http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, December 19, 2020

135 BahujanNama Mahamarg 20 Dec 20

बहुजननामा-135 ************** प्रा. श्रावण देवरे ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्याचा महामार्ग!! -1- गेल्या 2-3 वर्षांपासून ‘मराठा मराठा’ जप करणारे फडणवीस साहेब परवापासून अचानक ‘ओबीसी ओबीसी’ असा जप करू लागले आहेत. हे अचानक जप-बदलाचे कारण आपण सगळे जाणतोच आहोत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपचे सर्व (ब्राह्मण+मराठा) उमेदवार निवडणूकीत सपशेल पडले व देवेन्द्रजी अचानक भानावर आलेत. ही किमया ओबीसींशिवाय दुसरे कोणीच करू शकत नाहीत, हेही त्यांच्या लक्षात आले. ओबीसी बदलत आहे, याची त्यांना खात्री होते आहे.
आजवर सर्वच ब्राह्मण+क्षत्रिय जातींच्या मालकीचे पक्ष असे गृहीत धरून चालत होते की, ओबीसींना फक्त आश्वासन दिले की, काम भागते. ओबीसी जनगणना करण्याचे आश्वासन कॉंग्रेस व भाजपच्या अनेक केंद्रसरकारांनी पार्लमेंटसारख्या सर्वोच्च सभागृहात अनेकवेळा दिले आहे. मात्र जेव्हा जनगनना करणार्‍या डिपार्टमेंटचे अधिकारी जनगननेचा फॉर्म छापायला घेतात, तेव्हा प्रत्येकवेळी ते आपल्या मंत्र्यांना ओबीसी कॉलम टाकण्यासाठी विचारणा करतात. त्यावेळी हे मंत्री आपल्या अधिकार्‍यांना स्पष्टपणे सांगतात की, ‘‘मंत्री म्हणून मी पार्लमेंटमध्ये ओबीसी जनगणना करण्याचे आश्वासन दिलेले आहे. ओबीसींसाठी ‘आश्वासन’ हीच फार मोठी गोष्ट आहे. तेवढ्या एका आश्वासनावर ते आपल्याला भरघोस मत-‘दान’ करत असतील, तर प्रत्यक्ष ओबीसी जनगणना करण्याची गरजच काय?’’ फडणवीसांचाही असाच गैरसमज आतापर्यंत होता. 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या 15 दिवस आधी फडणवीसांनी धनगरांना 1000 करोड रूपये देण्याची घोषणा केली आणी धनगरांनी पडळकरांच्या भरवशावर आपली धनगर मते भाजपाला ‘दान’ करून टाकलीत. धनगरांना चौथ्यांदा मुर्ख बनविल्याबद्दल भाजपाने पडळकरांना आमदारकीची बक्षिसीही दिली. 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या 5 दिवस आधी फडणवीसांनी धोबी समाजाला एस्सी कॅटिगिरीत टाकण्याचे 4 ओळीचे पत्र दिले. बस्स! या चार ओळीच्या पत्रावर धोबी जात इतकी खूश झाली की, संपूर्ण धोबी जातीने बालाजी शिंदेंच्या भरवशावर भाजपाला मते ‘दान’ करून टाकलीत. एका-एका ओबीसी जातीला पकडून त्यांना मुर्ख बनविण्याचा धंदा हे प्रस्थापित पाच पक्ष वारंवार करीत असतात. ब्राह्मण+मराठा मालक असलेले कॉंग्रेस+राष्ट्रवादी कॉ.+भाजप+सेना+मनसे हे पाच पक्ष आलटून-पालटून ओबीसींना मुर्ख बनवित असतात व ते सत्तेवर येत असतात. मुर्ख बनविणारी ही फुसकी बंदूक कधी पडळकरांच्या खांद्यावर, तर कधी भुजबळांच्या खांद्यावर, कधी पंकजा-खडसे-धनंजयच्या खांद्यावर, तर कधी बालाजी शिंदे व म.जानकरांच्या खांद्यावर असते. आणी हे ढुसके ‘ओबीसी-लांडगे-नेते’ ढाण्या वाघाचं कातडं पांघरून पवार-फडणवीसांनी दिलेली फुसकी बंदूक आपल्या खांद्यावर घेतात व आपल्याच ओबीसी-जातबांधवांना मुर्ख बनवत असतात. ओबीसींच्या प्रत्येक जातीत असे ढुसके-लांडगे वाघाचे कातडे पांघरून ‘नेते’ बनलेले आहेत. हे लांडगे जोपर्यंत जीवंत आहेत, तो पर्यंत तुमच्या ओबीसीतला ‘सिंह-राजा’ कधीच जागृत होऊ शकत नाही. -2- मात्र पदवीधर+शिक्षक मतदारसंघातील निकालांनी फडणवीसांची झोप उडवली. आतापर्यंत संघ-भाजपाचे नेते ओबीसींना ‘हिंदू’ म्हणून हाक मारायचे. ओबीसींना ‘हिंदू’ म्हणून हाक मारली की, ओबीसी धावतच अयोध्येला जातात व बाबरी मशिद पाडतात. ओबीसींना हिंदू म्हणून हाक मारली की, लगेच मुस्लीमविरोधी दंगली पेटतात व संघ-भाजपा सत्तेत बसतो. मात्र परवा फडणवीसांनी आयुष्यात पहिल्यांदा ओबीसींना ‘ओबीसी’ म्हणून हाक मारली. भाजपाने आजवर कधीही ओबीसी सेलचा मेळावा घेतला नाही. मात्र परवा पहिल्यांदाच ओबीसी सेलचा मेळावा घेतला व त्यात फडनवीसांनी पहिल्यांदाच भाषण केले. भाषण कसले ते, सिंहगर्जनाच होती! ‘‘खबरदार! जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर!’’ –इति फडणवीस. फडणवीसांची ही सिंहगर्जना ऐकल्यानंतर उध्दवजींनाही चेव आला. ‘‘ओबीसींचे आरक्षण एका कणानेही कमी होणार नाही’’ –इति उध्दव ठाकरे. या दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला ‘धक्का’ लावण्याचे काम 29 नोव्हेंबर 2018 रोजीच करून टाकले आहे. तो केवळ धक्का नव्हता तर संवैधानिक नितीमत्तेला तो फार मोठा दाग-कलंक होता. त्यावेळी भाजपसेनेचे युती सरकार होते. या भाजप-सेना युती सरकारनेच मराठा-पक्षपाती गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली ओबीसींचा राज्यमागास आयोग नेमला. त्यात मराठा जातीयवादी-पक्षपाती सदस्य नियुक्त केलेत. मराठा जातीचे सर्व्हेक्षण मराठा जातीयवादी व्यक्तींकडून करवून घेतले. या खोट्या सर्व्हेक्षणाच्या आधारावर खोटा अहवाल तयार केला व त्यावर आधारित खोट्या शिफारशी करून ‘मराठा आरक्षण’ नावाचे अनैतिक अपत्य जन्माला घातले गेले. या पापात कॉंग्रेस+राष्ट्रवादी कॉ.+भाजप+सेना+मनसे हे पाचही पक्ष सहभागी आहेत. 29 नोव्हेंबर 2018 रोजी या सर्वच पाच पक्षांच्या आमदारांनी मराठ्यांचे ओबीसीकरण करणारे आरक्षण बील विधानसभेत बिनविरोध मंजूर करून या अनैतिक अपत्याला ‘अधिकृत’ अपत्य ठरवले. या अनैतिक अपत्याच्या गर्भार-काळापासूनच आम्ही त्याविरोधात आंदोलन केले. 15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2018 या 15 दिवसात दोन ओबीसी मोर्चे व दोन धरणे आंदोलने आम्ही आझाद मैदानावर केलीत. त्यावेळी हे ढुसके ओबीसी नेते मराठा-ओबीसीकरण विधेयकाच्या बाजूने जल्लोषात मत-‘दान’ करीत होते. आता ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याच्या वल्गना करून मोर्चे काढणारे हे ढुसके-ओबीसीनेते त्या ‘15 दिवासांच्या महत्वपूर्ण काळात’ बीळात घुसून लपून बसले होते. त्या 15 दिवसांच्या ‘थरार’ काळात या ओबीसी नेत्यांनी आम्हाला साथ दिली असती तर ‘मराठा-आरक्षण’ नावाचं हे अनैतिक अपत्य जन्मालाच आलं नसतं व ओबीसी आरक्षण आज धोक्यात आलं नसतं! -3- तीन पक्षांची मोट बांधून भाजपाला सत्तेबाहेर ठेवल्याने हे पक्ष पुरोगामी ठरत नाहीत. या सत्ताधारी पक्षांनी आतातरी तो गायकवाड आयोगाचा लपवून ठेवलेला अहवाल जगजाहिर करावा व त्यातील न्याय-विसंगतता व अनैतिकता विधानसभेत मांडून सुप्रिम कोर्टाला तसा अहवाल पाठवावा, तरच हे पक्ष पुरोगामी ठरू शकतात. परंतू हे होणे शक्य नाही, कारण या मविआ सरकारमधील तिनही पक्षांचे मालक ब्राह्मण+मराठे आहेत व त्यांच्या पक्षातील दलित+ओबीसी नेते त्यांचे नोकर-गुलाम आहेत! आता जे करायचे आहे ते ओबीसी मतदारांनीच करायचे आहे. त्याची सुरूवात पदवीधर+शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत झालेली आहे. परंतू ही सुरूवात गतिमान होऊन आपल्या ध्येयाप्रत गेली पाहिजे. केवळ भाजपाचे
मराठा+ब्राह्मण उमेदवार पाडून भागणार नाही, तर पुढील सर्वच निवडणूकात या पाचही पक्षांचे उमेदवार ‘चित’ केले पाहिजेत व त्यांचेजागी ओबीसी+दलित विचारवंतांनी पाठींबा दिलेले ‘अपक्ष’ उमेदवार निवडून दिले पाहिजेत. आज दलित+ओबीसींचा एकही पक्ष अस्तित्वात नाही, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र अशा ‘अपक्ष’ प्रयत्नातूनच ओबीसी+दलित+आदिवासी+कष्टकर्‍यांचा पक्ष ‘उभा’ राहू शकतो. ‘वरून’ कोणीतरी राजकीय पक्ष लादण्यापेक्षा आता जनतेतूनच पक्ष साकार झाला पाहिजे. परिस्थिती (नियती) तुम्हाला जातीअंताच्या दिशेने ढकलते आहे. या ढकल-गाडीचे रूपांतर बुलेट-ट्रेनमध्ये झाले पाहिजे. आपल्या जागृतीचे क्षेत्रही विस्तारले पाहिजे व वेगही वाढला पाहिजे. औरंगाबादच्या ज्या ओबीसी प्राध्यापकांनी दोन वर्षांपूर्वी माझ्या कडक भाषेवर नाराज होऊन बहिष्कार टाकला होता, त्याच प्राध्यापकांनी आज माझ्या आवाहनानुसार 53 हजार रूपये जमा केलेत व ओबीसी वकीलांना मदत म्हणून दिलेत. प्रा. वसंतराव हरकळ सरांनी याबाबत पुढाकार घेऊन हे क्रांतिकारक कार्य घडवून आणले. त्यांचे अभिनंदन! वैचारिक जागृती ही केवळ व्हाटसप+फेसबुक पर्यंत मर्यादित राहू नये, वैचारिक जागृती ही ‘तनमनधनात’ रूपांतर होऊन ठोस राजकीय पर्यायापर्यंत पोहोचली पाहिजे. आजची सर्व न्यायालये ही राजकीय-गुलाम झालेली आहेत. या न्यायालयांकडून तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर तुमच्याजवळ राजकीय ताकदही हवी! त्यासाठी ओबीसी+दलित मतदारांनी पुढील निवडणूकांमध्ये कॉंग्रेस+राष्ट्रवादी कॉ.+भाजप+सेना+मनसे या पाचही पक्षांचे उमेदवार पराभूत केले पाहिजेत व सच्चे फुलेशाहूआंबेडकरवादी ‘अपक्ष’ उमेदवार निवडून आणले पाहिजेत. अशा पद्धतीने 5-10 अपक्ष उमेदवार निवडून आणलेत तर, फडणवीस स्वतःच दिल्लीकडे धाव घेतील व सुप्रिम कोर्टाला सांगून ‘मराठा आरक्षण’ रद्द करवून आणतील! ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्याचा हाच एकमेव ‘महामार्ग’ आहे. हे स्वप्न साकार होईपर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!....... (लेखनः 18-19 डिसेंबर, प्रकाशनः 20डिसेंबर20, दै. लोकमंथन)  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 Links for this article- 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/12/135-bahujannama-mahamarg-20-dec-20.html 2) https://shrwandeore.blogspot.com/2020/12/135-bahujannama-mahamarg-20-dec-20.html ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/

No comments:

Post a Comment