http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, July 24, 2019

80 BahujanNama Marathadveshta 20July19


बहुजननामा-80

ब्राह्मणद्वेष्टा ते मराठाद्वेष्टा...!    (उत्तरार्ध)

बहुजनांनो.... !
बहुजननामातील लेखांकावरील वाचकांचे आक्षेप व त्यांना पुर्वार्धात दिलेली उत्तरे वाचून काहींनी आणखी नवे आक्षेप नोंदवलेले आहेत. कारकून, इतिहास, भुगोल वगैरेंना मी कमी लेखतो आहे व ते चूक आहे, असा एक आक्षेप नुकताच घेतला गेला आहे. एखादे ऑफिस चालवायचे असेल तर त्यात ऑफिसर (क्लास-वन) जितका महत्वाचा असतो, तितकाच कारकून व शिपाईसुद्धा. ती एक मशिनरी आहे. त्यात नाक, डोळे जितके महत्वाचे तितकेच इतर अवयवसुद्धा महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे मशिनमध्ये चाक, शाफ्ट, नोझल व पिस्टन जितके महत्वाचे असते तितकेच महत्वाचे धूर बाहेर सोडणारे धुराळेही (Exhaust pipe) असते. या धुराळ्याला मागून बूच लावले की, गाडी सुरूच होत नाही. एकवेळ ऑफिसर नसला तरी चालेल पण कारकूनशिवाय कसं चालेल?
एक कॉलेज मी असे पाहिले आहे की, त्याच्या प्राचार्याची पोस्ट 2 वर्षांपासून रिकामी आहे. तेथे प्राचार्य म्हणून काम करायला कोणीच इच्छुक नाही, कारण त्या कॉलेजचा चेअरमन धन-दांडगा व जात-दांडगा आहे. त्या जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांवर लक्ष ठेवणारा जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी महिनाभर रजेवर आहे, कारण त्याचा एकूलता एक मुलगा 12 वीची परीक्षा देतो आहे. त्या जिल्हा-शिक्षणाधिकारीच्या वरिष्ठ रिजनल ऑफिसरची (विभागीय सहसंचालकाची) बदली होऊन एक वर्ष झाले, पण त्या जागी कोणी आलेच नाही, कारण तो ट्रायबल एरिया आहे. रिजनल सहसंचालकाच्या वर एक डायरेक्टर असतो, तो मुंबईच्या हेड ऑफिसमध्ये बसून संपूर्ण राज्याचा शिक्षण-कारभार सांभाळतो. तर ह्या डायरेक्टर पदासाठी MPSC परिक्षेतून निवड झालेला उमेदवार पदभार घेण्यासाठी 2 वर्षांपासून प्रतिक्षेत आहेत, परंतू मंत्रालयातून तसे आदेश काढले जात नाहीत, कारण संबंधित टेबलावरच्या सचिवाची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बरखास्ती झाली आहे व तो मॅटमध्ये गेलेला आहे. कक्ष अधिकार्‍याने डायरेक्टर नियुक्तीची ही फाईल कारकूनामार्फत मंत्रीमहोदयाच्या टेबलावर ठेवलेली आहे, परंतू मंत्रीसाहेब त्या फाईलवर सहीच करीत नाहीत, कारण त्यांच्यापर्यंत थैलीच पोहोचलेली नाही. म्हणजे कॉलेजला प्राचार्य नाही, जिल्ह्याला शिक्षणाधिकारी नाही, रिजनला सहसंचालक नाही, राज्याच्या हेड ऑफिसला डायरेक्टर नाही व मंत्रालयात सचिवही नाही आणी तरीही ही सगळी कार्यालये सुरळीतपणे चालू आहेत. कोणामुळे? अर्थातच कारकुनांमुळे! कॉलेजपासून ते मुंबईच्या हेडऑफिसपर्यंतच्या सर्व कार्यालयांमध्ये जे कर्मचारी काम करतात, त्या सगळ्यांना नियमितपणे एक तारखेला पगार मिळतो, कोणामुळे? अर्थातच कारकुनांमुळे! तर असे आहे, हे अत्यंत महत्वपूर्ण कारकून पद! कारकूनांमुळे ऑफिस सुरळीत चालते व पगारही नियमितपणे मिळतो. मात्र शिक्षणव्यवस्थेत काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील, महत्वाचे बदल करायचे असतील तर तेथे ऑफिसरच लागतो, कारकुन नाही.
मी जे कारकुनाचे उदाहरण दिले आहे ते कोणाला कमी लेखण्यासाठी नाही, तर कामाच्या श्रेणीबद्ध वाटपासाठी दिलेले आहे. आणी प्रत्येक श्रेणीसाठी वेगवेगळी पात्रता लागते व तत्सम शिक्षणही लागते. मात्र काळजी अशी घेतली पाहिजे की, या श्रेण्यांसाठी विशिष्ट जात-पात्रता असू नये. म्हणजे सफाई कामगारसाठी आठवी पास अशी पात्रता असेल तर, नववी नापास झालेल्या सर्व जातींच्या उमेदवारांना सफाई कामगारासारखीच नोकरी मिळाली पाहिजे. मात्र तसे होत नाही. नाशिक महानगरपालिका श्रमिक संघाचे उपाध्यक्ष कॉ. महादेव खुडे यांच्याशी चर्चा केली असता पुढीलप्रमाणे सत्य बाहेर आले. सफाई कामगारांच्या श्रेणीत दलित (SC) कॅटेगिरीचेच पोरं का असतात? नववी नापास झालेला पोरगा ओबीसीचा असेल तर तो शेतात साल-गडी, शेतमजूर बनेल किंवा आपल्या बापाचा पारंपरिक न्हावी-धोबी-मेंढपाळाचा व्यवसाय सांभाळेल! नववी नापास झालेला आदिवासी मुलगा कुठेतरी रोजगार हमीच्या कामावर मजूरी करेल. नववी नापास झालेला मुलगा जर सरंजामदाराच्या पोटी पैदा झालेला असेल, तर तो नगरसेवक बनेल, आमदार बनेल, शिक्षणमंत्रीही बनेल, परंतू तो सफाई कामगार होणार नाही. नववी नापास झालेला मुलगा कोणाच्याही पोटी जन्माला आला असेल, तर तो सफाई कामगारच बनला पाहिजे. या देशात प्रत्येक जातीला जात्याभिमान चिकटलेला आहे. जातीची गुर्मी नष्ट करायची असेल तर प्रत्येक जातीतील नववी नापास व्यक्तीला किमान दोन वर्षांसाठी ‘सक्तीची’ सफाई कामगाराची नोकरी करायला भाग पाडले गेले पाहिजे. हा जात्यंतक कार्यक्रम राबवायचा असेल तर, ते मनूच्या भांडवली लोकशाहीत शक्य नाही, त्यासाठी जात्यंतक साम्यवादी राजवटच हवी! आणी अशी राजवट देशात यायची असेल तर, त्यासाठी जात्यंतक लोकशाही क्रांतीच करावी लागेल.
मराठा आरक्षणातील ओबीसीकरणाला मी सातत्याने विरोध करीत असल्यामुळे मला ‘मराठा-द्वेष्टा’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मराठाद्वेष्टाच्या आधी ‘ब्राह्मणद्वेष्टा’ ही पदवी फार मशहूर होती. ब्राह्मणद्वेष्टा ही शिवी सर्वप्रथम तात्यासाहेब महात्मा फुलेंना देण्यात आली आहे. त्यानंतर ह्या सन्मानाची पात्रता फक्त कॉ. शरद पाटील यांच्याकडेच होती. ज्यांनी ब्राह्मण्य, ब्राह्मणी, ब्राह्मण्यवाद, आर्यभट, पेशवा यासारख्या संकल्पना वापरून ‘टोकदार’ जातीअंताचे विचार किंवा सिद्धांत मांडलेत, त्यांना ब्राह्मण विद्वानांनी ‘ब्राह्मणद्वेष्टा’ ठरविले. परंतू ज्यांनी हिंदू, हिंदूत्ववाद, वैदिकी, सवर्ण, उच्चजातीय या सारख्या मोघम संकल्पना वापरून जातीअंताचे विचार मांडलेत त्यांना ‘द्वेष्टा’ म्हणून कोणतीच पदवी मिळाली नाही. कारण ही मांडणी ब्राह्मणांना सोयीची होती व आहे
ज्यांनी मराठा आरक्षणाला केवळ ‘50 टक्के मर्यादेचे उल्लंघन’ व ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही’ एवढ्याच मुद्द्यांवर विरोध केला व करीत आहेत, त्यांना ‘मराठाद्वेष्टा’ हा सन्मान मिळणार नाही. कारण ही भुमिका मराठ्यांसाठी व पेशव्यांसाठी सोयीची आहे. (उदाहरणार्थ एड.तिरोडकर, एड. सदावर्ते वगैरे व मुर्दाड ओबीसी नेते यांना मराठाद्वेष्टा म्हटले जात नाही.) परंतू जे मराठा आरक्षणाला कॅटेगिरीच्या मुद्द्यावरून विरोध करतात, त्यांनाच ‘मराठाद्वेष्टा’ ही सन्मानजनक शिवी दिली जाते. मराठा आरक्षणाला सरसकट पाठिंबा देणार्‍या बामसेफ सारख्या संघटना, दलित व बौद्ध सघटना आहेत. सरसकट पाठिंबा म्हणजे मराठा समाजाला ओबीसी कॅटेगिरीमध्ये आरक्षण दिले तरी आम्हाला आनंदच आहे, अशी ‘अ-आंबेडकरवादी’ भुमिका घेणारे अर्धवट लोक! याच्यात संधीसाधूपणा असा असतो की, मराठ्यांना जवळ करावे व पेशव्यांना शिव्या द्यायच्या! या मध्ये ‘सुरक्षिततेची’ भित्री-भागूबाईची भावना असते. मराठा व पेशव्यांना एकाच वेळेस युद्धासाठी ‘आव्हान’ देण्याची पात्रता केवळ सच्च्या ओबीसी जातींमध्येच आहे, हे मी उदाहरणासकट अनेकवेळा सिद्ध केले आहे (वाचा- बहुजननामा-68 व 69) त्यामुळे सच्च्या ओबीसी जातींना साधनहीन व शस्त्रहिन करण्यासाठी मराठ्यांना ओबीसी (SEBC) कॅटेगिरी प्रदान केली जात आहे. मराठे कितीही प्रबळ झालेत तरी ते पेशव्यांचे मांडलिक सरदार म्हणूनच काम करणे पसंद करतात. ब्राह्मण-क्षत्रिय युतीची ही परंपराच आहे. छत्रपती शिवराय हे शूद्र जातीत जन्मलेले असल्याने व राजे संभाजी हे जन्मतःच शूद्रधर्मी शाक्त असल्याने त्यांचा कट्टर ब्राह्मणविरोध-सरंजामविरोध हा स्वाभविक होता. परंतू सरंजामदार, वैतनिक जमिनदार हे जन्मतःच क्षत्रिय असल्याने ते ब्राह्मण वर्चस्वाखाली दोन नंबरचे (मांडलिक) स्थान स्वेच्छेने स्वीकारतात.
तर अशा या ब्राह्मण-क्षत्रिय युतीला कट्टर विरोध करणे हे ओबीसी, दलित व आदिवासी कॅटिगिरीचे जन्मसिद्ध कार्य आहे. ऐतिहासिक परंपरा हेच सत्य सांगते. त्यामुळे ब्राह्मण व क्षत्रिय (जाट-पटेल, मराठा वगैरे) यांचा कॉमन शत्रू ओबीसीच आहे व त्याला आत्ताच गाडला नाही तर, तो तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ब्राह्मण-क्षत्रियांना गाडून टाकेल, अशी रास्त भीती ब्राह्मण व मराठ्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांना ‘मराठा ओबीसीकरण’ करून सच्च्या ओबीसी जातींच्या गळ्यात ‘‘गाडगे-मडके’’ बांधायचे आहे.
सच्च्या ओबीसींशिवाय ‘जात्यंतक लोकशाही क्रांती’ शक्य नाही, हे सत्य सर्वप्रथम उमगले ते कॉ. शरद पाटील (शपा) यांना! शपांनी दलित व आदिवासी आरक्षणावर वा त्याच्या कोणत्याही आयोगावर कधीच पुस्तक लिहीले नाही. मात्र ओबीसींच्या आरक्षणावर व मंडल आयोगावर अकाट्य असे तात्विक पुस्तक लिहीले. शपा बामसेफच्या व मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आक्रमकपणे ठोकरून नाकारायचे, कारण त्यांच्या मते ह्या संघटना जातीय आहेत. श्रावण देवरे व अशोक राणा या दोघांनी शपांना ‘कन्व्हीस’ केल्यावर ते नाखूशीनेच मराठा व बामसेफच्या कार्यक्रमांना जायला लागलेत. मात्र श्रावण देवरे ओबीसींच्या सभा व मंडल आयोगाच्या परिषदांना शपांना निमंत्रीत करीत नाही, याबद्दलची उघड नाराजी शपांनी दादाजी माळी (जिभाऊ) यांच्याकडे व्यक्त केली होती. ‘छगन भुजबळांच्या समता परिषदेच्या शिबीरात माझे एक व्याख्यान आयोजित कर’, अशी सूचना शपांनी मला फोनवरून केली होती. परंतू समता परिषदेच्या शिबिरात वक्ता निमंत्रित करणारे संयोजक ‘करंट्या’ बुद्धीचे होते.  या शिबिरांमध्ये कुमार केतकरसारख्या कट्टर ‘मंडल आयोग विरोधी’ वक्त्याला माळ्यांचे प्रबोधन करण्यासाठी बोलावले जात होते. अशा परिस्थितीत या शिबिरांच्या करंट्या संयोजकांना मी शपाचे नाव सुचविण्याची हिम्मत करू शकलो नाही. पण शपाचे ओबीसी-प्रेम पाहता हेच सिद्ध होते की जात्यंतक लोकशाही क्रांतीसाठी सच्चा ओबीसीच साधनयुक्त व शस्त्रयुक्त झाला पाहिजे. ओबीसींसाठी मंडल आयोग हा एक जात्यंतक लोकशाही क्रांतीच्या शस्त्रांचा कारखाना होता व आहे. आणी हा क्रांतीकारी शस्त्रासांचा कारखानाच उध्वस्त करण्यासाठी जाट-पटेल-मराठा ओबीसीकरणाचा ब्राह्मणी सर्जीकल स्ट्राइक केला जात आहे. पेशव्यांचे हे मराठा-षडयंत्र उघडे पाडून त्या विरोधात वैचारिक व मैदानी संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्याला आधी ब्राह्मणद्वेष्टा व नंतर मराठा द्वेष्टा अशा पुरस्कारांनी सन्मानीत केले जाते. कॉ. शरद पाटील (शपा) ‘ब्राह्मणद्वेष्टा’ या महान पुरस्काराने सन्मानीत झालेत. त्यांच्या हयातीत मराठा आरक्षणाचे ब्राह्मणी षडयंत्र केले गेले असते, तर कदाचीत त्यांनाही ‘मराठाद्वेष्टा’ ही महान पदवी मिळाली असती. परंतू एक ‘शपाशिष्य’ म्हणून श्रावण देवरेंसारख्या छोट्या कार्यकर्त्याला ‘मराठा द्वेष्टा’ ही मोठी पदवी मिळाली, धन्य जाहला श्रावण देवरे!
जय जोती, जयभीम... सत्य की जय हो!!!!
(लेखन दिनांक- 17 जुलै 2019 व प्रकाशन 20 जुलै 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग

 Email- 

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

Saturday, July 13, 2019

79 Bahujannama Shanka Samadhan 14 July 2019


बहुजननामा-79
बाळ पाहिजे पण प्रसव वेदना नको...! (पुर्वार्ध)
बहुजनांनो.... !
ईव्हीएम आणी मराठा आरक्षणाच्या विषयावरून एका वेगळ्याच विषयाकडे वळावे लागते आहे. नंतर केव्हा तरी लिहू म्हणूण यावर लिहायचे मी पुढे ढकलत होतो, मात्र आता तक्रारींचा पाढा लांबत जात आहे, म्हणून शंका व तक्रारींना समाधानकारक उत्तरे तर दिलीच पाहिजेत, अन्यथा वाचकांमध्ये गैरसमज वाढू शकतो.
सर्वप्रथम बहुजननामाच्या तमाम वाचकांचे-अभ्यासकांचे मी आभार मानतो की, आपण माझ्यावर व बहुजननामावर जे प्रेम दाखवीत आहेत, त्याबद्दल मी खरेच आपला ऋणी आहे. फेबु व व्हाट्सप वरील चारोळ्या (चार ओळी) वाचता वाचता दमछाक होणार्‍या या काळात आपण माझे लांबलचक बहुजननामा वाचून काढतात, त्यावर कॉमेंट करतात, फोन करतात, चुका दाखवितात व दुरूस्त्याही सुचवतात. यात वाचकांनी घेतलेल्या आक्षेपांवर व्यक्तीशः फोनवरून वा भेटीत चर्चा होते. परंतू हेच आक्षेप इतरही वाचक-कार्यकर्त्यांच्या मनात असू शकतात, म्हणून बहुजननामाचा हा लेखांक ‘शंका आणी समाधान’ या विषयाला अर्पण करीत आहे.
पहिला आक्षेप आमच्या वाचक मित्रांनी घेतला ‘काठिण्याचा’! म्हणाले, तुमचा लेख वाचायला लांबलचक असला तरी समजायला कठिण असतो. लेखात जात्यंतक सारखे कठिण शब्द असतात. सोप्या भाषेत नाही का लिहीता येणार? बरेचसे मुद्दे, नव्या संकल्पना डोक्यावरूनच जातात. आता हा आक्षेप बरोबरच आहे. असेच आक्षेप आमचे गुरू कॉ. शरद् पाटील (शपा) यांच्यावर घेतले जात होते, आजही घेतले जातात. या आक्षेपांना शपांनी सुंदर उत्तर दिलेले आहे. ‘सत्यशोधक मार्क्सवादी’च्या संपादक मंडळातील एक सदस्य म्हणून मी या विषयावर यापूर्वी लिहीलेले आहे. त्यातील काही मुद्दे सारांशाने येथे देत आहे. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक रूटीन जीवन जगणारे. मागच्या पानावरून पुढच्या पानावर ढकलले जाणारे! ‘अद्यात ना मध्यात’ असलेले लोक या पहिल्या प्रकारात मोडतात. आणी दुसर्‍या प्रकारात जगाच्या प्रवाहाला चांगले-वाईट वळण देऊन जगण्याची दिशा बदलणारे असतात! जग बदलणारे क्रांती वा प्रतीक्रांतीकारक! रूटीन जीवन जगायचे असेल तर फारसं डोकं खाजवावे लागत नाही. नर्मदेच्या गोट्यासारखे प्रवाहासोबत वाहत जायचे असते. आलीया भोगासी असावे सादर! जे घडते आहे त्याला निमूटपणे खाली मान घालून सामोरे जाणारे. त्यासाठी फारशा शिक्षणाची गरज नसते. मागच्या पानावरून पुढच्या पानावर ढकलणारा ‘कारकून’ व्हायचे असेल तर इतिहास, भुगोल सारखे सोपे विषय घेऊन पदवीधर व्हावे व कारकूनी सारखी नोकरी पत्करून आयुष्यभर पाट्या टाकत राहावे! आर्ट्स कॉलेज यासाठी पुरेसे असते.
परंतू जर नवनिर्मिती करायची असेल, प्राणी सृष्टीच्या अडचणी, दुःख, व शोषण कमी करून त्यांना सुखसोयीचे जीवन मिळवून द्यायचे असेल तर, त्यासाठी खडतर तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या म्हणजे हिमालयात जाऊन ध्यानस्थ बसणे नव्हे. तपश्चर्या म्हणजे ज्ञानार्जन करणे, प्रयोग करणे. त्यातील निचोड असलेल्या अनुभवजन्य निष्कर्षांना एकत्रीत करून त्यांना शास्त्रशुद्ध तत्व-सिद्धांताचे स्वरूप देणे, त्याचा विस्तार, प्रसार करणे, त्याला सामान्यांपर्यंत पोहचवून जनरलाईज करणे व सर्वांना त्याचा लाभ मिळवून देणे! यासाठी घोर कष्ट करावे लागतात. जगाचा रोष पत्करावा लागतो, मृत्युलाही सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. क्रांतीचे महान तत्वज्ञान प्रसवणार्‍या महामानव बुद्ध व मार्क्सने सांगून ठेवलेले आहे की, ‘जग कसे आहे, हे सांगणारी तत्वज्ञाने खूप आहेत, परंतू जग कसे असावे, हे सांगणारे त्वज्ञान पाहिजे.’ अशी सृष्टीची नवनिर्मिती करणारी, नवरचना करणारी व आमुलाग्र बदल घडवून आणणारी तत्त्वज्ञाने, सिद्धांत व प्रयोग यशस्वी करायचे असतील तर त्यासाठी शास्त्रशूद्ध अभ्यासच करावा लागतो. शास्त्रज्ञ बनून काही नवे संशोधन करायचे असेल तर, सायन्स कॉलेजातच जावे लागते. सर्वच शास्त्रज्ञ ‘न्युटनच्या मार्गाने’ शास्त्रज्ञ होऊ शकत नाहीत. लाखो शास्त्रज्ञात अपवाद म्हणून एखादाच न्युटन असतो की, ज्याला शाळेत जाण्याची गरज नव्हती. बाकीच्यांना तर शास्त्रज्ञ होण्यासाठी सायन्स, मेडिकल वा इंजिनिअरिंग कॉलेजचेच विषय शिकावे लागलेत.
आर्ट्स कॉलेजमध्ये कथा-कांदबर्‍या, इतिहास, भूगोल सारखे घोकंपट्टीचे विषय सहजपणे पास होऊन कारकून होता येते. मात्र मेडिकल, इंजिनियरिंग व सायन्समध्ये गणित, रसायन, भौतिक अशी तर्कशास्त्रावर आधारित विषय घ्यावे लागतात. जग बदलणारे तत्वज्ञानही अशाच प्रकारचे एक शास्त्र असते. मार्क्सच्या काळात स्वप्नाळू समाजवाद मांडणारे अनेक विचारवंत होते, आजही आहेत. मात्र समाजवादाची मांडणी शास्त्रशूद्धपणे करणारा व त्याचे एक मॉडेल तयार करून ते अनेक देशात यशस्वी करणारा एकमेव मार्क्सच होता. बुद्धाच्या काळात सहा तत्वज्ञानी होते. मात्र जगभर मान्यता मिळाली ती एकमेव बुद्ध तत्वज्ञानाला. जे शास्त्रशूद्ध ज्ञानाची कास धरतात तेच जग बदलण्याची क्रांतीकारी कवायत यशस्वी करतात. शास्त्र शिकायचे असेल तर त्यातील संज्ञा, संकल्पना, त्यातील समिकरणे, तर्कशास्त्र इत्यादि कठीण वाटणारच! ते सोपे करून सांगणार कसे? ते आहे तसेच समजून घ्यावे लागतात. घोकंपट्टी करून काहीच पदरात पडत नाही. प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील अशा सोपेकरणवाल्यांना एक उदाहरण नेहमी द्यायचे. ‘‘यांना बाळ पाहिजे, परंतू प्रसव वेदना नकोत!’’
त्यामुळे माझ्या बहुजननामातील शब्द, संकल्पना व मुद्दे समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी मूलभूत अभ्यासाची गरज आहे. मी जात्यंतक चळवळीचा कार्यकर्ता असल्याने माझी सर्व मांडणी फुले, आंबेडकर, मार्क्स या सारख्या शास्त्रशुद्ध समतावादी तत्वज्ञानाची कास धरणारी आहे. आणी ती मांडणी समजून घ्यायची असेल तर वाचकांनी किमान एकदा तरी फुले-आंबेडकर वाचले पाहिजेत. माझ्या बहुजननामातील एखाद्या लेखांकात काही मुद्दे असे असतात की, ते फक्त संदर्भ म्हणून वापरलेले असतात. या मुद्यांचे अधिक स्पष्टीकरण वा विवेचन मी यापूर्वी लिहिलेल्या पुस्तकात अथवा लेखांकात केलेले असत. ते पुन्हापुन्हा रिपीट करणे शक्य नसते. त्यामुळे हे मुद्दे मुळातून समजून घेण्यासाठी माझी पुस्तके वा आधीचे लेखांकही वाचले पाहिजेत.
दुसरा आक्षेप आहे, धरसोडपणाचा! मी माझ्या भुमिकेत बदल करतो वा प्राधान्यक्रम बदलतो असा आक्षेप आहे. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. त्यांचा विचार करू या! मराठा ओबीसीकरणाच्या विरोधात मैदानी लढाई सुरू असतांना मराठा नेते हे आपले पहिल्या क्रमांकाचे शत्रू असले पाहिजेत. येथे शत्रू म्हणजे वैचारिक शत्रू समजावे. मराठा आरक्षणाच्या विरोधात लढणार्‍यांसाठी पहिल्या क्रमांकाचे शत्रू ओबीसीकरणवादी मराठेच असणार! म्हणजे ज्या मराठ्यांना ओबीसी कॅटॅगिरी म्हणूनच आरक्षण हवे आहे, ते आपले शत्रू असणारच! ते स्वाभाविकही आहे. या लढाईचा अत्यंत अटीतटीचा जीवघेणा संघर्ष 15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2018 दरम्यान लढला गेला. या काळात शत्रू म्हणून प्राधान्य क्रमांकावर मराठा नेतेच होते. नंतरच्या लढाईच्या काळातही तेच प्राधान्य क्रमावर राहतील. असे असतांना मी प्रवीण दादा गायकवाड सारख्या शत्रू मराठा नेत्याला पुण्यातून लोकसभा तिकीट मिळावे म्हणून बहुजननामा का लिहीला? हा प्रश्न विचारणार्‍या वाचकांच्या मनात कोणताही वाईट उद्देश नाही. त्यांना कदाचीत ओबीसीवरील अतिप्रेमापोटी माझा राग आला असावा. किंवा माझ्याकडून खुलासा करवून सच्चाई जाणून घ्यायची असावी.
प्रवीण दादा गायकवाड हे आज शत्रूनंबर एकच्या यादीत असले तरी ते पुर्वी मराठा ओबीसीकरणवादी नव्हते. तेव्हा आम्ही मराठा आरक्षणासाठी अनेक कार्यक्रम एकत्र येऊन संपन्न केलेले आहेत. माननीय पुरूषोत्तम खेडेकर यांचा मराठा सेवा संघ, प्रविण दादांची लढाऊ संभाजी ब्रिगेड व किशोर चव्हाणांची मराठा छावा संघटना आदि अनेक संघटनांच्या सोबत माननीय वामन मेश्रामप्रणीत बामसेफ व माननीय प्रदिप ढोबळे, श्रावण देवरे यांनी स्थापन केलेला ओबीसी सेवा संघ हे सर्व मराठा आरक्षणसाठी एकत्रीतपणे संघर्ष करीत होती. त्यातून दलित, ओबीसी व मराठा यांच्यात रासायनिक संयुगाची प्रक्रिया घडत होती व स्ट्रॉंग बॉण्ड असलेला ‘बहुजन समाज’ आकार घेत होता. परंतु नंतर आलेल्या पेशवे सरकारने मराठा आरक्षणाचाच मुद्दा वापरून समाज विघटनाची प्रक्रिया सुरू केली. ज्याप्रमाणे भुजबळसाहेबांना जेलबंद करून त्यांची वाचा बंद पाडली गेली, त्याचप्रमाणे पुरूषोत्तम खेडेकर साहेबांना ‘फेरा’ चा गैरवापर करून ‘जायबंदी’ करण्यात आले व त्यांना दिशा बदलवण्यास भाग पाडण्यात आले. पुरोगामी म्हणविणारे नेतेच मुर्दाड झाल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अलगदपणे सराटेंसारख्या संघीस्ट नेत्यांच्या हातात जाउन पडला. सराटेंसारखे आणखी काही लोक संघाच्या केडर कॅम्पमधून रासायनिक विघटनाचे प्रशिक्षण घेऊन आलेले होते. नंतर पेशवे सरकारप्रणित मराठ्यांचे लाखांचे मोर्चे निघायला लागलेत. त्याला हुरळून जाऊन प्रविणदादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, खेडेकर वगैरेंसारखे पुरोगामी त्यांच्या मागे फरफटत जात आहेत. आधी दलित-ओबीसींचे मित्र असलेले हे सर्व पुरोगामी मराठा नेते आज नकळतपणे शत्रूच्या छावणीत कसे जाऊन बसलेत, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच केले पाहिजे. जिजाऊंचा लाल महाल भक्कम करता-करता अचानक शनिवारवाड्याच्या नव-उभारणीचे कंत्राट या मराठा पुरोगामी(?) नेत्यांच्या खांद्यावर कसं येऊन पडलं, ह्याचा पुनर्विचार त्यांनीच केला तर बरे होईल.
मुद्दा प्रविण दादा गायकवाडांना पुण्याचे लोकसभेचे तिकीट मिळण्यासाठी मी त्यांच्या बाजूने बहुजननामा लिहीला, हा आहे. पुणे मतदारसंघातील कॉंग्रेसच्या तिकीटासाठी सरळसरळ दोन व्यक्तींमध्ये संघर्ष होता. एक जोशी होते व दुसरे प्रवीण गायकवाड होते. ही लढाई केवळ दोन व्यक्तींमधील लढाई नव्हती. ती दोन सामाजिक शक्तींची लढाई होती. माननीय शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याने आपले पूर्ण वजन प्रविण गायकवाडांच्या बाजूने टाकल्यावरही गायकवाडांना तिकीट नाकारले जात होते. याचे एकमेव कारण म्हणजे प्रविण दादा हे ब्राह्मणवादाचे विरोधक आहेत, हे त्यांनी केलेल्या अनेक आंदोलनातून सिद्ध झालेले आहे. ‘दादो कोंडदेव उखाड’ आंदोलन असो की, ‘भांडारकर फोडो’ आंदोलन, प्रविणदादांनी त्या आदोलनांचं नेतृत्व केलेले आहे. पुण्यासारख्या पेशवाईच्या अड्ड्यात हा मराठा बाणा निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे सर्वपक्षीय ब्राह्मण एकत्र येऊन प्रविण दादाला तिकीटापासून वंचित करीत होती. हा ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष होता. याच कारणास्तव मी प्रविण दादाची बाजू घेऊन बहुजननामाचा लेख लिहीला.
आपण कौरव-पांडवांचे नेहमी उदाहरण देतो. आपापल्या हक्कांसाठी आपसात लढत असतील 100 विरूद्ध 5 अशी लढाई होत असते. परंतू बाहेरच्या शत्रूशी लढायचे असेल तर 105 विरूद्ध बाहेरचा शत्रू अशीच लढाई होणार.
शब्दमर्यादा संपल्याने मी येथेच थांबतो. आणखीन काही महत्वाचे आक्षेप आहेत, त्यांचीही समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न मी पुढील लेखांकात उत्तरार्धात करीन. तोपर्यंत जयजोती जयभीम, सत्य की जय हो
(दिनांक- 13 जुलै 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग

 Email- 

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

Thursday, July 11, 2019

78 BahujanNama Maratha Peshwai, 4 Jukly 2019


बहुजननामा-78
पेशवाईचा पाया भक्कम करण्यासाठी मराठा आरक्षण!
                                                  (भाग-2)
बहुजनांनो.... !
-१-
मराठा आरक्षणाच्या कायद्याने वा त्याच्या हायकोर्ट जजमेंटने ओबीसी आरक्षणाला धक्का लावलेला नाही, त्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. असा सर्वत्र सोयिस्कर समज करून देण्यात आलेला आहे. शब्दच्छल करून संभ्रम निर्माण करणे, हे पेशवाईच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. आरक्षणाला धक्का लागणे हा मुद्दाच नाही. मुद्दा वेगळाच आहे. आम्ही अनेक वेळा तो मांडतो, परंतू तो दडपला जातो व नसलेला मद्दा फोकस करून दिशाभूल केली जाते. काय आहे ही दिशाभूल?
उदाहरण दिल्यावरच आमच्या बहुजनांना थोडेफार समजते. आता आपण सर्व बहुजन शेतीशी जुडलेलो आहोत, म्हणून शेतकर्‍याचच उदाहरण दतो. दोन शेतकरी आहेत. एकाचं नाव नामदेव आहे. दुसर्‍याचं नाव ज्ञानेश्वर! दोघेही अध्यात्मिक शेती करीत आहेत. दोघांचं शेत एकमेकांच्या शेजारी आहे. नामदेवाची काही एक तक्रार आहे ज्ञानेश्वराविरोधात! तंटा जेव्हा ब्रह्मवृंदाच्या पीठाकडे जातो तेव्हा ज्ञानेश्वर ओरडून सांगतो की मी याच्या शेतातल्या पीकाला धक्का लावलेला नाही. ब्राह्मण-पिठाधिपती नामदेवाला विचारतात, खरेच याने तुझ्या शेतातल्या पीकाला धक्का लावलेला आहे काय?’. नामदेव प्रमाणिकपणे म्हणतो, ज्ञानदेवाने माझ्या शेतातल्या (19%) पीकाला धक्का लावलेला नाही. आणी मी तशी तक्रारही केलेली नाही. माझी तक्रार वेगळीच आहे, आणी ती कुणी ऐकूण घ्यायलाही तयार नाही.’ मराठा आरक्षण सुनावणींमध्ये मुंबई हायकोर्टात ओबीसी वकीलांना बोलूच देण्यात आले नाही. मराठा आरक्षणाच्या हायकोर्ट निकालाच्या दिवशी 27 जूनला प्रा. श्रावण देवरे व प्रकाश शेंडगे यांना वेगवेगळ्या टिव्ही चॅनल्सच्या स्टुडिओत बोलावून दिवसभर बसवून ठेवण्यात आले. बोलूच दिले नाही. एका टिव्ही चॅनलच्या स्टुडियोत प्रा. श्रावण देवरे बोलत असतांना कॅमेराच पळवून नेण्यात आला. Tv वरील चर्चा संपली पण कॅमेरा परत आलाच नाही.  नामदेव व ज्ञानदेवच्या केसमध्ये असंच झालं. पीक चोरल्याची आवई उठवायची व पीक चोरलेच नाही, पीक चोरलेलं आहे अशा परस्परविरोधी मुद्द्यांवर खडाजंगी चर्चा करीत, खरा मुद्दा दडपून टाकण्यासाठी नामदेवाला बोलूच द्यायचे नाही, बोलला तर त्याचे म्हणणे ऐकूणच घ्यायचे नाही, ऐकूण घेतले तरी कागदावर त्याची नोंदच घ्यायची नाही. आणी ज्ञानदेवाच्या बाजूने एकतर्फी निकाल लावून मोकळे व्हायचे. न्यायालयाकडून झालेल्या या अन्यायाबाबत काही बोलले की, ‘Contempt of Court’ची धमकी द्यायची. म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार! असे हे षडयंत्र असते.
नामदेवाची खरी तक्रार पीकाला धक्का लागण्याची नसतेच, शेताला धक्का लागण्याची असते! परंतू पीक चोरलं की नाही, पीकाला धक्का लागला की नाही, यावरच चर्चा चालू ठेवायची आणी तिकडे ज्ञानदेवाने बांध तोडून शेतच ताब्यात घ्यायचे! खरे म्हणजे नामदेव व ज्ञानेश्वर यांचं भांडण कधीच नव्हते. ज्ञानदेवाचं म्हणणं होतं की, ‘नामदेवप्रमाणे मलाही सब्सिडी व सवलती मिळाल्या पाहीजेत, जेणे करून मलाही शेती करणे परवडेल.’ ब्राह्मण-पीठ ज्ञानेश्वराला म्हणते, ‘संविधानाप्रमाणे सब्सिडी-सवलती या व्यक्तीला मिळत नाहीत, शेताला मिळतात. आणी ज्ञानदेवा, तुझे शेत सवलतींच्या कॅटेगिरीत येतच नाही. तुला सवलती-सब्सिडी पाहिजे असेल तर नामदेवाच्या शेताचा बांध कोरून घुस त्याच्या शेतात, तरच तुला मिळतील सवलती आणी सब्सिडीसुद्धा!’’ याच पद्धतीने संत नामदेवावर अन्याय झाला! ज्ञानेश्वर व नामदेव यांच्यात खरेच काही भांडण नव्हते. ते दोन्ही मेल्यावर ब्राह्मण-पीठाने त्यांच्यात भांडण लावले. संत परंपरेची पायाभरणी नामदेवाने केली. ‘‘नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!!’’ अशी स्टॅगलाईन त्या काळाचे वास्तव दर्शवत होती. कारण वारकरी चळवळीत नामदेव आधी (Senior) आहे व (junior) ज्ञानदेव नंतरच्या पिढीतील आहे. परंतू ब्रह्मपीठाने भांडण लावले व नंतर स्वतःच जजमेंट देऊन सांगीतले की, ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!’ नामदेव शिंपी, शूद्र असल्याने त्याला संत परंपरेसारख्या क्रांतीकारी जातीविरोधी चळवळीचा हिरो कसा राहू द्यायचा? हिरो ब्राह्मणच असू शकतो, किंवा ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेला व्यक्तीच हिरो असू शकतो! ‘आर्टिकल 15’ चा हिरो अयश रंजन हा ब्राह्मणच होऊ शकतो, निषाद नाही. नदीच्या पात्रात सापडलेल्या बाळ कबीराचा बाप कोण, कोणालाच माहीत नाही. पण यांनी लिहून ठेवले, ज्या अर्थी कबीर गुणवान व क्रांतिकारक आहे, तर तो निश्चितच ब्राह्मणांच्या रक्ताचाच आहे. जेम्स लेन प्रकरण या पेक्षा वेगळे काय होते. रामदास हा संत नव्हताच, एक सर्वसामान्य पुजारी-भट वा भीख मागणारा गोसावी होता. त्याला संतांच्या कॅटेगिरीत (Status) घुसविल्याने समकालीन संत तुकारामावर अन्याय करण्याची वाट मोकळी झाली! रामदासाला संताचा दर्जा (Category) दिल्यावर, तुकारामाला राजे शिवाजींच्या गुरू पदावरून काढून टाकणे व त्या ठिकाणी रामदासाला बसविणे सोपे झाले. इतिहास लिहीण्याची सत्ता वैदिक-रामदासींकडे असल्याने त्यांनी संत नामदेवाचे पायाभरणीचे कर्तृत्व ज्ञानेश्वराला प्रदान केले व शिवरायांचे गुरूत्व तुकोबाकडून काढून एका गोसावड्याला दिले.
-2-
भांडण पीकाला धक्का लावण्याबद्दल नाहीच! भांडण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याबद्दल नाहीच! भांडण आहे, शेताला धक्का लावण्याबद्दलचे, कॅटेगिरीला धक्का लावण्याबद्दलचे, शेताचा बांध कोरुन शेतच बळकावण्याबद्दलचे! कागदावर लिहीलेल्या शब्दांचा अर्थ कसा लावायचा व त्याची अमलबजावणी कशी करायची याचा निर्णय खूर्चीवर बसलेले लोक करतात, खुर्चीसमोर उभे असलेले लोक नाही. कायदा कागदावर असतो. आणी हा कागद आडवा धरायचा की उभा, उलटा धरायचा की सुलटा हेही खुर्चीवर बसलेले लोकच ठरवितात. कागदावरचे शब्द तोडमरोड करून, खाडाखोड करून व वरखाली करूनही जर मनमानी जमत नसेल तर, तो कागदच फाडून फेकून दिला जातो. संविधानची पाने फाडूनच मनमानी लॅटरल एन्ट्रीने दिल्लीतील हायप्रोफाईल सेक्रेटरी पदे भरली जात आहेत. 13 पॉईंट रोस्टरने SC+ST+OBC आरक्षण खतम केले जात आहे.
एकदा का एखाद्या व्यक्तीला एस.ई.बी.सी. दर्जा असल्याचे प्रमाणपत्र मिळाले की, तो ओबीसी कॅटिगिरीच्या कोणत्याही सवलती लाटायला पात्र(?) ठरतो. प्रशासकीय स्तरावर ब्राह्मण-मराठ्यांचेच वर्चस्व असल्याने ते स्पष्ट सांगतील कि, ‘एस.ई.बी.सी. म्हणजेच ओबीसी व ओबीसी म्हणजेच एस.ई.बी.सी!’ खरे-सच्चे ओबीसी नोकर्‍यांपासून वंचित ठेवले जातील व लुच्चे ओबीसी नोकर्‍या बळकावतील, सवलती लाटतील. खर्‍या ओबीसीने अन्याय झाल्याची ओरड केली की, त्याला सांगण्यात येईल, ‘तुझ्यावर अन्याय झाला आहे तर, जा कोर्टात!’ आणी कोर्टातही न्यायधीश कोण आहेत? रणजीत मोरेंसारखे ब्राह्मण-मराठ्यांचे नातेवाईकच! तारीख पे तारीख, तारीख पे तारीख! हेलपाटा घालून सच्चा ओबीसी ‘म्हातारा’ होईल व नोकरी बळकाविणारा लुच्चा ‘रिटायर्ड’ होईल! अक्करमाशाला सावत्र-भाऊ म्हणून मान्यता मिळताच, हा भाऊ हक्काने घरात घुसतो व घरातील कोणत्याही वस्तूचा उपभोग घ्यायला पात्र ठरतो. समसमान हिस्सा मागतो व नंतर दबंगगिरी करून घरच बळकावतो. याच पद्धतीने राजकारणातील ओबीसी वार्डचे आरक्षण खतम होत आहे. पुणे महानगर पालिकेत 2012 साली 12 मराठे खोटे ओबीसी दाखले घेऊन निवडून आलेत. त्यांची केस आजही हायकोर्टात पेंडिंग आहे, आणी हेच नगरसेवक त्याच खोट्या ओबीसी दाखल्यांवर पुन्हा दुसर्‍यांदा नगरसेवक झालेले आहेत. 2017 साली त्यांची संख्या 17 झाली. एखादा चोर सज्जनांच्या कॅटिगिरीत घुसला की, त्याने केलेली चोरी ही चोरी ठरत नाही, तो हक्क ठरतो. एसईबीसींच्या दबंगगिरीने ओबीसी आरक्षण बळकावयाला ज्या दिवशी जागृत ओबीसींकडून मोठ्याप्रमाणात विरोध होईल व ओबीसीमधील घुसखोरी अशक्य होईल, त्यादिवशी कुणीतरी दुसरा दबंग कोर्टात जाईल व 16 टक्के आरक्षण रद्द करवील. मराठ्यांचे 16 टक्के आरक्षण रद्द होताच मराठे हे एसईबीसी म्हणून मूळ-खर्‍या ओबीसींच्या 19 टक्क्यांमध्ये येऊन पडतील. कारण एसईबीसी म्हणजे ओबीसी व ओबीसी म्हणजेच ऐसईबीसी! मराठा आरक्षण म्हणजे ओबीसींसाठी दोन तलवारी आहेत. एक तलवार ओबीसी कॅटिगिरीत घुसण्यासाठी पोटाजवळ आहे व तीची पोटात घूसण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरी तलवार डोक्यावर टांगती ठेवलेली आहे. मराठायांचे 16 टक्के आरक्षण रद्द होताच ती तलवार ओबीसींच्या डोक्यात घुसणार आहे. अशा पद्धतीने ओबीसी कॅटॅगिरी संपविण्याचा डाव यशस्वी होत असतांना आमचे ओबीसी नेते, ओबीसी विचारवंत व कार्यकर्ते वगैरे कुठे मरून पडले आहेत, माहीत नाही.
-3- 
मराठा आरक्षणासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनेही प्रयत्न केलेत. त्यांचे प्रयत्न काहीसे संविधानाला अनुसरून होते. नीती-नियमांची त्यांना थोडी तरी चाड होती. त्यांनी केलेल्या प्रयत्नात थडा तरी प्रमाणिकपणा होता. त्यांच्या प्रयत्नात त्रूट्या होत्या, चुकाही होत्या. त्या दुरूस्त करताही आल्या असत्या. त्यावेळी मुख्य अडचण होती 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेची! आता ही मर्यादा केंद्र सरकारनेच तोडली आहे. 10 टक्के आरक्षण सवर्णांना दिल्यामुळे आरक्षण 60 टक्क्यांवर गेले आहे. सवर्ण जातींना स्वतंत्रपणे आरक्षण घटनादुरूस्ती करून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे या सवर्णांमधील मराठा-जाट-पटेल आदि क्षत्रिय जातींना केंद्रात व राज्यातही स्वतंत्र आरक्षण देता येऊ शकते. किंवा सवर्ण कॅटिगिरीचे आरक्षण 30 टक्के करून त्यात ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य अशा तीन पोटविभागण्या करता येऊ शकतात.  जाट-पटेल मराठा यांना त्यांच्या राज्यात सवर्णातील 10 टक्के आरक्षण सहज मिळू शकते. चांगले मार्ग भरपूर आहेत. परंतू ज्या ब्राह्मण-क्षत्रियांचा पींडच वाट आहे, त्यांना चांगल्या मार्गावर आणणार कोण? दुर्बलांच्या शोषणावरच यांची मौजमस्ती असेल तर यांना रानटीपणाकडून ‘माणूसपणाकडे’ आणण्याचे सर्व रस्ते बंद होतात!
-4-
मराठा आरक्षणाचा विषय हे कोण्या एखाद्या जातीला आरक्षण देण्यापुरते मर्यादीत नाही. मराठा आरक्षण हे एखाद्या जातीची वोटबँक खिशात घालून निवडणूका जिंकण्याशी संबंधित नाही. ज्यांना पेशवाईचा उगम कसा झाला याचा इतिहास माहीत आहे, त्यांनाच आता सुरू असलेली इतिहासाची पुनरावृत्ती लक्षात येईल. पेशव्यांनी राजे संभाजीनंतर मराठा सरदारांना व मराठा गादीधार्‍यांना उर्जाहीन करून टाकले होते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे तुकडे करून ते तुकडे मराठा घराण्यांमध्ये वाटून दिले होते. या तुकड्यांच्या बदल्यात ते पेशव्यांना ‘मुजरा’ करीत होते. त्यावेळी पेशव्यांच्या समोर एकमेव ओबीसींचेच आव्हान होते. पेशवाईचा विकास करण्यात सर्वात मोठा आक्रमक विरोध केवळ ओबीसींकडून होत होता. धनगर समाजातले शूर लढवैय्ये मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्यामाई होळकर व विठूजी होळकर यांनी पेशव्यांना अक्षरशः जेरीस आणले होते. यशवंतराव होळकरांनी पेशव्यांवर निर्णायक आक्रमण केले तेव्हा बाजीराव पेशव्याला अक्षरशः जीव मुठीत घेउन पुण्यातून पळ काढावा लागला. नंतर यशवंतराव होळकरांनी उत्तर महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या भागात आपले स्वतःचे राज्य स्थापन केले व स्वतःचा राजाभिषेकही करून घेतला. यशवंतराव होळकरांना राजा म्हणून मान्यता इंग्रजांनी व दिल्लीच्या मुसलमान राजांनीही दिली. अशाप्रकारचा राजाभिषेक करण्याची व स्वतःला राजा म्हणून डिक्लेयर करण्याची पात्रता ना मराठ्यांमध्ये होती ना पेशवा-ब्राह्मणांमध्ये. पेशवा तर 1803 पासूनच इंग्रजांचे पगारी नोकर (तनखाधारी) बनलेले होते. म्हणजे इंग्रजांचे नोकर ‘पेशवे’ आणी पेशव्यांचे ‘मांडलिक’ सर्व मराठा सरंजामदार! आणी याच काळात यशवंतराव होळकर व विठूजी होळकर स्वतंत्र राजे म्हणून मान्यता पावलेले. हे आहे ओबीसींचे मेरीट, ओबीसींचे शौर्य, ओबीसींचा बाणा व ताठ कणाही!
आणि म्हणूनच त्याकाळी पेशवाईला ओबीसींपासून वाचविण्यासाठी सर्व 96 कुळी सरंजामदार पेशव्यांच्या मदतीला धावले! आजही तंतोतंत इतिहासाची पुनरावृती घडते आहे.
आज ‘ओबीसींच्या राजकीय जागृतीची’ प्रचंड धास्ती संघी-पेशव्यांनी घेतलेली आहे. याच ओबीसींनी 1991 पासून 2014 पर्यंतचे ब्राह्मणी कॉंग्रेसी व भाजपाई राजकारण लुळे-पांगळे करून टाकलेले होते. या ओबीसी-संकटातून बाहेर निघण्यासाठी त्यांना 1998 साली ईव्हीएम आणावे लागले. ईव्हीएम घोटाळा सोबत असुनही त्यांना ओबीसींची राजकीय मनधरणी करावी लागते आहे, त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव मोदीसारख्या शूद्र-ओबीसीला एकवेळा नाही, दोनवेळा प्रधानमंत्री बनवावे लागते आहे. संपूर्ण अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळत असतांना तिला वाचविण्यासाठी काळ्या ओबामा साहेबांना एकवेळा नाही, दोन वेळा राष्ट्राध्यक्ष बनवावे लागले. यावरून काळ्यांच्या किंवा ओबीसींच्या राजकीय ताकदीची कल्पना यावी. आणी अशा प्रचंड ताकदीच्या ओबीसीला तोडण्यासाठी, त्याचे खच्चीकरण करण्यासाठी, त्याचे आरक्षण खतम केले जात आहे. जाट-पटेल-मराठासारख्या क्षत्रियांना ओबीसी कॅटिगिरीत घुसवले जात आहे. ओबीसी कॅटेगिरीचे तीन तुकडे करण्यासाठी रोहिणी आयोगाचे षडयंत्र केले जात आहे. ओबीसी जनगणना टाळली जात आहे. आणी सर्वात मोठे कारस्थान म्हणजे मराठ्यांना सोबत घेऊन पेशवाईचा पाया भक्कम केला जात आहे. पेशव्यांच्या काळी स्वराज्याचे तुकडे करून तेच तुकडे मराठा सरंजामदारांना वाटप करण्यात आले व त्याबदल्यात पेशवाईचा पाया भक्कम करून घेतला गेला. आज मराठ्यांना आरक्षणाचा एक तुकडा देऊन त्याबदल्यात फडणवीसी पेशवाई भक्कम करून घेण्यात येत आहे. जेणे करून येत्या काळात ओबीसींच्या तोंडाला ‘गाडगे-मडके’ बांधून त्यांना कायमचे दडपून टाकायचे आहे. फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रचंड धावपळ करीत आहेत व जीवतोड प्रयत्न करीत आहेत, त्यामागे नेमके हे कारण आहे. संविधानाला लाथाडून, सुप्रिम व हाय कोर्टाला बाजूला ठेऊन, सर्व आयोगांच्या अहवालांना ठोकरून, नवा बोगस आयोग नेमून, मनमानी पद्धतीने खाजगी ब्राह्मण-मराठायांच्या संस्थांकडून बोगस सर्वेक्षण करून, त्यावर आधारित बोगस अहवाल तयार करून व हायकोर्टाचे वकील-न्यायधिश मॅनेज करून, 52 टक्के ओबीसींच्या नाराजीची पर्वा न करता, मुलांच्या मेडिकल ऍडमिशनचा खेळखंडोबा करून, इकडेतिकडे सर्वीकडे ‘कॅव्हेट’ दाखल करून, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले जात आहे, यामागे मराठा समाजाबद्दलचे पेशव्यांच्या मनात असलेले प्रचंड प्रेम व्यक्त होते आहे काय? की पेशवाईचा पाया भक्कम करण्यासाठी मराठ्यांचा (गैर)वापर होतो आहे?
महाराष्ट्रातील ज्या सूज्ञ लोकांचा सद्सद्विवेक मेंदू डोक्यातच असेल त्यांनी यावर अवश्य विचार करावा! हा विषय अधिक विस्ताराने मी ज्या पुस्तकात मांडलेला आहे, ते पुस्तक वाचावे, ही विनंती. पुस्तकाचे नाव आहेः- ‘ओबीसी मराठा बहुजनः मोर्चे-प्रतिमोर्चे व पुरोगामी महाराष्ट्राची फरफट’. जयजोती जयभीम, सत्य की जय हो
(दिनांक- 2-4 जुलै 2019) 

महत्वाची टिप- या लेखातील पेशवेकालीन संदर्भ सुप्रिसद्ध इतिहास संशोधक संजय सोनवणी यांच्या ‘‘आद्य स्वातंत्र्य सेनानी महाराजा यशवंतराव होळकर’’ या महाग्रंथातून घेतलेले आहेत.)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग

 Email- 

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)