http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, December 12, 2020

134 BahujanNama Obc Bachav 13Dec20 Lokmanthan

बहुजननामा-134 ************** प्रा. श्रावण देवरे ओबीसी आरक्षण बचाव! आता नाही, तर कधीच नाही!! -1- मराठा आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन ज्या तत्परतेने व लगबगीने कामाला लागले आहेत, त्यामागची त्यांची तडफड आम्ही समजू शकतो! त्यासाठी तनमनासह धनाच्या राशी मोठ्याप्रमाणात खर्च होत आहेत, वकीलांच्या फौजा रणांगणात उतरविल्या जात आहेत व त्यांना लढण्यासाठी सर्वप्रकारची रसद शासनातर्फे पुरविली जात आहे. याबद्दल आनंदच आहे. फक्त दुःख एवढेच आहे की, ओबीसी आरक्षणसुद्धा मराठा आरक्षणाप्रमाणे शासनाचेच अपत्य आहे, याचा सोयिस्कर विसर महाराष्ट्र शासनाला पडलेला आहे. मराठा आरक्षण वाचवितांना ओबीसी आरक्षण धोक्यात येत आहे, याची पुसटशी जाणीवसुद्धा महाराष्ट्र सरकारला नाही. ओबीसी आरक्षणावर येऊ घातलेला घाला रोखण्यासाठी ज्यांनी न्यायालयात पिटिशन्स दाखल केलेल्या आहेत व त्यांच्यामार्फत जे वकील कोर्टात लढत आहेत, त्यांची साधी दखलही सरकार घ्यायला तयार नाही.
ओबीसी आरक्षण, त्यांचे पिटिशनर्स व वकीलांना सरकारकडून मिळणारी उपेक्षेची वागणूक व मराठा आरक्षणवाल्यांचे सुरू असलेले एकतर्फी लाड यामागे काय कारणे आहेत? एखाद्या समाजाचे शासकिय लाड करणे याला शासकीय पर्यायवाची शब्द आहे- विशेष उपाययोजना करून त्या समाजाच्या हिताचे कार्यक्रम राबविणे. तसेच एकाद्या समाजघटकाच्या चूका पोटात घालून त्यांची सतत भलावण करीत राहणे, हे सुद्धा दुसर्‍या प्रकारचे शासकीय लाड समजले जातात. हे जे दुसर्‍या प्रकारचे शासकीय लाड आहेत, ते मुसलमानांच्या संदर्भात सांगीतले गेले आहेत. बहुपत्नीक विवाह, बहुअपत्यक कुटुंब, तोंडी तलाक पद्धती, पडदापद्धती वगैरे अशा अनेक चूका पोटात घालून शासन मुसलमानांची भलावण करीत असते व आपले (स्युडो) सेक्युलॅरिझमचे धोरण जनतेवर लादत असते. यामागे बोटबँकचे गणित असते, असाही आरोप यापूर्वी होतच होता. परंतू शासनाने कधीही मुसलमानांसाठी विशेष आर्थिक उपाययोजना आखून त्यांच्या विकासाचे कार्य केले नाही. बस्स! मुसलमानांच्या अनिष्ट चालिरितींना व त्यांच्या ऑर्थोडॉक्स आयडेंटीला मान्यता व संरक्षण दिले की ही धार्मिक वोटबँक सहज पदरात पडत असते, त्यामुळे मुसलमानांसाठी सरकारी तिजोरी खोलण्याची गरज नसते. हा कॉंग्रेसी लाडाचा मुसलमानीय तमाशा आपण 70 वर्षांपासून पाहात आलो आहोत व तो समजूनही घेतो आहोत. परंतु अलिकडे मराठा जातीचे जे शासकीय लाड सुरू आहेत, ते कोणताही सूज्ञ माणूस समजून घेऊ शकत नाही व तर्काच्या आधारावर ते कोणाला पटणारेही नाहीत. कारण ‘‘मराठ-लाड’’ हे प्रकरणच सर्वसामान्यांच्यादृष्टिने अनाकलनीय आहे. मराठ-लाड प्रकरणात दोन्ही प्रकारचे लाड येतात. 70 वर्षांच्या सत्ता-काळात त्यांनी स्वतःचे खूप वेगवेगळे लाड करून घेतलेत. सहकार-लाड, सामंती-लाड असे असंख्य लाड जनता आजही उघड्या डोळ्याने पाहात असते. जनतेने गल्लीतल्या निवडणूकीत ज्यांचे ‘डिपॉझिट’ जप्त केले आहे, अशा सामंतांना ‘राजे’ म्हणण्याचा आग्रह धरणे, हा सुद्धा लाडाचाच एक भाग आहे. त्यात आता आरक्षण-लाडाची भर पडलेली आहे. जे मराठा-आरक्षण सात आयोगांनी व हायकोर्ट सुप्रिम कोर्टांनी वारंवार फेटाळून लावले आहे, ते आरक्षण मिळविण्यासाठी शेवटी पेशवा षडयंत्र वापरावे लागले आहे, याचा सोयिस्कर विसर सर्वांना पडलेला आहे. मराठा जातीचे वर्चस्व असलेला गायकवाड आयोग नेमणे, मराठ्यांच्या तात्परत्या संशोधनसंस्था स्थापन करून त्यांच्याच कडून मराठा-सर्व्हेक्षण करून घेणे, खोटे सर्व्हेक्षण व खोटे रिपोर्ट तयार करून मराठा आरक्षणाची शिफारस करणे, हायकोर्टात जाणीवपूर्वक मराठा वकील व मराठा जातीचा न्यायधिश नेमणे व जातीच्याच लोकांकडून मराठा आरक्षण मंजूर करवून घेणे, याला पेशवा-षडयंत्र म्हणतात. विचार करा की जर आज सुप्रिम कोर्टात एकादा मराठा न्यायधिश असता तर, त्याने सर्व नितीमत्ता गहाण टाकून मराठा आरक्षण मंजूर करून टाकले असते. हेच नितीमत्ता गहाण टाकण्याचे काम गायकवाड-मोरे या मराठा न्यायधिशांनी मुंबई हायकोर्टात केले व त्यांना साथ इतर मराठा वकीलांनी केली. ओबीसी वकीलांना बोलूही दिले नाही व त्यांचे निवेदन रजिस्टरही केले नाही. मराठ्यांनी मराठ्यांसाठी मराठा-आरक्षण एकतर्फी जजमेंट(?) देऊन बळकावून घेतले आहे. याला पेशवा षडयंत्र म्हणायचे कारण हे आहे की, या न्यायालयीन नवटंकीचे मार्गदर्शक, संचालाक व नियंत्रक सर्वेसर्वा पेशवा-फडणवीस होते व आहेत. पेशवा-ब्राह्मण व सामंती-मराठा या सर्वांची मराठा आरक्षणासाठीची उठाठेव खरीखूरी प्रामाणिक असती, तर दलित-ओबीसींना त्याबद्दल काही आक्षेप असण्याचे कारण नव्हते व आजही आमचा कोणाचाच आक्षेप नाही. मात्र मराठा आरक्षणाच्या आड लपून ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचे यांचे षडयंत्र आज नागडे-उघडे झालेले आहे. जे लोक आधी ‘‘ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता’’ मराठा-आरक्षण देण्याचे समर्थन करीत होते, तेच नालायक लोक आता उच्चरवाने ‘‘मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण पाहिजे’’ म्हणून बोंबलत सुटले आहेत. 20 वर्षांपूर्वी फक्त मोघमपणे ‘मराठा आरक्षण’ शब्दाचा उगम झाला. त्याला ओबीसींनी ठाम व ठोस दिशा दिली आणी सशर्त पाठींबाही दिला. ओबीसींची शर्त ही होती की, ‘आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा तोडण्यासाठी मराठ्यांनी आंदोलन केले पाहिजे.’ ‘दलित-ओबीसींच्या आरक्षणविरोधात दंगली घडवून आणणारे सामंती-मराठा आता स्वतःच आरक्षण मागत आहेत’, एवढ्या एका बातमीनेच बामसेफी खूश झालेत व बिनशर्त पाठींबा देऊन आंदोलनात सहभागीही झालेत. मराठा-आरक्षण मिळाल्यावर सामंती-मराठा हे फुले-आंबेडकरवादी बनतील व संघ-भाजपाच्या विरोधात लढतील, अशी ‘अनाभ्यासू’ भाबडी अपेक्षा बामसेफींना होती. ही धारणा आंबेडकरवादाच्या विरोधात असल्याने ती खोटीच ठरणार होती व ती खोटी ठरलीच! 2015-16 साली मराठा सेवा संघाच्या स्टेज-मागे मराठा आरक्षणाचा कृती-कार्यक्रम ठरवितांना गडकरी-फडणवीसांना विश्वासात घेतले गेले, बामसेफींना नाही. ओबीसींना 1993 साली आरक्षण मिळताच ओबीसींच्या स्वतंत्र पक्ष-संघटना स्थापन झाल्यात व त्यांनी संघ-भाजपाच्या विरोधातील लढा तीव्र केला. मराठ्यांना 2018 साली आरक्षण मिळताच सगळे सामंती राजे-महाराजे भाजपमध्ये गेलेत व संघ-भाजपाचे दलित-ओबीसीविरोधी मनुवादी राजकारण भक्कम करू लागलेत. ओबीसी आरक्षण हे फुले-आंबेडकरवादाच्या तत्त्वानुसार संवैधानिक आहे व मराठा आरक्षण हे वैदिक धर्मानुसार मनुस्मृत्यैक आहे, हे समजण्यासाठी आंबेडकरवादाचा सुक्ष्म अभ्यास करावा लागतो, हे सत्य बुद्धिस्ट-बामसेफींना ज्या दिवशी समजेल, त्या दिवशी ते धन्य होतील. मराठा आरक्षण हे मनुस्मृत्यैक कसे? मनुस्मृती स्पष्टपणे सांगते की, राजकीय सत्ता ही क्षत्रियांच्याच ताब्यात राहीली पाहिजे. जेव्हा जेव्हा क्षत्रियांना सत्तेचा माज चढतो, तेव्हा तेव्हा अवतार घेऊन विष्णू-ब्राह्मण ही सत्ता आपल्या ताब्यात घेतो. मात्र दलित-ओबीसी आरक्षणामुळे क्षत्रियांच्या हातून सत्ता निसटत चालली आहे व ती शूद्रादिअतिशूद्रांच्या हातात जात आहे, हे पाहून सर्वात जास्त पित्त खवळले ते वैदिक- पेशव्यांचे! हा मनुस्मृतीचा घोर अपमान आहे, असे समजून ते कामाला लागले व शेवटी मराठा आरक्षण साकार केलेच! मनुस्मृतीच्या संहितेतून साकार झालेले मराठा आरक्षण आधी ओबीसीवर घाला घालणार व नंतर दलित-आदिवासींच्या आरक्षणावर! ही काळ्या दगडावरची रेघ समजावी! आज गावपातळीवरचा ओबीसी आपले संवैधानिक आरक्षण वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. अगदी विद्यार्थी, तरूण, तरूणी, म्हातारे जागृत झाले असून तेली, माळी, बारा बलुतेदार, भटके-विमुक्तांपर्यंतच्या ओबीसी जाती संघटित होत आहेत व आपले आरक्षण वाचविण्यासाठी आक्रोश करीत आहेत. ना शासनाचा पाठींबा, ना स्वजातीतील धनदांडग्यांचा पाठींबा! 1992 पर्यंत ओबीसी चळवळी करून ज्यांनी मंडल आयोग लागू करवून घेतला, त्यांच्यापैकी आज कोणीही ‘लाभार्थी’ नाहीत. मंडल आयोग लागू झाल्यानंतर अनेक लाभार्थी अचानक ओबीसी नेता म्हणून पुढे आलेत व त्यांनी अब्जावधी रूपयांची ‘माया’ कमावली. ओबीसी आरक्षण धोक्यात असतांना हे लबाड लाभार्थी नेते खिशात हात घालून पैसे काढीत नाहीत. सत्तेत आहेत, मंत्री आहेत, पण शासनाकडून काही मदत मिळाली पाहिजे, यासाठी कधी थोबाड उचकटत नाहीत. फक्त समित्या-उपसमित्या स्थापन करून ओबीसी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यापलिकडे यांना काहीही माहीत नाही. मराठा वकीलांप्रमाणे ओबीसी वकीलांनासुद्धा शासकिय मदत मिळाली पाहिजे, असा साधा उल्लेखही हे ओबीसी मंत्री आपल्या उपसमितीच्या अहवालात करीत नाहीत. प्रस्थापित मराठा-ब्राह्मणांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे की, ओबीसी नेत्यांना फक्त आश्वासन दिले तरी ते खूश होतात व आपली ओबीसी वोटबँक मराठा-ब्राह्मणांच्या पदारात ‘दान’ म्हणून टाकून देतात. अशा वेळी सर्वसामान्य ओबीसी जनतेने पुढे यावे व आपले आरक्षण वाचवावे. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी याचिकाकर्त्यांनी एक संस्था रजिस्टर केली असून बँकेत सामायिक खाते निर्माण केले आहे. ओबीसी बहिण-भावांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी आपल्या स्वकष्टार्जित कमाईतून
आपापल्या क्षमतेनुसार या अकाऊंटमध्ये पैसे जमा करावेत. आपला एक रूपयासुद्धा चळवळीला स्फुर्ती देणारा ठरणार आहे. बँक डिटेल्स पुढीलप्रमाणे- बँकेचे नावः ऍक्सिस बँक, शाखाः वानवडी पुणे, खात्याचे नावः ओबीसी वेलफेअर फाऊंडेशन, अकाऊंट नंबरः 92 00 100 701 22 932, आयएफएस कोडः UTIB 00 00 110, या खात्यात पैसे जमा करून माझ्या पुढील मोबाईल नंबरच्या व्हाट्सपवर पैसे पाठविल्याचा स्क्रीनशॉट पाठवावा ही विनंती. तो पर्यंत सत्य की जय हो!....... (लेखनः 11 डिसेंबर प्रकाशनः 13डिसेंबर20, दै. लोकमंथन)  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 Links for this Article:- 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/12/134-bahujannama-obcbachav-13dec20.html 2) https://shrwandeore.blogspot.com/2020/12/134-bahujannama-obc-bachav-13dec20.html ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/

No comments:

Post a Comment