http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, November 24, 2019

VBA Fall 41 to 25 November 1st 2019



वंचित बहुजन आघाडीः 41 ते 25

------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

     महाराष्ट्र विधानसभा-2019 चा निकाल जाहीर झाल्यापासून केवळ पुरोगामी वर्तुळातच नव्हे तर, प्रतिगाम्यांच्या कळपातही जोरात चर्चा सुरू आहे, ही चांगली बाब आहे. बरेच आक्षेप मांडले गेलेत. काही वैचारिक तर काही व्हल्गर! वैचारिक पातळीवरच्या आक्षेपांना माझ्यासकट अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. मी वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी वा सदस्य नाही. त्यामुळे मी त्यांचा अधिकृत प्रवक्ताही नाही. आणी असे जखडून घेणे, मला माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा वाटते. परंतू तरीही केवळ जात्यंतकच्या भुमिकेतून मी वंचित बहुजन आघाडीसाठी लिहीत असतो. आज ही पोस्ट लिहीण्याचा एकच उद्देश आहे. वंबआ वर ज्या अनेक मुद्द्यांवर आक्षेप व टिका केली गेली, त्यात अत्यंत महत्वाचा एक मुद्दा असा आहे की, वंबआने लोकसभेला 41 लाख मते घेतलीत, ती विधानसभेत वाढली पाहिजे होती. परंतू प्रत्यक्षात 25 लाख मते मिळालीत. या एकाच मुद्द्यावर मी आज लिहीणार आहे, कारण या मुद्याचे समाधानकारक विश्लेषण कोणीच करू शकलेले नाहीत. आणी म्हणून मला हस्तक्षेप करून उत्तर द्यावे लागते आहे......
महाराष्ट्रात माझ्यासारखे गल्ली-बोळात काम करणारे असंख्य ओबीसी कार्यकर्ते आहेत. ते अनेक वर्षांपासून अथकपणे प्रबोधन, संघटन चे कार्य करीत आहेत. परिणामी ओबीसी मोठ्या संख्येने भाजपा-कॉंग्रेसविरोधी झाला आहे. सरंजाम जातीची दहशत व पेशवाईच्या पार्श्वभूमीवर वंबआचा फुले-आंबेडकरी राजकीय पर्याय दिसताच जागृत ओबीसी वंबआकडे सरकला. हा जागृत ओबीसी केवळ फुले-शाहू-आंबेडकरी विचारांनी जागृत झालेला असल्याने तो जात्यंतक वंबआचाच स्वीकार करणार, तो मनसे वगैरे सारख्या पर्यायाकडे जाणे शक्यच नव्हते. वंबआने ओबीसीमधील छोट्या-छोट्या जातींना तिकीटे देऊन ब्राह्मण-मराठ्यांच्या तिकीटांवरील मक्तेदारीला धक्का दिला. लोकसभेला एकाही मराठा-ब्राह्मणाने वंबआकडे तिकीट मागीतले नाही, ही सुद्धा ओबीसींसाठी चांगली सूचक बाब होती. वंबआ हा पक्ष खरोखरच दलित-ओबीसी ऐक्याचे जात्यंतक मॉडेल ठरेल, याची ही ग्वाही होती. धनगर, माळी वगैरे जाती बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मान्य करीत राजकारणात उतरले. त्यामुळे लोकसभेत दलित व ओबीसी अशी शूद्ध जात्यंतक एकजूट मोठी आशादायी ठरली. त्यामुळेच 41 लाखावर मते वंबआला मिळाली.
परंतू विधानसभेत मात्र अनेक चूकांपैकी एकच चूक गंभीर ठरली आणी वंबआची घसरण 41 लाखावरून 25 लाखावर येऊन थांबली. ओबीसीमधील मोठा भाऊ म्हणून गणला गेलेला माळी समाज मोठ्या प्रमाणात उघडपणे वंबआशी जोडला गेला आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा ‘माळी सत्तासंपादन’ मेळावे संपन्न झालेत. माळी जातीचे बळीराम शिरस्कर गेल्या 10 वर्षांपासून आमदार असल्यामुळे दलित-ओबीसी ऐक्याला गती मिळाली होती. विद्यमान (सीटिंग) आमदार असतांना त्यांचे तिकिट बाळासाहेब आंबेडकरांनी कापले. याचा धक्का माळी समाजाला मोठ्या प्रमाणात बसला. बळीराम शिरस्कर यांचे तिकीट कापून ते दुसर्‍या कोणत्याही ओबीसी कार्यकर्त्याला दिले गेले असते तर, नाराजीचे प्रमाण कमी झाले असते. मात्र ओबीसीचे तिकीट कापून ते अशा मराठ्याला दिले गेले की, जो लाखांच्या मोर्च्यातील सहभागी मराठा होता. म्हणजे हा मराठा उमेदवार उघडपणे दलित-ओबीसीविरोधी होता, हे स्पष्ट होते. ही घटना ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. कदाचित याचाच राग येऊन बळीराम शिरस्करांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढायचे ठरवले. मी यावर लगेच शिरस्कारांना अनावृत्त पत्र पाठवीले व वंबआविरोधात बंडखोरी करू नका म्हणून विनवले. हे अनावृत्त पत्र आमच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी इतके व्हायरल केले की, त्यातून शिरस्करांवर दबाव आला व त्यांनी बंडखोरीचा निर्णय रद्द केला. या लेखातून मी त्यांचे जाहीर आभार मानतो. परंतू वैचारिक जागृती झालेला समस्त माळी समाज प्रचंड दुखावला गेला. माळी उमेदवारासोबत असे घडू शकते, तर उद्या आपल्याही जातीच्या उमेदवारासोबत घडू शकते, या शंकेने बाकीच्या ओबीसी जातीही कन्फ्युझ झाल्यात. जात-येडेपणा किती घातक असतो, याचा नुकताच ताजा अनुभव महाराष्ट्राला आलेला आहे. शरद पवार यांच्या ED प्रकरणामुळे मराठा जातीचा ईगो जागृत झाला व मरगळ आलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला मोठा बुस्ट मिळाला. मराठ्यांचा जातयेडेपणा फडणवीसांनी भडकावला आणी त्यामूळे त्यांचं स्वतःचच CM पद धोक्यात आलं !! आहे की नाही जातयेडेपणा विघातक? डिवचल्या गेलेल्या ओबीसींमधील हा जातयेडेपणा कमी करण्यासाठी मी स्वतः मैदानात उतरून प्रचार सभा घेतल्यात. डॅमेज कंट्रोल करण्याचा मी बराच प्रयत्न केला.
अर्थात काही अभ्यासकांनी MIM शी युती तुटल्याने मते कमी झालीत, असे मांडले आहे. परंतू मुस्लीमांनी लोकसभेत वंबआऐवजी कॉंग्रेसलाच मते दिलीत, हे खुद्द बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनीच सिद्ध केलेले आहे. मी सुद्धा यावर एक लेख लिहीलेला आहेच. MIM ला विधानसभेत फक्त 7 लाख मते मिळाली आहेत. आणी वंबआच्या लोकसभेतील 41 लाख व विधानसभेतील 25 लाख यात 16 लाखांचा फरक आहे, हे लक्षात घेता ओबीसी नाराजीमूळेच हा टक्का घसरला, हे सिद्ध होते.
वंबआची 41 लाखावरून 25 लाखावर घसरलेली मते ही एक गंभीर घटना समजून त्याचे पक्षपातळीवर विश्लेषण झाले पाहिजे असे, मला वाटते.
(लेखनः 31 ऑक्टो, प्रकाशनः 1 नोव्हे. 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- मी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

No comments:

Post a Comment