http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, February 23, 2019

59 BahujanNama OBC morcha Daily Lokmanthan 23Feb19


बहुजननामा-59    
मुलगी रंडकी होऊ द्यायची नसेल तर, या! आझाद मैदानावर 25 फेब्रुवारीला!
ओबीसींनो..... !   
भारतात कोणत्याही समाजघटकाला संघटित करणे सोपे आहे. नीळा झेंडा लावला की 5 मिनिटात हजार-पाचशे दलित गोळा होतात. मजहब खतरे मे अशी आरोळी ठोकताच 2-4 हजार मुस्लीम सहज गोळा होतात. परंतू सर्वात कठीण काम आहे ते ओबीसी एकत्र येण्याचे! आमचं अख्ख आयुष्यच या कामात व्यतीत होत आहे. माझ्या सारखे व माझ्याहीपेक्षा जास्त काम करणारे ओबीसी कार्यकर्ते महाराष्ट्रातच काय देशातही खूप आहेत.
मंडल आयोग लागू होईपर्यंत ओबीसी जातीत जन्मलेला एकही नेता स्वतःला ‘‘ओबीसी’’ म्हणवून घ्यायला धजत नव्हता. असंख्य लहान-मोठ्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या परीश्रमाने चळवळ उभी राहीली, त्याच्या परीणामी 1990 ला व्हि.पी. सिंगांनी मंडल कमिशनची पहिली शिफारस लागू केली. त्यामुळे ओबीसींमध्ये जागृती गतिमान झाली. त्यानंतर ‘‘ओबीसी नेत्यांचे’’ अमाप पीक आले. या अमाप ओबीसी नेत्यांनी अशी काही कामगिरी केली की, आज ओबीसी आरक्षण नष्ट होण्याच्या कड्यावर उभे आहे.
हे आरक्षण वाचविण्यासाठी आम्ही काही मुठभर ओबीसी कार्यकर्त्यांनी 15 नोव्हेंबरपासून संघर्ष सुरू केला. त्याचा पहिला टप्पा 25 फेब्रुवारी 2019 रोजी आझाद मैदानावर संपणार आहे. या पहिल्या टप्प्यात मित्रशक्ती व शत्रूशक्तीचे अनेक अनुभव आलेत. त्यापैकी काही अनुभव मी बहुजननामात या आधीच लिहीले आहेत.
कोणताही समाजघटक जो पर्यंत स्वाभिमानी व स्वच्छ नेता घडवित नाही, तो पर्यंत तो समाज प्रगती करू शकत नाही. 1992 नंतर ओबीसीला ‘ओबीसी’ म्हणून संघटित करण्याचे काम ज्या राजकिय ओबीसी नेत्यांनी केले, त्या सर्वांचे मालक एकतर मराठा आहेत किंवा ब्राह्मण आहेत. त्यामुळे प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांनी संघर्ष करून 1992 ला जे मिळविले होते, ते हळू हळू कमी होत, आज ते संपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आज ओबीसी वोटबँक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे ओबीसींचे लचके तोडून राजकीय फायदा लाटण्याचे काम सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. तेली, माळी, धनगर अशा ओबीसी जातीत जन्मलेल्या व्यक्तींना आमदारकी खासदारकीची तिकीटे देऊन ते ओबीसींचे हितचिंतक बनू पाहात आहेत. पण आपण गेल्या 4 वर्षात अनुभव घेतला. ओबीसी माणूस प्रधानमंत्री झाला तरी तो ओबीसींचे भले करू शकत नाही, कारण त्याचा मालक ब्राह्मण असल्याने त्याने ओबीसींचे नुकसानच केले. परंतू, जर ओबीसी हा ‘ओबीसी’ म्हणून स्वतंत्रपणे राजकारणात उतरला तर या 52 टक्क्यांच्या पुढे या 2-4 टक्के ब्राह्मण-क्षत्रिय जातींचे राष्ट्रीय (?) पक्ष कुठल्याकुठे उडून जातील. आपण आपल्याच ओबीसी दमावर मुख्यमंत्री-प्रधानमंत्री बनवू शकतो. म्हणूनच ओबीसीला ‘ओबीसी’ म्हणून संघटित होऊ द्यायला त्यांचा विरोध आहे.
15 नोव्हेंबर पासून आम्ही केलेल्या संघर्षाचे फलित हेच आहे की, आजचे मरण पुढे ढकलले गेले आहे. हे आरक्षण वाचवायचे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. 25 फेब्रुवारी रोजी तुम्ही किती जागृती दर्शवता त्यावर अवलंबून आहे. ओबीसी व्यक्ती ज्या प्राथमिकतेने लग्नाला, मौतीला जातो, त्याच प्राथमिकतेने तो 25 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आला पाहिजे. मित्राच्या, नातेवाइकाच्या लग्नाला गेलो नाही तर तो मित्र वा नातेवाईक नाराज होतो व तो आयुष्यभर आपल्याला शिव्या देतो. या भीतीपोटी आपण आपल्या मित्राच्या लग्नाला रजा टाकून जातो, सर्व महत्वाची कामे बाजूला सारून लग्नाला हजर राहतो. परंतू ओबीसी कार्यक्रमाला जर गेलो नाहीत पुढच्या अनेक पीढ्या आपण नरकात ढकलणार आहोत. आधीच ओबीसी बलुतेदार जातींचे पारंपारिक व्यवसाय बुडालेले आहेत. एकमात्र आरक्षणाचा आधार आहे, की ज्यामुळे आपला मुलगा-मुलगी कुठेतरी कारकून-शिपाई म्हणून नोकरीला लागू शकतो. आता हा आरक्षणाचा आधारही मराठा-जाटसारख्या क्षत्रीय जातींच्या खिशात गेला तर, तुमच्या पुढच्या पिढ्या वेठबिगार झाल्याशिवाय राहणार नाहीत. लग्नाला गेलो नाही म्हणून मित्र कोपला, तर तो एकटाच शिव्या देतो, मात्र ओबीसी कार्यक्रमाला गेलो नाही, तर पुढच्या पिढ्यातील लाखो मुलं तुम्हाला पीढी-दर-पीढी शिव्या देत राहतील
आज कोणत्याही माणसाला विचारा, तुम्हाला आपल्या मुलीसाठी जावई कसा पाहिजे? तर तो लगेच उत्तर देतो- ‘‘नोकरीवालाच पाहिजे.’’ पण ओबीसी आरक्षण खतम झाले तर नोकरीवाला जावई कसा मिळेल? नाईलाजास्तव तुम्हाला तुमची मुलगी शेतकर्‍यालाच द्यावी लागेल. आणी हा शेतकरी जावई लग्नानंतर दोन वर्षाच्या आतच आत्महत्त्या करतो. म्हणजे तुमची मुलगी लग्नानंतर लगेच ‘‘रंडकी’’ बनून तुमच्या घरी परत येईल. तेव्हा ती मुलगी कोणाला दोष देईल? अर्थातच तुम्हाला! पुढच्या पीढीच्या शिव्या खायच्या नसतील तर 25 फेब्रुवारीला आझाद मैदानवर या! न चूकता 11 वाजेपर्यंतया!  कोणतीही सबब सांगू नका.
आपण मोठ्या संख्येने याल या अपेक्षेसह जयजोती, जयभीम .... सत्य की जय हो!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com

Sunday, February 17, 2019

58 BahujnNama Sanghi Bhut, Lokmanthan 17 Feb 19


अठ्ठावन्नावी खेप ......!     ( दै. लोकमंथन, सोमवार,  17 फेब्रुवारी 2019 च्या अंकात प्रसिद्ध)
 बहुजननामा-58
     संघी भूतः बाटलीत बंद करायचे, जमिनीत गाडायचे की कायमचे नष्ट करायचे?
बहुजनांनो.... !   
                                    -1- 
        कोणत्याही विषमताग्रस्त समाजात अनेक स्तरावर अनेक क्षेत्रात समांतर, वि-समांतर व क्रासकट प्रवाह असतात. काही सुप्त तर काही उघड! काही गतिमान, काही स्लो तर काही सुस्त! अशा बहु-प्रवाही समाजाचे सर्वात किचकट व दुर्लभ उदाहरण म्हणजे भारतीय समाजव्यवस्था! अशा समाजावर तोच वर्चस्व मिळवू शकतो, जो या सर्व प्रवाहांचा अभ्यासू नियंत्रक आहे. व्यक्तीगत स्वरूपात उदाहरण द्यायचे तर चाणक्याचे देता येईल! राजाच्या विरोधात जनता ‘विद्रोही’ बनत असेल, तर या विद्रोहाच्या प्रवाहाला दडपून टाकण्यासाठी ‘राष्ट्र-प्रेमाचा प्रवाह’ गतिमान करावा, असे चाणक्य सांगतो! त्यासाठी शेजारच्या राष्ट्रातील राज्याला निरोप पाठवून आपल्यावर आक्रमण करायची विनंती करावी. आपल्या राष्ट्रावर आक्रमण झाले की, जनतेच्या मनात सुस्त पडलेले ‘राष्ट्र-प्रेम’ गतिमान होते व विद्रोहाची लाट परस्पर दडपली जाते. निवडणूकीच्या तोंडावरच असे अतिरेकी हल्ले का वाढतात, असा प्रश्न आपल्या मनात कधीच उपस्थित होत नाही, कारण आज आपण सर्व लोक ‘‘अखिल भारतीय’’ चाणक्यवादाचे बळी आहोत.
वंचितातील विद्रोह अशा वेगवेगळ्या कारणास्तव दडपला जातो व वंचित कधीच ‘‘सु-संचितवान’’ होत नाही. याचे मूळ अखिल भारतीय चाणक्यवादात आहे, हे माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी ओळखले आणी म्हणून त्यांनी फक्त एका अटीवर कॉंग्रेसशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यांची अट एकच आहे की, कॉंग्रेस जर सत्तेवर आली तर, त्यांनी चाणक्याचा आधुनिक अवतार असलेल्या आर.एस.एस. ला संवैधानिक चौकटीत बंदिस्त करावे.
स्वातंत्र्यानंतर भारताने संसदिय लोकशाहीची संवैधानिक चौकट स्वीकारलेली आहे.
देशाच्या जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आपली स्वतःची एक संविधान सभा बनविली, त्यांनी आपल्यातीलच काही तज्ञ लोकांच्या समित्या बनविल्या व त्यांच्याकडून भारताचे संविधान तयार करवून घेतले. हे संविधान जनतेच्या पुनर्विचारासाठी 8 महिने ठेवण्यात आले. त्यानंतर या संविधानाचे संविधान सभेत वाचन करण्यात आले व नंतर 26 नोव्हेंबर 1948 रोजी ते स्वीकारण्यात आले. एवढ्या सर्व लोकशाही प्रक्रियेतून तावून–सुलाखून बाहेर पडलेले व जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी शिक्कामोर्ब केलेले संविधान गेल्या 70 वर्षांपासून देशाच्या राज्यकारभाराची एकमेव चौकट म्हणून कार्यरत आहे. आणी त्यामुळे या चौकटीत राहून आर.एस.एस. ने काम करावे, अशी सर्वसामान्य भारतीयांच्या मनातील भावनाच माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी बोलू दाखविली, तर त्यात चूकीचे काय? आणी अशी पूर्व अट बाळसाहेबांनी कांग्रेसशी युती करतांना टाकली तर, कॉंग्रेससाठी ती आनंदाची बाब ठरावी. मांजराच्या गळ्यात परस्पर कोणी जिगरबाज घंटा बांधत असेल, तर कॉंग्रेसने ‘साप भी मर गया और अपनी लाठी भी नही टुटी’ असे म्हणून सुस्कारा सोडला पाहिजे. परंतू असे काही चित्र असावे असे कॉंग्रेसच्या ‘बॉडी लँग्वेज’ वरून वाटत नाही. बाळासाहेबांच्या या स्टेटमेंटवर एकाही कॉंग्रेसी नेत्याने काहीही मत व्यक्त केले नाही. या मागेही काही कारण आहे काय, ते शोधले पाहीजे. ते आम्ही शोधले ते असे.....
इंग्रज राजवटीतही संस्था स्थापन करतांना तीला घटनात्मक चौकटीत राहूनच काम करावे लागत होते. परंतू कॉंग्रेसने अशी घटनात्मक चौकट कधीच मान्य केली नाही. अर्थात कॉंग्रेस ही अधिकृतपणे तत्कालीन घटनेच्या चौकटीतच स्थापन झालेली होती. ध्येय, उद्दिष्ट, धोरण, कार्यक्रम, नियम व अटी अशा सर्व बाबींनी युक्त अशी स्वतःची घटना होती. ती घटना अधिकृतपणे तत्कालीन धर्मादायाक्ताकडून मंजूर करून घेतली होती. धर्मादायाक्ताने मंजूर करतांना ती तत्कालीन नियमात आहे की नाही हे तपासूनच मंजूर केली. असे असतांनाही कॉग्रेस खरेच लोकशाहीवादी संघटन होते काय? एखादे संघटन लोकशाहीवादी आहे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा अभिप्रेत हे असते की, संघटनेचे अधिकृत सदस्य असलेले व या सदस्यांनी निवडून दिलेलेच प्रतिनिधी संघटनेचे निर्णय घेतील व त्याप्रमाणे कार्यवाही करतील. पण कॉंग्रेसचा इतिहास वेगळेच काहीतरी सांगतो. कॉग्रेस संघटनेचे चार आण्याचेही सदस्य नसलेले व ज्यांना कॉंग्रेसच्या अधिकृत सदस्यांनी कधीच कोणत्या पदावर निवडून दिलेले, असे मोहनदास करमचंद गांधी सर्वेसर्वा ‘‘बॉस’’ म्हणून कॉंग्रेसवर राज्य करीत होते व कॉंग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण देशावर हुकुमत गाजवित होते.
अर्थात गांधी-शक्ती ही तात्कालीन भारतीय सत्ताकांक्षी जात-वर्गाची मजबूरी होती. त्या काळात फुले, शाहू, आंबेडकर व पेरियारांसारख्या अनेक महापुरूषांच्या कारणास्तव ब्राह्मणेतर समाजात विविध विद्रोही प्रवाह गतिमान झालेले होते. या सर्व विद्रोही ब्राह्मणेतर प्रवाहांना नियंत्रित करून त्यांना ब्राह्मणी कॉंग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम ब्राह्मणेतर महापुरूषच करू शकत होता. म्हणून गांधी एक मजबूरी होती. जेव्हा जेव्हा गांधी ‘वाट चूकण्याची’ शक्यता वाटत होती, तेव्हा तेव्हा त्यांच्यावर ‘अयशस्वी’ खुनी हल्ला करून त्यांना पुन्हा रस्त्यावर ‘नीट’ आणले जात होते. स्वातंत्र्यानंतर गांधींना असे वारंवार ‘नीट’ करणे परवडणारे नव्हते, म्हणून त्यांनी गांधी नावाची ‘भानगडच’ कायमची मिटवून टाकली.
-2-
तेव्हापासून आर.एस.एस. नावाच्या असंवैधानिक ‘संघी-भूताला’ घटनात्मक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो आज बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आपण असे गृहित धरू या की, कॉंग्रेसने संघी भुताला राज्यघटनेच्या बाटलीत बंदिस्त केले. तर काय होईल? संघाचे भूत बाटलीत बंद झाल्यावर ते आपल्या हिंसक कारवाया बंद करील? संघ घटनेच्या चौकटीत बंद करणे म्हणजे संविधानाच्या तत्वानुसार त्यांची ध्येय धोरणे असतील. म्हणजे समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद संघाला मान्य आहे, असे त्यांनी कागदावर मान्य करणे. घटनेचे उल्लंघन केल्यास या संघटनेची मान्यता काढून घेणे व त्यांच्या जबाबदार सदस्यांना कायद्याच्या चावडीवर उभे करून सजा सुनावणे, म्हणजे संघाला संविधान चौकटीत बंद करणे. परंतू हे केव्हा शक्य आहे?
आता एक उदाहरण घेऊ या. भीमा कोरेगावचा हिंसाचार संघाच्या लोकांनी केला म्हणून संघावर बंदी आणली पाहिजे, अशी आपली भुमिका आहे. आपण म्हणतो की, मिलिंद एकबोटे व भिडे हे संघाचे लोक आहेत. पण कोर्टात हे कसे सिद्ध करणार? कारण भिडे-एकबोटे हे संघाचे साधे सदस्यसुद्धा नाहीत. गांधी हत्त्या करणारा नथ्थू संघाचा सदस्य नव्हताच. संघीभूतांचे म्हणणे हे आहे की, भीमा-कोरेगावचा हिंसाचार एल्गार परीषदेचे संयोजक असलेल्या माओवाद्यांनी घडवून आणला आहे. तसा कट रचणारे लोक माओवादी संघटनेचे सदस्य आहेत किंवा प्रत्यक्ष संबंधित आहेत. त्यासाठी त्यांनी ईमेल, विमान तिकीट वगैरे पुरावे दिले आहेत. माओवादी संघटनेच्या लोकांना माओवादी संघटनाच रसद पुरवू शकतात. त्यामुळे पुरावे सहज उपलब्ध होतात. तसे पुरावे संघ-भीडे-एकबोटे बाबत नाहीतच, कारण भीडे-एकबोटेला रसद पुरविणारे कॉंग्रेसी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मराठा राजकारणी आहेत. त्यामुळे संघावर बंदी घालण्याऐवजी कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षावरच बंदी घाला, अशी मागणी करण्याची वेळ येईल. त्यामुळे संघाचे भूत संवैधानिक बाटलीत बंद केल्यावरही त्यावर काहीही कारवाई होऊच शकत नाही.
संघाचे भूत गाडायचे म्हणजे नेमके काय करायचे? उद्या बाळासाहेब प्रकाश आंबेडकर देशाचे प्रधानमंत्री झालेत, तर ते संघाचे भूत पोलीस-बळ वापरून गाडू शकतात. संघाच्या सदस्यांना जेलबंद करून संघटना मोडीत काढू शकतात. इंदिरा गांधींनी तसा प्रयत्न आणीबाणीत करून पाहिला. परंतू नंतर लगेच त्याच संघीभूताच्या मदतीने 1981 ला प्रचंड बहुमत घेऊन त्या प्रधानमंत्री झाल्यात. त्यामुळे संघी-भूत गाडून काहीच उपयोग नाही. संघाचे अधिकृत सदस्य जेलबंद करून काय साध्य होणार? कारण संघाचे सदस्य नसलेले लाखो कार्यकर्ते देशाच्या कानाकोपर्‍यात विविध क्षेत्रात ऑक्टोपस सारखे पसरलेले आहेत व त्यांची पाळे-मुळे शेतातल्या दरवडीसारखे घट्ट झालेली आहेत. ते सुप्रिम कोर्टात न्यायधिश म्हणून बसलेले आहेत, ते आय.बी., सी.बी.आय., ई.डी. व रॉ सारख्या सर्वोच्च सत्ताधारी व सर्वशक्तिमान संघटनांमध्ये षडयंत्रकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते राहूल-सोनियापासून ते पवार-अब्दुल्ला पर्यंतच्या सर्व राजकर्य धुरिणांच्या सल्लागार मंडळात ‘वेटोळे’ घालून बसलेले आहेत. त्यांना कसे जेरबंद करणार? त्यामुळे संघीभूत जमीनीत गाडून काहीच उपयोग नाही.
मग संघाचे काय केले पाहिजे. त्याला कायमचे नष्ट करणे हाच एकमेव उपाय! पण त्यासाठी त्याची शक्ती स्थळे शोधली पाहिजेत. संघाची ताकद त्याच्या विचारात नाही, तर त्या विचारांच्या प्रचार-प्रसार पद्धतीत आहे. आपणही आपल्या फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रचार-प्रसार करतोच की! पण पद्धतीत फरक आहे, हे कधीच लक्षात घेतले जात नाही. आपली पद्धत सभा-संमेलने, जयंत्या-पुण्यतिथ्या, मोर्चे-धरणे, केडर-शिबीरे, लेख-पुस्तके, साप्ताहिके-मासिके, पुतळे-स्मारके व त्यांच्या यात्रा-जत्रा बस्स एवढेच! हे असले उद्योग संघ स्वतः करीत नाही. ती त्यांची अतिदुय्यम साधने आहेत. संघाने देशाची शिक्षणव्यवस्थाच ताब्यात घेतली आहे. तुमचा मुलगा 5-6 वर्षाचा झाला की, तुम्ही त्याला संघाच्या शाखेवर स्वतःहून पोहचवतात. राईट! संघाचा केडर कॅम्प शाळेच्या पहिल्या वर्गापासून सुरू होतो. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षापर्यंत संघाच्या विचारांचे स्लो-पॉईझनिंग सुरूच असते. एवढी वर्ष संघाचं विष प्यालेला मुलगा तुमचा राहीलच कसा? तो संघाची एक हाक एकतो आणी लाखोंच्या संख्येने अयोध्येत पोहोचून बाबरी मस्जिद जमिनदोस्त करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य नसलेलला ‘ठाकरे’ मुंबईच्या घरात बसून चिथावणी देतो व राज्यात हिंदू-मुस्लीम दंगली सुरू होतात. हे केवळ आणी केवळ शिक्षणव्यवस्थेतून साध्य होते.
संघाच्या या शिक्षणव्यवस्थेला पर्यायी शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या 25 वर्षांपासून अखंडपणे करीत आहोत. फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ स्थापन करून पुरोगामी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून राज्यभर नवी पीढीच्या निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र या क्रांतीकारी प्रकल्पाकडे बघायला सो-कॉल्ड पुरोगामी पुढारी व बुद्धीवंताना वेळच नाही.
-3-
संघाचे दुसरे सर्वात मोठे सामर्थ्य स्थळ आहे ओबीसी! संघी शिक्षणव्यवस्थेचा हा सर्वात मोठा पारंपारिक बळी आहे. मंडल आयोगामुळे तो राजकीयदृष्ट्या जागृत झाला मात्र सांस्कृतिक-सामाजिकदृष्ट्या अजूनही जागृत होत नाही. अशा ओबीसी समाजाला संघ-नियंत्रणातील सर्वच राजकिय पक्ष कधी ‘जात’ म्हणून तर कधी ‘धर्म’ म्हणून वापरून घेत आहेत. आरक्षणामुळे हा ओबीसी घटक जागृत होऊन राजकीय सत्तास्पर्धेत उतरला आहे. गावाकडे सरपंच, तालुका पंचायत समिती मध्ये सभापती, जिल्हापरिषदेत अध्यक्ष म्हणून मोठ्या प्रमाणात ओबीसी निवडून येत आहेत. गावाकडची ही सत्तास्थाने आमदार-खासदार-मुख्यमंत्री ठरवितात. त्यामुळे प्रस्थापित जाट-मराठा समाज भयभीत झालेला आहे. ओबीसींचे आरक्षणच काढून घेतले तर तो पुन्हा कायमचा राजकारणातून हद्दपार होईल व पुन्हा ब्राह्मण-क्षत्रिय या ऐतिहासिक युतीची सत्ता पक्की होईल. त्यासाठी संघाने ‘सराटे’ नावाचे भूत प्रशिक्षित करून ओबीसींच्या मानगुटीवर बसवलेले आहे.
अशा सर्व संकटातून वाट काढीत आम्ही ओबीसींना ‘ओबीसी’ म्हणून संघटित करीत आहोत. कारण ओबीसीला ‘ओबीसी’ म्हणून जागृत करणे म्हणजेच संघी-भूताला कायमचे नष्ट करणे होय! परंतू, आमच्या काही आंबेडकरवाद्यांना हे पटलेले नाही. ते धनगर, माळी, तेली या नावाने मेळावे घेऊन, त्यांच्या वोटबँका तयार करून त्यांच्या सहाय्याने सत्तासंपादन करण्याचे स्वप्न पाहात आहेत. हाच उद्योग कॉंग्रेस-भाजपही करतातच की! मग जातीयवादी पक्षात आणी तुमच्यात काय फरक? संघी भूत कायमचे नष्ट करण्याची क्षमता असलेल्या एकमेव ओबीसी घटकाला तुम्ही ‘तोड-फोड’ करून परत ‘जातीत’ बंदिस्त करीत असाल तर त्यातून तुमचा ‘अ-आंबेडकरवाद’ सिद्ध होतो. संघीभूताला केवळ घटनात्मक बाटलीत बंद करण्याची तुमची मागणी, त्याला कायमचे जीवदान देण्याचा एक प्रयत्न वाटतो. आज बाबासाहेब आंबेडकर असते तर, ते हेच म्हणाले असते. एस्सी, एस्टी व ओबीसी प्रवर्गांनी स्वतंत्रपणे आरक्षण घेऊन जागृत व्हावे, स्वतंत्रपणे संघटित व्हावे व नंतर तिनही शक्तींनी फेडरल स्वरूपात एकत्र येऊन जातीव्यवस्था अंताकडे आगेकूच करावी. यातच संघीभूताचे कायमचे मरण आहे. हेच आंबेडकरवादाचे खरेखुरे सूत्र आहे. हे सूत्र नीट समजून घ्यायचे असेल तर ‘बाबासाहेब आंबेडकर राईटिंग्ज ऍण्ड स्पीचेसच्या 5 व्या खंडातील पान 112 ते 114 वाचावीत व त्यातील तक्ताही नीट समजून घ्यावा. जातीअंताच्या युद्धात दोस्त शक्ति म्हणून ओबीसी सोबत असेल तरच हे युद्ध आम्ही जिंकू शकतो. अशीच त्यांची भुमिका आहे.
-4-
म्हणून कॉंग्रेसशी युती करतांना संघाचे भूत कायमचे नष्ट करायची अट असली पाहिजे व त्यासाठी पुढील मुद्दे निवडणूक जाहीरनाम्यात पहिल्या 10 वाक्यात आली पाहिजेत.
1)  ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करणार्‍या मराठा-जाट सारख्या सर्वच क्षत्रिय जातींना ‘10 टक्के आरक्षणाच्या सवर्ण’ प्रवर्गात टाकावे व तसा कडक कायदा घटना-दुरूस्ती करून अमलात आणावा.
2)  2021 सालच्या राष्ट्रीय जनगणनेतच मराठा-ब्राह्मणांसकट सर्व जाती-पोटजाती-उपजातींची जनगणना करावी.
3)  नीती आयोग बरखास्त करून प्लॅनिंग कमिशनचे पुनरूज्जीवन करावे व लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व समाज घटक-प्रवर्गांना नीधीचे वाटप करावे. त्यासाठी घटना-दुरूस्ती करून संविधानातच तरतूद करावी.
4)  ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले पाहिजे व जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर ओबीसींचे चार उपविभाग करून त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वाटून दिले पाहिजे.
5)  संरक्षण, न्याय, आयबी, सीबीआय, खाजगी उद्योग, शिक्षण या सारख्या देशाच्या सर्व महत्वपूर्ण क्षेत्रात सर्व संवर्ग व सर्व पदांसाठी आरक्षण लागू करावे व ते 200 पॉईंट रोस्टर पद्धतीने अमलात आणावे. मायक्रो रिझर्वेशन रद्द करावे.
6)  देशातील व राज्यातील सर्व विभागातील रिक्त पदे ‘स्पेशल ड्राईव्ह’ पद्धतीने ताबडतोब भरावीत व एससी, एसटी, ओबीसींचा बॅकलॉग पूर्णपणे भरे पर्यंत ओपन कॅटेगिरीची भरती पुर्णपणे बंद ठेवावी.
7)  संघी-भाजपाच्या सरकारने घेतलेले कामगार-शेतकरीविषयक सर्व जनविरोधी निर्णय कॉंग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होताच रद्द करावेत व घटना दुरूस्ती करून तशी कायमची तजवीज करावी.
8)  स्वामीनाथन आयोग, मंडल आयोग, नचिअप्पन कमिटी रिपोर्ट व सच्चर आयोगाची अमलबजावणी पूर्णपणे सुरू करावी
9)  बौद्ध विद्यापीठाच्या धर्तीवर प्रत्येक राज्यात एक ‘फुलेआंबेडकर विद्यापीठ’ स्थापन करावे.
10)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘भांडारकर संशोधन’ संस्थेच्या धर्तीवर प्रत्येक राज्यात एक ‘बहुजन संशोधन संस्था’ असावी.
संघी-भूत कायमचे नष्ट करण्याचा हा 10 सूत्री निवडणूक जाहीरनामा डॉ. बाबासाहेबांच्या वांशिक, वैचारिक व भावनिक वारसदारांच्या कानी पडो, या अपेक्षेसह जयजोती, जयभीम .... सत्य की जय हो
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com


Monday, February 4, 2019

56 BahujanNama Tharar End 20 Jan 19 Daily Laokmanthan


छपन्नावी खेप ......!     ( दै. लोकमंथन, रविवार,  20 जानेवारी 2019 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-56
     तो 15 दिवसांचा थरार....! (भाग-अंतिम)
बहुजनांनो.... !   
15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यानच्या या 15 दिवसांची ही थरार-हकीकत गेल्या काही दिवसांपासून मी आपल्यासमोर चार भागात मांडली. अजून काही बरेचसे लिहायचे होते. काही मुद्दे सुटून गेलेत, काही मुद्दे जाणीवपूर्वक टाळलेत. हकीकत सांगतांना कोणाची मुद्दाम स्तुती करणे किंवा कोणाची तरी जाणिवपुर्वक बदनामी करणे, तुमची ईच्छा असली तरी, तुम्ही ते करू शकत नाहीत. कारण घडलेल्या घटना घडत असतांनाच हे हकीकत-कथन चालू होते. त्यामुळे कोणी कोणाकडे पुरावे मांगत बसण्याची गरज नाही. कारण दर्शन, श्रवण, कथन, लेखन व वाचन या सर्व क्रिया एकाच वेळी घडत होत्या. त्यातही मी कमीत कमी कटूता येईल याची काळजी घेत होतो.
लढाईत एखादी व्यक्ती जेव्हा एकाकी पडते, तेव्हा ती सर्वप्रथम चिडते ते आपल्याच रक्ता-मांसाच्या भरवशाच्या माणसांवर! त्यांनी उठावे, सोबत यावे, किमान लांबून का होईना, ‘लढ’ म्हणून प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा असते. तेही जर मान्यवरांकडून होत नसेल तर, कोणत्याही लढणार्‍या माणसाचा ‘तोल’ जाणं स्वाभविक आहे. त्यातून निश्चितच माझ्या कडून काही व्यक्ती दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची मी ‘बिनशर्तपणे’ जाहीर माफी मागत आहे. ते मला मोठ्या मनाने माफ करतील, याचीही मला खात्री आहे.
जुने मित्र नाही आलेत. परंतू या लढ्यात मला काही नवे मित्र भेटलेत. राजकारणी लोकांपासून नेहमीच अंतर ठेवून वागणारा मी एक कार्यकर्ता! पण प्रथमच माननीय प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या जवळ आलो आणी मी त्यांचा फॅन झालो. हा माणूस मला कोणत्याच अंगाने राजकारणी वाटला नाही. पूर्णपणे समाजकारणी! या माणसात कमालीचा नम्रपणा ठासून भरलेला आहे. गाडी फुल्ल झाल्यावर एक कार्यकर्ता गाडीबाहेरच राहीला. आण्णा स्वतःच्याच गाडीतून खाली उतरतात व बाहेर राहीलेल्या कार्यकर्त्याला आपल्या पहिल्या शीटवर बसण्याचा आग्रह करतात. डॉ. दिलीप घावडेंनी हा अनुभव घेतला आणी त्यांना तर गहीवरूनच आले. आणखीन एक प्रसंग... दिवसभराच्या धावपळीत माझं रात्रीचं जेवणच राहून गेले, असे जेव्हा आण्णांना कळले, तेव्हा आण्णा रात्री 12 वाजता आमदार निवासात आले व मला जेवणसाठी बाहेर नेले. माणूस भोळाच! मात्र अशा भोळ्या माणसाचा काही धुर्त लोक गैरफायदा घेतात, हेही मी प्रत्यक्ष पाहिले. या लढ्यात प्रकाश आण्णा शेवटपर्यंत साथ-साथ राहीलेत. आमदार नसतांनाही ते त्यांचे विधानभवनात दादागीरीने घुसणे, विधानभवनातील राष्ट्रवादी पक्षाच्या दालनात दरवाज्याला धडक मारून आत शिरणे, पुण्याच्या ओबीसी परिषदेत सर्वच राजकीय पक्षांवर तोफ डागणे, असे बरेच काही प्रसंग आठवले की, आण्णांचे मोठेपण जाणवते. असाच बेधडकपणा आण्णांनी राजकारणात दाखविला असता तर, आतातपर्यंत कितीतरी वेळा मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर आण्णाच दिसले असते.
दुसरे एक मित्र जे बारक्या जात-संघटनेचे नेतृत्व करीत ‘ओबीसी नेते’ म्हणून मान्यता
पावलेले, बालाजी शिंदे! ओबीसींमधील एक धडाडती तोफ! जात-दांडगे व धन-दांडग्या सत्ताधार्‍यांना भाषणातून कसं धुवून काढायचं, हे तर बालाजींकडूनच शिकायला पाहिजे. सतत प्रवासात, पायाला भिंगरी लावून फिरणारा हा निर्भीड माणूस! एका रात्रीतून नांदेडहून पुणे व पुण्यातून मुंबई गाठणारा हा माणूस मिटींग झाल्यावर लगेच निघणार नाशिक-धूळे दौर्‍यावर! अतिशय उर्जा असलेला नेता! परीट-धोबी समाजाला आपण अतिअल्पसंख्य म्हणून बारकी जात म्हणतो. पण या जातीतही ‘ओबीसी’ चळवळीचे जे स्फुल्लींग या माणसाने चेतवलेले आहे, ते अजून ‘’माळ्या-तेल्यांच्या नेत्यांनाही’’ जमलेले नाही. एक ‘ईगो’ व दुसरा ‘बेरकीपणा’ या दोन गोष्टी जर विर्सजित झाल्यात तर, हा माणूस निश्चितच महाराष्ट्रातील ओबीसींना सत्तापदावर नेल्याशिवाय राहणार नाही.
अरूणराव खरमाटे हे एक आगळे-वेगळे व्यक्तीमत्व आहे. अत्यंत शांत, मृदूवाणी व संयमित वागणे. आपला मुद्दा मांडतांना वा पटवून देतांना कोठेही आक्रस्ताळेपणा दिसणार नाही. रस्ता चुकलेल्या नव्या कार्यकर्त्याला समजावून सांगण्यात यांचा हातखंडा! छोट्याशा ओबीसी जमातीतून आलेले खरमाटे हे ‘ओबीसी नेते’ म्हणून जिल्हापरिषदेपर्यंत पोहोचले. या लढ्यात जर ते शेवटपर्यंत टिकून राहीलेत तर निश्चितच ते ओबीसी चळवळीचे शिल्पकार ठरतील, यात मला शंका वाटत नाही.
या लढ्यात एक तडफदार उमदा तरूण अचानक संपर्कात आला व सतत माझ्यासोबत माझा बॉडीगार्ड सारखा राहू लागला. कोल्हापूरचा सचिनदादा माळी हा पूर्वी राजूशेट्टींच्या संघटनेत आक्रमक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध होता. मध्यंतरी काही मतभेद झाल्यावर तो शेट्टींपासून दुरावला. लहानपणापासूनच व्यायामाची आवड असलेला हा तरूण आपल्या पीळदार व कसदार शरीराने समोरच्या माणसात धडकीच भरवतो. त्याने अनेक कुस्त्यांचे फड गाजवलेले आहेत. परंतू जसे त्याचे शरीर व्यायामाने कसदार बनले आहे, त्याचप्रमाणे त्याची बौद्धिक क्षमताही परिपूर्ण आहे. त्याने गेल्या एक वर्षात माझी अनेक पुस्तके वाचली व तो माझा मित्रच बनला. जेव्हा त्याला टि.व्ही. चॅनल्सवरून समजले की, श्रावण देवरे मैदानात उतरले आहेत, तेव्हा तो त्वरीत मुंबईत आला व पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत राहतो आहे. फुले आंबेडकर विद्यापीठाचा ‘संविधान गौरव परीक्षेचा’ कार्यक्रमही तो आता कोल्हापूर जिल्ह्यात राबवीत आहे.
     या सर्वात धाडसी ठरलेत ते आमदार हरिभाऊ राठोड! जे विद्यमान आमदार, खासदार असतात, ते सहसा मतांच्या राजकारणाच्या दबावाखाली मराठासारख्या डॉमिनन्ट वोटबँकेच्या विरोधात जात नाहीत. पण हरिभाऊ विद्यमान आमदार असतांनाही व भावी खासदार म्हणून निवडून यायचे असतांनाही त्यांनी ठामपणे मराठा ओबीसीकरणाच्या आरक्षणाला विरोध केला. अर्थात या सर्व लढ्यात ते आमच्या सोबत ओबीसी जनगणना अभियानापासूनच आहेत. सुरूवातीला हरिभाऊ बंजारा समाजाच्या पलिकडे जात नव्हते. ओबीसींचे चार तुकडे करणार्‍या रोहिणी आयोगाच्यापुढे त्यांची मजल जात नव्हती. मात्र आमच्यासोबत राहून ते हे सर्व विसरले व फक्त ‘‘ओबीसी...ओबीसी’’ जपमाळ करू लागलेत. मराठा ओबीसीकरणाच्या आरक्षणाला त्यांनी जो विरोध केला, तशी हिम्मत आज एकही विद्यमान आमदार करू शकलेला नाही, करूही शकत नाही. त्यांच्या आमदार निवासातली 612 नंबरची रूम ही या 15 दिवसांच्या थरार युद्धातील वॉर रुम होती. आजही आहे. कॉंग्रेस पक्ष मराठा आरक्षणाला उघड समर्थन करीत असतांनाही हरिभाऊ वेगळी भुमिका घेतात व आपल्याच पक्षातील जात-दांडग्यांना आव्हान देतात, यासाठी ‘’मर्दानगीची’’ गरज असते. ढाण्या वाघ म्हणून मिरविणारे अनेक ओबीसी नेते पायलीचे पंधरा मिळतील! पण याच षंढ ढाण्या वाघांना जेव्हा उंदरांच्या बीळात जाऊन लपून राहावे लागते, तेव्हा आमचे जहांमर्द प्रकाश आण्णा, हरिभाऊ, बालाजी व खरमाटे हे कोणताही आव न आणता खरेखुरे ‘‘जहांमर्द ओबीसी नेते’’ ठरतात, हे या 15 दिवसांच्या थरार लढ्यात सिद्ध झाले.
एक फार मोठे नाव, अशोकराव सोनवणे जे गेल्या 20 वर्षांपासून अखंडपणे 16 पानी दैनिक चालवीत आहेत, ‘दैनिक लोकमंथन’!... यांचा निर्भीडपणा कोणत्याही ‘खर्‍या’ सिंहापेक्षा कमी नाही. ओबीसींचा मोठाभाऊ म्हणविणार्‍या ‘‘गांडू’’ माळ्यांना जे कधीच जमले नाही व जमणारही नाही,  ते या ‘मर्द’ कुंभाराने करून दाखविले व करून दाखवीत आहे. ‘‘गांडू माळ्यांना’’ आधुनिक जाणत्या राजाच्या बुटांना चाटण्याची सवय लागलेली आहे. अशोकराव सोनवणे हा कुंभार समाजातील अत्यंत अल्पसंख्यांक बारक्या जातीतील मर्द माणूस हाच खरा ‘‘ओबीसी नेता’’ आहे. मी पाठविलेले सर्व बहुजननामे शिवीगाळसह बिनधास्तपणे छापतो व वरून चॅलेंजही देतो. अशोकरावसारखा मर्द माणूस जन्माला यायला एक पीढी खपावी लागते.
या 15 दिवसात आधीच ओबीसी नेते म्हणून सिद्ध झालेले राजाराम पाटील, चंद्रकांत बावकर, मृणाल ढोले पाटील, मंगेश ससाणे, ऍड. आंधळे व त्यांच्या साथीदारांनी चांगलीच लढत दिली. या शिवाय प्रतापराव गुरव, प्रा. टि.पी. मुंडे, माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे, ऍड. संजय भाटे, संजय राठोड, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, विलासराव काळे, शंकरराव आण्णा लिंगे, सचिन माळी, प्रा. करघणे, दिगंबरराव लोहार, पी.बी. कुंभार आणी आणखीन बरीच जहांमर्द नावे....सॅल्यूट फॉर ऑल.... दिलसे....
या अचानक आलेल्या मराठा संकटाच्या वावटळीने (भूतभवरीने) बरेच काही उडवून नेले. माझे नोव्हेंबर-डिसेंबर मधील पूर्वनियोजित व्याख्यानांचे, मिटींग, मेळाव्यांचे कार्यक्रम मला अचानक रद्द करावे लागलेत. बर्‍याच संयोजकांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांवर परिश्रम व पैसा खर्च केला होता, ते माझ्यावर जाम नाराज झालेत. मी त्यांच्यासमोर ओबीसी आरक्षणाच्या ‘‘ जीवन-मरणाचा’’ प्रश्न उभा केला. तेव्हा त्यांनी स्वतःच मला परवानगी दिली व सांगीतले की, ‘‘सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येऊ नका... आपण ओबीसींचे आरक्षण वाचवण्याला प्राधान्य द्या!’’ यात सर्वात मोठे नुकसान झाले ते ‘फुले आंबेडकर विद्यापीठाच्या राज्यस्तरीय संविधान गौरव परीक्षेचे’! ते नुकसान मी येथे शब्दात व्यक्त करू शकत नाही.
15 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा थरार 29 नोव्हेंबरला एक पर्व पूर्ण करून दुसर्‍या पर्वात आला आहे. या दुसर्‍या पर्वात माननीय ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मराठा गुंडांनी केलेला शारिरिक हल्ला झाला. अनेक विरोधी वकीलांना व कार्यकर्त्यांना धमक्या आल्यात. न्यायमुर्ती गायकवाड आयोगाच्या ‘बोगस’ गठणाला व त्यांच्या बोगस अहवालाला ‘जहांमर्द आमदार ईम्तियाज जलील व त्यांचे महामर्द वकील ऍड. तळेकर साहेबांनी दिलेले आव्हान फार महत्वाचे ठरले. मराठा जातीयवादी असलेल्या न्यायाधिश(?) गायकवाडांचा बोगस मराठावादी-अहवाल कोर्टातही सादर न करण्याची सरकारची भुमिका, ओबीसी आरक्षणाला व मुळ ओबीसींच्या यादीलाच आव्हान देणारीर्‍ सराटेंची याचिका, या बोगस याचिकेला पाठींबा देणारा महाराष्ट्र शासनाचा बदमाश सरकारी वकील, वकीलांची फौज उभी करून न्यायधिशांवर दहशत माजविणारे मराठा लोक आदि अनेक घटना घडत होत्या व घडत आहेत. यात सर्वात मोठी घटना घडली ती केंद्र शासन पुरस्कृत ‘‘10 टक्के उच्चजातीय आर्थिक आरक्षणाची!’’ तीचेही विश्लेषण नंतर करू या.. हा सिलसिला 2019-20 च्या निवडणूकांपर्यंत दमदारपणे चालणार आहे! त्याचाही आढावा पुढील बहुजननामात घेऊ या, तो पर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो....!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com

1)  महानायक... मध्ये प्रसिद्ध 22 जानेवारी19
2) दैनिक लोकमंथन 20 जानेवारी19 रविवार
3) ई-पेपर.... http://www.readwhere.com/read/1988233#page/5/2

57 BahujanNama 10 % Reservation 28 Jan19 Daily Lokmanthan


सत्तावन्नावी खेप ......!     ( दै. लोकमंथन, सोमवार,  28 जानेवारी 2019 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-57
     10 परसेंट विरूद्ध 16 परसेंट (पुर्वार्ध)
बहुजनांनो.... !   
राजकीय व सामाजिक घडामोडी इतक्या वेगाने घडत आहेत, की मला त्या सर्वांचा आढावा घेण्यासाठी रोजच ‘बहुजननामा’ लिहावा लागेल. माझ्यासोबत जी नवी टीम काम करते आहे, त्यात लिहिण्याचं काम कोणी करणारे नाहीत. त्यामुळे इतर सर्व कामांसोबत हेही काम मलाच करावे लागते. मुंबई-पुण्यात ओबीसीच्या नावाने गप्पा मारणारे, भाषणे करणारे, इंग्रजीचे जाणकार पायलीचे पंधरा मिळतात, पण एक-दोन अपवाद वगळता एखादी जबाबदारी अंगावर घेऊन काम करण्याचा बट्टा ते लावून घ्यायला तयार नाहीत. निवडणूका जसजशा जवळ येत आहे, तसतसे आमचे सर्वच ओबीसी नेते व बुद्धिमान ओबीसी लोक आपापले मतदार संघ ठरवित आहेत, ठरलेल्या मतदार संघात मराठा वोटबँक किती, ओबीसी किती, सौदेबाजीत व तोडीपाणीत किती पदरात पडतील वगैरे गणिते जुळविण्यात मश्गुल आहेत! आपल्या सौदेबाजीचा रेट वाढविण्यासाठी ते ओबीसी मेळावे, ओबीसी अधिवेशने वगैरे घेण्यात गुंतलेले आहेत. त्यात मराठा महापुरूषांना उद्गाटक म्हणून बोलावणे, मराठा जातीतील महामानवांना ‘कर्मवीर’ पुरस्कार देणे व भावी ‘‘मराठा-ओबीसी’’ प्रधानमंत्र्याला महात्मा फुलेंच्या नावाने पुरस्कार वगैरे देणे चालू आहे. वरिष्ठ जातींचे बुट साफ करून त्यांची मते मिळत असतील व आपले महान ओबीसी लोक आमदार-खासदार होत असतील तर, आपल्याला वाईट वाटण्याचे काही कारणच नाही. कारण हेच ओबीसी आमदार-खासदार उद्याच्या विधानसभेत-लोकसभेत ओबीसींचे अख्खे आरक्षणच सर्व क्षत्रिय जातींना सप्रेम भेट देऊन टाकण्याच्या विधेयकाला इमाने-इतबारे पास करतील व ओबीसींना भिखेला लावल्याबद्दल धन्य-धन्य होतील. त्यामुळे अशा महान कामात गुंतलेल्या महान ओबीसी लोकांना ‘‘ओबीसी आरक्षण बचावसारख्या’’ फालतू कामात जुंपणे महापाप ठरेल! असो!
गेल्या काही दिवसांपासून 10 परसेंटचा मुद्दा गाजतो आहे. त्या वेळेस मी नेमका दिल्ली व राजस्थानच्या दौर्‍यावर असल्याने माझी भुमिका मी मिडियातून जाहीर करू शकलो नाही. नंतरही पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने त्यावर काही लिहू शकलो नाही. 1991 साली जेव्हा कॉंग्रेसच्या नरसिंहराव सरकारने 10 टक्के सवर्ण आर्थिक आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणामध्ये घुसडला तेव्हा आम्ही त्याला कडाडून विरोध केला. तत्कालीन खासदार दि.बा. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ‘राखीव जागा संरक्षण समिती’चे आम्ही सदस्य होतो. त्यावेळी मुंबईत झालेल्या अनेक बैठकीत व कार्यक्रमात या आर्थिक आधारावरील आरक्षणाला आम्ही विरोध केला. त्यावेळच्या दैनिकातून, मासिकातून आम्ही वैचारिक भुमिका मांडल्या. आर्थिकवादाची वाळवी राज्यघटनेला लागली तर ती संपूर्ण संविधानच फस्त करील अशा अशायाचे मुद्दे आम्ही त्या काळात मांडले. कारण या देशात शोषणाची व्यवस्था ही ‘जातीय’ आहे, ‘आर्थिक’ नाही. त्यामुळे त्या काळात आर्थिक आधारावर आरक्षण देणे पूर्णपणे चूकीचे होते.    ( संदर्भ- ‘मंडल आयोगः आर्थिक निकषाच्या ब्राह्मणी कमंडलात बंदिस्त!’ सत्यशोधक मार्क्सवादी, मासिक, मुख्य संपादक- कॉ. शरद पाटील, जानेवारी 1992 चा अंक)
स्वातंत्र्योत्तर काळातील 2000 सालापर्यंतचे प्रत्येक जातीत झालेले गरीब-श्रीमंतीचे स्तरीकरण हे शोषणातून नव्हे तर काही इतर कारणांमुळे झालेले आहे. काही उदाहरणे पाहू या!
1)    मिळालेल्या कमी-अधिक संधींमुळे झालेले स्तरीकरण- एकाच कुटूंबातला मोठा भाऊ लाडा-कोडात वाढला, त्याचं डोकच नाही चाललं, त्यामुळे तो शाळेत गेलाच नाही, परिणामी गावातच राहिला. दुसर्‍या मुलाचं डोकं चाललं म्हणून तो उच्चशिक्षित होऊन नोकरीला लागला व शहरात जाऊन विकास पावला. किंवा राजकारणातून आमदार-खासदार वगैरे झाला.
2)   अचानक आलेला दुष्काळ, भुकंप वगैरे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले स्तरीकरण
3)   आधुनिक भांडवली युगाचे भान न ठेवता, जुन्याच सरंजामशाहीच्या परंपरा पाळण्यातून आलेले स्तरीकरण! उदाहरणार्थ- लग्नसराईतील उधळपट्टी, बाई-बाटलीची परंपरा, हुंडा पद्धती वगैरे
मात्र 1991 पासून सुरू झालेल्या खाजगीकरण-उदारिकरण-जागतिकीकरण (खाऊजा) धोरणाचे परिणाम एकवीसाव्या शतकात तीव्रतर होत गेलेत. जातीय शोषणासोबत आर्थिक शोषणही तीव्र झाले. या आर्थिक शोषणाने केवळ कनिष्ट जातींचेच शोषण केले असे नाही तर, उच्च-सवर्ण जातीतील कमजोर वर्गाचेही शोषण केले. सुरूवातीला केवळ ‘अचानक प्राप्त झालेल्या संधी-सवलतींमुळे निर्माण झालेले स्तरीकरण’ नंतर खाऊजा धोरणमुळे आर्थिक शोषणात बदलले. एकाच भाऊबंदकीतील एक घराणे जमिनदार आहे व दुसरे घराणे शेतमजूर बनले आहे. एक भाऊ शेतमालक तर दुसरा भाऊ त्याच्याच शेतावर सालदारकी करतोय! ही सारी उदाहरणे आर्थिक शोषणाची आहेत. शोषणकर्ते लोक ‘वर्गीय’ म्हणून संघटित असले तरी ते ‘लहान माशाला मोठा मासा गिळण्याला’ वर्गीय नितीमत्ता म्हणून मान्यता देतात. त्याचप्रमाणे शोषणकर्ते लोक ‘जातीय’ नावाने संघटित असले तरी ते आपल्या जातीतील कमजोरांना पायाखाली घेऊनच पुढे जाण्यात धन्यता मानतात. खाउजा धोरणाने हा सिद्धांत गतिमान केला आहे. बहुतेक सर्वच डॉमिनन्ट जातींच्या पोटात ‘वर्ग’ आकार घेत आहेत. त्यामुळे ब्राह्मण, जाट, पटेल, मराठा सारख्या उच्चजातीतील ‘गब्बर’ शोषकांनी आपल्याच जातीतील भाईबंधांना लुबाडले व त्यांना देशोधडीला लावले. शोषक हा ‘वर्गीय’ असेल कींवा ‘जातीय’ असेल, तो आपल्या सख्या भावाला वा सख्या बहिणीलाही सोडत नाही, कारण तो शोषक म्हणून ‘सैतान’ असतो. डॉ. बाबा आढावांनी 1972 साली लिहीलेल्या पुस्तकात आकडेवारी देऊन उदाहरणांसहीत सिद्ध केले आहे की, महाराष्ट्रातील मराठा राज्यकर्ते ब्राह्मण-बनिया भांडवलदारांच्या हितासाठी आपल्याच मराठा बांधवांना कसे देशोधडीला लावतात! (संदर्भ- ओबीसी मराठा बहुजनः मोर्चे प्रतिमोर्चे व पुरोगामी महाराष्ट्राची फरफट, संपादक- प्रा. श्रावण देवरे, ‘हे तर शेटजी-भटजींचे आधुनिक दासच!’ लेखक- डॉ. बाबा आढाव पान- 67 ते 75)
औद्योगिकरणातून जाती आपोआप नष्ट होतील, हा मार्क्सचा आपोआपवाद कदाचित खराही ठरला असता. मात्र जात ही केवळ वर्गीकरणाची व्यवस्था नसून ती शोषणाची उतरंड आहे व म्हणून औद्योगिकरणाच्या भरभराटीतही ती टिकविण्यासाठी तीचे लाभार्थी शर्तीचे प्रयत्न करतील व करीत आहेत, हे बाबासाहेब आंबेडकरांपासून ते प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटीलांपर्यंतच्या तत्वज्ञान्यांनी सिद्ध केले आहे. ब्राह्मणांमधील आर.एस.एस. व क्षत्रिय जातीतील करणी सेना, पटेल समर्थन संघटना, ठाकूरांच्या रणवीर सेना, मराठा महासंघ वगैरे संघटना निर्माण झाल्या नसत्या किंवा निर्माण होताच ठेचून काढल्या असत्या, तर निश्चितच जातीव्यवस्था आज पूर्णपणे खिळखिळी झाली असती. परंतू शासक-शोषक जातींनीच आपापल्या जातीय हिंस्त्र संघटना काढून आपले जातीय हितसंबंध कायम ठेवण्यासाठी समांतर मनस्मृतीची अमलबजावणी सुरू ठेवली.
या शासक-शोषक जातींच्या पोटात जो एक ‘शासित-शोषित वर्ग’ आकार घेत आहे, त्याला त्याच्या जातीपासून वेगळे काढले पाहिजे. अशा परिस्थितीत 10 परसेंट सवर्ण आर्थिक आरक्षणाचा कायदा झाला असेल तर, त्याबाबत पुर्वग्रहदुषित मुद्दे बाजूला ठेवून विचार केला पाहिजे. आपल्याच जातबांधवांकडून लुबाडल्या गेलेल्या ब्राह्मण, मराठा, जाट, पटेल वगैरे जातीतील गरीब-कमजोर लोकांचा विचार ‘शोषित वर्ग’ म्हणून एस्सी-एस्टी-ओबीसींनी नाही करायचा तर, कोणी करायचा??? फुले-आंबेडकरवादी म्हणून आपली दलित-ओबीसींची काही जबाबदारी आहे की नाही?? या ब्राह्मण-मराठा-जाट जातीतील गरीबांना दयाभाव वा करूणा न दाखवता, त्यांना शोषित म्हणून सैद्धांतिक मांडणी करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे की नाही? महान प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी भारतीय समाजव्यवस्थेचं विश्लेषण करतांना ते ‘‘जातीय-वर्गीय’’ असल्याचे सिद्ध केले आहे. जात्यंताचा व वर्गांतचा लढा याची सांगड घालण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. वर्गांतचा लढा हा केवळ एस्टी, एस्सी व ओबीसी जातीतील श्रमिकांना सोबत घेऊन लढता येणार नाही, तर ब्राह्मण-क्षत्रिय जातीतील श्रमिक वर्गालाही सोबत घ्यावे लागेल. त्याचप्रमाणे जात्यंतचा लढा हा केवळ कनिष्ठ जातीतील नेत्यांच्या भरवशावर नाही लढता येणार, आपल्याला ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य जातीतील सच्च्या पुरोगामी नेत्यांनाही सोबत घ्यावे लागेल. यासाठी एकच अट महत्वाची आहे आणी ती म्हणजे हे दोन्ही लढे कनिष्ठ समजले गेलेल्या शूद्र-अतिशूद्र जातीच्या नेतृत्वाखालीच झाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत जात्यंत व वर्गांतचा लढा हा ब्राह्मण-क्षत्रिय-बनिया या उच्च जातीय नेत्यांच्या नियंत्रणात नाही गेला पाहीजे.  
त्यामुळे आज क्षत्रिय-ब्राह्मण जातीतील गरीब वर्गासाठी दिलेले 10 टक्के आरक्षण हे योग्य आहे, असे मला वाटते. हा गरीब वर्ग तात्कालीक वा प्रासंगिक कारणास्तव गरीब झालेला नाही, तर खाऊजा धोरणासाख्या शोषण-व्यवस्थेतून गरीब झाला आहे. सवर्ण जातींचे 10 टक्के आरक्षण योग्य आहे, असे म्हणत असतांना त्याची दुसरीही बाजू लक्षात ठेवली पाहिजे. या देशात काहीही नवे मुलभूत बदल झालेत की त्याचा सुक्ष्म अभ्यास करून तो बदल आपल्याच फायद्याचा कसा करून घेता येईल यासाठी ब्राह्मणी शक्ती आपले डावपेंच व धोरणे आखते व त्यात ते यशस्वी होतात, कारण ते सत्ताधारी वा अमलबजावणीकर्ते असतात. याचे सर्वात मोठे उदाहरण एस्सी-एस्टी आरक्षणाचे! या आरक्षणाबद्दल अशी प्रचार मोहीम राबविली गेली की, जेणे करून ओबीसीं-क्षत्रियांच्या मनात एस्सी-एस्टीबद्दलची आधीच असलेली जातीय द्वेषाची भावना अधिक ज्वालाग्रही बनवली गेली व त्यातून दलित विरूद्ध ओबीसी दंगली भडकविण्यात येथील उच्चजातीय ब्राह्मणी सत्तधार्‍यांना यश आले. तुसरे उदाहरण मंडल आयोग अमलबजावणीचे!
 आर्थिक आधारावरचे आरक्ष कोणत्याही परिस्थीतीत 10 टक्क्याच्यावर जायला नाही पाहीजे. कारण हे आर्थिक आधारावरचे आरक्षण जर वाढत गेले तर सामाजिक-शैक्षणिक आधारावरचे आरक्षण क्षीण होत जाईल. म्हणून यात घटना-दुरूस्ती करून आणखी एक उप-कलम समाविष्ट करणे आवश्यक आहे. या नव्या घटना-दुरूस्तीबद्दल आपण आग्रही राहीले पाहिजे.
सवर्ण जातीतील ‘शोषित-शासितांना’ 10 टक्के आरक्षण दिले म्हणजे ते आपोआप वर्गांतक, जात्यंतक वा पुरागामी होतील, अशा भ्रमात कोणी राहू नये. आमचे बरेच आंबेडकरवादी मित्र असा ‘आपोआपवादी’ सिद्धांत मांडतात. एक बामसेफी नेते लिहीतात की, ‘मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण दिले की ते आपोआप फुले-आंबेडकरवादी होतील’ त्यावर मी त्यांना यापेक्षा अधिक क्रांतिकारक सिद्धांत सांगीतला कि, ‘‘मराठ्यांना दलितांच्या आरक्षणात घेऊन टाका म्हणजे ते डायरेक्ट ‘बुद्धिस्ट’ होतील’’ दुसर्‍याच्या घरातील कष्टाची कमाई ‘खिराफत’ म्हणून वाटणारे आमचे ‘अ-आंबेडकरवादी’ केव्हा सुधरतील माहीत नाही???
उत्तरार्धात आणखीन बरेच मुद्दे आहेत, ते पुढील आठवड्यात पाहू या! तो पर्यंत जय जोती, जयभीम, सत्य की जय हो!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com