बहुजननामा-88
(प्रकाशनः 20 सप्टेंबर 2019)
सावधान! माळी समाज ‘फुले-महामार्गावर’
येत आहे.....
बहुजनांनो....
!
-1-
माळी समाजाचे एकूण दोन ‘सत्ता
संपादन मेळावे’ गेल्या रविवारी व सोमवारी संपन्न झालेत. रविवारी 15 सप्टेंबरला
गडकरींचा संघभाजप-प्रणित माळी-मेळावा नागपूरला संपन्न झाला व सोमवारी 16
सप्टेंबरला बाळासाहेब प्रकाश आंबेडकर-प्रणित माळी-मेळावा अरण गावी संपन्न झाला. या
मेळाव्यांमध्ये काही समान मुद्दे ठळकपणे दिसत होते.
1) हे दोन्ही
मेळावे ‘सत्ता-संपादन’ मेळावे होते व ते माळी जातीचे होते.
2) दोन्ही
मेळाव्यात जमलेले माळी एक विशिष्ट ‘मेरीट’ चे होते. म्हणजे बाजार-बुणगे वा मेंढरं
नव्हती.
3) दोन्ही
मेळाव्यात जमलेल्या लोकांची संख्या मर्यादित असली तरी ती जागृत माळ्यांची संख्या
होती.
एवढे तीन साम्य
सोडले तर या दोन्ही मेळाव्यात ब्राह्मणी-अब्राह्मणीइतका प्रचंड मोठा फरक होता.
तो फरक आता आपण पाहू.....
1) नागपूरचा
माळी मेळावा हा ‘पेशव्यांसाठी सत्ता संपादन’ मेळावा होता. तर, अरणचा मेळावा
हा माळ्यांसकट सर्वच ‘ओबीसी-दलितांसाठी सत्ता संपादन’ मेळावा होता.
2) नागपूरच्या
मेळाव्यात वामन-अवतारी पेशवे हे मुख्य मार्गदर्शक होते, जे तात्यासाहेब
महात्मा फुलेंवर जीवंतपणी जीवघेणा शारिरीक हल्ला करीत होते व त्यांच्या मृत्युनंतरही
त्यांच्या विचारांवर हल्ला करीत आहेत. तर, याउलट अरण येथील माळी मेळाव्यात
तात्यासाहेबांचे वैचारिक शिष्य असलेल्या बाबासाहेबांचे नातू माननीय प्रकाश आंबेडकर
मुख्य मार्गदर्शक होते, ज्यांच्या समाजाने घरोघरी तात्यासाहेबांचे फोटो लावून
व ग्रंथ वाचून त्यांना भौतिक व वैचारिकदृष्ट्या जीवंत ठेवले आहे.
3) नागपूरच्या
मेळाव्यात जमलेले माळी जागृत असले तरी ते लाचार, लाळघोटे व पेशव्यांचे गुलाम होते,
तर अरणला जमलेले माळी स्वाभीमानी, ताठ मानेचे व पेशव्यांना लाथाडणारे होते.
नागपूरच्या
मेळाव्यात समोर माळी समाज बसलेला असतांना व पाठीमागे तात्यासाहेब महात्मा फुलेंचा
फोटो असतांना गडकरींनी आपली ‘फुले-मारेकर्या’ची भुमिका सोडली नाही. भाषणात
त्यांनी फुले-विचारांवर विषारी हल्ला चढविला. गडकरी म्हणाले, आरक्षणाने काहीही
प्रगती होत नाही. नागपूरात माझ्या जातीची 5-10 घरे आहेत, तरीही मी निवडून येतो व
मंत्रीही होतो.’ गडकरींच्या भाषणाचा सरळ मतितार्थ असा होता की, तुम्ही संख्येने
कितीही जास्त असा. शेवटी तुम्ही मेंढरं ते मेंढरंच राहणार आहात. आरक्षण नसतांनाही
आम्ही प्रगतीपथावर आहोत, सत्ताधारी आहोत, आणी तुम्ही माळी लोक आरक्षण असूनही
माझ्यासारख्या अल्पसंख्य ब्राह्मणासमोर ‘लाचार’ म्हणून बसलेले आहात.
नागपूरला उपस्थित माळी
लोक व्यक्तीगत स्वार्थापूरते जागृत आहेत. त्यांच्यापैकी कुणाच्या सहकारी बँका
आहेत, शिक्षण संस्था आहेत, सोसायट्या आहेत. या संस्था टिकवून ठेवण्यासाठी
सत्ताधार्यांच्या पायाशी लोळण घ्यावीच लागते, हे मी समजू शकतो. परंतू त्यासाठी
सत्ताधार्यांचे पाय चाटण्याचा कार्यक्रम जाहीरपणे व तात्यासाहेब महात्मा
फुलेंच्या साक्षीने साजरा करू नका. तुम्ही नासला आहात, तसे इतरही माळ्यांना नासवू
नका. तुम्हाला काय लाळघोटेपणा करायचा असेल तो गडकरींच्या केबीनमध्ये जाऊन, बँडवाजा
लावून साजरा करा. तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या साक्षीने त्यांच्या विचारांचा
कार्यक्रम करण्यासाठी किमान प्रामाणिकपणा लागतो. नागपूर मेळाव्यात जमलेले माळी शरिराने
‘लखवाग्रस्त’ होते व मेंदूने ‘बधीर’! नागपूरला उपस्थित माळ्यांमध्ये एक जरी माणूस
तात्यासाहेब महात्मा फुलेंवर प्रेम करणारा असता तर त्याने गडकरींचा निषेध केला
असता. आरक्षणाच्या सिद्धांताचे जनक असलेल्या तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या
फोटोसमोर व माळ्यांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या विरोधात बोलण्याची हिम्मतच कशी होऊ
शकते? गडकरी अशी हिम्मत करू शकलेत कारण, शेकडो वर्षे एकतर्फी 100 टक्के आरक्षण
जातनिहाय होते. मनुस्मृतीप्रमाणे सर्व ‘कष्टमय-यातनादायी-सेवाधर्मी’
व्यवसायांचे 100 टक्के आरक्षण शुद्रादिअतिशूद्रांच्या माथी मारून व ‘भोगमय-आरामदायी-नफाधर्मी’ व्यवसाय
ब्राह्मण-क्षत्रिय(?)-सरंजामदार-वैश्यांसाठी 100 टक्के राखीव ठेवून शतकानुशतके जी
सत्ता उपभोगत आहेत, त्यातून आलेली ही गुर्मी आहे. या गुर्मीमुळेच ‘फुले-विचार’ मारण्याचे
धाडस गडकरी करू शकलेत.
-2-
जातीव्यवस्थेच्या
अनेक वैशिष्ट्यांसोबत एक वैशिष्ट्य हे आहे की, प्रत्येक जातीला आपला नेता वरच्या
जातीतून अथवा वरच्या जातीच्या मान्यतेतून आलेला पाहिजे असतो. संघटना जातीय असो
कींवा वर्गीय, त्या संघटनेचा नेता सवर्ण जातीय अथवा त्यांच्या मान्यतेचाच लागतो.
शेतकरी हे सर्वच्या सर्व शूद्रच आहेत, पण त्यांच्या वर्गीय संघटनेचा नेता शरद जोशी
(ब्राह्मण) अथवा जाट-सरंजामदार टिकैतच असतो. कामगारवर्गात मोठ्या संख्येने
शूद्रादिअतिशूद्रच असतात, परंतू त्यांना नेता म्हणून दत्ता सामंत, डांगे, राव
सारखे ब्राह्मणच लागतात. शासकीय कर्मचार्यांमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक
असतात, पण त्यांना नेता म्हणून मुसलमान-दलित चालत नाहीत, तिथे नेता कर्णिक
(ब्राह्मणच) लागतात. जातनिहाय संघटनांचं सूत्र यापेक्षा वेगळे नाही. माळ्यांचा
नेता किंवा ओबीसींचा नेता कोण होऊ शकतो? ज्याच्या डोक्यावर गडकरी-ठाकरेंचा
आशिर्वाद आहे किंवा ज्याच्या खांद्यावर पवारांचा हात असेल, तोच माणूस माळ्यांचा
किंवा ओबीसींचा नेता होऊ शकतो. तेली, कोळी, सुतार, लोहार, कुंभार, नाभिक-धोबी-परीट
वगैरे सर्व जातींची हीच कहाणी आहे. फरक एवढाच आहे की, माळी, तेली सारख्या मोठ्या
जातींचे नेते स्वतः पवारसाहेब नियुक्त करतात व नाभिक-धोबीसारख्या छोट्या जातीतील
नेत्यांची नियुक्ती आर.आर.आबांसारखे दुय्यम नेते करतात. एकतर ब्राह्मण-मान्यता हवी
किंवा मराठा-मान्यता पाहिजे. एकमेव बौद्ध समाज असा आहे कि, त्यांचे नेते भुमिहिनांच्या
वर्गीय व नामांतरासारख्या जातीय-संघर्षातून निर्माण झालेले आहेत. परंतू अशा
संघर्षशिल नेत्यांना आमदार-खासदार-मंत्री होण्यासाठी सरंजामदार्यांच्या किंवा
पेशव्यांच्या पायाशी लोळण घ्यावीच लागते. त्याशिवाय ते मान्यताप्राप्त दलित-नेते
होतच नाहीत. वामन मेश्राम, बोरकर, माने-मानकर हे दलितांचे नेते होऊ शकत नाहीत,
कारण त्यांना अजून पेशव्यांचा आशिर्वाद लाभलेला नाही किंवा मराठा-सरंजामदारांकडून शाबासकीची
थाप त्यांच्या पाठीवर पडलेली नाही.
त्याचप्रमाणे
कोणाच्या सभेला जायचे आणी कोणाच्या सभेला नाही जायचे, हे सूत्रसुद्धा
याच पद्धतीचे
असते. मंडल आयोगासाठी आयुष्यभर चळवळ करणार्या व ओबीसी आरक्षणाला मराठ्यांपासून
वाचविणार्या श्रावण देवरेंच्या सभेला मोठ्या संख्येने लोक येत नाहीत, परंतू भुजबळ
फॉर्मवर रोजच जत्रा भरते! त्याचे साधे कारण हे आहे कि, श्रावण देवरेला गडकरी-ठाकरे-पवारांनी
गो-मूत्र शिंपडून पवित्र करून घेतलेले नाही. अशा ‘अपवित्र’ श्रावण देवरेला नेता
कसे मानणार, असा प्रश्न माळ्यांना व इतर ओबीसी जातींना पडलेला असतो. हे पेशवा व
सरंजामदार केवळ ओबीसी-दलित नेत्यांवरच गोमूत्र शिंपडतात असे नाही तर, दलित-ओबीसी
जातीतील विचारवंत, साहित्यिक, बुद्धिवंत आदि तज्ञ लोकांवरही गोमूत्र शिंपडतात.
त्याशिवाय या बुद्धिवंतांना साहित्य महामंडळाचे सदस्य वा अध्यक्ष बनता येत नाही. भांडारकर
संशोधन संस्थेचे डायरेक्टर होणे म्हणजे किती मोठे मानाचे पद. पण त्यासाठीसुद्धा पेशव्यांच्या
पायावर ‘डोके’ ठेवावे लागते. त्यानंतरच ते गोमूत्र शिंपडतात व पवित्र करून घेतात.
-3-
तर सांगायचा उद्देश
असा की, सभेला जातांना सुद्धा लोक असा विचार करतात की, या सभेचा मुख्य नेता
गोमूत्र शिंपडलेला आहे की नाही. सभेचा प्रमुख पाहूणा पेशवा किंवा सरंजामदार असेल
तर, हे ओबीसी-दलित लोक डोळे झाकून सभेला जातात. नागपूरच्या माळी मेळाव्यात हेच
पेशवा-सूत्र काम करीत होते. नागपूरच्या मेळाव्यात माळ्यांचे अधःकारमय भविष्य व
भयानक वर्तमान स्पष्टपणे दिसत असतांना अरणच्या माळी मेळाव्याने मात्र आशेचा किरण
दाखवीला. जातीतून बाहेर पडून ‘जात्यंतक’ राजकारण काय असते, ते अरणला जमलेल्या
माळ्यांनी दाखवून दिले. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक माननीय बाळासाहेब प्रकाश
आंबेडकर होते, ही एक तत्वज्ञानात्मक परिवर्तनाची दिशा आहे. तात्यासाहेब महात्मा
जोतीराव फुलेंनी एखाद्या राजा-महाराजाला, जमिनदार-सरंजामदाराला वा ब्राह्मण-पेशव्याला
गुरू नाही मानले. किंवा संत सावता माळ्यालाही गुरू नाही मानले.
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंनी मातंग जातीतील क्रांतीवीर लहूजी
साळवेंना गुरू-मार्गदर्शक मानले. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी संत चोखा महाराला गुरू नाही
मानले. परजातीय-परधर्मीय बुद्ध, कबीर, फुलेंना मार्गदर्शक मानले. या
महापुरूषांच्या पावलावर पाऊल ठेवत अरणला जमलेल्या माळ्यांनी बाबासाहेब
आंबेडकरांच्या संघर्षशील नातवाला मार्गदर्शक मानले, हाच आहे खरा ‘फुले-महामार्ग’,
अशी असते परिवर्तनाची दिशा, हे या माळ्यांनी सिद्ध केले आहे. आपण नागपूरच्या
दिशेने जाऊन गडकरीसारख्या ‘फुलेंच्या शत्रू’ला डोक्यावर घ्यायचे की अरणच्या दिशेने
जाऊन ‘फुले-प्रेमी’ प्रकाश आंबेडकरांना नेता मानायचे, हे ठरविण्यासाठी मेंदू
‘बधीर’ असून चालत नाही. तो मेंदू वैचारिकदृष्ट्या तल्लख व सतर्क असला पाहिजे, तरच
योग्य व अचूक दिशा सापडते.
याच्या उलटी आणखी
एक दिशा आहे, ती समजल्याशिवाय अरणच्या माळ्यांचे ‘फुले महामार्गावर’ येणे
किती क्रांतीकारक आहे, हे लक्षात येणार नाही. आमच्या बहुजन हुशारांना एखादा चांगला
मुद्दा समजून सांगायचा असेल तर, केवळ सिद्धांत सांगून समजत नाही. त्यासाठी एखादे
उदाहरणच द्यावे लागते, किंवा तुलनात्मक फरक स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे द्यावी
लागतात. म्हणून मला नाइलाजास्तव मराठा समाजाचे उदाहरण तुलना करण्यासाठी
द्यावे लागते आहे. परंतू पुढच्या बहुजननामात.......
तत्पूर्वी
आण्णासाहेब शंकरराव लिंगे व तरूण तडफदार नेते शाहीर सचिन माळी यांनी
महाकष्ट घेऊन हा अरणचा मेळावा यशस्वी केला, याबद्दल त्यांचे नाव ‘जात्यंतक’
चळवळीच्या इतिहासात निश्चितच नोंदले जाईल. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
या विषयाशी निगडीत
अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर आपण पुढील बहुजननामात चर्चा करीत राहू........तो
पर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 19 सप्टेंबर व प्रकाशनः 20 सप्टेंबर 2019)
-------
प्रा.
श्रावण देवरे
Mobile
– 88 301 27 270
Blog
ब्लॉग
Email-
(महत्वाची
सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित
करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)


खुप छान लिहिलय सर.
ReplyDelete