बहुजननामा-63
-
- ते कॉंग्रेसला चिरडत आहेत,
आपण संघ-भाजपाला चिरडू या!
बहुजनांनो!,
2019 ची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टिने ऐतिहासिक आहे, असे सगळेच
पुरोगामी म्हणत आहेत. कोणाला संविधान खतरेमे वाटते तर कोणाला लोकशाही! किती मोठा
धोका! मात्र तरीही ही निवडणूक ‘गंभीरपणे’ घेण्याचे काम फक्त प्रतिगामी पक्षच करीत आहेत. प्रतिगामी व प्रस्थापित पक्ष म्हणजे जे पक्ष ब्राह्मण-क्षत्रियांच्या
मालकीचे आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्ष व भाजपा-सेना! हे एकमेकांचे शत्रूपक्ष या
निवडणूकीत किती ‘सामंजस्य’ ठेवून वागत आहेत. कोणत्याही परिस्थितीत राजकीय सत्ता ही
ब्राह्मण अथवा क्षत्रिय जातींच्या घराण्यांमध्येच राहीली पाहिजे, या एकमेव
उद्देशाने पेटलेले हे सरंजामदार(मराठा) व कलम-कसाईखोर(ब्राह्मण) आपल्या घराण्यातील पोरंबाळं एकमेकांच्या पक्षात पाठवीत आहेत.
विरोधी बाकांवर बसूनही राष्ट्रवादीचे क्षत्रिय वतनदार फडणवीसांची पेशवाई पूर्ण
5 वर्षांपर्यंत टिकवून ठेवत आहेत. शत्रू पक्षात किती हे सामंजस्य!? युतीसरकारच्या
सत्तेत सहभागी होऊनही पूर्ण 5 वर्षाच्या काळात शिवसेनेने मोदी व भाजपाला शिव्या
देण्याची एकही संधी सोडली नाही. सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाच ‘विरोधी’ पक्षाची
भुमिका वठवीत होती. आणी तरीही निवडणुकीच्या तोंडावर अचानक याच पक्षांची युती होते,
जागा वाटपही होते व एकत्र प्रचारालाही लागतात. भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी
या चारही पक्षांमध्ये कुठेही भांडण नाही, मतभेदही नाही. सगळे कसे एकदिलाने ‘गंभीरपणे’
निवडणुकांना सामोरे जात आहेत.
अशा सामंजस्याची अक्कल आम्हाला आमचा ‘फुले-आंबेडकरवाद’ का देत नाही? ब्राह्मण-मराठा-क्षत्रिय
जातींचे पक्ष एकमेकांचे शत्रू असूनही निवडणूकीच्या काळात किती सामंजस्याने वागत
आहेत? आपण का नाही वागू शकत? महाराष्ट्रात हा सामंझस्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो.
खैरलांजी अत्याचारकांड वा भीमा-कोरेगावची दंगल हे संघ-प्रायोजित कार्यक्रम असू शकतात. पण
शत्रूने केलेल्या आक्रमणाला एक संधी समजून आपल्या समाजाला जागृत करणे, संघर्ष
करणे, संघटन मजबूत करणे व त्यातून दलित राजकारण स्वतंत्रपणे उभे करणे, हे कार्य दलित नेत्यांना करता
आले असते. मात्र एक बाळासाहेब प्रकाश आंबेडकर सोडलेत तर बाकीचे सर्व नेते आपापल्या
मराठा-ब्राह्मण मालकांच्या छत्रछायेत मौजमस्तीत गुंग आहेत.
बाळासाहेब प्रकाश आंबेडकर गेल्या 10-12 वर्षात संघर्षातून दलित राजकारण उभे करण्याचा प्रयत्न
करीत आहेत. कांशिराम साहेबांनीसुद्धा याच मार्गाने उत्तर प्रदेशात दलित राजकारण
उभे केले. मात्र एका विशिष्ट टप्प्यावर त्यांना हे दलित राजकारण पुढे नेण्यासाठी
आपल्या शत्रूपक्षाची मदत घ्यावीच लागली. ती मदत त्यांनी कधी
कॉंग्रेसकडून घेतली तर कधी संघ-भाजप कडून! त्यासाठी त्यांना किंमतही चुकवावी लागली. भाजप-संघाच्या आदेशाने कांशिरामजींना
ऑगस्ट-1990 मध्ये देवीलाल सोबत स्टेज शेअर करून मंडल आयोग अमलबजावणीला विरोधही करावा लागला. ज्या मंडल
आयोगासाठी ते पूर्ण आयुष्यभर चळवळ करीत होते, त्याच मंडल आयोगाला विरोध करण्याची
वेळ त्यांच्यावर आली. एक तडजोड म्हणून ती त्यांनी कली, त्याच्याबदल्यात त्यांना
संघ-भाजपाची साथ मिळाली. संघ-भाजपाची साथ मिळाल्यानंतर त्यांनी संधीचे सोने केले,
कॉंग्रेस राज्यातून हद्दपार केली व दलितांना सत्ताधारी केले. याच मार्गाने बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रात दलितांचे राजकारण उभे करीत आहेत.
त्यात त्यांचं काय चुकलं? कॉंग्रेसची वोटबँक कापून भाजपला पुन्हा सत्तेत
आणण्यासाठी बाळासाहेब राजकारण करीत आहेत, असा अरोप खरा मानला तरी त्यात चुकीचं
काय? याच कामाबद्दल कांशीरामसाहेबांना
माफी, आणी बाळासाहेब
आंबेडकर मात्र दोषी? हा कुठला न्याय? दलित आदिवासी ओबीसी जोपर्यंत एकत्र येत नाहीत,
तो पर्यंत आपल्याला स्वतंत्र राजकारण उभे करण्यासाठी दोन शत्रूंपैकी एका शत्रूची
मदत घ्यावीच लागेल. ते अपरिहार्य आहे.
आता माझ्या या भुमिकेवर एक प्रश्न उभा राहू शकतो. दोन शत्रूंपैकी एका शत्रूशी दोस्ती करायची तर मग
कॉंग्रेसशी का नाही, भाजपाशीच का? आपल्या मित्रांचं म्हणणं असे की, कॉंग्रेस ही ‘मऊ
वीट’ आहे. भाजप ‘दगड’! दगडापेक्षा वीट मऊ म्हणून कॉंग्रेसशी दोस्ती करायची! हा
जो ‘अखिल भारतीय गैरसमज’ बहुजनांच्या डोक्यात भरविलेला आहे, तेही एक ब्राह्मणी षडयंत्र आहे. सर्वात जास्त
दलित-मुस्लीमविरोधी दंगली कॉंग्रेसच्याच काळात झाल्यात, हे आपण सोयिस्करपणे
विसरतो. संघ-भाजपच्या दृष्टिने राजकीय सत्ता दुय्यम आहे. या देशाचं जातीय धृवीकरण
अधिकाधिक गतिमान करीत राहणे, ज्यामुळे ब्राह्मणी सत्ता टिकून राहते व मजबूतही
राहते. दंगली पेटविणे वगैरे षडयंत्रे संघ-भाजपला कॉंग्रेस काळातच करणे सोयीचे जाते, त्यामुळेच संघाची पहिली पसंद कॉंग्रेस आहे, भाजप नाही.
भाजपा दोनवेळा केंद्रीय सत्तेत आला, परंतू त्याला रामंदिराची एकही वीट चढविता नाही आली. त्यासाठी संघाला दिल्लीत कॉंग्रेसचंच सरकार हवे आहे. ‘‘कॉंग्रेस काळात
बाबरी मस्जीद पाडली, कॉंग्रेस काळातच राममंदिर बांधू!’’ हे संघ-भाजपाचे
धोरण आहे. 2019 ला कॉंग्रेस सत्तेत येईल, ते संविधान वाचविण्यासाठी नाही, तर राममंदिर
बांधण्यासाठी! आणी त्यासाठी राहूल-प्रियंकाने जाणवे घालण्यापासून ते सोमनाथ मंदिरांच्या
प्रदक्षिणा घालण्यापर्यंत व कुंभमेळ्याच्या गटारगंगेत डुबक्या मारण्यापर्यंतची
रिहर्सल सुरू केलेली आहे.
ज्या दलित-ओबीसी नेत्यांना कॉंग्रेसशी दोस्ती हवी आहे, त्यांनी कॉंग्रेसकडून संविधान वाचवायचे कोणते
आश्वासन मिळविलेलं आहे? एकतरी आश्वासन सांगा. राहूल गांधी, प्रियंका गांधी यांच्या एका तरी भाषणात असे आश्वासन
आहे काय की, ‘‘ कॉंग्रेस सत्तेत आल्यावर भाजपा सरकारचे संविधानविरोधी सर्व निर्णय,
कायदे व त्यांची झालेली अमलबजावणी मागील प्रभावाने रद्द करू. त्यासाठी घटना
दुरूस्ती करून पुढील काळात असे संविधानविरोधी कायदे करण्याची शक्यताच नष्ट करू.
म्हणजे भाजप सरकारच्या काळात 13 पॉईंट रोस्टर, समांतर आरक्षण, शून्य रिझर्वेशन
प्रमाणे झालेली सवर्णजातींची नोकरभरती रद्द करण्यात येईल, राज्यघटनेतच दुरूस्ती
करून प्लॅनिंग कमिशन, 200 पॉईंट रोस्टर, क्षत्रिय जातींची ओबीसीतील घुसखोरी रोखणे,
जातनिहाय जनगणना वगैरे जातीअंताच्या कलमांना मूलभूत कायदा बनवू. यापैकी एक तरी
आश्वासन कॉंग्रेस 2019 च्या निवडणूकात देत आहे काय? नाही. तर मग कॉंग्रेसशी दोस्ती कशासाठी? एकमात्र खरे
की, कॉंग्रेसच्या काळात आक्रोश करण्याचे, ओरडण्याचे, भाषणे करण्याचे, मोर्चे काढण्याचे भरपूर स्वातंत्र्य मिळते. आणी केवळ
तेवढ्यासाठी कॉंग्रेसशी दोस्ती करायची तर करा, मात्र त्यासाठी दलितांचे स्वतंत्र
राजकारण उभे करण्याची संधी गमवावी, असे मला वाटत नाही.
समविचारींकडून प्रकाश आंबेडकरांवर असाही आरोप होतो की, ते आम्हाला सोबत
घेत नाहीत. कसे घेतील सोबत तुम्हाला? बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी ज्या शत्रूपक्षाशी करार करून ते दलितांचे ‘स्वतंत्र राजकारण’ उभे करीत आहेत, त्या
शत्रूपक्षाच्याही काही अटी असतीलच ना? कॉंग्रेसला उघडपणे बाळासाहेब आंबेडकरांशी ‘आघाडी’ करावीशी वाटते व
भाजपाला गुप्तपणे बाळासाहेबांशीच अप्रत्यक्ष ‘युती’ करावीशी वाटते,
यातच बाळासाहेबांचे दलित चळवळीतील राजकीय वर्चस्व सिद्ध होते. गणराज्य मंच, बामसेफ वगैरेंशी तर कॉंग्रेसही युती करीत नाही. कॉंग्रेस तुमच्याशी बोलणीही करीत
नाही, तर जागावाटप वगैरेचा प्रश्नच येत नाही. कोणत्याही अटी नाहीत, कोणतेही आश्वासन
नाही, जाहीरनाम्यात कोणत्याही जात्यंताची कलमे नाहीत, आणी तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दारात का
म्हणून जाऊन बसावे? जर कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षच तुमच्या दारात येऊन बसला, तरची गोष्ट वेगळी!
राहीला प्रश्न आता ‘पुन्हा संघ-भाजप’ सत्तेवर येण्याचा! वंचित बहुजन आघाडीमुळे
कॉंग्रेसची वोटबँक कापली जाईल व भाजप सत्तेत येईल, असे आपले जर म्हणणे आहे तर, मग
तुम्ही तुमच्या दलित-पक्षाकडून उमेदवार उभे करून वेगळे काय करीत आहात? तुम्ही कॉंग्रेसचीच दलित वोटबँक
कापणार व भाजपाला निवडून देण्याचा प्रयत्न करणार. परंतू जर तुम्ही भाजपची पक्की
असलेली ओबीसी वोटबँक कापण्यासाठी आम्हाला मदत केली तर, तुम्ही खरे
संघ-भाजपाविरोधी ठराल. पण तुम्ही सर्व आंबेडकरवादी मराठा आरक्षणाला बिनशर्त
पाठींबा देऊन ‘ओबीसी’ कॅटेगिरीच नष्ट करायला निघाले आहात. मराठा
आरक्षणाच्या संकटाला एक संधी समजून आम्ही ओबीसींचे स्वतंत्र राजकारण उभे करण्याचा
प्रयत्न करीत आहोत. ओबीसी जातींना ‘‘ओबीसी’’ म्हणून त्यांची स्वतंत्र राजकीय शक्ती
उभी करणे, म्हणजेच संघ-भाजपाचा परस्पर नायनाट होणे, हे फुले-आंबेडकरी सूत्र तुम्ही
सोयिस्करपणे विसरले आहात. ओबीसींची स्वतंत्र राजकीय आघाडी उभी राहीली तर भाजपाला
धोका होईल, त्यामुळे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आम्हा ओबीसी नेत्यांना मदत करू शकत
नाहीत, हे आम्ही समजू शकतो. त्याबद्दल आम्ही त्यांना दोष देणार नाहीत. बाळासाहेब
किमान दलित राजकारणाची भक्कम उभारणी करीत आहेत, त्याबद्दल आम्ही प्रचंड आनंदी
आहोत. आनंद यासाठी की, दलितांची भक्कम अशी राजकीय उभारणी यशस्वी झाली,
तर त्यांचे अनुकरण करून आमचे ओबीसीही आपले स्वतःचे राजकारण उभे करतील, ही आमची
रास्त अपेक्षा आहे.
ज्यावेळी उत्तर प्रदेशात कांशिरामजी संघ-भाजपाची मदत घेऊन कॉंग्रेसला खतम करीत
होते, त्याचवेळेस मुलायम-लालूजी ओबीसींचे स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करून
भाजपाला खतम करण्याचे काम करीत होते. उशिरा का होईना, हेच काम आता आपल्याला
महाराष्ट्रात करायचे आहे. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर जर भाजपची मदत घेऊन कॉंग्रेस खतम करत असतील तर,
त्यांना शूभेच्छा देऊन आपण बाकीच्यांनीही संघ-भाजपाला खतम करण्याचे काम सुरू करू
या! संघ-भाजपाला खतम करणे फार सोपे आहे. आम्ही हे काम खूप आधीपासुनच सुरू केले
आहे. भाजपाची वोटबँक ना दलित आहे ना मुसलमान! भाजपाची एकमेव निर्णायक वोटबँक आहे
फक्त ओबीसी! या ओबीसींचे ‘ओबीसी’ म्हणून स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले,
की संघ-भाजपा खतम’ होण्याची प्रक्रिया सुरू होते. ओबीसी हे संघ-भाजपाचे केवळ मतदार
नाहीत, तर ते संघाच्या सांस्कृतिक दहशतवादाचे सैनिकही आहेत. अशा ओबीसींना आम्ही
सामाजिक व सांस्कृतिक ‘भान’ देण्याचे काम गेल्या 35 वर्षांपासून करीत आहोत. आणी
आता या ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष निर्माण करून संघ-भाजपाचा राजकीय आधारच
काढून घेत आहोत. आझाद बहुजन पक्षाच्या निवडणूक चिन्हावर (रोड रोलर) आम्ही ओबीसी
म्हणून 2019ची लोकसभा निवडणूक लढत आहोत. सर्व दलित पक्ष-संघटना व बामसेफ निर्मित
सर्व राजकीय पक्षांनी आमच्या ओबीसी उमेदवारांना उघडपणे पाठींबा देऊन निवडून
आणण्यास मदत करा. आमची ओबीसी राजकीय आघाडी तुमच्या उमेदवारांना पाठींबा देईल.
चला तर लागू या कामाला, एकमेकांचे कपडे फाडून भांडण करीत बसण्यापेक्षा 2019 ची
निवडणूक एक दिलाने लढू या व 2019च्या एकाच निवडणूकीत कॉंग्रेसकट भाजपाचेही ‘ब्राह्मण-क्षत्रिय’
राजकारण खतम करू या! तरच खर्या अर्थाने एसस्सी-एस्टी-ओबीसींचे बळीराष्ट्र निर्माण
होईल.
जयभीम-जयजोती, सत्य की जय हो!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
ईमेल- s.deore2012@gmail.com


No comments:
Post a Comment