http://shrwandeore.blogspot.in/

मराठाः क्रांतीमार्च ते लॉंगमार्च, भागः2

मित्रहो!, आपण माझा मराठा मोर्चावरील ‘‘क्रांती मोर्चा की गर्दीमोर्चा’’ हा प्रदिर्घ (29) पानांचा) लेख वाचला. या लेखाचा काही भाग सुप्रसिद्ध वैचारिक पाक्षिक ‘परिवर्तनाचा वाटसरू’ ने 15 नोव्हे ते 30 नोव्हे 2016 च्या अंकात छापला आहे. आता याच विषयावरील दुसरा लेख आपल्या वाचकांसाठी देत आहे. कृपया प्रतिक्रिया कळवावी ही विनंती...........   
 ..........................................
मराठाः क्रांतीमार्च ते लॉंगमार्च
                                     
            प्रा. श्रावण देवरे,           
                अध्यक्ष महाराष्ट्र ओबीसी संघटना
              s.deore2012@gmail.com
               Mobile: 94 22 78 85 46

1
भारतीय शोषणव्यवस्था पूर्णपणे ‘वर्ण-जाती’वर आधारित असेपर्यंत तिच्यात वर्गीय भेद अथवा वर्गीय जाणिवा निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. इंग्रजांच्या आगमनानंतर प्रथमच देशाची ओळख समता, उदारमतवाद, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता वगैरे भांडवली मुल्यांशी झाली. इंग्रजी शिक्षण, तंत्रज्ञान, देशी-विदेशी दळण-वळण व वाढता व्यापार यातून जी अर्धवट क्रांती झाली ती जातीव्यवस्थेच्या वटवृक्षावर वर्गीय कलम करणारी ठरली. वर्गीय कलमातून आपल्या मूळ जातीची फांदी नष्ट होण्याचा धोका लक्षात घेता उच्चजातीयांनी आपापल्या परीने ती वाचविण्याची पराकाष्ठा केली. यासाठी प्रातिनिधिक उदाहरण म्हणून टिळकांचे घेता येईल. नव्या भांडवली संकल्पना वापरून जुन्या जातीव्यवस्थेचे उदात्तीकरण किती उत्कृष्टपणे करता येते त्याचा हा नमुना पहा........
‘’........... जुने कारागिरांचे संघ (गिल्ड) व धंदे करणार्‍या जाति यांच्यात बरेच साम्य होते. जात ही औद्योगिक संस्था होती व औद्योगिक बाबतीत तिचा उपयोग ध्यानी घेता तिला नाशापासून वाचविले पाहिजे.’’1
‘’एकंदर हिंदू समाजाचा विचार करिता ब्राह्मणवर्गाने राजकारणी खटपट सोडून स्वतः सुताराचे, लोहाराचे किंवा वैश्याचे धंदे केल्यापासून देशाचा अधिक फायदा होईल असे आम्हास वाटत नाही......’’2
     
इंग्रजांबरोबर आलेल्या वर्गीय झंझावातात व सत्यशोधक चळवळीच्या लाटेत जातीव्यवस्था वाहून जात असतांना आपल्या जातीच्या वाट्याला शूद्र-बलुतेदारांची कामे येतील की काय, या भयानक कल्पेनेनेच ब्राह्मण-जात किती चिंताग्रस्त झाली होती, याची कल्पना टिळकांच्या वरील विवेचनावरून येते. आणि म्हणून यावर टिळक जे उपाय सांगतात त्यात ‘1) ब्राह्मणांनी राजकारणी खटपट करावी म्हणजे राजकीय शासक बनावे, 2) ब्राह्मणांनी आपल्याच उपजातीत लग्ने करून आपली जात भक्कम करावी, 3) सामाजिक सुधारणांना विरोध करावा व 4) कोणत्याही परिस्थितीत सुतार, लोहार वगैरे शूद्रांची कामे करू नयेत.’3
अर्थात टिळकांची ही सारी खटपट तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या जातीअंतक सत्यशोधक चळवळीच्या पार्श्वभूमीवर होती, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण तात्यासाहेब केवळ जात नव्हे तर जातीव्यवस्थाच नष्ट करायला निघाले होते. आणि टिळक उपजातीत लग्ने करून आपली जात भक्कम करायचे म्हणत होते. जात नष्ट होणे शूद्रादिअतिशूद्रांसाठी फायद्याचे होते तर ब्राह्मणांसाठी तोट्याचे! तात्यासाहेबांनी मराठा(?)-कुणबीसकट सर्वच शूद्रादिअतिशूद्रांना सत्यशोधक म्हणून संघटित करीत जातीव्यस्था नष्ट करण्यासाठी कंबर कसली होती. तात्यासाहेबांचे हे कंबर कसून केलेले काम म्हणजे युरापातील 16 व्या शतकात यशस्वी झालेल्या प्रबोधन क्रांतीचे (Renascence Movement चे) भारतीय स्वरूप होय! युरोपच्या वर्गीय समाजातील या प्रबोधन क्रांतीने जुनी सरंजामशाही व्यवस्था मुळापासून उखडून टाकून नवी ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ची भांडवली लोकशाही क्रांती यशस्वी केली. मात्र वर्ण-जातीव्यस्थेच्या भारतात तात्यासाहेब-प्रणित प्रबोधन क्रांतीचे काम किती कठीण आहे, हे 166 वर्षानंतरही जातीच्या नावाने निघत असलेल्या ‘क्रांती(?) मोर्च्यांवरून सिद्ध होते.
 जात नष्ट करायची तर जातीच्या संघटनाही नको, म्हणून तात्यासाहेबांनी व त्यांच्या शिष्यांनी शेतकरी संघटना, कामगार संघटना उभारल्या! ज्या काळात वर्गव्यवस्था अस्तित्वातही नव्हती, होते फक्त वर्ग-काम धारण केलेली काही माणसे.....! अशा काळात भविष्याचा वेध घेत तात्यासाहेबांनी (आपल्या instinctive जाणिवेने) जातीच्या वटवृक्षाला मुळासकट उलथून टाकण्यासाठी जातीअंतक वर्गीय-लढे सुरू केलेत. जुनी व्यवस्था मुळासकट उलथूनच नवी व्यवस्था आली पाहीजे हा
तात्यासाहबांचा निर्धार, तर जाती जिवंत ठेवूनच नव्या व्यवस्थेचे फायदे उपटायचे हा टिळकप्रणित उच्चजातीयांचा हेका! ब्राह्मणांचा हा जातीय-हेका झिरपत-झिरपत तथाकथित क्षत्रिय म्हणविणार्‍या जातींपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही.
आता हा झिरपण्याचा सिद्धांत इंग्लीश अधिकारी लॉर्ड एलेन बरो हे बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष असतांना त्यांनी कंपनीच्या संचालकांच्या अध्यक्षाला लिहीलेल्या पत्रात मांडला आहे. ‘वरच्या वर्गांना (उच्चजातींना) शिक्षण दिले की ते आपोआप झिरपत-झिरपत कनिष्ठ वर्गांपर्यंत (जातींपर्यंत) पोहोचेल’,4 असे त्याचे म्हणणे होते. पण त्याला हे माहीत नव्हते की, जात ही अशी एक भितं आहे की ती फक्त उच्चजातीच्या हिताचं असेल तरच पारदर्शक बनते आणी कनिष्ठ जातीच्या हिताचं असेल तर ही भिंत आपोआप अ-पारदर्शक बनते. म्हणजे काय? उदाहरण सांगीतल्याशिवाय आमच्या बहुजनांना काही कळतंच नाही....  उदाहरणार्थ.... ‘’आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून संघटित राहीलो तरच आपल्या देशाचे भले होईल व देशाला स्वातंत्र्यही मिळेल.’ हे टिळक-आर.एस.एस.च्या ब्राह्मणांचे म्हणणे ताबडतोब सर्व जाती-जमातीच्या भिंतींना पारदर्शक करीत (भिंतीना छेदित) थेट आदिवासींपर्यंत जावून भिडते. याच्या उलट दुसरे उदाहरण घ्या... ‘पिछडा पावे सौ मे साठ’ हे उच्चवर्णिय लोहियांचे म्हणणे कम्युनिस्ट-समाजवादी ब्राह्मणांपर्यंतही पोहोचत नाही, ते झिरपत जाऊन क्षत्रिय-मराठा-जाट-पटेलांपर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा जेव्हा जातीव्यवस्थेवर कुठाराघात होणार असतो तेव्हा तेव्हा ही भिंत आपोआप भक्कम-अपारदर्शक (डॉ. फिक्शीट वा बांगर सिमेंटची) बनते. आणि ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ ही घोषणा सर्व जातीधर्माच्या भिंती छेदत आदिवासींपर्यंत जाऊन पोहोचते व तत्काल हिंदू-मुस्लीम दंगलीत परावर्तीत होते.
‘आपली जात भक्कम केली पाहीजे व नव्या वर्गव्यवस्थेचे फायदे उपटले पाहीजे’ हा 19 व्या शतकातील ब्राह्मण-जातीचा सिद्धांत अत्यंत खालच्या जातींपर्यंत झिरपत जायला खूप काळ गेला असला, तरी उतरंडीप्रमाणे तो ताबडतोब लगतच्या तथाकथित क्षत्रिय जातींपर्यंत पोहोचला. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंच्या चळवळीत येऊन शहाणे-सुशिक्षित झालेल्या गंगाराम म्हसकेंनी हा ब्राह्मणी धागा पकडला, आणि त्यांनी स्वतंत्रपणे मराठा जातीची शिक्षण संस्था सुरु केली.  तात्यासाहेबांनी त्याला विरोध केला. परंतू ज्या तथाकथित क्षत्रियांची रक्त-कुंडलीच गद्दार आहे, त्यांना समजावून सांगण्यात महात्मा महापूरूषही हतबल ठरतात. ब्राह्मणवादाच्या मांडीवर जाऊन बसण्यासाठी आवश्यक असलेल्या मराठा जातीयवादाची बीजे अशाप्रकारे गंगाराम म्हसकेंनी पेरून ठेवली. ‘‘खासा मराठा म्हणविणारा’’ या परिशिष्टात चर्चा करायला आलेल्या माणसाला तात्यासाहेब उघडपणे व स्पष्टपणे जात विचारतात तेव्हा तो आपली जात ‘मराठा’ सांगतो. तात्यासाहेब त्याला खडसावतात-
‘‘........मी- ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारांपासून तो ब्राह्मणांपर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात. तरी तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगडा तेवढ्याने होत नाही.’’ गृ.- ‘‘तर मी कुणबी आहे असे समजा’’......’’ 5
      उपरोक्त संभाषणावरून एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट होतो की, तात्यासाहेबांना ‘मराठा’ या शब्दावरून धृवीकरण नको होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य ‘ब्राह्ण-ब्राह्मणेतर’ धृवीकरणावर केंद्रीत झाले होते. जातीअंतासाठी हेच एकमेव धृवीकरण धोरण म्हणून उपयोगी होते. त्यांना हेही माहीत होते की, ब्राह्मण आपली जातीव्यवस्था टिकविण्यासाठी संकटकाळात तथाकथित क्षत्रियांचा गैरवापर करुन घेतो. म्हणून ते मराठा शब्द जाणीवपूर्वक टाळतात व छत्रपती शिवाजीलाही कुणबी म्हणतात. पण शेवटी तेच घडले ज्याची भीती त्यांच्या मनात होती. ब्राह्मण सुधारकांच्या व ब्राह्मण-राष्ट्रवाद्यांच्या नादी लागून गंगाराम म्हसके तात्यासाहेबांच्या या जातीअंतक धृवीकरणाला तडा देऊ पाहात होते. अर्थात त्याकाळी ‘मराठा जात-अभिमानी’ लोक होतेच. ‘खासा मराठा म्हणविणारा’ या परिशिष्टातील संवादात तात्यासाहेबांनी खडसावल्यानंतरच तो गृहस्थ नाईलाजानेच ‘कुणबी’ असल्याचे सांगतो. ‘तर मी कुणबी आहे असे समजा’ या त्याच्या भाषेवरून व उत्तर देण्याच्या (उद्धट) पद्धतीवरूनच स्पष्ट होते की, खडसावल्यानंतरही तो स्वतःला ‘मराठा जातीचा’च समजतो. पुढे तात्यासाहेब त्याला त्याचा उद्योग-व्यवसाय विचारतात, तेव्हा उत्तरात तो म्हणतो-
      ‘‘....... ‘सातार्‍यातील आप्पासाहेब महाराजास निंबाजवळच्या भागूबाई तार्कशणिचा नाद लागण्याचे पूर्वी आमच्या घराण्याने त्याजपासून एकदोन लक्ष रूपये सहजात कमावून आणले होते; ते आम्ही हा काळपावेतो हरी हरी करून स्वस्थ खात बसलो आहों’.....’’ 6
      आप्पासाहेब महाराजांबद्दल अधिक माहीती देतांना याच ग्रंथात संपादक मंडळ लिहीते की, हे सातार्‍याच्या गादीचे राजे होते व ते बाहेरख्याली होते.7 अशा विलासी मांडलिक राज्याकडून या गृहस्थाने एकदोन लाख रूपये सहज कमवून आणले, म्हणजे कष्ट करून नव्हे. याचा अर्थ हा गृहस्थ या राजघराण्याच्या जवळचा नातेवाईक असावा व राज्याच्या भल्या-बुर्‍या (बाहेख्याली) कामातील मदतनीस-दलाल म्हणून एकदोन लाख रुपयांची बक्षिसी मिळवून स्वस्थ खात बसला होता. म्हणजे कोणताही काम-धंदा न करता रयतेला लुबाडून खाणार्‍या वतनदार घराण्याशी नाते असणारा हा गृहस्थ स्वतःला ठामपणे मराठा जातीचाच म्हणवतो, यात काहीच आश्चर्य नाही. अशा तत्कालीन मराठा माणासांचे प्रतिनिधित्व करणार्‍या गंगाराम म्हस्केंनी मराठा जातीयवादाची बीजे पेरलीत, ज्याचे परिणामी सत्यशोधक चळवळ ताब्यात घेणे, तिचे रेटींग वाढविण्यासाठी तीचे रुपांतर ब्राह्मणद्वेषी-ब्राह्मणेतर चळवळीत करणे व नंतर ती चळवळ कॉंग्रेसी ब्राह्मणांकडे विक्रीस देणे व त्या बदल्यात राज्याची ‘मांडलिक’ सत्ता मिळविणे, अशी अनेक विषारी फळे या मराठा-जातीयवादी रोपट्याला आलीत, जी शूद्रादिअतिशूद्रांना पचवावी लागलीत. मराठा क्रांती (?) मोर्चा म्हणजे या जातीयवादी काटेरी झुडुपाला लागलेले आधुनिक विषारी फळ होय!
2
मराठा मोर्च्यावर आजवर बरेच काही बोलले गेले. एखाद दुसरा अपवाद सोडला तर सर्वच मिडिया (Print & E-media) अक्षरशः आरत्या ओवाळत आहे. लेखक, विचारवंतही सगळे साहित्यिक नॉर्म्स व वैचारिक बांधिलक्या कचराकुंडीत टाकीत (जातीला जागत) मराठा मोर्च्याचे कौतुक करीत आहेत. यात सर्वात जास्त फटकेबाजी सदानंदजी मोरे यांनी टि.व्ही चॅनल्सवर केली आहे. बहुतेक सर्वच प्रॉमीनंट चॅनल्सवर ते मराठा मोर्च्याची बाजू घेतांना दिसत आहेत व ऐतिहासिक दाखले देत मराठा हे कुणबीच असल्याचे सांगत आहेत.7 त्यांच्या मुलाखतीतील वारंवार पुढे आलेला एक सिद्धांत पहा-
 ‘ शांततेच्या काळात नांगर धरणारा कुणबी व युद्धाच्या काळात शस्त्र धरणारा मराठा हे दोघे एकच!’8
आता हा इतका साधा-सरळ ऐतिहासिक सिद्धांत यापूर्वी आमदार मेटेंनी आपल्या भाषणांमधून अनेक वेळा मांडला आहे. मेटेंचे एकूणच ज्ञान पाहता आम्ही त्यांच्याकडे व त्यांच्या या सिद्धांताकडे दुर्लक्ष्य केले. पण हाच बाळबोध सिद्धांत जेव्हा सदानंद मोरेंसारख्या विद्वानांच्या तोंडी ऐकायला
मिळतो, तेव्हा मती गुंग होते. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयांनी, हायकोर्टांनी, विविध मागासवर्गीय आयोगांनी किमान 10 वेळा स्पष्टपणे निकाल दिलेले आहेत की, ‘कुणबी आणि मराठे हे एक नाहीत, त्या वेगळ्या जाती आहेत. तसेच मराठा हे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले असल्याने त्यांना आरक्षण मिळू शकत नाही.’9 लोकशाहीतली मुल्ये तुडवून, न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थांचा अनादर करीत, संशोधनाची सर्व शिस्त बाजूला ठेवून व ऐतिहासिक मोडतोड करून आदरणीय सदानंद मोरेंसारखे विद्वान जेव्हा जातीसाठी माती खातात, तेव्हा लोकशाहीच्या भवितव्याबाबत निश्चितच चिंता वाढत जाते.
आता ते जे म्हणत आहेत, की शांततेच्या काळात शेती करणारा कुणबीच युद्धकाळात मराठा सैनिक बनून लढाईवर जात होता.’, हे खरे आहे काय? याबाबत प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील आपल्या शिवाजीवरील महाग्रंथात लिहीतात-
      ‘’ मराठ्यांचे सैन्य मुख्यतः कुणबी, सुतार, वाणी, इ. हिनजातीयांनी बनलेले असल्याचे अली इब्राहिम खान त्याच्या ‘तारीख-इ-इब्राहिम खान’ मध्ये म्हणतो......... सतीशचंद्र त्यात कोळी आदिवासींची भर घालतात. मलिकअंबरने लहान किल्ल्याच्या शिबंदीचा प्रमुख नाईकवाडी नेमला होता (तामस्कर, पान 288). शिवाजीने ही परंपरा पुढे चालविल्याचे दिसते (पा. 32). ही शिबंदी रामोशी व बेरड या आदिवासी जमातींची असे......’’10
          पुढच्या प्यारामध्ये कॉ. शरद् पाटील बाबा पुरंदरेंची साक्ष काढीत स्पष्ट करतात की, ‘गाव पाटलांच्या संरक्षणासाठीसुद्धा शरीरसंरक्षक म्हणून वीरवृत्तीचे महार नेमलेले असायचे.’ पुरंदरे उदाहरण देतांना सांगतात, देशमुख बाजी पासलकर यांच्या पदरी ‘एक अत्यंत शूर मांग व खंड्या महार’ होते. वा.सी. बेंद्रेही स्पष्ट करतात की, मोगलांशी लढण्यासाठी कोळी व बेरड या अतिशूद्रजमाती आणि धनगर ही भटकी जमात या जमाती उतरल्या होत्या.11
      शिवरायांसकट सगळ्याच राज्यांच्या सैन्यात हिनजातीयांची संख्या मोठी होती. अंगरक्षकांपासून ते सरदार सेनापतींपर्यंत आणि खबर्‍यांपासून ते शिबंदींपर्यंत सर्व ठिकाणी शुद्रादिअतिशूद्रच होते, हे ऐतिहासिक सत्य शिवाजीकालीन इतिहासकांपासून सद्यकालीन संशोधकांपर्यंतचे विद्वान मांडत आहेत. मग या सर्व हिनजातीय लढवैय्यांमध्ये कुणबी हीच एकमेव हिन जात शस्त्र हाती धरताच ‘मराठा’ कशी बनू शकते? आणि बाकी जाती-जमाती शूर-वीर असूनही व पराक्रम गाजवूनही मराठा का बनल्या नाहीत? कारण शेती तर इतर हिनजातीयही करीतच होते.12 याचा अर्थ हे स्पष्ट होतो की, शेती सोडून शस्त्र धारण करण्याने कोणीही मराठा होत नाही.
मराठाचे मूळ दुसरीचकडे आहे. छत्रपती शिवाजी राजेंमुळे स्वराज्य म्हणून महाराष्ट्राला स्वतंत्र ओळख मिळाली. महाराष्ट्रात राहाणारा तो मराठा आणि हा मराठा शूर-वीर पराक्रमी म्हणून ओळखला जाऊ लागला. मराठा शब्दाला देश पातळीवर प्रतिष्ठा मिळाली. समाजातील उच्चभ्रू (उच्जातीय) लोक केवळ आर्थिकच शोषण करतात असे नाही, तर ते हिनजातीयांना त्यांच्या स्वतःच्या कष्टाने मिळणारी प्रतिष्ठाही शोषून घेतात. इंग्रजी काळात मराठा म्हणून मिळणारी प्रतिष्ठा वतनदार-जमिनदार जातींनी आपल्या स्व-जातीत बंदिस्त केली व इतर पराक्रमी जातींना प्रतिष्ठा-हिन केले. हाच उद्योग ब्राह्मणांनी पेशवाईच्या काळात केला. त्यांनी पेशवाईत ग्रामण्ये करून ब्राह्मण्य (पुरोहितशाही) स्वजातीत बंदिस्त केले.13 जेत्या आर्यांच्या भरभराटीच्या काळात अनेक अनार्य राज्यांना आर्यभूषण म्हणवून घ्यायचा मोह व्हायचा. महामानव गौतम बुद्धांना लोक आर्य का म्हणत होते, याचाही उलगडा यातून व्हायला हवा. मराठा शब्दाचेही असेच झाले. ‘96 कुळी मराठा’ हा कुलधर्मी व प्रदेशवाचक वाक्प्रचारही जातीत बंदिस्त झाला. जी 96 कुळे तथाकथित मरांठ्यांमध्ये आहते, ती सर्व कुळे तेली, माळी, न्हावी. धोबी जातींपासून ते महार, चांभार जातीतही आहेत, यावरूनही कुणबी-मराठा सिद्धांताचा फोलपणा सिद्ध होतो.14 खुद्द कुणबी जातींच्या सर्वच संघटना एकासूरात म्हणत आहेत की, मराठा व कुणबी या वेगळ्या जाती आहेत व मराठा जात उच्च असून ती आमचीही शोषक आहे. कोकणातल्या कुणबी संघटनेने मराठा जातीविरोधात व त्याच्या आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात केस दाखल केली आहे.15
देशमुख, पाटील वगैरे हे आनुवंशिक होते, त्यामुळे ते शांततेच्या काळात पुन्हा कुणबी-शेतकरी कसे होऊ शकतात? कॉ. शरद् पाटील रामचंद्र निळकंठ अमात्यच्या ‘आज्ञापत्रा’चा हवाला देतात-
‘’....... मनुस्मृतीच्या काळानंतर, म्हणजे पहिल्या शतकानंतर, ग्रामपती, दशी व विंशी हे इनामधारक आनुवंशिक वतनदार-जमीनदार झाले....... रामचंद्र निळकंठ अमात्य आज्ञापत्रा’त सांगतो-
‘’ राज्यातील वतनदार, देशमुख व देशकुळकर्णी पाटील आदिकरून यास वतनदार म्हणून म्हणावे ही प्राकृत परिभाषा मात्र आहे. ते स्वल्पच परंतू स्वतंत्र देशनायकच आहेत.’’ 16 (जाड ठसा माझा)
स्वतंत्र देशनायक असलेले वतनदार हातात नांगर धरून शेती करतील अशी कल्पना तरी कोणी करू शकतो काय? स्वतंत्र देशनायक असलेले हे वतनदार खालून सामंतप्रथेच्या काळात (सुरूवातीच्या) काळात ग्रामवासींकडून ग्रामाधिपती म्हणून नियुक्त झालेले होते व वरून सामंतप्रथेच्या काळात राजाचे वैतनिक अधिकारी होते. दोघांचे काम महसूल गोळा करणे व सोपानाप्रमाणे वाटून घेणे हे होते. नंतर हे देशनायक कसे मुजोर झालेत हे आपल्याला कॉ. शरद् पाटील सांगतात-
‘’...... शिवाजी जर पारंपरिक वतनदार व त्यांच्या जातींवर अवलंबून राहीला असता, तर तो स्वराज्य उभारूच शकला नसता. कारण हे वतनदार पिंडानेच स्वराज्यद्रोही होते असे रामचंद्र अमात्य त्याच्या आज्ञापत्रात सांगतो-....’’17
स्वराज्यद्रोही असलेले हे वतनदार(मराठा) कधीतरी नांगर हाती धरून कुणबी होतील, अशी कल्पनाच कोणी करू शकत नाही.
या ग्रंथाच्या तिसर्‍या प्रकरणाची सुरूवात करतांना कॉ. शरद् पाटील ‘राजतरंगिणी’ उधृत करतात-
‘’ग्रामीण जनता (शेतकरी) आपल्या वार्षिक गरजेपेक्षा जास्त खावटीचे धान्य व शेतीला लागतील त्यापेक्षा जास्त बैल ठेवणार नाहीत यासाठी सतत कारवाई करावी. कारण त्यांनी अतिरिक्त धन बाळगले तर ते एका वर्षात राजशासन न जुमानणारे डामर(काश्मिरमधील देशमुख-देसायासारखा जमिनदार-वतनदार) बनतील.’’ 18
शेतकरी-कुणबी-कुळ हे वतनदार-जमिनदार(मराठा) होणार नाहीत, याची किती काटेकोर काळजी
घेतली जात होती, हेच यावरून सिद्ध होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे (खानदानी) मराठा समाजातील फार मोठे सुधारक, प्राच्यविद्यापंडित, संशोधक व विचारवंत होत. त्यांनी तर आपल्या एका संशोधनपर लिहीलेल्या निबंधात सिद्ध केले आहे की, मराठा व कुणबी या दोन वेगवेगळ्या जाती आहेतच पण ते दोन वेगळे वंश आहेत-
‘’..... हे कोडे मराठे हे शक (परकीय) आणि कुणबी हे द्रावीड (मुलनिवासी) असे मानल्याशिवाय सुटण्याचा संभव नाही......’’20  (कंसातील शब्द व जाड ठसा माझा)
‘’.... ह्यावरून बैलवाल्या कुणब्यांचे मुळ स्थान दक्षिणेतले नसावे आणि घोडेवाल्या मराठ्यांचे मूळ स्थान तर मध्य आशियातले असावे, असे अनुमान करण्यास काय हरकत असावे?’’21

त्यांचे व्यवसायही वेगळे आहेत-
‘’............ महाराष्ट्रातले कुणबी मात्र अस्सल द्रावीड आणि मराठ्यांचे दक्षिणेतील आगमनापूर्वी येथे आलेल्या किंवा येथेच मूळचे असलेल्या कोणा इतर वंशाचे असतील, असे त्यांच्या चालीरितीवरून दिसते.............मराठ्यांचे मुख्य धंदे दोन. कटकटीच्या काळी मुलूखगिरी, किंबहुना प्रतिष्ठीत लुट आणि एरवी जमीनदारी. कुणब्यांची वृत्ती एकच आणि ती सात्विक. ती म्हणजे जमिनदारी व जमिनीची मशागत........ महाराष्ट्राच्या वसाहतीचे मराठ्यापेक्षाही कुणब्यांकडे अधिक श्रेय जाते हे (रा. वि. ना. अत्रे लिखित ‘गावगाडा’) या बालबोध पुस्तकावरून उघड होते.’’ 22   (कंसातील शब्द माझे)
सदानंद मोरेंचा दुसरा मुद्दाही असाच बालीश आहे. त्यांचे म्हणणे असे की, ‘पुर्वी सर्वच ओबीसी जाती ‘क्षत्रिय’ म्हणवून घेत होते, आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागास होण्यासाठी त्यांनी क्षत्रियत्व नाकारले मग एकट्या मराठ्यांवरच का क्षत्रियत्वाचा ठपका मारून आरक्षण नाकारता?’ 23
ओबीसींना आरक्षण देण्यासाठी ज्या कसोट्या कालेलकर आयोगाने व नंतर मंडल आयोगाने तयार केल्या व लावल्या त्यात क्षत्रियत्वाचा मुद्दा कुठेच नाही. नांगरधारी, शस्त्रधारी अशी कोणतीही कसोटी नाही. 11 कसोट्यातील 22 गुणांपैकी 11 किंवा 11 पेक्षा जास्त गुण ज्या वर्गाला वा जातीला मिळतील ते मागास ठरत होते व त्यांनाच आरक्षण वगैरे देण्याची शिफारस मंडल आयोगाने केली. मराठा समाजाला 11 पेक्षा कमी गुण मिळाले म्हणून ते पुढारलेले ठरलेत. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने (म्हणजे बापट आयोगाने) तयार केलेल्या कसोट्यांमध्येही उपरोक्त क्षत्रिय वा शस्त्रधारी मुद्द्यांचा उल्लेख नाही. 25 जुलै 2008 च्या बैठकित बापट आयोगाचे एक मान्यवर सदस्य प्रा. डी. के. गोसावी हे तर आपल्या क्षेत्र पाहणीचे निष्कर्ष मांडतांना स्पष्टपणे सांगतात –
‘’ प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व, जमिनीची मालकी, वतनदारी, पाटीलकी-देशमुखी, आर्थिक सत्तेचे केंद्रिकरण, शिक्षण व सहकार क्षेत्रातील सत्ता तसेच काही प्रमाणात उद्योधंद्यातील वर्चस्व या बाबींचा विचार करता हा समाज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या प्रगत आहे. सबब संपूर्ण मराठा समाज ओबीसी या प्रवर्गात समाविष्ट करणे सामाजिक न्यायाचे तत्त्वाला धरून होणार नाही.’’ 24
बापट आयोगाच्या या क्षेत्रपाहणीच्या निष्कर्षात दोन जिल्हे वगळता बाकी बहुसंख्य जिल्ह्यात 01, 02, 03, 04 असे गुण मराठा जातीला मिळालेले आहेत.25 यावरू हा समाज किती पुढारलेला आहे, याची कल्पना येते.
आरक्षण हे असमान समाजातील उपलब्ध साधन-सत्ता-संपत्तीच्या समान वाटपाची हमी देणारे आहे. उपलब्ध असलेल्या संधींचे प्रातिनधिक स्वरूपात समान वाटप व्हावे म्हणून आरक्षण सिद्धांत आला. कोणत्या वर्गाला किती कमी मिळाले या ऐवजी कोणत्याही वर्गाला आपल्या संख्येतील प्रमाणापेक्षा जास्त मिळू नये हा साधा सरळ हेतू आहे. आपल्या संख्येतील प्रमाणापेक्षा जास्त मिळवायचे असेल तर, ते मेरिटच्या आधारे मिळविण्याची वाटही मोकळी ठेवलेली आहेच. पण अलिकडे मेरिटची ही ओपन वाटही बुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राखीव जागांना विरोध करतांना मेरिटचा मुद्दा रेटणारे उच्च(?)लोक आता मागास जाती-जमातीयांच्या मेरिटला घाबरून 50 टक्के ओपन जागा स्वतःसाठी बंदिस्त करीत आहेत, यावरून त्यांचा मेरिटचा दावा फोल होता.
3
एखादा अपवाद वगळता, कोणतीही जात आज एकजिनसी राहीलेली नाही. प्रत्येक जातीत आर्थिक स्तर किंवा वर्ग आहेत. शिक्षणामुळे व राजकीयकरणामुळे विविध वैचारिक प्रवाहही निर्माण झाले आहेत. त्यामुळे जात संघटित करतांना या अडचणी येतातच. पण समान हितसंबंधांसाठी जात व जाती एकत्र येतांना दिसतात. राजकीय सत्तेच्या वर्तुळातील सत्ताकांक्षी वा सत्तावंचित जातींमध्ये संघटित राहण्यासाठी सुप्त वा उघड शक्ती कार्यरत राहतात. मराठा मोर्चे फारसे कष्ट न घेता अल्पावधित लाखोंच्या संख्येने निघतात तेव्हा हा हितसंबंधाचा धागा किती पक्का आहे व तो जातीला कसा घट्ट बांधून ठेवतो, हे सिद्ध होते. त्यामुळे मराठा मोर्चा प्रस्थापितांच्या विरोधात आहे, हा दावाही फोल ठरतो. या मोर्चात पुरोगामी-प्रतिगामी, शोषक-शोषित, शासक-शासित व गरीब-श्रीमंत असे सर्वच वर्ग-घटक केवळ जात-भावनेच्या घट्ट बंधनातून मूकपणे-शांततेने सामील होत आहेत.
भारतात क्षत्रिय व ब्राह्मण या दोन वर्ण-जातीच सत्तेच्या वर्तुळात वा परिघावर फिरत असतात. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींचे कॉंग्रेसवर एकहाती वचर्स्व होते, तरीही त्यांनी आपला कौल क्षत्रिय सरदार पटेलांच्या पारड्यात न टाकता ब्राह्मण नेहरूंच्या झोळीत टाकला व नेहरू प्रधानमंत्री झालेत. यावरून त्यांचे कॉंग्रेसवरील एकहाती वर्चस्व काही अटींवर होते. आणि या अटी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घालणारी शक्ती ब्राह्मणी होती. सत्यशोधक-जातीअंतक चळवळीच्या अभावात कॉंग्रेसवर ब्राह्मणी वर्चस्व वाढत जाणे स्वाभाविक होते. देशाच्या केंद्रीय सत्तेचा केंद्रबिंदू ब्राह्मणच रहावा व तो निर्विवाद व्हावा म्हणून गांधी-हत्त्येचा हिंसक मार्गही अवलंबला गेला. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणेतर जातींच्या वाढत्या जागृतीच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावर क्षत्रिय व इतर जातींना त्यांच्या जात-पायरीनुसार सत्तेत सामावून घेतले जाऊ लागले. मंडल आयोगाच्या उदयापर्यंत हे सर्व शांततेत सुरू होते. मात्र मंडल आयोगाच्या आंदोलनातून व त्याने निर्माण केलेल्या जागृतीने ओबीसींनी हे उच्जातीय सत्तासमिकरण बिघडवायला सुरूवात केली. ते अचूकपणे हेरत व्ही.पी. सिंगांनी ब्राह्मणकेंद्रीत केंद्रीय सत्तेच्या विरोधात बंड केले. परंतू सिंग हे जातीव्यवस्थेचे अभ्यासक नसल्याने आपण जातीयुद्धाच्या मैदानात उतरलो आहोत व अब्राह्मणी छावणीचे नेतृत्व करीत आहोत याचे भान त्यांना आले नाही. त्यात त्यांचे सल्लागार समाजवादी ब्राह्मण असल्याने गोंधळ अधिकच वाढला. या सर्व गोंधळात ब्राह्मणी-छावणीला मंडलविरोधात राममंदिराची प्रतिचढाई करणे सोपे गेले. या युद्धात कांशिराम यांच्या बसपाची जातीअंतक राजकीय शक्ती उतरली, परंतू ती मंडलआयोगविरोधी व ओबीसीविरोधी देवीलाल यांच्या बाजूने! त्यामुळे ब्राह्मणी छावणीचा विजय निश्चित होता.
वर्ण-जातीअंतासाठी स्व चा त्याग करणारे बळीराजा, बुद्ध, शाहू, आंबेडकर, व्हि.पी. सिंग असा एक मोठा वारसा आपल्या अब्राह्मणी छावणीला लाभलेला असतांना आज मात्र स्व चा त्याग करायला आम्ही कुचराई का करतो आहोत? वर्ण-जातीअंतासाठी बुद्धाने राजसत्ता सोडली, शाहू राजे यांनी आपले
प्राण पणाला लावले, बाबासाहेबांनी मंत्रीपदाला लाथ मारली, व्ही.पी. सिंगांनी प्रधानमंत्रीपद गमावले. मात्र जातीअंताच्या ऐन मोक्याच्या लढाईत काशीराम यांनी मंडल आयोगविरोधी व ओबीसीविरोधी भुमिका घेत वर्गशत्रू-जातशत्रू असलेल्या देवीलालशी दोस्ती केली. त्यामुळे आर.एस.एस.ला मंडलआयोगावर रामंदिराची सांस्कृतिक चढाई करणे सोपे झाले. अजाणतेपणाने का होईना पण व्ही.पी. सिंग जातीअंताची राजकीय लढाई लढत होते. कांशीराम यांच्या पक्षाने त्याचवेळी राममंदिरविरोधात शंबुक-त्राटका-शूर्पणखां यांच्या स्मारकासाठीची सांस्कृतिक प्रतिचढाई केली असती तर, ब्राह्मणी छावणीचा पराभव त्या काळात निश्चित होता. परंतू स्वतःसाठी प्रधानमंत्रीपद व स्वपक्षासाठी राज्यसत्ता एवढेच मर्यादित उद्दीष्ट असतांना जातीअंताचा विचार कोण कशाला करील? जातीयुद्धात ऐनमोक्याच्या प्रसंगी कुचराई केल्याची शिक्षा बसपाला भोगावी लागत आहे. आज ब्राह्मण-शरण जाऊनच बसपाला सत्ता मिळवावी लागते आहे व ब्राह्मणांनी आशिर्वादाचा हात बाजूला करताच लोकसभेतील बसपाची संख्या शुन्यावर येते. समाजवादी-ब्राह्मणांना सल्लागार ठेऊन जी चूक व्ही.पी. सिंगांनी केली, तीच चूक कांशिराम-मायावतींनी आर.एस.एस.-भाजपाशी अशत्रूभावी मैत्री करून केली. राजकारणात शत्रूशी मैत्री कधीकधी आवश्यकही असते. अशी शत्रूशी मैत्री करणे सोपेही असते. मात्र ही मैत्री शत्रूभावीच असते, याचे भान असावे लागते. शत्रूभावी असलेल्या या मैत्रीवर मात करण्यासाठी जे तत्त्वज्ञान, धोरण व डावपेंच लागतात ते व्यापक असावे लागतात, केवळ राज्यसत्ता मिळविण्याचे ध्येय-धोरण तुम्हाला निश्चितच खड्ड्यात नेणारे असते, हे नंतरचा (व आत्ताचाही) काळ सिद्ध करीत आहे.
शेवटी व्ही.पी. सिंग हे संसदेत खासदारांच्या सद्सद्विवेक बुद्धीला आवाहन करीत या जातीयुद्धाला सामोरे गेले व पराभूत झालेत. कोणतेही युध्द हे सद्सद्विवेकाने नव्हे, तर शास्त्रशूद्ध तत्त्वज्ञान, धोरण व चलाख डावपेचांनी जिंकले जाते. युद्ध-विजयाचे असे धोरण व डावपेंच शिकविणारी सत्यशोधक चळवळ मराठ्यांनी मोडीत काढल्यामुळे मराठाच काय दलितांसकट सर्वच जातीअंतवाले वारंवार ब्राह्मणी डावपेंचांना बळी पडतात व पराभूत होतात. राज्यात सत्तेवर आल्यानंतर आता आपणच खरे राज्यकर्ते व आता आपले स्थान कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, अशा भ्रमात मराठे राहीलेत. त्यांचे गुरु सत्यशोधक न राहता तर्कतीर्थांसारखे ब्राह्मण असल्याने तसा भ्रम निर्माणही केला गेला. संख्येच्या बळावर सत्ता मिळते हा आणखी दुसरा भ्रम निर्माण केला गेला. पण वास्तव वेगळेच होते. जोपर्यंत फुले-आंबेडकरी विचारांचा प्रभाव महाराष्ट्रातील एस्सी-ओबीसी जनतेवर होता तो पर्यंतच मराठे राज्यकर्ते राहू शकत होते. हा वैचारिक प्रभाव कमी होताच पेशवा मुख्यमंत्री होतो व एकहाती सत्ता राबवितो.
पेशवा जाईल व पुन्हा मराठा मुख्यमंत्री होईलही. पण असे राज्य मिळणे म्हणजे मांडलिक राज्यापेक्षाही जास्त अपमानाचे आहे. कारण हे राज्य स्वजातीचे भले करू देण्याचीही परवानगी देत नाही, हे गेल्या 50-60 वर्षात सिद्ध झाले आहे. फक्त आपली काही नातेवाईक घराणी राजकीय व आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे, एवढेच करण्याची परवानगी असते. आणि या छोट्या स्वार्थाच्या बदल्यात एस्सी-एस्टी व ओबीसींच्या चळवळी निष्प्रभ करणे, त्यांचे संभाव्य राजकीय पर्याय खतम करणे आदि नीच कामे मराठा सत्ताधार्‍यांकडून करून घेतली जातात.
मराठ्यांना खरेखुरे राज्यकर्ते व्हायचे असेल तर त्यांना तामिळनाडूप्रमाणे एस्सी-ओबीसींच्या
फुले-आंबेडकरी चळवळीचीच कास धरावी लागेल. परंतू असे न करता ऍट्रॉसिटी ऍक्ट व आरक्षणासारख्या फुटकळ मुद्द्यांवर लाखांचे मोर्चे काढणारे मराठे आणखी खोलात बुडत आहेत. अर्थात मराठा समाजावर संख्येने अल्प असलेले संघ-प्रशिक्षित वा भिडे गुरुजी-प्रशिक्षित मराठा-तरूणांचा प्रभाव आहे. त्यामुळे मराठा मोर्च्याच्या प्रमुख मागण्यात शेतीसुधार, जात गणना, नचिअप्पन कमेटी वगैरे कळीचे मुद्दे कधीच येऊ शकत नाहीत. मराठा समाजात संख्येने जास्त असलेली पुरोगामी माणसं हतबल का होत आहेत व राजीनामा देऊन क्रांती मोर्च्याला प्रतिक्रांतीची वाट मोकळी का करून देत आहेत, याचा गांभिर्याने कोणीही विचार करीत नाहीत. संभाजी ब्रिगेडचे संस्थापक व माजी अध्यक्ष असलेले प्रविण गायकवाड टी.व्ही. चॅनलवरील चर्चेत मला नेहमी सांगतात की, ‘देवरे सर मराठा समाजातील पुरोगामी व्यक्तींचे योगदान दुर्लक्षित करतात.’ त्यासाठी ते बाबा आढाव, महर्षी विट्ठल रामजी शिंदे, न्यायमुर्तीद्वय सावंत व कोळसेपाटील आदिंची नावे घेतात. प्रत्येक जातीत अशी पुरोगामी माणसं आहेत. प्रश्न असा आहे की, या पुरोगामी व्यक्तींना आपापल्या जातीत काय किंमत आहे? न्यायमुर्तीद्वय सावंत व कोळसेपाटील यांना मराठा मोर्च्याच्या निर्णय-समितीतून अपमानास्पद पद्धतीने बाहेर का पडावे लागते? याच न्यायाने काही हुशार ब्राह्मण लोक आगरकर, रानडे, राजाराम मोहनरॉय अशी बोटावर मोजण्याइतकी पुरोगामी नावे घेऊन ‘ब्राह्मण समाजही पुरोगामी आहे’, असे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.
कोणत्या जातीत किती पुरोगामी आहेत, यावरून ती जात किती पुरोगामी, हे ठरविता येत नाही. संख्येला फुटपट्टी समजलो तर मग बौद्ध (महार) जात ही सर्वात कमी पुरोगामी म्हटली पाहिजे, कारण त्याच्यात एकच बाबासाहेब होऊन गेलेत. मुख्य मुद्दा हा आहे की, आपल्या जातीतल्या महापुरूषाला-महास्त्रीला जातीत किती स्पेस मिळाला? स्पेसची फुटपट्टी वापरली तर सर्वात जास्त पुरोगामी जात महारच म्हटली पाहिजे, की जीने बाबासाहेबांच्या एका आदेशाने क्रांतीकारक बौद्ध धम्म स्वीकारला. आम्ही ओबीसी जातींमध्ये काम करतांना फुले-शाहू-आंबेडकर, कबीर, बौद्ध, सावित्रीमाई आदि महापुरूषांची व महास्त्रीयांचे विचार-कार्य सांगून जी प्रबोधनाची मोहीम राबविली, त्याचे सुपरिणाम आज स्पष्ट दिसत आहेत. 1985 पर्यंत हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण अशा जातीय व धार्मिक दंगलीत मोठ्या प्रमाणात ओबीसी तरूणांचा गैरवापर होत होता. मात्र मंडल आयोग आंदोलनासमवेत आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी ओबीसींचे जे प्रबोधन केले, त्यामुळे आजचा ओबीसी तुलनेने वर्धिष्णू पुरोगामी होत आहे. आजचेच उदाहरण घ्यायचे तर नाशिक-त्र्यंबकेश्वर, सातारा, धुळे, जालना-बीड आदि असंख्य ठिकाणी होत असलेल्या दलितविरोधी दंगलीत दंगलखोर म्हणून मराठा तरूणच आहेत, ओबीसी नाहीत.26
जात जसजशी कनिष्ठ होत जाते तसतशी ती पुरोगामी विचारांसाठी भूसभूशीत होत जाते, असा ढोबळमानाने सिद्धांत मांडला जाऊ शकतो. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांना बापाने घराबाहेर हाकलले व जातीने वस्तीबाहेर काढले. मात्र असे असले तरी त्यांना प्राप्त झालेल्या विविध जात-धर्मीय अनुयायात माळी व ओबीसी शिष्यांची संख्या मोठी होती. यात अर्थातच जातीचे कनेक्शन नव्हते तर, निव्वळ विचारांचे नाते होते. त्यामुळे आजही माळी व इतर ओबीसी जातीत फुलेविचारांना मोठा स्पेस आहे. मंडल आयोगाचा लढा त्यामुळेच आम्ही यशस्वी करू शकलो. या उलट मराठा समाजाचा विचार केला तर, या समाजाने समाजक्रांतीकारी शाहू राजेंना कधीच स्वीकारले नाही. आरक्षण मागण्यासाठी लाखांचे मोर्चे काढायचे आणि या मोर्च्यात आरक्षणाचे जनक असलेल्या व मराठ्यांनाही सर्वप्रथम आरक्षण देणार्‍या शाहू राजांचा नामोल्लेखही नाही. मोर्च्यात फोटो फक्त शिवाजींचे व घोषणा-फलक फक्त जय शिवाजी-जय भवानीचे! ब्राह्मणांच्या शिव-उदात्तीकरणाला भूलून छत्रपती शिवरायांना मराठ्यांनी स्वीकारले, मात्र तेही केवळ राजकीय परिप्रेक्षात! छत्रपती शिवाजींचे समाजक्रांतीकारी व्यवहार आजही मराठा समाज स्वीकारायला तयार नाही. कनिष्ठ जातीच्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून स्वजातीच्या रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडणारे शिवराय! आणि स्वजातीच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर कनिष्ठ जातींच्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणारे व त्यासाठी लाखांचे मोर्चे काढणारे मराठे, नाशिकच्या 5 वर्षाच्या बंजारा मुलीवर बलात्कार करणार्‍्या मराठा प्रौढ माणसाचा साधा निषेधही करीत नाहीत, उलट त्याला मराठा मोर्च्यात सहभागी करून घेतले जाते. बुलढाणा जिल्ह्यातील नुकतेच उघडकीस आलेले आदिवासी आश्रम शाळेतील सामुदायिक बलात्कार प्रकरण! यात अनेक आदिवासी मुलींवर वारंवार झालेले सामुदायिक बलात्कार उघडकीस आले आहेत आणि एक-दुसरा अपवाद वगळता बहुसंख्य बलात्कारी मराठा जातीचे आहेत. एवढे गंभीर प्रकरण असूनही तेथे (एखादा अपवाद वगळता) मुख्यमंत्री, मंत्री, जाणते राजे, शिवभक्त(?) वगैरे भेट द्यायला गेले नाहीत! कोपर्डीला भेट देऊन जिवंत असल्याचा पुरावा देणारे मुख्यमंत्री, जाणते राजे वगैरे लोक बुलढाणा प्रकरणात कोठे लपून बसलेले आहेत, ते एक शिवछत्रपतीच जाणो!???.. छत्रपती शिवरायांनी जातीअंताच्या लढाईतील एक अपरिहार्य चढाई म्हणून शाक्त राजाभिषेक व अस्पृश्य स्त्रीशी लग्न केले, तर ते आजच्या मराठा-जातीअभिमानी विचारवंत-बुद्धीजीवींनाही पचनी पडत नाही.27 त्यांचे
म्हणणे असे की, अस्पृश्य स्त्रीशी लग्न लावल्याचे सांगणे म्हणजे छत्रपती शिवरायांची बदनामी करणे होय! शूद्र-कुणबी असलेल्या छत्रपती शिवराज्यांनी अस्पृश्य स्त्रीशी लग्न लावण्याने त्यांची बदनामी कशी होऊ शकते, याचे उत्तर ते देऊ शकलेले नाहीत. संविधानाला मानणारे माजी न्यायधिशद्वय माननीय सावंत व कोळसेपाटील यांना अत्यंत अपमानास्पदरित्या मराठा मोर्च्याच्या समितीतून बाहेर काढले जाते व आर.एस.एस. प्रशिक्षित तसेच भिडेगुरूजी प्रशिक्षित सरोटेसारख्यांच्या हातात क्रांती मोर्च्याची सूत्रे जातात, हे कशाचे लक्षण आहे? भाजप सरकार या मोर्च्याला सर्वतोपरी मदत करते आहे व ही मदत स्वीकारली जात आहे. म्हणजे मराठा जातीच्या प्रतिगामीपणावर शिक्कमोर्तबच झाले की! मग मराठा जातीतले पुरोगामी का निष्प्रभ होत आहेत व प्रातिगामी का वर्चस्व गाजवित आहेत, याचे संशोधन व उपाय कोणी करायचा? ते करायचे सोडून काही मराठा विद्वान पळ काढत आहेत व काही मराठा विचारवंत हाच सर्वंकष क्रांतीचा मार्ग म्हणून भलावण करीत आहेत. सत्याला सामोरे जाण्याची हिम्मतच गमावून बसलेत हे सारे मराठा विद्वान व विचारवंत!
4
मराठामोर्चे जातीतील प्रस्थापितांविरोधात आहेत, असे संयोजकांकडून सांगण्यात आले. मात्र प्रा देवेन्द्र इंगळे यांनी हा दावा ताबडतोब लेख प्रसिद्ध करून खोडून काढला-
‘’ मराठा क्रांती मोर्चासंबंधी काही अभ्यासक असे मत व्यक्त करीत आहेत की, हे मोर्चे म्हणजे मराठा जातीसमुदायातील प्रस्थापितांच्या विरूद्ध विस्थापितांचा आक्रोश होय. खरे म्हणजे त्यांच्या या म्हणण्यात तथ्य आणि विश्लेषण कमी आणि त्यांची स्वतःची मनोकामना अधिक दिसते.....’’ 28
कॉ. भिमराव बनसोड आपल्या लेखात स्पष्ट करतात की, मराठा मोर्चे स्वजातीतील प्रस्थापितांविरोधात काय, सरकारच्याही विरोधात नाहीत, ते आहेत दलित-ओबीसीविरोधात (म्हणजे विस्थापितांविरोधात).29 हे लिहीत असतांनाच कॉ. भीमराव बनसोडेंचा फोन आला व त्यांनी सांगीतले की, आजच्या दिव्य मराठीतील बातमी निर्विवादपणे सिद्ध करते की, हे मोर्चे आर.एस.एस. नियंत्रित असून भाजपाचे सरकार आता या पुढील सर्व मोर्च्यांना उघडपणे मदत (रसद) पुरविणार असल्याचे आश्वासन देत आहे-
‘’......(मुख्यमंत्र्यांचे खास निकटवर्तीय असलेल्या) शेलार यांच्या विनंतीवरून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई व नाशिक येथून खास रेल्वेगाड्यांची व्यवस्था केलेली आहे....’’(कंसातील शब्द माझे)
पुढे बातमी स्पष्ट करते की, मोर्चेकर्‍यांसाठी सरकारने मोफत जेवणाची व राहण्याची व्यवस्था केलेली आहे-
‘’रस्त्यावरच्या लढाईची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी शेलार यांच्याकडेच सोपवलेली असल्याने
अधिवेशनाच्या गेल्या आठवड्यात शेलारांनी राज्यातील भाजपच्या सर्व मराठा नेत्यांशी मोर्च्यात सहभागी होण्याविषयी विस्तृत चर्चा केली. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथून पक्षाचे मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपूरमध्ये उतरतील या विषयी सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या प्रवासाची, जेवणाची, राहण्याची उत्तम व्यवस्था करण्याच्या शेलारांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांनी प्रवास करणे काहीसे अडचणीचे ठरू शकेल म्हणून मुंबई व नाशिकवरून खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था केलेली आहे.’’ 31
मराठा साखर कारखानदार, आमदार यांची मदत नाकारणार्‍या बातम्या प्रकाशित करणारे मोर्चा-संयोजक आता मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेली मदत स्वीकारतात की नाकारतात, हे आता पाहायचे आहे. यातून एक मुद्दा सिद्ध होतो की, हे मराठा मोर्चे शासनाच्या विरोधात नाहीत व कोणत्याही प्रस्थापितांविरोधात नाहीत, तर कॉ. बनसोडे सांगतात त्याप्रमाणे ते आहेत फक्त दलित-ओबीसींच्या विरोधात!
तरीही प्रा. इंगळे या मोर्च्याकडून वर्गविग्रहाची रास्त अपेक्षा करतात-
‘’..... दिलासादायक या साठी की मराठा जातीसमुहातील मूलभूत विग्रह व अंतर्विरोध मुखर झाल्याशिवाय इथल्या सामाजिक परिवर्तनाचा रूतलेला गाडा पुढे जाण्याची शक्यता फारच कमी आहे....’’ 32
प्रा. इंगळेंच्या म्हणण्याप्रमाणे मराठा समाजात विग्रह होऊ घातलेले हे वर्ग कोणते व ते खरोखर सामाजिक परिवर्तनाशी जोडून घेऊ इच्छितात का, हे पाहणे आवश्यक ठरेल.
 मराठा मोर्च्यात वेगवेगळे वर्ग व वेगवेगळे घटक परस्परविरोधी हितसंबंध असूनही मोर्च्यात कसे शांतपणे, मुकपणे एकत्रित चालत आहेत, हे आपण पाहात आहोत. वर्गात विभाजित होऊनही जात एवढी एकसंघ कशी? ओद्योगिकरणातून जात आपोआप नष्ट होईल या मार्क्सप्रणित सिद्धांतावर आजही भारतीय कम्युनिस्ट (अंध)श्रद्धा ठेवीत आहेत. मराठा गर्दी मोर्च्याने अशा आंधळ्या क्रांतीकारकांचे(?) पार डोळे फोडून टाकले, तरीही यांचे मार्क्सची पोथी रटणे बंद होत नाही. जातीत आकार घेत असलेल्या वर्गांना उजेडात आणणे व त्यांच्यातील संघर्ष तीव्र करणे, हे काम क्रांतीकारक वर्गीय संघटनांचे आहे. अशा वर्गीय संघटनांच्या अभावात जातसंघटनांचे काम सोपे होत असते. जातीतील प्रस्थापित उच्चवर्ग हा चलाख व हुशार असल्याने त्याला ‘मोर्च्यात अग्रभागी केव्हा चालायचे व पाठीमागे केव्हा राहायचे, मुकपणे केव्हा चालायचे व घोषणाबाजी केव्हा करायची’ याचे पुरते ज्ञान असते. आपल्या जातीतील वर्गभेद चव्हाट्यावर येऊ नयेत यासाठी मोर्च्याच्या चलाख संयोजकांनी त्याला मुक बनवला. डॉ. प्रा. रावसाहेब कसबे आपल्या ‘महाराष्ट्र1’ वरील मुलाखतीत स्पष्ट म्हणतात की, ‘ज्या दिवशी हा मूक मोर्चा बोलायला लागेल, त्या दिवशी तो क्रांती करेल व प्रस्थापितांना उघडे पाडील!’33 कोण आहेत हे जातीतले प्रस्थापित व काय आहेत हे जातीतले वर्गभेद?
सत्ताधारी वर्तुळात गेल्या 60 वर्षांपासून फिरत राहणार्‍या मराठा जातीतील वर्गीय धृवीकरण वेगाने घडणे स्वाभाविक होते. तसे ते घडलेही! अर्थात त्याला खाऊजा धोरणाने अधिक गतिमान केले. वारंवार येणार्‍या मंदीमुळे, खुंटत चाललेल्या औद्योगिकरणामुळे व वाढत्या काळ्या पैशामुळे गुंतवणूकीचे सर्व नैतिक (?) मार्ग बंद झालेले आहेत. गुंतवणूकीसाठी जमीन हा एकमेव स्थायी व भरवशाचा मार्ग आहे. त्यामुळे शासन-प्रशासनावर प्रभाव गाजविणार्‍या काळ्या पैशावाल्यांनी व प्रॉक्सी भांडवलवाल्यांनी शासनाची धोरणे प्रभावित करून शेती उजाड, शेतकरी कर्जबाजारी व शेतमजूर वेठबिगार बनविण्यासाठी सगळी सरकारी यंत्रणा गेल्या 20-25 वर्षांपासून जोरात कामाला लावली आहे. यात मांडलिक-सत्ताधारी असलेल्या मराठा-वतनदारांचा मोठा सहभाग आहे. हे सर्व काळे पैसेवाले सुरक्षित व संघटितपणे राहावेत व त्यांच्यात सल्लामसलत कायम होत राहावी म्हणून त्यांच्या अलिशान वसाहती दूर-दूर्गम जंगलात स्थापन करण्याची गरज भासू लागली. अशा अलिशान वसाहती म्हणजे आधुनिक इंद्रांचे दरबारच किंवा स्वप्ननगरीच! महाराष्ट्रात एक नव्हे, तर लव्हासासारख्या किमान 100 स्वप्ननगरी वसविल्या पाहिजेत, असे ठासून सांगणारे जाणते राजे या स्वप्ननगरींसाठी लागणारी हजारो एकर जमीन कोणाची असणार आहे व ते आपली जमीन विकल्यानंतर आलेल्या पैशातून लव्हासाचे रहीवासी बनणार आहेत की भणंग होऊन स्वेच्छेने स्वर्गवासी बनणार आहेत, हे स्पष्ट करणार आहेत काय? महाराष्ट्राच्या भाग्याविधाते म्हणविणार्‍या जाणत्या राजाने हे शासकीय धोरण स्पष्ट केले पाहीजे. जमिनीवरचे सिलींग काढणे, शेत-जमीन खरेदिच्या सर्व अटी व अडथळे दूर करणे, सेझ च्या नावाखाली हजारो एकर जमिनी भांडवलदारांच्या घशात घालणे यासारखे अनेक कायदे केंद्र व राज्यस्तरावर बनत असतांना ते कोणाच्या नेतृत्वाखाली बनत होते? ते मराठा राज्यकर्तेच होते. या सर्व शासकीय धोरणाचा एक अपरिहार्य परिणाम लहान-मध्यम शेतकरी भणंग होण्यात झाला. मराठा मोर्च्याची गर्दी वाढविणारा हाच तो उध्वस्त झालेला शेतकरी वर्ग!
मधला काही अल्पसा काळ वगळता 60 वर्षांपासून मराठा समाजच राज्याच्या सत्तेत असल्याने त्यांनी जिल्हा, तालूका व गांवपातळीवर आपल्या जातीचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा एक कार्यकर्ता वर्ग तयार केला. हा कार्यकर्ता वर्ग शासनाच्या लहान-मोठ्या योजना, शासकीय बांधकामाच्या व रस्त्याच्या कामांचे कंत्राटे घेऊन व ती परस्पर टक्केवारीने विकून गुजराण करणारा असतो. या कार्यकर्ता वर्गाची कामे फार कष्टमय असतात. मिळत असलेल्या रसदच्या प्रमाणात दुय्यम कार्यकर्त्यांची फौज बाळगणे, जुगार-सट्टा, अवैध धंदे, भ्रष्ट अधिकारी आदिंना मॅनेज करणे, वरिष्ठांची सभा-सम्मेलने यशस्वी करणे, सभेला गर्दी जमविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे, जमलेल्या लोकांची विशिष्ट व्यवस्था करणे, वरिष्ठ नेत्यांची दिवस-रात्रची विशेष सोय करणे, हे त्यांचे नित्याचेच काम. निवडणूक काळात तर ते युद्धमोहीमेवरच असतात जणूं! ही सर्व कष्टप्रद कामे ते अत्यंत चोखपणे बजावतात. कारण आपल्या चोख कामामुळेच आपली माणसं पुन्हा सत्तेवर येतील व आपली रसद पुढे चालू राहील, याची त्यांना खात्री असते. परंतू 2014 च्या लोकसभेत व 2015 च्या विधानसभेत ओबीसी लाटेने प्रस्थापित क्षत्रिय-राजकारणाचे हे गणित देशपातळीवर व राज्यपातळीवरही उधळून लावले.  अलिकडे महाराष्ट्रात व केंद्रात भाजपाचे कट्टर जातीअभिमानी व भक्कम असे सरकार आल्याने त्यांनी गावाकडचा हा वैशिष्ट्यपूर्ण असलेला जूना कार्यकर्ता वर्ग नव्याने भरती करून रिप्लेस केला. नवा कार्यकर्ता वर्ग अर्थातच अ-मराठा असणार! जुन्या मराठा कार्यकर्त्या वर्गाची शासकीय रसदच बंद झाल्याने तो अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. लढवैय्या फौजेची जेव्हा रसद बंद होते तेव्हा तो बंड करून उठतो. हा वर्ग खरा बंडखोर! कारण कोणत्याही जातीचे मोर्चे काढायचा खासा अनुभव या दलाल वर्गाजवळ आहे व हा अनुभव प्रदिर्घ काळापासूनचा आहे. फक्त हा मराठा मोर्चा ‘मूक, शिस्तबद्ध, नेताविहीन, घोषणाविहिन’ ठेवण्याचे प्रशिक्षण त्याला आर.एस.एस.च्या शाखेवरचे व भिडेगुरूजीच्या शाळेत शिकलेल्या मराठा कार्यकर्त्यांकडून घ्यावे लागले. मराठा क्रांती मोर्च्याचा खराखुरा कणा असलेला हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्ता वर्ग! मराठा-सत्ता टिकविणारा हाच खरा कष्टकरी वर्ग! मात्र आता त्याला आत्महत्तेच्या संभाव्य लाटेपासून वाचविले पाहिजे!
जातीतला तिसरा वर्ग तसा शांत वा उचापतींपासून अलिप्त असतो. त्याची भुमिका जात-समन्वयाची असते. परंतू हा वर्ग साधनहीन असल्यामुळे प्रभावी बनू शकत नाही. चौथा वर्ग वैचारिक-साहित्यिक क्षेत्रात कार्यरत असतो. अधूनमधून जात सम्मेलनांमध्ये जाऊन जातीचे प्रबोधनही करतो. सत्ताधारी जात-वर्गातील हा वैचारिक वर्ग शासनाच्या साहित्यिक-सांस्कृतिक योजनांचा लाभार्थी असतो. उच्चजातीयांना व सत्ताधार्‍यांना किफायतशिर भुमिका घेऊन ‘प्रतिष्ठेच्या शासकीय’ पुरस्कारांच्या प्रतिक्षेत असलेला हा वर्ग विशिष्ट मोक्याच्या वेळी धोकादायक असतो. याचे उत्तम उदाहरण मी वर वर्णिलेले आहेच! अर्थात असा संधीसाधू वैचारिक वर्ग प्रत्येक जातीत कमी-अधिक प्रमाणात आहे.
जातीतला पाचवा वर्ग हा उघडपणे शासक-शोषक म्हणून काम करीत असतो. प्रत्येक जातीत निर्माण झालेल्या मध्यम वर्गाला मॅनेज करीत व त्यांना आपापल्या जात-पायरीनुसार सत्तेत सहभागी करून घेत आपली मुख्य सत्ता घट्ट करणे व केंद्रीय ब्राह्मणी सत्तेची गुलामी करणे ही मुख्य कामे हा वर्ग करीत असतो. हा वर्ग सर्वच राजकीय पक्षात संघटितपणे पसरलेला असल्याने कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी या वर्गाला फारसा फरक पडत नाही. शरद पवारांना जो मान-सन्मान कॉंग्रेसच्या राजवटीत प्रधानमंत्री मनमोहनसिंग व राज्याचे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री देत होते, तोच मान-सन्मान पवारांना विरोधी भाजपाचे सरकार आल्यावर प्रधानमंत्री मोदी व फडणवीस देतात. किंबहुना कधीकधी स्वपक्षाला व मित्र-पक्षांना पराभूत करून विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर आणणे जास्त फायदेशिर ठरते. अशा सत्ताधारी वतनदार अभिजनांबद्दल रामचंद्र अमात्य आपल्या 300 वर्षांपूर्वीच्या आज्ञापत्रात जे सांगतात, ते आजचेही वास्तव आहे. 34
भणंग झालेला मध्यम शेतकरी, वैशिष्ट्यपूर्ण असलेला कार्यकर्ता वर्ग, समन्वयवादी शांत वर्ग, वैचारिक-साहित्यिक वर्ग व सत्ताधारी अभिजन वर्ग अशा एकूण पाच वर्गात ढोबळमानाने विभाजित झालेला मराठा समाज आज इतक्या एकजुटीने व मोठ्या संख्येने रस्त्यावर कसा उतरतो आहे, याचे कोडे मोठमोठ्या लोकांना पडलेले आहे. विशेष म्हणजे दोन वेगळ्या जाती असूनही व ते एकमेकांचे हित-शत्रू असूनही मराठ्यांना कुणबी जातीशी मैत्री का करावी लागते आहे? प्रा. देवेन्द्र इंगळे आपल्या लेखात याचे समर्पक विश्लेषण करतात-
‘’ ब्रिटिश निघून गेल्यानंतर आपल्याकडे सार्वत्रिक प्रौढ मतदानावर आधारित संसदिय शासनप्रणालीचा स्वीकार करण्यात आला. त्यात संख्याबळाला निरतिशय महत्व प्राप्त झाले. सत्तेत टिकून राहण्यासाठी मराठा जात समुदायाने रणनीती बदलली...... बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी कधीकाळी आपल्यापासून तोडून टाकलेल्या कुणबी जात समूहाशी ‘मराठा’ म्हणून सलगी करायला सुरूवात केली.....’’ 35
मराठ्यांच्या या सलगीला कुणबी जातीतील उच्च-मध्यम वर्गाने प्रतिसाद दिला. कुणबी
जातीतील उच्चपदस्थ प्रशासकीय वर्गाने मोक्याची टेबले मिळविण्यासाठी स्वतःला ‘मराठा’ डिक्लेअर करणे स्वाभाविक होते. मराठा सेवा संघ प्रशासनातील अशा कुणबी वर्गाचे प्रतिनिधित्व करतो. मात्र या (कुणबी-मराठा) दोन्ही जातीतील संधीसाधू ‘मराठा सलगीकरणाला’ शेतावर राबणार्‍या कुणब्याने भीख घातलेली नाही. विदर्भातील तरूण कुणबी नेते व ओबीसी कृती समितीचे संयोजक-संस्थापक सचिन राजूरकर यांनी अनेक कुणबी कार्यकर्त्यांच्या सहमतीने दै. लोकसत्तामधील पत्रकात ही भुमिका स्पष्ट केली.36  कोकणातील कुणबी जाती संघटनेने तर मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण मिळू नये म्हणून मुंबई हायकोर्टात अपिल केले आहे.36
मराठा-कुणबी सलगीकरणाने किंवा माधव (माळी-नगर-वंजारा) सारख्या जात-बेरजेच्या राजकारणाने तात्पुरती राजकीय सत्ता (आणि तीही मांडलिक स्वरूपाची) मिळते. उत्तरेतील यादवांचे (यादव-मुस्लीम) किंवा मायावतीचे (चर्मकार-ब्राह्मण) ही अशी बेरजेची सत्ता-समिकरणे आता सगळीकडेच आहेत. ही सत्ता-समिकरणे स्वजातीचेही भले करू शकत नाहीत, हे मराठा मोर्च्यांनी सिद्ध केले आहे. सर्व जातीत निर्माण झालेल्या मध्यम(बुद्धीजीवी) वर्गाला आपापल्या जातीतील शेतकरी-कष्टकरी वर्गाला व अंधकारमय भविष्य असलेल्या तरूण वर्गाला बरोबर घेऊन आपल्याच जातीतील प्रस्थापित व संधीसाधू वर्गाच्या विरोधात लढावेच लागेल. मोर्चे काढायचेच असतील तर सरकारची मूलभूत धोरणे बदलवण्यासाठी काढावे लागतील. त्यासोबत जनतेचे प्रबोधन करण्यासाठी युरोपसारखी रीनेसन्स मुव्हमेंट राबवावी लागेल. चीनचे नाव काढताच आपल्याला तीन गोष्टींची आठवण येते. लॉंगमार्च, सांस्कृतिक क्रांती व चीनचे जगातील आजचे स्थान! माओत्से तुंगचा शेतकर्‍यांचा लॉंगमार्च चीनमध्ये क्रांती करतो व आज चीनला जगात एक नंबरचे स्थान मिळते. कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाडांनी भुमिहिनांचा लॉंगमार्च काढला होता. पण शेतकर्‍यांच्या सहभागाशिवाय जात्यंत अशक्य आहे! मराठा 'जातीचा' शॉर्टमार्च काढण्याऐवजी मराठा 'शेतकर्‍यांचा' लॉंगमार्च काढला तर या मोर्च्यात सर्वजातीधर्माचे शेतकरी-कष्टकरी सामील झाल्याशिवाय राहणार नाहीत. असा लॉंगमार्चच भारतात जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती करू शकतो. मराठा-जाट-पटेल-कापू सारख्या जातींना इतिहास घडविण्याची फार मोठी संधी चालून आलेली आहे. ही संधी गमावली तर देशाची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.
                          --- प्रा. श्रावण देवरे,
               अध्यक्ष, महाराष्ट्र ओबीसी संघटना                s.deore2012@gmail.com
                   Mobile: 94 22 78 85 46  व  
                   घरचा फोन  0253-241 85 46
संदर्भ सूची-
1. समग्र टिळक खंड 7, पान 475-477
2. टिळक विचार, भा.कृ. केळकर, श्रीविद्या प्रकाशन, पुणे-30, पान 283
3. टिळक विचार, भा.कृ. केळकर, श्रीविद्या प्रकाशन, पुणे-30, पान 283 ते 287)
4. महात्मा फुले गौरव ग्रंथ, खंड पहिला, सुधारित द्वितीयावृत्ती, संपादक हरि नरके, य.दि. फडके, ‘महात्मा फुलेः शैक्षणिक तत्त्वज्ञान व कार्य’, धनंजय कीर, पा 137
5. महात्मा फुले समग्र वाडःमय, म.रा.सा.सं मंडळ, मुंबई, सुधारित सहावी आवृत्ती, नोव्हे 2006, पान-337)
6. (उक्त, पान-337)
7. सदानंद मोरेंची मलाखत, IBN लोकमत, दि. 26 सप्टें. 2016 व ABP माझा, 27 ऑक्टों.2016)
8. उक्त
9. मराठा ओबीसीकरण, संपादक- अशोक बुद्धीवंत, प्रथमावृत्ती-2009, पा 140 ते 200)
10. ‘शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोणः महंदी की ब्राह्मणी?’, खंड 2, भाग 2, कॉ.शरद् पाटील, आवृत्ती 2 री, 2004, पान 89-90)
11. उक्त
12. उक्त
13. ग्रामण्याचा साद्यंत इतिहास, प्रबोधन ठाकरे
14. ‘छत्रपती शिवराय’, प्रा. अशोक राणा लिखित ग्रंथाला प्रा. श्रावण देवरेंनी लिहिलेली प्रस्तावना, पान चोवीस-पंचवीस. 
15. कुणबी समाजोन्नती संघ, हायकोर्ट केस नं. 48-2015.  कुणबी समाजोन्नती संघाचे मुखपत्र, पक्षिक कुणबी भुमीपत्र व दै. लोकसत्ता, 23 सप्टेंबर 2016, पान 4)
16. जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व, खंड 2, शरद् पाटील, सुगावा प्रकाशन, पुणे-30, प्रथमावृत्ती1996, पा 50.
17. ‘शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण – महंमदी की ब्राह्मणी?’, कॉ. शरद् पाटील, खंड 2, भाग 2, मावळाई प्रकाशन, 2 री आवृत्ती-2004, पा. 139.
18. उक्त, पा 49.
19. सदानंद मोरेंची मुलाखत, उक्त
20. मराठ्यांची पूर्वपिठीका अथवा रट्टवंशोत्पत्तीविषयी शास्त्रीय विचार, महर्षी वि. रा. शिंदे, परिवर्तनाचा वाटसरू, 1-15 डिसें. 2016, पान 27.
 21. उक्त, पा 28.
 22. उक्त, पा 23.
 23. मराठा ओबीसीकरण, उक्त पा 66
 24. उक्त, पा 67-68
 25. उक्त, पा. 25 वरील तक्ता.
 26. नाशिक हिंसाचाराविषयी सत्यशोधन समितीची निरिक्षणे, शाम सोनार, परिवर्तनाचा वाटसरू, 15 नोव्हें ते 30 नोव्हें. 2016, पान 20-21.
 27. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक’, डॉ. आ. ह. साळुंखे, लोकायत प्रकाशन, जून 2015, मराठा सेवा संघाचे मुखपत्र, मराठा मार्ग, ऑक्टों 2016, मधील संपादकीय स्पष्टीकरण.
 28. ‘.....तोच खरा ‘क्रांती मोर्चा’, देवेन्द्र इंगळे, दै. लोकसत्ता, 28 सप्टेंबर 2016.
 29. पहिले ते अर्थकारण, भीमराव बनसोड, परिवर्तनाचा वाटसरू, 16 ते 30 नोव्हे 2016, पा27
 30. दै. दिव्य मराठी, ई-पेपर, दि. 13 डिसें 2016, पा 5.
 31. उक्त.
 32.. देवेन्द्र इंगळे, उक्त.
 33. डॉ. प्रा. रावसाहेब कसबे यांची ‘महाराष्ट्र1’ वर प्रकाशित झालेली मुलाखत, दि.30 सप्टें. 2016 अँकर- निखिल वागळे
 34. ‘शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण – महंमदी की ब्राह्मणी?’, कॉ. शरद् पाटील, खंड 2, भाग 2, मावळाई प्रकाशन, 2 री आवृत्ती-2004, पा. 139.
 35. ‘मराठा मोर्चेः आंतरिक विग्रह की विग्रहाची एकजूट!’, देवेन्द्र इंगळे, परिवर्तनाचा वाटसरू, 1 ते 15 ऑक्टों 2016, पा. 27.
 36. ‘मराठ्यांच्या विदर्भातील मोर्चांपासून कुणबी दूर’, दै लोकसत्ता. 23 सप्टें. 2016, पा. 4.

No comments:

Post a Comment