http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, April 12, 2020

108 BahujanNama Change 12 April 20


बहुजननामा-108
करोनाः आमूलाग्र बदलाची संधी!
-1-
      मानव प्राणी हा अत्यंत चिवटपणे परंपराप्रिय असतो. नवी परंपरा मान्यताप्राप्त होत नाही, तोवर तो जुनी परंपरा त्यागत नाही. त्यालाच अलिकडे काही लोक धार्मिक कट्टरता वगैरे म्हणतात. खरे म्हणजे परंपराप्रिय असणे हे मानवाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे त्या कट्टरतेचा धर्माशी काहीही संबध नाही. महाभारत युद्धात मृत्यु पावत असलेला भिष्म आपला प्राण उत्तरायणसाठी 58 दिवस रोखून ठेवतो, कारण त्याला नरक टाळून स्वर्गात जायचे असते. साक्षात मृत्युच्या दारात असतांनाही लोक आपल्या श्रद्धा, सण-उत्सव व यात्रा-मेळावे सोडायला तयार नाहीत, हे करोनाच्या जीवघेण्या संकटानेही सिद्ध केले आहे. त्याबाबत सर्वधर्मसमभावच म्हटले पाहिजे.
        परंतू कोणतीही नियमित सामुदायिक कृती ही परंपरा बनण्याच्या प्रक्रियेत असतेच! जोपर्यंत ती वैचारिक पाळीवर असते तो पर्यंत माणूस तीच्यापासून प्रेरणा घेत असतो. आपल्या समुदायाचे वेगळेपण त्यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. कोणतीही नियमित कृती प्रथा-परंपरा बनत असतांना ती वैचारिक व प्रतिकात्मक अशा दोन्ही आघाडीवर सातत्य ठेवत असेल तरच त्यातून येणार्‍या पुरोगामी कट्टरतेमुळे काही चांगले नवे बदल घडून येतात व समाज पुढील नव्या उच्चतर पातळीवर जातो. परंतू जर ती कृती वैचारिकता गमावून केवळ प्रतिकात्मक राहात असेल तर त्यातून येणारी कट्टरता प्रतिगामी बनते व समाज नवे मिळविलेलेही गमावतो.
          मरकज, ईस्टर, रामनवमी, कृष्णाष्टमी, यात्रा-जत्रा व शब्बे बारात वाले हे जेवढे कट्टर आहेत तेवढेच कट्टर फुलेआंबेडकरवादीपण आहेत. मात्र दोघात एक महत्वाचा फरक आहे. या दोघांच्या कट्टरतेत पुरोगामी व प्रतिगामीची विभागणी-रेषा आहे. करोनाच्या काळात बहुतेक सर्वच पुरोगाम्यांनी जाहीर आवाहन केले आहे की, 11 एप्रिल व 14 एप्रिल रोजी घरात राहूनच फुले आंबेडकर जयंती साजरी करायची आहे. त्याला अजून कुठेही विरोध झालेला नाही, उलट वेगळे वेगळे उपक्रम घरातूनच राबविले तरी ते समुदायिकपणाच्या अभावाची भरपाई करणारे आहेत. त्यापैकी काही उपक्रम पुढीलप्रमाणे- 1) 11 एप्रिल व 14 एप्रिल रोजी घराबाहेर पिवळ्या व निळ्या रंगाची गुढी उभारून फुले आंबेडकरांना अभिवादन करता येईल.
2)
घरातील फुले आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती वा दिवा लावून जयंती साजरा करा.
3)
फुले आंबेडकरांच्या ग्रंथांचे वाचन करून जयंती साजरा करता येते.
                              -2-
       असे अनेक कार्यक्रम सूचविले जात असतांना फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठाचे एक परीक्षाप्रमुख राजू कांबळे (मुंबई) यांनी 5 एप्रिल रोजी मला फोनवरून विनंती केली की, ‘‘तुमचे बरेचसे कार्यक्रम करोनामुळे रद्द झालेले आहेत. आता त्याला पर्याय म्हणून 11 एप्रिल व 14 एप्रिल रोजी आपण किमान एक तासाचे व्याख्यान फेसबुकवर लाईव्ह द्या, महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी कार्यकर्ते व श्रोते त्या व्याख्यानाचा लाभ घेतील.’’ त्यावर मी विचार करतो’, असे फोनवर सांगीतले. गेल्या 30-35 वर्षांपासून जे काम अथकपणे करत आहोत, तेच व्याख्याने देण्याचे काम करोना काळातही करावे, हे फारसे पटत नव्हते. नवे काहीतरी करावे जेणेकरून लोकांचाही त्यात सहभाग असावा. त्याच दिवशी एरंडोल-जळगावचे निलेश देवरे व लातूरचे दत्ता माळी यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणेसंबंधात माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी चंद्रपूरचे कार्यकर्ते हरिदास गौरकर व अजित साव यांनी माझ्याशी फोनवरून निबंध स्पर्धा आयोजन करण्याबद्दल चर्चा केली. मला हे दोन्ही कार्यक्रम आवडलेत. याच कार्यक्रमांना सक्रिय मदत करून राज्यस्तरावर नेले तर आपली व लोकांचीही करोना काळातील बळजबरीची सुट्टी सार्थकी लागेल व घरात बसूनच फुले आंबेडकर जयंती साजरा करण्याचा आनंदही घेता येईल.
        त्या पैकी एक वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम मी व माझ्या मित्र-कार्यकर्त्यांनी या आधीच सोशल मिडियावरून व्हायरल केलेला आहे. 15 एप्रिलपासून मी निबंध स्पर्धेचाही कार्यक्रम जाहीर करणार आहे. आपला मूळ विषय आहे, प्रथा परंपरा साजरा करण्याचा व जतन करण्याचा! रामजन्मोत्सव, कृष्णाष्टमी, बळीराजा श्राद्धपक्ष, खंडोबा, जोतिबा, नवरात्र, कूलमातांच्या यात्रा वगैरे हे सर्व सण-उत्सवांच्या परंपरा व फुले आंबेडकरांच्या जयंती-स्मृतीदिनाच्या परंपरा यात एक मोठी तफावत हीच आहे की, फुलेआंबेडकरांच्या नावाने होणारे कार्यक्रम अजूनही वैचारिक पातळी जपून आहेत, त्यांचे अजून दैवतीकरण झालेले नाही. आणी म्हणूनच करोनाच्या संकटातही कट्टरता कायम ठेवून सुरक्षितपणे सण-उत्सव साजरा करण्याचा आदर्श घालून देता येतो. 
          मानव समाजाच्या सांस्कृतिक प्रवाहात अनेक सार्वत्रिक उलथा-पालथी झालेल्या आहेत. कॉलरा, पटकी, प्लेग सारख्या असंख्य वेगवेगळ्या साथीच्या रोगांनी जगाच्या पाठीवर अनेकवेळा धुमाकूळ घातलेला आहे. त्यावर मात करीत माणूस आपले अस्तित्व आपल्या संस्कृतीसह अखंडपणे प्रवाही व वर्धिष्णू ठेवीत आहे. आधुनिक काळातही पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध ही मानवनिर्मित जागतिक संकटे आलीत, या संकटांना संधी समजून अनेक राष्ट्रांनी परिश्रम घेऊन प्रगतीचे शखर गाठले व महासत्ता म्हणून नव्याने उदयास आलेत. करोना हे दोन्ही महायुद्धांपेक्षा जास्त गंभीर व जास्त परिणामकारक आहे. या महायुद्धात अमेरिका, फ्रान्ससारख्या जागतिक महासत्ता करोनासमोर सपशेल चीत झाल्यात, तेथे भारतासारखा महाकाय अविकसित देश मात्र शर्थीने लढतो आहे व करोनाला नियंत्रित करतो आहे. तुर्कमेनिस्थानसारखा छोट्या व अत्यंत गरीब देशात आजही शून्य करोनाग्रस्त आहेत व त्यांनी एक दिवसाचाही लॉकडाऊन पाळला नाही. आजही तेथे सर्व सण-उत्सव प्रचंड उत्साहत लाखोंच्या संख्येने एकत्र येत साजरा करीत आहेत. कारण त्यांनी करोनाशी दोन हात करतांना जे उपाय केलेत ते उपाय इतर कोणताही देश अमलात आणू शकला नाही.
          असे म्हणतात की आपणच पैदा केलेले पोरगे आपल्या जीवावर उठते. चीनने करोना व्हायरसचे सत्य दोन महिने दडपून ठेवले, ते का? अमेरिकेने अजूनही अधिकृतपणे लॉकडाऊन जाहीर केलेला नाही, का? बहुतेक सर्वच प्रगत देश करोनाग्रस्त होत असतांना कडक उपाय योजना लागू करायला घाबरत होते, का? कारण आपणच पैदा केलेल्या पोराला एकूलता एक लाडका म्हणून आपण त्याला वाढवतो, आपल्या म्हातारपणी आपलं पोरगं आपल्याला सुखात ठेवील, या आशेने आपण नको ते अनैतिक व अवैध कृत्ये करीत त्याला खूश करण्याचा प्रयत्न करतो व शेवटी पोरगं बिघडतं, गुन्हेगार बनतं व आपल्याच जन्मदात्यांचा खून करतो. जगातील मूठभर भांडवलदारांनी जी अर्थव्यवस्था देशपातळीवर व नंतर जागतिक पातळीवर (LPG) उभी केलेली आहे, ती जगविण्यासाठी, वाढविण्यासाठी व वाचविण्यासाठी महायुद्धे लादली जातात. करोनासारख्या जागतिक संकटातही ते अमानवीपणे वागतात. अमेरिकेत एक लाख लोक मेलेत तरी काही हरकत नाही, असे निवेदन करणारे ट्रम्फ जागतिक साम्राज्यवादाच्या क्रूरतेचे खरेखूरे प्रतिक ठरतात.
          भांडवल श्रेष्ठ, श्रम कनिष्ठ, भांडवलदार हेच देशाचा विकास करतात, श्रमिक मात्र नेहमीच आंदोलने करून विकासाला अढथळा आणतात. धरण बांधणारे विकासपूत्र आणी धरणग्रस्त हे विकासाला अपशकून ठरतात. पूजापाठसारखी थोतांडे करून पोट भरणारे भिखारी भूदेवम्हणून मान्यता पावतात व कष्ट करून दुसर्‍्यांचीही पोटे भरणारे शूद्रादिअतिशूद्र हे अपवित्र-अस्पृश्यठरतात! अशा कृत्रिम व अनैतिक सिद्धांतांवर उभी असलेली ऐतखाऊंची वर्ग-जातव्यवस्था टिकून राहावी म्हणून देश अनेकवेळा धोक्यात टाकला गेला व आजही टाकला जात आहे.
करोना संकट हे देशाबाहेरून आणले गेले आहे. कोणाच्या प्रेमापोटी? अर्थातच आपल्या लाडक्या पूत्रांसाठी व नातेवाईकांच्या प्रेमापोटी! परकीय देशात काहीही संकट आले की हे लगेच आपल्या पोरा-बाळांसाठी विमाने पाठवितात व त्यांना आपल्या देशात घेऊन येतात. कारण ही लाडकी मुलं डॉलर-पौंड पाठवीत असतात. त्यांच्यासाठी आख्खा देश करोनाग्रस्त झाला तरी चालेल, परंतू आपले पूत्रप्रेम जागविले पाहिजे.
                               -3-
         कोणतेही देशव्यापी अथवा जागतिक संकट आले की समाजातला प्रत्येक घटक त्यातून वाट काढीत आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करतो. आपल्याच देशाचे उदाहरण द्यायचे तर वाढत्या सजातीय असंतोषातून आपले उच्चजातीय राजकारण टिकवून ठेवण्यासाठी ईव्हीएम आणण्यात आलं. जातीय लुटीची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी टॅक्स सिस्टीम दिल्ली-केंद्रीत (GST) करण्यात आली. आपली लूटीची व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी कृत्रिम उपाय-योजना करण्यातून तब्ब्येत अधिकच बिघडत गेली व त्यावर उपाय म्हणून नोटबंदीचा जालीम उपाय योजला गेला. तोही जातीय लूटीचाच एक प्रकार सिद्ध झाल्याने अर्थव्यवस्था डबघाईस गेली. रिझर्व बँकेचा रिझर्व फंडही वापरून झालेला आहे. त्यात करोना संकट आलं आणी त्याला एक संधी समजून आता आर्थिक आणीबाणी लादण्याचा घाट घातला जात आहे. ईव्हीएम आणून राजकीय आणीबाणी लादली गेलेली आहे, हिंदू-मुस्लीम धृवीकरणातून समाजिक आणीबाणी सुरूच आहे, त्यात आता आर्थिक आणीबाणी आणून देशातील SC+ST+OBC च्या 85 टक्के जनतेला देशोधडीला लावण्याचे काम सुरू होणार आहे. राजकीय आणीबाणी+सामाजिक आणीबाणी+आर्थिक आणीबाणी याचा अर्थ देशपातळीवरची पेशवाई भक्कम करणे होय!
           करोना संकटाला एक संधी म्हणून उच्चजातीय वापर करू शकतात तर आपण शूद्रादिअतिशूद्र का करू शकत नाहीत? ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य या शेठजी+भटजी+लाटजी विरोधात लढा उभारण्यासाठी SC+ST+OBCयांनी व श्रमिकवर्गाने एकत्रितपणे विचार केला पाहीजे. समोरून जोरात वाहन (संकट) येत असेल तर कुत्रं-मांजरही जीव वाचविण्यासाठी उडी मारून रस्ता बदलतो. आपण तर जीते-जागती माणसं, त्यात मार्क्सवादी+फुलेवादी+आंबेडकरवादी! आपल्यालाही थोडंफार नव्हे आमूलाग्रबदललंच पाहिजे! आपले सिद्धांत, आपले महापुरूष व आतापर्यंतचे कृती-कार्यक्रम मूर्ती-रूढी-परंपरा स्वरूपात प्रतिगामी प्रतिके बनण्याआधी त्यात क्रांतीकारी बदल केला पाहिजे.
        तसा आमूलाग्र बदल करण्याची बुद्धी या फुले आंबेडकर जयंतीपर्वात सर्वांना               यावी, अशी अपेक्षा करुन जयजोती जयभीमचा कडक सॅल्युट मारतो व सत्य की जय हो चा घोष करून निरोप घेतो.
             (लेखनः 11 एप्रिल 2020)
                                                                               ------ प्रा. श्रावण देवरे
                                                                              Mobile – 88 301 270                      
                              Blog ब्लॉग  https://shrwandeore.blogspot.in/                             Email- s.deore2012@gmail.com


Saturday, April 4, 2020

107 BahujanNama Chemical 5April20

बहुजननामा-107
करोनाः व्हेज, नॉनव्हेज आणी केमिकल लोच्या
-1-
        करोनाशी लढणार्‍या आरोग्य कर्मचारी अधिकार्‍यांना प्रत्यक्ष कृतीतून दिलासा देणारी आज देशात एकमेव व्यक्ती रतनजी टाटा आहेत. जी कामे शासनाने अत्यंत गांभीर्याने व वार्‍याच्या वेगाने केली पाहिजेत, ती सर्व कामे रतन टाटा करीत आहेत. हा माणूस केवळ प्रधानमंत्री निधीमध्ये पैसे देऊन 'धन्य' झाला नाही, तर आपली करोडो रुपये कमाईची फाईव्ह स्टारहॉटेल्स आरोग्य कर्मींना राहण्यासाठी देऊन टाकलेली आहेत. वास्तविक शासनाने स्वतःच पुढाकार घेऊन देशातील सर्व शासकीय व अशासकीय विश्रामगृहे,हॉटेल्स व वस्तीगृहे ताब्यात घेऊन तेथे प्रांतीय व परप्रांतीय कष्टकर्‍यांना ठेवता आले असते. पोलीस, डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचारी तसेच कोरोंटाइन केलेल्यांची राहण्याची व्यवस्था अशा हॉटेल्समध्ये करू शकले असते. कारण करोनाग्रस्तांच्या सहवासात राहणारे आरोग्य कर्मचारी व पोलीस आपली ड्युटी संपवून घरी जातात, तेव्हा त्या घरातील सदस्यांचेही जीवन धोक्यात येते. देशातील सर्व रजिस्टर्ड डॉक्टर्स व नर्सेसना अगदी सुरूवातीपासूनच अशा हॉटेल्स व वसतीगृहात ठेवले असते तर निश्चितच ते मानवतावादी ठरले असते. कारण या हॉटेल्समध्ये व होस्टेल्समध्ये जेवण्याची व राहण्याची उत्तम सोय आधीपासूनच असल्याने नवीन काही व्यवस्था करण्याची गरजही नव्हती. घरातच कोरोंटाइन केलेल्या व हातावर शिक्के मारलेल्यांना अशा होस्टेल्समध्ये ठेवले असते तर ते कुठे पळून जाण्याचीही शक्यता नव्हती. कारण तथे पोलीस बंदोबस्त ठेवता आला असता. परंतू जे रतन टाटा सारख्या एका व्यक्तीला सुचते ते शासनव्यवस्थेच्या नियंत्यांना सूचत नाही, असे कसे होऊ शकते?
-2-
         शासनव्यवस्थेचे प्रमुख असलेले प्रधानमंत्री आतापर्यंत देशाला 3 वेळा सामोरे आलेत, परंतू त्यांच्या एकाही भाषणात करोनाला नियंत्रित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय नव्हता. थाली ठोका, टाळी पिटा आणी आता अंधार करून दिवे लावा यासारख्या फालतू उपाययोजना वारंवार करायला लावणारे प्रधानमंत्री आजवर जगात कुठेच झाले नाहीत व पुढेही होऊ शकणार नाहीत. हे फक्त भारतातच घडू शकते कारण भारताची सर्वंकष सत्ता अशा 'एका' जातीच्या हातात गेली आहे, जी जात या देशाचे वाटोळे करण्यातच स्वतःचे 'अस्तित्व' पाहते. ही जात जेव्हा जेव्हा सत्तेवर येते, तेव्हा तेव्हा या देशाचे वाटोळे करण्यातच ती धन्यता मानीत आली आहे. त्यांनी या देशाची फाळणी खूप आधीपासूनच करून ठेवलेली आहे. आर्य-अनार्य, सूर-असूर, वैदिक-अवैदिक, ब्राह्मण- अब्राह्मण, अवर्ण-सवर्ण, हिंदू-मुस्लीम अशा अनेक सामाजिक विभागणीतून त्यांनी या देशाच्या धृवीकरणाची प्रक्रिया शतकांनुशतकांपासून सुरू ठेवलेली आहे. याला केमिकल लोच्या करणारी प्रक्रिया म्हणता येईल. अशा प्रकारे मेंदूंचा सामुदायिक रासायनिक लोच्या करणार्‍या प्रक्रियांमधून ते आज 'ब्राह्मण भारत' व 'अब्राह्मण भारत' बनवू शकलेले आहेत. अब्राह्मण भारत म्हणजे शूद्रादिअतिशूद्रांचा (SC+ST+OBC) भारत व ब्राह्मण भारत म्हणजे ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य यांचा ब्राह्मण-वैदिक भारत होय! ब्राह्मण भारतात ब्राह्मणांचे एकतर्फी निर्विवाद वर्चस्व असते व बाकीच्या जाती व व्यक्ती त्यांच्या-त्यांच्या जातीय व व्यक्तिगत हितसंबंधांना कायम ठेवीत व्यापक
ब्राह्मणी हितासाठी काम करीत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतलेली ही दोन राष्ट्रे प्रत्येक गावाच्या विभागणी सीमेपासून सुरू होतात. ही दोन्ही राष्ट्रे प्राचिन काळापासूनच शत्रू-राष्ट्रे म्हणून एकाच भूप्रदेशात नांदत आलेली आहेत, असेही बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात. जेव्हा सम्राट बळीराजा, जैन चंद्रगुप्त सम्राट, बौद्ध अशोक सम्राट, जैन-ओबीसी बिज्जल राजा, शाक्त ओबीसी शिवाजी-संभाजी-शाहू राजे, जातीयवादविरोधी व्हि.पी.सिंग, ओबीसीवादी देवेगौडा यांच्यासारखे राजे होतात, तेव्हा (SC+ST+OBC) भारत-राष्ट्राची समतावादी शासनव्यवस्था, समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था मजबूत होते. परिणामी ब्राह्मणांच्या विषमतावादी भारतराष्ट्राचे अस्तित्व धोक्यात येते. परंतू प्रदिर्घ सांस्कृतिक प्रति-क्रांतीतून ते आपल्या ब्राह्मण-भारत राष्ट्राला पुन्हा-पुन्हा जीवदान देण्यात यशस्वी होतात. तेव्हा या प्रतिक्रांतीतून ब्राह्मणी-वैदिकी राम, चाणक्य-शिष्य चंद्रगुप्त, ब्राह्मण पुश्यमित्र शृंग, ब्राह्मण-शशांक राजा, ब्राह्मण हेमाद्री पंडित, ब्राह्मण नेहरू घराणे, ब्राह्मण अटलबिहारी व ब्राह्मणी-वैदिकी नरेंद्र मोदी सारखे राजे राज्यकर्ते होतात व ते त्यांच्या ब्राह्मण-भारत राष्ट्राची अर्थव्यवस्था, शासनव्यवस्था व समाजव्यवस्था मजबूत करतात. म्हणजेच (SC+ST+OBC) भारत-राष्ट्राची शासनव्यवस्था, समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था खिळीखिळी करतात.
-3-
करोनासारख्या जागतिक महासंकटात मोदीजी प्रधानमंत्री म्हणून काही धोरणात्मक निर्णय घेतील, पॅकेज जाहीर करतील वा काही सुखद निर्णय घेतील अशी अपेक्षा घेऊन मोदीजींचे प्रत्येक भाषण कान देऊन ऐकले जाते, मात्र प्रत्येकवेळी पदरी निराशाच येते. अशाप्रकारे वारंवार निराशा का येते याच्या मुळाशी कोणी जाण्याचे प्रयत्न करीत नाहीत. खरे म्हणजे प्रयत्न करण्याचाही प्रश्न नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी समजावून सांगीतलेल्या दोन शत्रू राष्ट्रांचा सिद्धांत नव्या संदर्भात विस्तारून मांडला गेला पाहिजे. तेही काम आजचे पुरोगामी म्हणविणारे लोक करीत नाहीत. यांना बाबासाहेब फक्त राखीव जागांपुरतेच पाहिजे आहेत. आणी बाबासाहेबांच्या ज्या संविधानाचा हे उदो उदो करतात, ते संविधान ब्राह्मण-भारतराष्ट्र व SC+ST+OBCचे अब्राह्मणी भारत-राष्ट्र यांच्यात लोकशाही समन्वय साधणारे एक तात्पुरते 'साधन' होते. विशिष्ट काळानंतर ते या बाजूने वा त्याबाजूने निकामी होणारच होते, त्याप्रमाणे ते साधन निकामी झालेच आहे! जर SC+ST+OBC भारत-राष्ट्राचे नेते खरोखर पुरोगामी राहिले असते तर त्यांनी हे ‘समन्वयक संविधान’ नष्ट करून नवे आक्रकम समतावादी संविधान अस्तित्वात आणले असते. मात्र SC+ST+OBC भारत-राष्ट्राचे नेते बदमाष व ब्राह्मण-भारत राष्ट्राचे नेते प्रामाणिक असल्याने त्यांनी भारताचे ‘समन्वयक संविधान’ नष्ट करून नवे आक्रमक विषमतावादी संविधान अस्तित्वात आणले आहे.
ब्राह्मणी-भारत राष्ट्राच्या संविधानाचा पहिला फतवा हा आहे की, प्रत्येक संकटात वा प्रत्येक आनंदी प्रसंगात समाजाचे धृवीकरण घडवून आणले गेले पाहिजे. मागील महिन्यातील दिल्लीतील दंगल भडकाविणारे मिश्रा-ठाकूर सारखे ब्राह्मण-क्षत्रिय होते. ते उघडपणे पिस्तूल ताणून फिरत होते, पोलीसांच्या साक्षीने भडकाऊ भाषणे देत होते. तरीही या दंगलीचा मिडियामधील वृतातं आळणा म्हणजे कोणतीही चव नसलेला होता. मात्र आप पक्षाचा मुसलमान नेता ताहीर हुसेन त्याच्याच घराच्या टेरेसवर काठी घेऊन फिरतांना टिपला गेला आणी तेव्हापासून दंगलीचा वृतांत खमंग-मसालेदार चविष्ट झाला. हिंदू-मुस्लीम मसाला नसेल तर या देशात कशातही राम नाही. करोनाचे तेच झाले. जनता कर्फ्युनंतरही संसद चालू होती. संसद चालू असणे याचा अर्थ 800 सांसद, त्यांचे प्रत्येकी 5 स्टाफ व 5 कार्यकर्ते मिळून 8,000 लोकांचा हा जमावडा रोज संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत एकत्र येत होता व नंतर देशभरात आपापल्या मतदारसंघात विखूरला जात होता. त्याचवेळी मध्यप्रदेशातील कॉंग्रेसी कमलनाथांचे सरकार पाडण्यासाठी व वाचविण्यासाठी शेकडो आमदार व त्यांचे हजारो कार्यकर्ते राजस्थान ते बंगळूरू वगैरे राज्यातुन फिरून आलेत व नंतर भाजपाई चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्याच काळात कर्नाटकच्या भाजपाच्या आमदाराच्या घरी शाही थाटात लग्न-समारंभ पार पडला. यातही 4-5 हजार लोक देशभरातून एकत्र आलेत व एकाच्याही तोंडावर मास्क नसतांना पुन्हा देशभर पसरलेत, महाराष्ट्रात एका धार्मिक यात्रेत 3-4 हजार भाविक जमलेत, त्यांना विरोध करणारे पोलीस मार खाऊन पळून आलेत, अयोध्येतील एक संत रामनवमीला करोनाकडे दुर्लक्ष्य करायला सांगून लाखोंच्या संख्येने अयोध्येत येण्याचे आवाहन करीत होता. या सर्व बातम्या मिडियाला धार्मिक द्वेषाचा मीठ-मसाला नसल्याने आळणी म्हणजे कोणतीही चव नसलेल्या वाटत होत्या. मात्र निजामुद्दीनचे तबलीगी सापडताच करोनाच्या बातम्या चवदार झाल्यात आणी सर्व मिडिया एकदम तुफान बनून तुटूनच पडला. युद्ध करोनाशी आहे की मुसलमानाशी? अर्थातच मुसलमानाशीच आहे, करोना निमित्त मात्र आहे! काय ईराण-इराकमध्ये हिंदू अल्पसंख्य राहात नाहीत? काय ब्रिटन-अमेरिकेत मुसलमान राहात नाहीत? तेथील मिडिया अशा मसालेदार चटपटीत बातम्या का देत नाही? कारण तेथील जनतेच्या मेंदूंचा केमिकल लोच्या झालेला नाही. कारण त्या देशात अजून आर्य-वैदिक-ब्राह्मण सत्तेत आलेले नाहीत.
-4-
भारतात आता प्रत्येक करोनाग्रस्त हा कसा तबलीगी वा तबलिगीच्या सहवासात आला आहे, याचे रसभरीत वर्ण सुरू आहे. ब्राह्मणभारत राष्ट्राचे जावडेकर-सितारमण यांनी जाहीर केलेले एक लाख सत्तर हजार कोटी रूपयांचे पॅकेज किती गरीबांपर्यंत पोहोचले, किती राज्यांना किती निधी दिला, केंद्र शासनाने किती अन्नछत्रे सुरू केलीत, आणी तरीही या कष्टकरी लोकांचे लोंढे गावाकडे का जात आहेत, आतापर्यंत किती भूकबळी गेलेत, टाटांनी दिलेले पैसे कुठे वापरलेत, मदत करण्यासाठी अंबानीला अजून मुहुर्त का सापडत नाही, अजीम प्रेमजी मदत करतांना शासकीय यंत्रणेवर अविश्वास का दाखवितात, करोनाच्या संकटकाळात संसद अधिवेशन चालू ठेवणार्‍यांवर पोलीस कारवाई केव्हा करणार, कर्नाटकचा लग्नाळू आमदार जेलमध्ये केव्हा डांबणार, ऐन करोना संकटात देशहिताकडे दुर्लक्ष्य करणारया व एक राज्य सरकार पाडून तेथे नवे सरकार आणणार्‍यांवर कारवाई केव्हा करणार वगैरे प्रश्न ब्राह्मण-भारत राष्ट्रात गैरलागू आहेत. कारण या प्रश्नांना धार्मिक-जातीय द्वेषाचा मीठ-मसाला नाही. हे सगळे प्रश्न व्हेज आहेत. त्यामुळे असे प्रश्न विचारण्याचे धाडस कुणी करू नये. निजामुद्दीनच्या मीठ-मसाल्यातून करोना फ्रायच्या तबलीगी नॉन-व्हेज बातम्या मिडियातून घरोघरी परोसल्या जात असतांना निव्वळ आळणी व व्हेज बातम्या पाहिजेतच कशाला तुम्हाला? मोठमोठे पुरोगामी म्हणविणारे नेते, विचारवंत इतिहास-संशोधक बगैरे लोक केमिकल लोच्याला बळी पडतात, तेव्हा या देशाची चिंता निश्चितच जीवघेणी ठरते.आज भलभले पुरोगामी केमिकल लोच्याला बळी पडत आहेत. या केमिकल लोच्या विरोधात संघर्ष करायचा म्हणजे तुम्हालाही तेवढाच प्रदिर्घ व सखोल असा परिणामकारक सांस्कृतिक संघर्ष करावा लागणार आहे. परंतू त्याआधी केमिकल लोचा झाला आहे, हे तर मान्य करावे लागेल. तो मान्य होणे कठीणच ! त्यामुळे असा संघर्ष सुरू होणे आतातरी कठीण वाटते. परंतू तरीहि या ब्राह्मणी केमिकल लोच्याविरोधात लढण्याची प्रेरणा कधीतरी पुरोगाम्यांना मिळेल या अपेक्षेत सर्वांना जयजोती, जयभीम,
सत्य की जय हो!
(लेखनः 4 एप्रिल 2020)
------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270