http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, December 26, 2020

136 BahujanNama Farmer 27Dec20 Daily Lokmanthan

बहुजननामा-136 ************** प्रा. श्रावण देवरे किसान आंदोलन व फुलेशाहूआंबेडकर!! -1- गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. बर्‍याच दिवसांपासून बहुजननामाचे वाचक मला या विषयावर लिहीण्याचा आग्रह करीत आहेत. परंतू जात्यंत+वर्गांत+स्त्रीदास्यअंताच्या लढ्यात कधीकधी काही काळासाठी जात्यंतचे लढे प्राधान्याने पुढ्यात येऊन ठाकतात तर कधी वर्गांताचे लढे! स्त्रीदास्यांताचे लढे फारच दुर्मिळ! आज महाराष्ट्रात अखिल भारतीय क्षत्रिय जातींच्या ओबीसीकरणाची नांदी ठरणारे मराठा आरक्षण जात्यंताच्या लढ्यातील एक महत्वपूर्ण ‘लढाई’ म्हणून पुढ्यात येऊन ठाकली असतांना, मी माझे लक्ष शेतकरी आंदेलनाकडे डायव्हर्ट करावं, हे मला पटत नव्हतं. आणी म्हणूनच मी या आंदोलनावर लिहीणं टाळत होतो. एक ना धड, भाराभर चिंध्या किंवा जॅक ऑफ ऑल आणी मास्टर ऑफ नथिंग, असा आमचा पिंड नाही. ‘‘जॅक ऑफ ऑल आणी मास्टर ऑफ ऑल’’ असण्यासाठी महापुरूषच असावे लागते! महापुरूष एकाचवेळी अनेक क्षेत्रात विविध पातळ्यांवर लढतात व यशस्वीही होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रस्त्यावरची लढाई डोकं फुटेपर्यंत लढत होते, त्याचवेळी ते मुकनायकाच्या कार्यालयात बसून ‘संपादकीय’ लिहित होते व त्याचवेळी ते लंडनच्या गोलमेज परिषदेत जाऊन गांधींसारख्या बलाढ्य शत्रूशीही लढत होते. लेखक, इतिहास-संशोधक, वकील, पत्रकार, आंदोलक, पक्ष-संस्थापक, आमदार, मंत्री, विचारक, तत्वज्ञानी, अर्थतज्ञ, घटनातज्ञ व घटनेचे शिल्पकारही त्यासोबतच कुटुंबात नवरा, बाप यासारख्या असंख्य जबाबदार्‍या लिलया पेलत जीवन जगणारे बाबासाहेब त्यामुळेच युगपुरूष ठरतात. त्यांच्या जीवनसंघर्षातील कुठले तरी एक क्षेत्र निवडावे आणी त्यातच गाडून घेऊन काम करीत राहावे, हे खर्‍या अनुयायाचे काम असते.
आदिवासी चळवळ व दलित चळवळीतून प्रशिक्षण घेऊन आम्ही विद्यार्थी दशेतच ओबीसी चळवळीत आलोत व आजतागायत 35 वर्षांच्या जीवन-काळात त्याच ओबीसी चळवळीत गाडून घेत संघर्षरत राहीलो आहोत. अनेक राजकीय पक्षांचे निवडणूकीचे प्रस्ताव ठोकरलेत, अमक्या तमक्या साहेबांशी जुळवून घेतले तर, तुमच्या अक्कल-हुशारीचे ‘चीज’ होईल, फलाण्या-वलाण्या नेत्याची ‘भेट’ घालून देतो, फायद्यात राहाल! अशा अनेक अमिषांवर मात करीत आम्ही जेथे होतो, तेथेच राहून संघर्षरत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे! या विश्वासार्हतेपोटी आमच्या अनेक बहुजननामाच्या वाचकांना वाटते की, आम्ही शेतकरी आंदोलनावरही मार्गदर्शक असा बहुजनानामा लिहावा! -2- भारतातील कोणताही वर्गलढा वा वर्ग-संघटन हे जातीपासून मुक्त राहू शकत नाही. पॉझिटिव्ह मार्गाने तुम्ही या वर्ग-लढ्याचा ‘जात-संबंध’ स्वीकारला नाही, तर तो ‘जात-संबंध’ निगेटिव्ह बनून मागाच्या दाराने चळवळीत घुसतो व तुमचा वर्गलढा-वर्गसंघटन उध्वस्त करतो. वाईस-व्हर्सा हाच सिद्धांत दुसर्‍या बाजूने हेच सांगतो की, जर तुमचे जात्यंतक-संघटन व जात्यंतक लढा ‘वर्ग-संबंधां’पासुन लांब राहात असेल, तर तो निगेटिव्ह बनून तुमच्यात मागच्या दाराने घुसतो व तुमची जात्यंतक चळवळ उध्वस्त करतो. हा सिध्दांत पॉझिटिव्ह अर्थाने फुले+शाहू+आंबेडकर जगलेत, लढलेत व यशस्वी झालेत! स्त्री-शिक्षणाचा पुरूषी सत्तेविरुध्दचा लढा, शेतकर्‍यांचा सावकारशाहीविरुध्दचा लढा व कामगारांचा भांडवलशाहीविरुध्दचा लढा यांचा संबंध तात्यासाहेबांनी व त्यांच्या भालेकर-लोखंडे शिष्यांनी उघडपणे जातीनिर्मुलनाशी जोडला. त्यावर प्रतिक्रिया म्हणून खोत टिळाकांनी सांगीतले की, स्त्रीयांना शाळेत आदर्श गृहिणीचे शिक्षण दिले पाहिजे व कामगार संघटना जातींचे ‘आदर्श गिल्ड’ बनले पाहिजेत. त्यावर कडी म्हणून 1894 साली न्या. रानडे जातीचा आर्थिक सिद्धांत मांडतात की, ‘‘ब्राह्मण वर्चस्वाच्या सामंती जातीव्यवस्थेतील ‘उधळ्या’ क्षत्रिय जातींची जागा, उगवत्या भांडवली अर्थव्यवस्थेत ‘काटकसरी’ वैश्य जाती घेतील व सत्ताधारी जात+वर्गाचे नवे समिकरण ब्राह्ण+वैश्य बनतील.’’ जमिनीवरचे मैदानी लढे योग्य तत्वज्ञान व अचूक धोरणांनी युक्त असतील तर आपला शत्रू ते लढे तत्वज्ञानाच्या पातळीवर कसे नेतो व कसे लढतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. ‘जात+वर्ग+स्त्रीदास्यांताचे तत्वज्ञान ढोबळ स्वरूपात मांडून तात्यासाहेब महात्मा फुले व त्यांचे भालेकर-लोखंडेंसारखे शिष्य प्रत्यक्षात जगलेत. त्यानंतर या सिद्धांतांना अधिक सक्षम बनवित तात्यासाहेबांच्या मार्गावर शाहूराजे व बाबासाहेब आंबेडकर यांनी वाटचाल सुरू केली. शूद्रादिअतिशूद्रांना आरक्षण देतांना जातीचा निकष लावणारे शाहू राजे रशियाच्या ‘वर्गीय’ क्रांतीचे स्वागत करतात. जातीच्या आधारावर सामाजिक लढा देणारे बाबासाहेब, राजकारणात मात्र ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन करून वर्गांताच्या लढ्याशी असलेले नाते सिद्ध करतात. मात्र शूद्र-द्वेष्ट्या ब्राह्मणी कॉंग्रेसने व कामगार-द्वेष्ट्या साम्राज्यवादी इंग्रजांनी बाबासाहेबांना बळजबरीने शूद्ध जातीय राजकारणावर आणून उभे केले व बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील उगवता जात+वर्गलढा उध्वस्त केला. जात+वर्ग लढ्याचे क्रांतीकारक जीवन जगणारे 1944 पर्यंतचे बाबासाहेब व निव्वळ जातीलढ्यावर आलेले 1944 नंतरचे बाबासाहेब यांच्यात द्वंद निर्माण झाले व या द्वंदात प्रस्थापितांना फायदेशिर असलेले बाबासाहेब जिंकलेत. बाबासाहेबांचे सच्चे शिष्य असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी भुमिहिन शेतमजूरांचे देशव्यापी आंदोलन उभारून हा जात-वर्ग लढ्याचा संबंध पुनरूज्जीवीत करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला कारण तोपर्यंत जात-वर्गीय चळवळीत 1944 नंतरचे बाबासाहेब ठामपणे ‘आदर्श’ मानले गेले होते. त्यामुळे प्रस्थापितांची सरशी झाली. तात्यासाहेबांचे जात्यंतक वर्गलढे, शाहू महाराजांचे रशियन कामगार क्रांतीचे स्वागत व बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्ष या तीनही क्रांतीकारक घटना या देशातील दलित+ओबीसी+आदिवासी चळवळींनी कधीच स्वीकारल्या नाहीत. कम्युनिस्टांनी त्या स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण त्यांचा जन्मच मुळात या तीन क्रांतिकारक घटना दडपण्यासाठी झालेला आहे. कम्युनिस्टांनी उघडपणे टिळकांचा कामगार लढा ‘आदर्श’ मानला व रानडेंच्या जातीय अर्थशास्त्राप्रमाणे नव्या सत्तासमिकरणाचा संघ-आर.एस.एस.चा मार्ग खूला केला. -3- शेतकरी आंदोलन म्हटले की आमच्या लोकांना शरद जोशींची आठवण येते. शरद जोशींवर मी यापूर्वीही बरेच लिहीले आहे. जागतिक साम्राज्यवादी संस्थांनी शरद जोशींना भारतात शेतकरी नेते म्हणून ‘लॉंच’ केले, हे खरे
असले तरी भारतातील ब्राह्मणशाहीने त्यांना बिनविरोध कसे स्वीकारले, यावर फारशी चर्चा होत नाही. शरद जोशी लॉंच झालेत तो काळ मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीचाही होता, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या शेतकर्‍यांचे आंदोलन जोशीसाहेब उभे करणार होते, त्यात ओबीसी असलेल्या कुणबी-माळ्यांचे संख्यात्मक वर्चस्व होते व ते केव्हाही मंडल आयोग चळवळीत ‘उभे’ राहू शकतात, या भीतीपोटी शरद जोशींचा स्वीकार ‘एका अटीसह’ ब्राह्मणी सत्ताधार्‍यांनी त्वरीत केला. अट ही होती की शरद जोशींनी आरक्षणाला विरोध केला पाहिजे. ‘‘आरक्षण हे उष्ट्या पत्रावळीसाठी असलेले भांडण आहे’’ या जोशीबुवांच्या स्लोगणला भरपूर प्रसिद्धी दिली गेली. शरद जोशींच्या लॉंचिंगमागे दोन मुख्य उद्देश होते, डंकेल प्रस्तावाच्या खाऊजा धोरणाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांचे आंदोलन ‘वर्गीय’ होऊ नये व त्याचबरोबर मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर ‘जातीय’ होऊ नये. शरद जोशींमुळे शेतकर्‍यांचे आंदोलन हे केवळ ‘शेतकर्‍यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा’ या एकमेव ‘आर्थिक’ मुद्द्याभोवती फिरत ठेवले गेले. या पार्श्वभूमीचा विचार करता आजचे दिल्लीतले शेतकरी आंदोलन नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, याचा विचार केला पाहिजे. केवळ रिलायन्सच्या अंबानी-अडाणीवर बहिष्कार टाकल्याने बाकीचे उर्वरित बनिया-ब्राह्मण भांडवलदार ‘पुरोगामी’ ठरत नाहीत व केवळ मोदिंना शिव्या देऊन संघ-आर.एस.एस.ला पाठीशी घालता येत नाही. किमान महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकरी वारसा असलेल्यांनी तरी या दिशेने विचार करण्याची अपेक्षा होती. मात्र या सर्व वारसदारांनी 1944 पुर्वीचे बाबासाहेब ‘‘नाकारलेले’’ असल्याने त्यांच्याकडून ही अपेक्षा करणे मुर्खपणाचे ठरेल. शहानपणाच जेथे मुर्खपणाच्या नादी लागतो, तेथे नाईलाजाला ‘इलाज’ नसतोच! खर्‍या शहाणपणाचा ‘ईलाज’ सापडेपर्यंत सर्वांना जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!....... (लेखनः 26 डिसेंबर, प्रकाशनः 27डिसेंबर20, दै. लोकमंथन)  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/ Links for this article:- 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/12/136-bahujannama-farmer-27dec20-daily.html 2) https://shrwandeore.blogspot.com/2020/12/136-bahujannama-farmer-27dec20-daily.html

No comments:

Post a Comment