http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, April 1, 2018

17 BahujanNama Lokmanthan 1 April 18


बहुजननामा        सतरावी खेप                      (दिनांकः- 1 एप्रिल च्या अंकासाठी)

जात-वर्गांतची सम्यक क्रांती अंतिम टप्प्यात?

 आज टाईम्स ऑफ इंडियामध्ये ख्रिस्ती धर्मगुरू फ्रान्सिस पोप यांच्यासंदर्भातील एक बातमी वाचली आणि मला माझे मित्र फ्रान्सिस वाघमारे यांची आठवण झाली. लगेच फोन लावला. तासभर चर्चा झाली. पोप यांनी एका फार्मल मुलाखतीत सांगीतले की, नरक अस्तित्वात नाही. मुलाखत छापून येताच रोमच्या धर्मपीठाने ती मुलाखतच खोटी ठरवली. आमच्या फ्रान्सिसचं म्हणणं हे की आताचे पोप हे खूपच पुरोगामी आहेत. नास्तिकांनाही स्वर्ग मिळू शकतो, असे पोप म्हणतात. अलिकडे प्रोटेस्टंट हे प्रतिगामी व कॅथॉलिक हे पुरोगामी होत चालले आहेत, असेही फ्रान्सिसचं प्रामाणिक म्हणणं आहे. पण हे असेबदलणेएकाएकी होते काय? अचानक तर शक्य नाही. यासर्व धार्मिक व भ्रामक कल्पना लोकांमध्ये रूजल्या होत्या. प्रबोधन युग अवतरले आणी लोकांच्या मनात पुरोगामी विचार घर करू लागलेत. अर्थात पुरोगामी विचारांचे फायदेही प्रत्यक्ष विज्ञानयुगाच्या रूपाने दिसायला लागलेत. त्यामुळे युरोपात महाप्रबोधनाची चळवळ वेगाने पसरली व चर्चची राज्य-सत्ता कोसळली. मात्र धर्मसत्ता कॅथॉलिक पंथाच्या रूपाने जीवंत राहीली.
नवीन काही लिहायचे असेल तर दोन पदार्थांची गरज असते. एक म्हणजे लिहिण्याची पाटी दुसरे म्हणजे काळाची गरज. काळाची गरज असेल तर पाटीवर नवे काही लिहिण्याची प्रेरणा मिळते. पाटी कोरी असेल तर, सहजपणे लिहिण्याची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र जर पाटीवर आधिच काही लिहीलेले असेल तर मात्र ते पुसण्यासाठि बरेच कष्ट घ्यावे लागतात. युरोपातील महाप्रबोधनाच्या चळवळीनं अनेक बळी घेतले आहेत. भारतात तर ही परंपराच आहे पाच हजार वर्षांची!
पोपचाच मुद्दा पुढे सरकत सरकत मोदींवर येऊन पोहोचला. पोपसारखा एक धर्मगुरू जर पुरोगामी विचार मांडू शकतो तर मोदी पुरोगामी बनून काही चांगले का करीत नाहीत? यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला जात नाही. एखादि व्यक्ती प्रधानमंत्रीपदासारख्या मोक्याच्या जागेवर बसल्यानंतर ती व्यक्ती राहात नाही तर एका विशिष्ट शक्तीचं प्रतिक बनते. मोदी हे ब्राह्मणी छावणीचे एक प्रतिक आहेत. त्यामुळे व्यक्ती म्हणून मोदीनेपुरोगामीबनून काही चांगले निर्णय घेणे शक्यच नाही. आणी समजा काही चांगले निर्णय घेतलेही तरी ते निर्णय राबविणारी प्रशासकीय यंत्रणा जर तुमची वर्ग-शत्रू अथवा जात-शत्रू असेल तर ते चांगले असूनही वाइट पद्धतीनेच राबविले जाणार! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कॅडच्या चर्चेत याच शब्दात संविधानाच्या अमलबजावणीबाबत म्हटले होते कि, जे आज तंतोतंत खरे ठरत आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की, ब्राह्मणी छावणी कट्टर ब्राह्मणवादी जातीयवादी असतांना तीने एका शूद्राला म्हणजे मोदिंना एवढ्या मोठ्या मुख्य पदावर म्हणजे प्रधानमंत्रीपदावर का बसविले? आता हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात शिरावे लागेल. चाणक्याने बौद्ध राजा नंद याच्याविरोधात प्रतिक्रांती केली. षडयंत्राने राज्यसत्ता एका रात्रीत उलथून टाकता येते, लोकांच्या मनावर प्रभाव गाजविनारे विचार बदलविणे एक प्रदिर्घ चळवळ असते. ब्राह्मणी छावणीच्या चाणक्याने जरी राज्यप्रतिक्रांती केली तरी त्याने ब्राह्मणाला राजा नाही बनविले. शूद्र चंद्रगुप्ताला केले. चाणक्याने त्याचे नाव घेऊन राज्यात शूद्रविरोधी कारवाया सुरू केल्या. त्याची झळ खुद्द चंद्रगुप्तालाही बसत होतीच. चाणक्य हा चंद्रगुप्ताला वृषभसंबोधत होता. राजा बनूनही तो चाण्यक्याच्या दृष्टीने शूद्रच होता. चाणक्याच्या ब्राह्मणी छळाला कंटाळून राजा चंद्रगुप्ताने शेवटी जैन धर्म स्वीकारून बंड पुकारले. जसे शिवाजी राजाने ब्राह्मण नोकरदारांच्या छळाला कंटाळून शाक्त धर्म स्वीकारला. पण हे कशामुळे शक्य झाले? प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनून जेव्हा सर्वोच्चपदावरील एखादि व्यक्ती बंड पुकारते, तेव्हा तीच्या डोळ्यासमोर भक्कम सुरक्षित पर्याय उभा असावा लागतो. चंद्रगुप्ताच्या समोर जैन धर्माचा भक्कम पर्याय त्याकाळी होता. शिवरायांच्यासमोर शाक्त धर्माचे पीठ होते संत ज्ञानेश्वरासमोर मजबूत अशा नाथ धर्माचा पर्याय होता.
काय असा पर्याय मोदींसमोर आहे? केवळ पर्याय असून चालत नाही. त्याचा क्रांतिकारक पद्धतीने उपयोग करून शत्रूपक्षावर मातही करता आली पाहिजे, अन्यथा बंडखोर राजा हुतात्मा होतो. व्हि.पी. सिंगांसमोर ओबीसी व्होटबँकेचा मोठा पर्याय होता, म्हणून त्यांनी मंडल आयोगाच्या अंशतः अमलबजावणीला सुरूवात करून बंडाचे निशाण फडकाविले, मात्र सिंग हे फुलेआंबेडकरवादी नसल्याने त्यांना ब्राह्मणी छावणीचा सांस्कृतिक प्रतिहल्ला पराभुत करून गेला. त्यावेळचे तमाम क्रांतीकारक म्हणविणारे फुले-आंबेडकरवादी, मार्क्सवादी, समाजवादी यांनी ‘’कामचुकारपणा’’ केल्यामुळे व्हि.पी सिंगांना राजकिय हौतात्म्य पत्करावे लागले. समाजवाद-मार्क्सवादासारखे शास्त्रशूद्ध क्रांतीचे हत्यार ब्राह्मणांच्या जाणव्याला बांधलेले असल्याने जातीअंतक क्रांतीचा अजेंडा त्यांच्या जाहीरनाम्यांच्या पोथ्यांमध्ये सापडणे अशक्यच! आणी जातीअंतक क्रांतीचे तत्वज्ञान आमच्या रक्तातच आहे’, असे सांगणारे आमचे फुलेआंबेडकरवादी ‘’जात्योन्नती’’ वर समाधान मानणारे असल्याने ऐन मोक्याच्या वेळी कामचुकारपणा करण्यात तरबेज आहेत.
शत्रूचावीकपॉईंटहा आपला सामर्थ्य-बिंदू असतो’, हे कोणत्याही युद्धाचे साधे तंत्र असते. ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्यांच्या ब्राह्मणी छावणीला प्रधानमंत्री सारखे मोक्याचे मार्याचे पद स्वतःहून एका शुद्राकडे द्यावे लागले, याचा अर्थ ब्राह्मणी छावणी अत्यंत कमजोर होती. तीचा हाच वीकपॉईंट पकडून त्याला आपला सामर्थ्यबिंदू बनविता आला असता. मोदींनी 2014 च्या निवडणूकांमध्ये प्रचार करतांना जाहीर सभेत आपली जात सांगून मते मागीतली आहेत. मै ओबीसी, मै पिछडा असे ओरडून निवडणूक जिंकली आहे. कारण 2014 पर्यंत या देशाचे राजकारण ओबीसीकेंद्रित झालेले होते, हे ओळखण्याची पात्रता फक्त ब्राह्मणातच आहे, कारण त्यांच्याकडे आहेप्रतिक्रांतीचे शास्त्रशूद्ध ब्राह्मणी तत्त्वज्ञान, जे धोरण म्हणून कडक आहे डावपेंच म्हणून लवचिक !
मित्रांनो, अजूनही संधी गेली नाही. शूद्र चंद्रगुप्ताला राजा बनविल्यानंतर चाणक्याने ज्याप्रमाणे त्याचे नांव वापरून शूद्रविरोधी धोरणे राबविलीत, त्याचप्रमाणे ओबीसी प्रधानमंत्री बनविल्यानंतर ब्राह्मणी प्रशासन ओबीसींविरोधी शासन आदेश काढीत आहेत, त्यांचे आरक्षण खतम करीत आहेत, न्यायालये दलित-ओबीसी विरोधात निकाल देत आहेत. आज मोदींची अवस्था चंद्रगुप्त-शिवाजी राजेंसारखी झाली असणारच! पण बंड करण्यासाठी  समोर सुरक्षित पर्यायही हवा!.... तो सुरक्षित पर्याय निर्माण करून देण्याची ऐतिहासिक जबाबदारी जात्यंतक-वर्गांतक म्हणविणार्या क्रांतिकारक राजकीय पक्षांची आहे. ब्राह्मणी छावणीचा सर्वात मोठा वीकपॉईंट ओबीसी समाजघटक आहे. त्याचे ओबीसी जनगणनेसारखे ईश्श्यु घेऊन राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले तर, मोदी सुरक्षित बंडखोरी करून ब्राह्मणी छावणीला लाथ मारू शकतात. भाजप-कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय म्हणविणार्या ब्राह्मणी छावणीच्या पक्षांना कमजोर करूनच आपण जाती-वर्गांतक क्रांती करू शकतो. व्हि.पी. सिंगांनी कॉंग्रेसला लाथ मारून ती कमजोर केली परिणामी मंडलच्या युद्धाला आपण हात घालू शकलो. त्याची पुनर्रावृत्ती करून मोदी भाजपाला कमजोर करू शकतात. त्यामुळे आपल्याला जात-वर्गांतच्या पुढच्या मोठ्या युद्धाला हात घालता येईल. आज फार मोठी संधी चालून आली आहे. ती हुकली तर 2019 पासून पेशवाईच्या प्रतिक्रांतिचा अंतिम टप्पा सुरू होत आहे, तो शेवटास गेला तर, आपल्या पुढच्या सर्व पिढ्या गळ्यात मडके गांडीला झाडू बांधून फिरतांना दिसतील एवढे मात्र निश्चित! 


                                        श्रावण देवरे,
मोबाईल- 88 301 27 270
ईमेल- s.deore2012@gmail.com

No comments:

Post a Comment