बहुजननामा-121
कुणाच्या
खांद्यावर कुणाचे ओझे?!
-1-
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या काळात
एका वृत्तपत्रात एक बातमी छापून आली
होती. बातमीत म्हटले होते की, पुण्यातील काही शिक्षित ब्राह्मणांनी इंग्रज अधिकार्यांकडे
विनंती अर्ज केला आहे. अर्जात म्हटले आहे की, ‘इंग्रजांच्या राज्यात कलेक्टर
वगैरेसारख्या उच्च-श्रेणीच्या नोकर्या फक्त इंग्रज शिक्षितांनाच मिळतात, आम्हा
हिंदूंना या उच्चश्रेणीच्या नोकर्या मिळाल्या पाहिजेत व त्यासाठी हिंदूंना आरक्षण
मिळाले पाहिजे.’ तात्यासाहेबांच्या घरी रोज संध्याकाळी कार्यकर्ते जमा होत
होते व दिवसभराच्या घडामोडींसह वैचारिक मुद्दयांवरही चर्चा होत असे. त्याचबरोबर
कृती-कार्यक्रम आखून जबाबदार्यांचे वाटप होत असे. अशाच एका बैठकीत या बातमीचे
सामुहिक वाचन करण्यात आले व त्यावर तात्यासाहेबांनी मार्गदर्शन करावे, यासाठी सर्व
कार्यकर्त्यांनी विनंती केली.
त्यावर तात्यासाहेबांनी जे मार्गदर्शन केले ते जात्यंतक तत्वज्ञानाची तर्कशूद्ध मांडणी करणारे
महा-विवेचन ठरले आहे. या महा-विवेचनातून
त्यांनी जातीअंताचे अनेक सिद्धांत मांडून कृती-कार्यक्रमही सांगीतला. यावर मी
वेळोवेळी अनेक पुस्तकातून व बहुजननामाच्या लेखातून चर्चा केलेली आहे. त्याची
पुनर्रावृत्ती मी येथे करणार नाही. परंतू वर्तमान परिस्थितीचे अवलोकन करता
तात्यासाहेबांच्या या ऐतिहासिक महा-विवेचनाची पुन्हा आठवण झाली.
तात्यासाहेब त्या बातमीचे विवेचन करतांना पहिले
वाक्य उच्चारतात, ‘‘नाव
हिंदूंचे आणी गाव मात्र ब्राह्मणांचे’’ म्हणजे हिंदूंच्या नावाने नोकर्या
मागायच्या आणी ब्राह्मणांनी त्या फस्त करायच्या, हे आतील मर्म तात्यासाहेबांनी उघड
करून सांगीतले. हिंदूंच्या खांद्यावर ब्राह्मणांच्या वैदिक धर्माचे ओझे हजारो
वर्षांपासून आहेच, आता इंग्रजांच्या बदलत्या काळात प्रशासकीय
अधिकार-पदे बळकाविण्यासाठी ब्राह्मण-आरक्षणाचे ओझे
हिंदूंच्या खांद्यावर ठेवले जात होते. हे मर्म आजही
शूद्रादिअतिशूद्रांच्या मेंदूपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे ब्राह्मण आजही
वेगवेगळी कारस्थाने करतात व त्याला आमचे तथाकथित बुद्धीमान लोक बळी पडतात. खरे
म्हणजे अशा लोकांना बुद्धीमान तरी कसे म्हणायचे? हे आपली बुद्धी फक्त आरक्षित
नोकरी मिळविण्यासाठी खर्च करतात. एकदा का
नोकरी मिळाली, की ते आपल्या बुद्धीचा वापर फक्त मौजमस्तीचे ‘खाण्यासाठी व
पिण्यासाठी खर्च करतात. त्यामुळे ते बुद्धीभ्रष्ट होतात. मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करतांना यांचा फुले-शाहू-आंबेडकर उलट्या पावलांचा होऊन
जातो. म्हणजे यांची
बुद्धी उलटी चालते. उलटी बुद्धी म्हणजे मराठा-ब्राह्मणांच्या हितासाठी चालते. अडाणी लोक अज्ञानामुळे
ब्राह्मणांच्या षडयंत्रांना बळी पडतात. हे बुद्धीभ्रष्ट लोक अतिज्ञानामुळे
ब्राह्मणांच्या षडयंत्रांना बळी पडतात.
तर, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, हा प्रकार या
बुद्धीभ्रष्टांमुळे युगेनयुगे सर्सास चालू राहतो. मंडल आयोगामुळे स्वतःच्या
विकासाचे ओझे स्वतःच्या खांद्यावर पेलायला ओबीसी समर्थ होत होता. 52 टक्के
ओबीसी समर्थ झाला तर जातीअंताचा काळ अधीक जवळ
येईल, याची साधी कल्पनाही फुले-आंबेडकरी
बुद्धीभ्रष्टांना नव्हती, मात्र ब्राहमणांना पुरेपूर खात्री होती व आहे. त्यामुळे
या समर्थ होत चाललेल्या ओबीसींचे खांदे कमजोर केले पाहिजेत, यासाठी ब्राह्मणी
कृती-कार्यक्रम आखण्याचे काम सुरू झाले. या षडयंत्रात ‘‘हवेत तलवारी फिरविणार्या’’ क्षत्रिय जातींचा ‘रॉ-मटेरियल’ म्हणून वापर
करण्याचे ठरले, त्याप्रमाणे त्यांनी जाट-पटेल-मराठा जातींना ओबीसीत घुसखोरी करण्यासाठी चिथावणी दिली. संपूर्ण
देशात जाट-पटेल मराठ्यांचे ओबीसी दर्जा मिळावा म्हणून लाखोंचे मोर्चे
गाजलेत, रेल्वे रोको, दिल्ली घेराव वगैरे प्रकार संघ-भाजपाच्या मार्गदर्शनाखाली
सुरू झालेत.
या क्षत्रिय जातींमध्ये जे प्रामाणिक विचारवंत
होते, त्यांना या जातीपासून तोडण्यात आले. या प्रामाणिक विचारवंतांना
मोर्च्यांच्या बैठकांमधून अपमानास्पदरित्या हाकलून देण्यात आले. हा प्रकार महाराष्ट्रातही
घडला. महाराष्ट्रातील दोन ऋषीतुल्य माजी न्यायधिश माननीय श्री. पी.बी.सावंत व
न्यायधिश कोळसे-पाटील यांना अक्षरशः बैठकितून हुसकावून लावण्यात आले. कारण या
प्रामाणिक विचारवंतांनी फुले-शाहू-आंबेडकरांचा सखोल अभ्यास केला असल्याने मराठा
आरक्षणाचे ब्राह्मणी षडयंत्र यांनी ओळखले आहे. असे विचारवंत लोक मराठ्यांच्या
बैठकीत सामील व्हायला लागलेत तर संघ-भाजपाचे षडयंत्र यशस्वी कसे होणार? जाट-पटेल-मराठा
जातीच्या आरक्षणाचे ओझे ओबीसींच्या खांद्यावर ठेवण्यासाठी हे लोक कोणत्याही नीच
पातळीवर जायला तयार आहेत. कारण संघ-भाजपाला मराठा आरक्षणाशी काहीही देणे-घेणे
नाही, त्यांना काहीही करून ओबीसींचा समर्थ होत चाललेला खांदा कमजोर करून सोडायचा
आहे. या क्षत्रिय जातींवर संघ-RSS ने पूर्णपणे कब्जा केलेला आहे, त्यामुळे ते यशस्वी
होत आहेत.
-2-
जगात संघ-RSS ही अशी एकमेव संघटना आहे की, जीचा कब्जा देशातील
प्रत्येक राजकीय पक्षावर आहे. त्यामुळे संघभाजपाने घेतलेले निर्णय, केलेले
कायदे व मोडलेले संविधान कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर रद्द केले जातील व पुन्हा
पुरोगामी निर्णय कायम केले जातील, असे आश्वासन कॉंग्रेसच काय कोणताही राजकीय पक्ष
देण्याची हिम्मत करू शकत नाही, इतकी दहशत संघ-RSSची आहे. त्यामुळे संघ-भाजपाने षडयंत्र
करून जे मराठा आरक्षण दिले आहे, ते टिकविण्याची धडपड कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना
करीत आहे. संघ-RSS ची दहशत इतकी घोर-सैतानी आहे की, ते कोणत्याही
क्षणाला कोणत्याही नेत्याला जेलमध्ये टाकू शकतात. कारण सीबीआय, ईडी-सीडी, रॉ वगैरे
सर्व गुप्तचर संघटना संघ-RSS च्या कब्ज्यात आहेत. शिवाय मनुमिडिया आहेच सोबतीला!
स्वतःला पुरोगामी म्हणविणारे सगळेच पक्ष संघ-RSSच्या दहशतीत असल्याने ते ब्राह्मण-बनिया-क्षत्रिय
जातीच्या हिताचे कायदे ताबडतोब करतात. कोट्यावधी रूपयांचा निधी एका मिनिटात मंजूर
करतात. मात्र हे करीत असतांना एक काळजी घेतली जाते. अर्थमंत्री व गृहमंत्री मराठा
किंवा ब्राह्मणच असेल, याची काळजी घेतली जाते. कारण प्रत्येक खात्यात काही विशिष्ट
टक्केवारीने संबधित मंत्र्यांना टेबलाखालून अब्जावधी रूपये मिळत असतात. हे
टेबलाखालचे अब्जावधी रूपये दलित+आदिवासी+ओबीसी मंत्र्यांना मिळणार नाहीत, याची
दक्षता घेतली जाते. कारण या कनिष्ठ जातीच्या मंत्र्यांनी अब्जावधी रूपयांची
संपत्ती कमावली तर ते ताबडतोब मुख्यमंत्री पदावर दावा सांगतात.
मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकणारा ओबीसी-दलित मंत्री त्यांच्या दृष्टीने माजलेला
असतो. अशा ओबीसी मंत्र्याचा माज उतरविण्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकले जाते,
भ्रष्टाचार्याच्या फाईल्स तयार करून त्यांच्या मागे ईडी-सीडी लावली जाते. यासाठी
गृहमंत्रीपदही ब्राह्मण-मरांठा मंत्र्यांकडेच ठेवले जाते. एखाद्या खात्याला
कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करायचा असेल आणी तेथे ओबीसी-दलित मंत्री असेल तर
त्याला ‘टार्गेट’ करून प्रचंड छळ केला जातो. त्याचा मानसिक छळ करून नितीधैर्य
खचवले जाते. ओबीसी मंत्री वडेट्टीवारसाहेबांचे प्रकरण ताजेच आहे आणी भुजबळांचे
प्रकरण ऐतिहासिक आहे. दलित+आदिवासी+ओबीसींचे खच्चीकरण करण्यासाठी काही छळ करणार्या
भाडोत्री टोळ्या निर्माण केल्या जातात, या टोळ्यांना अमूक ब्रिगेड, टमूक
क्रांती-मोर्चा अशी संघटनात्मक नावे दिली जातात. या संघ-RSS च्या भाडोत्री टोळ्या असतात व त्यांना सर्वच राजकीय
पक्षांचा उघड पाठींबा असतो.
मात्र या राजकीय पक्षांच्या ढुंगणावर
दलित+आदिवासी+ओबीसींची लाथ बसली की, मग ते तात्पुरते का होईना, पुरोगामी बनतात व
कनिष्ठ जातींसाठी काहीतरी चांगले काम करतात. परवाचाच अनुभव पहा...... केवळ एका
जातीसाठी सारथी नावाची संस्था RSS-भाजपाच्या
सरकारने निर्माण केली. ही संस्था अ-संवैधानिक व अनैतिक आहे. पण संघ-RSS चा नितीमत्तेशी काय संबंध? केवळ ओबीसी वित्त
महामंडळाचा निधी सारथीकडे वळवून ओबीसींचा खांदा कमजोर करणे, हा एकमेव उद्देश! परवा
सारथी संस्थेला 8 कोटी रूपयांचा निधी एका मिनिटात मंजूर झाला, अशी शेखी कॉंग्रेसचे
प्रवक्ते सावंतसाहेब टीव्ही चॅनलवर मिरवीत होते. मी होतोच तिथे. मी सावंतांना
प्रश्न विचारला की, ‘‘मराठ्यांच्या सारथीला एका मिनिटात आठ कोटी दिलेत, मग ओबीसी
वित्त महामंडळाला, महाज्योतीला किती मिनिटात, किती तासात वा किती वर्षात निधी मिळवून
देणार? या राज्यात काय फक्त मराठाच राहतात का? दलित+आदिवासी+ओबीसी हे काय
इराण-इराकमधून आले आले आहेत काय? हे 85 टक्के लोक तुम्हाला मते देत नाहीत काय? मूळ
खर्या ओबीसींना उपाशी ठेवतात आणी खोट्या SEBC ला मात्र जिलेबीवर बासुंदी देतात! ओबीसींच्या वित्त
महामंडळाला तीन वर्षांपासून अध्यक्षच नाही? निधी-पैसे देणे तर फारच लांबची गोष्ट!
महाज्योतीला मंत्रालयात अजूनही खुर्ची-टेबल-कपाट सापडत नाही?’’ गंमत बघा....मी
परवाच अशा लाथा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कमरेत घातल्या आणी कालच ओबीसी आयोगाचे पुनर्रगठण
करण्याची जाहीरात निघाली.
या पुढील चर्चा पुढील भागात... सत्य की जय
हो!
(लेखनः 11जलै2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 12जुलै20)
लेखक-- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27270
Mobile – 88 301 27270
Email-s.deore2012@gmail.com
Link for this article to read in text: https://shrwandeore.blogspot.com/2020/07/121-bahujannama-oze-lokmanthan-12july20.html
Link for this article to read in text: https://shrwandeore.blogspot.com/2020/07/121-bahujannama-oze-lokmanthan-12july20.html

No comments:
Post a Comment