http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, March 31, 2019

64 BahujanNama Andhare 31March19 Lokmanthan


चौसष्ठावी खेप ......!     ( दै. लोकमंथन, रविवार  31 मार्च 2019 च्या अंकात प्रसिद्ध)
 बहुजननामा-64    
आठवले ते अंधारे व गायकवाड ते मातोंडकर....!
बहुजनांनो!,
निवडणूकीच्या धामधुमीत पुरोगामी चळवळीत काही व्यक्ती विशेष चर्चेत येत आहेत. त्यात माननीय आठवलेसाहेब, सुषमाताई अंधारे, प्रविणदादा गायकवाड यांच्या निमित्ताने काही महत्वाच्या मद्द्यांवर चर्चा करू या!
संभाव्य मंडल अमलबजावणीला गाडण्यासाठी संभाव्य बाबरी मस्जिद भंजनाचा कार्यक्रम ठरविला जात असतांना संघ-भाजपाने नव्वदिच्या दशकात ओबीसी-बहुजनांमधून अनेक नेत्यांची निर्मिती केली. उमा भारती, गोपीनाथ मुंडे अशी अनेक नावे सांगता येतील. कल्याणसिंगांसारखे काही 2-3 ओबीसी नेते 1967 पासूनच जनसंघात होते. मात्र त्यांना हिंदुत्वाच्या आडून ‘ओबीसी नेते’ म्हणून फोकस करायची सुरूवात 85 नंतर झाली. जसेजसे मंडल आंदोलन पुढच्या टप्प्यावर जात होतं तसेतसे या नेत्यांचं ओबीसीकरण गर्द होत गेलं. वरचा मुलामा हिंदू असला तरी ओबीसी जातीतल्या या नेत्यांना फोकस करण्याचा एकमेव उद्देश ‘त्यांच्या ओबीसी जातींना मंडल वजी कमंडलच्या दिशेने वळविणे,’ हाच होता.
1992 ला बाबरी मशिद पाडून तिच्या ढिगार्‍याखाली काही अंशी मंडलचे अवशेष दफन करण्यात आले. त्यानंतर संघ-भाजपाच्या दृष्टिने या ओबीसी नेत्यांचं अवतार-कार्य संपलेलं होतं. लालू-मुलायमच्या प्रभावी ओबीसी राजकारणाच्या प्रभावात संघी-भाजपाई ओबीसी नेत्यांना ‘नेता म्हणून कन्टिन्यु’ करणं तारेवरची कसरत होत. त्यामुळे बहुतेक सर्वच ओबीसी नेत्यांचं नेतेपद नियंत्रित व प्रभावहिन करण्यात आलं. मेव्हणे प्रमोद महाजनांच्या मुळे गोपीनाथजींना प्रदिर्घ काळ मिळाला, परंतू नंतर काय झालं ते मी सांगण्याची गरज नाही. जे जे ओबीसी नेते संघाच्या वैचारिक प्रभावातून निर्माण झालेत त्यांना जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक प्रभावहीन करण्यात आले. 2010-11 च्या दरम्यान ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर ‘खरेखुरे’ ओबीसी नेते बनण्याच्या प्रयत्नात काही जेलमध्ये गेलेत, काही अपघातात तर काही दवाखान्यातूनच परस्पर वर गेलेत.
एकमात्र मोदी आहेत की ज्यांना जीवदान देण्यात आलं. अर्थात त्यांना संपविण्याचे अनेक प्रयत्न झालेत. परंतू मोदींच्या त्यांच्या स्वतःच्या काही अंगभूत गुणांमुळे ते संघ-भाजपाला मात देत राहीलेत. पहिला गुण हा की, त्यांच्या तोडीचा फर्डा वक्ता संघ-भाजपात कोणीच नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा हा की त्यांनी स्वतःला ‘ओबीसी’ म्हणून डिक्लेयर करणं. मोदींच्या विरोधात राहूनही मोदींचा खुबीने वापर करण्यात संघ-भाजपा कुठेच मागे राहीले नाहीत. 2014 ला निर्णायकपणे जागृत झालेली ओबीसी व्होटबँक लुटण्यासाठी ‘टोळीचा सरदार’ म्हणून मोदींचा वापर केला गेला, जोडीला त्यांचे फर्डे वक्तेपण उपयोगी ठरलं! विशिष्ट हेतू ठेवून मानसं निर्माण करणं, त्यांचा वापर करणं व नंतर त्यांचे अवतार-कार्य संपवणं, ही सगळी कामे तेच करू शकतात, जे व्हिजन बाळगूण असतात व आपल्या ध्येयाशी प्रमाणिक असतात.
हे काम पुरोगामी म्हणविणार्‍या चळवळीत का होऊ शकत नाही, असा प्रश्न पडतो. कॉंग्रेस-भाजपासारख्या पक्षांना ब्राह्मण-क्षत्रिय व भांडवलदार जात-वर्गांकडून ‘रसद’ परविली जात असल्याने ते आपल्या जात-वर्ग ध्येयाशी अ-प्रामाणिक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र आमच्या पुरोगामी चळवळीतून निर्माण झालेले नेते अ-प्रमाणिक होऊन शत्रूपक्षाकडे कसे जातात, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. डाव्या-समाजवादी वगैरे पक्षांना त्यांच्या कामगार युनियन काही प्रमाणात रसद पुरवीतात. मात्र दलित, आदिवासी, ओबीसी कॅटेगिरीतील नेत्यांना व त्यांच्या पक्षांना रसद कोणी पुरवायची? आरक्षणामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनेक उद्देश होते, त्यापैकी हाही एक उद्देश होता. आरक्षणाचा फायदा घेऊन जे अधिकारी कर्मचारी बनतील त्यांनी आपल्या पगारातून किमान 5-10 टक्के रक्कम समाजकार्याला द्यावी, हे बाबासाहेबांचे सांगणे केवळ ‘जयंती-पुण्यतीथीच्या पावत्या फाडण्यापुरते मर्यादित नव्हते. मान्यवर कांशिराम साहेबांनी अशा कर्मचार्‍यांचे संघटन करून त्यातून बहुजन समाज पक्षाची उभारणी यशस्वीपणे केली. जे रिपब्लिकन नेत्यांच्या बाबतीत होऊ शकले नाही. त्यामुळे अशा दलित नेत्यांना रसद पुरवीण्याचे काम कॉंग्रेसी सरंजामदारांनी व भाजपाई कलम-कसायांनी केले. त्यामुळे हे सर्व नेते त्यांच्या आश्रयाला गेले आहेत.
पँथर, नामांतर, रिडल्स  सारख्या चळवळी सर्वसामान्य जनतेने संघटित होऊन कराव्यात, त्यातून निर्माण झालेल्या नेत्यांना मध्यमवर्गीय कर्मचारी अधीकार्‍यांनी ‘रसद’ पुरवावी व त्यांचे राजकारण यशस्वी करावे, एवढे साधे-सोपे सूत्र होते. आरक्षणाच्या माध्यमातून अनेक अधिकारी गडगंज श्रीमंत झालेत, मात्र त्यासोबत त्यांनी आठवलेसाहेब, कवाडेसाहेब आदि नेत्यांना राजकारणासाठी आवश्यक असलेली साधन-सामुग्री पुरवीली असती तर, हे नेते कॉंग्रेस-भाजपाच्या आश्रयाला गेले नसते.
नेते आसमंतातून टपकत नाहीत. त्यांच्या काही अंगभूत गुणांमुळे व चळवळीमुळे ते घडतात. त्यांना टिकवून ठेवणे गरजेचे असते. परंतू असे होत नाही. काही चुकीचे गृहितके आमचे डोक्यात असतात. सुषमाताई अंधारे यांच्याबाबतही असेच काहीतरी घडले. त्यांच्याकडे उपजतच उत्कृष्ट वक्त्याचा गुण आहे. अभ्यास करून बोलणे, ठासून मांडणे, कोणत्याही दहशतीला भीख न घालता घणाघाती आरोप करणं हा त्यांचा विशेष गुण आहे. मात्र आपण त्यांच्या या गुणाची कदर न करता त्यांच्या मानधनावरच बोलत राहीलो. कार्यक्रमाच्या ‘डी.जे. वरील व अवांतर ‘‘खाण्या-पिण्या’’वरील अनावश्यक खर्चावर कधीच चर्चा होत नाही. मात्र वक्त्याच्या मानधनावर जमके चर्चा होते. जर सुषमाताई राखीव जागेचा फायदा घेऊन एखाद्या सरकारी पदावर असत्या तर त्यांनी एवढं मानधन घेतलच नसतं. आणी मग ‘सरकारी’ म्हणून त्या एवढ्या घणाघाती बोलूही शकल्या नसत्या. फुले-आंबेडकरी चळवळीचा कोणताही फायदा न घेता सुषमाताई जर आपले अंगभूत गुण, जीव धोक्यात घालून उत्स्फुर्तपणे समाजासाठी उधळत असतील, तर काय त्यांनी ते उपाशीपोटी उधळायचे का? दरम्यानच्या काळात त्यांना अनेक घटनांवरून व मानधनाच्या विषयांवरून मोठ्याप्रमाणात ‘ट्रोल’ करण्यात आलं. अशावेळी प्रतिगामी लोक पुढे येतात व आपणच तयार केलेली आपली माणसं हातोहात पळवतात. मानधन हा भीखेचा विषय नसून तो चळवळीच्या लढवैय्यांना रसद पुरविण्याचा विषय असतो, हे आपण कधीच लक्षात घेत नाही.
तशीच काहीसी गोष्ट घडते आहे प्रविण दादा गायकवाडांच्या बाबतीत! मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या सुरूवातीच्या पुरोगामी चळवळींतून जे काही 2-4 वैचारिक नेते पुढे आलेत, त्यात इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे प्रविण दादा गायकवाडांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ते स्वतः सरंजामदार असले तरी सरंजामदाराची कुठलीही ऐट त्यांच्यात दिसत नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आजही त्यांची ओळख कायम आहे. अभ्यापूर्ण मांडणी व मुद्देसूद बोलणे हे त्यांचे विशेष गुण म्हटले पाहिजेत. प्रवीण दादा मराठ्यांचे वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षात ते सहजपणे जाऊ शकले असते. मात्र पुरोगामी पींड असलेल्या दादाने शेकापसारखा फुले-शाहू-आंबेडकरवादी पक्ष निवडला. मात्र आज त्यांच्यावर कॉंग्रेसकडे तिकीट मागण्याची वेळ आलेली आहे. वास्तविक शेकाप ने महाआघाडीत सामील होतांना किमान एक जागा हक्काने मागून ती प्रवीण दादाला दिली असती तर, शेकापचंही पुरोगामी म्हणून चांगभलं झालं असतं. पण नाही. पुरोगामी वैचारिक लोकांना पुढे येऊ द्यायचे नाही, असे धोरण कॉंग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे शेकापचंही आहे की काय, अशी शंका येते. त्यातही नागडं-उघडं नाचणार्‍या सिलीब्रटीजसाठी पायघड्या अंथरणार्‍या कॉंग्रेसने प्रवीण दादा सारख्या वैचारिक नेत्याला तिकीट नाकारणं संशयास्पद आहे. राजकारणाची पतच एकूण घसरत चाललेली आहे. अशा वेळेस मराठा आरक्षणासारख्या चूकीच्या मागणीसाठी लाखोंचे मोर्चे काढणारे लोक आपल्यातील एका वैचारिक नेत्याला ‘मोरल रसद’ पुरवायला तयार नाही. सरंजामदार व त्यांचे मिसरूड न फुटलेली पोरं संसदेत जावेत म्हणून जीव काढणारा मराठा समाज, वैचारिक नेतृत्व म्हणून प्रवीण दादांना सपोर्ट करायला तयार नाही. अर्थात अशा घटना कमी-अधिक प्रमाणात सर्वच समाजात घडत असतात. पण लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत अशा काही ठळक घटना लक्ष वेधून घेतात. शेकापसारख्या पुरोगामी पक्षाला एकही जागा न देणारे पक्ष-कारभारी कोणतीही विचारसरणी नसलेल्या राजू शेट्टीसारख्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत.
विधान परिषद व राज्यसभा या केवळ विचारवंत, अभ्यासक, साहित्यिक यासारख्या विशेष व्यक्तींसाठी आहेत. मात्र तेथेही आता केवळ नाचणारे, खेळणारे सिलिब्रटीज जातात. मेटेंसारखे लोक या जागा अडवून ठेवत आहेत. विचारक, अभ्यासक वगैरे लोक निवडणूकीच्या राजकारणात वापरता येत नाहीत, उलट ते अडचणीचेच ठरतात. त्यामुळे ते सर्वच राज्यकर्त्यांना नकोसे झाले आहेत. याचा अपरिहार्य परिणाम आपण आज बघतो आहोत व भोगतही आहोत. हुकुमशाही हिटलरची असो की पेशव्यांची, तीच्या आगमनापूर्वी वैचारिकतेचा खून होत असतो, तो आज भारतात अगदी ठरवून, शांतपणे, नियोजनबद्ध पद्धतीने सर्वपक्षीय कार्यक्रम म्हणून राबविला जात आहे. या वैचारिक खून सत्राचे उद्घाटन 1978 साली जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांची मार्क्सवादी पक्षातून हकालपट्टी करून करण्यात आले. त्यानंतर सफ्दर हाश्मी, शंकर गुहा नियोगी, शहीद जगदेवप्रसाद कुशवाह, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशी ही रांग बरीच पुढे जाणार आहे.
हे लिहित असतांनाच मला दोन कार्यकर्त्या अभ्यासकांचे फोन आलेत. लिहीत असतांनाच माझ्या या लेखातले मुद्दे त्यांना कसे कळलेत माहीत नाही., मात्र ते याच मुद्यांवर माझ्याशी फोनवर बोलत होते. त्यात एक होते ऍड. संजय भाटे व दुसरे डॉ. लता प्र.म.! लता मला फोनवरून सांगत होत्या की, आप पक्षाच्या कार्यालयातून फोन आला. मला लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह करीत होते. मी त्यांना विचारले की, आत्ताच अचानक माझी आठवण तुम्हाला कशी आली? मी त्यांना नकार दिला. आमच्या दोघातील चर्चेचा निष्कर्ष असा आहे की, आपसारख्या संघटना व पक्ष अधूनमधून येतात व जातात. या पक्षांची निर्मिती पडद्याआडून संघ-भाजपा करीत असते पण अशा पक्षांचे पालन-पोषण समाजवादी करीत असतात. त्यांचा एकमेव उद्देश समाजातील विचारक व वलय प्राप्त झालेले कार्यकर्ते नेते संपविणे! प्रचंड वैचारिक क्षमता असलेल्या योगेंद्र यादवांपासून ते आक्रमक वलयांकीत मेधा पाटकरांपर्यंतचे अनेक छोटो-मोठे लोक यांनी पद्धतशीरपणे संपवलेत. सगळ्यांनाच गोळ्या घालून संपवता येत नाही. म्हणून हे राजकीय निवडणूकांचे जाळे पसरवीले जाते. आज जातीअंताची राजकीय वाट महामार्ग बनण्याच्या प्रयत्नात असतांना हे वलयांकीत अभ्यासक-विचारक लोक त्या वाटेवर गेलेत तर, आपलं साडेतीन टक्क्यांचं काय होईल हे सांगण्याची गरज नाही.
बहुजनांमध्ये लता मॅडम, संजय भाटेंसारख्या सतर्कता असलेल्यांची संख्या वाढत राहो, अशी अपेक्षा व्यक्त करून माझा जयभीम-जयजोती घ्या व  सत्य की जय हो’ चा नारा द्या!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com

Wednesday, March 27, 2019

63 BahuajanNama Road roller


 बहुजननामा-63    
-   - ते कॉंग्रेसला चिरडत आहेत,
     आपण संघ-भाजपाला चिरडू या!
बहुजनांनो!,
2019 ची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टिने ऐतिहासिक आहे, असे सगळेच पुरोगामी म्हणत आहेत. कोणाला संविधान खतरेमे वाटते तर कोणाला लोकशाही! किती मोठा धोका! मात्र तरीही ही निवडणूक ‘गंभीरपणेघेण्याचे काम फक्त प्रतिगामी पक्षच करीत आहेत. प्रतिगामी व प्रस्थापित पक्ष म्हणजे जे पक्ष ब्राह्मण-क्षत्रियांच्या मालकीचे आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्ष व भाजपा-सेना! हे एकमेकांचे शत्रूपक्ष या निवडणूकीत किती ‘सामंजस्य’ ठेवून वागत आहेत. कोणत्याही परिस्थितीत राजकीय सत्ता ही ब्राह्मण अथवा क्षत्रिय जातींच्या घराण्यांमध्येच राहीली पाहिजे, या एकमेव उद्देशाने पेटलेले हे सरंजामदार(मराठा) व कलम-कसाईखोर(ब्राह्मण) आपल्या घराण्यातील पोरंबाळं एकमेकांच्या पक्षात पाठवत आहे.
विरोधी बाकांवर बसूनही राष्ट्रवादीचे क्षत्रिय वतनदार फडणवीसांची पेशवाई पूर्ण 5 वर्षांपर्यंत टिकवून ठेवत आहेत. शत्रू पक्षात किती हे सामंजस्य!? युतीसरकारच्या सत्तेत सहभागी होऊनही पूर्ण 5 वर्षाच्या काळात शिवसेनेने मोदी व भाजपाला शिव्या देण्याची एकही संधी सोडली नाही. सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाच ‘विरोधी’ पक्षाची भुमिका वठवीत होती. आणी तरीही निवडणुकीच्या तोंडावर अचानक याच पक्षांची युती होते, जागा वाटपही होते व एकत्र प्रचारालाही लागतात. भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी या चारही पक्षांमध्ये कुठेही भांडण नाही, मतभेदही नाही. सगळे कसे एकदिलाने ‘गंभीरपणे’ निवडणुकांना सामोरे जात आहेत.
अशा सामंजस्याची अक्कल आम्हाला आमचा ‘फुले-आंबेडकरवाद’ का देत नाही? ब्राह्मण-मराठा-क्षत्रिय जातींचे पक्ष एकमेकांचे शत्रू असूनही निवडणूकीच्या काळात किती सामंजस्याने वागत आहेत? आपण का नाही वागू शकत? महाराष्ट्रात हा सामंझस्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. खैरलांजी अत्याचारकांड वा भीमा-कोरेगावची दंगल हे संघ-प्रायोजित कार्यक्रम असू शकतात. पण शत्रूने केलेल्या आक्रमणाला एक संधी समजून आपल्या समाजाला जागृत करणे, संघर्ष करणे, संघटन मजबूत करणे व त्यातून दलित राजकारण स्वतंत्रपणे उभे करणे, हे कार्य दलित नेत्यांना करता आले असते. मात्र एक बाळासाहेब प्रकाश आंबेडकर सोडलेत तर बाकीचे सर्व नेते आपपल्या मराठा-ब्राह्मण मालकांच्या छत्रछायेत मौजमस्तीत गुंग आहेत.
बाळासाहेब प्रकाश आंबेडकर गेल्या 10-12 वर्षात संघर्षातून दलित राजकारण उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कांशिराम साहेबांनीसुद्धा याच मार्गाने उत्तर प्रदेशात दलित राजकारण उभे केले. मात्र एका विशिष्ट टप्प्यावर त्यांना हे दलित राजकारण पुढे नेण्यासाठी आपल्या शत्रूपक्षाची मदत घ्यावीच लागली. ती मदत त्यांनी कधी कॉंग्रेसकडून घेतली तर कधी संघ-भाजप कडून! त्यासाठी त्यांना किंमतही चुकवावी लागली. भाजप-संघाच्या आदेशाने कांशिरामजींना ऑगस्ट-1990 मध्ये देवीलाल सोबत स्टेज शेअर करून मंडल आयोग अमलबजावणीला विरोधही करावा लागला. ज्या मंडल आयोगासाठी ते पूर्ण आयुष्यभर चळवळ करीत होते, त्याच मंडल आयोगाला विरोध करण्याची वेळ त्यांच्यावर आली. एक तडजोड म्हणून ती त्यांनी कली, त्याच्याबदल्यात त्यांना संघ-भाजपाची साथ मिळाली. संघ-भाजपाची साथ मिळाल्यानंतर त्यांनी संधीचे सोने केले, कॉंग्रेस राज्यातून हद्दपार केली व दलितांना सत्ताधारी केले. याच मार्गाने बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रात दलितांचे राजकारण उभे करीत आहेत. त्यात त्यांचं काय चुकलं? कॉंग्रेसची वोटबँक कापून भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी बाळासाहेब राजकारण करीत आहेत, असा अरोप खरा मानला तरी त्यात चुकीचं काय? याच कामाबद्दल कांशीरामसाहेबांना माफ, आणी बाळासाहेब आंबेडकर मात्र दोषी? हा कुठला न्याय? दलित आदिवासी ओबीसी जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तो पर्यंत आपल्याला स्वतंत्र राजकारण उभे करण्यासाठी दोन शत्रूंपैकी एका शत्रूची मदत घ्यावीच लागेल. ते अपरिहार्य आहे.

आता माझ्या या भुमिकेवर एक प्रश्न उभा राहू शकतो. दोन शत्रूंपैकी एका शत्रूशी दोस्ती करायची तर मग कॉंग्रेसशी का नाही, भाजपाशीच का? आपल्या मित्रांचं म्हणणं असे की, कॉंग्रेस ही ‘मऊ वीट’ आहे. भाजप ‘दगड’! दगडापेक्षा वीट मऊ म्हणून कॉंग्रेसशी दोस्ती करायची! हा जो अखिल भारतीय गैरसमज बहुजनांच्या डोक्यात भरविलेला आहे, तेही एक ब्राह्मणी षडयंत्र आहे. सर्वात जास्त दलित-मुस्लीमविरोधी दंगली कॉंग्रेसच्याच काळात झाल्यात, हे आपण सोयिस्करपणे विसरतो. संघ-भाजपच्या दृष्टिने राजकीय सत्ता दुय्यम आहे. या देशाचं जातीय धृवीकरण अधिकाधिक गतिमान करीत राहणे, ज्यामुळे ब्राह्मणी सत्ता टिकून राहते व मजबूतही राहते. दंगली पेटविणे वगैरे षडयंत्रे संघ-भाजपला कॉंग्रेस काळात करणे सोयीचे जाते, त्यामुळेच संघाची पहिली पसंद कॉंग्रेस आहे, भाजप नाही. भाजपा दोनवेळा केंद्रीय सत्तेत आला, परंतू त्याला रामंदिराची एकही वीट चढविता नाही आली. त्यासाठी संघाला दिल्लीत कॉंग्रेसचंच सरकार हव आहे. ‘‘कॉंग्रेस काळात बाबरी मस्जीद पाडली, कॉंग्रेस काळातच राममंदिर बांधू!’’ हे संघ-भाजपाचे धोरण आहे. 2019 ला कॉंग्रेस सत्तेत येईल, ते संविधान वाचविण्यासाठी नाही, तर राममंदिर बांधण्यासाठी! आणी त्यासाठी राहूल-प्रियंकाने जाणवे घालण्यापासून ते सोमनाथ मंदिरांच्या प्रदक्षिणा घालण्यापर्यंत व कुंभमेळ्याच्या गटारगंगेत डुबक्या मारण्यापर्यंतची रिहर्सल सुरू केलेली आहे.
ज्या दलित-ओबीसी नेत्यांना कॉंग्रेसशी दोस्ती हवी आहे, त्यांनी कॉंग्रेसकडून संविधान वाचवायचे कोणते आश्वासन मिळविलेलं आहे? एकतरी आश्वासन सांगा. राहूल गांधी, प्रियंका गांधी यांच्या एका तरी भाषणात असे आश्वासन आहे काय की, ‘‘ कॉंग्रेस सत्तेत आल्यावर भाजपा सरकारचे संविधानविरोधी सर्व निर्णय, कायदे व त्यांची झालेली अमलबजावणी मागील प्रभावाने रद्द करू. त्यासाठी घटना दुरूस्ती करून पुढील काळात असे संविधानविरोधी कायदे करण्याची शक्यताच नष्ट करू. म्हणजे भाजप सरकारच्या काळात 13 पॉईंट रोस्टर, समांतर आरक्षण, शून्य रिझर्वेशन प्रमाणे झालेली सवर्णजातींची नोकरभरती रद्द करण्यात येईल, राज्यघटनेतच दुरूस्ती करून प्लॅनिंग कमिशन, 200 पॉईंट रोस्टर, क्षत्रिय जातींची ओबीसीतील घुसखोरी रोखणे, जातनिहाय जनगणना वगैरे जातीअंताच्या कलमांना मूलभूत कायदा बनवू. यापैकी एक तरी आश्वासन कॉंग्रेस 2019 च्या निवडणूकात देत आहे काय? नाही. तर मग कॉंग्रेसशी दोस्ती कशासाठी? एकमात्र खरे की, कॉंग्रेसच्या काळात आक्रोश करण्याचे, ओरडण्याचे, भाषणे करण्याचे, मोर्चे काढण्याचे भरपूर स्वातंत्र्य मिळते. आणी केवळ तेवढ्यासाठी कॉंग्रेसशी दोस्ती करायची तर करा, मात्र त्यासाठी दलितांचे स्वतंत्र राजकारण उभे करण्याची संधी गमवावी, असे मला वाटत नाही.
समविचारींकडून प्रकाश आंबेडकरांवर असाही आरोप होतो की, ते आम्हाला सोबत घेत नाहीत. कसे घेतील सोबत तुम्हाला? बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी ज्या शत्रूपक्षाशी करार करून ते दलितांचे स्वतंत्र राजकारण’ उभे करीत आहेत, त्या शत्रूपक्षाच्याही काही अटी असतीलच ना? कॉंग्रेसला उघडपणे बाळासाहेब आंबेडकरांशी आघाडी करावीशी वाटते व भाजपाला गुप्तपणे बाळासाहेबांशीच अप्रत्यक्ष युती करावीशी वाटते, यातच बाळासाहेबांचे दलित चळवळीतील राजकीय वर्चस्व सिद्ध होते. गणराज्य मंच, बामसेफ वगैरेंशी तर कॉंग्रेसही युती करीत नाही. कॉंग्रेस तुमच्याशी बोलणीही करीत नाही, तर जागावाटप वगैरेचा प्रश्नच येत नाही. कोणत्याही अटी नाहीत, कोणतेही आश्वासन नाही, जाहीरनाम्यात कोणत्याही जात्यंताची कलमे नाहीत, आणी तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दारात का म्हणून जाऊन बसावे? जर कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षच तुमच्या दारात येऊन बसला, तरची गोष्ट वेगळी!
राहीला प्रश्न आता ‘पुन्हा संघ-भाजप’ सत्तेवर येण्याचा! वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेसची वोटबँक कापली जाईल व भाजप सत्तेत येईल, असे आपले जर म्हणणे आहे तर, मग तुम्ही तुमच्या दलित-पक्षाकडून उमेदवार उभे करून वेगळे काय करीत आहात? तुम्ही कॉंग्रेसचीच दलित वोटबँक कापणार व भाजपाला निवडून देण्याचा प्रयत्न करणार. परंतू जर तुम्ही भाजपची पक्की असलेली ओबीसी वोटबँक कापण्यासाठी आम्हाला मदत केली तर, तुम्ही खरे संघ-भाजपाविरोधी ठराल. पण तुम्ही सर्व आंबेडकरवादी मराठा आरक्षणाला बिनशर्त पाठींबा देऊन ‘ओबीसी’ कॅटेगिरीच नष्ट करायला निघाले आहात. मराठा आरक्षणाच्या संकटाला एक संधी समजून आम्ही ओबीसींचे स्वतंत्र राजकारण उभे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओबीसी जातींना ‘‘ओबीसी’’ म्हणून त्यांची स्वतंत्र राजकीय शक्ती उभी करणे, म्हणजेच संघ-भाजपाचा परस्पर नायनाट होणे, हे फुले-आंबेडकरी सूत्र तुम्ही सोयिस्करपणे विसरले आहात. ओबीसींची स्वतंत्र राजकीय आघाडी उभी राहीली तर भाजपाला धोका होईल, त्यामुळे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आम्हा ओबीसी नेत्यांना मदत करू शकत नाहीत, हे आम्ही समजू शकतो. त्याबद्दल आम्ही त्यांना दोष देणार नाहीत. बाळासाहेब किमान दलित राजकारणाची भक्कम उभारणी करीत आहेत, त्याबद्दल आम्ही प्रचंड आनंदी आहोत. आनंद यासाठी की, दलितांची भक्कम अशी राजकीय उभारणी यशस्वी झाली, तर त्यांचे अनुकरण करून आमचे ओबीसीही आपले स्वतःचे राजकारण उभे करतील, ही आमची रास्त अपेक्षा आहे.
ज्यावेळी उत्तर प्रदेशात कांशिरामजी संघ-भाजपाची मदत घेऊन कॉंग्रेसला खतम करीत होते, त्याचवेळेस मुलायम-लालूजी ओबीसींचे स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करून भाजपाला खतम करण्याचे काम करीत होते. उशिरा का होईना, हेच काम आता आपल्याला महाराष्ट्रात करायचे आहे. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर जर भाजपची मदत घेऊन कॉंग्रेस खतम करत असतील तर, त्यांना शूभेच्छा देऊन आपण बाकीच्यांनीही संघ-भाजपाला खतम करण्याचे काम सुरू करू या! संघ-भाजपाला खतम करणे फार सोपे आहे. आम्ही हे काम खूप आधीपासुनच सुरू केले आहे. भाजपाची वोटबँक ना दलित आहे ना मुसलमान! भाजपाची एकमेव निर्णायक वोटबँक आहे फक्त ओबीसी! या ओबीसींचे ‘ओबीसी’ म्हणून स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले, की संघ-भाजपा खतम’ होण्याची प्रक्रिया सुरू होते. ओबीसी हे संघ-भाजपाचे केवळ मतदार नाहीत, तर ते संघाच्या सांस्कृतिक दहशतवादाचे सैनिकही आहेत. अशा ओबीसींना आम्ही सामाजिक व सांस्कृतिक ‘भान’ देण्याचे काम गेल्या 35 वर्षांपासून करीत आहोत. आणी आता या ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष निर्माण करून संघ-भाजपाचा राजकीय आधारच काढून घेत आहोत. आझाद बहुजन पक्षाच्या निवडणूक चिन्हावर (रोड रोलर) आम्ही ओबीसी म्हणून 2019ची लोकसभा निवडणूक लढत आहोत. सर्व दलित पक्ष-संघटना व बामसेफ निर्मित सर्व राजकीय पक्षांनी आमच्या ओबीसी उमेदवारांना उघडपणे पाठींबा देऊन निवडून आणण्यास मदत करा. आमची ओबीसी राजकीय आघाडी तुमच्या उमेदवारांना पाठींबा देईल.
चला तर लागू या कामाला, एकमेकांचे कपडे फाडून भांडण करीत बसण्यापेक्षा 2019 ची निवडणूक एक दिलाने लढू या व 2019च्या एकाच निवडणूकीत कॉंग्रेसकट भाजपाचेही ‘ब्राह्मण-क्षत्रिय’ राजकारण खतम करू या! तरच खर्‍या अर्थाने एसस्सी-एस्टी-ओबीसींचे बळीराष्ट्र निर्माण होईल.
जयभीम-जयजोती, सत्य की जय हो!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com