http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, May 30, 2020

114 BahujanNama Cream 31May20 Lokmanthan Daily


बहुजननामा-114

क्रिमी लेयरः अट आहे कि तत्व?
-1-
क्रिमी लेयर ही संकल्पना मुख्यतः सुप्रिम कोर्टच्या मंडल जजमेंटनंतर मोठ्या प्रमाणात चर्चेला आली. सुप्रिम कोर्टाचे हे जजमेंट नोव्हेंबर 1992 ला आले. या जजमेंटचे विश्लेषण करणारे पुस्तक लवकरात-लवकर काढण्यासाठी मी लिहीण्याचे काम हाती घेतले. ‘‘मंडल आयोग व आधुनिक पेशवाई’’ हे माझे दुसरे पुस्तक मुख्यतः क्रिमी लेयर या विषयावरच आहे. नागपूरच्या कायजेन मिडियाने ते सप्टेंबर-1993 ला प्रकाशित केले. हे पुस्तक प्रकाशित होऊन आज 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणी मधल्या काळात ओबीसी चळवळीचे प्रायोरिटीचे प्रश्न बदलत गेलेत. त्यामुळे नंतर-नंतर क्रिमी लेयर हा विषय ओबीसी चळवळीच्या जाहिरनाम्यात तळाशी गेला.
आता 27 वर्षानंतर क्रिमी लेयरचे तत्व (सिद्धांत) दलित-आदिवासींच्या सवलतींना लावण्यात आल्यानंतर या कॅटेगिरीतील बुद्धिवंत जागृत झालेत व क्रिमी लेयरवर लिहू-बोलू लागलेत, त्यांचे स्वागतच आहे. परंतू बहुतेक सर्वच बद्धिवंत क्रिमी लेयरला ‘अट’ म्हणतात. क्रिमी लेयरला सर्वसामान्य माणसांनी ‘अट’ म्हणणं स्वाभाविक आहे, कारण विशिष्ट सोयीचा वा सवलतीचा फायदा घेतांना काही अटी ठेवलेल्या असतात. उदाहरणार्थ वयाची अट, शैक्षणिक पात्रतेची अट वगैरे.....तशी आर्थिक उत्पन्नाची अट म्हणजे क्रिमी लेयर, असे साधे सरळ सोपे विश्लेषण सर्वसामान्य माणसाने केले तर ते आपण सहज समजू शकतो. मात्र बुद्धिवंतांचे काम तेथून पुढे सुरू व्हायला हवे. बुद्धीवंतांनी काही प्रश्न उपस्थित करून त्याच्या उत्तरात सैद्धांतिक मांडणी केली पाहिजे, जी चळवळीला पोषक ठरेल.
क्रिमी लेयर ही केवळ अट नसून तो सत्ताधार्‍यांचा शोषणाचा एक सिद्धांत कसा आहे व सत्ताधारी त्याचे समर्थन कसे करतो आहे व सत्ताधार्‍यांच्या या समर्थन मुद्यांना भले-भले पुरोगामी म्हणविणारे दिग्गज कसे बळी पडत आहेत, अशा सगळ्यांचे विवेचन मी ‘‘मंडल आयोग व आधुनिक पेशवाई’’ (1993) या पुस्तकात विस्ताराने केले आहे. या पुस्तकाचे पुन्हा प्रकाशन झाले पाहिजे, असा आग्रह 2009 मध्ये माननीय कालकथित हनुमंतराव उपरे यांनी केला होता व त्यासाठी त्यांनी दहा हजार रूपयांची तरतूदही केली होती. परंतू काही अ-प्रस्तूत कारणास्तव ते काम नंतर थांबले.
आज सत्तावीस वर्षानंतरही मोठमोठे दलित अधिकारी व बुद्धिवंत शिष्यवृत्तीला लावलेल्या क्रिमी लेयर तत्वाचे ‘अट’ म्हणून समर्थन करतात. 27 वर्षांपूर्वी सुद्धा आमचेच ओबीसी प्राध्यापक, साहित्यिक, विचारवंत क्रिमी लेयरचे समर्थन करीत होते. त्याकाळी (1990-93) महाराष्ट्र स्तरावरची सर्व राजकीय पक्षांची आरक्षण समिती स्थापन झालेली होती. त्यात रिपब्लीकन, समाजवादी, कम्युनिस्ट, शेकाप, सकप, भाजप असे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सदस्य होते. शेकापचे तत्कालीन खासदार दि.बा. पाटील हे या समितीचे अध्यक्ष होते. कॉ. प्रभाकर संझगिरी, आमदार दत्ता पाटील, रा.सू गवई आदि बरेच दिग्गज नेते या समितीचे सदस्य होते. मी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या आरक्षण समितीत सदस्य होतो. कर्मवीर ऍड. जनार्दन पाटील हेही या समितीचे सदस्य होते व सर्व बैठकांना ते आवर्जून हजर असत. या समितीच्या बहुतेक सर्वच बैठका मुंबईत मंत्रालय परिसरात होत असत. यातील काही बैठकांचा वृतांत ‘‘सत्यशोधक मार्क्सवादी’’ या तत्वज्ञानिक मासिकात छापून आलेला आहे. या समितीच्या बैठकीत अनेकवेळा क्रिमी लेयरवर चर्चा झाली होती. एका बैठकीत रिपब्लीकन पक्षाचे नेते माननीय रा. सू. गवईसाहेबांनी क्रीमी लेयरचे समर्थन केले. तेव्हा मी त्यांना ईशारा दिला की, ‘आज ओबीसी जाती क्रिमी लेयर तत्वाच्या जात्यात भरडले जात आहेत, उद्या त्याच जात्यात दलित-आदिवासी जनताही भरडली जाणार आहे.’ 27 वर्षांपूर्वी मी दिलेला ईशारा आज खरा ठरत आहे.
समाजवादी, कम्युनिस्ट वगैरे पक्षांनी क्रिमी लेयर तत्वाला पाठिंबा दिला, कारण त्यांच्या दृष्टीने क्रिमीलेयर तत्व त्यांच्या ‘शूद्ध वर्ग’ तत्वाला समर्थन करते. एखाद्या दलित, आदिवासी व ओबीसी नेत्याने क्रिमी लेयरचे ‘अट’ म्हणून समर्थन केले तर ते आपण समजू शकतो. कारण तत्वज्ञानाच्या पातळीवर ते शासक-शोषक जातवर्गाच्या भूलभूलय्यैला समजू शकले नाहीत किंवा सत्ताधार्‍यांकडून संभाव्यपणे मिळू शकणार्‍या व्यक्तीगत अमिषाला ते बळी पडलेले आहेत, असे आपण म्हणू शकतो. मात्र ज्या समाजवादी व कम्युनिस्ट पक्षांच्या तात्विक निष्ठा अढळ आहेत, ते क्रिमी लेयर तत्वाचे समर्थन तत्वज्ञानाच्या पातळीवरूनच करतात, यात कोणतीही शंका नाही. मग हे असे कोणते तत्वज्ञान आहे की, जे एकाचवेळी ब्राह्मणांच्याही हिताचे आहे व समाजवादी-कम्युनिस्टांच्याही हिताचे आहे? अर्थातच ‘शूद्ध वर्गीय’ तत्वज्ञान! कॉंग्रेस पक्ष 1967 पासून देशातील जात-वर्गीय समस्यांनी ग्रस्त झाल्यामुळे फुटला व कमजोर झाला. त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजींनी ‘शूद्ध वर्गीय’ सुधारणा करून पक्षाला सावरले. बँकाचं राष्ट्रीयकरण, गरीबी हटाव वगैरे वर्गीय-सुधारणा होत्या, मात्र तत्कालीन कम्युनिस्ट पक्षाच्या डांगेसारख्या नेत्यांना वर्गीय क्रांती झाल्याचा साक्षात्कार झाला व त्यांनी उघडपणे इंदिराजींना पाठिंबा दिला. भारतातील कम्युनिस्ट पक्षाचा ‘शूद्ध वर्गवाद’ हा असा ब्राह्मणी भांडवलशाहीला पूरक आहे. क्रिमि लेयर तत्वाला कॉंग्रेस, भाजपा, समाजवादी व कम्युनिस्ट पक्ष अशा सर्व प्रतिगामी व पुरोगामी पक्षांनी पाठिंबा देणे, ही या देशात होऊ घातलेल्या जात्यंतक क्रांतीमधील मोठी अडचण आहे.
-2-
क्रिमि लेयर म्हणजे दुधावरची साय! ही साय आपोआप निर्माण होते काय? तर नाही. ती आपोआप निर्माण होत नाही. दलित, आदिवासी व ओबीसींमध्ये ही साय कशी निर्माण झाली? अनेक कारणांपैकी एक मोठे कारण आहे- प्रतिनिधीत्वाचे तत्व, प्रस्थापितांच्या भाषेत सांगायचे तर- आरक्षणाची सवलत. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या दबावाखाली भारतीय ब्राह्मणी जात-वर्गीय सत्ताधार्‍यांना विशेष प्रतिनिधीत्वाचे तत्व स्वीकारवे लागले. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी त्याची तत्वज्ञानाच्या पाळीवर मांडणी केली. छत्रपती शाहू महाराजांनी या क्रांतीकारी तत्वाची ठोस अमलबजावणी आपल्या संस्थानात करून या तत्वाचा पाया मजबूत केला. त्यानंतर या चळवळीचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 ते 1950 पर्यंत प्रदिर्घ संघर्ष करून प्रतिनिधीत्वाच्या या तत्वाला कायद्याचे अखिल भारतीय मूर्त स्वरूप संविधानात दिले. तर दलित आदिवासी व ओबीसी जातीतून जे काही क्रिमि लेयर आज सत्ताधार्‍यांना दिसते आहे ते केवळ या फुले-शाहू-आंबेडकरी जात्यंतक चळवळीचे एक फलित आहेत.
तर, साय दुधावर आपोआप येत नाही, त्या दुधाला तापवावे लागते व ते उतू जाण्याच्या आत थांबवावे लागते. तापविण्याची ही प्रक्रिया प्रसूती वेदनांपेक्षाही जास्त वेदनादायक असते. थंड होण्याच्या प्रक्रियेत त्यावर ‘साय’ जमा होते. ही साय दुधातून बाहेर काढली जाते व तिच्यावर आणखी काही प्रक्रिया करून तिचे तुप बनविले जाते. आणखी एक वेगळा मार्ग असतो- दुधातून ‘लोणी’ काढण्याचा! दुधाचे प्रमाण जास्त असल्यास दुध एका मोठ्या भांड्यात घेऊन त्याची घुसळन केली जाते. समुद्र मंथनातून अनेक मोती-रत्ने निघालीत, तशी दुधाच्या घुसळनमधून लोणी निघते व त्याच्यावरही प्रक्रिया करून तुप बनविले जाते. दलित+आदिवासी+ओबीसी जातींची घुसळून होऊन जी क्रिम नावाची साय-लोणी तरंगत वर आली आहे, ती साचली किती व नासली किती, याची चर्चा आपण पुढच्या बहुजननाम्यात करू या! पुढील चर्चेतील बरेचसे मुद्दे हे माझ्या 1993 च्या पुस्तकातील असण्याची शक्यता जास्त आहे. हे पुस्तक आता आऊट ऑफ प्रिन्ट आहे. माझ्याकडे एकमेव प्रत आहे व आता हे क्रिमी लेयरचे लेख लिहीतांना मी या पुस्तकापासून दूर 400 किलेमिटरवर आहे. चळवळीच्या जुन्या कार्यकर्त्यांकडे ते असेल. बहुजननामाच्या वाचकांनी हे पुस्तक मिळवून वाचले तर आपली या विषयावरची चर्चा अधिक सखोल व व्यापक होऊ शकते.
तो तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 30 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 31मे20)
------- प्रा. श्रावण देवरे
 Mobile – 88 301 27
270
Link-

Wednesday, May 27, 2020

113 BahujanNama AGMD-4 Lokmanthan 27May20


बहुजननामा-113

अंगामाढो-4 (अंतिम भाग)
-1-
अंगामाढो हेच का? श्रीमंत कोकाटे, सचिन बगाडे, नागोराव पांचाळ, कल्याण दळे, राजेंद्र कुंभार, माधव सरकुंडे, सचिन डोरले, जावेद पाशा, सुनिल गोटखिंडे, आदिम कोळी, ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, अरूणा माळी, सचिन राजूरकर, बळीराज धोटे अशी असंख्य तरूणांची फौज महाराष्ट्रात प्रामाणिकपणे काम करीत असतांना तुम्ही या चारच लोकांची नावे का घेत आहात? आणी हो, तुम्ही स्वतः श्रावण देवरे जबाबदारीतून अंग का काढून घेत आहात? अंगामाढो मध्ये स्वतःचं नाव का घातलं नाही? असे अनेक प्रश्न मला विचारले गेलेत? याचा खुलासा करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
मला प्रथम हे स्पष्ट करू द्या की, अंगामाढो ही कोण्या चार माणसांची नावे नाहीत. अंगामाढो ही एक प्रवृत्ती आहे, की ‘‘जिच्यात अंगभूत गुण व कार्य-कर्तृत्वाची घुसळण आहे आणी राजकीय महत्वाकांक्षेमुळे ती सातत्याने गतिमानही होत असते’’ अशी ही अंगामाढो प्रवृत्ती महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतात लाखों तरूणांमध्ये कार्यरत आहे. त्या असंख्य तरूणांच्या कार्य-प्रवृत्तीला कोणत्या तरी नावाने एकत्रित करण्याच्या प्रयत्नात मी अंगामाढो हे नांव घेतले. उद्या असा प्रयत्न नागेश चौधरींनी केला तर ते ‘अंगामाढो’ऐवजी वेगळंच ‘भोनाडेमो’ नामकरण करू शकतात. किंवा शिवानंद हैबतपूरे यांनी असा प्रयत्न केला तर कदाचित ते ‘सोकांबझ’ असंही नामकरण करू शकतात. राजकूमार घोगरे कदाचित ‘लंसामांधु’ असे नामकरण करतील. अंगामाढो म्हणजे सुषमा अंधारे, प्रवीण गायकवाड, सुरेश मानेप्रदिप ढोबळे ही चार नावे प्रातिनिधिक आहेत. कदाचीत मी या चार लोकांच्या सहवासात जास्त आल्याने त्यांची नावे माझ्या मेंदूवर जास्त ठळकपणे कोरली गेली असावीत. या चौघांनी आपली वैचारिक बैठक पक्की करून आपल्या स्वकर्तृत्वावर ‘उभारी’ सिद्ध केली आहे व त्यांच्यात जबरदस्त राजकीय महत्वाकांक्षा आहे. राजकीय महत्वाकांक्षा नसेल तर राजकीय चळवळ उभी राहणारच नाही व परिवर्तन प्रत्यक्षात येणारच नाही. अर्थात सगळ्यांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा नसते. ज्यांना फक्त सामाजिक क्षेत्रात राहून प्रबोधनाची मशागत करायची आहे, त्यांनी ते काम करीत राहावे. परंतू या मशागत केलेल्या शेतात पेरणी, कापणी कोणी केलीच नाही तर, मशागतीचे शेत वांझोटेच राहते. तुमच्या प्रबोधनातून राजकीय पक्ष निर्माण व्हावा लागतो.
-2-
महाराष्ट्रात व भारतात असंख्य पुरोगामी व क्रांतीकारक पक्ष अस्तित्वात असतांना पुन्हा नवा पक्ष स्थापन करून काय साध्य होणार आहे, असा प्रश्नही मला विचारला गेला. अर्थात या प्रश्नाशी निगडीत विवेचन मी अंगामाढोच्या दुसर्‍या व तिसर्‍या भागात केले आहे. काहींचा असाही समझ झाला की, हे चार लोक वेगवेगळ्या चार कॅटेगिरीतील वेगवेगळ्या चार जातींचे चेहरे आहेत, म्हणून मी त्यांच्या नावाने काही नवा पर्याय सूचवित आहे. असे अजिबात नाही. वेगवेगळ्या जाती-धर्माचे चेहरे दाखवून मते घेण्याचे व सत्ता काबीज करण्याचे धंदे बहुतेक सर्वच पुरोगामी व प्रतिगामी पक्षांनी केले आहेत व आजही करीत आहेत.
कॉंग्रेसने देशपातळीवर जगजीवनराम-झाकिर हुसेन यासारखे चेहरे दाखवीलेत व मुसलमान-दलितांची मते घेऊन दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. राज्यपातळीवर मराठा जाट पटेलवगैरे क्षत्रिय जातींना राज्यस्तरावरची ‘मांडलिक’ सत्ता देऊन खूश करण्यात आले व त्याबदल्यात अखिल भारतीय सत्ता ताब्यात घेतली. परंतू याचा परिणाम असा झाला की, सातत्याने एक-दोन जातीच सत्तेवर येत राहिल्याने इतर जातीत प्रतिक्रियात्मक राजकीय जागृती झाली. परिणामी इतर जातींनी प्रादेशिक राजकीय पर्याय शोधलेत. लालू-मुलायम-कांशिराम यांनीही अशीच एक-दोन जातींची मोट बांधून काही काळ सत्ता मिळवीली. सपा, बसपा व राजद सारख्या पक्षांमुळे हिंदी राज्यातील यादवेतर जातीं व चांभारेतर जातींमध्ये प्रतिक्रियात्मक राजकीय जागृती झाली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठा जातींच्या प्रतिक्रियेत इतर जाती जागृत झाल्यात. या इतर जातींची प्रतिक्रियात्मक जागृती आधी शिवसेनेने व नंतर भाजपाने कॅश केली. भाजपाने मोदींचा ओबीसी’ चेहरा दाखविला व सैतानी बहुमत घेउन पूर्ण देशच हडप केला.
जातीच्या आधारावर भक्कम राजकीय पर्याय दिला एकट्या तामिळनाडूच्या ओबीसींनी! कोणताही चेहरा न दाखवता केवळ वैचारिक प्रबोधन करून जनतेची मते घेणारे व प्रदिर्घ काळ सत्तेवर असलेले दोनच पक्ष आहेत, आणी ते म्हणजे तामिळनाडूतील डी.एम.के. व आण्ना डी.एम.के. हे पक्ष! स्वामी पेरियारांनी तेथे ब्राह्मणी-वैदिक संस्कृतीच्या विरोधात उघडपणे व आक्रमकपणे चळवळ उभारली. ही खर्‍या अर्थाने अब्राह्मणी क्रांती होती, जात्यंतक चळवळ होती. त्यामुळे त्या राज्यात संघ-भाजपाला व कॉंग्रेसला आजही प्रवेश मिळत नाही. तेथील दोन्ही राजकीय पक्ष शुद्ध ओबीसींचे असून तेच आलटून-पालटून सत्तेवर येत राहतात. परंतू हे पक्षही आताशा व्यक्तिगत-कौटुंबिक खाजगी मालमत्तेचे झालेले आहेत. कारण, पेरियारकृत अब्राह्मणी प्रबोधन बंद पडलेले आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये केव्हाही संघ-भाजपाप्रणित कमल हसन वा रजनीकांतचा पक्ष सत्तेवर येऊ शकतो व ब्राह्मणी प्रतिक्रांती होऊ शकते.
निव्वळ वर्गीय आधारावर कम्युनिस्ट पक्षांनी प. बंगाल व केरळमध्ये प्रदिर्घ काळ सत्ता मिळविली, मात्र अब्राह्मणी प्रबोधनाअभावी आता तेथेही व्हाया-ममता बॅनर्जी भाजपाची प्रतिक्रांती दाखल होत आहे. केरळमध्ये नारायण गुरू व बळीराजाच्या प्रभावामुळे तेथे संघ-भाजपाला अजून प्रवेश मिळालेला नाही. मात्र तेथेही सबरीमाला व आयप्पा मंदिराचा वापर करून संघ-भाजपा ब्राह्मणी प्रबोधन करीत आहे. त्याला शह देण्यासाठी केरळच्या कम्युनिस्ट सरकारकडे कोणताही अब्राह्मणी प्रबोधनाचा कार्यक्रम नाही, कारण ते निव्वळ वर्गीय पयावर उभे आहेत.
-3-
हे सर्व अनुभव पाहता अंगामाढो यांना जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची भूमिका घेऊन तात्विक बैठक तयार करावी लागेल. कॉ. शरद पाटील यांनी या दिशेने एक मोठी वाट प्रशस्त करून दिलेली आहे. त्या वाटेवर तरूण कार्यकर्त्यांना गोळा करीत प्रबोधनाची लाट निर्माण करावी लागेल. शपांना मानणारा एक मोठा तरूण वर्ग महाराष्ट्रात आहे. तुम्ही वाट पकडताच हा तरूणवर्ग तुमच्या दिमतीला हजर होईल! एकीकडे प्रबोधनाची चळवळ व दुसरीकडे जात-वर्गनिहाय जनगणनेची चळवळ अशी सैद्धांतिक व व्यवहारिक सांगड घालत पक्षनिर्मीतीकडे वाटचाल करावी लागेल. जात-वर्गनिहाय जनगणनेची चळवळ यासाठी की, जात-वर्गांतच्या लढाईसाठी आपल्याजवळ आधुनिक डेटाच नाही! मैदानी युद्धात अत्याधुनिक शस्त्र नसेल तर पराभव निश्चित असतो! त्याचप्रमाणे राजकीय-सामाजिक लढाईत ‘आधुनिक मुद्दे’ नसतील तर जिंकण्याची शक्यताच नाही. आजवर आम्ही जातीअंताची लढाई 3-4 हजार वर्षांपूर्वीच्या रामायण-महाभारताच्या कथा व पोथी-पुराणे घेऊन लढतो आहोत. आम्हाला 90 वर्षांपूर्वीची म्हणजे 1931 सालची जनगणना घेऊन ओबीसींची लढाई लढावी लागते आहे. 2021ला वर्ग-जातनिहाय जनगणना झाली तर प्रत्येक जाती-उपजातीची व कामगार-शेतकरी सारख्या कष्टकरीवर्गाचीही ताजी आकडेवारी मिळेल. करोनाच्या महासंकटात लाखो हात-मजूरांचे हाल होत आहेत. जर त्यांची जातीय-वर्गीय आकडेवारी व इतर डेटा उपलब्ध असता तर मदत करणार्‍या संघटनांनाही सूत्रबद्ध उपाय-योजना आखता आल्या असत्या व मजूरांचे एवढे हाल झाले नसते.
जात-वर्गनिहाय जनगणना झाली तर ‘जात-वर्गव्यवस्थेच्या नव्या अर्थशास्त्राची मांडणी तज्ञ लोक करू शकतील! हे जातीचे अर्थशास्त्रच आपले ‘नवे शस्त्र’ बनेल. त्यातून होणारी जागृती आपली चळवळ भक्कम करेल.
असा क्रांतिकारक पर्याय उभा राहात असतांना संघ-भाजपा व कॉंग्रेस-राष्ट्रवादीसारखे प्रतिगामी पक्ष आपली गंमत पाहात शांत बसून राहतील, असे समजणे चूकीचे ठरेल! सर्वात आधी अंगामाढो हे समिकरणच जूळणार नाही, असा प्रयत्न ते करतील. एकेकट्याला पकडून काहीही भीती घालून ते यात खोडा घालतील. अर्थात अंगामाढो हे आपल्या जीवनात स्वच्छ व पारदर्शी असल्याने ते अशा घाबरवण्याला भीख घालणार नाहीत. नंतर ते एकेकट्याला पकडून त्याची स्तुती करतील व त्याच्यात व्यक्तीगत इगो वा जातीय इगो जागृत करून एकमेकाममध्ये वितुष्ट निर्माण करतील. अर्थात त्याही बाबतीत अंगामाढो हे पक्के मॅच्युअर असल्याने इगो नावाचा शब्द अंगामाढोच्या डिक्शनरीतून कायमचा डिलीट झालेला आहे.
त्यानंतर पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या रचनेवरून वा मिळणार्‍या संभाव्य सत्तेच्या वाटपावरून आपसात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. असा कलह निर्माण होऊ नये म्हणून पक्षाच्या घटनेत व जाहीरनाम्यात काही अपरिवर्तनीय नियम समाविष्ट करावे लागतील. त्याची एकदोन उदाहरणे मी देतो. पक्षातील सत्ता वा राजकिय सत्ता वाटप करण्याची पद्धत शोषणाच्या जात-वर्गीय उतरंडीच्या व्यस्त प्रमाणात ठरली पाहिजे. पक्षाचे अध्यक्षपद, जनरल सेक्रेटरीपद यासारखी निर्णायक पदे व राजकीय सत्तेतील मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, अर्थमंत्री वगैरे महत्वाची पदे ही सर्वात जास्त शोषित जात-वर्गाला मिळाली पाहिजेत. ‘‘जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी भगिदारी’’ ही घोषणा भोंगळ आहे. या घोषणेमुळेच तर सपा, बसपा व राजदसारख्या जातीय पक्षांनी मुख्यमंत्री पद एकाच चांभार, यादव जातीत कायम ठेवले व इतर शोषित जातींना कायमचे सत्तेपासून लांब ठेवले. अशा चूकीच्या मार्गाने गेलोत तर अतिअल्पसंख्य धोबी, नाभिक, वडार, पिंजारी, मातंग वगैरे व्यक्ती कधीच वरच्या पदापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. नवी घोषणा अशी असेल- ‘‘शोषितोमे जिसकी जितनी संख्या कम, उसको उतना उंचा पद’’
शेवटी अंगामाढो प्रकरण संपवितांना एकच गोष्ट महत्वाची म्हणून सांगतो. जातीव्यवस्थेचे व वर्गव्यवस्थेचे छोटे-मोठे प्रश्न सोडविण्यासाठी मोर्चे, मेळावे, धरणे, जेलभरो अशी रस्त्यावरची आंदोलने आता कालबाह्य झालेली आहेत. सत्ता मिळाल्याशिवाय तुम्ही जनतेची एकही समस्या सोडवू शकत नाहीत. आणी ही सत्ता तुम्हाला केवळ प्रबोधनाची सायलेंट मुव्हमेंट अत्यंत निष्ठेने व अथकपणे राबवूनच मिळणार आहे.
अंगामाढो हे प्रकरण आता मी संपवितो! मला खात्री आहे, लिहीणे थांबल्यानंतर अंगामाढो चळवळ लवकरच सुरू होईल! तो तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 25 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 27मे20)
------- प्रा. श्रावण देवरे
 Mobile – 88 301 270


Monday, May 25, 2020

112 BahujanNama AGMD-3 Daily Lokmanthan 14May20


बहुजननामा-112

अंगामाढो-3
-1-
आज देशात अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांमध्ये असा एकही पक्ष नाही की, ज्या पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्याने प्रवेश घेऊन देशाच्या व्यापक हितासाठी राजकीय चळवळ उभी करावी. जनता नेहमी पर्याय शोधत असते. कॉंग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय जनआंदोलनातून निर्माण झालेला पक्षही एका कुटुंबाची खाजगी मालमत्ता बनलेला आहे व तो ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य या जातींशिवाय दुसरे कोणाचेही हित साधू इच्छित नाही. कॉंग्रेस नको तर मग दुसरे कोण? जनसंघ-भाजपाकडे जाण्याआधी जनतेने अनेक पर्याय शोधलेत, स्वीकारलेत व त्यांना काही अंशी सत्ताही दिली. मात्र भारतीय जनतेचं मूलभूत जातीव्यवस्थेचं दुःख निवारण्यास सगळेच राजकीय पक्ष नालायक ठरले आहेत. बहुतेक सर्वच राजकीय पक्ष व्यक्तिगत, कौटुंबिक व स्वजातीय हिताचे झालेले आहेत. याला समाजवादी व कम्युनिस्ट पक्षही अपवाद नाहीत. कारण त्यांना जातीव्यवस्थेला कोणताही धक्क न लावता वर्गीय क्रांती करायची आहे व देशात समता आणायची आहे, की ‘जे कधीच शक्य नाही.’ जातीव्यवस्था नष्ट केल्याशिवाय या देशात कोणताही क्रांतिकारीवाद वा सुधारणावाद मूळ धरू शकत नाही, हा बाबासाहेबांचा सिद्धांत वारंवार सिद्ध झाल्यामुळे आता कुणीही प्रामाणिक कार्यकर्ता या कम्युनिस्ट पक्षांकडे फिरकणार सुद्धा नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगील्याप्रमाणे या देशाचे मुख्य दोन शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही व दुसरा भांडवलशाही! त्यासाठीच त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला होता. बाबासाहेबांनी 1936 पर्यंत संघटन, प्रबोधन व संघर्ष करतांना जातीय आधार घेतला. मात्र राजकीय मैदानावर येताच वर्गीय पक्ष स्थापन केला. सेम टू सेम तात्यासाहेब! तात्यासाहेब महात्मा फुले यांनी ब्राह्मणशाहीच्या विरोधात जातीय प्रबोधन केलं, मात्र रस्त्यावरचा जात्यंतक-संघर्ष करतांना त्यांनी वर्गीय सघटन उभं केलं. रावबहादूर कृष्णराव भालेकर व रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे तात्यासाहेबांचे महान शिष्य होत. भालेकरांनी शेतकर्‍यांचे संघटन करून सावकारशाहीविरोधात क्रांतिकारी बंड केलं. ते देशाचे पहिले शेतकरी नेते ठरलेत. नारायण मेधाजी लोखंडे यांनी देशातील पहिली कामगार संघटना उभी केली व यशस्वी संपही केलेत. तात्यासाहेब महात्मा फुलेंचे म्हस्के नावाचे एकमेव मराठा शिष्य होते. म्हस्केंनी ‘मराठा’ नावाने जातीय संघटन स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तात्यासाहेब महात्मा फुलेंनी त्यांचे चांगलेच कान उपटले. जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर त्यासाठी जातीय आधाराचे संघटन वा जातीय पक्ष स्थापन करून चालणार नाही. त्यातून ब्राह्मणशाहीचेच भले होईल! जातीव्यवस्था समूळ नष्ट करायची असेल तर वर्गीय संघटना व वर्गीय पक्ष स्थापन करूनच जात्यंतक-संघर्ष करावा लागेल.
तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या काळात वर्गव्यवस्था जन्मालाही आलेली नव्हती, ब्रिटिशांमुळे ‘वर्ग’ हे जातीच्या पोटात आकार घेत होते. परंतू महापुरूष द्रष्टे असतात. ते पाच हजार वर्षांचा इतिहास अभ्यासून वर्तमान काळाचे विश्लेषण करतात व पुढील 500 वर्षे मार्गदर्शक ठरेल, असे तत्वज्ञान सिद्ध करून जातात. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी द्रष्टेपणाने जातीच्या पोटात आकार घेत असलेले वर्ग पाहिले व भविष्यातील वर्गसंघर्षावर जात्यंतचीही जबाबदारी टाकून लोकशाही क्रांतीच्या नव्या तत्वज्ञानाची पायाभरणी केली. महामानव गौतम बुद्धांच्या काळात जातीव्यवस्था नव्हती, जरठ झालेली वर्णव्यवस्था होती. जाती नुकत्याच आकाराला येत होत्या. बौद्ध धम्माने वर्णव्यवस्था नष्ट करण्याची क्रांती केली. परंतू उगवत्या जातीव्यवस्थेलाही कडाडून विरोध केला. भावी काळातील जात्यंतक संघर्षाचे सूत्रही दिले. त्यालाच सौत्रांतिक बौद्धवाद म्हणतात. काळाच्या ओघात गडद अंधारात गेलेला हा क्रांतीकारक बौद्ध धम्म कॉ. शरद पाटलांना पहिल्यांदा गवसला आणी त्यांनी या बौद्धवादाचा मार्क्सवादाशी एकमय संयोग करीत ‘‘सौत्रांतिक मार्क्सवादा’’ची उभारणी केली.
त्याचप्रमाणे तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंनी उगवत्या वर्गव्यवस्थेचाही अभ्यास केला व त्यातून जात-वर्ग-स्त्रीदास्यांतक लोकशाही क्रांतीच्या तत्वज्ञानाची पायाभरणी केली. पुढे बाबासाहेबांनी हेच तत्वज्ञान विकसित करून ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ हा वर्गीय पक्ष स्थापना केला. बाबासाहेबांनी पक्ष स्थापन केल्यानंतर या पक्षाला मोठे यशही प्राप्त व्हायला लागले. एक वर्षाच्या आत झालेल्या निवडणूकीत (1937) स्वतंत्र मजूर पक्षाने 17 जागा जिंकल्यात, त्यापैकी तीन ओपन म्हणजे सवर्ण उमेदवार होते व दोन उमेदवार ओबीसी जातीतले होते. परंतू इंग्रज राज्यकर्त्यांकडून भारताला मिळत असलेले सत्तेचे मर्यादित अधिकार ‘वर्गीय’ नव्हे तर ‘जातीय’ आधारावर मिळत होते. जेव्हा बाबासाहेबांना असा प्रश्न विचारला गेला की, ‘‘तुम्ही मजूरांचे प्रतिनिधी आहात की अस्पृश्यांचे?’’ तेव्हा त्यांना स्वतंत्र मजूर पक्ष गुंडाळून ठेवावा लागला व पुन्हा जातीय पक्षाकडे वळावे लागले. बाबासाहेबांनी जातीय आधारावरचा ‘शेकाफे’ पक्ष स्थापन केला आणी 1944 च्या निवडणूकीत सपशेल पराभव झाला. खूद्द बाबासाहेबही त्यानंतर कधीच निवडून आले नाहीत. संविधान सभेत जाण्यासाठी त्यांना एकदा जोगेन्द्रनाथ मंडल यांची मदत घ्यावी लागली व दुसर्‍यांदा कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून यावे लागले.
अस्पृश्य चळवळीची मर्यादित ताकद, बलाढ्य शत्रू कॉंग्रेस, हिंदू महासभा व संघ-जनसंघांचा उघडा-नागडा ब्राम्हणवाद, समाजवादी-कम्यनिस्टांचं ‘‘सोशल डिस्टन्सिंग’’ व सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्रज राज्यकर्त्यांनी जाता-जाता बाबासाहेबांचा केलेला विश्वासघात; हे सर्व पाहता बाबासाहेबांना आपल्या मूळच्या जात-वर्गांताच्या क्रांतिकारक भूमिकेकडे कधीच परत जाता आले नाही. या काळात बाबासाहेबांना ब्राह्मणशाहीला अनुकूल असलेली ‘जातीय भुमिका’ घेउनच काम करावं लागलं. संविधान सभेतही जात्यंतकऐवजी जात-समन्वयाचीच भुमिका घेऊन संविधानाची निर्मिती करावी लागली.  संविधान हे ब्राह्मणी व अब्राह्मणी या दोन युद्धरत राष्ट्रांमधला तात्पुरता ‘तह’ म्हणून अस्तित्वात आलेले आहे, तेही केवळ उदारमतवादी इंग्रजांच्या दबावामुळे! आपल्या या मवाळ भुमिकेचं समर्थन स्वतः बाबासाहेब करतात. ते स्पष्टपणे म्हणतात- ‘‘सतत संघर्षाची भुमिका घेत लढत राहाणं शहाणपणाचं नाही’’. ‘1945-46 नंतर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारक राहीले नाहीत,’ हे कॉ. शरद पाटलांचे म्हणणे सत्य असले, तरी त्याचे विश्लेषण मात्र शपांनी केले नाही. मी केलेले उपरोक्त विश्लेषण लक्षात घेता, त्याकाळी कोणत्याही महापुरूषाने बाबासाहेबांसारखीच भुमिका घेतली असती. इंग्रजांनी बाबासाहेबांना आजवर दिलेला पाठिंबा काढून घेतल्यामुळे कॉंग्रेस मुजोर व आक्रमक झाली होती. संपूर्ण देशाला स्वातंत्र्याचा अधिकार मिळत असतांना अस्पृश्यांनी संघर्ष करून मिळविलेले अधिकार हिरावले जातात की काय, अशी परिस्थीती निर्माण झाली होती. जे आहे तेच टिकविणे मुष्कील झाले होते. स्वतंत्र भारतात अस्पृश्यांचे अधिकार टिकऊन ठेवण्यासाठी बाबासाहेबांना समन्वयाची भुमिका घेणं भाग पडलं. समन्वयाच्या भुमिकेतून बाहेर पडून पुन्हा एकदा जात-वर्गांताच्या क्रांतिकारक सिद्धांताकडे वळण्याचा प्रयत्न त्यांचे महान शिष्य असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी केला, मात्र त्यांनाही कॉंग्रेसने त्वरीत गिळंकृत केले. त्यानंतरचे बाबासाहेब आंबेडकरांचे बरेचसे ‘वारसदार’ कॉंग्रेस व संघ-भाजपाच्या अंगणात बसून जयभीम नावाचे क्रांती-गीत गात आहेत.
‘‘वर्गीय संघर्षातूनच जातीव्यवस्था आपोआप नष्ट होईल, हे कम्युनिस्ट पक्षांचे धोरण चूकीचे आहे, जातीव्यवस्था ही वर्गाप्रमाणेच पायाभूत शोषणाची व्यवस्था आहे’’, अशी नवी सैद्धांतिक मांडणी कॉ. शरद पाटलांनी केल्यावर त्यांना मार्क्सद्रोही व पक्षशत्रू ठरविण्यात आले. तेव्हा शपांनी ‘मार्क्सवाद-फुलेआंबेडकरवाद’ या नव्या तत्वज्ञानाची मांडणी केली व जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची भूमिका घेत ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष’ स्थापन केला. 1978 ला पक्ष स्थापन होताच आम्ही या पक्षात दाखल झालोत व पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागलोत. शपांना आपल्या सामर्थ्याची व मर्यादांची पूर्ण कल्पना होती. जरी शपांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केलेला असला, तरी तो वर्गवादी ब्राह्मणी कम्युनिस्टांवर बाहेरून तत्वज्ञानात्मक दबाव टाकणारा केवळ एक दबाव-गट होता.
आज 70 वर्षांनंतर खूप परिस्थिती बदलली आहे. जनतेने अनेक जातीय व वर्गीय पर्याय अनुभवले आहेत. जातीव्यवस्था जर्जर झाली असून ती आता मरणाची वाट पाहात आहे, परंतू तीच्या मृत्युस कारणीभूत होईल असा ‘‘ बस्स! एक धक्का और’’ मारणारा एकही सक्षम नेता व पक्ष आज अस्तित्वात नाही. संघ-भाजपा जातीव्यवस्थेला व्हेंटीलेटरवर ठेवून जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत व त्यातून ते नवी अखिल भारतीय पेशवाई स्थापण्याचा यशस्वी प्रयत्न करतांना दिसत आहेत. अशा परिस्थितीत भारताची शूद्रादिअतिशूद्र जनता पुन्हा एकदा नव्या पर्यायाच्या शोधात आहे. अशावेळी अंगामाढो यांनी पुढे आले पाहिजे व जनतेसमोर नवा जात्यंतक-वर्गांतक राजकीय पर्याय ठेवला पाहिजे.  
या आधीचे जातीय-वर्गीय राजकीय पर्याय जनतेने स्वीकारूनही, कशामुळे ते नेस्तनाबूत झालेत, याचा अभ्यास करून या नव्या पक्षाची तात्विक बैठक तयार करावी लागेल. ही तात्विक बैठक कशी असेल, कृती कार्यक्रम काय असू शकतात व नवा संकल्पित पक्षाची रचना काय असू शकते, अशा सर्व प्रश्नांची चर्चा आपण शेवटच्या चौथ्या भागात (बहुनजननामा-113 मध्ये) करू या!
तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 22 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 24मे20)
लेखकःप्रा. श्रावण देवरे
 Mobile – 88 301 270
                
Link to read this article in text file

बहुजननामाचे सर्व लेख वाचण्यासाठी पुढील ब्लॉग लिंकवर क्लिक करा....
Blog ब्लॉग लिंक- https://shrwandeore.blogspot.in/ 

Tuesday, May 19, 2020

111 BahujanNama AGMD2 Lokmanthan 20May20


बहुजननामा-111
अंगामाढो-2
-1-
जगातील सर्व क्रांतीकारी व प्रतिक्रांतीकारी महापुरूष, संघटना वा पक्ष हे हाय-रिस्क घेउन काम करीत असतात, म्हणूनच ते क्रांती वा प्रतिक्रांती करू शकतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील हायमेरिटची माणसं किंवा स्वयंभू मास लिडर्स या सर्वांना जोडून त्यांना आपल्यात सामावून घेतात व क्रांती वा प्रतिक्रांतीची वाट मोकळी करतात. मात्र प्रस्थापित व्यक्ती, संघटना व पक्ष कोणतीही लहान-मोठी रिस्क घेतांना 100 वेळा विचार करतात. कारण त्यांना कोणतीही क्रांती वा प्रतिक्रांती करायची नसते. आहे त्याच व्यवस्थेतील आपले स्थान मजबूत करणे एवढे एकच उद्दिष्ट्य घेऊन ही महान(?) माणसं काम करीत असतात. ते सतत भीतीग्रस्त असतात. आपले स्थान, आपले कुटुंब व आपली जात धोक्यात येईल की काय, अशी भीती कायम त्यांच्या मनात घर करून बसलेली असते. त्यामुळे हाय मेरिटची माणसं आपल्या पक्षात येणार नाहीत, याची ते पूरेपूर काळजी घेत असतात.
अंगामाढो (अंधारे, गायकवाड, माने, ढोबळे) हे चारही नेते आपापल्या कॅटेगिरीतले
स्यंवंभू नेते आहेत व ते वैचारिकदृष्ट्या मजबूत आहेत. या दृष्टिने पाहता हे चारही लोक हाय मेरिटचे आहेत. त्यामुळे या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन आमदार-खासदार बनविले तर आपल्या पक्षाचे कौटुंबिक व जातीय स्वरूप धोक्यात येईल, ही कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या मनातील भीती रास्तच आहे. सुषमाताई राष्ट्रवादी कॉंग्रेस (राकॉं) पक्षात येऊन आमदार झाल्यात तर सुप्रियाचं ताईपद फिके पडेल. प्रविणदादा पक्षात आलेत तर अजितदादांचं स्थान धोक्यात येईल. मानेसाहेब व ढोबळेसाहेब जर या पक्षात आलेत तर पक्षाचा ‘मराठा-गाभा’च नष्ट होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जर माने-ढोबळेंसारखे नेते आमदार-खासदार बनलेत तर मराठा आरक्षणाचं बील विधानसभेत कधीच मंजूर झालं नसतं! करोनाच्या पार्श्वभूमीवर पवारसाहेबांनी मराठा सम्राटांच्या साखर कारखान्यांसाठी आर्थिक पॅकेज मागीतले, माने-ढोबळे राष्ट्रवादीचे नेते झालेत तर, साखर कारखान्यांऐवजी बारा बलुतेदारांच्या जात-व्यवसायांसाठी ‘बेलआऊट’ पॅकेज मागावे लागेल.
-2-
भारतातील बहुतेक सर्वच राजकीय पक्ष कौटुंबिक व जात-हितसंबंधी झालेले आहेत. स्वातंत्र्य चळवळीसारख्या महान जनआंदोलनातून कॉंग्रेस पक्षाची निर्मिती झाली. या जनआंदोलनात आदिवासी, ओबीसी, दलित, मराठा, ब्राह्मण, मुसलमान वगैरे सर्वच जाती-धर्मातील लोक सहभागी होते. परंतू जनआंदोलनाचे नेतृत्व करणारा कॉंग्रेस पक्ष जन्मापासून आजवर ब्राह्मण-वर्चस्ववादीच होता व आहे. गोखले, टिळकांसारखे ब्राह्मण नेते बहुजन नेत्यांना पक्षात कोणतेही महत्वाचे पद द्यायला तयार नव्हते. वास्तविक त्यावेळचे काही दिग्गज मराठा टिळकांसोबतच होते. मात्र तरीही मराठा-कुणब्यांना असेंब्लीमध्ये घ्यायला टिळक विरोध करीत होते. त्याकाळी तात्यासाहेबांच्या सत्यशोधक चळवळीचा दरारा इतका जबरदस्त होता की, ब्राह्मण ताकही फुंकून पीत होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रभावात मराठा-कुणबी हे कॉंग्रेस पक्षातील ब्राह्मणांचे वर्चस्व नष्ट करतील, याची खात्री ब्राह्मणांना होती.
परंतू, जनतेचा सहभाग असल्याशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही, हे तत्कालीन उगवते वैश्य-भांडवलदार जाणून होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रभावात सामान्य जनता ‘ब्राह्मणविरोधी’ झालेली होती. त्यामुळे कॉंग्रेसचे नेतृत्व ब्राह्मणांच्या कडून काढून घेऊन ते ब्राह्मणेतर व्यक्तीकडे दिले, तरच सामान्य जनता स्वातंत्र्य चळवळीत येईल, असा साधा व्यवहारिक विचार तत्कालीन वैश्य-भांडवलदारांनी केला. कॉंग्रेस पक्ष वैश्य-भांडवलदारांच्या पैशांवर चालत होता, त्यामुळे कॉंग्रेसचे नेतृत्व वैश्य गांधींजींकडे जाणे स्वाभाविक होते. भारतातील उगवत्या वैश्य-भांडवलदारांना स्व-वर्गाच्या विकासासाठी स्वातंत्र्य आंदोलन यशस्वीपणे चालवायचे होते. त्यासाठी या उगवत्या भांडवलदारांनी कॉंग्रेसची संपूर्ण निर्णय प्रक्रिया गांधींजींच्या हाती सोपविली. आपल्या नेतृत्वाला ब्राह्मणांचा कडवा विरोध होऊ नये म्हणून एकीकडे गांधीजींनी वर्ण-जातव्यवस्थेचे कट्टर समर्थन केले व दुसरीकडे ब्राह्मणेतर लोक कॉंग्रेसमध्ये यावेत म्हणून ‘जोतीराव फुले हेच खरे महात्मा’ अशी घोषणाही केली. असेंब्लीच्या सत्तेसाठी हपापलेल्या मराठ्यांनी गांधीजींचा तेव्हढाच सोयीचा धागा पकडला आणी कॉंग्रेसच्या चरख्यावर बसून सत्तेचा स्वर्ग गाठला. कॉंग्रेस पक्षाचं नेतृत्व बदललं, धोरण बदललं, डावपेंचही बदललेत, मात्र टिळकांनी पक्की ठासून भरलेली वेदांती-ब्राह्मणी तत्वज्ञानाची चौकट कायम राहीली. त्याचे कारण काय? कॉंग्रेसवरचं ब्राह्मणी वर्चस्व कमी होत असतांना त्वरीत दुसरा पर्याय अवलंबला गेला. त्याला ‘प्लॅन-बी’ म्हणतात. प्लॅन-बी प्रमाणे वैदिक ब्राह्मणांनी लगेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना केली व गांधीजींवर दबावतंत्राने नियंत्रण ठेवले. त्यामुळे गांधीजींनी कॉंग्रेसच्या या ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या चौकटीला धक्का लावण्याची हिम्मत कधीच केली नाही. जेव्हा जेव्हा ही चौकट तोडण्याची शक्यता निर्माण होई, तेव्हा तेव्हा गांधीजींच्या कानफटीवर बंदुकीची नळी ताणली जायची!
याचा अर्थ गांधीजी मरायला घाबरत होते, असे नव्हे! त्यांच्यासमोर वैश्य-भांडवलदारांनी जे टार्गेट ठेवलेले होते, ते ‘राजकीय स्वातंत्र्य’ मिळवीण्यापुरतेच मर्यादित होते. समाजसुधारणा हे टार्गेटच नव्हते! ब्राह्मणेतरांनी आपले सामाजिक प्रश्न बाजूला ठेवून स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या सख्येने यावे व ती चळवळ यशस्वी करावी, एवढाच उद्देश गांधीजींचा होता. आणी हे टार्गेट गांधीजींच्या केवळ एका घोषणेने साध्य झाले. कोणती घोषणा? ‘‘जोतीराव फुले हेच खरे महात्मा!’’ फक्त तोंडी घोषणा! लेखी कुठेच नाही! गांधीजींच्या कोणत्याही अग्रलेखात, बातमीत, मासिकात, त्यांच्या कोणत्याही भाषणात या घोषणेचा साधा उल्लेखही नाही. तात्यासाहेबांचे सत्यशोधक विचार कॉंग्रेसने स्वीकारण्याचा प्रश्नच पुढे आला नाही. कारण कॉंग्रेसमध्ये घुसलेल्या मराठ्यांनी तसा आग्रह कधीच धरला नाही. सत्ता मिळण्याशी मतलब! तीला सत्ता तरी कशी म्हणायची? मालक ब्राह्मण, मांडलिक मराठा! मंत्रालयातल्या शिपायालासुद्धा ‘साहेब’ म्हणावे लागते, इतकी ती हीन दर्ज्याची सत्ता! आता नुकतेच कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांना ‘राष्ट्रपती-नियुक्त’ खासदारपदाची भीख वाढण्यात आली. हे छत्रपती अनेकवेळा निवडणूकीत पडलेत, कारण जनता त्यांना आपले छत्रपतीही मानीत नाही. लोकप्रतिनिधीही मानीत नाही. परंतू संघी-ब्राह्मणांना असे मांडलिक छत्रपती सेवेसाठी लागतात.
मराठे तात्यासाहेबांच्या सत्यशोधक चळवळीची कुबडी वापरून कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे ग्रामीण भागातील दलित-ओबीसी मोठ्या संख्येने कॉंग्रेसमध्ये गेलेत. कॉंग्रेस भक्कम झाली. सत्यशोधक चळवळ खतम झाली! करारच तसा झाला होता. आम्ही तुम्हाला (मांडलिक) सत्ता देतो, तुम्ही सत्यशोधक चळवळ संपवा! त्याकाळी केशवराव विचारे हे एकमेव मराठा नेते होते ज्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळ गावो-गावी रूजविली. बाकीचे सर्व मराठा नेते कॉंग्रेसच्या नादी लागलेत व सत्यशोधक चळवळ नष्ट करायला कारणीभूत झालेत. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये या सत्यशोधक मराठ्यांचे प्रचंड हाल सुरू झालेत. ब्राह्मणांकडून अवमानकारक वागणूक मिळायला लागली. सेम टू सेम खडसे-मुंडे-बावनकुळे! छळ असह्य झाल्यावर हे मराठा नेते कॉंग्रेसमधून बाहेर पडलेत व शेकाप नावाच पक्ष स्थापन केला. परंतू तोवर कॉंग्रेसी ब्राह्मणांनी कट्टर सत्यशोधकविरोधी मराठ्यांना नेता बनविले होते. रॉयवादी यशवंतराव चव्हाण हे कट्टर सत्यशोधकविरोधी नेते म्हणून कॉंग्रेसचे ‘साहेब’ झालेत. कॉंग्रेसमधील या सर्व प्रतिगामी मराठ्यांनी सत्यशोधक चळवळ संपवीली, 1956 नंतर त्यांच्या मराठा वारसदारांनी दलित चळवळ संपवली! मराठ्यांच्या ज्या शाळा-कॉलेजात शिवजयंती-उत्सव साजरा व्हायला पाहिजे होता, त्याऐवजी तेथे 10 दिवसांचा गणपती-उत्सव थाटामाटात साजरा होऊ लागला. मंत्रालयात जेथे बळीराजा महोत्सव साजरा व्हायला पाहिजे होता, तेथे सत्यनारायणाच्या भाकडकथा मनोभावे ऐकविल्या गेल्यात. मंत्रालयात सत्यनारायणाची पोथी वाचणारा ब्राह्मण, कधी मुख्यमंत्री बनून छातडावर बसला, हे या मराठ्यांना कळलेसुद्धा नाही! सेम टू सेम 300 वर्षांपूर्वीच्या मराठा सरंजामदारांनी पेशवाई उरावर बसवून घेतली, तशीच 2014 साली या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मराठ्यांनी भाजपाला पाठींबा देऊन फडणवीसी-पेशवाई महाराष्ट्राच्या छातडावर बसवली. सेम टु सेम इतिहासाची पुनर्रावृत्ती!
-3-
हा सर्व इतिहास सांगण्याचा उद्देश हा की, अंगामा नेत्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागू नये! हे पक्ष कधीच पुरोगामी नव्हते व यापुढेही ते कधीच पुरोगामी होणार नाहीत, याची गॅरंटी तात्यासाहेबांनी दिलेली असतांनाही तुम्ही ‘पुरोगामी’ आयडेंटी घेऊन या पक्षांमध्ये जाणार व आमदारकी-खासदारकीची स्वप्ने पाहात बसणार! तुम्ही खूपच लाचार झालेत आणी पुढे आयुष्यभर लाचार राहण्याचा बॉण्ड पेपर लिहून दिला, तर कदाचित तुम्ही या पक्षामार्फत आमदार-खासदारकी मिळवालही, मंत्रीसुद्धा व्हाल! लाल दिव्याची गाडी, प्रशस्त बंगला व नोकर-चाकर, ऐषआरामी जीवन जगाल. आम्हाला आनंदच वाटेल! परंतू तुम्हाला ज्या समाजाने पुरोगामी होण्याची संधी दिली व ज्या समाजाला तुम्ही फुले-शाहू-आंबेडकरी ‘बळीराष्ट्राचे स्वप्न’ दाखवीले, त्याचं काय होईल? राष्ट्रवादी कॉंग्रेससारखे पक्ष पुन्हा फडणवीसी पेशवाई महाराष्ट्राच्या छातडावर बसवणार नाहीत, याची काय गॅरंटी तुमच्याकडे आहे? हेच राष्ट्रवादी सरंजामदार फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीत पुन्हा सामील होणार नाहीत, याची काय गॅरंटी आहे तुमच्याकडे? कॉंग्रेसनेच बाबरी मशिद पाडण्याचा रस्ता प्रशस्त करून दिला व संघ-भाजपाला देशाच्या छातडावर बसायला मदत केली, तीच कॉंग्रेस पुन्हा काशि-मथूरेच्या मशिदी पाडण्यासाठी संघ-भाजपाला मदत करणार नाही, याची कोणती खात्री तुमच्याकडे आहे?
त्यापेक्षा मी सांगीतलेल्या तीन मार्गांपैकी दोन नंबरच्या मार्गावर या! जर तसे झालेच, तर पुढची तुमची वाटचाल कशी असावी, याबद्दलची चर्चा शेवटच्या तिसर्‍या भागात करू या!
तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
       (लेखनः 19 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 20मे20)
लेखकः- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27270
Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/