http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, November 14, 2018

49 BahujanNama LokManthan, 11 Nov 18, Chandragupta & Modi


बहुजननामा-49
     चंद्रगुप्ताचा ‘‘मोदी’’ व मोदींचा ‘‘चंद्रगुप्त’’!
बहुजनांनो.... !   
चंद्रगुप्त आणी मोदी! काही साम्य व बरेच फरकसुद्धा! प्रदिर्घ काळाचा फरक असला तरी एक महत्वाचे साम्य आहे. तो काळ बौद्ध व जैन क्रांतीचा होता. अनेक राजे बौद्ध वा जैन धर्म स्वीकारून क्रांतीची वाट मोकळे करून देणारे होते. परंतू क्रांती जेव्हा ऐनभरात असते, त्या काळात प्रतिक्रांतीची विषवल्ली जमिनीतून बाहेर येण्यासाठी दबा धरून बसलेली असतेच. चाणक्य व त्याची ब्राह्मणी पिलावळ अंडरग्राऊंड षडयंत्रे रचित होती.
मोदिंचा काळ अत्याधुनिक असला तरी 5 हजार वर्षांपूर्वीचा राम आजही तुमच्या मानगुटीवरून खाली उतरायला तयार नाही. राज्यघटना, प्रजासत्ताक, निवडणूका, मताधिकार, स्वातंत्र्य, लोकशाही असे सर्व असतांना कोणत्याही देशात जीर्ण झालेली जातीव्यवस्था जीवंत राहूच कशी शकते? पण ती जीवंत आहे, हे वास्तव आहे. कारण प्रतिक्रांतीचे आजचे चाणक्य याच साधनांचा वापर करून जरठव्यवस्था जीवंत ठेवत आहे.
बौद्धराजा नंद याचा कपटाने खून केल्यानंतर चाणक्याने शूद्रवर्णीय चंद्रगुप्ताला
राजा बनविला. स्वतः चाणक्य वा कोणीही ब्राह्मण राजा बनू शकला असता. मात्र जैन व बौद्ध धर्मांच्या प्रभावातील शूद्रादिअतिशूद्रांच्या जागृतीमुळे ब्राह्मण राजा मान्य होणे कठीणच होते. जसे की आज ओबीसींच्या जागृतीच्या प्रभावामुळे ओबीसी-मोदींना प्रधानमंत्री बनवावे लागले. मोदींना सर्वोच्च पदावर बसवून तेथेच त्यांचा पराभव करणे म्हणजे ओबीसी जनजागृतीचा प्रभाव नष्ट करणे, ही खरी लढाई आहे. या लढाईत शासनकर्ता राजा शूद्र असला व प्रशासनकर्ता वर्ग ब्राह्मण असला तर राजाचा पराभव निश्चित असतो. कारकून म्हणून प्रशासनात शिरलेला ब्राह्मण जेव्हा प्रशासनकर्ता वा ‘पेशवा’ बनतो तेव्हा तो मुजोर होणे जात-स्वाभाविक आहे. पेशवा मुजोर होताच त्याने शिवाजीपासून पुढचे सर्व छत्रपती एकतर मारून टाकले किंवा जेलमध्ये सडविलेत. एकाला तर ‘पागल’ करून मारला. मोदींचेही तेच होत आहे व तसेच होत राहणार आहे. मोदींच्या सुरू असलेल्या पराभवाच्या साखळीत सर्वात शेवटी ओबीसी जागृतीचा खुन होणार आहे. एकदा का ओबीसी जागृतीचा प्रभाव खतम झाला की, मग जाणवेधारी कोणीही ब्राह्मण प्रधानमंत्री बनविला जाऊ शकतो. अशा या दिशाभुल करण्याच्या लढाईत ब्राह्मणवाद यशस्वी होत आहे. मोदी ‘चंद्रगुप्त’ नाही होऊ शकलेत. मात्र चंद्रगुप्ताचा ‘मोदी’ का झाला नाही, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण दोघांच्या काळात फार मोठे अंतर असले तरी काही महत्वपूर्ण बाबातीत साम्य आहे.
ज्याप्रमाणे चंद्रगुप्ताच्या काळात बौद्ध-जैन धर्मांच्या प्रभावात शूद्रादिअतिशूद्र जनता व बुद्धीमान जागृत होता. त्याचप्रमाणे आज फुलेशाहूआंबेडकरांच्या प्रभावात सर्वात मोठा घटक ओबीसी राजकीयदृष्ट्या जागृत झाला आहे. त्यामुळे त्याकाळात चंद्रगुप्त व आजच्या काळात मोदींना ‘’राजा’’ बनवावे लागले.
शूद्र चंद्रगुप्ताला राजा बनविल्यानंतर चाणक्याने त्याचा पराभव करायला सुरूवात केली. त्याची दिशाभूल करू लागला. सम्राट होण्याचा मान प्राप्त झाल्यावरही चाणक्य त्याला ‘वृषभ’ म्हणूनच हिणवीत राहीला. या सांस्कृतिक संघर्षात अनेक चढउतार झालेत. अमात्य राक्षसाच्या ताब्यात प्रशासन देणे हाही एक संघर्षच होता. राक्षस नावाचा अमात्य (प्रधान) असल्याने शासन-प्रशासन जागृत शुद्रांच्या ताब्यात होते. या सांस्कृतिक संघर्षाचा शेवट चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकारण्यात झाला. छत्रपती शिवाजी शाक्तधर्माचा स्वीकार करून सांस्कृतिक संघर्षात मात देत होते. पण त्यांचा खून झाला. तेच राजे संभाजींचे झाले. चंद्रगुप्ताचा ‘मोदी’ होऊ शकला नाही. कारण त्या काळात बौद्ध व जैन धर्मांच्या प्रभावात ब्राह्मणी शक्ती दहशतीत होती. संत ज्ञानेश्वराच्या काळापर्यंत ही दहशत बरकरार होती. ज्ञानेश्वर ब्राह्मण-वैदिक धर्माच्या विरोधात बंड करू शकला कारण त्या काळात अवैदिक नाथ धर्माचा दबदबा होता. ज्ञानेश्वराने नाथधर्माचा उघड स्वीकार करून सांस्कृतिक संघर्षाला क्रांतीचे टोक दिले. सांस्कृतिक युद्धात क्रांतिकारी महापुरूषांना ठार मारणे हा जरी रडीचा डाव असला, तरी तो युद्धाचा एक अविभाज्य बनवला गेला आहे.
बहुजनांच्या युद्धछावणीची सर्वात मोठी कमजोरी याला कारणीभुत आहे. बहुजनांची कमजोरी ही आहे की, ते अवतारवादी आहेत. कोणीतरी अवतार घेईल व मग आपण त्याला अनुसरत गेलो की, आपले दुःख-शोषण नष्ट होईल. आपण युद्ध जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेलो असतो, मात्र विजयाच्या या उंबरठ्यावर आपल्या सरदाराचा खून झाला व त्याचे शीर तलवारीच्या टोकावर घेऊन जिंकणार्‍या मावळ्यांना दाखवीले की झाले काम. सरदाराचे कापलेले मुंडके पाहताच बहुजन सैन्य सैरावैरा पळत सुटते व अशाप्रकारे जिंकलेली लढाई हरतात. सांस्कृतिक युद्धात पराभव दिसू लागताच ब्राह्मणी छावणी रडीचा डाव म्हणून शेवटचे हत्यार काढते व महापुरूषाचा (सरदारचा) खून करते. पुन्हा नवा अवतार येईपर्यंत बहुजन सैन्य सुस्त पडून राहते. या सुस्तीच्या काळात ब्राह्मण छावणी जोरात कामाला लागते. पोथ्या पुराणे, साहित्य, महाकाव्ये, भाकड कथा घेऊन घरोघरी-दारोदारी फिरून कुप्रबोधनाची लाट निर्माण करतात. आधीच्या महापुरूषाने निर्माण केलेले क्रांतीचे बुरूज नष्ट करतात किंवा विद्रूप करतात.
मोदींचा चंद्रगुप्त नाही होऊ शकत. कारण आश्रय देऊ शकणार्‍या क्रांतिकारी शक्ती आकलना-अभावी क्षीण आहेत आणी काही क्रांतीकारी शक्ती जातीच्या नावाने फितूर आहेत. अर्थात याला जबाबदार आजचा शूद्रअतिशूद्र बुद्धीमान वर्ग आहे, जो राजकीय जागृतीचा विकास सामाजिक-सांस्कृतिक संघर्षात करू शकलेला नाही. आजचा शूद्रअतिशूद्र बुद्धीमान वर्ग सर्वात जास्त कर्मकांडी झालेला आहे.
बुद्धीमान वर्गाचं पहिलं आणी शेवटचं काम हेच असतं की त्याने सांस्कृतिक संघर्षातील शस्त्रे विकसित करायची असतात. आपल्या महापुरूषाने जर आपल्याला ‘तलवार’ दिलेली असेल तर तिचा बंदुकीत विकास करता आला पाहिजे. आपल्या महापुरूषाने वर्णव्यवस्था नष्ट करणारे ‘धम्म-तत्वज्ञान’ दिले असेल तर त्याचा विकास जातीअंत करणार्‍या ‘‘नव्या’’ तत्वज्ञानात करता आला पाहिजे. पण नाही. सामान्य जनता कर्मकांड म्हणून जयंती-पुण्यतीथी साजरी करते आणी हे बुद्धीमान तेथे भाषण ठोकून मान व धन कमवितात. ब्राह्मणांना शिव्या देऊन, देवदेवतांची नकारात्मक टिंगल-टवाळी करून भरपूर टाळ्या मिळतात व भरघोस मानधनही मिळते. दिशा बदल करण्याची जबाबदारीच विसरलो आम्ही. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण देतो.
1984 ते 1990 च्या काळात मंडल आयोगासाठीच्या जनजागृतीतून ओबीसींमध्ये राजकीय जागृती मोठ्या प्रमाणात झाली. अब्राह्मणी छावणीकडून  मंडल आयोगाची अमलबजावणी सुरू करून युद्धाची घोषणा केव्हाही होऊ शकते, याची खात्री ब्राह्मणी छावणीला झालेली होती. मग या युद्धात शह देण्यासाठी ब्राह्मणी छावणीने सांस्कृतिक संघर्षाची गर्जना केली. मंडलचे शूद्रास्त्र बाहेर काढताच ब्राह्मणी छावणीने राम नावाचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले. रामाचे हत्यार या सांस्कृतिक युद्धातील ब्रह्मास्त्र होते. त्या काळात कॉ. शरद् पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे ‘‘सीता शंबुक ताटिकेच्या स्मारकाची मोहिम’’ हाती घेतली होती. अयोध्येत एकीकडे रामंदिर व दुसरीकडे मस्जिद बांधून या दोघात सीता, शंबुक ताटिकेचं स्मारक उभे करावे, असा सम्यक तोडगा घेऊन आंदोलन केले. धूळ्यात सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यात आंदोलनाची रुपरेषा आखली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा आंदोलन सुरू झाले, तेव्हा सर्व दलित व कम्युनिस्ट पक्षांनी पळ काढला. कॉ. शरद पाटील यांचा सांस्कृतिक तोडगा देशपातळीवरील सर्व दलित, परोगामी व डाव्या पक्ष-संघटनांनी उचलून धरला असता तर रामंदिराचे आंदोलन कुठल्याकुठे गायब झाले असते. मुख्य म्हणजे या सांस्कृतिक संघर्षात ब्राह्मणी छावणीची पिछेहाट झाली असती व ओबीसींसकट वर्ग-जातीअंतक शक्ती मजबूत झाल्या असत्या. मात्र ऐन मोक्याच्या वेळी विजय उंबरठ्यावर असतांना आमचे सरदारच पळ काढतात व युद्ध हरतात.
ब्राह्मणी छावणी जेव्हा राम-कृष्णाच्या नावाने सांस्कृतिक युद्ध लादते, तेव्हा तेव्हा आमचे बहुजन बुद्धीमान लोक आकलनाभावी तारे तोडतात. रामायण व महाभारत काल्पनिक आहे, असे सांगून युद्धातून पळ काढतात. 2014 साली ओबीसी जागृतीची राजकिय लाट कॅश करण्यासाठी ब्राह्मणी छावणीने ओबीसी मोदींना प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार बनवीले. जसे चाणक्याने चंद्रगुप्ताला ‘राजा’ बनवीले. देशातील सर्व पुरोगामी, दलित व डाव्या पक्ष-संघटनांसाठी ही फार मोठी संधी होती. ओबीसी जनगणना, ओबीसींना 52 टक्के रिझर्वेशन व ओबीसी कर्मचार्‍यांना प्रमोशनमध्ये रिझर्वेशन, ओबीसींना सरकारी तिजोरीतून 52 टक्के हिस्सा यासारखे प्रश्न घेऊन देशपातळीवर आंदोलन केले असते तर चंद्रगुप्तासारखे मोदीनेही निश्चितच ब्राह्मणी छावणीविरोधात बंड केले असते. चंद्रगुप्ताला जैन धर्माचा, अशोकाला बौद्ध धम्माचा, ज्ञानेश्वराला नाथ धर्माचा, शिवाजींना शाक्त धर्माचा आधार मिळाला म्हणून ते ब्राह्मणी छावणी विरोधात विद्रोह करू शकलेत. याच कारणामुळे चंद्रगुप्ताचा ‘मोदी’ झाला नाही. मोदिंना असा कोणताही आधार क्रांतिकारी म्हणविणार्‍या पक्ष-संघटनांनी पूरवला नाही, त्यामुळे मोदींचा ‘चंद्रगुप्त’ नाही होऊ शकला. परिणामी ब्राह्मणी छावणी अधिकाधिक मजबूत होत चाललेली आहे. पूर्ण पेशवाई कडून सर्वंकष पेशवाईकडे तिची वाटचाल जोरात सुरू आहे, आणी आम्ही आपसात एकमेकांचे ताट हिसकावण्यात मश्गुल आहोत.
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
E-paper Link


Tuesday, November 6, 2018

48 BahujanNama, Lokmanthan, 4 Nov 2018, Dish Badal & Dishabhul


अठ्ठेचाळीसावी खेप ......!        ( दै. लोकमंथन, रविवार4 नोव्हेंबर 2018 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-48
     दिशाबदल व दिशाभूल
बहुजनांनो.... !   
दिशाबदल व दिशाभूल ह्या अनुक्रमे प्रतिक्रांती व क्रांतीच्या कार्यक्रम पत्रिका आहेत. पुर्वी क्रांती प्रतिक्रांती म्हटली की मैदानी युद्ध वा हिंसक कारवाया वगैर करावी लागत असत. बौद्धकाळापर्यंत याच पद्धतीने क्रांत्या व प्रतिक्रांत्या झाल्यात. ब्राह्मणी-वैदिक धर्मातील दशावतराचे मिथक अशा हिंसक क्रांत्या-प्रतिक्रांत्यांचेच प्रतिक आहे. अर्थात ते मिथक ब्राह्मणी धर्माच्या ग्रंथात लिहिलेले असल्याने तेथे ब्राह्मण विजय दाखविलेला आहे. अब्राह्मणी धर्मग्रंथात याच्या अगदि उलट लिहिलेले आहे. उदाहरणार्थ जैन धर्मग्रंथात लिहिले आहे की, क्षत्रियांनीच 21 वेळा पृथ्वी निःब्राह्मण केली आहे.
परंतू बौद्धकाळात हिंसात्मक क्रांती-प्रतिक्रांतीचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे. एक नंदराजाचा व दुसरा बृहद्रथ राजाचा कपटाने खून करून झालेल्या प्रतिक्रांत्या सोडल्यात तर संपूर्ण भारतात जे काही मूलभूत समाज-व्यवस्था बदल झालेले आहेत, ते दिशाबदल व दिशाभूल या दोन कृती-कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेले आहेत.
चातुर्वर्ण्यव्यवस्था नष्ट करण्याची क्रांती ज्या बौद्धधम्माच्या नेतृत्वाखाली
झाली त्या धम्माला शस्त्र उचलण्याची गरज भासली नाही. कारण समाजाच्या दिशा बदलातूनच जर परिवर्तन शक्य असेल तर शस्त्र का हाती घ्यायचे? या काळात लोखंडाचा शोध लागला होता. त्यामुळे शेतीची लाकडी अवजारे जाऊन लोखंडी नांगर वगैरे येत होती. मात्र शूद्रांचे शोषण व गुलामी आतितिव्र व असह्य करणारा ब्राह्मणी चातुर्वर्ण्याचा धर्म कर्मठ झाला होता. समाज करवट बदलण्याच्या परिस्थितीत होता. हीच परिस्थिती महापुरूष वा महान स्त्री घडवत असते. ही समाजस्थिती समजून घेऊन तिचा अभ्यास करून तीला शास्त्रशूद्ध पद्धतीने योग्य दिशेने बदलण्याचे काम जी कोणी व्यक्ती करते, ती व्यक्ती महापुरूष वा महान स्त्री म्हणून सिद्ध होते. चातुर्वर्ण्याचा ब्राह्मण-श्रुतींचा धर्म अतिकर्मठ झाल्याने त्याला आव्हान देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. बौद्ध व जैन धर्माने हे आव्हान पेलले. मात्र केवळ धर्माला आव्हान देऊन भागत नाही. कर्मठ झालेल्या भौतिक व्यवस्थेलाही दिशाबदल करायला भाग पाडले पाहिजे. सिद्धार्थ गौतम बुद्धाला त्याचाही मार्ग सापडला. मेंढक श्रेष्ठीच्या घरी धम्माचे प्रवचन देत असतांना बुद्धाने जे पाहिले, त्याचे त्याने निरिक्षण केले व चिंतन-मनन करून एक नवा ‘पंचधम्म’ तयार केला. मेंढक श्रेष्ठीच्या घरातले लोक ज्या पद्धतीने आपसात व्यवहार करीत होते, त्यातूनच बुद्धाला ‘पंचधम्म’ सापडला. काय होता हा पंचधम्म?
1)  गुलामाला वेतन द्या.
2)  गुलामाला तुम्ही जे खातात तेच अन्न खायला द्या.
3)  गुलामाला आठवड्यातून एक दिवस सुटी द्या.
4)  गुलाम आजारी पडल्यास त्याची शुश्रुषा करून त्याला बरे करा.
5)  दासाला त्याच्या वय व शारिरिक कुवतीनुसार काम द्या.
अशाच प्रकारे बुद्धाने दासांसाठीही पंचध्म्म सांगीतला. या पंचधम्मांचा प्रचार प्रसार करून बुद्धाने चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा मूळ आधार असलेली शुद्रप्रथाक गुलामगिरी नष्ट केली. गुलाम स्वतंत्र झालेत. म्हणजे गुलामांचे रूपांतर वैतनिक मजूरात झाले. या निमस्वतंत्र मजुरांनी लोखंडी अवजारांच्या साहाय्याने शेती करून उत्पादन 10 पटीने वाढविले. त्याकाळातील कुंभार, लोहार, सुतार, साळी, कोळी आदि व्यवसाय करणारे लोक पुग व श्रेणी या दोन घटकात संघटित झालेत व त्यांचेही उत्पादन 10 पटीने वाढले. हे उत्पादन थेट पश्चिमेकडच्या देशांमध्ये विकले जाऊ लागले. समाजाची भरभराट करणार्‍या धम्मक्रांतीचा आश्रय मोठमोठे राजे व जमिनदारही घेऊ लागलेत. एरवी इतर धर्म राजाश्रय मिळाला तरच प्रसार पावतात. येथे स्वतः राजेच धम्माचा आश्रय घेत आपल्या राज्याच्या विकासाची वाट मोकळी करीत होते. याला म्हणतात दिशा बदलून केलेली क्रांती.
बुद्धाने अशा प्रकारे समाजाची दिशा बदल करून वर्णांतक क्रांती केली. आणी त्यासाठी त्याला व त्याच्या सैनिकांना (बौद्ध भिक्खूंना) कोणतेही हत्यार उचलण्याची गरज भासली नाही. या उलट अनेक राजे व सरदारांनी हत्यार टाकून बौद्ध धम्म स्वीकारला. किमान 700 वर्षे ही बौद्ध क्रांती वर्धिष्णू स्वरूपात जीवंत होती. मात्र प्रतिक्रांती दबा धरून बसलेली होतीच. शेवटचा मौर्य राजा बृहद्रथाचा भर सैन्य कवायतीत त्याच्याच ब्राह्मण सेनापतीने खून केला व समाजाची दिशाभूल करून त्याचा मार्गच बदलण्यास सुरूवात झाली. समाजाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बुद्धाच्याच कार्य-पद्धतीचा वापर केला. धम्माने सु-प्रबोधन करण्यासाठी भिक्खुसंघ संघटित केला व ब्राह्मणी धर्माने कु-प्रबोधन करण्यासाठी ब्राह्मण बुद्धीजीवी संघटित व प्रशिक्षित केला. पुश्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीमुळे राजाश्रय मिळालेला असल्याने अमलबजावणीत कुठेही अडथळा आला नाही. थोडेफार वैचारिक विद्रोह व काही तुरळक राजकिय उद्रेक झालेत, मात्र क्रूर ब्राह्मणांनी ते हिंसक मार्गाने मोडीत काढलेत.
बौद्ध धम्माने संपूर्ण देशालाच जी क्रांतिकारी विकासाची दिशा दिली होती, ती दिशा बदलणे इतके सोपे नव्हते. राजकिय क्रांती वा प्रतिक्रांती एका रात्रीतून होऊ शकते, मात्र मानसिक क्रांती वा प्रतिक्रांती करून लोकांच्या विचारांची दिशा बदलणे महाकठीण काम असते. बौद्ध धम्माला वर्णांतक क्रांतीसाठी जनमानसांच्या विचारांची दिशा बदलावी लागली व त्यासाठी लाखो बौद्ध भिक्खु रात्रंदिवस चारिका करीत सु-प्रबोधन करीत होते. तेव्हा कुठे ही क्रांती 700 वर्षे जीवंत राहीली. तिला नष्ट करण्यासाठी ब्राह्मणांना दस पटीने जास्त कष्ट घ्यावे लागलेत. आजही संभाजी भिडेंसारखे असंख्य ब्राह्मण रात्रंदिवस चारिका करीत कुप्रबोधन करीत फिरतात व दंगलींचे कार्यक्रमही घडवून आणतात.
ब्राह्मण बुद्धीजीवींनी आधीचे अनेक ग्रंथ विद्रूप करीत नव्याने लिहून काढलेत. रोज नवनव्या पोथ्या, पुराणे लिहून त्या घरोघरी जाऊन वाचून दाखविणे, नवस, उपवास, पुजा-पाठ, कर्मकांड, यात्रा-जत्रांचे स्वरूप बदलणे अशी कितीतरी असंख्य कामे त्या काळात ब्राह्मणांनी अत्यंत मायक्रो लेव्हलवर केलीत व आजही डोळ्यात तेल घालून करीतच आहेत. भिडे गुरूजीला स्वतःला राज्यकर्ता होण्याची महत्वाकांक्षा नाही, मात्र काम असे करतो की, देशाचा राजा असलेला प्रधानमंत्री भिडेच्या घरी येतो व पायावर लोटांगणही घालतो. याला म्हणतात दिशाभूल करणारी प्रतिक्रांती. आणी आमच्या 85 टक्के दलित-आदिवासी-ओबीसीतून जे काही छटाकभर लोक ‘ज्ञानी’ बनतात ते सर्वच्या सर्व नगरसेवक पासून तर आमदार-खासदार-प्रधानमंत्री बनण्याच्या शर्यतीत उर फुटे पर्यंत धावतात, आणी शेवटी गरीब बिचार्‍या ब्राह्मणांच्या पायावर जाउन आडवे पडतात.
समाजाची दिशा बदलण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी मार्ग दिला, पण पोपटपंची शिवाय दुसरं काय नाही. धम्मही दिला, मात्र तेथेही कर्मकांडाशिवाय दुसरं काही दिसत नाही. जातीव्यवस्था नष्ट करण्याची कृतीशिल दिशा दाखविणारी अनेक ग्रंथ-पुस्तके महापुरूषांनी लिहलीत. परंतू हे सर्व ग्रंथ कपाटात बंदिस्त आहेत. ब्राह्मण त्यांची पोथी-पुराणे घरोघरी पोहोचविण्यासाठी जी मेहनत घेतात तेवढी मेहनत 85 टक्के वाले घेतात काय? ज्या संविधानाने मागासवर्गीय जनतेला गुलामीतून काढून प्रतिष्ठीत बनवले, ते संविधान घरोघरी पोहोचले काय? मग ते पोहोचविण्याची जबाबदारी कोणाची? भारतीयांच्या घरा-घरातून दिशाभूल करणारी पोथी-पुराणे बाहेर काढायचे असेल तर ‘’घर घर संविधान’’ पोहचलं पाहिजे. आम्ही आमच्या फेसबुकवरील 5,000 हजार मित्रांना आवाहन केले की, ‘घर घर संविधान’ पोहचविण्यासाठी ‘’संविधान गौरव परीक्षा’’ कार्यक्रमात सहभागी व्हा! आम्ही जो संविधान अभ्यासग्रंथ छापला आहे त्याच्या फक्त 25 प्रती विकत घ्या व जवळपासच्या कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सप्रेम भेट द्या! 5000 फेसबुक मित्रातून फक्त 20 मित्रांनी प्रत्येकी 25 ग्रंथ विकत घेतले आहेत. कशी होणार संविधानाची अमलबजावणी? संविधान अजूनही कागदावरच आहे. ते जनमाणसांच्या डोक्यात गेलंच नाही. आजवर जेवढं संविधान  राबविलं गेलं, ते केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. बाबासाहेबांच्या नंतरची पीढी नालायक निघाली. त्या पुण्याईत भर टाकलीच नाही. फक्त ओरबाडत राहीली. बाबासाहेबांची पुण्याई संपली आणी राज्यघटनेची अमलबजावणी थांबली. पेशवाई डोक्यावर बसली आणी मनुस्मृतीची अमलबजावणी सुरू झाली.
संविधानामुळे आज कितीतरी मागासवर्गीय व्यक्ती अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर झाले आहेत. लाखो रूपये कमावत आहेत. बंगले, गाड्या, महागड्या साड्या वगैरे खरेदी करीत आहेत, पण हे इतके नालायक आहेत की संविधानाच्या 25 प्रती विकत घेण्याची यांची दानतच नाही. कसा होणार क्रांतीकारी दिशा बदल? मात्र भिडे-एकबोटेसारखे त्यागी लोक समाजाची ‘दिशाभूल’ करून प्रातिक्रांतीला सुसाट वेगाने पुढे नेत आहेत. तोंडाला पुन्हा गाडगे-मडके व गांडीला झाडू बांधले जाण्याची वाट पाहू या, तोवर सर्वांना कडक जयजोती-जयभीम!!!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
( दै. लोकमंथन, रविवार28 ऑक्टोंबर 2018 च्या अंकात प्रसिद्ध)
पुढील लिंकवर क्लीक करा....And open page 5
https://www.readwhere.com/read/1882607/Lokmanthan-Mumbai/Mumbai#page/5/1