http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, January 30, 2019

Statement of OBC VJNT Sangharsh Samiti on 30 Jan 19


ओबीसी   VJNT   संघर्ष   समिती

अध्यक्ष- मा. आ. प्रकाशआण्णा शिवाजीराव शेंडगे, मुंबई-9

 

दिनांक – 30 जानेवारी 2019

ओबीसी व्ही.जे.एन.टी. संघर्ष समिती तर्फे दिनामक 30 जानेवारी 2019 रोजी पुढील निवेदन प्रकाशित करण्यात येत आहे...........
न्या. गायकवाड राज्य मागास आयोगाचा अहवाल हा ‘ब्रह्मघोटाळा’ असून त्याची मूळातून चौकशी झाली पाहिजे
माननीय उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर महाराष्ट्र शासनानाला न्या. गायकवाड राज्य मागास आयोगाचा अहवाल कोर्टात व याचिकाकर्त्यांना द्यावा लागला आहे. मात्र त्यातही शासनाने फसगत केलेली आहे. राज्य मागास आयोगाचा पूर्ण रिपोर्ट न देता त्याचा सारांश फक्त दिलेला आहे. मूळ रिपोर्ट हा एक ‘ब्रह्मघोटाळा’ असून त्याची मुळातूनच चौकशी होणे गरजेचे आहे.
मराठा समाज हा पुढारलेला समाजघटक आहे, असा अहवाल राज्य मागास आयोगाच्या अनेक अध्यक्षांनी अनेकवेळा दिलेला आहे. त्याचप्रमाणे मान्यवर हायकोर्ट व मान्यवर सुप्रिम कोर्ट यांनीसुद्धा अनेकवेळा मराठा समाज पुढारलेला असल्याचे निकाल दिलेले आहेत. त्यामुळे मराठा जात ही ओबीसी अथवा SEBC च्या यादीत कधीच येऊ शकत नाही.
असे असतांना विद्यमान भाजपा-शिवसेनेच्या फडणवीस सरकारने पुढीलप्रमाणे षडयंत्र करून चुकीच्या पद्धतीने मराठा समाजास ओबीसी (SEBS) दर्जा देऊन त्यांना आरक्षण दिले आहे.
    
1)      सुप्रिम कोर्टाच्या सर्व गाईड लाईन्स डावलून राज्य मागास आयोगाचे गठण करण्यात आले.
2)      हा आयोग ओबीसींचा असतांना त्यात जाणीवपूर्वक मराठा समाजाचे पक्षपाती सभासद मोठ्या संख्येने नियुक्त करण्यात आलेत.
3)      आयोगामार्फत मराठा समाजाचे जे सर्वेक्षण करण्यात आले ते खाजगी संस्थांकडून करण्यात आले. या खाजगी संस्था मराठा-पक्षपाती होत्या, त्यामुळे त्यांनी बोगस अहवाल तयार केला व आयोगाला सादर केला.
4)      या खाजगी संस्थांची नियुक्ती मागास आयोगातर्फे केली गेलेली नाही. शासनानेच या खाजगी संस्थांना काम दिले व त्यांचे अहवाल राज्य मागास आयोगाला स्वीकारायला भाग पाडले. यावरून महाराष्ट्र शासनच हे सर्व षडयंत्र घडवून आणत होते, हे सिद्ध होते.
5)      या बोगस संस्थांच्या बोगस सर्व्हेक्षणाच्या आधारावर बोगस अहवाल तयार करण्यात आला. अशा बोगस अहवालाच्या आधारावर मंजूर झालेला ‘मराठा आरक्षणाचा कायदा’ न्यायालयात टिकणार नाही, या बद्दल आमची खात्री आहे
6)      महाराष्ट्र शासनाने हा अहवाल स्वीकारला नाही, मात्र अहवालाच्या फक्त शिफारशी स्वीकारल्या व मराठा जातीला ओबीसी म्हणजेच SEBC दर्जा देऊन त्यांना मूळ ओबीसींचे आरक्षण फस्त करण्याचा परवाना दिला.
7)      महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आमदारांनी राज्य मागास आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्याचा आग्रह धरला व त्यासाठी दोन दिवस सभागृह बंद पाडले. मात्र तरीही अहवाल विधानसभेत मांडला गेला नाही. हायकोर्टाने, वकीलांनी, पत्रकारांनी व असंख्य कार्यकर्त्या-नेत्यांनी राज्यमागास आयोगाचा अहवाल मागीतला, मात्र त्यांना अजूनही अहवालाची मूळप्रत देण्यात आलेली नाही.
8)      फडणवीस सरकारने केले तसे षडयंत्र इतरही राज्ये सरकारे करू शकतात व जाट, पटेल, राजपूत, ठाकूर सारख्या क्षत्रिय जाती संपूर्ण देशातील ओबीसींचे आरक्षण नष्ट करू शकतात.
9)      देशातील सर्व क्षत्रिय जाती केंद्र सरकारमधील ओबीसींच्या यादीत आलेत तर, संपूर्ण देशातील हजारो ओबीसी जाती रस्त्यावर भीक मांगतांना दिसतील, यात शंका नाही.
या बोगस अहवालाचा सारांश असलेली प्रत पी.डी.एफ. फाईल स्वरूपात देण्यात आलेली आहे. त्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे.....
1)  मराठा व कुणबी एकच जात आहे, हे या अहवालाने मान्य केले आहे. त्यासाठी ते पहिला आधार देतात की, मराठी भाषा बोलणारा तो मराठा, असा पुरावा देऊन अहवालकर्ते स्वतःच अडचणीत आलेले आहे. कारण महाराष्ट्रात राहणारे सर्वच जातीचे लोक मराठी भाषेतच बोलतात. धोबी, लोहार, सुतार, कुंभार आदि जातीसुद्धा मराठीच बोलतात मग त्यांनीही स्वतःला मराठाच म्हणावे काय?
2)  मराठा व कुणबी मराठी भाषाच बोलतात म्हणून ते एकच जात आहेत, असा हास्यास्पद पुरावा जोडलेला आहे.
3)  मराठा व कुणबी एकच आहेत तर, मग त्यांना एकत्र 16 टक्के आरक्षणाच्या SEBC प्रवर्गातच का टाकले नाही. कुणबी जातीला ओबीसी यादीतच का ठेवले आहे?
4)  आजवरच्या सर्व राज्य मागास आयोगाच्या अहवालात मराठा व कुणबी एक नाहीत व मराठा ही पुढारलेली जात असल्याचे सिद्ध केले आहे. संदर्भः- मराठा ओबीसीकरण, लेखक- अशोक बुद्धीवंत, प्रथमावृत्ती-2009)
5)  जगन्नाथ होले विरूद्ध महाराष्ट्र सरकार (रीट पिटिशन क्र. 4476/2002) या केसच्या दिनांक 17 ऑक्टोंबर 2003 च्या निकालपत्रात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठा व कुणबी हे एकच आहेत, असे मानायला नकार दिलेला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 15 एप्रिल 2005 रोजी शिक्कामोर्तब केले आहे. हायकोर्टाने अशा प्रकाराला मुर्खपणा (Absurdity) म्हटलेले आहे. (AIR Bombay R 365 (DB) Aurangabad bench, 2006, Vol.1, P 370)
6)  मराठा हे कुणबीच आहेत व ते शूद्रच आहेत, असे सिद्ध करण्याचा आटापिटा करतांना चूकीची उदाहरणे दिलेली आहेत. छत्रपती शिवराय, संत तुकाराम आदि महापुरूष मुळातच शुद्र होते व कुणबीही होते. मात्र आजच्या मराठा जातीच्या तत्कालीन मराठा पूर्वजांनी स्वतःला 96 कुळी उच्चवर्णीय समजून शिवरायांना शूद्र म्हणून हिन वागणूक दिलेली आहे. छत्रपती शिवरायांनी लिहिलेल्या 136 पत्रांपैकी एका पत्रात ते खंत व्यक्त करतात की, ‘ते देशमूख नाहीत, पाटील आहेत.’ (संदर्भः- शिवाजी महाराजांची पत्रे, लेखक- डॉ. प्र.न. देशपांडे)
7)  जातीव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या काळात अनेक उलथापालथी झालेल्या असून काही जातींची उन्नती होऊन त्या क्षत्रिय झालेल्या आहेत. त्यापैकी मराठा ही मुळात मिरासदार कुणबी जात असली तरी मध्ययुगीन काळात सामंतशाहीमुळे व आधुनिक काळात ब्राह्मणेतर चळवळीमुळे काही कुणबी घराणी उन्नयन होऊन त्या क्षत्रिय झाल्यात. महाराष्ट्रात जसे मराठा, तसे उत्तरेकडे जाट, ठाकूर वगैरे जाती क्षत्रिय म्हणून आजही मिरवितांना दिसतात.
8)  खाऊजा धोरण वा शेतीविषयक सरकारी धोरणामुळे या क्षत्रिय जातीत गरीब वर्ग निर्मान झाला आहे. तो आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्याचे कोणतेही सामाजिक व शैक्षणिक शोषण झालेले नाही, त्यामुळे तो सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असू शकत नाही. हे सत्य कालेलकर आयोग, मंडल आयोग व त्यानंतरच्या अनेक आयोगांनी, तसेच न्यायालयांनीही वारंवार मांडले असतांना, महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना जाणीवपूर्वक षडयंत्र रचून त्यांना SEBC दर्जा दिला व मूळ ओबीसींच्या यादीत टाकले आहे.
या निवेदनाद्वारे आम्ही विनंती करतो की, मराठा समाज हा केवळ आर्थिकदृष्ट्या मागास असून त्यांना 10 टक्के सवर्ण आरक्षणाच्या प्रवर्गात टाकावे.

आपले विश्वासू
1)    प्रकाश आण्णा शिवाजीराव शेंडगे, अध्यक्ष,
2)    बालाजी शिंदे, उपाध्यक्ष,
3)    अरूणराव खरमाटे, सचिव,
4)    चंद्रकांत बावकर, कुणबी समाज अध्यक्ष,
5)    प्रा. टि.पी. मुंडे
6)    राजाराम पाटील, आगरी कोळी संघटना
7)    सचिनदादा माळी, युवा आघाडी अध्यक्ष,
8)   
9)   
10)                      
11)                      
12)                      
13)                      
14)                       प्रा. श्रावण देवरे, सल्लागार,


------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
                                                                                     ईमेल- s.deore2012@gmail.com

Sunday, January 13, 2019

55 BahujanNama, Tharar (4), Lokmanthan 13 Jan 19


पंचावन्नावी खेप ......!     ( दै. लोकमंथन, रविवार,  13 जानेवारी 2019 च्या अंकासाठी)
 बहुजननामा- 55
     तो 15 दिवसांचा थरार....! (भाग-4)
बहुजनांनो.... !   
जातीव्यवस्थेची जी अनेक अंगभूत वैशिष्टे आहेत, त्यापैकी एक वैशिष्ट्य जे निश्चितपणे समाजकारण, अर्थकारण व राजकारणावर परिणाम करते. ब्राह्मण व क्षत्रिय जातींची दहशत ही बहुतेक सर्वच एस.सी, एस.टी. व ओबीसी जातींवर प्रभाव गाजवीत असते. ही दहशत उतरत्या क्रमात चढत्या भांजणीत असते. या दहशतीवर मात करण्यासाठी प्रचंड मानसिक ताकत कमवावी लागते. यात नैतिकता व प्रामाणिकता या दोन बाबी फार महत्वाच्या असतात. शुद्रादिअतिशूद्रांकडे असलेली ही दोन हत्यारे अशी आहेत, की ती कधीच कोणी हिसकावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या नेत्या-कार्यकर्त्याकडे ही हत्यारे आहेत, तो कितीही कनिष्ठ जातीचा असला तरी त्याचे लढाईतील मनोधैर्य कोणीच खच्ची करू शकत नाही.
या 15 दिवसांच्या लढाईत आमचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी शत्रूंनी अनेक अडथळे आणलेत. मानसिक त्रास सर्वात मोठा असतो. परंतू असा त्रास होतांना तात्यासाहेब महात्मा फुलेंचा एक आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अनेक अडथळे आणूनही तात्यासाहेब आपले स्त्री-शिक्षण व अस्पृश्य शिक्षणाचे काम थांबवत नाहीत, असे लक्षात आल्यावर पुणे नगरपालिकेतील ब्राह्मणांच्या सांगण्यावरून त्या भागातील कचरा व घाण तात्यासाहेबांच्या घराच्या मागे भिंतीला लागूनच टाकायला सुरूवात झाली. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी यायला लागली व घरात राहणेही अशक्य व्हायला लागले. परंतू तरीही तात्यासाहेबांनी एकही तक्रार केली नाही. तो त्रास ते गुपचूप सहन करीत होते. याचे साधे कारण असे आहे की, शत्रूकडून होणार्‍या त्रासाबद्दल नेत्याने गवगवा केला की, त्याचा सर्वात मोठा वाईट परिणाम सोबतचे मित्र वा कार्यकर्त्यांवर होत असतो. नेत्याला त्रास देऊन कार्यकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे दहशत निर्माण करण्याची ही एक पध्दत आहे. शत्रूने दिलेल्या त्रासाबद्दल आपणच गवगवा केला तर, सोबतचे मित्र व कार्यकर्ते आपल्यापासून लांब जातात. ही अप्रत्यक्ष दहशत असते, जी नेत्यावर नव्हे तर सोबतच्या मित्र-कार्यकर्त्यांवर परिणाम करते. तात्यासाहेबांचा हा आदर्श लक्षात ठेवून मी सर्व प्रकारचा त्रास गुपचूप सहन केला व करीत आहे.
शत्रूंकडून जसे त्रास देण्याचे प्रयत्न झालेत, त्यापेक्षा जास्त प्रयत्न मित्रांकडून झालेत. शत्रूंनी दिलेला त्रास गुपचुप सहन केला तर तो लपून राहतो, मात्र मित्रांनी आपले मनोधैर्य खच्ची करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या कारवाया केलेल्या असतात, त्या लपवून ठेवता येत नाही. कारण ऐन लढाईत आपली साथ कोण सोडणार आहे किंवा कोण अडथळे आणणार आहे, याची स्पष्ट कल्पना जर तुम्हाला नसेल तर चळवळीचा घात होऊ शकतो. एरवी शांततेच्या काळात सर्वच मित्र असतात व एकत्रीत चर्चाही करीत असतात. पण जसजसा संघर्ष तीव्र होत जातो, तसतसे मित्र कोण व शत्रू कोण याची स्पष्टता होत जाते. पुसट रेषा ठळक होत जातात. पांढरे स्वच्छ दिसणारे चेहरे अधिक भडक व गडदही होत जातात. काही तर भेसूर वाटायला लागतात. ही झाली रेषेच्या पलिकडची गोष्ट, जी गृहीतच असते. मात्र रेषेच्या अलिकडील आपल्याच मित्रांचे वागणे माणसाला अस्वस्थ करून जाते. जे लोक फेसबवूक व्हाट्सपवर लाईक करायला व सपोर्टींग कमेंट करायला थकत नव्हते, त्या लोकांच्या लाईक घटत गेल्यात. शत्रूंकडून फेसबुक-व्हाट्सपवर मला अश्लिल शिव्यांचा भडिमार सुरू झाल्यावर बहुतेक सर्व फेबुफ्रेंड गायबच झालेत. लाईक करायलाही घाबरत होते. कमेंट करणे तर दुरच! एकमात्र सुरेश चरडे व प्रविण वाघ नावाचे दोन तरूण फेसबुक व यु ट्युबवर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलेत. या तरूणांना मी यापूर्वी कधीच कोठे पाहिले नाही व भेटलोही नाही. या 15 दिवसांच्या लढाईत हे तरूण अचानक उगवले व माझे खंबीर पाठीराखे बनले. अजूनही सुरेश चरडें व प्रविण वाघ बद्दल मी अनभिज्ञच आहे.
शांततेच्या काळात जे अनेक ओबीसी नेते डरकाळ्या फोडत होते, ते बहुतेक गायब झालेत. ओबीसीतील बरेचसे यशस्वी भाषणकर्ते जे एकेका भाषणाचे 20 ते 30 हजार रूपये रोख मोजून घेत होते व आक्रमक भाषणे करून टाळ्याही मिळवीत होते, तेही बीळात लपून बसलेत. यांनी ‘ओबीसी’ असल्याचे सर्व राजकीय-आर्थिक फायदे उपटलेत व अजूनही उपटत आहेत. मात्र ओबीसीसाठी लढाई सुरू होताच हे सर्व लाभार्थी बीळात लपून बसलेत. ते बीळातून बाहेर यावेत म्हणून मी त्यांच्यासाठी एक अश्लील शिवीगाळ करणारी पोस्ट टाकली.
29 तारखेला धरणे आंदोलन चालू असतांना मराठा आरक्षणाचे बील मंजूर होताच एक विचारवंत बीळातून बाहेर पडलेत. उशिरा का होईना मित्र साथ देण्यासाठी बाहेर पडला म्हणून आनंद झाला. मला वाटले ते थेट आझाद मैदानावर येतील, पण नाही आलेत. काही हरकत नाही. ते गेलेत डायरेक्ट टि.व्ही. चॅनलवर! संध्याकाळच्या चर्चेत मीही सहभागी होतो. मराठा आरक्षणाचे बील पास झाले या बद्दल एंकर ने विचारणा करताच हे महाशय मोठ्या आनंदाने म्हणाले की, ‘‘आता आजपासून आमचे ‘जाणते राजे’ ओबीसी झाले आहेत व ते आता निश्चितच ओबीसी म्हणून प्रधानमंत्री होतील!’’ त्यांचे हे वाक्य ऐकल्यावर माझी खात्री झाली की हे महाशय माझ्या अश्लिल पोस्टमुळे बीळातून बाहेर आलेले नव्हते, तर ते आपल्या मराठा मालकाला ‘ओबीसी प्रधानमंत्री’ डिक्लेयर करण्यासाठी बाहेर पडले होते.
या 15 दिवसात लढाई ऐन भरात असतांना लढणार्‍यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे जे
अनेक कार्यक्रम झालेत, ते काही योगायोग म्हणून झाले नाहीत. त्यामागे शत्रूंचीही योजना असते. मराठ्याला ‘‘ओबीसी प्रधानमंत्री’’ डिक्लेयर करणे, एवढ्यावर भागले नाही. तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या नावाने दरवर्षी 28 नोव्हेंबरला फुलेवाड्यावर पुरस्कार दिला जातो. ओबीसी-मराठा संघर्ष सुरू असतांना या वर्षीच्या महात्मा फुले पुरस्कारासाठी मराठा जातीतील हे भावी ‘ओबीसी प्रधानमंत्री’च कसे सापडले? याला निव्वळ योगायोग कसे म्हणणार? तिसरे आणखी एक बुद्धिमान आहेत ज्यांना दहशतीच्या बीळातून बाहेर पडण्यासाठी मराठा माणूसच सोबतीला लागला. ‘मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे’, अशी भुमिका मांडणार्‍या मा. म. देशमुखांना पुरस्कार देऊन आमची ओबीसी चळवळ धन्य धन्य झाली. तिकडे बामसेफ तरी कशी मागे राहील? त्यांनीही ओबीसींचे खच्चीकरण करण्यासाठी कट्टर ‘मराठा आरक्षणवादी’ माणूस बामसेफ अधिवेशनात आणून स्वतःच्या ‘‘अ-आंबेडकरवादाचे’’ उद्गाटन करून घेतले. यात मी मित्रांची नावे टाकलेली नाहीत, याचे कारण हे आहे कि, आम्हाला आधीच शत्रूंची कमतरता नाही, त्यात नव्या शत्रूंची भर नको. ज्याने-त्याने प्रामाणिकपणे आपले स्वतःचे ‘आत्मपरिक्षण’ करावे व ओबीसी चळवळीला आपापल्या परीने हातभार लावावा. काही करता येत नसेल तर उगाच आव आणून ‘काहीही’ करायचा प्रयत्न करू नका. घरात शांत बसून राहणे ही सुद्धा चळवळीला मदतच असते.
ओबीसी आरक्षण संकटात असतांना व त्यासाठी आम्ही लढत असतांना असे काही निराशजनक प्रकार घडलेत. अर्थात अशा खच्चिकरणाला आम्ही फाट्यावर मारतो. ते आमच्या पाचवीलाच पूजले आहे. 90 च्या दशकात मंडल आयोगाचे सर्वात कट्टर समर्थक असलेले देशपातळीवरचे सर्वोच्च ‘बहुजन-नेते’, मंडल आयोग लागू होत असतांना मान्यवर व्हि.पी. सिंगांचे खच्चिकरण करण्यासाठी देविलाल सोबत सभा घेत होते व व्ही.पी. सिंगांचे सरकार पाडण्याचे आवाहन करीत होते. अशी अनेक उदाहरणे आहेत.
दरम्यान प्रकाश आण्णा व हरिभाऊ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील होतेच. 28 तारखेला बील तयार झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून निरोप आला. आमचे ओबीसींचे शिष्टमंडळ मंत्रालयात आले. तेथे आम्हाला काही ओबीसी व एस्सी विद्यार्थी भेटलेत. ते समांतर आरक्षणाचे बळी होते. त्यांनी आम्हाला शिष्टमंडळात सामील करून घेण्याची विनंती केली. ते अनेक आमदार व मंत्र्यांकडे जाऊन भेटून आले होते, मात्र त्यांचा प्रश्न सुटत नव्हता. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटले तरच हा प्रश्न सुटेल. म्हणून आम्ही त्यांन सोबत घेतले. प्रकाश आण्णा माननीय छगन भुजबळसाहेबांना भेटायला गेलेत. आण्णांनी भुजबळसाहेबांना विनंती केली की, आपण ओबीसींच्या शिष्टमंडळात सामील होऊन आमचे नेतृत्व करावे’. मात्र भुजबळसाहेबांनी ओबीसी शिष्टमंडळात सामील व्हायला स्पष्टपणे नकार दिला. मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चेत आम्ही आमचे मुद्दे मांडलेत. मुख्यमंत्री ठासून सांगत होते की, ‘मराठ्यांचा प्रवर्ग वेगळा आहे व ते मुळ खर्‍या ओबीसीत कधीच शिरकाव करू शकणार नाहीत.’ ‘पण जर वरचे 16 टक्के आरक्षण कोर्टात टिकले नाही तर, ते एस.ई.बी.सी. म्हणून मूळ ओबीसीतच येतील’, अशी शंका आमच्याकडून व्यक्त होताच ते म्हणाले की, ‘जो पर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तो पर्यंत मी असे काहीहि होऊ देणार नाही.’ याचा स्पष्ट अर्थ असा की, पुढच्या काळातही मीच मुख्यमंत्री राहील याची काळजी ओबीसींनी घेतली पाहिजे. डोक्यावर तलवार लटकती ठेवायची व मलाच पुन्हा मुख्यंमत्री करा, नाही तर तलवार तुमच्या डोक्यातच घुसेल, असा दमही द्यायचा! ओबीसींच्या कृपेने सत्तेवर आलेले मुजोर लोक ओबीसींच्याच डोक्यावर तलवार टांगत आहेत. मात्र ओबीसी जागा होतो आहे. निवडणूका आल्यावर तीच तलवार काढून तुमच्या बहुमताचे मुंडके ओबीसीच छाटणार आहे.
शिष्टमंडळात असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले गार्‍हाणे मांडताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही आक्रमक झालो व परिणामी मुख्यमंत्र्यांना त्यांचे गार्‍हाणे ऐकूण घ्यावेच लागले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘4-5 दिवसातच मी तुमचा प्रश्न सोडवतो. ओपनच्या 50 टक्के जागा या सर्व जाती-धर्मांसाठी खूल्याच राहतील,’ असेही स्पष्ट केले. 5 दिवसाच्या आतच मुख्यमंत्र्यांनी जी.आर. काढला व हजारो ओबीसी-एस्सी-एस्टी व भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांचे नोकरी मिळण्याचे मार्ग मोकळे झाले. ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिष्टमंडळात सामील करून घेतले होते, त्यांचे आभार मानणारे फोन आलेत. नंतर फुकटचे श्रेय घेणार्‍या नेत्यांनी उगाच पत्रके काढून आपली चमकोगिरी करून घेतली. 
29 नोव्हेंबला आमचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन चालू असतांनाच विधानसभेत मराठा आरक्षणाचे बील एकमताने मंजूर झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जाहीर केले. त्यानंतर आझाद मैदानवर पत्रकार व टि.व्ही. चॅनल्सची गर्दी वाढली. आम्ही धरणे आंदोलनाच्या स्टेजवरूनच जाहीर केले की, ओबीसींच्या व एकूणच जातीअंताच्या इतिहासातील ही काळीकुट्ट घटना असून आजचा 29 नोव्हेंबरचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून नोंद होईल!
15 नोव्हेंबरपासून सुरू झालेला थरार 29 नोव्हेंबरला एक पर्व पूर्ण करून दुसर्‍या पर्वात आला आहे. त्याचाही आढावा पुढील बहुजननामात घेऊ या, तो पर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो....!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com


Sunday, January 6, 2019

54 BahujanNama Tharar 15Days Lokmanthan 6Jan19


चोपन्नावी खेप ......!     ( दै. लोकमंथन, रविवार,  6 जानेवारी 2019 च्या अंकासाठी)
 बहुजननामा- 54
     तो 15 दिवसांचा थरार....! (भाग-3)
बहुजनांनो.... !   
          माननीय आमदार हरिभाऊ राठोड यांनी न्युज 18 लोकमतच्या 20 नोव्हेंबरच्या बेधडक कार्यक्रमात एक नवा मुद्दा चर्चेसाठी पुढे आणला आणी जणू काय भुकंपच झाला. हरिभाऊ म्हणाले की, मराठा व कुणबी यांचा एकच नवा प्रवर्ग तयार करून त्यांना काय आरक्षण द्यायचे तर देऊन टाका. त्यांच्या या एका ओळीच्या वक्तव्याचे काय अर्थ निघतात ते बघा- 1) कुणबी मराठा एकच आहेत हे शासनाने व आयोगाने मान्य केले आहे. 2) त्यामूळे त्यांचा एकत्रीत प्रवर्ग बनवायला कोणतीही अडचण नाही. 3) मूळ-खर्‍या ओबीसींच्या यादीतून कुणबी वजा करावेत. 4) त्यामुळे मोठी संख्या असलेली व सर्वात जास्त फायदा घेणारी ‘कुणबी-जात’ मूळ ओबीसी यादीतून काढून टाकली तर खरे ओबीसी असलेले नाभिक, धोबी वगैरे बारा बलुतेदार जातींपर्यंत आरक्षणाचे फायदे पोहचतील. 5) खोटे कुणबी दाखले घेऊन ओबीसी बनलेल्या मराठ्यांची घाण मूळ ओबीसीतून निघून जाईल व शूद्ध-खरे ओबीसीच यादीत राहतील.
हरिभाऊ चॅनलवर हा मुद्दा मांडत असतांनाच मला माननीय चंद्रकांत बावकरांचा फोन
येत होता. मी तो वारंवार कट करीत होतो, कारण त्याच कार्यक्रमात मी हरिभाऊंच्याच शेजारी बसलो होतो. त्यामुळे मला त्यांचा फोन घेता येत नव्हता. दुसर्‍या दिवशी कोकणातल्या सर्वच्या सर्व कुणबी संघटना एकवटल्या व पत्रके प्रसिद्ध करू लागलीत. त्यात माननीय विश्वनाथ पाटील व चंद्रकांत बावकर अग्रेसर होते. सर्व कुणबी संघटनांचे म्हणणे एकच होते की, मराठा व कुणबी एक नाहीत, त्या वेगळ्या दोन जाती आहेत. त्यामुळे आम्हाला मराठ्यांच्या प्रवर्गात टाकू नये. आम्हाला मूळ खर्‍या ओबीसी प्रवर्गातच राहायचे आहे. मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण द्यायला आमचा आधीपासूनच विरोध आहे, तशी याचिका कुणबी संघटनेने 4 वर्षापूर्वीच दाखल केलेली आहे.’ संध्याकाळी जवळ जवळ सर्व टिव्ही चॅनल्सवर कुणबी संघटनांचे प्रतिनिधी याच मुद्यावर आक्रमक होऊन बोलत होते.
2-3 दिवस ही चर्चा चांगलीच गाजली. कुणबी समाजाची एकत्र बैठक झाली व त्यात त्यांनी 29 नोव्हेंबरला आझाद मैदानावर धरणे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय झाला. दरम्यान 24 नोव्हेंबरला प्रतिष्ठीत समजल्या जाणार्‍या बजाज भवनात ओबीसी नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला ओबीसी कॅटेगिरीतील विविध जातीचे जवळपास 70 नेते हजर होते. विशेष म्हणजे अतिअल्प संख्या असलेल्या वडार सारख्या जाती सहसा ओबीसी चळवळीत कधीच आल्या नव्हत्या. मात्र बजाज भवनच्या मिटिंगला वडार समाजाचे नेते आवर्जून हजर होते. जनजागृती वाढत होती. या बैठकीच्या माध्यमातून आम्हाला दोन झुंजार ओबीसी युवक येऊन मिळालेत. राज्य मागास आयोगाच्या गठण पद्धतीलाच आक्षेप घेणारी पिटीशन ज्या दोन साहसी तरूणांनी हायकोर्टात दाखल केली आहे, त्या मृणाल ढोले पाटील व मनोज ससाणे यांनीही टि.व्ही. चॅनल्सवरील चर्चा गाजविल्या. ओबीसींचे आणखीन एक मोठे नेते प्रतापराव गुरव येऊन मिळालेत.
नवे नवे साथीदार मिळत होते. जुने ओबीसी नेते, जुने ओबीसी विचारवंत, नेहमीचे यशस्वी भाषणकर्ते, आणी काही उच्चविद्याविभूषित बुद्धीमान, विद्वान वगैरे लोक मात्र बीळातून बाहेर यायला तयार नव्हते. एरवी शांततेच्या काळात ढाण्या वाघ बनून डरकाळ्या फोडणारे हे लोक या 15 दिवसात प्रचंड दहशतीत असलेले दिसत होते. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलण्याचा साधा विचार जरी यांच्या मनात आला तरी त्यांच्या अंगाचा प्रचंड थरकाप उडतांना स्पष्ट दिसत होता. ही (जुनी) नेते व विद्वान मंडळी बिळातून व दहशतीतून बाहेर निघावीत म्हणून मला फेसबूकवर एक अत्यंत अश्लिल शिवीगाळ करणारी पोस्ट टाकावी लागली. ही पोस्ट अश्लिल असल्याने मार्क जुबेर साहेबांनी लगेच डिलीट केली. मात्र मराठा समाजात आमचे काही खास ‘‘हित(?)मित्र’’ आहेत, जे माझ्या व्हाट्सपवर व फेसबूकवर 24 तास डोळ्यात तेल घालून पहारा ठेवून असतात. या पहारेकर्‍यांनी माझ्या त्या अश्लिल पोस्टचा स्क्रिनशॉट काढून ठेवला व ती पोस्ट वारंवार व्हायरल करीत राहीलेत.
29 तारखेच्या आझाद मैदानावरील ओबीसींचे धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू झालेत. मुंबईतूनच सर्व कामे करता-करता महाराष्ट्रभरातील ओबीसी नेते-कार्यकर्त्यांना फोन करणे, त्यांना पर्सनल एस.एम.एस. करणे, व्हाट्सप, फेसबूकसारख्या सोशल मिडियाचा वापर करून प्रचार करणे. ‘‘आरक्षण वाचविण्यासाठी फक्त एक दिवस द्या!’’, अशी अनेक आवाहने करण्यात आली. धरणे आंदोलनासाठी पोलीस परवानगी घेण्यासाठी प्रा. शंकररावजी महाजन व कर्मवीर ऍड. जनार्दन पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले कमलाकरजी दरवडे हे आझाद मैदान पोलीस्टेशनला गेले. मात्र पोलीसांनी त्यांना परवानगी देण्याचे नाकारले. दुसर्‍या दिवशी काही राजकीय वजन वापरून परवानगी मिळाली. 29 तारखेला प्रत्यक्षात जेव्हा मी आझाद मैदानवर पोहोचलो, तेव्हा लक्षात आले की, आजही लोकशाहीच्या काळात रणांगणावरील युद्धात रणमैदानात सैन्याची व्युहरचना व युद्ध-पोजीशन घेण्याची जागा कशी असावी, कोठे असावी याचे प्रशिक्षण शास्त्रशूद्धपणे आर.एस.एस. कडून दिले जाते आहे. आझाद मैदानावर एका कोपर्‍यात सर्वात शेवटी ओबीसी धरणे आंदोलनाच्या मंडपासाठी जागा दिलेली होती. ओबीसी मंडपाच्याच बाजूला मराठा ठोक मोर्चाचा मंडप होता. आझाद मैदानावर प्रवेश करतांनाच सुरूवातीला मराठा क्रांती मोर्च्याचा मंडप होता. म्हणजे जो कोणी ओबीसी नेता वा कार्यकर्ता आझाद मैदानावर प्रवेश करेल त्याला सर्वप्रथम मराठा क्रांती मोर्च्याच्या मंडपाजवळून जावे लागेल. मोठ्या हिमतीने हा मंडप पार करून गेल्यावर पुढे मराठा ठोक मोर्च्याच्या मंडपाशेजारीच बसावे लागेल. मराठ्यांच्या दोन मंडपात मधोमध ओबीसी मंडपाला जागा देण्याचे कारण लपून राहात नाही. दहशत निर्माण करण्याची ही एक वेगळी लोकशाहीवादी पद्धत आहे. मला यावेळी 9 एप्रिल 2013 रोजी संपन्न झालेल्या आझाद मैदानावरच्या धरणे आंदोलनाची आठवण झाली. विषय हाच होता व दहशतीची पद्धतही अशीच होती. त्या दिवशी आमच्या मंडपच्या शेजारी जाणीवपूर्वक असा मंडप लावण्यात आला की, जेणेकरून आमचे ओबीसी धरणे आंदोलन अयशस्वी होईल.
जातीव्यवस्थेची जी अनेक अंगभूत वैशिष्टे आहेत, त्यापैकी एक वैशिष्ट्य जे निश्चितपणे
समाजकारण, अर्थकारण व राजकारणावर परिणाम करते. ब्राह्मण व क्षत्रिय जातींची दहशत ही बहुतेक सर्वच एस.सी, एस.टी. व ओबीसी जातींवर प्रभाव गाजवीत असते. ही दहशत उतरत्या क्रमात चढत्या भांजणीत असते. या दहशतीवर मात करण्यासाठी प्रचंड मानसिक ताकत कमवावी लागते. यात नैतिकता व प्रामाणिकता या दोन बाबी फार महत्वाच्या असतात. शुद्रादिअतिशूद्रांकडे असलेली ही दोन हत्यारे अशी आहेत, की ती कधीच कोणी हिसकावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या नेत्या-कार्यकर्त्याकडे ही हत्यारे आहेत, तो कितीही कनिष्ठ जातीचा असला तरी त्याचे लढाईतील मनोधैर्य कोणीच खच्ची करू शकत नाही.
लढाईच्या या 15 दिवसात आमच्या कोणत्या शत्रूंनी व कोणत्या मित्रांनी  आमचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला, ते आता पुढील भागात पाहू या!  
तो पर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो....!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com