http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, October 7, 2018

44 BahujanNama, Lokmanthan, 7 Oct 18 एक ब्राह्मण लाखाला भारी!

बहुजननामा-44
एक ब्राह्मण लाखाला भारी!
बहुजनांनो.... !   
     आपल्या महाराष्ट्रात फडणवीस साहेबांच्या मंत्रीमंडळातील एक जानकार मंत्री म्हणून ‘’नामदार महादेवराव जानकर’’ सगळ्यांनाच माहीत आहेत. काल त्यांनी त्यांच्या भाषणातून बरीच महत्वपूर्ण जानकारी दिली. खरे म्हणजे ती ऐतिहासिक अशीच माहीती होती. त्याहीपेक्षा ती सर्वांना ‘कटू’ वाटणारी असल्याने सगळ्यांची तोंडे वाकडी-तिकडी झाली.
नामदार जानकर आपल्या भाषणात जे काही बोललेत त्यात 8-10 वाक्ये ही वाद्ग्रस्त होती. यातील काही वाक्ये ही ‘घोषवाक्ये’ होती. घोषवाक्ये ही त्या त्या समाजघटकाची वैचारिक प्रतिबिंब असतात. त्यापैकी ज्या घोषवाक्यांना राजाश्रय मिळतो, ती प्रसारमाध्यमातून इतकी बिंबवली जातात की ती सर्वच लोकांच्या मेंदूंचा जबरी ताबा घेतात. जातीयुद्धात ही घोषवाक्ये फार मोठ्याप्रमाणात वापरली जातात. आपल्या फौजेचं मनोधैर्य वाढविण्यासाठी किंवा त्यांची तयारी करून घेण्यासाठी अशी घोषवाक्ये कामाला येतात. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, भारत बौध्दमय करण्याची घोषणा, इडा पिडा जाओ बळीचं राज्य येवो, अशी अनेक घोषवाक्ये सामाजिक युद्धासाठी वापरली जातात. ‘हर हर महादेव’, ‘अल्ला हो अकबर’ या प्रत्यक्ष रणांगणातील ललकार्‍या घोषवाक्येच होती. ‘गर्वसे कहो ….’ वगैरे घोषवाक्य धार्मिक युद्धासाठी आहेत.
याच रांगेतील ’एक मराठा लाख मराठा’ ही अलिकडच्या जातयुद्धातील एक घोषणा होय! या घोषवाक्याला शह देण्यासाठी ओबीसींनी ‘एकच पर्व ओबीसी सर्व’ किंवा दलित मोर्च्यावाल्यांची ‘एक बहुजन करोड बहुजन’ वगैरे घोषणा आल्यात. मात्र त्यांना राजाश्रय मिळाला नाही. परंतू, ब्राह्मणांनी ‘एक ब्राह्मण लाखाला भारी!’ अशी गर्जना करताच त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. आता हे घोषवाक्य सत्ताधारी ब्राह्मणांच्या हिताचे असल्याने त्याला राजाश्रय मिळाला. म्हणून ते मंत्री जानकरांच्या तोंडातून बाहेर पडले. ‘गरीब ब्राह्मणांना आरक्षण दिले पाहिजे’ हे वाक्यही याच पठडीतले. हे वाक्य बहनजीच्या बसपाचे ‘राष्ट्रीय घोषवाक्य’ बनलेले आहे. कालच्या जानकरसाहेबांच्या भाषणात हे महान घोषवाक्यही होतेच. अशा सर्व राजकिय घोषवाक्यांच्या गडबळ-गोंधळात जानकरसाहेब एक ऐतिहासिक सत्य बोलून गेलेत. एक ब्राह्मण लाखाला भारी! ब्राह्मणांचे हे घोषवाक्य संख्यात्मक नाही, तर ते गुणात्मक आहे. आणी म्हणून ते ब्राह्मणांच्या वतीने भाडोत्री फौजेकडून वदवून घेतले जाते. ब्राह्मणांचे शत्रू असलेले रावण, बळी, नरकासूर सारखे बलाढ्य असूर राजे भाडोत्री क्षत्रिय राजांकडून मारून घेण्याचे कसब ब्राह्मणातच आहे. म्हणून- ‘एक ब्राह्मण लाखाला भारी’ हेच सत्य आहे.
एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारा ब्राह्मण परशूराम लाखच काय कोट्यावधी क्षत्रियांना भारी होता की नाही? चाणक्य विरूद्ध बौद्ध नंदराजा, पुष्यमित्र शृंग विरोधी ब्रहद्रथराजा अशी अनेक उदाहरणे आहेत. ही झालीत प्राचिन ऐतिहासिक उदाहरणे. कोकणातल्या मुठभर पेशव्यांनी लाख मोलाचे स्वराज्य कसे सहजपणे घशात घातले? ही होती बावीसावी निःक्षत्रीयकरणाची मोहिम! सत्यशोधक चळवळीने जात्यंतक क्रांतीच्या उंबरठ्यावर आणलेलं महाराष्ट्र राज्य आज पुन्हा पेशवाईत कसं रूपांतरीत झालं? ही झाली यशस्वी 23 वी निक्षत्रियकरण मोहिम!
विसाव्या शतकाच्या उदयाबरोबर इंग्रजांनी भारतीयांना सत्तेत सहभागी करून घेण्याचे ठरविले. मॉंटेग्यु चेम्सफर्ड कमिटीच्या योजना राबवून छोट्या-छोट्या सत्तेचे हप्ते देशी जनतेला देण्यास सुरूवात झाली. असेंब्ली स्थापन करून काही अधिकार दिले जाणार होते. त्यासाठी या असेंब्लीवर निवडून जाणे गरजेचे होते. राजकारण व निवडणूका म्हटले की काही जातींच्या अंगात वारं येतं! त्याकाळी निवडणूका लढविण्यासाठी मराठा समाजाने ताबडतोब ‘’मराठा लीग’’ स्थापन केली! पण टिळकांनी दम भरला की, ‘असेंब्लीत येऊन कुणबटांना काय नांगर हाकायचा आहे काय?’ टिळकांचा दरारा पाहता मराठ्यांच्या लक्षात आले की, ब्राह्मणांच्या विरोधात आपण लढूच शकत नाहीत. मराठा म्हणून आपला निभाव लागणार नाही, तेव्हा त्यांनी तत्कालीन सत्यशोधकांना बरोबर घेऊन ‘ब्राह्मणेतर पक्ष’ स्थापन केला. शूद्रादिअतिशूद्रांना बरोबर घेतले तरच हे तथाकथित क्षत्रिय ब्राह्मणांच्या विरोधात लढू शकतात, अन्यथा यांचे निःक्षत्रियकरण ठरलेलेच असते. पण इतिहासापासून बोध घेतील ते क्षत्रिय कसले? शेवटी गुडघ्यातच! शूद्रअतिशूद्रांच्या मदतीने क्षत्रिय राज्यसत्तेवर येतात, मात्र पुन्हा नेहमीप्रमाणे ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शंबुकवधाचे धडे गिरविणे सुरू करतात! शुद्रअतिशूद्र बाजूला सरकताच क्षत्रियजातींचे शिरकाण करणे ब्राह्मणांना सोपे जाते. यालाच म्हणतात पृथ्वी निःक्षत्रिय करणे. यालाच आजच्या भाषेत म्हणतात- ‘’एक ब्राह्मण लाखाला भारी!’’ जानकर साहेब सत्य वदले! त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांचा निषेध करणे चुकीचे आहे.
गुजराथमध्ये पटेल जातीने एकच मोर्चा काढला आणी गुजराथच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची उफराटी झाली. महाराष्ट्रातल्या मराठायांनी लाखा-लाखांचे अनेक मोर्चे काढलेत, परंतू तरीही फडणवीस साहेबांची खूर्ची एक इंच सुद्धा इकडे-तिकडे सरकली नाही. याला म्हणतात-‘एक ब्राह्मण लाखाला भारी!’ महाराष्ट्र विधानसभेत फक्त 7-8 ब्राह्मण आमदार आहेत व मराठ्यांचे 145 आमदार आहेत. तरीही 145 मराठा आमदार 8 ब्राह्मणांचा ‘’पेशवाइ-रथ’’ आनंदाने ओढत आहेत. याला म्हणतात- एक ब्राह्मण लाखाला भारी!
फुले-शाहु-आंबेडकरांनी संसदिय लोकशाहीचे स्वप्न पाहतांना स्पष्ट केले होते की, संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्यानंतर येथे बहुजनांचे राज्य येईल व निःब्राह्मणीकरणातून समता स्थापन होईल. बिनडोक बहुजन निवडून जाऊ नयेत म्हणून त्यांनी शिक्षणावर भर दिला. सांस्कृतिक चळवळ करण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी शिवजयंती महोत्सव, बळीराजा महोत्सव आदि सांस्कृतिक कार्यक्रम दिलेत. शूद्रादिशूद्रांच्या मदतीने राज्यात सत्तेवर आलेल्या मराठ्यांनी ब्राह्मणांच्या नादी लागून पुन्हा ‘’शंबुक-वधाचा खेळ’’ सुरू केला. मंडल आयोगाला विरोध, एट्रॉसिटी ऍक्ट कायद्याला विरोध वगैरे कारस्थाने ही ब्राह्मणांच्या सांगण्यावरून केलेले ‘शंबुक-वधच’’ आहेत. राज्यसत्ता टिकविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घडवू आणावे लागतात, हे तर मराठ्यांच्या गावीही नाही. त्यामुळे मंत्रालयात सत्यनारायण घालणे किंवा गणपतीची आरती मुख्यमंत्र्यांकडून करून घेणे आदि कार्यक्रम हे धार्मिक आहेत असेच त्यांना वाटत राहीले. परंतू हे कार्यक्रम कोणत्याही अँगलने धार्मिक नाहीत. हे कार्यक्रम सांस्कृतिक आहेत व असे सांस्कृतिक कार्यक्रम हे सत्ता-प्राप्तीच्या युद्धातील फार मोठे हत्यार असतात, हे सत्य सांगणार्‍या फुले-शाहू-आंबेडकरांशी मराठ्यांनी खूप आधीच नाळ तोडून टाकलेली होती व आजही तोडलेलीच आहे. त्यामुळे सत्यनारायणाची पोथी वाचण्याचं निमित्त करून मंत्रालयात घुसलेला ब्राह्मण कधी मुख्यमंत्री होऊन बसला, हे मराठ्यांना कळलेच नाही. त्यामुळे भांबावलेल्या सर्वपक्षीय 145 मराठ्यांना पेशवाइचा रथ आजही गुमान ओढावा लागत आहे. याला म्हणतात-एक ब्राह्मण लाखांना भारी! विधानसभेत आपली संख्या ‘भारी’ असूनही 7-8 ब्राह्मण आपल्यावर भारी का पडत आहेत, असा साधा-सुधा प्रश्न त्यांना कधीच पडत नाही! त्यांना प्रश्न पडतात- ‘गावात मराठा असूनही ओबीसी सरपंच झालाच कसा? दलित असुनही एखादी व्यक्ती ऑफिसर कशी काय होऊ शकते?
एकबोटे व भिडे गुरूजींच्या विरोधात बोलले तर आपली जीभ झडून जाईल, या भीतीपोटी एकही मराठा आमदार तोंड उघडत नाही. मात्र शूद्र जातीत जन्मलेले छत्रपती शिवराय राजे होतात व कुळकर्णी नावाच्या ब्राह्मणाला उभा कापून काढतात, हे सत्य मराठ्यांच्या मेंदूत कधीच शिरू शकत नाही. मात्र आर.एस.एस. ने दिलेली ओबीसी-दलित द्वेषाची शिकवणी त्यांना पटकन समजते. ब्राह्मणांचे सांस्कृतिक राजकारण समजून न घेतल्याने ‘एक ब्राह्मण लाखांना भारी पडतच राहणार व बहुजन गुलामगिरीचे ओझं वाहातच राहणार’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
मान. नामदार जानकर साहेबांचा निषेध करण्याऐवजी त्यांनी सत्य सांगण्याचे धाडस केले, त्याबद्दल त्यांचे आभार माना. त्यांनी सांगीतलेल्या सत्याचा शोध घेत ब्राह्मणवादाच्या मुळाशी जाण्याचे काम करा, अशी विनंती करून थांबतो. जय जोती! जयभीम!!

------- प्रा. श्रावण देवरे
            Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/

No comments:

Post a Comment