http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, December 6, 2020

133 BahujanNama ThamBhumika 6Dec20 Lokmanthan

बहुजननामा-133 ************** प्रा. श्रावण देवरे योग्य व ठाम भुमिकेची दुसरी आघाडी! -1- योग्य भुमिका व ठाम भुमिका नसेल तर, तुमची कोणतीही कृती वा आंदोलन हे शत्रूच्या फायद्यात जाऊन पडते. अज्ञानातून योग्य भुमिका न घेणे समजू शकतो, परंतू वारंवार सूचना देऊनही व माहिती असनही काही लोक जाणूनबूजून चुकीची भुमिका घेत असतील तर, त्यात शत्रूचे षडयंत्र आहे, हे स्पष्ट होते. एक-दोन ताजी उदाहरणे दिलीत तर स्पष्ट होईल परवा पुण्यात ओबीसींचा मोर्चा झाला. हा मोर्चा लाखोंचा झाला असता, परंतू, काही मुर्ख लोकांनी या मोर्च्यात अचानक शरद पवारांचा फोटो मिरवायला सुरूवात केली आणी स्वाभिमानी असलेल्या ओबीसींनी मोर्च्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे लाखांचा मोर्चा हजारातच निघाला. मोर्चा ओबीसींचा आणी फोटो मराठ्याचा असेल तर आपण किती हीन पातळीवरचे गुलाम आहोत, याची कल्पना येते. राज्य मागास आयोगाचे गठण करतांना फडणवीसांनी असेच ‘पेशवा-षडयंत्र’ यशस्वी केले. आयोग ओबीसी जातींसाठी, मात्र आयोगाचा अध्यक्ष व सदस्य मराठा जातीचे! याच धर्तीवरचे ‘मराठा-षडयंत्र’ पुण्यात यशस्वी करण्यात आले. ओबीसी नेता म्हणून एकवेळ भुजबळ मान्य होतील, पण शरद पवार ओबीसी नेता होऊच शकत नाहीत. ते उघडपणे स्वतःला ‘मराठा-नेता’च म्हणवतात. बरे, हा मराठा नेता ओबीसींच्या हिताचं काही काम करीत असेल तर, त्याचे नेतृत्व एक वेळ मान्य होईल. राजवंशात जन्मलेले क्षत्रिय व्ही.पी. सिंग यांना ‘ओबीसीचे मसिहा’ मानले जाते, कारण त्यांनी मंडल आयोग अमलबजावणीसाठी प्रधानमंत्रीपदाला लाथ मारली. मात्र ओबीसींचे शत्रू म्हणूनच शरद पवार कार्य करीत असतील आणी तरीही पवारांचा फोटो ओबीसी मोर्च्यात मिरविला जात असेल तर हे शत्रूचे षडयंत्र होते व ते यशस्वी झाले, असे समजायचे का?
दुसरे एक उदाहरण चंद्रपूरच्या मोर्च्याचे! हा मोर्चा लाखांच्या घरात निघाला, त्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले पाहिजे. मात्र मोर्च्याची भुमिका योग्य व ठाम नसेल तर, शत्रूचे फावते. या मोर्च्याची सुरूवातीची माहितीपत्रके वाचली. त्यात ओबीसी जनगणनेचा मुद्दा होता. मात्र ओबीसी जनगणना जर होतच नसेल, आणी ती होणारच नाही, हे स्पष्टपणे केंद्र सरकार सांगत असेल तर, ओबीसींनी पुढे काय केले पाहिजे, हे माहिती पत्रकात सांगणे आवश्यक होते. दुसरे सर्वात मोठे संकट ओबीसींवर येऊ घातले आहे, ते मराठा ओबीसीकरणाचे! या संकटामुळे खर्‍या ओबीसींचे आरक्षणच खतम होत आहे. एवढे मोठे संकट ओबीसींच्या डोक्यावर टांगले जात असतांना मोर्च्याच्या माहितीपत्रकात मराठा ओबीसीकरणाबाबत एक चकार शब्दसुद्धा नाही. मोर्च्याचे संयोजक कदाचित विसरले असतील म्हणून मी फेसबुकवर एक पोस्ट टाकून व काही लोकांशी प्रत्यक्ष चर्चा करून या दोन मुद्यांची आठवण करून दिली. पोस्टमध्ये व प्रत्यक्ष चर्चेत मी पहिला मुद्दा स्पष्ट करतांना लिहीले की, ओबीसी जनगणना होऊच शकत नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे, म्हणून तुम्हाला जनगननेवर बहिष्कार टाकण्याची भुमिका घ्यावीच लागेल. ‘‘ओबीसी कॉलम नाही, म्हणून आमचा जनगणनेवर बहिष्कार’’ असा मजकूर असलेली पाटी घरावर लावा, असा मुद्दा माहितीपत्रकात प्राधान्याने असणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे मराठा ओबीसीकरणाला कडाडून विरोध प्राधान्याने माहितीपत्रकात हवा होता, तो कुठेही दिसला नाही, ना पत्रकात.... ना भाषणांमध्ये! -2- ओबीसींच्या शत्रूंबद्दल नेतेच जर बोटचेपी भुमिका घेत असतील तर, ओबीसी आरक्षण नष्ट झाल्यातच जमा आहे. ओबीसी मोर्च्याच्या माहितीपत्रकात मराठा ओबीसीकरणाविरोधात ठाम भुमिका प्राधान्याने असती, तर या मोर्च्याचे स्वागत करणारे पुरूषोत्तम खेडेकरांचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड लावण्याची हिम्मत कोणी केली नसती. तुमचे शत्रू जेव्हा तुमचे स्वागत करतात, तुमचे अभिनंदन करतात; तेव्हा समजून घ्यावे की, ‘तुमची भुमिका शत्रूच्या हिताची आहे व ओबीसींसाठी मारक आहे.’ ओबीसी मोर्च्यात योग्य व ठाम भुमिका न घेणे म्हणजे ‘कणाहिन’ असणे असे नव्हे, तर ओबीसींच्या शत्रूंना मदत करण्याची भुमिका घेणे होय! ते कसे.... ते समजून घ्या पुढीलप्रमाणे- उद्या समजा जर सुप्रिम कोर्टात ओबीसींची बाजू मांडणार्‍या वकीलांनी असा युक्तीवाद केला, की, ‘‘महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ओबीसी संघटना व ओबीसी नेते मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला कडाडून विरोध करीत आहेत, त्यामुळे त्यांचा विरोध डावलून जर मराठा ओबीसीकरणाला मंजूरी दिली तर राज्यात मोठा संताप उफाळून येईल व राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल’’ असा युक्तीवाद ओबीसींचा वकील करीत असतांनाच मराठ्यांचे वकील चंद्रपूरच्या या मोर्च्याचे माहितीपत्रक कोर्टात सादर करून युक्तीवाद करतील की, ‘‘हे बघा, चंद्रपूरच्या लाखो ओबीसी मोर्चेकर्‍यांनी मराठा ओबीसीकरणाला कुठेही विरोध केलेला नाही.’’ काही हुशार लोकांना असे वाटते कि, ओबीसी नेते हे भोळे-भाबळे आहेत, चंद्रपूरच्या ओबीसी मोर्च्याच्या आड आपण केलेले हे ‘‘मराठा-षडयंत्र’’ ओबीसींच्या लक्षात येणारच नाही. असे मराठ्यांना वाटणे स्वाभाविक आहे, कारण ओबीसी-नेते आहेतच एक नंबरचे बयाळ! परंतू, हा धोका जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मी अनेक लोकांशी चर्चा केली व कोर्टात संभाव्यपणे केले जाणारे हे ‘मराठा-षडयंत्र’ कसे हाणून पाडायचे, याचीही पर्यायी व्यवस्था मी तयार करून ठेवलेली आहे. योग्य व ठाम भुमिका नसेल तर आपणच आपल्या पायावर शत्रूची कुर्‍हाड कशी पाडून घेतो, याची ही दोन उदाहरणे पुरेशी आहेत. रस्त्यावरची आंदोलने केलीच पाहिजेत, मात्र या आंदोलनांना योग्य व ठाम भुमिका नसेल तर आपण भरकटत जातो. ईव्हीएमविरोधातील आंदोलनाचे तेच झाले! भाजपाच्या विजयाचे खापर आपण ईव्हीएमवर फोडून मोकळे झालोत. मात्र ते खरे नव्हते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. ईव्हीएमचा गैरवापर करून आपला शत्रू सतत जिंकत असेल तर त्यामागे शत्रूपक्षाची कोणती तरी वैचारिक ‘भुमिका’ काम करते आहे. ही भुमिका कोणती व तीला कसा शह देता येईल, याचे कोणतेही उत्तर ईव्हीएमविरोधकांना देता आलेले नाही. ईव्हीएमच्या गैरवापराचे तांत्रिक रहस्य उघड करण्यासाठी मशिनला खोलता येईल. असा प्रयत्न अनेक तंत्रज्ञांनी करून पाहिला आहे. मात्र ईव्हीएमच्या गैरवापराचे रहस्य ‘भुमिकेत’ही आहे, याचे भान कोणालाच नाही, त्यामुळे ‘योग्य व ठाम भुमिकेअभावी’ ईव्हीएमविरोधी लढाई जिंकली जावू शकत नाही. मी या विषयावर हिंदीतून
‘‘ईव्हीएम-2019’’ या नावाची छोटी पुस्तिका लिहीली आहे. -3- नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकात ईव्हीएम नव्हते, बॅलेट पेपर होते. शत्रू पक्षासाठी ही लिटमस टेस्ट होती. या लिटमस टेस्टमधून एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली की, लोकांसमोर दोनच पर्याय आहेत! एकदा कॉंग्रेस, एकदा भाजपा! तिसरा पर्याय लोक अजूनही शोधत नाहीत. तिसरा पर्याय हा केवळ नंबरवाला पर्याय नव्हे तर, भुमिकेवाला पर्याय आहे. त्यामुळे त्याला तीन नंबर न देता दोन नंबरने ओळखले पाहिजे. कॉंग्रेस व भाजपा हे एकमेकाला केवळ पक्ष म्हणून पर्याय असू शकतात, भुमिका म्हणून नाही. कॉंग्रेस व भाजपाच्या आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, जातीय आदि क्षेत्रातील वैचारिक व तात्विक भुमिका जवळपास सारख्याच आहेत. त्यामुळे कॉंग्रेस व भाजपा या दोन वेगळ्या राजकीय आघाड्या दिसत असतील तरी त्यांचे वेगळेपण फसवे आहे. ती एकच आघाडी आहे व तीचे नियंत्रक, संयोजक, संघटक व चालक वगैरे असलेले पडद्यामागील लोक एकच आहेत. कोण आहेत हे कॉंग्रेस+भाजपाच्या पहिल्या आघाडीचे पडद्यामागील चालक, संयोजक, नियंत्रक? त्यांची विचारसरणी कोणती, तत्वज्ञान कोणते, ध्येय-धोरण काय व त्यांना या देशात नेमके काय हवे आहे? या सर्व प्रश्नांवर आम्ही वारंवार लिहीत असतो, बोलत असतो व तसे जनजागृतीचे कार्यक्रमही घेत असतो. मात्र अजूनही आमच्या शिक्षित असलेल्या पदवीधारकांना व प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांना ‘‘योग्य व ठाम भुमिका’’ म्हणजे काय हेच माहित नाही. निवडणूकात एकदा ‘याला’ व एकदा ‘त्याला’ आलटून-पालटून निवडून आणायचे असते, एव्हढेच त्यांना माहिती आहे. या आलटून पालटून मध्येही ‘जाती’ मात्र बदलत नाहीत. एकदा ब्राह्मणवादी भाजपाचा ब्राह्मण निवडूण आणायचा व दुसर्‍यांदा ब्राह्मणवादी कॉंग्रेसचा मराठा निवडून आणायचा, यालाच आलटून-पालटून म्हणायचे. कधीतरी कॉंग्रेस-भाजपातर्फे ओबीसी निवडून आला तर त्याला ‘क्रांतिकारी परिवर्तन’ म्हणायचे का? ब्राह्मणवादी ब्राह्मण व ब्राह्मणवादी मराठा यांच्या व्यतिरिक्त ‘अब्राह्मणवादी मागास’ उमेदवारही निवडणूकीला उभे आहेत, याचा कुणी विचारही करायला तयार नाही. त्यामुळे भुमिका घेऊन पर्याय उभा करणे हे फार मोठे काम आहे व ते लांब पल्ल्याचे आहे. ते सतत करीत राहणे, हाच एकमेव मार्ग आहे. केव्हा तरी यश येईल, एवढे मात्र निश्चित! तो पर्यंत सत्य की जय हो!.......  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 Links for this article 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/12/133-bahujannama-thambhumika-6dec20.html ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/

No comments:

Post a Comment