ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष
समितीचे पत्रक
कॉंग्रेस-राष्ट्रवादी व
भाजप-सेना या पक्षांतर्फे
आपला ‘बाप’ उभा असेल तरी त्याला
मतदान करू नका!
महासचिव प्रा. श्रावण देवरे यांचे ओबीसींना आवाहन!
गेल्या 70 वर्षांपासून राज्यसत्तेचा यथेच्छ उपभोग घेणार्या व सरंजामदार-जमिनदार
असलेल्या मराठा जातीला ओबीसींचे आरक्षण बहाल करणार्या भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी या चार पक्षांच्या तिकीटावर आपला स्वतःचा जन्मदाता ‘बाप’ जरी निवडणूकीला उभा असेल तरी 85
टक्के मागास मतदारांनी वाट चुकलेल्या आपल्या बापाला मतदान करू नये, असे आवाहन ‘‘ओबीसी
व्हीजेएनटी संघर्ष समितीचे’’ महासचिव प्रा.
श्रावण देवरे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षांपासून राज्यकर्त्या असलेल्या मराठा जातीला ‘ओबीसी’
म्हणून आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. 52 टक्के
ओबीसींच्या निर्णायक मतांवर निवडून येणार्या भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी या
चारही पक्षांनी संगनमताने षडयंत्र करून मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण दिले आहे. धोबी, लोहार,
सुतार, नाभिक, कुंभार, अन्सारी, पिंजारी यासारख्या बलुतेदार-विश्वकर्मा जाती व
वंजारा, वडार, पाथरवट, धनगर यासारख्या भटक्या जमातींना म्हणजे खर्या ओबीसींना
देशोधडीला लावण्याचे काम केले आहे.
म्हणून या पत्रकाद्वारे ‘‘ओबीसी
व्हीजेएनटी संघर्ष समिती’’ लोकसभा-2019 च्या निवडणूकांबाबत भुमिका जाहीर करीत
आहे. 52 टक्के ओबीसींनी या निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत भाजप-सेना व
कॉंग्रेस-राष्ट्रवादी या चार पक्षांच्या उमेदवारांना मतदान करू नये. अपवाद
फक्त दोन आहेत. एक नाना पटोले (नागपूर मतदारसंघ) व दुसरे किशोर गजभिये(रामटेक
मतदारसंघ)! हे दोन्ही उमेदवार जरी कॉंग्रेसच्या तिकीटावर उभे असले तरी हे उमेदवार अगदी
सुरूवातीपासून ओबीसी चळवळीला मदत करीत आहेत. त्यामुळे नागपूर व रामटेक
मतदारसंघातील ओबीसींना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी ओबीसी चळवळीच्या व्यापक
हितासाठी नाना पटोले व किशोर गजभिये यांना मतदान करून निवडून आणावे.
बाकी इतर मतदारसंघात फुले शाहु आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मतदान करावे. त्यात
प्राधान्य वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना द्यावे. ज्या मतदारसंघात वंचित
बहुजन आघाडीचा उमेदवार खूपच कमजोर असेल तर तेथे बहुजन समाज पक्ष (BSP), कम्युनिस्ट पक्ष, जनाधार पार्टी व बामसेफनिर्मित पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (PPI), बहुजन मुक्ती पार्टी (BMP), आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया (API) या पक्षांच्या कोणत्याही एका
उमेदवाराचे नाव निश्चित करावे व त्याला मतदान करून निवडून आणावे.
भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी या चारही पक्षांतर्फे आपला सख्खा भाऊ किंवा
सख्खा बाप जरी निवडणूकीला उभा असेल तरी त्यांना मतदान करू नका. कारण या पक्षातर्फे
निवडणूक लढविणार्या उमेदवारांचे मालक एकतर मराठा आहेत किंवा ब्राह्मण आहेत. 29
नोव्हेंबर 2018 रोजी सर्वपक्षातील ओबीसी आमदारांनी आपल्या ‘‘मराठा वा ब्राह्मण’’ मालकांच्या आदेशाप्रमाणे मराठा
आरक्षण बीलाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे
आताही तुम्ही जर या चार पक्षांचे खासदार निवडून दिलेत तर ते उद्याच्या लोकसभेत
मांडल्या जाणार्या ‘जाट-पटेल-मराठा आरक्षण बीलाच्या’ बाजूनेच मतदान करतील.
29 नोव्हेंबर 2018 रोजी जे महाराष्ट्र विधानसभेत घडले, त्याचीच पुनरार्वृत्ती
उद्याच्या लोकसभेत हे सर्व खासदार करणार आहेत. राज्यातलं ओबीसी आरक्षण तर गेलेच
आहे. उद्या देश पाळीवरचं ओबीसी आरक्षण (27 टक्के) सुद्धा खतम होईल. या देशाचा 52
टक्के ओबीसी वाचवायचा असेल तर, कोणत्याही परिस्थितीत भाजप-सेना व
कॉंग्रेस-राष्ट्रवादी या चारही पक्षांना अजिबात मतदान करू नका.
2019 च्या लोकसभा निवडणूकीत प्राधान्याने वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा.
अपवाद मात्र दोनच आहेत. एक अनिल जाधव (पुणे मतदारसंघ) व दुसरे धनराज
वंजारी (वर्धा मतदारसंघ)! हे उमेदवार जरी वंचित बहुजन आघाडीचे असले तरी हे
दोन्ही उमेदवार उघडपणे संघ-भाजपशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे ओबीसींनी या दोन्ही उमेदवारांना
मतदान करू नये.
पत्रकात शेवटी कळकळीचे आवाहन करतो की, ही लोकसभा निवडणूक पुरोगामी चळवळीसाठी
निर्णायक ठरणार आहे. कोण उमेदवार निवडून येतो व कोणता पक्ष सत्तेवर येतो, हा
मुद्दाच नाही. आपल्या ओबीसींसमोर व दलित-आदिवासींसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा हा
आहे की, ‘आपण आपली स्वतःची स्वतंत्र ‘शक्ती’ सिद्ध करतो आहे की नाही.’ या निवडणूकीत दलित, आदिवासी व ओबीसी
कॅटेगिरींनी आपले अस्तित्व सिद्ध केले नाही तर, तुम्ही पुन्हा एकदा अखिल भारतीय
पेशवाईच्या मरणांतक मगरमिठीत चिरडले जाणार व तुमच्या पुढच्या अनेक पिढ्या
जीवघेण्या नरकात ढकलल्या जाणार!
प्रा. श्रावण देवरे
महासचिव,
ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समिती.
Mobile – 94227
88546
Email- deore.satyashodhak@gmail.com
No comments:
Post a Comment