बासष्ठावी खेप ......! ( दै.
लोकमंथन, रविवार 17 मार्च 2019 च्या अंकात प्रसिद्ध)
बहुजननामा-62
मुसलमान गेला, इंग्रज गेला,
आता काय चीनची वाट पाहात आहात काय ?
आज फेसबुकवर एका पोस्टने लक्ष वेधून घेतले. आदिवासी समाजातील एक मान्यवर विचारवंत व लेखक
प्रा. डॉ. माधव सरकुंडे यांच्या फेसबुक वॉलवर ती वाचायला मिळाली. अर्थात त्यांचा
हा स्वतःचा अनुभव होता व त्याबद्दल त्यांनी लिहीले आहे. आदिवासी विषयावर कुणीतरी
एक संशोधक यवतमाळात आले आहेत व तुमच्याशी ते चर्चा करू ईच्छितात, अशा आशयाचा फोन
त्यांना आला. फोनवर बोलणार्याचे म्हणणे हे होते की, ‘संशोधकाने आदिवासींवर
पी.एच.डी केली असून त्याला आदिवासींबद्दल फार तळमळ आहे.’ प्रा. डॉ. माधवजी हे चौकस
असल्यामुळे त्यांनी फोनवरच अधिक चौकशी केली. त्यात त्यांना संशोधकाच्या मनातील
गुपित कळाले. संशोधकाचे म्हणणे असे होते की, ‘आदिवासी समाजावर डॉ. आंबेडकरांनी फार
अन्याय केला आहे. आदिवासींना 13 टक्के आरक्षण मिळणार होते परंतू आंबेडकरांनी 7.5
टक्क्याचा तुकडा त्यांच्यासमोर टाकला.’ या तथाकथित संशोधकाचा हेतू स्पष्ट होता.
आदिवासींमधील कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत, नेते यांच्या मनात डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या बद्दल वीष पेरायचे व 13 टक्के आरक्षणासाठी संघर्ष करण्याची चिथावणी
द्यायची.
माधवजींशी चर्चा केली असता कळाले की, तो आर.एस.एस. (संघ) मध्ये काम करणारा
आहे. आता हे जे साडेसात टक्के आरक्षण आहे ते लोकसंख्येप्रमाणे आहे. दलितांचे 15
टक्के आरक्षण हे सुद्धा लोकसंख्येप्रमाणेच आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी दलितांना
जास्त दिले व आदिवासींना जाणीवपूर्वक कमी दिले, असे कुणीच म्हूण शकत नाही.
ओबीसींना आरक्षण देतांना लोकसंख्येच्या निम्म्याप्रमाणात द्या, असे बाबासाहेबांनी
कोठेच काही लिहून वा बोलून ठेवलेले नाही. ओबीसींनाही त्यांच्या लोकसंख्येच्या
प्रमाणातच आरक्षण दिले पाहिजे, हे बाबासाहेबांच्या एकूण धोरणावरून स्पष्ट होते.
परंतू आमचेच काही संघ-सहवासात राहून बिघडलेले लोक बाबासाहेबांचा संदर्भ देऊन असे
काही-बाहि बकवास करीत असतात व जाती-जातीतील संघर्षात तेल टाकत असतात.
आदिवासी जातीत डॉ. माधव सरकुंडेंसारखे विचारवंत व कार्यकर्ते आहेत, त्यामुळे
त्यांनी या तथाकथित संशोधकाची चांगलीच हजेरी घेतली व त्याला चर्चेतच जेरबंद केलं.
अन्यथा बहुजनांमध्ये बिनडोक लोकांची कमतरता नाही. अशाच प्रकारचे फोन मराठा, जाट,
पटेल, धनगर, नाभिक, धोबी, तेली जातीतील विचारवंतांना-कार्यकर्त्यांना केले जातात.
हे विचारवंत व कार्यकर्ते लगेच कामाला लागतात. जातीसाठी आरक्षण मागीतले की,
वर्तमानपत्रात, टिव्ही चॅनलवर लगेच प्रसिद्धी मिळते. कॅटिगिरीच्या मिटिंगला कधीही
हजर न राहणारे लोक जातीच्या सभांना, मोर्च्यांना गर्दी करतात. त्यामुळे अशा बिनडोक विचारवंतांना वा
कार्यकर्त्यांना ‘नेता’ म्हणून मान्यता मिळते. जातीसाठी लोक माती खातात व अशा
नेत्यांना भरपूर पैसेही देतात, साधने देतात. आज प्रत्येक जात आरक्षण मागते आहे.
दुसर्या जातीच्या छातडावर पाय देऊन क्रूर व हिंसक बनून रस्त्यावर उतरते आहे. आणी
अशा संघ-प्रणित आंदोलनांना तथाकथित फुले-आंबेडकरी बुद्धिमान लोक पाठींबा देत आहेत.
फुलेआंबेडकरी चळवळ अशी यु-टर्न घेऊन प्रतिक्रांतीच्या रस्त्यावर कशी आली? याचं
सर्वात मोठं कारण हे आहे कि, बहुजन समाजात अजूनही फुले-आंबेडकरी विचार रुजले
नाहीत. फुले आंबेडकरांना मानने वेगळे, वाचणे वेगळे, ते समजून वेगळे आणी ते रूजणे
वेगळे. बी रुजले तरच त्यातून पाने, फुले, फळे अशी नवसृष्टी साकारते. नवेनवे विचार,
बदलत्या संदर्भात बदलते डावपेंच सुचतात. बौद्ध धम्माने वर्णव्यवस्थेविरूद्ध
लढण्यासाठी बहुजनांमधून ज्यापद्धतीने ‘सैनिक व सेनापती’ तयार केले होते, ते आपण
सर्व विसरलो आहोत. आणी म्हणून जातीअंताची लढाई आपण सुरू होण्याआधीच हारतो.
वर्णव्यवस्थेविरूद्धची लढाई आपण बहुजनांनी स्वतःच्या पायावर लढली व जिंकली. परंतू
जातीअंताची लढाई?
मुसलमान आलेत, आणी त्यांनी तुम्हाला त्यांच्या सैन्यात सेनापती, सरदार बनवीले,
त्यातून तुम्हाला लढण्याची प्रेरणा मिळाली. इंग्रज आलेत आणी त्यांनी तुम्हाला
लोकशाही शिकवीली, त्यातून लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच फुले-आंबेडकरांसारखे
नेतृत्व निर्माण झाले. आज गेल्या 70 वर्षांपासून भारतावर ना मुसलमानांचे वर्चस्व
आहे, ना इंग्रजांचे! त्यामुळे तुम्हाला जातीव्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी ‘हिम्मत’
देणारा कुणीही ‘तटस्थ कॅटॅलिस्ट’ (परकीय) घटक भारतात राहिलेला नाही. बहुजन म्हणून
तुम्ही जातीअंताची लढाई स्वबळावर लढूच शकत नाही. कारण तुम्हाला मागून ‘पुश’ करणारा
कॅटॅलिस्ट सारखा केमिकल घटक आवश्यक असतो. आज हे काम कॅटॅलिस्ट (?) म्हणून मराठा
(क्षत्रिय) व ब्राह्मण करीत आहेत.
बहुजन समाजातील नेतृत्व निर्मितीचे काम आज ब्राह्मण व मराठा करीत आहेत, याचे
स्पष्टीकरण करण्यासाठी अधिक विवेचन करण्याची गरज नाही, मात्र तरीही ‘तोंडात घास
दिला तरच खाणार’ अशा प्रवृत्तीच्या लोकांना प्रत्येक गोष्ट खोलून समजावून सांगावी
लागते. आज प्रत्येक जातीत जे नेते निर्माण झालेले आहेत. त्यांचं मुळ काय आहे?
माळी, तेली वगैरे जातींनी आपआपल्या जातींची मिटींग घेऊन ठराव मांडून आपला नेता
निवडला आहे काय? नाही. शरद पवार ज्या माळ्याला आमदारकीचं वा खासदारकीचं तिकीट देईल
तो माणूस आपोआपच त्या जातीचा नेता बनतो. ब्राह्मणांकडून हे काम बाळ ठाकरे, प्रमोद
महाजन वगैरे मंडळी करीत होते, आता फडणवीस, गडकरी करतात. असे ब्राह्मण-मराठानिर्मित
बहुजन नेते आपआपल्या जातीला कुंपणात (वाडग्यात) बांधून ठेवतात व तिचा वोटबँक
म्हणून वापर करतात. सगळी जात मेंढरासारखी त्या नेत्याच्यामागे धावते.
बहुजनांमधल्या बहुतेक सर्वच जातींच्या डोक्यात काही गृहितके भरून ठेवलेली
आहेत. आपला माणूस (अर्थात जातीतला) मोठा झाला पाहिजे. तो ‘एकच’ मोठा झाला की
बाकीच्यांची छाती फुगुन बाहेर येते. नेता हा आपल्या भागातील जनतेचे हित करण्यासाठी
निवडायचा असतो, ही लोकशाही संकल्पना आजही बहुजन जातीला माहीत नाही. आपल्या जातीत
कोणी साहित्यिक, विचारवंत, प्रामाणिक कार्यकर्ता असतो, त्याला ते तुच्छतेने पाहात
असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे राजाश्रय मिळालेली माणसं यांच्यासाठी ‘मोठी’
माणसं! आता पुर्वीचे राजाश्रय देणारे राजे मुसलमान, इंग्रज होते, ते खरोखरच
‘कॅटॅलिस्ट’ होते म्हणून त्यांनी फुले आंबेडकरांसारखे नेते निर्माण होण्यात मदत
केली व बाजूला झालेत. त्यांनी कधीही फुलेआंबेडकरांवर वैचारिक गुलामगिरी लादली
नाही. मुसलमान, इंग्रज राज्यकर्त्यांनी नेते निर्मितीच्या प्रक्रियेत एवढच पाहिलं
की ही माणसं प्रामाणिक व वैचारिक लेव्हलची आहेत. म्हणूनच मुसलमानांच्या काळात
बंडखोर कवींना संताचा दर्जा मिळाला व इंग्रजांच्या काळात फुले आंबेडकरांना ‘महात्मा,
घटनाकार’ म्हणून मान्यता मिळाली. पेशवाइचं राज्य असतं तर या सर्व
संत-महात्मा-घटनाकारांना तोंडाला मडकं व गांडीला झाडू बांधुन फिरावं लागलं असतं. म्हणूनच
तात्यासाहेब महात्मा फुले यांनी इंग्रजांना ‘मायबाप सरकार’ म्हटले.
आज आपल्या जातीतील एखाद्या व्यक्तीला राजाश्रय देऊन ‘नेता’ बनविले जाते. यात
आजचे राजे क्षत्रिय-ब्राह्मण असल्याने ते उघडपणे जातीव्यवस्था जीवंत ठेवण्यासाठी व
ती अधिक पक्की होण्यासाठी सत्ता राबवितात. या सत्तेत ते अशाच बहुजन नेत्यांना सामावून
घेतात जे जातीव्यवस्था पक्की करण्यात मदत करतील. त्यामुळे ते कनिष्ठ जातीतल्या
साहित्यिक, विचारवंतांना असा राजाश्रय कधिच देत नाहीत की, ज्यामुळे ते
फुलेआंबेडकरांसारखे महापुरूष होऊन जातीअंताचे काम करतील. ब्राह्मण-मराठ्यांनी
जन्माला घातलेले ‘ओबीसी आमदार’ व ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान केलं. सत्तेत बसलेले ब्राह्मण-मराठा नेते बालाजी शिंदे, अरूण खरमाटे, श्रावण देवरे वगैरेंना कधीच आमदार बनू देणार
नाहीत, कारण ते जर आमदार असते तर 29 नोव्हेंबर 2019 रोजी ‘ओबीसींचे आरक्षण नष्ट
करणारा मराठा आरक्षणाचा कायदा’ विधानसभेत मंजूर झालाच नसता.
ब्राह्मण क्षत्रिय सत्ताधारी कनिष्ठ जातितल्या अशाच माणसाला राजाश्रय
देऊन ‘नेता’ बनवितात की जो बिनडोक आहे, गुंड-भ्रष्ट आहे. असा माणुस कितीही वरच्या पदावर
गेला तरी तो केवळ ब्राह्मण मराठ्यांचा ‘गुलाम’ म्हणूनच राहतो. जर तो ‘महापुरूष’ बनण्याचा प्रयत्न
करू लागला तर त्याला मंत्रीपद देऊन दिल्लीत बोलाविले जाते व गाडीचा अपघात करून
त्याला ठार मारले जाते. किंवा भ्रष्टाचाराचा आरोप करून जेलमध्ये टाकले जाते. अशा
पद्धतीने कनिष्ठ जातीचं नेतृत्व त्रासदायक ठरण्याच्या आधीच कापून फेकलं जातं. एक
गुलाम नेता संपला झाला की दुसरा त्याची जागा घेण्यासाठी रांगेत उभा असतोच. जशी खाटकाकडे
बोकडांची रांग असते, असे अनेक तेली-माळी जातीचे बोकड ब्राह्मण-क्षत्रिय सत्ताधार्यांच्या
पायाशी पडलेले असतात. ओबीसींच्या ‘ढाण्या’ वाघचे अवतार-कार्य संपले की त्या जातीतले ‘कोल्हे’ रांगेत उभे असतातच, गुलामी
करण्यासाठी.
बौद्धकाळातील वर्णव्यवस्थाअंताची लढाई आपण स्वबळावर लढली, तशी जातीअंताची लढाई आपण स्वबळावर कधीच लढू शकणार
नाहीत, हे सत्य आता आपण स्वीकारले पाहिजे. आणी जर हे सत्य स्वीकारायचे नसेल
तर वेगळा विचार, वेगळे तत्वज्ञान, वेगळे डावपेंच आणी ठोस असा वेगळा कृतीकार्यक्रम
ठरवून कार्यकर्ता, संघटन व पक्ष उभा करण्याची तयारी हवी. अशी तयारी कुठेही
दृष्टीपथात दिसत नाही, जी काही दिसते आहे ती एकतर ब्राह्मणांच्या (भाजपा) कंपूच्या
हिताची किंवा मराठा (कॉंग्रेस) च्या हिताची! आपलं स्वतःच्या हिताची कुठेही तयारी
नाही.
काही वेगळं करण्याची हिम्मत असेल तर बोला. अन्यथा मुसलमान गेला, इंग्रज गेला,
आता वाट पाहात बसा ‘चीन’ येण्याची! तोच तुम्हाला जातीच्या नरकातून काढण्यासाठी
कॅटॅलिस्ट म्हणून काम करेल, असे जर कोणाला वाटत असेल तर, त्याला माझा नाईलाज आहे!.
मागच्या बाजूनं ‘पूश’ ज्यांना
लागतो, त्यांनी चीन येण्याची वाट पाहात राहावी, तो पर्यंत त्यांना कडक जयजोती जयभीम,
सत्य की जय हो!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
Lokmanthan Link…

No comments:
Post a Comment