http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, March 29, 2020

106 BahujanNama Midterm 29March20 Lokmanthan

बहुजननामा-106
करोनाः ताबडतोब मध्यावधी निवडणूका घ्या!
-1-
     ‘करोना व्हायरसचे संकट ताबडतोब आटोक्यात आणायचे असेल तर एकच मार्ग आहे.... मध्यावधी निवडणूका एक महिन्याच्या आत घेण्याचे जाहीर करा.’ असे आमचे एक मित्र विनोदाने म्हटले. यात विनोद किती आणी सत्य किती, याची पडताळणी केली तर भारताबाबत हा विनोद 100 टक्के गंभीर व सत्य ठरतो. दर पाच वर्षांनी निवडणूक लढणारे सरदार व त्यांचे सैन्य निवडणूका नसतांना कोणत्या कामात गुंतलेले असते? अर्थातच दारू तस्करी, सट्टा, चोर्‍या, डकैती, लुटमार, दंगली, भ्रष्टाचार, खंडण्या आदि अनेक कामात हे कार्यकर्त्यांचे सैन्य तत्परतेने काम करीत असते. त्यांच्या दृष्टिने ‘अ-निवडणूकांचा काळ’ हा नफा कमविण्याचा काळ असतो व ‘निवडणूकांचा काळ’ हा गुंतवणूकीचा (Investment) काळ असतो.
निवडणूकांच्या काळात हे सरदार व त्यांचे सैन्य गुंतवणूक करतात, म्हणजे नेमके काय करतात? निवडणूक जाहिर झाली की, निवडणूकीचे युद्ध लढणारे सर्व नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टोळ्या ‘जनसेवेच्या कामाला’ लागतात. एक टोळी सांगते, 10 रूपयात पोटभर जेवण! त्यावर कुरघोडी करण्यासाठी दुसरी टोळी 5 रूपयात थाळी देते. या टोळ्यांचे सरदार व त्यांचे सैन्य घरोघरी जाउन हात जोडतात व लोकांना विचारतात की, ‘आम्ही आपली काय सेवा करू?’ दारोदारी फिरून साड्या वाटप करणारे, वस्ती-वस्तीत जाउन दारूचे खोके पुरविणारे, एका मताला किमान 500 रुपये रोख देणारे हे नेते व वाटप करणारे त्यांचे हे सैन्य करोना संकटात वापरून घ्यायचे असेल तर ताबडतोब निवडणूका जाहीर करा...! करोना संकटात निवडणूका नसल्यामुळे हे सरदार व त्यांचे सैन्य करोना संकटाचा गैर फायदा घेऊन जनतेला लुटत आहे. 10 रूपयांचा मास्क 50 रूपयात विकत आहेत, करोडोच्या संख्येने साठेबाजी करीत आहेत. नकली सॅनेटायझर विकत आहेत. करोनाचा फैलाव करणारी अवैध वाहतूक करून लोकांची ने-आण करीत आहेत. थोडक्यात सांगायचे तर ‘निवडणूक-काळात’ जनसेवा करणार्‍या राजकीय टोळ्या करोनाच्या संकट काळात जनतेची लूट करीत आहेत व करोनाचा फैलाव करायला कारणीभूत ठरत आहेत. जर ताबडतोब मध्यावधी (Mid-term) निवडणूका घेतल्यात तर लुटण्याचे काम करणार्‍या या टोळ्या वाटण्याचे काम करतील! जे सैन्य करोनाचा नायनाट करू शकते ते सैन्य करोनाचा फैलाव करण्यासाठी मोकळे का सोडून देत आहात?
ताबडतोब निवडणूका जाहीर केल्यात तर हेच नेते व त्यांचे हे सैन्य गरीब वस्त्यांमध्ये जाऊन चौका-चौकात अन्नाचे पॅकेट्स वाटप करतांना दिसतील. त्यामुळे हातावर पोट असणारे कष्टकरी लोक घराबाहेर व वस्तीबाहेर जाणारच नाहीत. कार्यकर्त्यांचे हे सैन्य उच्चभ्र्‍ कॉलन्यांमध्ये घरपोच किराणा व भाजीपाला पुरविण्याचे काम करतांना दिसेल. त्यामुळे कॉलनीचे रहिवासी बाहेर पडणारच नाहीत. एखाद्या घरात करोना-रूग्ण वा इतर रूग्ण आढळला तर निवडणूकीचे युद्ध लढणारा नेता स्वतः जातिने आपली ऍम्ब्युलन्स घेऊन तेथे धावत जाईल. टिव्हीच्या पडद्यावरून ‘हात धुण्याचे’ महान संदेश देणारे नेते, स्वतः सॅनेटायझरच्या बाटल्या घेऊन वस्त्यांमध्ये जातील व लोकांचे हात धुतांना दिसतील. या सर्वांतून एक महान क्रांती घडेल. जगातील कोणत्याही देशात अशी क्रांती घडू शकत नाही, ती आपल्या भारतात घडेल व संपूर्ण जग आपली पाठ थोपटेल. आता या घडीला ताबडतोब मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्यात तर फक्त 10 दिवसात करोनाची साखळी तुटेल व करोना व्हायरस कायमचा आपल्या देशातून हद्दपार होईल. हीच ती क्रांती जी जगाच्या दुसर्‍या कोणत्याही देशात घडू शकत नाही. निवडणूक काळात फक्त जाहीर सभांना बंदी घातली की, झालीच क्रांती समजा!
-2-
संकटाच्या अशाही काळात काही लोक आपले ‘सोवळे’ सावरण्यासाठी कसे काटेकोरपणे वागत आहेत, याचाही प्रत्यय येत आहे. भारतात करोना-संकटाची चाहूल लागताच केरळच्या कम्युनिस्ट सरकारने सर्वात आधी गोर-गरीब व कष्टकरी वर्गासाठी 20 हजार रूपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे नेते राजन क्षिरसागर यांनी केंद्र सरकारला विस्तृत पत्र लिहून काही उपाय-योजना सूचविल्यात. त्यावर मी ‘बहुजननामा-105’ लिहून या उपाययोजना व नव्या काही सूचना फोकस केल्यात. माझा बहुजननामा मी मराठीत लिहीत असलो तरी हिंदी पट्टयातले काही ओबीसी कार्यकर्ते त्या बहुजननामाचे हिंदी भाषेत ट्रान्सलेशन करतात व ते यु.पी., एम.पी., बिहार वगैरे राज्यात व्हायरल करतात. ‘मार्क्सवाद म्हणजेच मानवतावाद व मानवतावाद म्हणजेच मार्क्सवाद’ ही टॅगलाईन ‘अ-मार्क्सवादी’ राज्यकर्त्यांसाठी जिव्हारी लागणारी होती. या टॅगलाइनने आपले काम बरोबर केले व केंद्रसरकार सहित बहुतेक सर्वच राज्य सरकारांनी लाखो-करोडो रूपयांचे पॅकेज जाहीर करून कष्टकरी वर्गाला दिलासा देण्याचे काम केले.
भारताचे केंद्र सरकार हे ‘सोवळे-ओवळे’ वाले आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. करोनासारख्या जागतीक महामारीच्या काळातही आपले केंद्र सरकार आपले ‘सोवळे’ शूद्ध राखण्याचा कसा प्रयत्न कसे करते, हेही दिसून आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री मोदीजी दोन वेळा टिव्हीवर आलेत, परंतू त्यांच्या तोंडातून गरीब-कष्टकरी वर्गासाठी कोणत्याही उपाय-योजना बाहेर पडल्या नाहीत. मात्र जेव्हा गरीब-कष्टकरींसाठी करोडोंचे आर्थिक पॅकेज जाहिर करणे भाग पडले, तेव्हा प्रधानमंत्री मोदीसाहेब बाजूला सारले गेलेत व सोवळे नेसणारे जावडेकर आणी निर्मला सितारामण यांना पुढे करून पॅकेज जाहीर करण्यात आले. आता यावर आमचे भोळे-भाबडे भक्तगण लगेच आक्षेप घेतील व वेगवेगळे मुद्दे मांडून ‘शासकीय ब्राह्मण्यवादाला’ सावरण्याचा प्रयत्न करतील. मुद्दे संपलेत की शिव्यांवरही येतील! आता भक्तांचे संभाव्य मुद्दे कोणते असतील? पहिला मुद्दा- ‘आर्थिक पॅकेज अर्थ मंत्रालयाच्या अधीन असते व म्हणून ते अर्थमंत्री सितारमण यांनी जाहीर केले.’ आता हा तसा बालीश मुद्दा आहे. जर अर्थमंत्रालयच आर्थिक घोषणा करते, असे म्हटले तर, नोटबंदीची घोषणा एकट्या मोदीजींनी का केली? भक्तांचा संभाव्य दुसरा मुद्दा- ‘तुम्ही स्वतःच म्हणत आहेत की, नोटबंदीसारखी आर्थिक घोषणा मोदीजींनी केली, तर मग आता करोना-पॅकेजच्या वेळेसच तुम्हाला ‘सोवळे-ओवळे’चा भेदभाव कसा आठवला?’ हा भक्तांचा मुद्दा हास्यास्पद नाही, गुंतागुंतीचा व गंभीर आहे. तो कसा, ते समजून घेऊ या!
-3-
वर्गीय समाजात नोटबंदीसारख्या धोरणात्मक उपाय-योजना या देशाच्या व्यापक हितासाठी असतात. परंतू ‘वर्गीय’ समाजात देशाचे व्यापक हित साधणार्‍या योजना ‘जात-वर्ग’ समाजात देशाच्या व्यापक हिताच्या सिद्ध होत नाहीत, हे या देशाच्या इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. खाऊजाचे आर्थिक धोरण असो की क्रिमी (आर्थिक) लेयर वगळण्याचे जातीय धोरण असो, ते उच्चजात-वर्गीयांच्या हिताचे व कष्टकरी जातींच्या नुकसानीचेच सिद्ध होते. ‘संघ-RSS जातीभेद पाळत नाही’ हे लहाणपणीच्या शाखांमध्ये बिंबवले गेलेले महान सुभाषित ज्यांनी आपल्या मेंदूवर कोरून घेतलेले आहे, अशाच कट्टर ‘अ-जातवादी’ शूद्रांना प्रधानमंत्री, राष्ट्रपती वगैरे पदांवर बसविले जाते. एखाद्या शूद्र व्यक्तीला ‘‘कट्टर अजातवादी’’ बनविणे म्हणजे त्याला कट्टर ‘अ-फुलेवादी’ बनवीणे. म्हणजे त्याची जात नष्ट न करता ती लपवून कार्यरत ठेवणे. अशी कट्टर ‘अ-फुलेवादी’ शूद्र व्यक्तीच उघडपणे वा अप्रत्यक्षपणे तन-मन-धनाने ब्राह्मणांची सेवा करीत असते. ब्राह्मणांची सेवा करणे म्हणजे केवळ ब्राह्मणांचे हित करणे नव्हे तर, शूद्रांचे नुकसान करणे म्हणजेच ब्राह्मणांची सेवा करणे होय! मोदीजी प्रधानमंत्री बनताच ओबीसींचे आरक्षण खतम करतात, म्हणजे ते ब्राह्मणांची सेवा करतात, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे महामहीम राष्ट्रपतींना ‘शूद्र’ म्हणून जगन्नाथांच्या मंदिरात धक्काबुक् झाली तरी तो देशाचा अपमान ठरत नाही, तर तो अतिशूद्र-लिखीत संविधानाचा अपमान ठरतो. संविधानाचा अपमान करणे म्हणजे मनुस्मृतीचा गौरव करणे, इतके साधे-सरळ व सोपे समिकरण आहे. अशी समिकरणे जुळवून आणायची असतील तर निवडक शूद्रादिअतिशूद्रांना कट्टर ‘अ-फुलेवादी’’ बनविले जाते व त्यांना मोक्याच्या (मार्‍याच्या नव्हे) जागांवर बसवून त्यांच्याकडून ‘धोरणात्मक’ ब्राह्मण-सेवा करवून घेतली जाते. नोटबंदीचा धोरणात्मक आर्थिक निर्णय हा ब्राह्मणी-जात-वर्गीयांच्या व्यापक हितासाठी व एस्सी+एस्टी+ओबीसींच्या भारताची अर्थव्यवस्था कोसळविण्यासाठी होता. म्हणूनच तो कट्टर अफुलेवादी मोदीसाहेबांच्या तोंडातून वदवून घेतला गेला.
कट्टर अ-फुलेवादी’ घडविण्याची योजना फक्त शूद्रादिअतिशूद्रांसाठीच राबविली जाते, ब्राह्मण व्यक्तीसाठी नाही. कारण ब्राह्मण हा जन्मतःच कट्टर ‘अ-फुलेवादी’ असतो. ब्राह्मण व्यक्ति कितीही क्रांतीकारक असली तरी ‘फुलेवादी’ होऊ शकत नाही. ब्राह्मण व्यक्ति कम्युनिस्ट बनू शकते, नक्षलवादी बनू शकते, कट्टर राष्ट्रवादी बनू शकते वा कट्टर विद्रोहीसुद्धा बनू शकते, मात्र ‘फुलेवादी’ कधीच बनू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ असल्याने ती योजना बिनधास्तपणे फक्त शूद्रअतिशूद्रांसाठीच राबविली जाते.
करोना-संकटच काय जगबूडी आली तरी संघ-RSS आपले वैदिक-ब्राह्मणी धोरण कट्टरतेने पाळते, हेच यावरून सिद्ध होते. यापुढील चर्चा पुढच्या बहुजननामात! तोपर्यंत सर्वांना जयजोती, जयभीम, सत्य की जय हो.....!
(लेखनः 27-28 मार्च 20)

------- प्रा. श्रावण देवरे

Mobile  – 88 301 27 270

105 BahujanNama Karona 22March20 Lokmanthan


बहुजननामा-105
करोनाः संकट व उपाय
-1-
     करोनामुळे 12 मार्चपासूनचे पुढील सर्व दौरे व कार्यक्रम मी रद्द केले आहेत व आता घरात बसूनच ओबीसी जनगणना आंदोलन सुरू ठेवीत आहे. कार्यकर्त्याला सक्तीची विश्रांती अशीच केव्हा तरी मिळत असते. कार्यकर्त्याचे सक्तीने घरी बसणे, हा मित्र व नातेवाईकांसाठी विनोदाचा विषय असतो. गेल्या 3-4 दिवसांपासून फोनवर याच गमती-जमती सुरू आहेत. परवा एक जावई गमतीने फोनवर म्हणाले की, ‘करोनामुळे ओबीसी जनगणनाही रद्द करणार की पुढे ढकलणार?’ ते विनोदाने म्हणाले असले तरी तो माझ्यासाठी ‘गंभीर’ विषय बनला. करोनामुळे जर सर्वच जग ठप्प होत असेल तर राष्ट्रीय जनगणनेचा कार्यक्रमही पुढे ढकलला पाहिजे. कारण जनगणना करणारा कर्मचारी अथवा अधिकारी एक एप्रिलपासून घरोघरी फिरणार आहे, तो दिवसभरात अनेक घरांशी व लोकांशी संपर्कात येणार. जर तो या प्रक्रियेत कुठे तरी चूकून संक्रमित झाला तर तो ‘करोना-वाहक’ बनेल व संकट अधिक विध्वंसक बनेल. त्यामुळे जनगणनेचा कार्यक्रम ताबडतोब पुढे ढकलला पाहिजे.
मी अगदी सुरूवातीपासून घरी बसून आंदोलन करण्याचा सल्ला देत आहे. आता सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी घरी बसूनच आपले ‘ओबीसी जनगणना आंदोलन’ सुरू ठेवले पाहिजे. सोशल मिडियाचा भरपूर वापर करून ओबीसी जनगणनेचा मुद्दा तापवत ठेवा. आपल्या जवळच्या व दूरवरच्या नातेवाईकांना वारंवार फोन करा व घराच्या दरवाज्यावर ‘दोन बोर्ड’ लावण्याची आठवण करीत रहा. त्यांनाही असेच फोन करून जागृती करायला सांगा! हे बोर्ड छापीलच पाहिजेत असे काही नाही, साध्या A-4 साईजच्या कागदावर हाताने लिहूनच बोर्ड तयार करा व गोंद लावून दरवाज्यावर चिकटवा! हे दोन्ही बोर्ड अशा ठिकाणी चिकटवा की घरी आलेल्या प्रगणकाला दरवाज्यावरचे बेल-बटण दाबतांनाच तो बोर्ड दिसला पाहिजे. त्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टी सांगत बसण्याचा वेळ वाचेल. त्याच्याकडील जनगणनेच्या फॉर्ममध्ये रिमार्कच्या रकान्यात त्याने ‘बोर्डची व बोर्डवरील मॅटरची लेखी नोंद’ घेतली पाहिजे. ही लेखी नोंदच येत्या काही महिन्यात सरकारला धोरण बदलण्यास भाग पाडेल व ओबीसी कॅटेगिरीचा-जातीचा कॉलम जनगणनेच्या फॉर्ममध्ये सामील करील.
-2-
व्यापक संकटात सर्वात जास्त मार समाजातील दुर्बल घटकावरच पडत असतो. उच्चवर्ग व मध्यमवर्ग आपापल्या वस्त्या-वाड्यांमध्ये व कालन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात सुरक्षित असतात. मात्र तरीही शासकीय पातळीवरून त्यांचीच सर्वात जास्त काळजी घेतली जाते. पगारी सुट्ट्या व इतर सुविधांची रेलचेल असते. करोनाची निर्मिती कशी झाली व कोणी केली, यापेक्षा त्याचा फैलाव कोण करीत आहेत हा सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न आहे. देश-विदेशात राहणारा उच्च-मध्यम वर्ग हाच करोनाचा वाहक व प्रसारकही आहे. आहेत तेथेच थांबून संकटाचा मुकाबला करण्याऐवजी हे लोक भित्रे-भागूबाईसारखे स्वदेशात पळून येतात व त्यांना आणण्यासाठी शासन मोफत विमाने पाठविते. परंतू याच कारणामुळे आपण आपल्या देशातील निष्पाप जनतेलाही संकटात टाकत आहोत, याची जरासुद्धा खंत शासनाला व ऍब्रोडसना वाटत नाही. एरवी त्सुनामी वा युद्धासारख्या संकटात ते आपापल्या स्वदेशात परत आलेत तर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र संसर्गजन्य संकटाच्यावेळी स्वदेशी परतणे धोक्याचे आहे, हे तरी मान्य केले पाहिजे.
करोनासारख्या ‘सर्व-ग्रस्त’ संकटातही विषमव्यवस्था अधिक विषम वागते, याचाही अनुभव आपण पूर्वी घेतलेला आहे व आताही घेत आहोतच! भरपगारी सुट्ट्या घेऊन लोकांना घरात बसण्यास सांगत आहेत. पगारी सुट्ट्या घेणारा हा उच्चभ्रू वर्ग आहे तरी किती टक्के? 5-10 टक्के म्हणजे मूठभरच ना? मग ज्या करोडो लोकांना पगारच नाही व हातावरच पोट भरावे लागते, त्यांना बायको-पोरांसह घरी बसून उपाशी मरणे काय आणी करोनाला खेटत रोजी-रोटीसाठी मरणे काय? सारखेच आहे. देशात संकट आणले आहे मूठभर उच्चभ्रूंनी, मात्र सर्वात जास्त भोगतो आहे तो बहुसंख्य असंघटित कष्टकरी! सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री व खूद्द प्रधानमंत्री यांच्या बोलण्यातून व कृतीतून या असंघटित कष्टकर्‍यांबद्दल एकही उपाययोजना नाही. अपवाद मात्र केरळच्या कम्युनिस्ट राज्यसरकारचा आहे. अशावेळी खरेच खात्री पटते की मार्क्सवाद म्हणजेच मानवतावाद व मानवतावाद म्हणजेच मार्क्सवाद!
जीवनदानी कम्युनिस्ट कार्यकर्ते कॉ. राजन क्षिरसागर हे असंघटित कष्टकर्‍यांसाठी काम करतात. त्यांनी भारत सरकारला पत्र लिहून धोरणकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन भरले आहे. त्या पत्रातील काही उपाययोजना येथे मी येथे माहितीस्तव देत आहे.
१. राज्यातील सर्व माथाडी मंडळामार्फत सर्व हमाल माथाडी कामगारांना सॅनिटेशन किट, मास्क आणि आवश्यक साधने आणि एक महिन्याचे आगाऊ वेतन (खावटी) तत्काळ उपलब्ध करा. त्या साठी माथाडी मंडळांचा निधी वापरा गरज भासल्यास आगाऊ लेव्ही मध्ये 5% वाढ करून आगाऊ वसुली करा. याच प्रमाणे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांना त्यांच्याकडे प्रत्यक्ष हमाली करणाऱ्या कामगारांना याच सुविधा देण्याचे आदेश जारी करा.
२. अशाच प्रकारे बांधकाम व इमारत महामंडळाकडून उपाय योजना करा उपलब्ध निधीतून रु 10,000/- तात्काळ कामगारांच्या खात्यावर अदा करा.
3. अनेक कारखाने व उद्योग बंद झाल्याने मराठवाड्यातील स्थलांतरित मजूर गावाकडे मोठ्या प्रमाणावर परतले आहेत त्यांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर ग्रामीण मजुरांना तात्काळ रोहयो कामे उपलब्ध करा कामाची मागणी नोंदविण्यासाठी मोबाईल अँप व दूरसंचार तंत्रज्ञान या आधारे प्रत्यक्ष गर्दी टाळून तशाच प्रकारची बांधबंदिस्ती, व अन्य जल संधारण कामे हाती घ्या. प्रत्येक जॉबकार्ड धारकास रु रु 10,000/- खावटी द्या. सर्व कामगार व सर्व ग्रामीण जनतेस रेशनवर मोफत 35 किलो धान्य द्या
४. परित्यक्ता महिला, अपंग व निराधार आणि वृध्द व्यक्ती या सर्वांना अशाच प्रकारच्या मदतीसाठी सर्व वित्तसंस्था देशी विदेशी कंपन्यांचा CSR निधी आणि राज्य शासनाचा निधी याची सांगड घाला.
५. सर्व खाजगी फायनान्स कंपन्या यांना कर्ज वसुली स्थगित करण्याचे आदेश जारी करा
-3-
     अशा व आणखी काही उपाययोजना आखून देशातील या नव-निर्मिक वर्गाला सहारा दिला पाहिजे. परंतू त्या दिशेने काहीही होतांना दिसत नाही. काम नाही व खायलाही नाही, म्हणून शेकडो कोस दूर असलेल्या आपापल्या प्रांतात परत जाणारे हे कष्टकरी लोक रेल्वे व बस-स्टॅण्डवर प्रचंड गर्दी करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री व पायलीचे पंधरा सिलिब्रिटिज आपल्या तोंडाची वाफ दवडत ‘जनता कर्फ्यु’ लागू करण्याच्या वायफळ गोष्टी करीत आहेत. जनतेने खरोखर स्वयंस्फुर्तीने घरात बंदिस्त व्हावे, असे वाटत असेल तर-
1)     ज्याप्रमाणे महापुराच्या संकट काळात हेलिकॉप्टरने फुड पॅकेट्स दिले जातात, त्याप्रमाणे असंघटित वस्त्यांमध्ये सकाळ-संध्याकाळ सकस फुड पॅकेट्स पुरविल्या पाहिजेत.
2)     दारिद्र्य रेषेखालील कार्ड असलेल्या कष्टकर्‍यांच्या बँक अकाऊंटमध्ये किमान वेतन इतकी रक्कम रोज जमा केली पाहिजे.
3)     असंघटित कष्टकरींच्या वस्त्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी खास केंद्र सुरू केले पाहिजेत व तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली पाहिजे.
या व यासारख्या काही उपाय-योजना करून जनता कर्फ्यु प्रत्यक्षात अमलात आणू शकतो व करोनासकट त्याच्या कोवीड-19 ला आपण कायमचे हद्दपार करू शकतो.
  शासनाला असे शहाणपण सुचेल अशी अपेक्षा करू या! सर्वांना जयजोती, जयभीम, सत्य की जय हो.....! 

                               (लेखनः 21 मार्च 20)

------- प्रा. श्रावण देवरे

Mobile – 88 301 27 270
Blog ब्लॉग-लिंक
https://shrwandeore.blogspot.in/                   

Wednesday, March 18, 2020

104 BahujanNama Daridri 15March 20


बहुजननामा-104
बुद्धी-दरिद्री व कर्म-दरिद्री नेते
-1-
     ओबीसी जनगणना आंदोलन दिल्लीत पोहोचले आहे. महाराष्ट्रातील सामाजिक स्तरावर काम करणारे अनेक ओबीसी नेते दिल्लीत जाऊन धडक मारीत आहेत. हायकोर्टात ओबीसी जनगननेची पिटीशन दाखल करणार्‍या व बोर्ड लावा’ आंदोलन घरोघरी पोहोचविणार्‍या ऍडव्होकेट अंजली साळवे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे विलास काळे यांच्यासारख्या धडाकेबाज नेत्यांच्या नेतृत्वाखाली परवा दिल्लीच्या जंतरमंतरवर जबरदस्त धरणे आंदोलन सपन्न झाले.
बारा बलुतेदार महासंघाचे संस्थापक माननीय कल्याण दळे व नगरसेवक सतिश दरेकर यांच्या नेतृत्वाखाली एक मार्च रोजी पुणे-पिप्री आकुर्डी भागातील ग्रॅण्ड एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये पूर्ण दिवसभराची गोलमेज बैठक झाली. त्यात अनेक सामाजिक कृतीशिल, संघर्षशिल नेते, कार्यकर्ते व विचारवंत उपस्थित होते. बैठकीचे समन्वयक प्रताप गुरव होते. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. प्रल्हाद लूलेकर, भटके-विमुक्त जाती-जमातींवरच्या अभ्यासक-नेत्या एड. पल्लवी रेणके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रावण देवरे, मुस्लीम ओबीसी संघटनेचे संस्थापक शब्बीर अन्सारी, दशरथ राऊत, मानव कांबळे, बारा बलुतेदार महासंघ युवा प्रदेश अध्यक्ष विशाल जाधव, लिंगायत समाजाचे नेते बसवराज कणजे, तुकाराम माने, डॉ. एस.के. पोपळगट, अशोक तळवडकर, संदेश चव्हाण, सतिश कसबे, चंद्रकांत गवळी, डॉ. विजय माने, मोहम्मद खुर्शीद सिद्दीकी, लक्ष्मण हाके, सुप्रिया सोळंकूरे, डॉ. प्रिया राठोड, विवेक राऊत आदी उपस्थित होते. विदर्भात डॉ. बबन तायवाडे, सचिन राजूरकर व माजी आमदार बोपचे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जनगननेचे आंदोलन संदेश यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे. 23 मार्च रोजी दिल्लीला धडक देण्यासाठी हे सर्व सज्ज झालेले आहेत.
गेल्या तीन दिवसात औरंगाबाद, परभणी व नांदेडमध्ये ओबीस जनगननेसाठी एल्गार परिषदा व बैठका झाल्यात. दिल्ली युनिव्हर्सिटीचे डॉ. संदिप यादव, औरंगाबादचे अभ्यासू वक्ते प्रा. सुदाम चिंचाणे, पिछडा वर्ग संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष माननीय माचनवार सर, परभणीचे डॉ. सुनिल जाधव, प्रा. नागोराव पांचाळ, प्रा. नागोराव काळे सर अशा अनेक मान्यवरांनी परिश्रम घेऊन हे सर्व कार्यक्रम यशस्वी केलेत. या कार्यक्रमांच्या यशाने भारावून जाऊन अनेक नवे कार्यकर्ते पुढे येत आहेत व ओबीसी जनगणेसाठीच्या प्रचार सभांचे आयोजन करीत आहेत. त्यामुळे ‘‘बोर्ड लावा आंदोलन’’ गतिमान होत आहे. ठाणे जिल्ह्यातही बोर्ड लावा आंदोलन गावोगावी जाऊन करण्यात येत आहे. ठाण्याचे दत्ता प्रकाश पाटील, प्रकाश पाटील, अनिल भोईर यांचेही खोडोपाडी जाऊन बोर्ड लावा आंदोलन जोरात सुरू आहे.  कोणताही प्रस्थापित ओबीसी राजकीय नेता पुढे नसतांना व पाठीशीही नसतांना देश पातळीवर ओबीसी जनगननेचे आंदोलन केवळ ‘‘गल्ली-बोळातले’’ कार्यकर्ते यशस्वी करीत आहेत, हे या आंदोलनाचे क्रातिकारकत्व आहे. ओबीसी अभ्यासक चंद्रभान पाल यांनी माझ्या अनेक बहुजननामा लेखांकांचे हिंदीत भाषांतर करून ते उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या हिंदी पट्ट्यात ‘व्हायरल’ केले. त्यामुळे ‘ओबीसी जनगणनेवरील’ माझ्या मराठी पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीची मागणी होते आहे. 12 मार्चच्या नांदेड येथील कार्यक्रमात ओबीसी जनगणनेवरील तब्बल दोन तासांचे माझे व्याख्यान पिनड्रॉप सायलेंसमध्ये ऐकूण झाल्यावर श्रोत्यांनी माझ्या ओबीसी जनगणना पुस्तकाच्या 200 प्रती विकत घेतल्यात.
-2-
ओबीसी जनगननेचे कार्यक्रम अशा प्रकारे भव्य स्वरूपात सुरू असतांना राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. त्यांच्या पंटर लोकांकडून संयोजकांना निरोप येत आहेत, अमक्या साहेबांना कार्यक्रमाकाला बोलावले पाहिजे. तमक्या साहेबांचा तुमच्या कार्यक्रमात ओबीसी नेता म्हणून सत्कार केला पाहिजे, असे दडपण येत आहेत. परंतू संयोजक कार्यकर्ते निर्भिडपणे अशा दडपणांना भीख न घालता कार्यक्रम यशस्वी करीत आहेत. आमच्या एका कार्यकर्त्याने नेत्याच्या पंटरला सुनावले- ‘‘तुमच्या नेत्याचा पक्ष जर ओबीसी जनगणनेसाठी आंदोलन करीत नसेल तर कशासाठी हा नेता स्टेजवर बोलवायचा? फक्त भाषण ठोकण्यासाठी? या राजकीय ओबीसी नेत्यांनी आधी आपल्या पक्षाच्या प्रमुखासमोर भाषण करावे व पक्षप्रमुखाला-पक्षाध्यक्षाला आंदोलन करण्यासाठी भाग पाडावे. जर त्यांनी हे करून दाखविले तर आम्ही अशा राजकीय नेत्याला अवश्य आमच्या स्टेजवर बोलवू व त्याचा सत्कार करू.’’.
कॉंग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे
, भाजपाचे फडणवीस वगैरे पक्षप्रमुख ओबीसीवर भाषणे ठोकतात, मात्र पक्षातर्फे अधिकृतपणे आंदोलन करीत नाहीत व सत्तेत असतांना कृतीही करीत नाहीत. फडणवीस-पेशव्यांचे सरकार येऊ नये म्हणून पुरोगामी म्हणविणार्‍या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे शिवसेना-प्रणित सरकार आणले गेले. हे बहुजनांचे सरकार आहे, असेही म्हटले गेले. इकडे पक्षप्रमुख पवार-चव्हाण लोकांसमोर भाषणे करतांना फुले-शाहू-आंबेडकांच्या गप्पा करतात आणी तिकडे त्यांचेच अर्थमंत्री अजित पवार बजेटमध्ये ओबीसींच्या तोंडाला पाने पुसतात. अजित पवारांनी विधानसभेत बजेट सादर करण्यापूर्वी तो शरद पवार व अशोक चव्हाण साहेबांकडून मंजूर करून घेतला असेलच! यात कोणीही शंका घेउ शकत नाही. शरद पवारसाहेबांनी बजेटमध्ये फुले-आंबेडकरांच्या दलित-आदिवासी-ओबीसींना काय दिले?
1)   52% ओबीसींना (OBC + NT + VJNT +SBC ) 3 हजार करोड रूपये
2)   16% एससींना 9 हजार 668 कोटी रूपये
3)   08% एसटी  8 हजार 853 कोटी रूपये
हे धनवाटप कोणत्या आधारावर झाले? अर्थातच जातीयवादाच्या आधारावर झालेले आहे. ज्यांची जनगनना होते, त्या SC+ST कॅटिगिरींनाही तुम्ही त्यांच्या हक्काची रक्कम पूर्णपणे देत नाहीत, तर ज्या ओबीसींची जनगननाच होत नाही, त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम देण्याची ‘दानत’ पवार साहेबात येऊच शकत नाही. केवळ फुले-आंबेडकरांच्या गप्पा मारल्याने कुणी पुरोगामी होत नाहीत. SC+ST कॅटिगिरींची जनगणना होते, त्यामुळे त्यांना काही सन्माननीय रक्कम तरी मिळते. मात्र ओबीसींची जनगणनाच होत नाही, त्यामुळे तीन हजार कोटीची ‘भीख’ वाढून त्याला हिनवीले जाते. ओबीसींची लोकसंख्या ज्यात भटकेविमुक्त जाती-जमाती (NT-VJNT), बारा बलुतेदार व अलुतेदार जाती, विश्वकर्मा जाती, विशेष मागास जाती (SBC) अशा विविध जाती-जमाती येतात. या सर्वांची लोकसंख्या कितीही कमी करायची म्हटली तरी ती 50 टक्क्याच्या खाली जात नाही. त्यामुळे जेथे ओबीसींना 57,500 कोटी रुपये मिळाले पाहिजेत, तेथे त्यांना फक्त 3000 कोटी दिले जातात. आणी तरीही विधानसभेतील ओबीसी आमदारांना व ओबीसी मंत्र्यांना कसलीही लाजलज्जा नाही.

कॅटेगिरी
टक्केवारी
मिळाले पाहिजेत
प्रत्यक्षात मिळालेत
किती कमी मिळालेत
किती टक्के लूट

दलित

16

19,167 कोटी

9,668 कोटी


9,499 कोटी

49 टक्के लूट
आदिवासी
08
9,583 कोटी
8,853 कोटी
730 कोटी
7.61 टक्के लूट
ओबीसी
52
57,500कोटी
3,000 कोटी
54,500कोटी
94.78 टक्के लूट



एकूण-
64,729 कोटी लूट
56.28 टक्के लूट


वरील तक्त्यात दलित, आदिवासी ओबीसींच्या हक्काची किती रक्कम या सरकारने लुटली आहे, याची कल्पना येते. ही जातीय लूट आहे. या लुटीवरच ब्राह्मण+क्षत्रिय (मराठा)+बनिया या उच्चजातीयांची ‘‘मौजमस्ती’’ चालते. यांचे साखर कारखाने, सूत गिरण्या दर दोन-चार वर्षात कागदोपत्री बुडतात, त्यामुळे मागील अब्जावधी रूपयांचे कर्ज माफ होते व पुन्हा नव्याने हजारो कोटी रुपयांचे कर्जही मिळते. हीच बाब खाजगी व सहकारी बँकांची, खाजगी उद्योगांची! मल्ल्यांसारखे किमान 25 हजार खोटे उद्योजक बँकांवर दरोडे टाकून परदेशात पसार झालेले आहेत. या लूटीतील काही रक्कम निवडणूकांमध्ये मुक्त हस्ते उधळली जाते, पुन्हा तेच लुटेरे निवडून येतात व आलटून-पालटून सत्तेवर येत राहतात. दलित+आदवासी+ओबीसी भिकारीच राहतो.
-3-
या आशयाची पोस्ट मी परवाच फेसबुकवर टाकली आणि आमच्या दोन ‘विचार-दरिद्री’ बहुजनांनी ती वेगळ्याच दिशेने भरकटवली. SC, ST OBC यांना मिळणार्‍या रकमेची मी तुलना केली तर ते लगेच कमेंट करतात की, ‘दलितांना मिळणार्‍या रकमेवर तुम्ही चिडतात.’ अशी कमेंट करणारी एक व्यक्ती न्यायधिश होती, असे सांगीतले तर तुमचा विश्वासच बसणार नाही. आणी ही न्यायधिश व्यक्ती दलित-बौद्ध होती, असे सांगीतले तर लोक मला खोट्यातच काढतील. पण हे नाइलाजाने सत्य आहे! दुसरे एक ओबीसी नेते चौधरी म्हणतात, ‘वंचितांशी तुलना करण्याऐवजी संचितांशी केली पाहिजे.’ आता या चौधरींना एवढे तरी किमान समजले पाहिजे की विषय ओबीसी जनगननेचा आहे. ओबीसींना जनगणनेचे महत्व पटवून द्यायचे असेल तर, तुलना अशाच कॅटेगिरीशी करावी लागेल, ज्यांची जनगणना होते. दलित+आदिवासींची जनगणना होते, म्हणून त्यांना सरकारी तिजोरीतून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ‘सन्माननीय’ वाटा मिळतो. ओबीसींची जनगननाच होत नसल्याने त्यांना फक्त ‘भीख’ मिळते. जर दलित+आदिवासींप्रमाणेच ओबीसींचीही जनगणना झाली तर ओबीसींनाही आपल्या विकासासाठी सरकारी तिजोरीतुन सन्माननीय रक्कम मिळेल. या मांडणीतून असा संदेश ओबीसींना दिला जातो. चौधरी सांगतात त्याप्रमाणे संचितांशी म्हणजे ब्राह्मण+क्षत्रिय मराठा+बनियांशी तुलना केली तर, ओबीसींना काय संदेश जाईल? ‘‘ब्राह्मण+बनिया+क्षत्रिय मराठा वगैरे उच्च जातींची जनगनना होत नाही, तरीही त्यांचा विकास होतो व ते सत्ताधारी होतात, त्यामुळे ओबीसी जातींनी जनगणना करण्याच्या भानगडीत पडू नये’’, असाच उफराटा संदेश ओबीसींना जाईल. बुद्धीने दरिद्री असलेले असेच आणखीन दोन-चार नेते ओबीसींना मिळालेत तर ओबीसींचा पूर्ण सत्यानाश व्हायला एक मिनिटही लागणार नाही.
अर्थात, ओबीसी जाती आता थोड्यातरी प्रमाणात हुशार झालेल्या आहेत. त्यामुळे अशा बुद्धी-दरिद्री व कर्म-दरिद्री नेत्यांची बडबड ते ऐकूण घेत नाहीत. असो....आपण आपले ओबीसी जनगणना अभियान असेच जोरात सुरू ठेवू या व पुढील बहुजननामांमध्ये असेच भेटत राहू या!   
सर्वांना जयजोती, जयभीम, सत्य की जय हो.....! 

                               (लेखनः 14 मार्च 20)

------- प्रा. श्रावण देवरे

Mobile – 88 301 27 270
Blog ब्लॉग-लिंक
https://shrwandeore.blogspot.in/