बहुजननामा-86
शूद्र शरद
पवारसाहेब व श्रीमंत पेशवे फडणवीस! (भाग-1)
बहुजनांनो....
!
-1-
बहुजननामा वाचकांचे
आजही (3Sept19) असे काही
फोन आलेत की ज्यात चिंतातूरता ठासून भरलेली होती व कळकळ बेंबीच्या देठापासून येत होती. नॉनस्टॉप अर्धा तास बोलत असतांना एकाच मुद्द्यावर गाडी अडकत
होती. ‘‘आता कोणीतरी भक्कम
नेता निर्माण झाला पाहिजे. मजबूत संघटन झाले पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही.’’ असेच काहीतरी भरभरून बोलत होते.
मी त्यांना मध्येच थांबवीत एक प्रश्न विचारला की, ‘भक्कम नेता कुठून, आकाशातून
येईल काय?’ ते तेवढ्याच त्वरेने म्हणाले की, ‘‘आकाशातून
कशाला, जनतेतूनच येईल. जसे फुले, शाहू, आंबेडकर निर्माण झालेत... आता बहुजन जनता
अवतार कल्पना मानीत नाही.’’
यावर बरीच चर्चा
झाली. इंग्रजांच्या शेवटच्या 100 वर्षांच्या काळात फुले, शाहू, गांधी,
आंबेडकरांसारखे असंख्य महान-लहान नेते निर्माण झालेत. मात्र स्वातंत्र्याच्या 70
वर्षांच्या काळात एकही बहुजन-मान्य महान व भक्कम नेता का निर्माण झाला नाही?
त्याचं मूळ जातीव्यवस्थेच्या वैशष्ट्यात आहे. जातीव्यवस्थेमुळे आपले सर्वांचे
मेंदू इतके बधीर झाले आहेत की, साधा कॉमन सेन्सही राहीला नाही. आपलं भलं करू ईच्छिणार्याला
आपण नेता मानला पाहिजे, असा विचार चूकूनही त्यांच्या मनाला शिवत नाही. बहुतेक सर्वच
बहुजन जातींना सत्ताधार्यांच्या वा
राज्यकर्त्यांच्या गुलामीत
राहणेच आवडते. त्यामुळे आपल्याला अन्यायातून मुक्ती देणार्याला नेता मानणे, हा
त्यांचा जात-स्वभावच नाही. आता हे झालं मोघम.
फोनवरून मला काही उदाहरणे द्यावी लागलीत तेव्हा कुठे थोडंसं समोरच्यां डोक्यात
घुसलं.
मी पहिलं उदाहरण
दिलं तात्यासाहेब महात्मा फुलेंचं! बहुजन समाज तात्यासाहेबांचे विचार केव्हा व का
मानू लागलेत? त्यांनी मुलींची शाळा काढली म्हणून का? विधवा महिलांसाठी आश्रम काढले
म्हणून का? अजिबात नाही. जेव्हा राज्यकर्त्या इंग्रजांनी तात्यांच्या महान
कार्याचा गौरव करीत त्यांच्या खांद्यावर ‘शॉल’ टाकली, तेव्हा बहुजनातील लोकांना
कळले की, ‘‘अरे...! हा जोती तर
फारच मोठा माणूस आहे.’’ आणी
त्यानंतर ब्राह्मणही जोतीरावांना घाबरायला लागलेत व बहुजनांवरची ब्राह्मणी दहशतही त्यामुळे कमी झाली.
त्यानंतर त्यांच्याभोवती सर्वजातीय व सर्वधर्मीय ‘सज्जन’ माणसं जमा होऊ लागलीत.
त्या काळात बहुतेक सर्वच सामाजिक सुधारकांना व सामाजिक क्रांतीकारकांना इंग्रज
राज्यकर्त्यांनी ‘मान्यता’ व ‘संधी’ दिली. त्याच्या परिणामी सुधारणाही झाल्यात व
काही क्रांतिकारक बदलही झालेत. या सर्वांना ‘नेता, महापुरूष वा महात्मा’ म्हणून मान्यताही मिळाली.
-2-
स्वातंत्र्योत्तर
काळात फुले-शाहू-आंबेडकर-गांधींपेक्षा अनेक मोठी माणसं निर्माण झालीत, मात्र त्यांच्या
खांद्यावर मान्यतेची ‘शॉल’ टाकणारे राज्यकर्ते वा सत्ताधारी नसल्याने ते
बहुजनमान्य झाले नाहीत. स्वामी पेरियार, कर्मवीर दादासाहेब
गायकवाड, कर्पूरी ठाकूर, शहिद बाबू जगदेव प्रसाद कुशवाह, रामस्वरूप वर्मा,
त्यागमूर्ती चंदापूरी, कर्मवीर एड. जनार्दन पाटील, व्हि.पी. सिंग, लालू प्रसाद, लोहिया, कांशिराम अशी कितीतरी नांवे घेता
येतील. परंतू स्वातंत्र्योत्तर काळात उदारमतवादी परकीय राज्यकर्ते (मुस्लीम व
इंग्रज) नसल्यामुळे यापैकी एकही नेता महापुरूष वा महात्मा म्हणून जनमान्य होऊ शकला नाही. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचे सर्वंकष सत्ताधारी
ब्राह्मण झालेत. ब्राह्मण हे स्वतःच्या जातीतूनही ‘व्हॉल्टेयर’ निर्माण होऊ देत
नाहीत व इतर जातीत कुणी ‘महात्मा’ निर्माण झालाच असेल तर त्याचा इतिहास तोड-मोड करून विकृत बनवून त्याला
बदनाम केले जाते. एवढ्यावर भागत नसेल तर त्याला ‘प्रातःस्मरणीय’ बनवून
आपल्या छावणीत ओढून घेतले जाते. आणी सगळ्यात शेवटचा जालीम उपाय म्हणजे त्याला नंबर
देऊन ‘अवतार’ बनवणे. ‘महापुरूष तुमचा...पाया पडतो आमचा’! छत्रपती शिवराय हे
रामदासाच्या पायावर झुकलेले आहेत, असा फोटो असलेले कॅलेंडर आतापर्यंत निघत होते.
आणी हे कॅलेंडर मोठ्या अभिमानाने बहुजनांच्या
घरी भींतीवर लावले जात होते.
ब्राह्मणी
संस्कृतीचं एक मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ते स्वतः कुठेही युद्ध करीत नाहीत,
मैदानी संघर्षही करीत नाहीत. जेथे कुठे अशी युद्ध झाली असतील वा संघर्ष झाले असतील, त्याचा इतिहास लिहीण्याचे एकमेव काम ते करतात. ते मैदानात येऊन लढत नाहीत, ते लढतात इतिहासाच्या
पानांवर की जेथे त्यांना अडवणारा कोणीच बहुजन योद्धा नसतो. पुराण-इतिहासात जर
कोणी महाबली बळीराजा पराक्रमी होऊन गेला तर त्याचा इतिहास (पुराणातील
भाकडकथा) लिहीतांना ते एवढाच संदेश देतात
की. ‘‘तुमच्या महाबली बळीराजाला आम्ही फक्त तीन
लाथा घालून जमिनीत गाडलं. तुमच्या छत्रपती शिवरायांनी
तलवार गाजवून ‘स्वराज्य’ स्थापन केलं, मात्र त्यांचे ‘गुरू’ रामदास व कोंडदेव
होते, हे विसरू नका. आणी गुरूदक्षिणा म्हणून शिवाजी राजाने हे स्वराज्य
रामदासाच्या झोळीत टाकलं होतं.’’ पुराण
काळात व इतिहास काळात जेवढेही महापुरूष बहुजनातून निर्माण झालेत त्यांचे बाप
बदलणे, त्यांचा इतिहास विकृत करणे, त्यांना आपल्या छावणीत ओढून अवतार बनवणे व
आपल्या छावणीची भांडी घासायला लावणे, असे सर्व प्रकार ते करतात. ‘‘महापुरूष तुमचा, पाया पडतो आमचा!’’ अशी एक टॅगलाईन ब्राह्मणवाद्यांची आहे. यातून ते
एकच सिद्धांत बहुजनांवर बिंबवतात, तो सिद्धांत म्हणजे तुम्ही कितीही करा, काहीही
करा, शेवटी आम्ही तुमचे बाप आहोत, भुदेव आहोत आणी सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही या
देशाचे मालक आहोत, सर्वेसर्वा आहोत.
परंतू हे काही आपोआप
होत नाही. त्यासाठी सतत सतर्क राहावे लागते, मेंदू सतत तेज ठेवावा लागतो, डोळे
रात्रंदिन उघडे ठेवून ‘जागते’ राहावे लागते, आपले हात बांधून ठेवून बहुजनांच्या
हातांना कामे ‘वाटप’ करावी लागतात, आपण स्वतः एके ठिकाणी उभे राहून बहुजनांच्या
पायांना सतत ‘धावत’ ठेवावे लागतात. या बहुजनांना कुठल्याना कुठल्या
व्रत-वैकल्यात, विधी-कर्मकांडात, पुजा-पाठात, मंदिर-मठात, पोथ्या-पुराणात,
सण-उत्सवात, यात्रा-जत्रात ‘गुंतवून’ ठेवावे लागते. गुंतवून ठेवणे म्हणजे बारोही
मास-चोबीसो तास त्यांना गुंगीत ठेवणे. म्हणजे बहुजन जे उत्पादनाचे काम करतो,
ते धार्मिक गुंगीत असतांनाच करतो. म्हणजे शेतकरी आपल्या जमिनीला ‘सीता-माता’
म्हणूनच कसतो व उत्पादन काढतो. या शेतीला तो ‘औद्योगिक’ दर्जा कधीच देत नाही.
त्यामुळे ही शेती कधीच नफ्यात नसते, तोट्यातच असते आणी एक दिवस हा तोटा असह्य झाला
की, शेवटी तो आत्महत्त्या करून मोकळा होतो. ब्राह्मण-पुजारी, काजी, भिक्खु-भन्ते,
पादरी, जंगम अशा कोणत्यातरी मठाधिपतीने मान्यता दिल्याशिवाय यांचं कोणतंही
शुभ-अशुभ कार्य पार पडतच नाही. तुमचा धर्म-धम्म-पंथ कोणताही असो, ते तुम्हाला
ब्राह्मणी पाशातून सोडतच नाहीत, किंवा बहुजनाला त्यांच्या ब्राह्मणी पाशात राहूनच आपल्या
धर्म-धम्म-पंथाचे पालन करणे आवडते. बारोही मास-चोबिसो तास आपण ब्राह्मणी गुंगीतच!
या ब्राह्मणी
गुंगीचा एक परिणाम असा होतो की, आपण आपल्या शत्रूला आदर्श मानायला लागतो, त्याची
पुजा बांधायला लागतो, त्याचे पायावर लोटांगण घालायला लागतो. त्याला आपल्या घरी बोलावून दान-दक्षिणा दिल्याशिवाय चैनच पडत
नाही. जेव्हा आपण ब्राह्मणाचा पाया पडतो, तेव्हा आपण त्याला पुज्य, भुदेव म्हणून त्याचा पाया पडतो. परंतू आपण त्याचा
पाया पडत असतांना तो आपल्याला भक्त, अनुयायी, शिष्य
समजत नाही. तो आपल्याला शत्रूच समजतो. ‘शेवटी आपण
या बहुजनाला ‘शरण’ आणलेच, आणतच राहीले पाहिजे, आणखीन जास्तीत-जास्त झुकवत ठेवले
पाहिजे, त्यासाठी कोणती नवी पोथी लिहली पाहिजे,’ बारोही मास-चोबिसो तास तो असाच कु-विचार करीत असतो. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ‘ब्राह्मण आपल्या
शत्रूला कधीच माफ करीत नाही, मग तुम्ही त्याच्या कितीही पाया पडा, त्याला
दान-दक्षिणा द्या, त्याला भुदेवाचा दर्जा द्या, तुम्ही त्याची कितीही सेवा करा, तो
तुम्हाला शत्रूच समजतो व कायम पायाशी ठेवण्याचा प्रयत्न करतो.’ याचे एक ताजे उदाहरण सांगतो. कारण उदाहरण दिल्याशिवाय आमच्या बहुजनांच्या
मेंदूत काही शिरतच नाही.
-3-
उदाहरण द्यायचे तर
सोम्या-गोम्याचे देऊन चालत नाही, ते दिग्गज माणसाचे दिले तरच त्याला वेटेज प्राप्त
होते. म्हणून मी आज तुम्हाला महाराष्ट्राचे आजचे एकमेव भाग्यविधाते व राज्याचे
एकमेव साहेब असलेल्या माननीय-वंदनीय शरद
पवारसाहेबांचे उदाहरण देतो. 2014च्या विधानसभा निवडणूकीत भाजप-सेना युती तुटली व नंतर
भाजपच्या पेशव्यांचे लंगडे सरकार स्थापन झाले. ते सरकार पडणारच होते, कारण
शिवसेनेने या पेशव्यांना ‘औरंगजेबाची औलाद’ म्हणून जाहीर केलेले होते. आपले भुदेव असलेल्या पेशव्यांचे सरकार संकटात आहे, असे दिसताच
माननीय शरद पवारसाहेबांनी क्षत्रिय रामाचा अवतार धारण केला व ब्राह्मणांच्या दुसर्या
पेशवाई सरकारला जीवदान दिले. दोनशे
वर्षापूर्वीची पहिली पेशवाई ओबीसी योध्यांमुळे धोक्यात आली असतांना तत्कालीन
सरंजामदार जे स्वतःला वतनदार-क्षत्रिय(?) समजत होते, ते पेशव्यांच्या मदतीला धावुन
गेले व शिवरायांच्या खून्यांना जीवदान दिले. पाच हजार वर्षांपूर्वी ब्राह्मणाच्या
मेलेल्या मुलाला जीवदान देण्यासाठी क्षत्रिय रामाचा अवतार धावून आला व शूद्र
शंबुकाचा वध(?) करून ब्राह्मणाचा मुलगा जीवंत केला.
पवारसाहेबांनी
पेशव्यांची सेवा पाच वर्षे इमाने-इतबारे केली. पेशव्यांनी आपली पेशवाई
शूद्रादिअतिशूद्रांच्या विरोधात यथेच्छ राबवीली. पेशवा सरकारप्रणीत लाखांचे मराठा
मोर्चे काढून दहशत माजवीली, मराठा विरुद्ध दलित दंगली पेटवील्या, ओबीसी आरक्षणात
मराठ्यांना घुसवून ओबीसींचा सत्यानाश सुरू आहे, ओबीसी आरक्षण, ओबीसी शिष्यवृत्ती, दलित-आदिवासी शिष्यवृत्ती आदि सर्व खतम झालेले आहे. आदिवासींवर होणारे अत्याचार अजून मुंबईच्या वेशीवर टांगलेच
गेलेत नाही. असा सर्व पेशवाईचा नंगानाच
सुरू असतांना या सरकारचा पाठिंबा
काढून घ्यावा, असे एक क्षणभरही पवारसाहेबांच्या मनात आले
नाही. केवढा मोठा उदारपणा.
पवारसाहेबांचे हिमालयाएवढे उपकार भाजपावर असतांना त्यांना किमान
‘राष्ट्रपती’पद दिले गेले पाहिजे होते. तशी मागणीही झाली होती. नाही राष्ट्रपतीपद तर, किमान ‘भारतरत्न’
तर हवेच होते. उपकाराची परतफेड केली पाहिजे, असा विचार बहुजन करतो, कारण तो
भोळा आहे. तो शत्रूला भूदेव समजून पयावरच लोटांगण घालतो. मात्र याच्या नेमका उलट विचार मनु-महाराज करतात. शूद्र हा कितीही महान असला,
ज्ञानी असला, उपकारकर्ता असला तरी तो शूद्रच असतो, शत्रूच असतो, ब्राह्मणांच्या पायाशीच
त्याची जागा, असे मनूने लिहूनच ठेवले आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या उपकाराची
परतफेड करणे म्हणजे मनू महाराजांशी बंडाळी करणे होय, जगात एकमेव पवित्र व शूद्ध असलेल्या
आर्य-वंशाला कलंक लावून घेणे होय!. शत्रू हा
शत्रूच असतो, मग त्याने आपल्यावर कितीही उपकार केले तरी... आपला आर्य-बाणा खाली
पडणार नाही, याची ते नेहमीच काळजी घेतात. ब्राह्मणाच्या मुलाला जीवंत
करण्यासाठी शूद्र रामाची मदत घ्यावी लागली, हा फार मोठा बट्टा आर्य वंशाला लागला होता. आणी असा बट्टा
लावण्याचे पाप रामाने केले, म्हणून त्याला आत्महत्या करून जीव द्यावा लागला.
होळकरांसारख्या ओबीसी योद्ध्यांमुळे पेशवाई संकटात आली असतांना तीला वाचविण्यासाठी
मराठा सरंजामदार मदतीसाठी धावून आलेत. शूद्र मराठ्यांची मदत घेऊन पेशवाई वाचवावी लागली, हा फार मोठा बट्टा
आर्यवंशाला लागला. आणी असा बट्टा लावण्याचे पाप या मराठा सरंजामदारांनी केले, म्हणून त्यांना जेलमध्ये टाकणे, वेडा ठरवून ठार करणे आदि शिक्षा देण्यात
आल्यात. पेशवाई नष्ट करायला निघालेल्या यशवंतराव होळकरांना ते शिक्षा करू शकले
नाहीत, कारण होळकर ओबीसी होते,
योद्धे होते, आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ते ‘मर्द’ होते.
महाराष्ट्रातील फडणवीसांची दुसरी पेशवाई वाचविण्यासाठी शूद्र
सरंजामदारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मदत घ्यावी लागली, हा फार मोठा कलंक
आर्य वंशावर लागला, हा कलंक पुसून टाकण्यासाठी या शूद्र राष्ट्रवादी कॉंग्रेस
पार्टीला खतमच केले पाहिजे. आणी मनुमहाराजांचे आदेश पाळत श्रीमंत पेशवे फडणवीस
साहेबांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस 15 दिवसात खतम करून टाकली.
शब्दमर्यादेच्या
बाहेर आपण जात आहोत, म्हणून मी येथेच थांबतो..... जगलो-वाचलो तर भेटूच पुन्हा...
तो पर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 3-4
सप्टेंबर व प्रकाशनः 4 सप्टेंबर 2019)
-------
प्रा.
श्रावण देवरे
Mobile
– 88 301 27 270
Blog
ब्लॉग
Email-
(महत्वाची
सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित
करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)
No comments:
Post a Comment