बहुजननामा-91
तेलही गेले, तुपही गेले आणी हाती
धुपाटणे आले....
अर्थात- #शरद_पवार_ED_मराठा_ईगो_54_जागा_फडणवीसांचं_CM_पद_धोक्यात!!
बहुजनांनो....
!
-1-
सर्व
प्रकारचे अ-नैतिक, अ-न्यायिक व अ-संवैधानिक मार्ग अवलंबून व सर्व प्रकारची लाज-शरम
खुंटीवर टांगून फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने मराठा-ओबीसीकरण आरक्षणाचे बील
मंजूर करून घेतले, त्या मागे अनेक उद्देश होते व आहेत, त्यापैकी एक उद्देश होता 30
परसेंट कुणबी-मराठा वोटबँक एक गठ्ठा भक्कमपणे भाजपाच्या मागे उभी करणे. आणी ही
एकगठ्टा मराठा वोटबँक खरोखर भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली, लोकसभा-2019
च्या निवडणूकांचा रिझल्ट हेच सिद्ध करतो. 30 टक्के कुणबी-मराठा वोटबँक ही
कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षांची वोटबँक होती. 2014 ला ‘ओबीसी वोटबँक’ लुटण्यासाठी
मोदींचा ओबीसी मुखवटा भाजपाने लावला आणी एक पर्याय म्हणून ओबीसींनी भाजपाला केंद्रात
व राज्यांमध्ये सत्तेत आणलं. परंतू, नेहमीप्रमाणे इतिहासाची पुनर्रावृत्ती झाली. ओबीसी
जे जे पर्याय शोधून काढतो, त्यावर कब्जा क्षत्रिय-जाती करतात व ओबीसींना खड्डयात
घालतात. भाजपातील सर्व ओबीसी जातींच्या सक्षम नेत्यांची पद्धतशिरपणे ‘वाट’
लावण्यात आली व ब्राह्मण-मराठ्यांच्या एकतर्फी प्रभावात अधिकृतपणे ‘पेशवाईची
स्थापना’ करण्यात आली. या पेशवाइने ओबीसींचे आरक्षण, ओबीसी-दलित विद्यार्थ्यांची
शिष्वृती व ओबीसी विद्यार्थ्यांचे मेडिकल-इंजिनिअरिंगसारख्या उचउचशिक्षणातील
आरक्षण नष्ट करण्यास सुरूवात केली. ऍट्रॉसीटी ऍक्टच्या विरोधात वातावरण तापवणे
सुरू झाले. दुसरीकडे मराठा-ओबीसीकरण आरक्षण लागू करून उरले-सुरले ओबीसीपणही नष्ट
केले.
न्यायिक
प्रक्रियेला जातीच्या गटारीत आंघोळ घालीत अशक्यप्राय असलेले मराठा-ओबीसीकरण आरक्षण
मिळाल्यानंतर 30 टक्के कुणबी-मराठा वोटबँक भाजपाची गुलाम बनली. याचा परिणाम लगेच
होणार्या लोकसभा निवडणूकीत (24 मे-2019) दिसला. जो मुर्खपणा लोकसभा-2014 ला अखिल
भारतीय ओबीसी जातींनी केला, तोच मुर्खपणा केवळ जात-स्वार्थापायी लोकसभा-2019 ला
अखिल भारतीय क्षत्रिय जातींनी केला. 2014 लाच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर
सत्ता स्थापनेसाठी भाजपाला बाहेरून पाठींबा देणारी पार्टी मराठा जातीचीच होती, हा
काही योगायोग नव्हता. हा बाहेरून पाठिंबा म्हणजे एक सूचक ईशारा होता की,
ज्यातून पेशवाईच्या स्थापनेची दिशा स्पष्ट होत होती. ब्राह्मण व क्षत्रिय
जातींच्या सूचक एकजूटीमूळे पेशवाई आपल्या कामाला लागली. दलित ओबीसींच्या आरक्षणाला
‘नख’ लावणे, ऍट्रॉसिटी एक्टच्या विरोधात लाखांचे मोर्चे काढून वातावरण तापविणे,
ओबीसी आरक्षणात घुसखोरीला ‘फूस’ देणे, हे प्रकार इतके गंभीर होते की, ज्यामुळे
पूर्ण महाराष्ट्र खालून-वरून ढवळून निघाला. फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या
प्रभावात एकमेकांना ‘जात’ विचारण्याचे धाडस महाराष्ट्रात कोणी करीत नव्हते.
मात्र लाखांच्या मोर्च्यानंतर खोडोपाडी जातीचे विष इतके भिनले की, लोक एकमेकांना
बिनदिक्कत जात विचारायला लागलेत. पेशवाईत यापेक्षा वेगळे काय घडत होते?
-2-
ओबीसींचा एक
गौरवशाली इतिहास आहे. ओबीसी अज्ञानात आहे तो पर्यंतच ब्राह्मण-सरंजामदार जातींची
मौजमस्ती चालते. ओबीसी जागृत झाला की, वामनशाही-सरंजामशाही नेस्तनाबुत होते, हा
बळीराजापासूनचा इतिहास आहे. संघ-भाजप या इतिहासाचे पारायण रोजच करीत असतो, म्हणूनच
तो सतत सतर्क असतो व 24 तास डोळे गाडून ओबीसींच्या ‘’गल्ली-बोळातील’’
कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवत असतो. ब्राह्मणाला इतर कोणत्याही घटकाची भीती नाही. तो
घाबरतो फक्त ओबीसी घटकाला. तामिळनाडूत रामास्वामी पेरियार यांचा पुतळा फक्त एकदाच
तोडला गेला आणी ओबीसींनी किमान 100 ब्राह्मणांची पिटाई भररस्त्यात-भरदिवसा
केली. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देशाच्या अनेक राज्यांमध्ये हजार वेळा
तोडला गेला, परंतू आजवर कुठेही एकाही ब्राह्मणाची पिटाई झालेली नाही.
यावरून ओबीसींच्या ताकदीची पुरेपूर कल्पना यायला हरकत नसावी. पुरोगाम्यांना नाही,
परंतू ब्राह्मणांना त्याची पूर्ण कल्पना आहे.
महाराष्ट्रात
पेशवाईची पुनर्रस्थापना होताच सर्वप्रथम ओबीसी-जागृतीचे सर्व मार्ग बंद करण्याचा
सपाटा लावण्यात आला. त्यात ओबीसी आरक्षण, शिष्यवृत्ती, उच्चशिक्षण ओबीसी
महामंडळ वगैरे जागृतीचे मार्ग रोखून धरलेत वा बंद केलेत. या उलट मराठा-जागृतीचे
सर्व मार्ग जोरात सुरू करण्यात आले. मराठा आरक्षण, मराठा शिष्यवृत्ती, सारथी,
मराठा उद्योजक निर्मीती या सारख्या करोडो रूपये खर्चून अनेक उपाय-योजना करून
मराठा-जागृती करण्यात येत आहे. कारण मराठा जितका जागृत होत जातो, तितका तो
अधिकाधिक जातीयवादी बनतो व पेशवाईचा संरक्षक बनतो, असा इतिहास आहे.
अशा पद्धतीने
पेशवाइचे 5 वर्षीय मनुस्मृतिप्रणित मार्गक्रमण चालू असतांना महाराष्ट्र
विधानसभेच्या निवडणूका लागल्या. निवडणूक केवळ जिंकायची नसते, तर सत्ताही टिकवायची
असते वा मिळवायची असते. त्यासाठी काही धोरण बनविले जाते व डावपेंच आखले जातात.
2014 चा अनूभव बघता 2019 ला डावपेचांची आखणी करण्यात आली. 2014ला 288 जागा लढवूनही
भाजपाला सत्ता स्थापनेसाठी मराठा पक्षाचा बाहेरून पाठिंबा घ्यावा लागला होता. 2019
ला भाजपा फक्त 164च जागा लढत असल्याने बाहेरून पाठिंबा देणार्या मराठा पक्षाची
गरज भासणारच! परंतू मराठ्यांचे दोन्ही पक्ष 2019लाही गलित-गात्र झालेले. त्यांना
20 जागा मिळणेही मुश्कील दिसत होते. अशा परिस्थितीत फडणविस चिंतातूर होणे स्भाविक
होते. आपल्या संघ-भाजपाच्या गोठ्यात आतल्या खूंटीवर बांधलेला राष्ट्रवादी
कॉंग्रेस नावाच पक्ष आपल्या हक्काचा एक्का आहे. हा एक्का सत्ता प्राप्तीचा डाव
भाजपाला निश्चितच जिंकून देईल, यात कोणतीही शंका नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला
बुश्टअप करणे गरजेचे होते. परंतू कॉंग्रेससकट राष्ट्रवादीही मर्तूक-मढे बनून
पराभूत मानसिकतेत निवडणूक लढवीत होती. मग ठरले की राष्ट्रवादीला बूश्टअप
करण्यासाठी पिछाडीकडून जरा मोठाच दणका देऊन पुढे रेटलं पाहिजे. हा दणका असा असला
पाहिजे कि, ज्याची निशाणी उमटेल राष्ट्रवादीच्या पृष्ठावर, परंतू जखम झाली पाहिजे मराठा
मतदारांच्या ईगोला. झाले, ठरले आणी घडले. ईडीची नोटीस अशा एखाद्या प्रकरणावर
द्यायची की, जी ईडीवरच उलटेल. लव्हासा किंवा सिंचनसारख्या भ्रष्टाचारावरून जर
ईडीने नोटीस बजावली असती तर, निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट
जप्त झाले असते. त्यामुळे भाजपच्याच अंगावर डाव उलटला असता. म्हणून
जाणीवपूर्वक सहकारी बँकेच्या घोटाळ्यावर ईडीला नोटीस पाठविण्यास सांगीतले गेले.
ठरल्याप्रमाणे ती नोटीस ईडीवर उलटली. व पवारसाहेब मराठ्यांच्या जाग्या झालेल्या
ईगोवर स्वार झाले आणी त्यांची घोडदौड तुफान वेगात सुरू झाली. मराठ्यांच्या जातयेड्या
पावसात पवारसाहेब अक्षरशः ओलेचिंब भिजलेत. मराठ्यांच्या जात-येडेपणाचा अंदाज
फडणवीसांना आला नाही. फक्त राष्ट्रवादीलाच बुश्टअप करायचे होते. परंतू
कॉंग्रेसही मराठा जातीचीच पार्टी आहे, हे फडणवीस विसरले. जखमी झालेल्या मराठा
ईगोने कॉंग्रेसलाही 44 वर नेले व राष्ट्रवादीला 54 वर! आणी परीणामी फडणवीसांचं
मुख्यमंत्रीपदच धोक्यात आलं. डाव फसला म्हणण्यापेक्षा डाव उलटला आणी शिवसेनेचा वाघ
उरावर येऊन बसला!
म्हणजे आधीची 52
टक्के ओबीसींची वोटबॅंक घालवून 30 टक्के कुणबी-मराठा वोटबँक कमवली होती, ती
सत्तास्थापनेच्या डावपेचात घालवली. अवघ्या सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा
निवडणूकीत ज्या मराठा वोटबँकेने भाजपाला भरभरून मते देऊन उपकाराची अंशतः परतफेड
केलेली होती. त्याच मराठा वोटबँकेच्या जात-येडेपणाला भडकावून फडणवीसांनी आपल्याच
पायावर कुर्हाड मारून घेतलेली आहे. याला म्हनतात- ‘तेलही गेले, तुपही गेले आणी
हाती धुपाटणे आले.’ आणी शिवसेचा वाघ उरावर गुरगुरतो आहे, तो बोनस समझावा!
-3-
विधानसभा निकाल
जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया दिली, ती भूजबळसाहेबांनी! भुजबळांची प्रतिक्रीया
राजकीय ‘मुद्सद्दीपणाचा’ उत्तम नमूना होता. राजकारणात शत्रूपक्षामध्ये किंवा शत्रूपक्षांमध्ये
फाटाफूट होईल, असा प्रयत्न केला जातो. याला राजकीय मुत्सद्देगिरी म्हणतात. ती
भुजबळांनी उत्तमप्रकारे केली. भूजबळांची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी प्रसार
माध्यमांसमोर सांगीतले की, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद पाहिजे असेल तर
त्यांनी भाजपकडे जावे, आणी जर ‘मुख्यमंत्रीपद’ पाहिजे असेल तर त्यांनी
आमच्याकडे यावे. भूजबळांच्या या मुत्सद्देगिरीचा चांगलाच परिणाम झाला. शिवसेनेला
बळ मिळाले, भाजपाची तारांबळ उडाली. मात्र लगेच पवारसाहेबांनी भाजपाला सावरण्यासाठी
भूजबळांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली. पवारसाहेब म्हणाले, ‘कोणत्याही
परिस्थितीत आम्ही शिवसेनेबरोबर जाणार नाहीत.’ वास्तविक पाहता राज्यात खर्या
अर्थाने भाजपाचेच राज्य होते. शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षाचेच काम करीत
होती. पाच वर्षात विरोधक म्हणून एकही काम कॉंग्रेस-राष्ट्रवादी करू शकली नाही. मात्र
शिवसेनेने विरोधक म्हणून उत्तम काम करून दाखविले. त्यामुळे निवडणूकीत ऍन्टिइन्कंबसी
फॅक्टर भाजपाशी निगडीत होता. शिवसेनेच्या बाबतीत नाही. महाराष्ट्रात जनतेचा जो रोष
होता तो संपूर्ण सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या विरोधात होता व आहे, शिवसेनेच्या
विरोधात नाही. भाजपाने सर्वात जास्त जागा लढविल्यामुळे ते शंभरीपर्यंत पोहोचले
आहेत, त्यामागे दुसरे कोणतेही कारण नाही. भुजबळांनंतर कॉंग्रेसच्या थोरातसाहेबांनी
शिवसेनेलाच साद देऊन आपले मुद्सद्देगिरीचे उत्तम राजकारण केले. जे थोरात व भूजबळ
करू शकतात, ते पवारसाहेब का करू शकले नाहीत? उत्तर सगळ्यांना माहीत आहे. ते पुन्हा
पुन्हा सांगण्याची गरज नाही.
हे सर्व सांगण्याचा
एकच उद्देश आहे की, जर तुम्ही खरोखर जनतेशी प्रामाणिक राहून राजकारण करीत असाल
तर भाजपाला सत्तेबाहेर ठेवणे, हे तुमचे परमकर्तव्य आहे. पण ते होणे नाही, कारण
येथल्या सरंजाम्यांना पेशवाईच्या गुलामीची चटक लागलेली आहे.
निवडणूकीतील अशा
विविध गमज्यांवर पुढील बहुजननामात चर्चा करू या, तोपर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की
जय हो....!!!
(लेखनः 30 ऑक्टो व प्रकाशनः 31
ऑक्टो 2019)
-------
प्रा.
श्रावण देवरे
Mobile
– 88 301 27 270
Blog
ब्लॉग
Email-
(महत्वाची
सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित
करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)
No comments:
Post a Comment