तेहतिसावी खेप ......! दै. लोकमंथन रविवार – 22 जुलै 2018 च्या अंकासाठी)
बहुजननामा-33
सद्सद्विवेकबुद्धी!
बहुजनांनो.... !
सद्सद्विवेकबुद्धी हा
मानवी जीवनप्रवाहातील सर्वात मोठा चमकदार व अमुल्य असा दागीना होय! यासाठी मानवाला हजारो वर्षांचा प्रवास करीत पुढे यावे लागले.
इतर प्राण्यात व मानव प्राण्यातील ही सर्वात मोठी अमिट अशी विभाजक रेषा!
ती फार कमी लोकांना स्पर्श करीत पुढे जाते. आजही
बहुसंख्य लोक सर्वकाही संधी-सवलती-संपत्ती
असूनही सद्सद्विवेकबुद्धीला पात्र ठरत नाहीत, यावरून लक्षात येते
की हा सद्गुण प्राप्त करण्यासाठी माणसाला किती संघर्ष व त्याग करावा लागतो!
तिच्या प्रभावाचा व अभावाचाही प्रत्यय वारंवार येतो. काल तो प्रत्यय देशपातळीवर आला व सर्वोच्च सभागृहात प्रतिबिंबितही झाला!
काल लोकसभेत आर.एस.एस प्रणित भाजपा सरकारवरील अविश्वास ठराव फेटाळला
गेला. अशावेळी सर्व राजकिय पक्ष(श्रेष्ठी)
आपापल्या खासदारांसाठी ‘व्हिप’ काढतात व त्याप्रमाणे खासदार आपले ‘मत’ नोंदवितात. त्याची मोजणी होऊन बहुमतवाल्या पक्षाचा विजय
होतो. त्याप्रमाणे सरकार पडते वा राहते. लोकशाहीचे हे गृहितक आहे, जे सर्वांना मान्य असते.
पण काय गृहितक कधीच बदलत नाही का? माणूसच नियम
बनवितो. राज्य व सुव्यवस्था, शांतता व विकास
अशा मानवी मुल्यांच्यासाठी कायदा वा नियम बनवावे लागतात व ते पाळण्यासाठी सर्व सुज्ञलोक
आग्रही असतात. पण काही लोक अचानक पुढे येतात व कायदा भंग करायला
सांगतात, अव्यवस्था निर्माण करायला सांगतात. कायदाभंग ‘सविनय’ केलेला असो की
‘बॉम्ब’ टाकून केलेला असो, त्यांना गुन्हेगार ठरविले जाते, जेलमध्ये कोंबले जाते
व फासावरही लटकाविले जाते. कालांतराने मग हे लोक विद्रोही,
असंतोषाचे जनक, बंडखोर, हुतात्मा
वा महात्मा वगैरे भुषणांनी सन्मानित केले जातात. हे फार थोड्याच
लोकांच्याबाबतीतच का होत असते? कारण रानटीप्राणी व मानवप्राणी
यांच्यातील सद्सद्विवेकबुद्धीची विभाजक रेषा फार थोड्या लोकांना स्पर्श करून पुढे जात
असते. तेच हे लोक ज्यांना आपण मोठे सुज्ञ, मसिहा, महापुरूष वगैरे म्हणतो!
असाच एक मसिहा
1990 साली प्रधानमंत्री झाला! त्याला देशातील
52 टक्के लोकांना अधःकारमय जीवनातून बाहेर काढायचे होते, प्रकाशाकडे न्यायचे होते. मात्र अधःकारावर पोट भरणार्या लोकांना वाईट वाटले. कारण 52 टक्के लोक जागृत झालेत तर हे अंधाराचे पुजारी उपासमारीने मरतील अशी भीती होती.
म्हणून मग या अधःकार-प्रिय लोकांनी सर्वमान्य असलेल्या
लोकशाही नियमांचा आधार घेऊन मसिहालाच गाडायचे ठरविले. पार्लमेंटमध्ये
अविश्वास ठराव आला. चर्चा-महाचर्चा सुरू
झाल्यात! आवाहने-प्रतिआवाहने सुरू झालीत.
गुणवत्ता-दुणवत्तावर भरभरून लिहीले गेले.
टिव्ही, प्रिंट मिडीया सुसाट वेगाने एकतर्फी प्रचार
करू लागलेत. जाळून घेणे, जाळून टाकणे
‘स्वस्त’ झाले. असे करणे
लोकशाही मुल्ये ठरू लागलीत. राज्यघटनेत लिहिल्याबरहुकुम अविश्वास
ठराव आला व व्हिपच्या पताका फडफडू लागल्यात. पार्टी-लाइन, पक्षश्रेष्ठी वगैरे शब्द घुमू लागलेत. लोकशाहीचाच वापर करून 52 टक्के लोकांचा गळा आवळायला निघालेले
हे लोक हुकुमशाहीची पायाभरणी करीत होते. मसिहाला हे स्पष्ट दिसत
होते. अशा कठिणसमयी त्याने मानवतेचे सर्वोच्च मुल्य असलेल्या
सद्सद्विवेकबुध्दीचा उपयोग केला. सर्व आरोप-प्रत्यारोप ऐकूण झाल्यावर तो पार्लमेंटमध्ये ‘रिप्लाय’साठी उठला आणी म्हणाला की, ‘’नो पार्टीलाईन, नो व्हिप, ना कोणी राजा, ना कोणी
पक्षश्रेष्ठी! मोडून काढा ही लोकशाहीची गृहितके! फक्त आपली सद्सद्विवेकबुध्धी जागृत करा आणी अविश्वासदर्शक ठरावावर आपले ‘मत’ नोंदवा!’’
सेम घटना घडत होती परवाच्या
दिवशी! 1990 ला पार्लमेंटमध्ये ज्यांनी सद्सद्विवेकबुद्धी गहाण
ठेऊन हुकुमशाहीचा पाया रचला, तेच लोक आज त्याच पार्लमेंटमध्ये
सत्ताधारी बाकांवर बसले होते. लोकशाहीच्याच वीटा वापरून हुकुमशाहीचा
महाल बांधणारे हे लोक सत्ता टिकविण्यासाठी व्हिप काढत होते, उपस्थित
राहण्याचे आदेश देत होते. पार्टीलाइनचा जयघोष करीत होते.
1990 आणी 2018. फरक एक होता आणी तोच अत्यंत महत्वाचा
होता. 1990 ला सद्सद्विवेकबुद्धी जागृत करण्याचे आवाहन करणारा
एकमेव मसिहा होता ‘व्हिपी सिंग’! आज पार्लमेंटमध्ये
असे आवाहन करण्याची क्षमता व पात्रता ना विरोधकात होती ना सत्ताधार्यात! सगळेच्यासगळे गुलामबुद्धिचे धनी! जे 1990 साली घडले तेच 2018लाही!
सद्सद्विवेकबुद्धी जागविण्याची
किंमतही चुकवावी लागते. 2009 व 2010 ला
काही ओबीसी खासदारांनी पार्टीलाइन झिडकारून, पक्षश्रेष्ठींना
खुंटीवर टांगून ओबीसी जनगणनेची मागणी केली. केवळ एवढेच करून ते
थांबले असते तर फार काही झालेही नसते. मात्र या खासदारांनी लोकसभेला
झुकवलं, ही सगळ्यात मोठी व महत्वाची घटना होती. परंतू त्यामुळे जात-श्रेष्ठींचा अहंकार दुखावला.
जातश्रेष्ठी सतर्क झाले व त्यांनी 2018 पर्यंत
‘’ओबीसी जनगणनावादी’’ एकही खासदार पार्लमेंटमध्ये
शिल्लक ठेवला नाही. त्यातील काहींना पार्लमेंटमधून हद्दपार केले
तर काहींना जीवनातूनच हद्दपार केले, उरलेल्यांना जेलमध्ये डांबलं
व दुसर्याला राजकारणातून उठविलं. किंमत
तर चुकानी पडती है, फोकट मे कुछ नही मिलता!
काल पार्लमेंटमध्ये
150 च्यावर ओबीसी खासदार उपस्थित होते. 100 खासदार
दलित-आदिवासीतून होते. त्यांची
‘सद्सद्विवेकबुध्धी’ जागृत करणारा एकही मसिहा आज
नाही. एक सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्ता म्हणून हे काम आपण केले
पाहिजे, असे मला वाटले. आम्ही सोशल मिडियातून
आवाहन केले की, ‘पार्टीलाइन झिडकारा, पक्षश्रेष्ठींना
बाजूला सारा व 85 टक्के बहुजन-मुस्लीमांचे
मरण असलेल्या पक्षाला ‘’अविश्वास’’ दाखवून
गाडा! परंतू कधी पुतळे उभारून तर कधी बदनामीची पुस्तके लिहून
महापुरूषालाच गाडायला निघालेले हे लोक सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काय ऐकणार??
कोणाची सद्सद्विवेकबुद्धी कशी समजून घेणार? पण
लक्षात ठेवा सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या लोकांबरोबर राहाल तरच माणूस म्हणून स्वाभिमानाने
जगू शकाल! अन्यथा जनावरांपेक्षाही वाइट हाल करणारे जीवन या देशात
लाखो लोक शेकडो वर्षांपासून जगतच आहेत. त्यातील काही लोकांनी
बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रबुद्ध महापुरुषाची वाट धरली आणी त्यांची सद्सद्विवेकबुद्धी
जागृत झाली. आज ते सन्मानाचे जीवन जगत आहेत. ओबीसी जनतेलाही सुबद्ध व्हावेच लागेल. तरच तुमच्यातील
सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेली व्यक्ती ओळखू शकाल! या प्रबुद्ध
व्यक्तीला फॉलो केले तर भुलभुलैय्या करणारे नेते कुठल्याकुठे उडून जातील. हा प्रबुद्ध माणूसच तुम्हाला अधःकारमय जीवनातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल!
फुले-आंबेडकरी शिक्षणामुळे आज प्रत्येक जातीत विद्वान निर्माण झाले आहेत.
हे विद्वान समाजाने ओळखले तर पूर्ण समाजच बुद्धिमान होऊन अन्यायाविरूद्ध
संघर्षास तयार होईल. मात्र या विद्वानांना झाकून ठेवण्यासाठी
व त्यांच्या जातीला विद्वानांपासून लांब ठेवण्यासाठी अक्कलशून्य नेते प्रत्येक जातीत
निर्माण केले जात आहेत. त्यांना भरपूर प्रसिद्धी देऊन,
साधने-सवलती देऊन ‘’मोठा’’
बनविले जाते, परिणामी समाजास योग्य मार्गदर्शन
करणार्या बुद्धिमानाला आयसोलेशनमध्ये टाकले जाते. महार जातीने आपल्यातील प्रबुद्धाला बरोबर ओळखले म्हणूनच ते आज सर्वच्या सर्व
‘’प्रबुद्ध’’ होऊन तुलनेने सन्मानाचे जीवन जगत
आहेत.
महारांपेक्षा माळी वगैरे तत्सम ओबीसी
जातींना अशी प्रबुद्ध होण्याची संधी 100 वर्षे आधीच प्राप्त झाली होती-1848 साली! मात्र या ओबीसी जातींनी आपल्यातला ‘प्रबुद्ध’
माणूस ओळखलाच नाही, परिणामी ते अंधारातच राहिलेत.
त्यांचा उध्दार करणारी सत्यशोधक चळवळ मराठ्यांनी पळवीली, ती ब्राह्मणांना विकली व त्याबदल्यात राज्यसत्ता मिळविली. कोणताही संघर्ष न करता आयत्या मिळालेल्या सत्तेचे महत्व त्यांना कधी समजलेच
नाही. त्यांच्यादृष्टीने सत्ता म्हणजे ‘’आमदार-खासदार होणे, एखादा साखर
कारखाना वा शिक्षणसंस्था स्थापन करणे, त्यात आपल्या नातेवाईकांची
सोय लावून यथेच्छ लुट करणे’’ एवढाच! त्यामुळे
यांच्या खोट्या राजकीय झगमगाटात मराठा समाजातील प्रबुद्ध लोक झाकोळले गेलेत.
परिणामी आज त्यांच्यावर आरक्षण मागायची वेळ आली. आजही प्राच्यविद्यापंडित डॉ. आ.ह. साळुंखे, न्यायमुर्ती कोळसे
पाटील व न्यायाधिश पी.बी. सावंतांसारखे
प्रबुद्ध लोक मराठा समाजाच्या बैठकांमधून अपमानास्पद पद्धतीने बाहेर हाकलले जातात.
यावरून इतकी वर्षे सत्तेत राहूनही या लोकांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत
झालीच नाही. त्यामुळे ते आपल्या हातातील सत्ता ब्राह्मण व वैश्यांच्या
हितासाठीच राबवित राहिलेत. गरीब व वंचित जनता अधिकच गरीब होत
गेली. स्वतःच्या मराठा जातीतील गरीबांनाही त्यांनी वार्यावर सोडले, परिणामी मराठा-आरक्षणाची
मागणी पुढे आली.
सद्सद्विवेक ही काही बाजारात मिळणारी वस्तू नाही. शरीर
जसे सततच्या व्यायामातूनच कमवले जाऊ शकते, तसेच सद्सद्विवेकबुद्धी
ही सततच्या अभ्यासातून, संघर्षातून व मानवतेवरील अढळ निष्ठेतूनच
प्राप्त होऊ शकते. यात मानवतेवरची निष्ठा हा शब्द फार महत्वाचा
आहे. निष्ठेअभावी तुम्ही कितीही अभ्यास करा वा संघर्ष करा,
त्यातून सद्सद्ऐवजी कुबुद्धीच निर्माण होते, जी
आज ब्राह्मण व तत्सम क्षत्रिय-वैश्य जातींकडे भरपूर आहे.
लहानपणापासूनच सद्सद् वा कुबुद्धिचा पाया भक्कम होत असतो. आपल्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या
नंतरच्या पिढ्या सद्सद्विवेकबुद्धीच्या नेतृत्वाअभावी अधःपतीत झाल्या आहेत.
आता नव्याने काही कार्यक्रम हाती घेऊन पुढच्या पिढीला सद्सद्विवेकबुद्धीचे
नेतृत्व मिळवू दिले पाहिजे. चला तर…. त्यासाठी
एकमेकांना कडक जयभीम-जयजोती घालत नवे कार्यक्रम सुरू करू या !!!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
Blog
ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
Email-
s.deore2012@gmail.com

No comments:
Post a Comment