रविवार 2 जून 2019 साठी)
बहुजननामा-73 (EVM-2)
लोकशाहीवरचे आणीबाणी पेक्षाही मोठे संकट!
बहुजनांनो.... !
23 मे रोजी लोकसभा निवडणूकीचे निकाल
जाहीर होणार असल्याने टिव्ही चॅनल्सवाल्यांनी निकालाच्या समिक्षेच्या चर्चा आयोजित
केल्या होत्या. मला एक महिन्याआधीच ‘न्युज-18लोकमत’या मराठी चॅनलने बुक केलेलं होतं. सकाळी
7.30 वाजेपासूनच खडाजंगी चर्चा सुरू झाल्या होत्या. पहिल्या फेजपासूनच भाजपा
आघाडीवर दिसत असल्याने बहुतेक पुरोगामी चर्चक थांबा, वाट पहा, अशा प्रतिक्रिया देत
होते. 11 वाजेनंतर टिव्ही अँकर वारंवार विचारत होते की, आमचे एक्झिट पोल खरे ठरत
आहेत की नाहीत?
सुप्रिया सुळे व पार्थ पवार पिछाडीवर
असल्याच्या धक्कादायक बातम्या टिव्हीवर झळकायला लागताच चर्चा अधिकच गरम झाली. टि.व्ही. अँकरने
जेव्हा माझी प्रतिक्रिया विचारली तेव्हा मी स्पष्टपणे म्हणालो की, ‘आता शरद्
पवारसाहेबांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे. आता त्यांनी ईव्हीएम विरोधात
दिल्लीत उपोषणाला बसले पाहिजे.’ परंतू
नंतर सुप्रिया सुळेंच्या मतांची आघाडी
वाढत गेली, तसातसा पवारसाहेबांचा लोकशाहींवरचा
विश्वास हळूहळू वाढायला लागला व शेवटी सुप्रियाजी जिंकल्याचे जाहीर झाले आणी
पवारसाहेबांची लोकशाही जिंदाबाद झाली त्यामुळे संघ-भाजपाचाही जीव भांड्यात पडला.
संघ-भाजपाचा जीव भांड्यात का पडला? याचं
रहस्य उलगडण्यासाठी बरीच पाने खर्ची पडतील, पण तुर्तास एकाच पॅरात घेऊ. पवारसाहेब
किती खासदार-आमदार निवडून आणतात, हे महत्वाचे नाहीच! पवारसाहेबांचे खासा
व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त आहे की, ते विरोधकांची सरकारे 5 वर्षे तगवू शकतात व ते आपली स्वतःची माणसंही पाडू शकतात.
दिल्लीत तर त्यांचा वट वेगळाच आहे. ऐन बाबरी-भंजनाच्या घटिका प्रसंगी ते संरक्षण
मंत्री होते. त्यामुळे तेव्हापासून
त्यांचं दिल्लीतील वजन वाढलं, ते नंतर वाढतच गेलं. दिल्लीतील खलबते ज्या
केसरी वर्तुळात शिजविली जातात, त्याच्या परिघावर
पवारसाहेब कुठेतरी असतातच! त्यामुळे ईव्हीएमच्या खलबत्त्यात कोण-कोणत्या
दिग्गजांना कुटायचं ठरलं आहे, याचा सुगावा पवारसाहेबांना लागणं कठीण नाही. अशोकरावांच्या
नांदेडसोबत आपल्या बारामतीचीही वाट लागते की काय, अशी शंका त्यांना येणं स्वाभाविक
होतं. म्हणून निकालाआधीच त्यांनी सांगून टाकलं की, ‘सुप्रिया
जर हरली तर, माझा लोकशाहीवरचा विश्वास उडेल.’ त्यांचा
स्पष्ट निर्देश ईव्हीएम घोटाळ्याकडे होता. हा सरळ-सरळ दमबाजीचा प्रयत्न होता. सुप्रिया
सुळे पराभूत झाल्या असत्या तर निश्चितच पवारसाहेबांनी ईव्हीएम विरोधात आघाडी उघडली
असती, यात वाद नाही. त्यामुळे पवारांच्या धमकीने दिल्लीतले खलबत्ते-कारभारी हादरले
व त्यांनी दोनच दिवसात योग्य ते नियोजन करून आगामी पवारप्रणित भंडाफोड कार्यक्रम
थांबवला. या सर्व नियोजन नाट्यात ताईसोबत आणखी तीन दादांची सोय झाली. त्यामळे ‘राष्ट्रीय’
कॉंग्रेसला एकच जागा व ‘राज्य’-राष्ट्रवादीला 4 जागा असा चमत्कारही घडून आला. या
चमत्कारानंतर पवारसाहेबांनी इव्हीएम ला नमस्कार करीत जाहीर केले की, ‘ईव्हीएममुळे
घोटाळा होऊच शकत नाही.’
23 मेच्या निकालावरील चर्चेत मी ‘न्युज-18
लोकमत’ चॅनलवर जाहीर आवाहन केलं की सर्व विरोधी पक्षांनी यानंतर होणार्या ईव्हीएम
वरील सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकावा.
या बहुजननामाच्या पुर्वार्धात आपण
पाहिले की, कोणतेही ठोस कारण नसतांना 2019 चे रिकॉर्डब्रेक सत्तापुनरागमन झाले. इंदिराजींसारख्या
दिग्गज नेहरू घराण्याच्या नेत्याला जातीय-वर्गीय सुधारणा करूनच लोकप्रियता
मिळवावी लागायची, तेव्हा कुठे त्या पुन्हा सत्तेवर यायच्या. 2014 ला
वाढत्या ओबीसी जातजाणीवेमुळे व इतर काही ठोस कारणास्तव रेकॉर्डब्रेक सत्तापरिवर्तन
संघ-भाजपाने घडवून आणले. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कालावधित घेतलेल्या
अनेक ‘अ-लोकप्रिय’ निर्णयांमुळे जातीय-वर्गीय-धार्मिक असंतोष धगधगत असतांना 2019
ला जात्यंतक-वर्गांतक शक्ती देशाच्या राजधानीत सत्तेवर येणे स्वाभाविक होतं. 1967,
1977. 1989, 1996 अशी दशकीय सत्तांतरे झालीत व त्यानंतर 2009 व 2019 अशी दशकीय
सत्तांतरे अपेक्षित होती. शेवटची 2009 व 2019 ची जात्यंतक-वर्गांतकवादी सत्तांतरे
झाली नाहीत याचे एकमेव कारण ‘ईव्हीएम’ हेच होऊ शकतं! 1967 ते 1996 दरम्यानच्या
जातजाणीवा मंदगतीक व मर्यादित होत्या. एकविसाव्या शतकात त्या जलदगतिक व अमर्याद
झाल्यात. त्यामुळेच तर सपा, बसपा राजद वगैरे जात्यंतक पक्ष स्वबळावर उत्तर
पट्ट्यात राज्यस्तरीय सत्तेवर येत राहिलेत. आणी 2014 साली ओबीसी प्रधानमंत्री
बनण्यास हीच अमर्याद जात जाणीव कारणीभूत होती.
1996-97 च्या दरम्यान सच्च्या ओबीसी
प्रधानमंत्र्याने जाहीर केलेला ओबीसी जनगणनेचा निर्णय निर्णायकपणे जात्यंताकडे
घेऊन जाणारा होता. या काळात कॉंग्रेस-भाजपासकट शिवसेनेसारखे सर्वच जातव्यवस्थावादी
पक्ष दुर्बल झालेले होते. देशाची भांडवली-निमसरंजामी अर्थव्यवस्था कोसळण्याच्या
मार्गावर होती. परकिय गुंतवणूकदार व नवसाम्राज्यवादी भारतातील राजकीय अस्थिरता
पाहता चिंतातूर होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे देशी जात-वर्गव्यवस्थावादी व
विदेशी वर्गव्यवस्थावादी यांनी एकत्र येऊन ही राजकीय अस्थिरता ईव्हीएम च्या
माध्यमातू संपविली. ईव्हिएम आल्यानंतर देशात एकदाही जात्यंतकशक्ती दिल्लीच्या
तख्तावर बसू शकली नाही. जात्यंतक व वर्गांतक पक्ष राज्यात सत्तेवर येणे
फारसे धोकादायक नसते. मात्र हे पक्ष दिल्लीच्या तख्तावर बसणार नाहीत, याची
खबरदारी ईव्हीएम च्या माध्यमातून घेतली जाते. त्यापूर्वी दर दहा वर्षांनी न चूकता
जात्यंतक शक्ती केंद्रात सत्तेवर येत होती.
2019 ला देशातील बदललेली जातीय व राजकीय
समिकरणे बघता जात्यंतक शक्तीच दिल्लीत सत्तेवर येणार हे उघड होते. ईव्हीएम चा
गैरवापर गृहित धरूनही हे सत्तांतर घडणार यात कोणतीच शंका नव्हती. म्हणूनच जगप्रसिद्ध
अमेरिकन ‘टाइम’ मासिकाने मोदीविरोधात लेख छापला. भारतीय व संपूर्ण जगातील तज्ञांचा
हाच अंदाज होता. मग तरीही असे का घडले याचा उहापोह होणे गरजेचे आहे, अन्यथा 2024
साली हेच तुमच्या माथी मारल जाणार!
लोकसभा निवडणूका
मुख्यतः ओबीसी वर्चस्वाखालील उत्तर प्रदेश व बिहार भोवती फिरतात. यात बिहारमधील
चढ-उतार बघा. 2009 च्या बिहार लोकसभेत नितीशकुमार एन.डी.ए. आघाडीत होते.
नितीशकुमारांना 20 जागा व भाजपाला 12 जागा मिळाल्या. 2010 सालच्या विधानसभेत नितीश
कुमार भाजपासोबत होते म्हणून त्यांना 22.61 टक्के मते घेत 115 सीट मिळाल्यात.
भाजपाला मिळाल्या 91 जागा (16.46 टक्के मते). 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपा
प्रणित एन.डी.ए. गठबंधनला
बिहारमध्ये 38.8 टक्के मतांसह 40 पैकी
31 जागा मिळाल्या. यावेळी बिहारमध्ये लोकप्रिय झालेले प्रशासनबाबू माननीय नितीश
कुमार हे मुख्यमंत्री होते व ते भाजपप्रणित गठबंधनमध्ये नव्हते. लोकप्रियता व
सत्ता असूनही त्यांना फक्त 2 जागा मिळाल्या. व्होट शेअर होता 15.8! गंमतीची गोष्ट
अशी की, लोकसभा-2014 नंतर दिड वर्षाच्या आत झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणूकीत
मुख्यमंत्री असलेल्या याच नितीशकुमारांच्या पक्षाला 16.8 परसेंट
वोटींगने एकदम 70 जागा मिळतात. तीच बाब लालूजी यांच्या पक्षाबाबत. लोकसभा-2014 ला
लालूंजीच्या पक्षाला 20 परसेंट वोटींगने फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. 2015 ला 18.8 परसेंटने 81 जागा मिळाल्या. 2014 ला
मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार भाजपासोबत नव्हते म्हणून त्यांना दोनच जागा
मिळाल्यात. 2019 ला हेच नितीश कुमार भाजपासोबत होते म्हणून 16 जागा मिळतात व
राजदला शून्य जागा! वरील आकडेवारीवरून
एकच मुद्दा सिद्ध होतो, तो हा की, लोकसभेच्या निवडणूकीत जर नितीशकुमार भाजपा
आघाडीत असतील तरच त्यांना 16 ते 20 जागा मिळतात. जर ते लालूंजींसोबत असतील तर
त्यांना फक्त 2 जागांवरच समाधान मानावे लागते. काय बिहारी जनता भाजपाकडे पाहून
नितीशकुमारला मते देतात? तसे जर असेल तर मग खुद्द भाजपाला कमी जागा व कमी वोट शेअर
कसा? या विश्लेषनावरून आपण एकाच निष्कर्षाला येतो. तो एकमेव
निष्कर्ष असा की, हा सर्व अनैतिक चमत्कार केवळ आणी केवळ ‘‘ईव्हीएम’’ मुळेच
होतो.
उत्तरप्रदेश
राज्याबाबतही हेच घडलेले आहे. 2007 व 2012 साली कोणाशीही अलायन्स न करता स्बळावर एकदा बसपा व
एकदा सपा पूर्ण बहुमताने सत्तेत येतात. मात्र त्याच काळात झालेल्या लोकसभा
निवडणूकात त्यांना त्या प्रमाणात जागा मिळत नाहीत. 2014 ला बसपा शून्यावर आली व
सपा फक्त 5 जागा मिळवू
शकली. 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकात भाजपाचा वोट शेअर 39.7 होता.
परंतू एसपी व बीएसपी वेगवेगळे लढल्याने त्यांचा एकत्रित वोट शेअर 44.2 टक्के असूनही ते
पराभूत झालेत. 2019 ला जर जिंकायचे असेल तर एकत्रित एसपी व बीएसपी च्या 44 टक्के
वोट शेअरवर मात करावी लागेल. 2019
च्या लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात
भाजपाने 49.56 वोट शेअर घेत 62 जागा
घेतल्या. म्हणजे एसपी-बीएसपी
वेगवेगळे लढले भाजपाला 72 जागा (2014) आणी एसपी-बीएसपी एकत्र लढले तरी भाजपाला 62
जागा(2019) मिळतात. हा काय चमत्कार आहे? ‘टाइम्स ऑफ इंडिया’चा 24 मे 2019 चा अंक सांगतो की, हिंदी (उत्तर) पट्ट्यातील
141 सीट्स भाजपाने 50 टक्क्यांपेक्षाही जास्त वोट शेअर ने घेतल्या आहेत.’ एवढा वोट शेअर
1984 ला 414 जागा जिंकणार्या कॉंग्रेसनेही कुठे घेतला नाही. 2014 ते 2019
दरम्यान सर्वोच्च शिगेला पोहोचलेला जातीय, धार्मिक व
आर्थिक असंतोष दडपण्यासाठी मोठ्या प्रमाणात ईव्हीएम घोटाळा झालेला आहे, हे
निश्चित.
या इव्हीएम पुराणात
असे अनेक प्रश्न आहेत की ज्यांच्या उत्तरात मी अजूनही काही येथे लिहू शकलो नाही.
शब्द मर्यादा असल्याने व चळवळीच्या इतरही कामात व्यस्त असल्याने हा लेखांक-2 इथेच
थांबवितो व पुढील चर्चा पुढच्या तिसर्या भागात करू या!
परंतू तो पर्यंत काही अभ्यासू वाचक https://shrwandeore.blogspot.in/ या
ब्लॉगवर जाऊन माझे ‘‘ईव्हीएम-2019’’ हे पुस्तक
वाचण्याची तसदी घेतील, अशी
अपेक्षा व्यक्त करीत कडकडीत जयजोती जयभीम घालतो आणी ‘सत्य की जय हो’ घोषित करून थांबतो.
(दिनांक- 30 मे 2019)
------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270
No comments:
Post a Comment