http://shrwandeore.blogspot.in/

Thursday, June 14, 2018

26 BahujanNam 3 जुन 2018 बाबासाहेबांच्या राजकीय क्रांतीचं आजचं चरित्र !!??


सव्वीसावी  खेप......!   (दै. लोकमंथन रविवार – 3 जुन 2018 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-26
बाबासाहेबांच्या राजकीय क्रांतीचं आजचं चरित्र !!??

बहुजनांनो.... !
अलिकडे बरेच सुज्ञ राजकारणी निवडणुक निकालांवरून आपली राजकीय धोरणे ठरवायला लागली आहेत. कर्नाटकच्या निवडणुका देशाचे राजकीय धोरण ठरविणार, भंडारा-गोंदियाची निवडणुक दलित राजकारणाची दिशा ठरविणार आहे, अशी अनेक विधाने ऐकायला मिळतात.
समजा कर्नाटकमध्ये भाजपा बहुमताने सत्तेत आला असता तर काय विरोधक कॉंग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आले नसते? भंडारा गोंदियात भारिपचा उमेदवार जिंकला असता तर काय बाळासाहेबांच्या नेतृत्वात दलित ऐक्य झाले असते? जगातल्या कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा मणभर सरस असलेली राज्यघटना या देशाला मिळलेली असतांना, वैचारिक वादविवाद-संवादाची हजारो वर्षांची परंपरा लाभलेली असतांना देशातील राजकीय पक्ष आपले धोरण केवळ निवडणुकांवरून ठरवितात, हे काय लोकशाहीचे लक्षण म्हणावे? जणू काय या राजकीय पक्षांनी देशातील जनतेचे भरपूर वैचारिक प्रबोधन केले आहे व लोक मतांचा हक्क बजावतांना डोक्यात वैचारिक भुमिका घेऊनच येतात!
भंडारा-गोंदिया निवडणुक निकालावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यात मला एकच प्रतिक्रिया भावली कारण ती झिरो-ग्राऊंडवरची वास्तव प्रतिक्रिया आहे. भारिपचे कार्यकर्ते डॉ. संदिप नंदेश्वर यांनी त्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराचे काम केले असल्याने त्यांची प्रतिक्रिया मला जास्त विश्वासार्ह वाटते. त्यांचेच वाक्य उद्धृत करतो- ‘’ .... कमी पडली ती या दोन्ही जिल्ह्यात मागील ६० वर्षात झालेली प्रबोधनाची कमतरता .....’’ आता ही प्रतिक्रिया काय दोन जिल्ह्यांपुरती मर्यादित राहात नाही. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्ये व भारतातील सर्वच्या सर्व 712 जिल्ह्यांची हीच कथा आहे. बाबासाहेब आंबेडकरांना 1954 साली 2 लाख वोटींग झालं! आज निव्वळ बौद्धांचंच वोटींग 2 लाख असतांना फक्त 60 हजारच वोटींग आंबेडकरवादी उमेदवारांना झालं! बाकीच्या बौद्धांनी खैरलांजीच्या गुन्हेगारांना मतदान केलं! ब्राह्मणी प्रतिक्रांतीचे सर्वात मोठे संकट बौद्धांवर आलेले असतांना बौद्धलोक वोटींग करण्यासाठी घराबाहेरही पडत नाहीत आणी पडलेत तर सरळ मनुवाद्यांच्या पदरात मतदान करतात. मत-हक्कातूनच सम्यक क्रांतीचं स्वप्न पाहणार्‍या बाबासाहेब आंबेडकरांचा हा निर्विवाद पराभव आहे.
जेथे बौद्धांची ही परिस्थिती तेथे बाकीच्या एस्सी, एस्टी, ओबीसींची काय अवस्था असेल? आज पुन्हा एकदा या नव-बौद्धांनाच ‘आंबेडकरवाद’ समजून सांगण्याची गरज भासते आहे. त्यांना समजला तर बाकीच्या जातीना तो समजेल. अर्थात ते आंबेडकरवाद विसरलेत यात त्यांचा काय भी दोष नाही. दोष आहे तो नेत्यांचाच! 1954 साली बाबासाहेबांना 2 लाख मतं मिळाली होती याचं साधं कारण हे होते की बाबासाहेबांचं राजकारण ‘सकारात्मक ईश्युबेस्ड’ होते. आजचं राजकारण हे नकारात्मक आहे. मनुवाद्यांनी केलेल्या क्रियेला  आपण प्रतिक्रया द्यायची व त्यावरच नकारात्मक राजकारण करायचं! आजूबाजूला होणार्‍या निवडणुकांवर व त्यातील प्रस्थापितांच्या जय-पराजयावर धोरणं ठरत  असतील तर आपली कुठे तरी चूक होते आहे, हे समजून घ्यायला पाहिजे.
संदिप नंदेश्वर यांनी मांडलेल्या मुद्द्याचाही विचार केला पाहिजे. जात म्हणुनही बौद्धांना मतदान न करणार्‍या व सरळ आपल्या जात-शत्रूंनाच मतदान करण्यात धन्यता मानणार्‍या बौद्धांचं प्रबोधन होणे गरजेचे आहे. मुद्दा विचारसरणीचा आहे. 7-8 वर्षांपूर्वीचा एक अनूभव सांगतो. आपल्या फुलेआंबेडकर विद्यापीठाच्या सत्यशोधक परिक्षांचे केंद्र एका बौद्ध शाळेत सुरू होतं. माझ्या एका बौद्ध प्राध्यापकाला हे समजलं. या बौद्ध प्राध्यापकानं हे परिक्षाकेंद्र बंद पाडलं. कारण काय तर बौद्धांना आता फुले-आंबेडकर सांगण्याची गरज नाही, ते बुद्ध झाले आहेत व विचारांनी पक्के आहेत. नाशिकच्या राकेश वानखेडे या सुप्रसिद्ध कांदबरीकाराने ‘पुन्हा शंबुक’ नावाची कांदंबरी लिहीली. तेव्हा दुसरे एक बौद्ध प्राध्यापक म्हणाले, ‘’बौद्ध आता रामायण-महाभारताच्या पलिकडे गेले आहेत. त्यांना कशाला पुन्हा शंबुकाची आठवण करून देतात?’’ आजचे बौद्ध जेव्हा खैरलांजीतील शंबुकांच्या खुन्यांना मतदान करतात तेव्हा ते शत्रूच्या राम-छावणीचे सैनिक झाले आहेत व त्यांना पुन्हा ‘’रिडल्स’’ सांगून भीमछावणीत आणावे लागणार आहे.
आज प्रबोधन विरूद्ध कुप्रबोधन अशी सरळ-सरळ लढाई आहे. भीडे भटजीसारखे असे असंख्य कुप्रबोधनकार घर-दार त्यागून व जीव धोक्यात घालून गावोगावी कुप्रबोधन करीत हिंडत आहेत. भिडे भटजी 81 वर्ष वयाचे आहेत. बौद्धांमध्ये असा एकतरी निष्ठावान दाखवा की जो 81 वर्ष वयानंतरही जीव धोक्यात घालून ब्राह्मणवाद्यांचं कुप्रबोधन खोडून काढण्यासाठी गावो-गावी हिंडतो आहे?? सगळे आपले एसी रूममध्ये बसून फेबुवर व व्हाट्सपवर क्रांतीच्या बाता मारण्यात मग्न आहेत. जे थोडेफार स्वतःला निष्ठावंत बौद्ध म्हणवितात ते रोज नित्यनेमाने बौद्ध विहारात (की मंदिरात) जाऊन पंचशिलची आरती ओवाळतांना दिसतात. विचारांची क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होत नाही, हा बाबासाहेबांचा आवडता सिद्धांत! पण येथे सर्वांनाच डायरेक्ट राजकिय क्रांती करायची आहे. आणी आजच्या राजकीय क्रांतीचे चरित्र पुढीलप्रमाणे आहे—
आज प्रमुख चार पक्ष सोडलेत तर बाकीच्या पक्षांना निवडणूकीत कडीपत्त्याइतकीच किंमत आहे. या पक्षांना वा अपक्ष उमेदवारांना उभे राहण्यासाठी पैसे मिळतात, नाव मागे घेण्यासाठी पैसे मिळतात, प्रचार करण्यासाठी व न करण्यासाठीही पैसे मिळतात. एकाच जातीचे 10 अपक्ष उमेदवार ज्या मतदारसंघात उभे केले जातात, यावरून त्या जातीला त्या मतदारसंघात भलताच ‘भाव’ आहे. आणी हा भाव ‘वसूल’ करण्याची संधी साधण्यासाठी चढाओढ लागते आहे. हे आहे बाबासाहेबांच्या राजकीय क्रांतीचं आजचं चरित्र! हे चरित्र बदलण्यासाठी वैचारिक क्रांतीच करावी लागेल, ती होईल अशी फुका आशा धरू या व तोपर्यंत कडकडीत जयभीम-जयजोती एकमेकांना करीत राहू या!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
                                      Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
                                       Email- s.deore2012@gmail.com








        

No comments:

Post a Comment