http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, July 19, 2020

122 BahujanNma Mudade Daily Lokmanthan 19July20


बहुजननामा-122
ओबीसी नेतेः चालते-बोलते मुडदे!
-1-
झी 24 तास टिव्ही चॅनलचे अँकर आशिष जाधव यांनी मला प्रश्न विचारला की, ‘‘मराठा समाजाचे नेते मराठा समाजाच्या हितासाठी सतत पाठपुरावा करीत असतात, त्यामुळे त्यांना पाहिजे ते लगेच मिळते. तुमचे ओबीसी नेते असा पाठपुरावा का करीत नाहीत?’’
सारथीला एका मिनिटात 8 कोटी मिळतात व एकूण रक्कम 100 कोटीच्या वर जाते.
महाजोतीला मंत्रालयात अजून टेबल-कपाट सापडत नाही, पेसे मिळणे फारच लांबची गोष्ट! ओबीसी वित्त व विकास महामंडळाला 3 वर्षांपासून अध्यक्षच नाही, पैशांचा प्रश्नच नाही. ‘‘खरे ओबीसी उपाशी व खोटे एसईबीसी तुपाशी’’
हा खरोखर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आमचे ओबीसी नेते ओबीसींसाठी पाठपुरावा करीत नाहीत, हे कोणीच नाकारू शकत नाही. पण त्यात त्यांचा काय दोष? सर्वात महत्वाची बाब ही आहे की, जे ओबीसी लोक या नेत्यांना ‘ओबीसी नेता’ मानतात, ते सर्व मेंढरं आहेत. मेंढरांना कोणतीही अपेक्षा नसते, महत्वाकांक्षा नसते व काही मागायचेही नसते. मेंढरांना एकच पाहिजे असते- आमचा एक मेंढा नेता झाला पाहिजे, त्याला आमदारकी, मंत्रीपद मिळाले पाहिजे. त्याच्या पुतण्याला खासदारकी, सुनेला महापौरपद, मुलाला एजन्सी, जावयाला मोठे सरकारी कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळाले पाहिजेत. या नेत्याला व त्याच्या नातेवाईकांना जर असं काही मिळालं नाही, तर मग समस्त ओबीसी जनतेवर तुम्ही अन्याय करीत आहात, असा त्याचा अर्थ होतो. मेंढरं आपल्या नेत्याला फार जपतात. त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. मेंढरांच्या या नेत्याचा वाढदिवस शिवाजी पार्कवर थाटामाटात साजरा होतो व किमान 5 लाख ओबीसी लोक तेथे जमतात. स्वतःचं भाडं खर्चून हे लोक लांबून-लांबून येतात. अशा परिस्थीतीत ओबीसी नेते आपल्या कुटुंबियांचं भलं करून घेत असतील व समाजाला वार्‍यावर सोडून देत असतील तर, त्यात त्यांचं काय चुकलं? जी बाब ओबीसी नेत्यांच्या ‘ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलीटीज’ मध्ये येतच नसेल तर त्यासाठी त्यांना जॉब विचारणे, हेच मुळात चुकीचे आहे.
दुसरी महत्वाची बाब ही आहे की, हे आमचे ओबीसी नेते मंत्री झाल्यावर मंत्रीपद कसं चालवायचं याची ‘बुद्धी’ मागण्यासाठी सिद्धीविनायकाला शरण जातात. मंत्रीपद मिळाल्यावर सर्वप्रथम प्रभादेवीला जातात. त्यानंतर त्यांचा एखादा विचारवंत कार्यकर्ता त्यांना तात्यासाहेब महात्मा फुलेंची आठवण करून देतो. मग नेता तडक पुण्याला फुलेवाड्यावर जाऊन ‘बुद्धीची मागणी’ करतो. परंतू तात्यांच्या राखेच्या थडग्यातून बुद्धी देण्याची ऑनलाईन व्यवस्था फुलेवाड्यावर नाही, कारण तात्यासाहेबांचा अशा फालतू गोष्ठींवर विश्वासच नव्हता. मात्र प्रभादेवीला युगेनुयुगे बुद्धी-वाटप करणारी देवता असल्याने तिथे या ओबीसी नेत्यांना भरपूर बुद्धी मिळते. आता भट-पंड्यानी घेरलेला गणपती यांना कोणती बुद्धी देणार? ‘‘गो-ब्राह्मण प्रतिपालक बना! आपल्या मालकाशी म्हणजे मराठ्यांशी एकनिष्ठ राहा. तुमच्या खात्याचा सर्व निधी ब्राहमण-मराठ्यांच्या हितासाठी वापरा, त्यातूनच तुमची स्वतःची भरभराट होत जाईल, तुमच्या सर्व कुटुंबाचं भलं होईल.’’ अशी उदात्त व पवित्र बुद्धी घेऊन आमचे ओबीसी नेते कामाला लागतात. त्यामुळे त्यांनी ओबीसी-दलितांसाठी काहीच केलं नाही, अशी ओरड करण्यात काहीच अर्थ नाही.
तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे की, जातीव्यवस्थेचं रसायन अजब असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की, या ओबीसी नेत्यांना ओबीसींच्या हितासाठी आक्रमक व्हावेच लागते. जर ते तसे आक्रमक झाले नाहीत, तर त्यांचं ‘ओबीसी नेतेपद’ धोक्यात येण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांचे मालक स्वतःच त्यांना थोडे ‘मोकळे’ होण्याची परवानगी देऊन टाकतात. परंतू ही परवानगीची दोरी फारच अखूड असते. 2009-10 साली सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्त्यांनी ‘ओबीसी जनगणनेचा ईश्यु’ फारच गाजविला. कोणतेही आंदोलन प्रभावी होताच ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून काढून प्रस्थापित नेत्यांच्या हाती द्यावे लागते. जर असे केले नाही तर, प्रभावी आंदोलनातून नवा नेता निर्माण होतो व तो प्रस्थापित ब्राह्मण-क्षत्रियांसाठी डोकेदुखी ठरतो. ओबीसी जनगणेच्या आंदोलनाने पेट घेतल्यानंतर ते विविध राजकीय पक्षांच्या ओबीसी नेत्यांनी आपल्या हाती घेतलं. ओबीसी नेत्यांनी संसद गाजविली, ती अनेकवेळा बंद पाडली. पत्रकार परिषदा, मेळावे, मुलाखती, भडक वक्तव्ये अशी सर्व रेलचेल सुरू होती. परंतू, एकाही ओबीसी नेत्याने परवानगीच्या दोरीचं भान ठेवलं नाही. बर्‍याच ओबीसी नेत्यांनी उत्साहाच्या भरात ही दोरी तोडली व पुढे गेलेत! त्याचे परिणाम काय झालेत, ते आपण बघतच आहोत. ही दोरी केवळ परवानगीची दोरी नसते, तर ती राजकीय करिअरची दोरी असते. या तुटलेल्या दोरीने काही ओबीसी नेत्यांचे राजकीय करियरच खतम केले. काही जेलमध्ये गेलेत आणी लोकनायक गोपीनाथ मुंडेसाहेबांसाठी ती आयुष्याची दोरी ठरली.
                               -2-
भाजप तर ओबीसी नेत्यांची अजिबात गय करीत नाही. 1990 ते 1993 पर्यंतच्या हिंदू-मुस्लीम द्वेषाच्या राजकारणात अग्रेसर असलेले कल्याणसिंग, साध्वी उमा भारती, विनय कटियार हे सर्व ओबीसी नेते अडवाणीच्या आधीच कचर्‍याच्या डब्ब्यात फेकले गेलेत. मुंडेसाहेब ‘’सोयरे’’ असल्यामुळे प्रकाश झोतात राहीलेत. पुढे प्रमोद महाजन गेल्यामुळे ते स्वयंभू व स्वाभिमानी नेते बनलेत. असे ओबीसी नेते ब्राह्मण-मराठा राज्यकर्त्यांसाठी धोकेदायक असतात. त्यामुळे त्यांची आयुष्याची दोरी आखूड केली गेली. एक ओबीसी नेता गेला तर एका रात्रीतून शेकडो ओबीसी नेते निर्माण करण्याची क्षमता भाजपामध्ये आहे. त्याप्रमाणे खडसे, पंकजाताई मुडे, बावनकुळे वगैरे काही ओबीसी नेते निर्माण करण्यात आलेत. त्यांना काही महत्वाची पदेही दिलीत. काही दिवस भरपूर खाऊ-पिऊ दिलं. कुणी चिक्की खाल्ली, कुणी जमिनच हडप केली. बोकडाला चरायला मोकळं कुरण मिळालं की तो काही दिवसातच चरबीदार बनतो व मालकावरच शिंगे उगारतो. असा चरबीदार व माजोर्डा बोकड कापून खाण्याची मजा काही औरच असते! ओबीसी नेते चरबीदार बनल्यानंतर कापून खाण्यासाठीच असतात, हे सर्व राजकीय पक्षांनी वारंवार सिद्ध करूनही या पक्षांच्या कार्यालयात आजसुद्धा अनेक ओबीसी लोक लाळ गाळत मुडद्यासारखे वावरत असतात.
 जातीव्यवस्थेचा केमिकल लोच्या एकीकडे तुम्हाला ब्राह्मण-क्षत्रियांची गुलामी करायला भाग पाडतो, तर दुसरीकडे जातीसाठी-कॅटेगिरीसाठी काहीतरी चांगले काम केलेच पाहिजे, असा धोशापण लावतो. या द्वंदातून सुरक्षितपणे बाहेर निघणं फार अवघड असतं. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरी शास्त्राचा अभ्यास असावा लागतो. तसा अभ्यास एकाही राजकीय ओबीसी नेत्याचा नाही. त्यामुळे त्यांचा खून होणे, त्यांचे जेलमध्ये सडणे आणी आयुष्यभर जेलच्या भीतीने व मृत्युच्या भीतीने हे ओबीसीनेते चालते-बोलते मुडदे बनून राहतात. आणी आशिष जाधवसाहेब अशा मुडद्यांकडून ‘पाठपुराव्याची अपेक्षा’ ठेवतात.  

(लेखनः 18जुलै2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, १९जुलै20)
लेखक-- *प्रा. श्रावण देवरे*
*Mobile –* 88 301 27270
*Blog लिंक-* http://shrwandeore.blogspot.com/

No comments:

Post a Comment