http://shrwandeore.blogspot.in/

Monday, September 24, 2018

42 BahujanNama, Lokmanthan 23 Sept 18, Shapa


बहुजननामा-42
शपा
बहुजनांनो.... !   
शपा अर्थात कॉ. शरद् पाटील! 17 सप्टेंबर शपांची जयंती धुमधडाक्यात साजरा झाली! अर्थात हा धुमधडाका सोशल मिडियावरच होता. महापुरूषांच्या जयंत्या-मयंत्यांनाही जातीचे निकष लावण्याचे प्रकार वाढत आहेत. अर्थात वाढत्या जात-अभिनिवेशाच्या काळात तसे होणे स्वाभाविकही आहे. परंतू तरीही अलिकडे शपांच्या अनुयायांची संख्या वाढत आहे, याचा आनंद वाटतो आहे. शपांच्या लिखाणातील कोटेशन्स आकर्षक पद्धतीने सादर केली जात आहेत. अनन्य कॉम्रेड या नावाखाली सुभाष सोनार वारंवार महापुरूषांची आठण करून देत आहेत. शिरूरचे डॉ. गवारीकर शपांचे ग्रंथ पुन्हा नव्याने छापून ते तरूणांना उपलब्ध करून देत आहेत. अहमदनगरचे माफुआं परिवाराचे सदस्य दिलीप चव्हाण शपांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण करीत आहेत. जीवनदानी कॉ. किशोर ढमाले शपांचा चळवळीचा वारसा सक्षमपणे चालवीत आहेत. किशोर मांदाळे, सचिन गरूड, सचिन माळी, बाळासाहेब गरूड, निरज धुमाळ, मिलिंद धुमाळे, नितीन सावंत, अशोक राणा, उमेश बगाडे असे कितीतरी तरूण शपासाहित्यावर चिंतन-मनन करीत आहेत. शपा साहित्य वाचकांची संख्या वाढते आहे. परंतू आजही काही वाचक शपा वाचायला कठीण आहेत, डोक्यावरून जातात, काहीच समजत नाही, अशा तक्रारी करतांना आढळतात, तेव्हा मात्र अश्चर्य वाटतं.
अशा तक्रारी त्यांच्यादास शुद्रांची गुलामगिरी’ या महान ग्रंथाच्या पहिल्या खंडापासूनच सुरू झाल्या होत्या. प्राच्यविद्येतील शपांचे पुर्वसुरी तर्कतीर्थ लक्ष्ण जोशी हे प्राज्ञ वाई पीठाचे मठाधिपती होते. शपांचा पहिला ग्रंथ या प्रकाशनानेच छापला. त्याला प्रस्तावना तर्कतीर्थांनीच लिहिली. ही प्रस्तावना दिड पानातच गुंडाळली गेली. यावरून तत्कालीन प्राच्यविद्यापंडितांनाही शपा किती दुर्बोध वाटतात, असा समज जाणीवपुर्वक पसरविला गेला. शपांना येत असलेल्या अनेक पत्रांपैकी बरीच पत्रे या काठीण्यावर अथवा दुर्बोधपणावर लिहिलेली असायची. असेच एक पत्र शपांनी माझ्याकडे भिरकावीले व म्हणाले, अशा पत्रांना उत्तरे देणे हे तुझे काम आहे. संपादक मंडळात आहेस, तर काही जबाबदार्‍या उचलल्या पाहिजेत.’ आता जबाबदारीचेच म्हणायचे तर त्याचा पदाशी काहीही संबंध नसतो. समोर येईल ते काम करावेच लागते. सत्यशोधक मार्क्सवादी (समा) प्रिन्टींग प्रेस मध्ये साफ-सफाइपासून ते प्रुफ करेक्शन करण्यापर्यंतची सर्व कामे करणे हाही एक जबाबदारीचाच भाग असायचा. आरक्षण, जंगल जमिन, विद्यार्थी संघटन वगैरेच्या बैठकांना सकप प्रतिनिधी म्हणून हजर राहणे, समामध्ये लेख लिहीणे, मंडल आयोग-ओबीसी चळवळ ही सर्व जबाबदारीचीच कामे होती व ती न सांगता पार पाडावी लागत होती. (सांगणार तरी कोणाला?)
शपा वाचायला कठीण व समजायला दुर्बोध आहेत, असा समज आजही बर्‍याच लोकांचा आहे. या समस्यचे मूळ शपांच्या लिखाणात नाही, तर वाचकांच्या अपसमजात आहे. आर्ट कॉलेजमधील अभ्यासक्रम हा मुख्यतः कथा, कांदबर्‍या व कविता सारख्या हलक्या-फुलक्या स्वरूपाचा असतो. त्यामुळे हा अभ्यासक्रम सहज उत्तीर्ण होता येतो. कारण तो वाचायला समजायला सोपा असतो. तुलनेने सायन्स-इंजिनियरिंगचा अभ्यास कठीण असतो. कथा, कादंबर्‍यांमध्ये समाजाचे प्रतिबिंब असते. सायन्समध्ये जगाचे भौतिक स्वरूप समजून घेण्याचा व ते बदलण्याचा शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम असतो. त्यामुळे तो कठीण असतो. आर्ट कॉलेजातून कारकून तयार होतात, तर सायन्स कॉलेजातून शास्त्रज्ञ! जगाचा विकास शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे झालेला आहे. पोथ्यापुराणे वाचायला व समजून घ्यायला अक्कल लागत नाही. पण याच पोथ्या-पुराणांचे सुक्ष्म वाचन करणे, त्यावरील फोलपटे काढणे व त्याच्या गाभ्यातील ब्राह्मणी-षडयंत्रे शोधून काढणे, यासाठी तत्वज्ञानाचाच अभ्यास लागतो. असे हे तत्वज्ञान-शास्त्र कठीण वाटले तरी ते समजून घेण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे असते.
आज फेबु-व्हाट्सपच्या जमान्यात ‘गंभीर’ वाचन-मनन नष्ट झालेले आहे, हे मी अनेकदा अनुभवजन्य पुराव्यानिशी सिध्द केले आहे. खुद्द शपांना मानणार्‍यांपैकी किती लोक शपांचे तत्वज्ञान समजून घेऊन ते आजच्या समस्याचे निराकरण करणारी मांडणी करतात? उदाहरण म्हणून अनेक समस्या सांगता येतील. परंतू आजची सर्वात मोठी समस्या ‘आरक्षण’ बनली आहे. आरक्षण हे जात्यंतक युद्धातील केवळ एक हत्यार व साधन-सामुग्री आहे. जात्यंतक युद्धातील सर्वात निर्णायक घटक असलेल्या ओबीसींच्या हातात जोपर्यंत हे हत्यार दिले जात नाही, तो पर्यंत जात्यंतक युद्ध निर्णायक टोकावर येणार नाही. म्हणून शपांनी मंडल आयोगाच्या व ओबीसींच्या समर्थनार्थ तात्विक संघर्ष केला. त्यातून जे महापुस्तक प्रसवले ते आजही जात्यंतक युद्धासाठी मार्गदर्शक आहे. त्या पुर्वी व नंतरही त्यांनी कधीच दलित-आरक्षण व आदिवासी-आरक्षणावर पुस्तक लिहीले नाही. मात्र ओबीसी मंडलवर तात्विक मांडणी केली. ब्रह्मो-कम्युनिस्टांनी कधीच दलित-आदिवासींच्या आरक्षणावर आक्षेप घेतला नाही, मात्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींसारख्या रॉयीस्टांपासून ब्राह्मो-मार्क्सवादी असलेल्या नंबुद्री-शहांपर्यंतचे सर्व तत्वज्ञानी व पंडित मंडल-ओबीसींच्या विरोधात आपले तत्वज्ञान पाजळत होते. या लढाईत शपांना उतरावे लागले, कारण जात्यंतक लढाईतील ओबीसींचे निर्णायक स्थान त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सिद्धांतावरून लक्षात आलेले होते. या तत्कालीन युद्धाचा मी एक शपा-शिष्य म्हणून युद्धखोर-शिलेदार होतो, ही माझ्यादृष्टीने अभिमानास्पद गोष्ट होती व आहे.
ओबीसींच्या हातात आरक्षणाचे हत्यार पडताच त्यांनी जे राजकीय भुकंप घडवून आणलेत त्यातून त्यांनी ब्राह्मणवाद्यांचे मुख्य दोन पक्ष कमजोर करून टाकलेत. 1993 ते 20014 पर्यंतच्या एवढ्या मोठ्या प्रदिर्घ कालावधीत ब्राह्मणी राजकीय पक्षांचे कंबरडे मोडले असतांना राष्ट्रियस्तरावरच्या क्रांतिकारी पक्षसंघटनांना त्याचा फायदा उचलता आला नाही. रशियात झारची सरंजामी राजवट नष्ट करून केरेन्स्कीचे भांडवलदारी सरकार स्थापन झाले होते. ते कमजोर असल्याचे लक्षात येताच बोल्शेविकांनी त्याचा फायदा घेतला व कम्युनिस्ट क्रांती घडवून आणली. भारतातील ओबीसींनी अशा राजकिय क्रांतीकारक उठावासाठी ज्योती बसूंना प्रधामंत्री बनण्याचे आमंत्रण दिले. परंतू जात्यंतक लढाईला निषिद्ध मानणार्‍या ब्राह्मो कम्युनिस्टांनी या ऐतिहासिक जबाबदारीतून पळ काढला व आपला ब्रह्मसिद्ध कामचोरपणा अंगिकारला.
ओबीसी-आरक्षणाने जात्यंतक युद्धातील आपले क्रांतिकारकत्व सिद्ध करताच ब्राह्मणी-प्रतिक्रांतिकारी शक्ती जोमाने कामाला लागल्या. त्यांच्या समोरचे सर्वात मोठे संकट ‘ओबीसी-आरक्षण’ होते व आहे. हे ओबीसी आरक्षणाचे हत्यार निकामी करण्यासाठी त्यांनी ‘क्रिमी लेयर’ सारखे अनेक फंडे वापरलेत. पण ते निष्फळ ठरलेत. शेवटी त्यांनी ऐतिकासिक दोस्त असलेल्या क्षत्रिय जातींना कामाला लावले. 2014 च्या क्षितिजावर एकीकडे ‘ओबीसी’ प्रधानमंत्री बनवून ओबीसी राजकारण संपविण्याचा घाट घातला गेला, तर त्याचवेळी जाट, पटेल, मराठा सारख्या क्षत्रिय जातींना हिंसक बनवून ओबीसींच्या अंगावर सोडण्यात आलेत. या असा अनैतिक व अमानवी कृत्यातून ओबीसी आरक्षणाचे हत्यार बोथट करण्याचे षडयंत्र यशस्वी होत आहे. परिणामी जात्यंतक क्रांती जी ओबीसीमुळे उंबरठ्यावर आलेली होती ती आता कोसो दूर गेलेली आहे.
आज जे स्वतःला शपा-शिष्य मानतात, त्यापैकी किती लोक जात्यंतक क्रांतीबाबत गंभीर आहेत. जर ते गंभीर असते तर त्यांनी ओबीसींसकट सर्व जाती-धर्मियांची जातनिहाय जनगणना होण्यासाठी आमच्यासोबत आंदोलनात सामील झाले असते. जर ते खरोखर सद्सद्विवेक बुद्धीने शपा-शिष्य असते, तर त्यांनी जाट-पटेल-मराठा सारख्या ब्राह्मो-दोस्त असलेल्या क्षत्रिय जातींच्या ओबीसीतील घुसखोरीला विरोध केला असता. करियर घडविण्यासाठी अनेक लोक आपले नाव पुरोगामी महापुरूषांशी जोडून घेतात. भारतातील क्रांतिकारक ट्रेंड असलेल्या ब्राह्मणांनी आपले नाव मार्क्सशी जोडले व करियर घडविले. जात-गंडामुळे त्यांना फुले-आंबेडकरांशी नांव जोडणे शक्य नव्हतं, म्हणून मार्क्स! क्षत्रिय जाती त्याहून जास्त बदमाश! मंडल-ओबीसींचा महिमा वाढल्यावर त्यांनाही फुले-आंबेडकर आठवू लागले. 1981 ला ज्या क्षत्रिय जाती मंडलविरोधात दंगली पेटविण्याची धमकी देत होत्या, त्याच क्षत्रिय जातीतले करियरिस्ट बुद्धीमान नंतर स्व-जातीच्या नव्या संघटना स्थापन करून फुले-शाहू-आंबेडकरी बुरखा पांघरू लागले. सुरूवातीला आम्हीही या बुरख्यांना फसलो. बामसेफ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ सारख्या संघटना या जातीय आधारावरच्या संघटना आहेत, म्हणून शपा त्यांची निमंत्रणे ठोकरून देत असत. बामसेफचं निमंत्रण शपांनी स्वीकारावं म्हणून मी स्वतः शपांना कनव्हीन्स केलं. असाच प्रयत्न नंतर प्रा. डॉ. अशोक राणा यांनी मराठा सेवा संघाचं निमंत्रण स्वीकारण्यासाठी केला.
जातीआधारावरच्या संघटना या कधीच क्रांतिकारक होऊ शकत नाहीत, त्या पुरोगामित्वाच्या बुरख्याखाली प्रतिक्रांतीचंच काम करतात, हे त्यांचं म्हणणं शेवटी आजही सिद्ध होत आहे. आरक्षणाला ब्राह्मणी शक्तींच्या विरोधातील एक हत्यार न समजता ते केवळ गरीबी हटविण्याचं व रोजी-रोटी कमावण्याचं ऐषआरामीचं साधन असल्याचा सिद्धांत आज सर्वच जातीआधारावरच्या संघटना मांडत आहेत. आज कोणीही आरक्षण मागावे आणी त्याला बामसेफ वगैरेसारख्या संघटना लगेच पाठींबा देतात. मात्र आरक्षणाचं 50 टक्के बंधन तोडून त्यांना ब्राह्मणांच्या ताब्यातील जागा हिसवण्याचा मार्ग बामसेफसारख्या संघटना दाखवू शकत नाहीत. जातीआधाराची मर्यादा त्यांना असे करू देत नाही.
आज मातंग, चर्मकारांच्या जाती संघटना बौद्धांच्या विरोधात आग ओकत आहेत, धनगर आदिवासींचं ताट हिसकावत आहेत, तर मराठा ओबीसींच्या ताटावर डल्ला मारीत आहेत. आरक्षण हे क्रांतीचं हत्यार न राहता प्रतिक्रांतीचं हत्यार बनले आहे. आणी अशा प्रतिक्रांतीच्या काळात शपांच्या अनुयायांसह सर्वच महापुरूषांचे बुद्धिमान अनुयायी प्रत्यक्षपणे प्रतिक्रांतीला हातभार लावीत आहेत. या बुद्धिमानांना लवकरात लवकर शपांच्या जात्यंतक क्रांतीचं ‘’भान’’ येवो, अशी अपेक्षा व्यक्त करीत कडकडीत जयजोती जयभीम घालतो आणी थांबतो.

     ------- प्रा. श्रावण देवरे
            Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/

1 comment:

  1. कला शाखा आणि विज्ञान शाखा याबद्दल आपण मांडलेले विचार निराधार आणि अपुऱ्या आकलनावर आधारित आहे. महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्याशाखांच्या चौकटीत विचार केला तरी कॉम्रेड शरद् पाटील यांचे लेखन कला शाखेच्या प्रवाहामध्ये येते. आपण निकषच बाळबोध वापरलेला असल्यामुळे हे स्पष्टीकरण द्यावे लागले. तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भाषा, हे सर्व विषय 'आर्ट कॉलेज'मधले आहेत म्हणून ते सोपे आणि इंजिनियरिंग कॉलेजमधील ज्ञान अवघड, ही आपली समज असेल तर आपल्याला शपा किती कळले याची शंका वाटते. त्याचप्रमाणे अशा आकलनातून आपण सम्यक व समतावादी विचार कसे मांडू शकणार?

    ReplyDelete