http://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, October 2, 2018

43 BahuajanNama, Lokmanthan, 30 Sept 18, न्यायधिशांची नेणीव!



 बहुजननामा-43
न्यायधिशांची नेणीव!
बहुजनांनो.... !   
     काल सर्वोच्च न्यायालयाने पती-पत्नी विवाहबाह्य संबंधांवर एक निर्णय दिला आणी सगळीकडे स्मशान शांतता पसरली. सगळेच संम्रभावस्थेत गेले आहेत. एरवी अशा इतर वादग्रस्त निर्णयावर तुटून पडणारे विचारवंत या निर्णयावर फारशी खळखळ करतांना दिसत नाहीत. स्त्रीवादी काही बोलत नाहीत. स्वागत वा विरोध काहीच नाही. असा काही निकाल येईल अशी सुतराम शक्यता वाटत नसतांना असा निकाल आलाच कसा, असा प्रश्न बहुतेक सगळ्यांच्याच मनात उद्भवलेला आहे. परंतू निकाल तर आला आहे, त्यावर बोललेच पाहिजे. काल एका टि.व्ही. चर्चेत एका स्त्री-सहभागक ने सांगीतले की यामुळे कुटुंब-व्यवस्था उध्वस्त होईल. काही वर्तमान पत्रांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी त्यात विश्लेषण असे काही नाही.
     मुळात कुटुंब-व्यवस्था ही पुरूषी-वर्चस्वाचा एक अविभाज्य भाग म्हणूनच अस्तित्वात आली आहे. आधीच्या मातृसत्ताक व स्त्रीसत्ताक गणराज्यात कुटुंब ही संस्था नव्हती तर कुलसंस्था होती. कूलसंस्था म्हणजे मोठे कुटुंब असे काहीसे सोपे करून सांगता येईल. मात्र तेही खरे नाही. कारण गणराज्य जसे गणराणीच्या वर्चस्वात होते, तसे कूलसंस्थेत मातृ-वर्चस्व होते. कूलसंस्था ही फक्त रक्ताच्या व दुधाच्या नात्यातील व्यक्तींनी बनलेली होती. त्यात आई, तीची अपत्ये असलेली मुलं, मुली व मुलीच्या पोटी जन्मलेली मुलं-मुली राहात असत. बाप नावाचे नाते निर्माण झालेले नव्हते. कारण आई कोण हे निसर्गतःच सहज ठरविता येत होते. पण बाप कोण हे कसे ठरविणार?? आजच्या अत्याधुनिक काळातही डी.एन.ए. टेस्ट करून बाप ठरविला जातो, मात्र त्यातही किती सत्यता असते, याबद्दल शंका असतेच. आपल्या अपत्याचा बाप कोण, हे फक्त आईच सांगू शकते. मात्र त्याकाळी हे विचारण्याची व सांगण्याची कोणाला कधी गरज पडली नाही. कारण बाप ही संकल्पनाच मुळी त्या काळात उदयास आली नव्हती.
हिडिंबा राक्षसीण जेव्हा भीमाला एका अपत्यासाठी सहवासाची मागणी करते तेव्हा ‘बाप’ शब्दाचा किंवा तत्सम अर्थाचा शब्द कोठेही आलेला नाही. पाच पांडवांचे ‘बाप’ कोण यावर अनेक प्राच्यविद्यापंडित आजही ‘कीस’ काढतांना दिसतात. मुळात त्या काळात ‘बाप’ ही संकल्पनाच अधिकृत नव्हती. महाभारतातील युद्धाचा विषय पुत्रप्रेम, सिंहासन-प्रेम, राजशकट वारसा वगैरे दाखविले जाते, मात्र मूळातील संघर्ष हा वेगळाच होता, असे प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील सांगतात.
महाभारतीय युद्धतातील मूळ संघर्ष हा दासप्रथाक पुरूषसत्ताक राजर्षीसत्ता व दासप्रथाक मातृवंशक राजर्षीसत्ता यांच्यातील होता, असे कॉ. शरद् पाटील सांगतात. ‘रामायण व महाभारतातील पुराण व वास्तवता’ या अनन्य लेखात ते म्हणतात, ‘महाभारतीय युद्ध खरे म्हणजे ‘कौटुंबिक संघर्ष’ होता, जो ‘कुरू कुटुंबाच्या सदस्यांमध्ये घडून आला’ ……. असे सांकलियाचे प्रतिपादन आहे….. पण त्याला भाऊबंदकीचा झगडा लेखणे, हे वैज्ञानिक इतिहाससंशोधन व आकलन खास ठरू शकत नाही. कुटुंब ही संस्था बुद्धाच्या जीवन कालात अगदी प्रथमतः उदयाला येतांना आपल्याला दिसते….’’ (मराठवाडा संशोधन मंडळ वार्षिक 1975)
गणराज्याची नावे मातेवरून ठेवली जायची, जसे- सीता-वैदेही चा गण ‘विदेह गण, केकयीचा केकय गण, कौसल्येचा कोसल गण इत्यादि. अपत्यांची नावेही आईवरूनच ठरायची. कौंतेय, राधेय, नैऋत, राधा-सूता आदि. कुटुंब संस्था ही सरंजामशाहीचे अपत्य आहे. मातृसत्ताक, मातृवंशक व स्त्रीसत्ताक गणराज्याच्या शवावर पुरूषसत्ताक चातुर्वर्ण्य सरंजामी समाज उदयास येत असतांना त्याचा अविभाज्य भाग म्हणून कुटुंब संस्था उदयास आली. शेतीचं कृषीकर्म स्त्रीयांच्या हातात होतं. म्हणजे त्या काळातले उपजीवीकेचं अर्थशास्त्र स्त्रीयांच्या ताब्यात होतं म्हणून पुरूषाला दुय्यम स्थान होतं. ‘जनक’ या शब्दाचा अर्थ ‘’संततीला निमित्त मात्र’’ असा होतो.
मात्र कृषीकर्म जसजसे पुरूषांच्या हातात यायला लागल्यानंतर समाजव्यवस्थेने ‘करवट’ बदलली. लोहयुग अवतरल्यानंतर लोखंडाची अवजारे बनू लागलीत. या लोखंडी अवजारांना पाळीव प्राणी जुंपले गेलेत व शेतीचं उत्पादन अनेकपटीने वाढले. मातृ व स्त्रीसत्ताक गणराज्यात आधीचं अवजार होतं ‘स्फ्य’ नावाची टोकदार काठी! या काठीच्या अणकुचीदार टोकाने जमिनीत छिद्र पाडून ‘बी’ टाकले जात होते. ही हाताने केलेली शेती व त्यातून येणारे उत्पन्न हे समाजाच्या वाढत्या लोकसंख्येच्या व वाढत्या गरजांच्या तुलनेने ‘कमी’ पडू लागले. याला ‘कुंठीत’ होणे म्हणतात. मागास होत चाललेल्या उत्पादन साहित्याच्या मुळे उत्पादन कमी-कमी वाटायला लागते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत ताण-तणाव निर्माण होऊन समाजव्यवस्था ‘कुंठीत’ होते. गरज ही शोधाची जननी असते.
लोखंडी अवजारे व पाळीव प्राण्यांमुळे शेतीचे कर्म पुरूषांच्या हातात येताच अर्थव्यवस्थेवरील स्त्रीयांचे वर्चस्व नष्ट होत गेले. तसतसे स्त्रीयांचे सामाजिक व सांस्कृतिक वर्चस्वही संपत गेले. पुढच्या टप्प्यावर ‘गुलामी’ आली. ही गुलामी येण्याचेही खास कारण होते. गणराज्याची प्राथमिक घटक कुलसंस्था होती. गणराज्याची गणमाता होती, गणपिता नव्हताच! त्याचप्रमाणे कुलसंस्थेत कुलमाता होती, कुलपिता नव्हताच! पुरूषसत्ताकतेच्या प्रवासात या कुलसंस्थेचे विभाजन होऊन प्राथमिक संस्था म्हणून ‘कुटुंब’ उदयास आले. या कुटुंबाचा प्रमुख पुरूष होता. मात्र कुटुंबातील अपत्ये कुणाची हा ‘प्रश्न भेडसावणाराच’ होता. कुटुंबातील अपत्ये एका विशिष्ट पुरूषाची असतील तरच तो खर्‍या अर्थाने त्या कुटुंबाचा प्रमुख गणला जाणार! त्यातून ‘’एक स्त्री व तिच्याशी विवाहीत एकच-एक पुरूष यांनी आणी फक्त यांनीच एकत्रीत येऊन जन्माला घातलेले अपत्य’’ ही कुटुंबाची कसोटी बनली. स्त्री सत्ताक-मातृसत्ताक समाजव्यवस्थेत वारसदार मुलगीच असायची! तिची जन्मदात्री कोण हे निसर्गताच सिद्ध व्हायचे. जिच्या पोटी जनम घेतला तीची ही मुलगी वारसदार आपोअप ठरायची. मात्र पुरूषसत्ताक कुटुंब व्यवस्थेत वारसदार मुलगा असतो. पण हा मुलगा विशिष्ट पुरूषाचेच अपत्य आहे हे कसे ठरविणार, हा मोठा ‘यक्षप्रश्न’ होता. म्हणून एका पुरूषाशी विवाह झालेली स्त्री दुसर्‍या पुरूषासोबत सहवास करू नये यासाठी काही बंधने आलीत. अर्थात ही बंधने नैसर्गिक नव्हतीच. म्हणून ती तंतोतंत पाळण्यासाठी काही कायदे व शिक्षा यांची तरतूद करावी लागली. या कायद्यांना नैतिक, धार्मिक अधिष्ठान देण्यात आलं. पुरूष प्रेषितांनी स्थापन केलेल्या धर्मांना राजाश्रय मिळू लागला. कथा, कादंबर्‍या, पुराणे, पोथ्या, महाकाव्य, स्मृती-श्रुती, कर्मकांड, विधी, प्रवचने अशा सर्व साहित्य साधनांनी महा(कू)प्रबोधनाची लाट निर्माण झाली. या कुप्रबोधनातू स्त्रीयांचं न्युनगंडत्व व पुरूषांचं अहंगंडत्व घडविले गेले. ‘’मी असं केलं तर लोक काय म्हणतील?’’ असा एक गंड प्रत्येक स्त्रीच्या मनात निर्माण केला गेला. जमिनीची मालकी जी आधी गणराज्याची होती, ती आता एका विशिष्ट पुरूषाची झाली, त्यामुळे स्त्री सुद्धा एका विशिष्ट पुरूषाची मालकीची वस्तू बनली. कायदे पुरूष-वर्चस्वी बनलेत. या पैकी एका कायद्याचा सर्वोच्च न्यायालयाने काल ‘’निकाल’’ लावला.
आता या पुरूषसत्ताक कायद्याचा लावलेला निकाल कायद्याच्या चौकटीतच राहील. समाजाची चौकट म्हणून तो लगेच स्वीकारला जाईल का??? तर त्याचे उत्तर नाही आहे. अनेकांना वाटते की हा क्रांतिकारी निर्णय आहे. पण या निर्णयासाठी आवश्यक असलेली समाजव्यवस्था दृष्टीपथात तरी आहे काय? नाहीच नाही! स्त्रीसत्ताक व्यवस्था नष्ट करण्यासाठी उत्पादनाची साधने विकसित होऊ लागलीत व ती पुरूषांच्या हातात एकवटण्याची परिस्थीती निर्माण झाली. म्हणजे अर्थव्यवस्था पुढच्या टप्प्पावर गेल्याने समाजातील प्रमुख स्त्रीऐवजी पुरूष बनला. यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. आक्षेपार्ह हे आहे की, पुरूष प्रमुख झाल्याने त्याचा वारसदार मुलगा प्रमुख बनायचा असेल तर तो त्याच पुरूषाचे अपत्य असणे बंधनकारक ठरणे! या आग्रहातून स्त्रीयांवर बंधने आलीत. आक्षेपार्ह हे आहे की, या आग्रहासाठी धर्म व नीती व्यवस्था राबविली गेली.
आज उत्पादन साधने अशी विकसित झालेली आहेत की, तेथे स्त्री-पुरूष भेदच राहीलेला नाही. तंत्र-कर्म जाऊन आता यंत्रकर्म आलेलं आहे. नांगर हाकण्यासाठी आता पुरूषाची गरज नाही, ट्रॅक्टरवर बसून हातात चाक पकडून आमची लाडकी आर्ची परूषापेक्षाही जास्त खुलून दिसते. त्यामुळे उत्पादन-व्यवस्था स्त्री-पुरूष सामायिक झालेली आहे, पण काय अर्थव्यवस्था तशी झालेली आहे काय? समाजव्यवस्थेत पुरूषी वर्चस्व दृढ करणारे धर्म, त्यांचे धर्मग्रंथ, विधि-कर्मकांड हे नष्ट झालेले आहेत काय? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला क्रांतीकारक म्हणायचे असेल तर मग न्यायालयाने याचाही खुलासा करणे गरजेचे होते.
ज्या महापुरूषांनी ‘स्त्री-गुलामगिरी’ मुळातून उखडून टाकण्यासाठी काही सिद्धांत व व्यवहार सांगीतले आहेत, त्याचाही उल्लेख या जजमेंटमध्ये होणे गरजेचे होते. तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या स्त्रीशिक्षणाची व बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बीलाची कशी वासलात लावली गेली, हे आपण सर्व पाहात आहोतच. आजही भिडे-भटजींसारखे असंख्य समाज-धुरीण मनुस्मृतीचं कौतुक करतात, त्यांच्यासाठी खास शिक्षेची तरतूद करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायधिशांनी करायला हवी होती. केवळ ‘निकाल’ देणे वा ‘निकाल’ लावणे पुरेसे नाही. तशी मुलभूत व्यवस्था निर्माण करण्यासाठी काही गाईड लाइन न्यायालयाने दिली पाहिजे होती. अशी गाईड लाईन निश्चितच या देशाला ‘सावित्री-जोती-भीमाच्या’ मार्गावर नेणारी ठरली असती. मात्र निकाल लावणारे न्यायाधिश ज्या महाकुप्रबोधनाचे बळी आहेत, व ते ज्या विचारसरणीचे पाइक आहेत, ती त्यांना ‘‘नेणीवपुर्वक’’ तसे करू देत नाही, हे मात्र निश्चित!
------- प्रा. श्रावण देवरे
            Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
            Email- s.deore2012@gmail.com


No comments:

Post a Comment