रांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी त्यात विश्लेषण असे काही नाही.
     मुळात कुटुंब-व्यवस्था ही पुरूषी-वर्चस्वाचा एक अविभाज्य भाग म्हणूनच अस्तित्वात आली आहे. आधीच्या मातृसत्ताक व स्त्रीसत्ताक गणराज्यात कुटुंब ही संस्था नव्हती तर कुलसंस्था होती. कूलसंस्था म्हणजे मोठे कुटुंब असे काहीसे सोपे करून सांगता येईल. मात्र तेही खरे नाही. कारण गणराज्य जसे गणराणीच्या वर्चस्वात होते, तसे कूलसंस्थेत मातृ-वर्चस्व होते. कूलसंस्था ही फक्त रक्ताच्या व दुधाच्या नात्यातील व्यक्तींनी बनलेली होती. त्यात आई, तीची अपत्ये असलेली मुलं, मुली व मुलीच्या पोटी जन्मलेली मुलं-मुली राहात असत. बाप नावाचे नाते निर्माण झालेले नव्हते. कारण आई कोण हे निसर्गतःच सहज ठरविता येत होते. पण बाप कोण हे कसे ठरविणार?? आजच्या अत्याधुनिक काळातही डी.एन.ए. टेस्ट करून बाप ठरविला जातो, मात्र त्यातही किती सत्यता असते, याबद्दल शंका असतेच. आपल्या अपत्याचा बाप कोण, हे फक्त आईच सांगू शकते. मात्र त्याकाळी हे विचारण्याची व सांगण्याची कोणाला कधी गरज पडली नाही. कारण बाप ही संकल्पनाच मुळी त्या काळात उदयास आली नव्हती.
हिडिंबा राक्षसीण जेव्हा भीमाला एका अपत्यासाठी सहवासाची मागणी करते तेव्हा ‘बाप’ शब्दाचा किंवा तत्सम अर्थाचा शब्द कोठेही आलेला नाही. पाच पांडवांचे ‘बाप’ कोण यावर अनेक प्राच्यविद्यापंडित आजही ‘कीस’ काढतांना दिसतात. मुळात त्या काळात ‘बाप’ ही संकल्पनाच अधिकृत नव्हती. महाभारतातील युद्धाचा विषय पुत्रप्रेम, सिंहासन-प्रेम, राजशकट वारसा वगैरे दाखविले जाते, मात्र मूळातील संघर्ष हा वेगळाच होता, असे प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील सांगतात.
महाभारतीय युद्धतातील मूळ संघर्ष हा दासप्रथाक पुरूषसत्ताक राजर्षीसत्ता व दासप्रथाक मातृवंशक राजर्षीसत्ता यांच्यातील होता, असे कॉ. शरद् पाटील सांगतात. ‘रामायण व महाभारतातील पुराण व वास्तवता’ या अनन्य लेखात ते म्हणतात, ‘महाभारतीय युद्ध खरे म्हणजे ‘कौटुंबिक संघर्ष’ होता, जो ‘कुरू कुटुंबाच्या सदस्यांमध्ये घडून आला’ ……. असे सांकलियाचे प्रतिपादन आहे….. पण त्याला भाऊबंदकीचा झगडा लेखणे, हे वैज्ञानिक इतिहाससंशोधन व आकलन खास ठरू शकत नाही. कुटुंब ही संस्था बुद्धाच्या जीवन कालात अगदी प्रथमतः उदयाला येतांना आपल्याला दिसते….’’ (मराठवाडा संशोधन मंडळ वार्षिक 1975)
गणराज्याची नावे मातेवरून ठेवली जायची, जसे- सीता-वैदेही चा गण ‘विदेह गण, केकयीचा केकय गण, कौसल्येचा कोसल गण इत्यादि. अपत्यांची नावेही आईवरूनच ठरायची. कौंतेय, राधेय, नैऋत, राधा-सूता आदि. कुटुंब संस्था ही सरंजामशाहीचे अपत्य आहे. मातृसत्ताक, मातृवंशक व स्त्रीसत्ताक गणराज्याच्या शवावर पुरूषसत्ताक चातुर्वर्ण्य सरंजामी समाज उदयास येत असतांना त्याचा अविभाज्य भाग म्हणून कुटुंब संस्था उदयास आली. शेतीचं कृषीकर्म स्त्रीयांच्या हातात होतं. म्हणजे त्या काळातले उपजीवीकेचं अर्थशास्त्र स्त्रीयांच्या ताब्यात होतं म्हणून पुरूषाला दुय्यम स्थान होतं. ‘जनक’ या शब्दाचा अर्थ ‘’संततीला निमित्त मात्र’’ असा होतो.
मात्र कृषीकर्म जसजसे पुरूषांच्या हातात यायला लागल्यानंतर समाजव्यवस्थेने ‘करवट’ बदलली. लोहयुग अवतरल्यानंतर लोखंडाची अवजारे बनू लागलीत. या लोखंडी अवजारांना पाळीव प्राणी जुंपले गेलेत व शेतीचं उत्पादन अनेकपटीने वाढले. मातृ व स्त्रीसत्ताक गणराज्यात आधीचं अवजार होतं ‘स्फ्य’ नावाची टोकदार काठी! या काठीच्या अणकुचीदार टोकाने जमिनीत छिद्र पाडून ‘बी’ टाकले जात होते. ही हाताने केलेली शेती व त्यातून येणारे उत्पन्न हे समाजाच्या वाढत्या लोकसंख्येच्या व वाढत्या गरजांच्या तुलनेने ‘कमी’ पडू लागले. याला ‘कुंठीत’ होणे म्हणतात. मागास होत चाललेल्या उत्पादन साहित्याच्या मुळे उत्पादन कमी-कमी वाटायला लागते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत ताण-तणाव निर्माण होऊन समाजव्यवस्था ‘कुंठीत’ होते. गरज ही शोधाची जननी असते.
लोखंडी अवजारे व पाळीव प्राण्यांमुळे शेतीचे कर्म पुरूषांच्या हातात येताच अर्थव्यवस्थेवरील स्त्रीयांचे वर्चस्व नष्ट होत गेले. तसतसे स्त्रीयांचे सामाजिक व सांस्कृतिक वर्चस्वही संपत गेले. पुढच्या टप्प्यावर ‘गुलामी’ आली. ही गुलामी येण्याचेही खास कारण होते. गणराज्याची प्राथमिक घटक कुलसंस्था होती. गणराज्याची गणमाता होती, गणपिता नव्हताच! त्याचप्रमाणे कुलसंस्थेत कुलमाता होती, कुलपिता नव्हताच! पुरूषसत्ताकतेच्या प्रवासात या कुलसंस्थेचे विभाजन होऊन प्राथमिक संस्था म्हणून ‘कुटुंब’ उदयास आले. या कुटुंबाचा प्रमुख पुरूष होता. मात्र कुटुंबातील अपत्ये कुणाची हा ‘प्रश्न भेडसावणाराच’ होता. कुटुंबातील अपत्ये एका विशिष्ट पुरूषाची असतील तरच तो खर्‍या अर्थाने त्या कुटुंबाचा प्रमुख गणला जाणार! त्यातून ‘’एक स्त्री व तिच्याशी विवाहीत एकच-एक पुरूष यांनी आणी फक्त यांनीच एकत्रीत येऊन जन्माला घातलेले अपत्य’’ ही कुटुंबाची कसोटी बनली. स्त्री सत्ताक-मातृसत्ताक समाजव्यवस्थेत वारसदार मुलगीच असायची! तिची जन्मदात्री कोण हे निसर्गताच सिद्ध व्हायचे. जिच्या पोटी जनम घेतला तीची ही मुलगी वारसदार आपोअप ठरायची. मात्र पुरूषसत्ताक कुटुंब व्यवस्थेत वारसदार मुलगा असतो. पण हा मुलगा विशिष्ट पुरूषाचेच अपत्य आहे हे कसे ठरविणार, हा मोठा ‘यक्षप्रश्न’ होता. म्हणून एका पुरूषाशी विवाह झालेली स्त्री दुसर्‍या पुरूषासोबत सहवास करू नये यासाठी काही बंधने आलीत. अर्थात ही बंधने नैसर्गिक नव्हतीच. म्हणून ती तंतोतंत पाळण्यासाठी काही कायदे व शिक्षा यांची तरतूद करावी लागली. या कायद्यांना नैतिक, धार्मिक अधिष्ठान देण्यात आलं. पुरूष प्रेषितांनी स्थापन केलेल्या धर्मांना राजाश्रय मिळू लागला. कथा, कादंबर्‍या, पुराणे, पोथ्या, महाकाव्य, स्मृती-श्रुती, कर्मकांड, विधी, प्रवचने अशा सर्व साहित्य साधनांनी महा(कू)प्रबोधनाची लाट निर्माण झाली. या कुप्रबोधनातू स्त्रीयांचं न्युनगंडत्व व पुरूषांचं अहंगंडत्व घडविले गेले. ‘’मी असं केलं तर लोक काय म्हणतील?’’ असा एक गंड प्रत्येक स्त्रीच्या मनात निर्माण केला गेला. जमिनीची मालकी जी आधी गणराज्याची होती, ती आता एका विशिष्ट पुरूषाची झाली, त्यामुळे स्त्री सुद्धा एका विशिष्ट पुरूषाची मालकीची वस्तू बनली. कायदे पुरूष-वर्चस्वी बनलेत. या पैकी एका कायद्याचा सर्वोच्च न्यायालयाने काल ‘’निकाल’’ लावला.
आता या पुरूषसत्ताक कायद्याचा लावलेला निकाल कायद्याच्या चौकटीतच राहील. समाजाची चौकट म्हणून तो लगेच स्वीकारला जाईल का??? तर त्याचे उत्तर नाही आहे. अनेकांना वाटते की हा क्रांतिकारी निर्णय आहे. पण या निर्णयासाठी आवश्यक असलेली समाजव्यवस्था दृष्टीपथात तरी आहे काय? नाहीच नाही! स्त्रीसत्ताक व्यवस्था नष्ट करण्यासाठी उत्पादनाची साधने विकसित होऊ लागलीत व ती पुरूषांच्या हातात एकवटण्याची परिस्थीती निर्माण झाली. म्हणजे अर्थव्यवस्था पुढच्या टप्प्पावर गेल्याने समाजातील प्रमुख स्त्रीऐवजी पुरूष बनला. यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. आक्षेपार्ह हे आहे की, पुरूष प्रमुख झाल्याने त्याचा वारसदार मुलगा प्रमुख बनायचा असेल तर तो त्याच पुरूषाचे अपत्य असणे बंधनकारक ठरणे! या आग्रहातून स्त्रीयांवर बंधने आलीत. आक्षेपार्ह हे आहे की, या आग्रहासाठी धर्म व नीती व्यवस्था राबविली गेली.
आज उत्पादन साधने अशी विकसित झालेली आहेत की, तेथे स्त्री-पुरूष भेदच राहीलेला नाही. तंत्र-कर्म जाऊन आता यंत्रकर्म आलेलं आहे. नांगर हाकण्यासाठी आता पुरूषाची गरज नाही, ट्रॅक्टरवर बसून हातात चाक पकडून आमची लाडकी आर्ची परूषापेक्षाही जास्त खुलून दिसते. त्यामुळे उत्पादन-व्यवस्था स्त्री-पुरूष सामायिक झालेली आहे, पण काय अर्थव्यवस्था तशी झालेली आहे काय? समाजव्यवस्थेत पुरूषी वर्चस्व दृढ करणारे धर्म, त्यांचे धर्मग्रंथ, विधि-कर्मकांड हे नष्ट झालेले आहेत काय? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला क्रांतीकारक म्हणायचे असेल तर मग न्यायालयाने याचाही खुलासा करणे गरजेचे होते.
ज्या महापुरूषांनी ‘स्त्री-गुलामगिरी’ मुळातून उखडून टाकण्यासाठी काही सिद्धांत व व्यवहार सांगीतले आहेत, त्याचाही उल्लेख या जजमेंटमध्ये होणे गरजेचे होते. तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या स्त्रीशिक्षणाची व बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बीलाची कशी वासलात लावली गेली, हे आपण सर्व पाहात आहोतच. आजही भिडे-भटजींसारखे असंख्य समाज-धुरीण मनुस्मृतीचं कौतुक करतात, त्यांच्यासाठी खास शिक्षेची तरतूद करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायधिशांनी करायला हवी होती. केवळ ‘निकाल’ देणे वा ‘निकाल’ लावणे पुरेसे नाही. तशी मुलभूत व्यवस्था निर्माण करण्यासाठी काही गाईड लाइन न्यायालयाने दिली पाहिजे होती. अशी गाईड लाईन निश्चितच या देशाला ‘सावित्री-जोती-भीमाच्या’ मार्गावर नेणारी ठरली असती. मात्र निकाल लावणारे न्यायाधिश ज्या महाकुप्रबोधनाचे बळी आहेत, व ते ज्या विचारसरणीचे पाइक आहेत, ती त्यांना ‘‘नेणीवपुर्वक’’ तसे करू देत नाही, हे मात्र निश्चित!
------- प्रा. श्रावण देवरे
            Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
            Email- s.deore2012@gmail.com