http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, January 22, 2020

96 BahujanNama Daily Lokmanthan 23Jan20, CAB NCR


बहुजननामा-96
नागरिकत्व बील अर्थात CAB, NCR, NPR
-1-
बहुजननामाच्या काही वाचकांनी मला ‘नागरिकत्व बीलावर बहुजननामा लिहीण्याचा आग्रह केला, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगीतले की अशा शत्रूंनी दिलेल्या मुद्यांवर मी आपली शक्ती खर्च करीत नाही. मुंबईतल्या संविधानप्रेमी संघटनांनी 29 डिसेंबर ला नागरिकत्व बीलाच्या विरोधात चर्चासत्र ठेवले होते. संयोजक रवी भिलाणे यांचे आग्रहाचे निमंत्रण आले, तेव्हा मी त्यांना हेच सांगीतले की, ‘मुद्देच चुकीचे आहेत, काय चर्चा करणार?’ त्यावर भिलाणे म्हणाले की, ‘मुद्दे चूकीचे आहेत, हे सांगण्यासाठीच तुम्ही या चर्चेत सामील व्हा व तुमच्याकडे दुसरे योग्य मुद्दे असतील तर तेही सांगा!’ असा आग्रह झाल्यावर मी होकार दिला.
आपल्या देशातील लोकशाहीला एक गम्मत करून ठेवलेले आहे. घरातील पाळीव कुत्रा वा पाळीव मांजर ऐन जेवणाच्या वेळेस आजूबाजूला घुटमळतात व जेवणाची मजा घालवतात. अशावेळी हमखास केला जाणारा एक कृतीकार्यक्रम! कुत्र्याला अथवा मांजराला दुरवर भाकरीचा एक तुकडा अथवा हाडाचा एक तुकडा फेकला जातो व कुत्रा-मांजर तो तुकडा चघळत बसतो. तोपर्यंत यजमानाचे जेवण संपते व कार्यभाग विनाअडथळा सहज साध्य होतो. आमच्या देशातील डावे-पुरोगामी म्हणविणार्‍यांची अवस्था अशा कुत्र्या-मांजरांपेक्षा वेगळी नाही.
-2-
कोणताही मुद्दा उपस्थित झाला कि, त्याला विरोध व समर्थन सुरू होते, ते स्वाभाविकही आहे. मात्र यातील गम्मत अशी की, विरोधक व समर्थक हे एकाच दिशेने धावत असतात. विरोधातून विकासाकडे म्हणजे ‘विरोधविकासवाद’, द्वंदात्मक भौतिकवाद वगैरे संकल्पनांचे अर्थ वर्गीय समाजात वेगळे असतात व जातीय समाजात वेगळे असतात. आता काही उदाहरणे देऊन हे समजून घेऊ या!

अमेरिका-युरोपसारख्या खंडातील वर्गीय देशांमध्ये दोन किंवा तीन राजकीय पक्ष असतात. मुख्य दोन्ही पक्ष आपसात सत्तेसाठी संघर्ष करतात. एकमेकांच्या धोरणांना, कृती-कार्यक्रमांना लोकशाही मार्गाने विरोध करतात. एकमेकांच्या विरोधात निवडणूका लढवितात व आलटूनपालटून सत्तेवर येत असतात. हे झाले वर्गीय लोकशाहीचे उदाहरण! मात्र भारतात जातीय लोकशाही आहे. म्हणजे भारतात वरवर पाहता राजकीय पक्ष राजकारण करतात, मात्र प्रत्यक्षात विशिष्ट जाती आपसात राजकारण करीत असतात. प्रत्येक जात अथवा जाती कॅटेगिरीचे वेगवेगळे हितसंबंध असतात व त्या हितसंबंधांना बाधा येताच सत्ताधारी जाती आपसातही लढतात. पुराणात 21 वेळा ब्राह्मणांनी पृथ्वी निःक्षत्रिय केल्याचा दाखला आहेच! आताही अधूनमधून हे युद्ध सुरु असतंच! कधी ब्राह्मण मुख्यमंत्री तर कधी मराठा-जाट-पटेल! परंतू दलित-ओबीसी सत्तेवर येऊ नयेत म्हणून ब्राह्मण-क्षत्रियजाती आपसात तडजोडी करतात व एकमेकांना मिठ्याही मारतात. राज्यस्तरावरील दलितांमधील चर्मकार-बौध्द व ओबीसींमधील यादव-कुर्मी-कुणबी सारख्या वरचढ शेतकरी जाती जातीय चौकटीत राहूनच सत्तेवर येण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, मात्र एकमेकांचे राजकीय शत्रू असलेले भाजपा व कॉंग्रेस समान सामाजिक हितसंबंधांमुळे कधी उघड तर कधी छुप्यामार्गाने एकत्र येतात व दलित-ओबीसींमधील सत्ताकांक्षी नेतृत्व खतम करतात. त्यासाठी सीबीआय, ईडी, ईव्हिएम वगैरे साधने वापरून दलित-ओबीसींचे पक्षच खतम करतात. हे जातीय चित्र तुम्हाला वर्गीय समाजात दिसू शकत नाही.
मात्र आपल्या देशातील डावे व पुरोगामी म्हणविणारे पंडित एकतर भट आहेत किंवा भटाळलेले तरी आहेत. ते हे जातीय वास्तव माहीत असूनही लपवून ठेवतात व वर्गीय संकल्पनांना बळी पडून कधी कॉंग्रेसहिताचे तर कधी भाजपाहिताचे राजकारण करीत असतात. 1985 ते 1990 च्या काळात जसजसे मंडल आयोगाचे आंदोलन खेडोपाडी पसरत होते, तसतसे रामंदिरासाठीचे बाबरी भंजनाचे आंदोलनही वाढत होते. ही प्रबोधनाची लढाई होती. यात आमच्यासारख्या ओबीसी कार्यकर्त्यांनी फक्त मंडल आयोगासाठीच्या प्रबोधनावर लक्ष केंद्रित केले. त्याकाळी आम्ही जाहीरपणे लिहित होतो व बोलतही होतो की, बाबरी भंजनाचे आंदोलन राममंदिरासाठी नाही, तर मंडल आयोग गाडण्यासाठी आहे. त्यामुळे मंदिर-मस्जिदवर काही बोलण्यापेक्षा फक्त मंडल आयोगावरच बोला. मात्र तमाम डावे-पुरोगामी रामावर, रामाच्या जन्मावर, बाबरी मस्जिदवर ऐतिहासिक-पौराणिक पुरावे देऊन फाड-फाड बोलत राहीलेत व धडाधड लिहीत राहीलेत. संघ-भाजपाला हीच चर्चा हवी होती. कारण विरोधक व समर्थक एकाच दिशेने धावत होते. संघ-भाजपा मुसलमानांवर निशाणा साधतो....गोळी पण झाडतो, मात्र त्या गोळीने मुसलमान मरतच नाही, ओबीसीच मरतो. आणी संघाचा विजय होतो. कारण संघाचा मुसलमानविरोध हा केवळ हिंदू-मुस्लीम धृवीकरणासाठी असतो. या धृवीकरणात ओबीसी हा कट्टर हिंदू होत जातो व त्याची ओबीसी आयडेंटी हरवत जाते. संघ-भाजप तो पर्यंतच जीवंत राहतील जो पर्यंत ओबीसी ‘हिंदू’ आहे. ओबीसीला जसजसी ‘ओबीसी’ म्हणून आयडेंटी मिळेल, तसतसे संघ-भाजपाचे मरण नजदिक येत जाईल. एवढा साधा सिद्धांत जर डाव्या-पुरोगामी लोकांना समजत नसेल तर त्यांची विद्वत्ता बकरीच्या शेपटीसारखी म्हणावी लागेल. झाकण्याच्याही कामाची नाही व माशी उडविण्याच्याही कामाची नाही. तत्कालीन (1985-92) डाव्या-पुरोगाम्यांनी राममंदिरासाठीच्या-बाबरी मशिद भंजनावर निरर्थक चर्चा करण्यापेक्षा जर मंडल आयोगासाठीचे आंदोलन कृती-कार्यक्रमात आणले असते, तर बाबरीभंजनासाठी संघ-भाजपाला ओबीसींची फौज ‘हिंदू’ म्हणून लाभलीच नसती. प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री कॉम्रेड ज्योती बसू तर स्पष्ट म्हणाले की,  ‘‘आमच्या राज्यात ओबीसी नाहीतच.’’ म्हणजे त्यांच्या राज्यातील न्हावी, धोबी, सुतार, लोहार वगैरे लोक ओबीसी नाहीतच, ते ‘हिंदूच’ आहेत, त्यामुळे त्यांनी बाबरीमशिद पाडायला गेले पाहिजे, असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होतो.
-3-
आज पुन्हा त्याच इतिहासाची पुनर्रावृत्ती होत आहे. CAB, NCR, NPR वगैरे मुद्दे गंभीर आहेतच. पण ती फक्त हत्यारे-शस्त्रे आहेत. शत्रूचा मुख्य उद्देश काय आहे, त्याचे धोरण व डावपेंच काय आहेत, हे जोपर्यंत समजून घेत नाहीत, तो पर्यंत कसे कळेल की, कोणती हत्यारे घेऊन त्यांच्याशी भिडले पाहिजे? त्यांचा पहिला उद्देश आहे ओबीसी जनगणनेचा मुद्दा दडपणे! एकदा का राष्ट्रीय जनगणना सुरू झाली की, ओबीसी जनगननेचा मुद्दा पुन्हा 10 वर्षांसाठी निकाली निघतो. 2011च्या वेळी त्यांनी अशीच आण्णा हजारेंचा गैरवापर करून वेळ मारून नेली.  2001 ला तर खुद्द अटल बिहारी वाजपेईच प्रधानमंत्री होते. त्यामुळे (1998-99) ओबीसी जनगणना करण्याचा प्रधानमंत्री देवेगौडाच्या ओबीसी सरकारचा निर्णय तत्कालीन (1999-2000) प्रधानमंत्री अटलबिहारींनी रद्द केला. आता 2021 ला ओबीसी जनगनना टाळण्यासाठी सत्ताधार्‍यांनी CAB, NCR, NPR चा तुकडा डाव्या-पुरोगामी लोकांसमोर टाकला आहे. आमचे कुत्रे-मांजरे हे तुकडे चघळत स्वतःला पुरोगामी म्हणून सिद्ध करीत आहेत.
CAB, NCR, NPR च्या मागील आणखी एक मुद्दा आहे. हिंदू-मुस्लीम धृवीकरणाचा! 2014 च्या निवडणूका येईपर्यंत मुस्लीमांना इतके भयभीत करून सोडायचे की, ते एकगठ्ठा वोटबँक बनून पुन्हा कॉंग्रेसच्या मागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजेत. दलित-आदिवासी तर आजच कॉंग्रेसच्या पाठीशी बिनशर्तपणे उभे आहेत. भुजबळ, मुलायम, लालू, मायावती वगैरेंचे जातीविरोधी नेतृत्व व पक्ष ईव्हीएमच्या साहाय्याने मोडीत काढल्याने व हिंदू-मुस्लीम धृवीकरणामुळे आता ओबीसीं अजून घट्टपणे भाजपाच्या पाठीशी उभे राहतील. भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर त्यांना युरोपप्रमाणे ‘द्वी-पक्षीय वर्गीय लोकशाही’ आणायची आहे, परंतू जातीव्यवस्था जीवंत ठेवण्याच्या अटीवर!
यावरची चर्चा आपण पुढील बहुजननामाच्या 97 व्या खेपेतही सुरू ठेवू या! तोपर्यंत जयजोती, जयभीम, सत्य की जय हो!

(बहुजननामा-96 लेखनः 15-22 जानेवारी 2020)

------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
https://shrwandeore.blogspot.in/                  


दैनिक  लोकमंथन 23जाने20  बहुजननामा-96......

No comments:

Post a Comment