http://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, March 5, 2019

60 BahujanNama Lokmanthan 3March19


साठावी खेप ......!     ( दै. लोकमंथन, रविवार  3 मार्च 2019 च्या अंकात प्रसिद्ध)
 बहुजननामा-60    
ओबीसी आरक्षण बचावासाठी राजीनामा आंदोलन सुरू!
ओबीसींनो..... !   
-1-
ओबीसी आरक्षण बचावासाठी 15 नोव्होंबरपासून सुरू असलेले आंदोलन 30 नोव्हेंबर पर्यंत पहिल्या पर्वात होते. 29 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षणाचे विधेयक विधानभवनात एक मताने दादागिरी करून मंजूर झाले आणी 30 नोव्हेंबरला राज्यपालाने त्यावर सही करून त्याला कायद्याचे स्वरूप दिले. वास्तविक राज्यपालाने हे विधेयक (सही न करता) सरकारकडे परत पाठविले पाहिजे होते. तशी निवेदने आम्ही वेळोवेळी प्रकाशित केलेली होती व नंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून भाजपा सरकारच्या ओबीसी-दलित विरोधी काळ्या कृत्यांची माहितीही दिली होती. ओबीसी दलित व आदिवासींना देशोधडीला लावणार्‍या या सरकारला ताबडतोब बरखास्त करावे, अशी विनंतीही आम्ही राज्यपालांना केली होती.
या पहिल्या पर्वात आम्ही ओबीसी आरक्षण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तो
आम्ही बहुजननामाच्या ‘चार थरार’ भागात विस्ताराने लिहीलेला आहे. हे पहिल्या पर्वाचे आंदोलन आम्ही केले नसते तर निश्चितच मराठा जातीला ओबीसी कॅटिगिरीच्या 19 व 27 टक्के आरक्षणाच्या यादीत समाविष्ट केले गेले असते. मात्र आंदोलनाच्या पहिल्या पर्वात आम्ही ब्राह्मण-क्षत्रिय युतीच्या या सरकारचे षडयंत्र आम्ही हाणून पाडले. भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेचेचे हे संयुक्त सरकार आहे हे यावरून सिद्ध झालेले आहे. आमच्या प्रयत्नांमुळे आजचे मरण उद्यावर ढकलले गेले एव्हढेच आमचे यश म्हणायचे. जर 29 नोव्हेंबर 2018 च्या आझाद मैदानावरील आक्रोश धरणे आंदोलनात किमान 10 हजार ओबीसी उपस्थित राहिले असते तर निश्चितच ओबीसींच्या धाकाने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झालेच नसते. परंतू ओबीसीतील समस्त प्रस्थापित नेते, आमदार, मंत्री विचारवंत व बुद्धिमानांनी लढाई सुरू होण्याआधीच शरणागती पत्करली व आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. अशा सर्व जीवघेण्या संकटातून वाट काढीत आम्ही आपला ओबीसी आरक्षणाचा लढा आजही सुरू ठेवला आहे. आम्ही अशा लोकांची लढाई लढत आहोत की जे शरिराने जीवंत आहेत, मात्र मनाने पुरते मेलेले आहेत. स्वाभिमानशून्य! हे मी सर्वसामान्य ओबीसींबद्दल नाही म्हणत, ओबीसींमधील प्राध्यापक, डॉक्टर, वकील, सोकॉल्ड ओबीसी नेते, आमदार-खासदार व बुद्धीमान विचारवंत यांच्याबद्दल म्हणत आहे. या लोकांची निसर्गतःच जबाबदारी आहे की, त्यांनी आपल्या लोकांच्या हितासाठी आपापल्या परीने मैदानात उतरले पाहिजे. पण हे लोक आपली ऐतिहासिक गद्दारीची भुमिका बदलावयाला तयार नाहीत. याच लोकांच्या पूर्वजांनी तात्यासाहेब महात्मा फुले यांना घरातून व माळी वस्तीतून हाकलून बाहेर काढले होते. फरक एवढाच आहे की, त्यावेळचे ते पूर्वज अज्ञानी होते व आजचे त्यांचे हे वारसदार तात्यासाहेबांच्या चळवळीचा भरपूर फायदा घेऊन शिकले-सवरलेले व आर्थिकदृष्ट्या टम्म फुगलेले आहेत. माळी प्राध्यापकांच्या एका व्हाट्सप गृपने मला गृपमधून बाहेर काढले, या वरून हेच सिद्ध होते की, हे माळी आपला ऐतिहासिक ‘गद्दारीचा’ वारसा सोडायला तयार नाहीत.
-2-
दुसर्‍या पर्वात न्यायालयीन लढाईचा टप्पा सुरू झाला. माननीय ऍड. गुणरत्न सदावर्ते, मराठा समाजातील खरीखुरी जीजाऊची कन्या एड. जयश्री पाटील, पुण्याचे मृणाल ढोले पाटील. मंगेश ससाणे, औरंगाबादचे ऍड. आंधळे, माननीय ऍडव्हकेट सतिश तळेकर, एड. संचेती व संजित शुक्ला यासारखे दिग्गज व जिगरबाज योद्धे ओबीसी आरक्षणाची न्यायालयीन लढाई आजही जीवाची बाजी लावून लढत आहेत. त्यांना समस्त न्यायप्रिय जनतेकडून क्रांतीकारी सलाम!
तिसर्‍या पर्वात 3 फेब्रुवारी रोजी मुंबईत एल्गार मोर्चा काढण्याचे ठरले. त्याच्या तयारीसाठी पूर्ण महाराष्ट्रात जनजागरण यात्रा काढण्याचेही ठरले. दरम्यान माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून माननीय प्रकाश आण्णा शेंडगे यांना संपर्क केला व चर्चा करण्यासाठी भेटण्याची ईच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी प्रकाश आण्णांचे दररोजचे मिटींग-स्थळ असलेल्या मुंबईच्या सुप्रसिद्ध नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या वतीने प्रकाश आण्णांसह बालाजी शिंदे, अरूण खरमाटे, चंद्रकांत बावकर, तांडेल हे उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या बैठकीतील चर्चेचा वृतांत आज विस्ताराने सांगणे ठीक होणार नाही. म्हणून आज सारांशावरच भागवतो. सारांश असा की, ओबीसींच्या मोर्च्याची तारीख 3 फेब्रुवारी ऐवजी 25 फेब्रुवारी करावी, कारण हा दिवस अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. ओबीसींचा मोर्चा हा ‘ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखालीच निघेल व या मोर्च्याला माननीय बाळासाहेब प्रकाश आबेडकरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे. असा प्रस्ताव खुद्द बाळासाहेबांनीच मांडला व तो सर्वांनी सहर्ष एकमताने मान्यही केला.
त्यानंतर ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समितीची राज्यस्तरीय जनजागर यात्रा सुरू झाली. 27 जानेवारी 2019 पासून कोल्हापूर येथून राजर्षी शाहू छत्रपतींना मानवंदना देऊन ही यात्रा सुरू झाली. प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींच्या बैठका, पत्रकार परिषदा, जाहीर सभा घेण्यात आल्यात. 25 फेब्रुवारीच्या नियोजित ओबीसी मोर्च्याची धास्ती सत्ताधारी पक्षांनी घेतली. कारण ओबीसी वोटबँक तर त्यांची हक्काची वोटबँक! आर.एस.एस.-भाजपला दलित व मुस्लीम मतदान करीत नाहीत, त्यामुळे ही वोटबँक परस्पर कोणी घेऊन जात असेल तर त्यात आरएसएस-भाजपाचा फायदाच आहे. मात्र हक्काची ओबीसी वोटबँक जर कुणी भाजपापासून तोडत असेल तर ते आरएसएस-भाजपा कधीच सहन करू शकत नाही. म्हणून भाजपा-आर.एस.एस. च्या वेगवेगळ्या वींग्ज कामाला लागल्या. आरएसएस-भाजपाने आपल्या अनेक विंग्ज (सेल) निर्माण करून ठेवलेले आहेत. त्यात दलित विंग, ओबीसी विंग, मुस्लीम विंग, फुले-आंबेडकरी राजकीय वींग, सामाजिक वींग वगैरे. या वींग्ज आरएसएस-भाजपासाठी काम करतात.
आरएसएस-भाजपाच्या या वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय विंग्जचे प्रमुख आमच्या ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समितीच्या नेत्यांना फोन करून तोड-फोडीचे राजकारण करू लागल्या. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्वतःच्याच बॅनरखाली ओबीसी मेळावे जाहीर केलेत. आमच्या ओबीसी एल्गार मोर्च्याला अपशकून करण्यासाठी वेगवेगळी षडयंत्रे करू लागलीत. राणीच्या बागेपासून मोर्चा निघणार होता, गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मोर्च्याची परवानगी रद्द केली. त्याच दिवशी आझाद मैदानावर तीन वेगवेगळी आंदोलने सुरू होती. त्या लहान-लहान आंदोलनाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली, मात्र 52 टक्के ओबीसींच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली. मात्र तरीही या सगळ्या संकटांवर मात करून 25 फेब्रुवारीचा एल्गार आम्ही यशस्वी केला. हा एल्गार मोर्चा यशस्वी झाला, त्याचा सर्वात मोठा पुरावा हा की, मराठा-ब्राह्मण मालक असलेल्या चारही पक्षांचे निरोप आलेत. या पक्षांचे निरोप होते की, आमचे नेते जाहीर सभेत येऊन भाषण करू इच्छितात. त्यात राष्ट्रवादीच्या एका दिग्गज नेत्याची आम्ही कशी फजिती केली, ते नंतर कधीतरी सांगेन! आझाद मैदानवरील या ओबीसींच्या एल्गार महासभेला माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे कबूल केले होते, मात्र ते आलेच नाहीत.
-3-
ओबीसींच्या या एल्गार महासभेने काही ऐतिहासिक ठसे उमटविले आहेत, जे मी माझ्या भाषणातून स्पष्टपणे मांडलेत.
1)  आतापर्यंत ओबीसींनी अनेक वेळा मोठ्या संख्येने गर्दी करून कार्यक्रम यशस्वी केलेत. मात्र ही गर्दी ते केवळ आपल्या जातीच्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करीत होते. आज 25 फोब्रुवारीला जमलेले हे हजारो ओबीसी केवळ ओबीसी हितासाठी एकत्र आलेले आहेत.
2)  आजवर ओबीसींना कोणत्या तरी मराठा-ब्राह्मणवादी पक्षाच्या खुट्याला बांधण्यासाठी गोळा केले जात होते. तेली, माळी, धनगर वगैरे जातीचे नेते स्वतःला ओबीसी नेते म्हणवत असले तरी, त्या नेत्यांचे मालक एकतर मराठा असतात किंवा ब्राह्मण असतात. आज 25 फेब्रुवारीला पहिल्यांदाच अशा ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण जमलेलो आहोत, की ज्यांचे मालक ओबीसी जनताच आहे, कुणी ब्राह्मण वा मराठा नाही.
3)  आज या एल्गार मोर्च्याच्या जाहीर सभेत स्टेजवर विविध जातींचे किमान 50 नेते उपस्थित आहेत. आज जमलेले ओबीसी कोण्या एका व्यक्तीला ‘‘भावनिक किंवा वांशिक नेता’’ बनविण्यासाठी जमलेले नाहीत तर, 350 ओबीसी जातींचं फेडरल नेतृत्व निर्माण करण्यासाठी आज हे ओबीसी जमलेले आहेत.
आणी माझ्या भाषणात सर्वात शेवटी या सर्व ओबीसी नेत्यांना मी आवाहन केले की, ही सभा संपल्यानंतर स्टेजवरचा एखादा नेता आपल्या मराठा मालकाला मुजरा घालण्यासाठी जाईल, कुणी दुसरा नेता आपल्या ब्राह्मण मालकाचे पाय धुण्यासाठी जाईल, तर ती सर्वात मोठी धोकेबाजी या ओबीसी जनतेच्यासोबत होईल. म्हणून 25 फेब्रुवारीच्या या ऐतिहासिक एल्गार सभेनंतर एक आगळं-वेगळं आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत. या आंदोलनाचं नाव आहे- ‘‘राजीनामा आंदोलन’’
आमचे ओबीसी नेते अनेक पक्षात काम करतात. बहुतेक या सर्व पक्षांचे मालक एकतर ब्राह्मण वा मराठा असतात. फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने किंवा दलित-ओबीसींच्या नावाने राजकारण करणार्‍या पक्षांचेही मालक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ब्राह्मण-मराठाच असतात. तर अशा ब्राह्मण-मराठा मालक असलेल्या पक्षात काम करणार्‍या प्रत्येक ओबीसी नेत्याला त्या भागातील ओबीसी कार्यकर्त्यांनी भेटले पाहिजे व नम्रपणे सांगीतले पाहिजे की, आता ‘‘ओबीसी जनताच मालक’’ असलेला पक्ष स्थापन होत आहे, या पक्षात आपण काम करा व त्यासाठी ब्राह्मण-मराठा मालक असलेल्या पक्षाचा राजीनामा द्या! या राजीनामा आंदोलनाचे उद्घाटन आमचे नेते माननीय प्रकाश आण्णा शेंडगे यांनी स्वतःचा राजीनाम देऊन केले. त्यांनी 26 फेब्रवारी रोजी आझाद मैदानावरील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार परीषद घेऊन आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा देतांना त्यांनी स्पष्टपणे भुमिका मांडली की, (आज उपलब्ध असलेल्या) कोणत्याही पक्षाच्या चौकटीत राहून मला ओबीसी आरक्षण वाचविण्याचे आंदोलन करणे अशक्य झालेले आहे. म्हणून मी राजीनामा देत आहे.
3 मार्च ला पुण्यात चौथ्या पर्वाची सुरूवात होत आहे. या व्यापक ओबीसी बैठकीत आता पुढील महत्वाच्या टप्प्याची सुरुवात होत आहे. राजकीय भुमिका ठरविणे व त्याप्रमाणे लोकसभा विधानसभा निवडणूकांना सामोरे जाणे. या राजकीय भुमिकेचे विश्लेषण पुढील बहुजननाम्यात सादर करीन. तो पर्यंत जयजोती, जयभीम .... सत्य की जय हो!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com



No comments:

Post a Comment