http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, January 6, 2019

54 BahujanNama Tharar 15Days Lokmanthan 6Jan19


चोपन्नावी खेप ......!     ( दै. लोकमंथन, रविवार,  6 जानेवारी 2019 च्या अंकासाठी)
 बहुजननामा- 54
     तो 15 दिवसांचा थरार....! (भाग-3)
बहुजनांनो.... !   
          माननीय आमदार हरिभाऊ राठोड यांनी न्युज 18 लोकमतच्या 20 नोव्हेंबरच्या बेधडक कार्यक्रमात एक नवा मुद्दा चर्चेसाठी पुढे आणला आणी जणू काय भुकंपच झाला. हरिभाऊ म्हणाले की, मराठा व कुणबी यांचा एकच नवा प्रवर्ग तयार करून त्यांना काय आरक्षण द्यायचे तर देऊन टाका. त्यांच्या या एका ओळीच्या वक्तव्याचे काय अर्थ निघतात ते बघा- 1) कुणबी मराठा एकच आहेत हे शासनाने व आयोगाने मान्य केले आहे. 2) त्यामूळे त्यांचा एकत्रीत प्रवर्ग बनवायला कोणतीही अडचण नाही. 3) मूळ-खर्‍या ओबीसींच्या यादीतून कुणबी वजा करावेत. 4) त्यामुळे मोठी संख्या असलेली व सर्वात जास्त फायदा घेणारी ‘कुणबी-जात’ मूळ ओबीसी यादीतून काढून टाकली तर खरे ओबीसी असलेले नाभिक, धोबी वगैरे बारा बलुतेदार जातींपर्यंत आरक्षणाचे फायदे पोहचतील. 5) खोटे कुणबी दाखले घेऊन ओबीसी बनलेल्या मराठ्यांची घाण मूळ ओबीसीतून निघून जाईल व शूद्ध-खरे ओबीसीच यादीत राहतील.
हरिभाऊ चॅनलवर हा मुद्दा मांडत असतांनाच मला माननीय चंद्रकांत बावकरांचा फोन
येत होता. मी तो वारंवार कट करीत होतो, कारण त्याच कार्यक्रमात मी हरिभाऊंच्याच शेजारी बसलो होतो. त्यामुळे मला त्यांचा फोन घेता येत नव्हता. दुसर्‍या दिवशी कोकणातल्या सर्वच्या सर्व कुणबी संघटना एकवटल्या व पत्रके प्रसिद्ध करू लागलीत. त्यात माननीय विश्वनाथ पाटील व चंद्रकांत बावकर अग्रेसर होते. सर्व कुणबी संघटनांचे म्हणणे एकच होते की, मराठा व कुणबी एक नाहीत, त्या वेगळ्या दोन जाती आहेत. त्यामुळे आम्हाला मराठ्यांच्या प्रवर्गात टाकू नये. आम्हाला मूळ खर्‍या ओबीसी प्रवर्गातच राहायचे आहे. मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण द्यायला आमचा आधीपासूनच विरोध आहे, तशी याचिका कुणबी संघटनेने 4 वर्षापूर्वीच दाखल केलेली आहे.’ संध्याकाळी जवळ जवळ सर्व टिव्ही चॅनल्सवर कुणबी संघटनांचे प्रतिनिधी याच मुद्यावर आक्रमक होऊन बोलत होते.
2-3 दिवस ही चर्चा चांगलीच गाजली. कुणबी समाजाची एकत्र बैठक झाली व त्यात त्यांनी 29 नोव्हेंबरला आझाद मैदानावर धरणे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय झाला. दरम्यान 24 नोव्हेंबरला प्रतिष्ठीत समजल्या जाणार्‍या बजाज भवनात ओबीसी नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला ओबीसी कॅटेगिरीतील विविध जातीचे जवळपास 70 नेते हजर होते. विशेष म्हणजे अतिअल्प संख्या असलेल्या वडार सारख्या जाती सहसा ओबीसी चळवळीत कधीच आल्या नव्हत्या. मात्र बजाज भवनच्या मिटिंगला वडार समाजाचे नेते आवर्जून हजर होते. जनजागृती वाढत होती. या बैठकीच्या माध्यमातून आम्हाला दोन झुंजार ओबीसी युवक येऊन मिळालेत. राज्य मागास आयोगाच्या गठण पद्धतीलाच आक्षेप घेणारी पिटीशन ज्या दोन साहसी तरूणांनी हायकोर्टात दाखल केली आहे, त्या मृणाल ढोले पाटील व मनोज ससाणे यांनीही टि.व्ही. चॅनल्सवरील चर्चा गाजविल्या. ओबीसींचे आणखीन एक मोठे नेते प्रतापराव गुरव येऊन मिळालेत.
नवे नवे साथीदार मिळत होते. जुने ओबीसी नेते, जुने ओबीसी विचारवंत, नेहमीचे यशस्वी भाषणकर्ते, आणी काही उच्चविद्याविभूषित बुद्धीमान, विद्वान वगैरे लोक मात्र बीळातून बाहेर यायला तयार नव्हते. एरवी शांततेच्या काळात ढाण्या वाघ बनून डरकाळ्या फोडणारे हे लोक या 15 दिवसात प्रचंड दहशतीत असलेले दिसत होते. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलण्याचा साधा विचार जरी यांच्या मनात आला तरी त्यांच्या अंगाचा प्रचंड थरकाप उडतांना स्पष्ट दिसत होता. ही (जुनी) नेते व विद्वान मंडळी बिळातून व दहशतीतून बाहेर निघावीत म्हणून मला फेसबूकवर एक अत्यंत अश्लिल शिवीगाळ करणारी पोस्ट टाकावी लागली. ही पोस्ट अश्लिल असल्याने मार्क जुबेर साहेबांनी लगेच डिलीट केली. मात्र मराठा समाजात आमचे काही खास ‘‘हित(?)मित्र’’ आहेत, जे माझ्या व्हाट्सपवर व फेसबूकवर 24 तास डोळ्यात तेल घालून पहारा ठेवून असतात. या पहारेकर्‍यांनी माझ्या त्या अश्लिल पोस्टचा स्क्रिनशॉट काढून ठेवला व ती पोस्ट वारंवार व्हायरल करीत राहीलेत.
29 तारखेच्या आझाद मैदानावरील ओबीसींचे धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू झालेत. मुंबईतूनच सर्व कामे करता-करता महाराष्ट्रभरातील ओबीसी नेते-कार्यकर्त्यांना फोन करणे, त्यांना पर्सनल एस.एम.एस. करणे, व्हाट्सप, फेसबूकसारख्या सोशल मिडियाचा वापर करून प्रचार करणे. ‘‘आरक्षण वाचविण्यासाठी फक्त एक दिवस द्या!’’, अशी अनेक आवाहने करण्यात आली. धरणे आंदोलनासाठी पोलीस परवानगी घेण्यासाठी प्रा. शंकररावजी महाजन व कर्मवीर ऍड. जनार्दन पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले कमलाकरजी दरवडे हे आझाद मैदान पोलीस्टेशनला गेले. मात्र पोलीसांनी त्यांना परवानगी देण्याचे नाकारले. दुसर्‍या दिवशी काही राजकीय वजन वापरून परवानगी मिळाली. 29 तारखेला प्रत्यक्षात जेव्हा मी आझाद मैदानवर पोहोचलो, तेव्हा लक्षात आले की, आजही लोकशाहीच्या काळात रणांगणावरील युद्धात रणमैदानात सैन्याची व्युहरचना व युद्ध-पोजीशन घेण्याची जागा कशी असावी, कोठे असावी याचे प्रशिक्षण शास्त्रशूद्धपणे आर.एस.एस. कडून दिले जाते आहे. आझाद मैदानावर एका कोपर्‍यात सर्वात शेवटी ओबीसी धरणे आंदोलनाच्या मंडपासाठी जागा दिलेली होती. ओबीसी मंडपाच्याच बाजूला मराठा ठोक मोर्चाचा मंडप होता. आझाद मैदानावर प्रवेश करतांनाच सुरूवातीला मराठा क्रांती मोर्च्याचा मंडप होता. म्हणजे जो कोणी ओबीसी नेता वा कार्यकर्ता आझाद मैदानावर प्रवेश करेल त्याला सर्वप्रथम मराठा क्रांती मोर्च्याच्या मंडपाजवळून जावे लागेल. मोठ्या हिमतीने हा मंडप पार करून गेल्यावर पुढे मराठा ठोक मोर्च्याच्या मंडपाशेजारीच बसावे लागेल. मराठ्यांच्या दोन मंडपात मधोमध ओबीसी मंडपाला जागा देण्याचे कारण लपून राहात नाही. दहशत निर्माण करण्याची ही एक वेगळी लोकशाहीवादी पद्धत आहे. मला यावेळी 9 एप्रिल 2013 रोजी संपन्न झालेल्या आझाद मैदानावरच्या धरणे आंदोलनाची आठवण झाली. विषय हाच होता व दहशतीची पद्धतही अशीच होती. त्या दिवशी आमच्या मंडपच्या शेजारी जाणीवपूर्वक असा मंडप लावण्यात आला की, जेणेकरून आमचे ओबीसी धरणे आंदोलन अयशस्वी होईल.
जातीव्यवस्थेची जी अनेक अंगभूत वैशिष्टे आहेत, त्यापैकी एक वैशिष्ट्य जे निश्चितपणे
समाजकारण, अर्थकारण व राजकारणावर परिणाम करते. ब्राह्मण व क्षत्रिय जातींची दहशत ही बहुतेक सर्वच एस.सी, एस.टी. व ओबीसी जातींवर प्रभाव गाजवीत असते. ही दहशत उतरत्या क्रमात चढत्या भांजणीत असते. या दहशतीवर मात करण्यासाठी प्रचंड मानसिक ताकत कमवावी लागते. यात नैतिकता व प्रामाणिकता या दोन बाबी फार महत्वाच्या असतात. शुद्रादिअतिशूद्रांकडे असलेली ही दोन हत्यारे अशी आहेत, की ती कधीच कोणी हिसकावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या नेत्या-कार्यकर्त्याकडे ही हत्यारे आहेत, तो कितीही कनिष्ठ जातीचा असला तरी त्याचे लढाईतील मनोधैर्य कोणीच खच्ची करू शकत नाही.
लढाईच्या या 15 दिवसात आमच्या कोणत्या शत्रूंनी व कोणत्या मित्रांनी  आमचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला, ते आता पुढील भागात पाहू या!  
तो पर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो....!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com

No comments:

Post a Comment