http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, March 29, 2020

105 BahujanNama Karona 22March20 Lokmanthan


बहुजननामा-105
करोनाः संकट व उपाय
-1-
     करोनामुळे 12 मार्चपासूनचे पुढील सर्व दौरे व कार्यक्रम मी रद्द केले आहेत व आता घरात बसूनच ओबीसी जनगणना आंदोलन सुरू ठेवीत आहे. कार्यकर्त्याला सक्तीची विश्रांती अशीच केव्हा तरी मिळत असते. कार्यकर्त्याचे सक्तीने घरी बसणे, हा मित्र व नातेवाईकांसाठी विनोदाचा विषय असतो. गेल्या 3-4 दिवसांपासून फोनवर याच गमती-जमती सुरू आहेत. परवा एक जावई गमतीने फोनवर म्हणाले की, ‘करोनामुळे ओबीसी जनगणनाही रद्द करणार की पुढे ढकलणार?’ ते विनोदाने म्हणाले असले तरी तो माझ्यासाठी ‘गंभीर’ विषय बनला. करोनामुळे जर सर्वच जग ठप्प होत असेल तर राष्ट्रीय जनगणनेचा कार्यक्रमही पुढे ढकलला पाहिजे. कारण जनगणना करणारा कर्मचारी अथवा अधिकारी एक एप्रिलपासून घरोघरी फिरणार आहे, तो दिवसभरात अनेक घरांशी व लोकांशी संपर्कात येणार. जर तो या प्रक्रियेत कुठे तरी चूकून संक्रमित झाला तर तो ‘करोना-वाहक’ बनेल व संकट अधिक विध्वंसक बनेल. त्यामुळे जनगणनेचा कार्यक्रम ताबडतोब पुढे ढकलला पाहिजे.
मी अगदी सुरूवातीपासून घरी बसून आंदोलन करण्याचा सल्ला देत आहे. आता सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी घरी बसूनच आपले ‘ओबीसी जनगणना आंदोलन’ सुरू ठेवले पाहिजे. सोशल मिडियाचा भरपूर वापर करून ओबीसी जनगणनेचा मुद्दा तापवत ठेवा. आपल्या जवळच्या व दूरवरच्या नातेवाईकांना वारंवार फोन करा व घराच्या दरवाज्यावर ‘दोन बोर्ड’ लावण्याची आठवण करीत रहा. त्यांनाही असेच फोन करून जागृती करायला सांगा! हे बोर्ड छापीलच पाहिजेत असे काही नाही, साध्या A-4 साईजच्या कागदावर हाताने लिहूनच बोर्ड तयार करा व गोंद लावून दरवाज्यावर चिकटवा! हे दोन्ही बोर्ड अशा ठिकाणी चिकटवा की घरी आलेल्या प्रगणकाला दरवाज्यावरचे बेल-बटण दाबतांनाच तो बोर्ड दिसला पाहिजे. त्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टी सांगत बसण्याचा वेळ वाचेल. त्याच्याकडील जनगणनेच्या फॉर्ममध्ये रिमार्कच्या रकान्यात त्याने ‘बोर्डची व बोर्डवरील मॅटरची लेखी नोंद’ घेतली पाहिजे. ही लेखी नोंदच येत्या काही महिन्यात सरकारला धोरण बदलण्यास भाग पाडेल व ओबीसी कॅटेगिरीचा-जातीचा कॉलम जनगणनेच्या फॉर्ममध्ये सामील करील.
-2-
व्यापक संकटात सर्वात जास्त मार समाजातील दुर्बल घटकावरच पडत असतो. उच्चवर्ग व मध्यमवर्ग आपापल्या वस्त्या-वाड्यांमध्ये व कालन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात सुरक्षित असतात. मात्र तरीही शासकीय पातळीवरून त्यांचीच सर्वात जास्त काळजी घेतली जाते. पगारी सुट्ट्या व इतर सुविधांची रेलचेल असते. करोनाची निर्मिती कशी झाली व कोणी केली, यापेक्षा त्याचा फैलाव कोण करीत आहेत हा सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न आहे. देश-विदेशात राहणारा उच्च-मध्यम वर्ग हाच करोनाचा वाहक व प्रसारकही आहे. आहेत तेथेच थांबून संकटाचा मुकाबला करण्याऐवजी हे लोक भित्रे-भागूबाईसारखे स्वदेशात पळून येतात व त्यांना आणण्यासाठी शासन मोफत विमाने पाठविते. परंतू याच कारणामुळे आपण आपल्या देशातील निष्पाप जनतेलाही संकटात टाकत आहोत, याची जरासुद्धा खंत शासनाला व ऍब्रोडसना वाटत नाही. एरवी त्सुनामी वा युद्धासारख्या संकटात ते आपापल्या स्वदेशात परत आलेत तर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र संसर्गजन्य संकटाच्यावेळी स्वदेशी परतणे धोक्याचे आहे, हे तरी मान्य केले पाहिजे.
करोनासारख्या ‘सर्व-ग्रस्त’ संकटातही विषमव्यवस्था अधिक विषम वागते, याचाही अनुभव आपण पूर्वी घेतलेला आहे व आताही घेत आहोतच! भरपगारी सुट्ट्या घेऊन लोकांना घरात बसण्यास सांगत आहेत. पगारी सुट्ट्या घेणारा हा उच्चभ्रू वर्ग आहे तरी किती टक्के? 5-10 टक्के म्हणजे मूठभरच ना? मग ज्या करोडो लोकांना पगारच नाही व हातावरच पोट भरावे लागते, त्यांना बायको-पोरांसह घरी बसून उपाशी मरणे काय आणी करोनाला खेटत रोजी-रोटीसाठी मरणे काय? सारखेच आहे. देशात संकट आणले आहे मूठभर उच्चभ्रूंनी, मात्र सर्वात जास्त भोगतो आहे तो बहुसंख्य असंघटित कष्टकरी! सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री व खूद्द प्रधानमंत्री यांच्या बोलण्यातून व कृतीतून या असंघटित कष्टकर्‍यांबद्दल एकही उपाययोजना नाही. अपवाद मात्र केरळच्या कम्युनिस्ट राज्यसरकारचा आहे. अशावेळी खरेच खात्री पटते की मार्क्सवाद म्हणजेच मानवतावाद व मानवतावाद म्हणजेच मार्क्सवाद!
जीवनदानी कम्युनिस्ट कार्यकर्ते कॉ. राजन क्षिरसागर हे असंघटित कष्टकर्‍यांसाठी काम करतात. त्यांनी भारत सरकारला पत्र लिहून धोरणकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन भरले आहे. त्या पत्रातील काही उपाययोजना येथे मी येथे माहितीस्तव देत आहे.
१. राज्यातील सर्व माथाडी मंडळामार्फत सर्व हमाल माथाडी कामगारांना सॅनिटेशन किट, मास्क आणि आवश्यक साधने आणि एक महिन्याचे आगाऊ वेतन (खावटी) तत्काळ उपलब्ध करा. त्या साठी माथाडी मंडळांचा निधी वापरा गरज भासल्यास आगाऊ लेव्ही मध्ये 5% वाढ करून आगाऊ वसुली करा. याच प्रमाणे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांना त्यांच्याकडे प्रत्यक्ष हमाली करणाऱ्या कामगारांना याच सुविधा देण्याचे आदेश जारी करा.
२. अशाच प्रकारे बांधकाम व इमारत महामंडळाकडून उपाय योजना करा उपलब्ध निधीतून रु 10,000/- तात्काळ कामगारांच्या खात्यावर अदा करा.
3. अनेक कारखाने व उद्योग बंद झाल्याने मराठवाड्यातील स्थलांतरित मजूर गावाकडे मोठ्या प्रमाणावर परतले आहेत त्यांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर ग्रामीण मजुरांना तात्काळ रोहयो कामे उपलब्ध करा कामाची मागणी नोंदविण्यासाठी मोबाईल अँप व दूरसंचार तंत्रज्ञान या आधारे प्रत्यक्ष गर्दी टाळून तशाच प्रकारची बांधबंदिस्ती, व अन्य जल संधारण कामे हाती घ्या. प्रत्येक जॉबकार्ड धारकास रु रु 10,000/- खावटी द्या. सर्व कामगार व सर्व ग्रामीण जनतेस रेशनवर मोफत 35 किलो धान्य द्या
४. परित्यक्ता महिला, अपंग व निराधार आणि वृध्द व्यक्ती या सर्वांना अशाच प्रकारच्या मदतीसाठी सर्व वित्तसंस्था देशी विदेशी कंपन्यांचा CSR निधी आणि राज्य शासनाचा निधी याची सांगड घाला.
५. सर्व खाजगी फायनान्स कंपन्या यांना कर्ज वसुली स्थगित करण्याचे आदेश जारी करा
-3-
     अशा व आणखी काही उपाययोजना आखून देशातील या नव-निर्मिक वर्गाला सहारा दिला पाहिजे. परंतू त्या दिशेने काहीही होतांना दिसत नाही. काम नाही व खायलाही नाही, म्हणून शेकडो कोस दूर असलेल्या आपापल्या प्रांतात परत जाणारे हे कष्टकरी लोक रेल्वे व बस-स्टॅण्डवर प्रचंड गर्दी करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री व पायलीचे पंधरा सिलिब्रिटिज आपल्या तोंडाची वाफ दवडत ‘जनता कर्फ्यु’ लागू करण्याच्या वायफळ गोष्टी करीत आहेत. जनतेने खरोखर स्वयंस्फुर्तीने घरात बंदिस्त व्हावे, असे वाटत असेल तर-
1)     ज्याप्रमाणे महापुराच्या संकट काळात हेलिकॉप्टरने फुड पॅकेट्स दिले जातात, त्याप्रमाणे असंघटित वस्त्यांमध्ये सकाळ-संध्याकाळ सकस फुड पॅकेट्स पुरविल्या पाहिजेत.
2)     दारिद्र्य रेषेखालील कार्ड असलेल्या कष्टकर्‍यांच्या बँक अकाऊंटमध्ये किमान वेतन इतकी रक्कम रोज जमा केली पाहिजे.
3)     असंघटित कष्टकरींच्या वस्त्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी खास केंद्र सुरू केले पाहिजेत व तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली पाहिजे.
या व यासारख्या काही उपाय-योजना करून जनता कर्फ्यु प्रत्यक्षात अमलात आणू शकतो व करोनासकट त्याच्या कोवीड-19 ला आपण कायमचे हद्दपार करू शकतो.
  शासनाला असे शहाणपण सुचेल अशी अपेक्षा करू या! सर्वांना जयजोती, जयभीम, सत्य की जय हो.....! 

                               (लेखनः 21 मार्च 20)

------- प्रा. श्रावण देवरे

Mobile – 88 301 27 270
Blog ब्लॉग-लिंक
https://shrwandeore.blogspot.in/                   

No comments:

Post a Comment