http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, April 8, 2018

18 BahujanNama Lokmanthan 8 April18

अठरावी खेप......!
(दै. लोकमंथन रविवार – 8 एप्रिल 2018) बहुजननामा-18 मतदान- ‘चेहरा’ पाहून की ‘धोरण’ पाहून?? !
बहुजनांनो.... !
   नरेंद्र नेरकर..! माझे अध्यापक सहकारी. व्यक्तिमत्व असे की ताबडतोब मैत्री व्हावी. जातीने वैश्य वाणी असल्याने सामाजिक चळवळीचा कुठेही गंध नाही. पण काही माणसं उपजतच सामाजिक असतात. आपल्या विभागातील एससी व एसटी विद्यार्थ्यांची ते विशेष काळजी घेतात. त्यांच्या शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म जमा करण्यापासून ती शिष्यवृत्ती मंजूर होईपर्यंत हा माणूस स्वतः धडपड करतो. प्रसंगी समाजकल्याण विभागातील दलित अधिकार्‍याशी भांडणही करतो. नेहमी गैरहजर राहणार्‍या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या आदल्या दिवशी फोन करून परिक्षेची आठवणही करून देतो. ही सर्व कामे हा माणुस स्वतः करतो. हाताखालच्या दलित शिक्षकावर ढकलून मोकळा
होत नाही.
हे माझे शिक्षक मित्र मला काल भेटलेत. बर्‍याच गप्पा झाल्यानंतर मला ते तळमळीने विचारतात- ‘सर, केव्हा बदलेल हे सारे? आपण राज्यकर्ते बदलतो पण परिस्थिती मात्र बदलत नाही.’ मी त्यांना विचारलं की तुम्ही जर ईलेक्ट्रॉनिक्सचे प्राध्यापक असाल तर तुम्ही पाककला शात्राचा अभ्यास कराल का?’ ‘नाही, काही गरजच नाही’, त्यांचे उत्सफुर्त उत्तर. ‘पण समझा बायको गेली माहेरी आणि अचानक मोठ्ठे पाहणे आले घरी, तर काय तुम्ही त्यांना हॉटेलातील चहा पाजणार?’ माझा प्रश्न. ते तडक उत्तरले, ‘छे! छे! असं कसं? मी स्वतः चहा बनवून त्यांना देणार.’ पण सर तुम्ही तर पाककला शास्त्राचा अभ्यास करतच नाहीत. चहा कसा बनविणार? – माझी प्रश्नार्थक मल्लीनाथी! ‘’अहो, सर, त्यासाठी कशाला हवे पाकशास्त्र? चहा बनविण्याइतकं नॉलेज तर देखादेखीतून मिळतंच! तेवढ्या नॉलेजवरून आपण चहा करण्यात यशस्वी होतोच!’’ ‘’आता तुम्ही मुद्द्याचं बोललात नेरकर सर.’’ त्यांचा ‘ताला’ उघडताच मी आतील कांदे-बटाटे काढून विचारांचे बदाम-पिस्ते भरायला लागलो.
जरी आपण कुठल्याही एका विषयात तज्ञ असलो तरी जीवनात आवश्यक असलेल्या इतर क्षेत्रांची जुजबी का होईना आपण माहीती मिळवित असतो. त्या जुजबी ज्ञानावरही आपण आपल्यापुरतं काम भागवतोच. एखादि वस्तू विकतांना अथवा खरेदी करतांना नफा-नुकसान समजण्या इतपत आपल्याला अर्थशास्त्राचं ज्ञान असतंच. कोणत्या देवीला कसे प्रसन्न करायचं, कोणत्या प्रसंगी हनुमान चालिसा पुटपुटायचा व सोवळं-ओवळं कसं पाळायचं एवढा धर्मशास्त्राचा अभ्यास तर आपण करतोच. त्याचप्रमाणे अंकशास्त्र, भौतिकशास्त्र, लैंगिक शास्त्र आदि जीवनाश्यक विषयांचा आपण वेळोवेळी अभ्यास करतच असतो. मात्र एक असा विषय आहे की जो अत्यंत महत्वाचा असूनही आपण त्याचा अभ्यास कधीच करीत नाही.
‘कोणता विषय?’ त्यांची उत्सुकता ताणली गेली. मी त्यांना ओढत-ओढत अंधार कोठडीच्या एक्झिट गेटवर आणून ठेवलं होतं. बस्स एक किक मारली हा माणूस प्रकाशवाटेवर धावत सुटेल.
‘’राज्यशास्त्र’’ मी त्यांची उत्सुकता थोडी ढीली केली. ‘कसे काय, मी समजलो नाही?’
मी पुन्हा माझी टकळी सुरू केली. राज्यशास्त्र या विषयात लोकशाही, निवडणुका, विविध राजकीय पक्षांची धोरणे, त्यांचे कार्यक्रम, निवडून आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात राबविलेली धोरणे, कोणत्या सरकारमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत अथवा कमजोर झाली, वगैरे वगैरे मुद्द्यांवर अभ्यास असतो. अर्थात सर्वच मुद्द्यांची चर्चा पुस्तकांमध्ये नसते. देखादेखीतूनही आपण बरेच ज्ञान मिळवू शकतो. सत्तेवर आलेल्या पक्षांचा जो अनुभव येतो, त्यावरूनही आपला आवश्यक अभ्यास पूर्ण होऊ शकतो.
आता प्रत्यक्ष उदाहरणच देतो. देशात मुठभर भांडवलदार सोडले तर बाकी सर्व कामगार-शेतकरी-मजूरच आहेत. 2 टक्के उच्च मध्यम वर्ग जर सोडला यांची संख्या 80-85 टक्क्यांपर्यत जाते. आणी हे सर्व कामगार, शेतकरी वगैरे शोषित पिडीत आहेत. या 80 टक्के श्रमिकांनी राज्यशास्त्राचा थोडा जरी अभ्यास केला तरी त्यांच्या सहज लक्षात येईल की, आपल्या देशात कोणते पक्ष भांडवलदार-धार्जिणे आहेत व कोणते पक्ष शेतकरी-कामगार हिताचे राजकारण करतात! पण राज्यशास्त्र हा विषय आपल्या जीवनातील सुख-दुःखाशी निगडीत आहे, हेच अजून समजलेलं नाही. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याचा प्रश्नच नाही. बरे! हा अभ्यास करण्यासाठी पुस्तकेच वाचली पाहिजे असेही नाही. देखादेखीतूनही हे राज्यशास्त्राचे ज्ञान मिळू शकते. केरळ, प. बंगाल सारख्या राज्यात कम्युनिस्ट पक्षाची सरकारे येतात, तेव्हा ते कोणत्या वर्गाच्या हिताचे कायदे अमलात आणतात, एवढी जरी दखादेखी गांभिर्याने केली तरी आपल्याला सहज कळते की बाकीचे पक्ष हे मुठभरभांडवलदारांचे, सावकारांचे व व्यापारी-दलालांच्या हिताचे धोरण राबवितात. बस्स! मतदान करण्यासाठी एवढं जुजबी ज्ञान पुरेसं असतं!
आणखी एक उदाहरण देतो. आपल्या देशात जातीव्यवस्था आहे. आता तुम्ही वाणी समाजाचे असले तरी ‘ओबीसी’ कॅटेगिरीत आहेत. देशात एस्सी, एस्टी व ओबीसी यांची लोकसंख्या जवळपास 75 टक्के आहे. आपल्या देशात ब्राह्मण-क्षत्रिय यासारख्या उच्चजातीय लोकांचे पक्ष आहेत तसे एस्सी व ओबीसींचेही पक्ष आहेत. कोणता पक्ष कोणत्या जातीचं भलं करण्यासाठी राजकारण करतो, हे समजून घेण्यासाठी राज्यशास्त्राचं कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाही. मात्र केवळ देखीदेखीतूनही आपण राज्यशास्त्राचं ज्ञान घेत नाहीत, म्हणून 85 टक्के कनिष्ठ जाती उघडपणे ब्राह्मण-क्षत्रियांचे पक्ष सत्तेवर निवडून आणतात.
आजही निवडणूका ‘चेहरा’ दाखवून जिंकल्या जातात. ओबीसी-मोदींचा चेहरा पाहिल्यानंतर ओबीसी ब्राह्मणांच्या पक्षाला निवडून आणतात. चेहरा पाहण्यासाठी ज्ञान लागत नाही, धोरण पाहण्यासाठी जुजबी का होईना ‘राज्यशास्त्राचं ज्ञान’ लागतं. पेरियार-फुले-आंबेडकरी विचारांचं सरकार दिल्लीत निवडून आणलं तर, तामिळनाडूप्रमाणे संपूर्ण देशातील ओबीसींना 50 टक्केपेक्षाही जास्त आरक्षण मिळेल, हे समजून घेण्यासाठी देखादेखी पुरेशी आहे.
औपचारिक समारोप करतांना मी म्हणालो की, ‘’सर, राज्यशास्त्राचा केवळ जुजबी अभ्यास करून आपण मतदानाला गेलो तर परिस्थिती बदलण्यासाठी वारंवार राज्यकर्ते बदलण्याची गरज नाही. चला, मला अजून बरीच कामे आहेत.....!
------- प्रा. श्रावण देवरे
ब्लॉग Link - https://shrwandeore.blogspot.in/
Whatsap No. Mobile – 88 301 27 270 .
Email- s.deore2012@gmail.com

No comments:

Post a Comment