http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, July 19, 2020

122 BahujanNma Mudade Daily Lokmanthan 19July20


बहुजननामा-122
ओबीसी नेतेः चालते-बोलते मुडदे!
-1-
झी 24 तास टिव्ही चॅनलचे अँकर आशिष जाधव यांनी मला प्रश्न विचारला की, ‘‘मराठा समाजाचे नेते मराठा समाजाच्या हितासाठी सतत पाठपुरावा करीत असतात, त्यामुळे त्यांना पाहिजे ते लगेच मिळते. तुमचे ओबीसी नेते असा पाठपुरावा का करीत नाहीत?’’
सारथीला एका मिनिटात 8 कोटी मिळतात व एकूण रक्कम 100 कोटीच्या वर जाते.
महाजोतीला मंत्रालयात अजून टेबल-कपाट सापडत नाही, पेसे मिळणे फारच लांबची गोष्ट! ओबीसी वित्त व विकास महामंडळाला 3 वर्षांपासून अध्यक्षच नाही, पैशांचा प्रश्नच नाही. ‘‘खरे ओबीसी उपाशी व खोटे एसईबीसी तुपाशी’’
हा खरोखर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आमचे ओबीसी नेते ओबीसींसाठी पाठपुरावा करीत नाहीत, हे कोणीच नाकारू शकत नाही. पण त्यात त्यांचा काय दोष? सर्वात महत्वाची बाब ही आहे की, जे ओबीसी लोक या नेत्यांना ‘ओबीसी नेता’ मानतात, ते सर्व मेंढरं आहेत. मेंढरांना कोणतीही अपेक्षा नसते, महत्वाकांक्षा नसते व काही मागायचेही नसते. मेंढरांना एकच पाहिजे असते- आमचा एक मेंढा नेता झाला पाहिजे, त्याला आमदारकी, मंत्रीपद मिळाले पाहिजे. त्याच्या पुतण्याला खासदारकी, सुनेला महापौरपद, मुलाला एजन्सी, जावयाला मोठे सरकारी कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळाले पाहिजेत. या नेत्याला व त्याच्या नातेवाईकांना जर असं काही मिळालं नाही, तर मग समस्त ओबीसी जनतेवर तुम्ही अन्याय करीत आहात, असा त्याचा अर्थ होतो. मेंढरं आपल्या नेत्याला फार जपतात. त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. मेंढरांच्या या नेत्याचा वाढदिवस शिवाजी पार्कवर थाटामाटात साजरा होतो व किमान 5 लाख ओबीसी लोक तेथे जमतात. स्वतःचं भाडं खर्चून हे लोक लांबून-लांबून येतात. अशा परिस्थीतीत ओबीसी नेते आपल्या कुटुंबियांचं भलं करून घेत असतील व समाजाला वार्‍यावर सोडून देत असतील तर, त्यात त्यांचं काय चुकलं? जी बाब ओबीसी नेत्यांच्या ‘ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलीटीज’ मध्ये येतच नसेल तर त्यासाठी त्यांना जॉब विचारणे, हेच मुळात चुकीचे आहे.
दुसरी महत्वाची बाब ही आहे की, हे आमचे ओबीसी नेते मंत्री झाल्यावर मंत्रीपद कसं चालवायचं याची ‘बुद्धी’ मागण्यासाठी सिद्धीविनायकाला शरण जातात. मंत्रीपद मिळाल्यावर सर्वप्रथम प्रभादेवीला जातात. त्यानंतर त्यांचा एखादा विचारवंत कार्यकर्ता त्यांना तात्यासाहेब महात्मा फुलेंची आठवण करून देतो. मग नेता तडक पुण्याला फुलेवाड्यावर जाऊन ‘बुद्धीची मागणी’ करतो. परंतू तात्यांच्या राखेच्या थडग्यातून बुद्धी देण्याची ऑनलाईन व्यवस्था फुलेवाड्यावर नाही, कारण तात्यासाहेबांचा अशा फालतू गोष्ठींवर विश्वासच नव्हता. मात्र प्रभादेवीला युगेनुयुगे बुद्धी-वाटप करणारी देवता असल्याने तिथे या ओबीसी नेत्यांना भरपूर बुद्धी मिळते. आता भट-पंड्यानी घेरलेला गणपती यांना कोणती बुद्धी देणार? ‘‘गो-ब्राह्मण प्रतिपालक बना! आपल्या मालकाशी म्हणजे मराठ्यांशी एकनिष्ठ राहा. तुमच्या खात्याचा सर्व निधी ब्राहमण-मराठ्यांच्या हितासाठी वापरा, त्यातूनच तुमची स्वतःची भरभराट होत जाईल, तुमच्या सर्व कुटुंबाचं भलं होईल.’’ अशी उदात्त व पवित्र बुद्धी घेऊन आमचे ओबीसी नेते कामाला लागतात. त्यामुळे त्यांनी ओबीसी-दलितांसाठी काहीच केलं नाही, अशी ओरड करण्यात काहीच अर्थ नाही.
तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे की, जातीव्यवस्थेचं रसायन अजब असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की, या ओबीसी नेत्यांना ओबीसींच्या हितासाठी आक्रमक व्हावेच लागते. जर ते तसे आक्रमक झाले नाहीत, तर त्यांचं ‘ओबीसी नेतेपद’ धोक्यात येण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांचे मालक स्वतःच त्यांना थोडे ‘मोकळे’ होण्याची परवानगी देऊन टाकतात. परंतू ही परवानगीची दोरी फारच अखूड असते. 2009-10 साली सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्त्यांनी ‘ओबीसी जनगणनेचा ईश्यु’ फारच गाजविला. कोणतेही आंदोलन प्रभावी होताच ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून काढून प्रस्थापित नेत्यांच्या हाती द्यावे लागते. जर असे केले नाही तर, प्रभावी आंदोलनातून नवा नेता निर्माण होतो व तो प्रस्थापित ब्राह्मण-क्षत्रियांसाठी डोकेदुखी ठरतो. ओबीसी जनगणेच्या आंदोलनाने पेट घेतल्यानंतर ते विविध राजकीय पक्षांच्या ओबीसी नेत्यांनी आपल्या हाती घेतलं. ओबीसी नेत्यांनी संसद गाजविली, ती अनेकवेळा बंद पाडली. पत्रकार परिषदा, मेळावे, मुलाखती, भडक वक्तव्ये अशी सर्व रेलचेल सुरू होती. परंतू, एकाही ओबीसी नेत्याने परवानगीच्या दोरीचं भान ठेवलं नाही. बर्‍याच ओबीसी नेत्यांनी उत्साहाच्या भरात ही दोरी तोडली व पुढे गेलेत! त्याचे परिणाम काय झालेत, ते आपण बघतच आहोत. ही दोरी केवळ परवानगीची दोरी नसते, तर ती राजकीय करिअरची दोरी असते. या तुटलेल्या दोरीने काही ओबीसी नेत्यांचे राजकीय करियरच खतम केले. काही जेलमध्ये गेलेत आणी लोकनायक गोपीनाथ मुंडेसाहेबांसाठी ती आयुष्याची दोरी ठरली.
                               -2-
भाजप तर ओबीसी नेत्यांची अजिबात गय करीत नाही. 1990 ते 1993 पर्यंतच्या हिंदू-मुस्लीम द्वेषाच्या राजकारणात अग्रेसर असलेले कल्याणसिंग, साध्वी उमा भारती, विनय कटियार हे सर्व ओबीसी नेते अडवाणीच्या आधीच कचर्‍याच्या डब्ब्यात फेकले गेलेत. मुंडेसाहेब ‘’सोयरे’’ असल्यामुळे प्रकाश झोतात राहीलेत. पुढे प्रमोद महाजन गेल्यामुळे ते स्वयंभू व स्वाभिमानी नेते बनलेत. असे ओबीसी नेते ब्राह्मण-मराठा राज्यकर्त्यांसाठी धोकेदायक असतात. त्यामुळे त्यांची आयुष्याची दोरी आखूड केली गेली. एक ओबीसी नेता गेला तर एका रात्रीतून शेकडो ओबीसी नेते निर्माण करण्याची क्षमता भाजपामध्ये आहे. त्याप्रमाणे खडसे, पंकजाताई मुडे, बावनकुळे वगैरे काही ओबीसी नेते निर्माण करण्यात आलेत. त्यांना काही महत्वाची पदेही दिलीत. काही दिवस भरपूर खाऊ-पिऊ दिलं. कुणी चिक्की खाल्ली, कुणी जमिनच हडप केली. बोकडाला चरायला मोकळं कुरण मिळालं की तो काही दिवसातच चरबीदार बनतो व मालकावरच शिंगे उगारतो. असा चरबीदार व माजोर्डा बोकड कापून खाण्याची मजा काही औरच असते! ओबीसी नेते चरबीदार बनल्यानंतर कापून खाण्यासाठीच असतात, हे सर्व राजकीय पक्षांनी वारंवार सिद्ध करूनही या पक्षांच्या कार्यालयात आजसुद्धा अनेक ओबीसी लोक लाळ गाळत मुडद्यासारखे वावरत असतात.
 जातीव्यवस्थेचा केमिकल लोच्या एकीकडे तुम्हाला ब्राह्मण-क्षत्रियांची गुलामी करायला भाग पाडतो, तर दुसरीकडे जातीसाठी-कॅटेगिरीसाठी काहीतरी चांगले काम केलेच पाहिजे, असा धोशापण लावतो. या द्वंदातून सुरक्षितपणे बाहेर निघणं फार अवघड असतं. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरी शास्त्राचा अभ्यास असावा लागतो. तसा अभ्यास एकाही राजकीय ओबीसी नेत्याचा नाही. त्यामुळे त्यांचा खून होणे, त्यांचे जेलमध्ये सडणे आणी आयुष्यभर जेलच्या भीतीने व मृत्युच्या भीतीने हे ओबीसीनेते चालते-बोलते मुडदे बनून राहतात. आणी आशिष जाधवसाहेब अशा मुडद्यांकडून ‘पाठपुराव्याची अपेक्षा’ ठेवतात.  

(लेखनः 18जुलै2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, १९जुलै20)
लेखक-- *प्रा. श्रावण देवरे*
*Mobile –* 88 301 27270
*Blog लिंक-* http://shrwandeore.blogspot.com/

Saturday, July 11, 2020

121 BahujanNama Oze Lokmanthan 12July20


बहुजननामा-121
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?!
-1-
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या काळात एका वृत्तपत्रा एक बातमी छापून आली होती. बातमीत म्हटले होते की, पुण्यातील काही शिक्षित ब्राह्मणांनी इंग्रज अधिकार्‍यांकडे विनंती अर्ज केला आहे. अर्जात म्हटले आहे की, ‘इंग्रजांच्या राज्यात कलेक्टर वगैरेसारख्या उच्च-श्रेणीच्या नोकर्‍या फक्त इंग्रज शिक्षितांनाच मिळतात, आम्हा हिंदूंना या उच्चश्रेणीच्या नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत व त्यासाठी हिंदूंना आरक्षण मिळाले पाहिजे.’ तात्यासाहेबांच्या घरी रोज संध्याकाळी कार्यकर्ते जमा होत होते व दिवसभराच्या घडामोडींसह वैचारिक मुद्दयांवरही चर्चा होत असे. त्याचबरोबर कृती-कार्यक्रम आखून जबाबदार्‍यांचे वाटप होत असे. अशाच एका बैठकीत या बातमीचे सामुहिक वाचन करण्यात आले व त्यावर तात्यासाहेबांनी मार्गदर्शन करावे, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली.

त्यावर तात्यासाहेबांनी जे मार्गदर्शन केले ते जात्यंतक तत्वज्ञानाची तर्कशूद्ध मांडणी करणारे महा-विवेचन ठरले आहे. या महा-विवेचनातून त्यांनी जातीअंताचे अनेक सिद्धांत मांडून कृती-कार्यक्रमही सांगीतला. यावर मी वेळोवेळी अनेक पुस्तकातून व बहुजननामाच्या लेखातून चर्चा केलेली आहे. त्याची पुनर्रावृत्ती मी येथे करणार नाही. परंतू वर्तमान परिस्थितीचे अवलोकन करता तात्यासाहेबांच्या या ऐतिहासिक महा-विवेचनाची पुन्हा आठवण झाली.
तात्यासाहेब त्या बातमीचे विवेचन करतांना पहिले वाक्य उच्चरतात, ‘‘नाव हिंदूंचे आणी गाव मात्र ब्राह्मणांचे’’ म्हणजे हिंदूंच्या नावाने नोकर्‍या मागायच्या आणी ब्राह्मणांनी त्या फस्त करायच्या, हे आतील मर्म तात्यासाहेबांनी उघड करून सांगीतले. हिंदूंच्या खांद्यावर ब्राह्मणांच्या वैदिक धर्माचे ओझे हजारो वर्षांपासून आहेच, आता इंग्रजांच्या बदलत्या काळात प्रशासकीय अधिकार-पदे बळकाविण्यासाठी ब्राह्मण-आरक्षणाचे ओझे हिंदूंच्या खांद्यावर ठेवले जात होते. हे मर्म आजही शूद्रादिअतिशूद्रांच्या मेंदूपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे ब्राह्मण आजही वेगवेगळी कारस्थाने करतात व त्याला आमचे तथाकथित बुद्धीमान लोक बळी पडतात. खरे म्हणजे अशा लोकांना बुद्धीमान तरी कसे म्हणायचे? हे आपली बुद्धी फक्त आरक्षित नोकरी मिळविण्यासाठी खर्च करतात. एकदा का नोकरी मिळाली, की ते आपल्या बुद्धीचा वापर फक्त मौजमस्तीचे ‘खाण्यासाठी व पिण्यासाठी खर्च रतात. त्यामुळे ते बुद्धीभ्रष्ट होतात. मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करतांना यांचा फुले-शाहू-आंबेडकर उलट्या पावलांचा होऊन जातो. म्हणजे यांची बुद्धी उलटी चालते. उलटी बुद्धी म्हणजे मराठा-ब्राह्मणाच्या हितासाठी चालते. अडाणी लोक अज्ञानामुळे ब्राह्मणांच्या षडयंत्रांना बळी पडतात. हे बुद्धीभ्रष्ट लोक अतिज्ञानामुळे ब्राह्मणांच्या षडयंत्रांना बळी पडतात.
तर, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, हा प्रकार या बुद्धीभ्रष्टांमुळे युगेनयुगे सर्सास चालू राहतो. मंडल आयोगामुळे स्वतःच्या विकासाचे ओझे स्वतःच्या खांद्यावर पेलायला ओबीसी समर्थ होत होता. 52 टक्के ओबीसी समर्थ झाला तर जातीअंताचा काळ अधीक जवळ येईल, याची साधी कल्पनाही फुले-आंबेडकरी बुद्धीभ्रष्टांना नव्हती, मात्र ब्राहमणांना पुरेपूर खात्री होती व आहे. त्यामुळे या समर्थ होत चाललेल्या ओबीसींचे खांदे कमजोर केले पाहिजेत, यासाठी ब्राह्मणी कृती-कार्यक्रम आखण्याचे काम सुरू झाले. या षडयंत्रात ‘‘हवेत तलवारी फिरविणार्‍या’’ क्षत्रिय जातींचा ‘रॉ-मटेरियल’ म्हणून वापर करण्याचे ठरले, त्याप्रमाणे त्यांनी जाट-पटेल-मराठा जातींना ओबीसीत घुसखोरी करण्यासाठी चिथावणी दिली. संपूर्ण देशात जाट-पटेल मराठ्यांचे ओबीसी दर्जा मिळावा म्हणून लाखोंचे मोर्चे गाजलेत, रेल्वे रोको, दिल्ली घेराव वगैरे प्रकार संघ-भाजपाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेत.
या क्षत्रिय जातींमध्ये जे प्रामाणिक विचारवंत होते, त्यांना या जातीपासून तोडण्यात आले. या प्रामाणिक विचारवंतांना मोर्च्यांच्या बैठकांमधून अपमानास्पदरित्या हाकलून देण्यात आले. हा प्रकार महाराष्ट्रातही घडला. महाराष्ट्रातील दोन ऋषीतुल्य माजी न्यायधिश माननीय श्री. पी.बी.सावंत व न्यायधिश कोळसे-पाटील यांना अक्षरशः बैठकितून हुसकावून लावण्यात आले. कारण या प्रामाणिक विचारवंतांनी फुले-शाहू-आंबेडकरांचा सखोल अभ्यास केला असल्याने मराठा आरक्षणाचे ब्राह्मणी षडयंत्र यांनी ओळखले आहे. असे विचारवंत लोक मराठ्यांच्या बैठकीत सामील व्हायला लागलेत तर संघ-भाजपाचे षडयंत्र यशस्वी कसे होणार? जाट-पटेल-मराठा जातीच्या आरक्षणाचे ओझे ओबीसींच्या खांद्यावर ठेवण्यासाठी हे लोक कोणत्याही नीच पातळीवर जायला तयार आहेत. कारण संघ-भाजपाला मराठा आरक्षणाशी काहीही देणे-घेणे नाही, त्यांना काहीही करून ओबीसींचा समर्थ होत चाललेला खांदा कमजोर करून सोडायचा आहे. या क्षत्रिय जातींवर संघ-RSS ने पूर्णपणे कब्जा केलेला आहे, त्यामुळे ते यशस्वी होत आहेत.
-2-
     जगात संघ-RSS ही अशी एकमेव संघटना आहे की, जीचा कब्जा देशातील प्रत्येक राजकीय पक्षावर आहे. त्यामुळे संघभाजपाने घेतलेले निर्णय, केलेले कायदे व मोडलेले संविधान कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर रद्द केले जातील व पुन्हा पुरोगामी निर्णय कायम केले जातील, असे आश्वासन कॉंग्रेसच काय कोणताही राजकीय पक्ष देण्याची हिम्मत करू शकत नाही, इतकी दहशत संघ-RSSची आहे. त्यामुळे संघ-भाजपाने षडयंत्र करून जे मराठा आरक्षण दिले आहे, ते टिकविण्याची धडपड कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना करीत आहे. संघ-RSS ची दहशत इतकी घोर-सैतानी आहे की, ते कोणत्याही क्षणाला कोणत्याही नेत्याला जेलमध्ये टाकू शकतात. कारण सीबीआय, ईडी-सीडी, रॉ वगैरे सर्व गुप्तचर संघटना संघ-RSS च्या कब्ज्यात आहेत. शिवाय मनुमिडिया आहेच सोबतीला!
     स्वतःला पुरोगामी म्हणविणारे सगळेच पक्ष संघ-RSSच्या दहशतीत असल्याने ते ब्राह्मण-बनिया-क्षत्रिय जातीच्या हिताचे कायदे ताबडतोब करतात. कोट्यावधी रूपयांचा निधी एका मिनिटात मंजूर करतात. मात्र हे करीत असतांना एक काळजी घेतली जाते. अर्थमंत्री व गृहमंत्री मराठा किंवा ब्राह्मणच असेल, याची काळजी घेतली जाते. कारण प्रत्येक खात्यात काही विशिष्ट टक्केवारीने संबधित मंत्र्यांना टेबलाखालून अब्जावधी रूपये मिळत असतात. हे टेबलाखालचे अब्जावधी रूपये दलित+आदिवासी+ओबीसी मंत्र्यांना मिळणार नाहीत, याची दक्षता घेतली जाते. कारण या कनिष्ठ जातीच्या मंत्र्यांनी अब्जावधी रूपयांची संपत्ती कमावली तर ते ताबडतोब मुख्यमंत्री पदावर दावा सांगतात. मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकणारा ओबीसी-दलित मंत्री त्यांच्या दृष्टीने माजलेला असतो. अशा ओबीसी मंत्र्याचा माज उतरविण्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकले जाते, भ्रष्टाचार्‍याच्या फाईल्स तयार करून त्यांच्या मागे ईडी-सीडी लावली जाते. यासाठी गृहमंत्रीपदही ब्राह्मण-मरांठा मंत्र्यांकडेच ठेवले जाते. एखाद्या खात्याला कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करायचा असेल आणी तेथे ओबीसी-दलित मंत्री असेल तर त्याला ‘टार्गेट’ करून प्रचंड छळ केला जातो. त्याचा मानसिक छळ करून नितीधैर्य खचवले जाते. ओबीसी मंत्री वडेट्टीवारसाहेबांचे प्रकरण ताजेच आहे आणी भुजबळांचे प्रकरण ऐतिहासिक आहे. दलित+आदिवासी+ओबीसींचे खच्चीकरण करण्यासाठी काही छळ करणार्‍या भाडोत्री टोळ्या निर्माण केल्या जातात, या टोळ्यांना अमूक ब्रिगेड, टमूक क्रांती-मोर्चा अशी संघटनात्मक नावे दिली जातात. या संघ-RSS च्या भाडोत्री टोळ्या असतात व त्यांना सर्वच राजकीय पक्षांचा उघड पाठींबा असतो.
     मात्र या राजकीय पक्षांच्या ढुंगणावर दलित+आदिवासी+ओबीसींची लाथ बसली की, मग ते तात्पुरते का होईना, पुरोगामी बनतात व कनिष्ठ जातींसाठी काहीतरी चांगले काम करतात. परवाचाच अनुभव पहा...... केवळ एका जातीसाठी सारथी नावाची संस्था RSS-भाजपाच्या सरकारने निर्माण केली. ही संस्था अ-संवैधानिक व अनैतिक आहे. पण संघ-RSS चा नितीमत्तेशी काय संबंध? केवळ ओबीसी वित्त महामंडळाचा निधी सारथीकडे वळवून ओबीसींचा खांदा कमजोर करणे, हा एकमेव उद्देश! परवा सारथी संस्थेला 8 कोटी रूपयांचा निधी एका मिनिटात मंजूर झाला, अशी शेखी कॉंग्रेसचे प्रवक्ते सावंतसाहेब टीव्ही चॅनलवर मिरवीत होते. मी होतोच तिथे. मी सावंतांना प्रश्न विचारला की, ‘‘मराठ्यांच्या सारथीला एका मिनिटात आठ कोटी दिलेत, मग ओबीसी वित्त महामंडळाला, महाज्योतीला किती मिनिटात, किती तासात वा किती वर्षात निधी मिळवून देणार? या राज्यात काय फक्त मराठाच राहतात का? दलित+आदिवासी+ओबीसी हे काय इराण-इराकमधून आले आले आहेत काय? हे 85 टक्के लोक तुम्हाला मते देत नाहीत काय? मूळ खर्‍या ओबीसींना उपाशी ठेवतात आणी खोट्या SEBC ला मात्र जिलेबीवर बासुंदी देतात! ओबीसींच्या वित्त महामंडळाला तीन वर्षांपासून अध्यक्षच नाही? निधी-पैसे देणे तर फारच लांबची गोष्ट! महाज्योतीला मंत्रालयात अजूनही खुर्ची-टेबल-कपाट सापडत नाही?’’ गंमत बघा....मी परवाच अशा लाथा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कमरेत घातल्या आणी कालच ओबीसी आयोगाचे पुनर्रगठण करण्याची जाहीरात निघाली.
     या पुढील चर्चा पुढील भागात... सत्य की जय हो!
(लेखनः 11जलै2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 12जुलै20)
लेखक-- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27
270

Sunday, July 5, 2020

120 BahujanNama JalnaMantha Daily Lokmanthan 5July20

बहुजननामा-120
पिडिताच्या खूनाचा निषेध व माळी समाजाचे अभिनंदनीय वर्तन!

-1-
महाराष्ट्रातील जालना जिल्याह्यातील मंठा येथे माळी समाजाच्या नवविवाहितेचा एकतर्फी प्रेम प्रकरणातून खून झालेला आहे. त्याचा जाहीर निषेध करून संबंधित गुन्हेगारास कायद्यानुसार योग्य ती कडक शिक्षा झाली पाहिजे व त्यासाठी त्या परिसरातील पुरोगामी नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न केला पाहिजे. याबाबत संयम ठेवून माळी समाजाने जे काम
केले आहे व करीत आहे, त्याबद्दल समस्त माळी समाजाचे मी अभिनंदन करतो!
परंतू तरीही पुढील गोष्टींकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या.......

1)   RSS-संघाने प्रत्येक जातीतील निवडक तरूणांना प्रशिक्षीत करून त्यांना त्यांच्या जातीत काम करण्यासाठी सोडून दिलेले आहे. माळी जातीतही असे संघ-प्रशिक्षित तरूण असू शकतात. हे तरूण आपापल्या जातीत खोटा जात्याभिमान निर्माण करतात तसेच जाणीव पूर्वक चूकीच्या व खोट्या अफवा पसरवून लोकांना भडकवीतात.
2)   RSS-संघाने पढविलेले माळी-तरूण पिडीत तरूणीच्या घरासमोर रोज जातीचे मेळावे घेण्याचा प्रयत्न करतील, असा प्रयत्न हाणून पाडा.
3)   जातीचे मेळावे पिडीत तरूणीच्या घरासमोर झालेत तर हे भटाळलेले माळी तरूण भडकावू भाषणे करतील व धार्मिक-जातीय तेढ निर्माण करतील. अशा मेळाव्यांना ब्राह्मणी मिडीया भरपूर प्रसिद्धी देतो. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे पुढारी तुमच्या मेळाव्याला भेटी द्यायला येतील व तुमचा जातीय उन्माद वाढवतील.
4)   अशा जात-उन्मादाच्या मेळाव्यात हे संघ-प्रशिक्षित माळी लोक जाणीवपूर्वक चूकीची आकडेवारी देतील व समाजाला चिथविण्याचा प्रयत्न करतील. उदाहरणार्थः- ‘‘आमच्या माळी पोराला 96 टक्के मार्क्स मिळूनही अकरावीला प्रवेश मिळत नाही व दलितांच्या मुलांना 36 टक्के मिळाले तरी त्यांना प्रवेश मिळतो’’, असे कुभांड ते रचतील, त्यांना तेथेच ठेचून काढा.
5)   आणखी एक नवटंकी ते उभे करतील- माळी जातीच्या पाचवी शिकत असलेल्या पोरीला ते भाषण लिहून देतील व तीच्या कडून ते भाषण पाठ करवून घेतील. तीला माळी समाजाच्या मोर्च्यासमोर उभे करून हे पाठांतर केलेले भाषण बोलायला लावतील. या भाषणातून आरक्षण कसे वाईट आहे व त्यातून गुणवत्ता कशी बिघडते, आरक्षणामुळे दलित कसे माजलेत, मुस्लीम कसे माजलेत वगैरे असे उच्च कोटीचे तत्वज्ञान ती मुलगी आपल्या जातीला पाजळेल. अशा पोरीला व तीच्या भाषणाला ब्राह्मणी टिव्ही मिडिया भरपुर प्रसिद्धी देतात, असा प्रत्यक्ष अनुभव आपण सर्वांनी दिड-दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. अशी नवटंकी हाणून पाडा.
6)   अशा मेळाव्यातून वा बैठकीतून माळी समाजातील पुरोगामी लोकांना व सच्च्या मार्गदर्शक विचारवंतांना समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यांना अपमानास्पदरित्या बैठकीतून हाकलून दिले जाऊ शकते. महाराष्ट्रातील दोन ऋषीतूल्य माजी न्यायधिशांचा अपमान त्यांच्याच जातीने कसा केला, हे महाराष्ट्राने नुकतेच उघड्या डोळ्याने पाहिलेले आहे. वैदिक ब्राह्मणांनी निर्माण केलेला असा जात-उन्माद माळी समाजाला परवडणारा नाही.
7)   ‘‘माननीय रामदास आठवले, बाळासाहेब प्रकाश आंबेडकर’’ यासारख्या दलित नेत्यांनी किंवा मुसलमान नेत्यांनी पिडित मुलीच्या घरी भेट द्यायला येवु नये’’, असा जातीयवादी फतवा काही संघी-माळी काढण्याची शक्यता आहे, अशा संघीस्ट माळ्याला जागेवरच ठेचून काढा. अर्थात अजून एकाही माळ्याने असा फतवा काढला नाही व काढणारही नाही, कारण माळीसमाज बाबासाहेबांचे गुरू असलेल्या तात्यासाहेबांच्या रक्ताचेही वारसदार आहेत व विचारांचेही वारसदार आहेत. माळी समाज वैदिक-ब्राह्मणांचे घाणेरडे रक्त आपल्या माळी समाजात मिसळू देणार नाहीत, या बद्दल मला खात्री आहे.
8)   तुमच्यात माळी-उन्माद निर्माण व्हावा म्हणून संघ-भाजपावाले तुम्हाला चूकीची आश्वासने देऊ शकतात. उदाहरणार्थ- संघ-भाजपावाले सांगतील की, ‘‘पिडीत मुलीला न्याय देण्यासाठी माळी समाजाला दलित-कॅटेगिरीचे आरक्षण दिले पाहिजे, जेणेकरून माळ्यांना दलितांचे ताट हिसकावता येईल व माळ्यांचा प्रचंड वेगाने विकास होईल.’’ संघ-भाजापाचा उद्देश तुम्हाला आरक्षण देण्याचा नसतो तर, दलित-माळी, मराठा-ओबीसी यांच्यात भांडणे लावणे, हा खरा उद्देश असतो.
9)   संघ-भाजपाचा हा डाव यशस्वी करण्यासाठी दलितांमधील सर्वात जास्त बुद्धीमान असलेली एक संघटना माळी समाजाला भेटायला येईल. ‘‘माली समाज को दलित आरक्षण मिल गया तो सब माली बुद्धीस्ट हो जाएंगे और देशमे क्रांती लाएंगे’’ अशा विषयांवर हे दलित बुद्धीमान परिषदा भरवतील व तुम्हाला ‘मिस-गाईड’ करतील.
10) माळ्यांनी जर वैदिक-ब्राह्मणांच्या व ‘त्या’ अतिबुद्धीमान दलितांच्या संघटनेच्या नादी लागून माळी-उन्माद निर्माण केला तर, पुढील घटना घडतील-  अ) माळी लोकांना दलित-आरक्षण मिळण्यासाठी संघ-भाजपावाले ताबडतोब माळी जातीतील एखादा कुडमुडा न्यायधिश शोधून काढतील व त्याच्या अध्यक्षतेखाली मागास आयोग नेमतील. ब) या आयोगात माळी जातीचेच भटाळलेले सदस्य नेमले जातील. क) याच संघीस्ट माळ्यांच्या बोगस संशोधन संस्था निर्माण केल्या जातील व त्यांच्याचकडून घरबसल्या बोगस अहवाल तयार करून माळी लोकांना ‘‘अस्पृश्य’’ ठरविले जाईल. ड) या बोगस अहवालाद्वारे माळ्यांना दलित-आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल.
11) ज्या अहवालावर आधारित माळ्यांना ‘‘अस्पृश्य’’ ठरवून दलित आरक्षण दिले जाईल, तो अहवाल कोर्टाने मागीतला तर सरकारतर्फे नकार देण्यात येईल. ‘‘अहवाल स्फोटक आहे, दंगली होतील’’, अशी कारणे सांगण्यात येतील. अशा वेळी ‘‘स्फोटक व दंगलखोर’’ अहवाल बनविणार्‍या हरामखोरांना फाशीची शिक्षा देण्याची’ मागणी माळी समाजाने केली पाहिजे. आणी, अशा खोट्या अहवालावर सही करणार्‍या न्यायधिशाला भर चौकात नागडा करून चाबकाने फोडून काढण्याची शिक्षा देण्याची मागणी माळी समाजाने केली पाहिजे.
12) परंतू, माळी समाजावर अजून तरी वैदिक ब्राह्मणांची चाटूगिरी करण्याची वेळ आलेली नाही, त्यामुळे दलित-आरक्षण मागण्याचा नालायकपणा एकही माळी करणार नाही. त्याला त्याच्या लायकीपेक्षा व प्रमाणापेक्षा कितीतरी कमी आरक्षण मिळाले आहे आणी तरीही तो दुसर्‍यांचे ताट हिसकाविण्याचा मुर्खपणा कधीच करणार नाही. कारण तो सच्चा फुलेवादी आहे.  
13) एखादी जात दलित असेल, ओबीसी असेल, क्षत्रिय असेल किंवा ब्राह्मण असेल..... त्या जातीला प्रमाणापेक्षा जास्त किंवा लायकीपेक्षा जास्त आरक्षण मिळाले कि, ती जात उन्मादी बनते, खूनी-दरिंदा बनते. वैदिक ब्राह्मणांना लायकीपेक्षा व प्रमाणापेक्षा जास्त मिळाले, तर ते अस्पृश्यांच्या गळ्यात मडके बांधणारी पेशवाई स्थापन करतात. क्षत्रिय असलेल्या सरंजाम जातींना प्रमाणापेक्षा व लायकीपेक्षा जास्त आरक्षण मिळायला लागताच राज्यात सरंजामी-पेशवाई स्थापन झाली व दलित-ओबीसी पोरांचे खून पडायला लागलेत.
14) कोणत्याही परिस्थितीत पिडीत तरूणीच्या या प्रकरणाचा गैरवापर संघ-भाजपाकडून होणार नाही व आपल्या माळी जातीचे तरूण अशा षडयंत्राला बळी पडणार नाहीत, याची काळजी घ्या. आरक्षणाची ‘खिरापत’ वाटप करीत फिरणार्‍या दलित-बौद्ध संघटनांच्या नादी लागू नका. शूद्ध पुरोगामी विचारांच्या अनेक दलित-बौद्ध संघटना आहेत, त्यांचे मार्गदर्शन घ्या व त्यांच्या सोबत काम करा. वैदिक ब्राह्मणांनी या पूर्वी असा गैरवापर एका जातीचा केलेला आहे व त्या जातीत जातीय उन्माद निर्माण करून त्यात पूर्ण महाराष्ट्र होरपळून निघालेला आहे. त्यातून बोध घेऊन माळी समाज अशा जातीय उन्मादात भर घालणार नाही, अशी मी अपेक्षा करतो.
-2-
     अर्थात माळी समाज तात्यासाहेब महात्मा फुलेंना आदर्श मानत असल्याने ‘शांतता व समता’ त्याच्या रक्तातच आहे. त्याच्या रक्तात ‘‘मारो-काटो-अत्याचार’’ वगैरेचा लवलेशही नाही व तशी माळी समाजाची परंपराही नाही. मजूर-सालदार-कूळ यांच्या शोषणावर मौजमस्तीचे सरंजामी चंगळवादी जीवन जगण्यावर माळी समाज थूंकतो. माळीसमाज स्वतः कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो व देशाच्या विकासाला हातभार लावतो. दुसर्‍यांच्या आरक्षणाचे ताट माळी समाज कधीच हिसकावून घेणार नाही व तसा षंढ विचार माळ्यांच्या डोक्यात येणारही नाही. थोडक्यात तो ऐतखाऊ नाही. केवळ माळी समाजच नाही तर हिंदू-मुस्लीम धर्मातले सगळे बारा-बलुतेदार, भटके-विमुक्त, विश्वकर्मांसह मातंग, चर्मकार, बौद्ध असे सगळे दलित-आदिवासी-ओबीसी ही 85 टक्के जनता स्व-कष्टाचे खाणारी आहे व ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य जातीतील ऐतखाऊंना पोसणारी आहे.
खून झाल्यापासून या दोन दिवसात माळी समाजाने पिडीत मुलीच्या घरी गर्दी केली नाही, ही खूपच अभिमानाची बाब आहे. पिडीत मुलीच्या मृत्युच्या बदल्यात आमच्या जातीला दलित आरक्षण द्या, ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा किंवा मुसलमानांना देशातुन हाकलून द्या, अशी मागणी एकाही माळ्याने केली नाही. पिडित मुलीच्या घरासमोर माळी जातीची उन्मादी गर्दी नसल्याने मिडियाने प्रसिद्धी दिलेली नाही. त्यामुळे पवारांपासून फडणवीसांपर्यंतचा एकही हरामखोर नेता तेथे वोट कॅश करायला कडमडला नाही. माळीजातीतील आमदार-खासदार-मंत्री हे आधीच 'नालायक' म्हणून प्रसिद्ध आहेत व पवार-फडणवीसांचे पाय चाटत आहेत, याची जाणीव माळी समाजाला आहे. त्यामुळे कोणीही माळी-ओबीसी त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही.
तरीही अशा परिस्थितीत माळी समाजाने जिल्हाभर शांततेत मोर्चे काढलेत व त्यात मुसलमान व दलित नेत्यांनाही सामावून घेतले, हा माळी समाजाचा मोठेपणा आहे. अभिनंदन!
(लेखनः 27जून2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 28 जून 20)
लेखक-- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27
270
           ब्लॉग लिंक- http://shrwandeore.blogspot.com/