त्रेपन्नावी खेप ......! ( दै.
लोकमंथन, रविवार, 30 डिसेंबर 2018 च्या
अंकासाठी)
बहुजननामा- 53
तो 15 दिवसांचा
थरार....! (भाग-2)
बहुजनांनो.... !
आमदार हरिभाऊ
राठोड यांच्या आकाशवाणी आमदार निवासातील 612 नंबरची रूम इतिहासात ‘‘वॉर-रूम’’
म्हणून ओळखली जाईल. कारण 15 तारखेपासून सुरू झालेल्या या ओबीसी आरक्षण बचावासाठीच्या
युद्धाची नांदी या रूममध्ये घातली गेली. 18
तारखेला राज्यभरातून जमलेले निवडक ओबीसी नेते या रुममध्ये उपस्थित होते. माझे
पंचवटीचे आरक्षण कन्फर्म झाले नाही, म्हणून मला बसने व कसारा लोकलने प्रवास करावा
लागला. त्यामुळे मला 612 वर पोहचण्यासाठी दुफारचे 2 वाजले. महाराष्ट्रभरात जे
जीवंत ओबासी नेते व विचारवंत होते ते
सकाळी 11 वाजेपासूनच माझी वाट पाहात थांबलेले होते. मी रूममध्ये आल्याबरोबर प्रकाश
आण्णा शेंडगे यांनी सर्व टि.व्ही. चॅनल्स व प्रिंट मिडियाला बोलावून घेतले. त्याच
दिवशी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी पत्रकारांना सांगीतले की, मराठा समाजाला ओबीसी
कोट्यातूनच आरक्षण दिले पाहिजे. त्यामुळे ओबीसी आरक्षण पूर्णपणे धोक्यात आणण्याचा
डाव फडणवीस सरकार खेळत आहे, याची खात्री झाली.
612 वर झालेल्या
पत्रकार परिषदेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद
उमटत होते. जवळपास सर्वच टि.व्ही चॅनल्स दिवसभर आमच्या मुलाखती घेऊन विषय तापवीत
होते. कधी नव्हे ते ईलेक्ट्रॉनिक्स
मिडिया ओबीसींची बाजू सक्षमपणे व प्रामाणिकपणे मांडायला संधी देत होते. त्यांच्या दृष्टीने
आतापर्यंतचा सर्वोच्च टीआरपी देणारा हा विषय होता. दुसर्या दिवसापासून सकाळी 7
वाजेपासूनच मला टि.व्ही. चॅनल्चे फोन यायला लागलेत. एकेका दिवसाला किमान 3 टिव्ही
चॅनल्सवर मुलाखत द्यावी लागत होती. दिवसभर आमदार व मंत्र्यांना भेटून निवेदने
देणे, त्यांना विषय समजावून सांगणे, विविध ओबीसी जातीच्या प्रमुखांच्या
बैठका घेणे व दुफारून 4 वाजेपासून
रात्री 11 वाजेपर्यंत एक-एक
टि.व्ही. चॅनलवर मुलाखती देणे, असा दिनक्रम 15 दिवस चालू होता.
रविवारच्या 18 नोव्हेंबरच्या मंत्रीमंडळाच्या
बैठकीत गायकवाड आयोगाचा अहवाल स्वीकारल्याचे
जाहीर करण्यात आले. प्रकाश आण्णा व हरिभाऊ मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून
सातत्याने प्रयत्न करीत होते. मात्र फडणवीस साहेब आमच्या शिष्टमंडळाला भेट
देण्याचे टाळत होते. 19 नोव्हेंबरपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं. पहिल्याच
दिवशी पाच मिनिटाच्या आत मराठा आरक्षण व धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून विधानसभा
तहकूब झाली. विधानभवनात हरिभाऊ होतेच. हरिभाऊंनी ही वार्ता आण्णांना सांगीतली. आम्ही
काही निवडक लोक विधानभवनात घुसलो. आवारात
व गॅलरीत जे जे आमदार व मंत्री भेटतील त्या सर्वांना निवेदने देणे व त्यांना ओबीसी
आरक्षणावरील महासंकटाची जाणीव करून देणे, असा उपक्रम सुरू केला. तेवढ्यात प्रकाश आण्णांना
कोणीतरी सांगीतले की, बाजूच्या रूममध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची
बैठक सुरू आहे. रूमचा दरवाजा बंद होता व दरवाज्यावर शिपाई उभा होता. आण्णांनी
त्याला हातानेच बाजूला केले व दरवाजा जोरात ढकलला. दरवाजा उघडला व आम्ही तीनजण बैठकित
घुसलो. बैठकीत समोर माननीय छगन भुजबळसाहेब होते व त्यांच्याच शेजारी अजितदादा होते.
बाकी सर्व आमदार राउंड टेबल करून बसलेले होते. आमचा धडक प्रवेश पाहताच सर्व अवाकच
झालेत. मी, आण्णा व हरिभाऊ आम्ही तिघेजण भुजबळसाहेबांच्या व अजितदादांच्या पाठीमागे
जाऊन उभे राहीलो. प्रकाश अण्णांनी दोन वाक्यांच्या प्रस्तावनेत सांगीतले की, आम्हाला
आपल्याशी मराठा आरक्षण व ओबीसीवर होणार्या अन्यायाबाबत बोलायचे आहे. आमच्यासोबत आलेले
प्रा. श्रावण देवरे हे ओबीसींचे
नेते असून ते अभ्यासक आहेत. ते आपल्याला हा विषय समजावून सांगतील. सगळ्यांच्या
नजरा माझ्यावर रोखल्या गेल्यात. पुढील पाच मिनीटे मी जे काही बोलत होतो ते सर्वजण
कान देऊन ऐकत होते. मी दोनच मुद्दे मांडले. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा
आरक्षणासाठी मी स्वतः आतापर्यंत काय काय प्रयत्न केले आहेत, ते ही सांगीतले. हा
पहिला मुद्दा मांडला. दुसरा मुद्दा होता मराठा आरक्षणाच्या नावाने ओबीसीवर लादले
जात असलेले महासंकट व फडणवीससाहेब करीत असलेला शब्दच्छल! मराठा जातीला जर ओबीसी वा
एस.ई.बी.सी. चा दर्जा दिला तर तो मूळ खर्या ओबीसींच्या आरक्षणातच येऊन पडणार आहे.
कारण वरचे 16 टक्के आरक्षण कोर्टात टिकणारे नाही. जर मराठा समाज ओबीसीत घुसला तर
तो खर्या कुणब्याला शिपायाचीही नोकरी मिळू देणार नाही. बाकीचे नाभिक, धोबी, सुतार
लोहार, अन्सारी, पिंजारी, धनगर अशा सर्व भटक्याविमुक्त व बारा बलुतेदार जाती देशोधडीला
लागतील. शेवटी मी सर्व आमदारांना स्पष्टपणे ईशारा दिला की, जर तुम्ही ओबीसींना दगा
दिला तर पुढच्या निवडणूकीत 52 टक्के ओबीसींपैकी एकही ओबीसी तुम्हाला मतदान करणार
नाही.’’ माझे बोलणे संपल्यानंतर भुजबळसाहेबांनी माझे मुद्दे उचलून धरलेत. आमदार जितेंद्र
आव्हाडही उठून उभे राहीलेत व माझे समर्थन करू लागलेत. अजितदादांच्या हातात निवेदन
दिले व आम्ही बैठकीतून बाहेर पडलो. बाहेर पत्रकार आमची वाट पाहातच होते. बैठकीतून
बाहेर येताच त्यांनी आम्हाला घेरले व आत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल प्रश्न विचारू
लागलेत. पत्रकारांना सर्व माहिती दिल्यावर आम्ही पुन्हा आवारात आलो. तेथे नामदार
पंकजाताई मुंडे भेटल्यात. त्यांना निवेदन दिले व ओबीसींवरील
महासंकटाची जाणीवही करून दिली. ‘मराठा आरक्षणाची
फाईल माझ्याकडे आली तर एका मिनिटात मराठ्यांना आरक्षण देऊन टाकण्याची घोषणा करणारी
ही बाई, ओबीसी आरक्षण संकटात असतांना एक शब्दही न बोलता पुढे निघून गेली. मान्यवर
गोपीनाथ मुंडेसाहेबांची तीव्रतेने आठवण झाली व मुंडेसाहेबांचा खून का करण्यात आला
यावरही शिक्कामोर्तब झाले. आज मुंडेसाहेब जीवंत असते तर अशा प्रकारचं मराठा आरक्षणाचं
बील मांडण्याची हिम्मतही कोणी करू शकले नसते. वडिलांच्या कुर्बाणीची थोडीशीही
जाणीव नसलेल्या या पोरी ओबीसींना खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत, याचीही
खात्री झाली.
मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण देण्याची
मागणी करणारे विखे पाटील यांचीही भेट घेण्याचे ठरले. ते प्रमुख विरोधी पक्षनेते असल्याने
त्यांची भेट घेऊन त्यांना विषय समजावून सांगणे गरजेचे होते. रात्री 8 वाजता त्यांच्या
शासकीय कुटीरमधील अ-5 निवासस्थानी बैठक झाली. ते स्पष्टपणे म्हणाले की, राज्यमागास
आयोगाचा अहवाल जो पर्यंत आमच्या हातात येत नाही तो पर्यंत काही चर्चाच करता येत
नाही. आमचा मुद्दा वेगळा होता. मराठा समाजाला ओबीसींच्या आरक्षणातच टाकण्याबद्दलची
भुमिका चूकीची आहे व त्यामुळे ओबीसी मतदार तुमच्यापासून दुरावतील, याचीही जाणीव आम्ही
विखेपाटलांना करून दिली. त्यानंतर आम्ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय
मुंडे यांचीही भेट घेतली. मागास आयोगाचा अहवाल पटलावर मांडल्याशिवाय आम्ही हे
विधेयक मंजूर होऊ देणार नाही, असे आश्वासन मुंडे यांनी दिले.
दरम्यान टि.व्ही. वरील चर्चा व मुलाखती
देणे सुरूच होते. चॅनल्स जास्त व ओबीसीकडून बोलणारे कमी होते. मराठा समाजाकडून
बोलणार्यांचा तर महापूरच होता. मराठा आमदार टि.व्ही चॅनल्सवर आक्रमक भुमिका घेत
असतांना, बाकीचे ओबीसी-माळी जातीत
जन्मलेले आमदार व विचारवंत बिळात घुसून शेण खात होते. अशा परिस्थितीत नवीन बोलणारी
फळी निर्माण करावी लागली. कल्याण रेल्वेस्टेशनवर भोई समाजाचे ऍडव्होकेट संजय भाटे मला
पहिल्यांदाच भेटायला आलेत आणी त्यांना त्याच दिवशी सरळ टि.व्ही.-9 च्या कॅमेरासमोर
बसविले. सचिन माळी, शंकरराव लिंगे यांनाही याच पद्धतीने टिव्हीवरील चर्चेत सहभागी
करून घेतले. प्रकाश आण्णा, हरिभाऊ राठोड व अरुण खरमाटे यांनीही चर्चा चांगल्याच
गाजवल्यात. राज्य मागास आयोगाच्या गठण
पद्धतीलाच आक्षेप घेणारी पिटीशन ज्या दोन साहसी तरूणांनी हायकोर्टात दाखल केली आहे,
त्या मृणाल ढोले पाटील व मनोज ससाणे यांनीही टि.व्ही. चॅनल्सवरील चर्चा गाजविल्या.
दरम्यान
20 नोव्हेंबरला रात्री एक नवे वळण या विषयाला प्राप्त झाले. माननीय आमदार हरिभाऊ
राठोड व मी न्युज 18 लोकमतच्या रात्रीच्या बेधडक चर्चेत सहभागी होतो. या चर्चेत मराठा
आरक्षण समर्थक माननीय राजेंद्र कोंडरे यांनी स्टेथोस्कोप, तापमापक वगैरे बरीच
मेडिकल उपकरणे सोबत आणली होती. ओबीसी-मराठा संघर्षात कोणाची तब्बयेत बिघडली तर
त्यावर प्रथमोपचार करण्याच्या महान उद्देशाने ती उपकरणे आणली गेली
होती, असा समज कोणी करीत असेल तर तो चुकीचा ठरेल, कारण त्यांनी ओबीसींची
टिंगल-टवाळी करण्यासाठी हा प्रकार केला होता. चतूर व प्रसंगावधान राखणारे एंकर डॉ.
निरगुडकरांनी समारोपात त्याचा हसत हसत
समाचार घेतला.
या चर्चेत
आमदार हरिभाऊ राठोड यांनी असा एक धक्का दिला की ज्याच्यामुळे मराठा आरक्षणाच्या
चर्चेची दिशाच बदलून गेली. या
चर्चेतल्या कोणत्या मुद्द्यामुळे मराठा आरक्षणाला नवे वळण मिळाले व त्याचे काय
परिणाम झालेत, याचा थरार पुढील बहुजननामामध्ये पाहू या!
तो पर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो....!!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270

No comments:
Post a Comment