http://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, May 28, 2019

72 BahujanNama EVM1, 26May19


बहात्तरावी खेप ......!  (रविवार26 मे 2019)
 बहुजननामा-72                EVM-1
पन्हा एकदा ईव्हीएम-पुराण (पुर्वार्ध)
बहुजनांनो.... !   
2009 च्या लोकसभा निवडणूका! नाशिक मतदारसंघ! कॉंग्रेसच्या एका माजी आमदाराच्या बंगल्यात ईव्हीएम सापडल्या. पोलीसांनी धाड टाकून मशिन्स जप्त केल्यात, पोलीस केस दाखल झाली. आज दहा वर्षे झालीत. कोणालाही अटक नाही, चौकशीसाठी कोणालाही ताब्यात घेतलं नाही. त्यांतर ईव्हीएम सापडण्याच्या अनेक घटना घडल्या. 2014 च्या ईलेक्शनच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांच्या घरात ईव्हीएम सापडल्यात. 2019 च्या ईलेक्शनमध्ये तर अशा घटनांनी कहरच केला. कल्याण मतदारसंघातील 300 पेक्षाही जास्त ईव्हीएम वोटींग बुथ्सवरून कलेक्शन केल्यानंतर दोन दिवस गायब होत्या. तिसर्‍या दिवशी त्या सापडल्या आणी स्ट्रॉंगरूममध्ये जमा केल्यात. कोणीही कर्मचारी सस्पेंड नाही, कोणालाही अटक नाही. एफ.आय.आर. तरी दाखल केला की नाही, तेही कोणाला माहीत नाही. अशा अनेक घटना घडत असतील ज्यांची माहिती वा बातमी ब्राह्मणी प्रशासनाच्या पोलादी भींतीतून कधीच बाहेर पडू शकत नाही.
वास्तविक ईव्हीएम ही अत्यंत कॉन्फडेनशियल वस्तू आहे. एके-49 बंदूक खाजगीरित्या घरात ठेवल्याबद्दल संजय दत्त देशद्रोही ठरला व 5-7 वर्षे जेलमध्येही जाऊन आला. ईव्हीएम घरात बाळगणे हा त्यापेक्षाही मोठा देशद्रोह आहे. एके-49 ने जास्तीत जास्त 5-50 माणसं मारली जाऊ शकतात. ईव्ही मशिनच्या चोरीमुळे किंवा हेराफेरीमुळे देशाच्या लोकशाहीचाच खून पडतो. रस्त्यावरचा पिसाळलेला कुत्रा मारला तर श्वानप्रेमी लोक लगेच न्यायालयात जातात. रस्त्यात आडवे येणारे झाड तोडले तर वृक्षप्रेमी संघटना बांधकाम विभागाला जाब विचारते. पण ईव्हिएमच्या एके-49 ने लोकशाहीचा दिवसा-ढवळ्या खून होतो आणी कुणीही कुणाला जाब विचारीत नाहीत. मिडियातून बातमी गायब झाली की संपलं सर्व! आपल्या देशात जनावर-प्रेमी खूप आहेत, माणूस-प्रेमी कुणीही नाही. माणूस-प्रेमी असते तर निशचितच लोकशाही-प्रेमीही राहीले असते. अखलाख मॉबलिंचिंगने मरतो, रोहित वेमुलाचा संस्थात्मक खून होतो, अजून एकही मेणबत्ती संप्रदाय न्यायालयात गेला नाही. बरे ही सर्व कामे एन.जी.ओ. वगैरेंनीच करावीत का? तर होय! कारण सध्या त्यांनाच प्रसिद्धी मिळते व म्हणून त्यांनाच दाद मिळते. त्यांनी न्यायधिशांना पाठविलेले साधे पोस्टकार्डही पिटीशन म्हणून दाखल करून घेतले जाते. आणी तामिळनाडूचे शेकडो शेतकरी अर्धनग्न अवस्थेत वर्षभर दिल्लीत जंतर-मंतरवर बसतात, त्यांची साधी विचारपूसही कुणी करीत नाही. ‘‘टि.व्हीत नाही दिसलं, पेपरात नाही वाचलं, मामाचं पत्र हरवलं, ते कुणीच नाही पाहिलं’’, सर्व काही आलबेल! ऑल ईज वेल असल्याने ‘फिर एक बार मोदी सरकार’ तो बनतीही है! और वो भी रेकॉर्ड तोडके!
देशाच्या 70 वर्षाच्या इतिहासात सर्व रेकॉर्ड तोडून सर्वोच्च आकडेवारीचे बहुमत गाठणारे 2019 चे हे कॉंग्रेसविरोधी सरकार आहे. गेल्या 5 वर्षात अशी काय कामगिरी केली की, 2014 चे त्यांचे स्वतःचे रेकॉर्ड 2019 साली त्यांनीच तोडले? एखादे रकॉर्ड तोडले जात असेल तर त्याला विशेष असे काही कारण असते. 1967-68 च्या काळात प्रथमच राज्यस्तरावर विरोधकांची सरकारे आलीत. काय विशेष कारण घडले? त्यावेळी बलाढ्य कॉंग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर होता. येथूनच ओबीसी-प्रभावाखालील जात्यंतक व किसान-कामगारांच्या प्रभावाखालील वर्गांतक सरकारे स्थापन व्हायला लागलीत या विशेष कारणामुळेच विरोधक आपले पराभवाच्या सातत्याचे रेकॉर्ड तोडू शकलेत. जात्यंतक-वर्गांतक शक्तींवर मात करण्यासाठी इंदिराजींना ‘गरीबी हटाव’ व बॅंकांच्या राष्ट्रीयकरणाचा वर्गीय कार्यक्रम व सरंजामदार-संस्थानिकांच्या बरखास्तीचा जात्यंतक कार्यक्रम घोषित करावा लागला. परिणामी इंदिरा कॉंग्रेसने 71 च्या निवडणूकात 282 या नीचांकावरून वरून 352 पर्यंत मजल मारली. 1975ची आणीबाणी व त्यातील अन्याय-अत्याचार चे विशेष कारण घडले म्हणून विरोधकांनी पुन्हा एकदा रेकॉर्ड-ब्रेक 77 सालचा विजय मिळविला. त्यानंतर कधी इंदिराजींचा खून, कधी मंडल आयोग, कधी राममंदिर तर कधी ओबीसी जनगणना अशा ठोस विशेष कारणांमुळे रेकॉर्डब्रेक सत्ता परिवर्तने होत गेली आहेत. 2014 साली संघ-भाजपाचे सरकार विरोधकांचे सर्व रेकॉर्डब्रेक करून सत्तेवर आलं, त्यालाही काही ठोस कारणे होतीच. पहिलं कारण ओबीसी प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार ओबीसी असणे, दुसरे कारण 10 वर्षांची कॉंग्रेस सरकारची ऍन्टीइन्कंबस्सी तिसरे कारण संपूर्ण मिडिया मनुवाद्याच्या एकछत्री अमलाखाली येणे. अशा छोट्या-मोठ्या अनेक ठोस कारणास्तव 2014 साली रेकॉर्ड तोडत संघ-भाजपाचे सरकार आले.
हा सर्व इतिहास सांगण्याचा हेतू हाच की, आतापर्यंतच्या ज्या ज्या निवडणूका रेकॉर्डब्रेक झाल्यात त्यांच्यामागे काही ठोस कारणे होती. त्यात मुख्यतः जातीय, धार्मिक व कधी वर्गीय कारणे होती. मात्र आता 2019 साली जात्यंतक सरकार येण्याचा काळ असतांना असे कोणते ठोस कारण घडले की ज्यामुळे 2014 चे त्यांचेच रेकॉर्डब्रेक करीत ‘फिर एक बार मोदी सरकार’ आले? काय मोदी सरकारने इंदिरा गांधींप्रमाणे जात्यंतक वा वर्गीय पुरोगामी निर्णय घेऊन लोकप्रियता मिळवीली? नाही! याउलट आधीचे पुरोगामी कायदे नष्ट करून कामगारविरोधी व शेतकरीविरोधी कायदे अमलात आणलेत. 13 पॉईंट रोस्टर आणून 75 टक्के जनतेचे आरक्षणच खतम केलेत. नोटबंदी फसली, जीएसटी रूसली. असे एक तरी कारण ठोस वा किरकोळ कारण सांगा की 2019 साली रेकॉर्डब्रेक करून फिर एक बार मोदी सरकार आले? भारतीय मतदार, जे 75 टक्के मागासजाती आहेत व 70 टक्के किसान आहेत, ते गेल्या 5 वर्षात अज्ञानी, आंधळे झाले आहेत का? स्वतःच्या पायावर कर्‍हाड मारणारे बेवकूप झालेले आहेत का? जर तसे असेल तर तुम्हाला ते एकदा तरी बॅलेट पेपरवर निवडणूका घेऊन सिद्ध करावे लागेल. पण ते होणे नाही, कदापि होणे नाही. कारण ईव्हीएम आणले गेले ते मुळातच जात्यंतक-वर्गांतक शक्तीचा राजकीय बिमोड करण्यासाठी! ईव्हीएम च्या टोपलीखाली ज्या पेपरबॅलेटची पेटी झाकून ठेवली आहे, ती स्वतःच क्षितीजाखालून सुर्याला खेचून वर आणण्याची ताकद ठेवते. ब्राह्मणवाद्यांच्या दृष्टीने बॅलेट पेपर म्हणजे जालीम विषच! विषची परीक्षा घेण्याइतके बेवकूफ संघी-ब्राह्मण निश्चितच नाहीत.
2019 च्या निवडणूका दुसर्‍यांदा रेकॉर्डब्रेक करुन जिंकण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणज केवळ ईव्हीएमचा घोटाळा!  मग सर्वसामान्य व्यक्तीला असा प्रश्न पडू शकतो की, जर ईव्हीएमनेच जिंकायचे असेल तर, एवढा जीवतोड प्रचार का म्हणून करायचा? करोडो रूपयांचा चुराडा का म्हणून करायचा? प्रसारमाध्यमांना एवढे कामाला का लावायचे? जवानांचे बळी घेणारे पुलवामा का घडवून आणायचे?  प्रधानमंत्री पदासाठी ओबीसी उमेदवाराची काय गरज? एखादा ब्राह्मणही प्रधानमंत्री बनवीता येतो. दुसरा प्रश्न असाही उपस्थीत होतो की, 2009 ला कॉंग्रेसच्या माजी आमदाराकडे ईव्हीएम सापडतात. नंतर 2014 ला भाजपच्या कार्यकर्त्यांकडे सापडतात. मग ईव्हीएम घोटाळा कोण करते? कॉंग्रेस की भाजपा? की दोन्ही मिळून? या सर्व प्रशांची उत्तरे मी माझ्या ‘‘ईव्हीएम-2019’’ या छोट्याशा पुस्तिकेत विस्ताराने दिलेली आहेत. माझ्या या पुस्तिकेचे प्रकाशन 2 वर्षांपर्वीच दिल्लीला माननीय शरद यादव यांच्या हस्ते झालेले आहे. पुस्तक प्रकाशनाच्या आदल्या दिवशी रात्री त्यांच्या हातात पुस्तक सोपवीले व ‘आपल्या हस्ते उद्याच्या कार्यक्रमात याचे प्रकाशन करायचे आहे, आपणास वाचण्यास वेळ मिळावा म्हणून आधीच हे पुस्तक देत आहोत’, असे सांगीतले. त्याचवेळी चर्चेत शरद यादव म्हणाले, ‘‘ईव्हीएम घोटाला नही किया जा सकता!’’ तरीही त्यांनी दुसर्‍या दवशी पुस्तकाचे प्रकाशन केलेच. कारण त्यांनी ते वाचलेच नव्हते.
आज ईव्हीएम बाबत अनेक मुद्यांवर चर्चा वाढते आहे. जे नेते ‘‘ईव्हीएम घोटाला नही किया जा सकता’’ असे ठामपणे म्हणत होते, तेच 21 विरोधीपक्ष नेते राष्ट्रपतींना साकडे घालण्यासाठी राष्ट्रपतीभवनावर जातात. वेळ व शब्दमर्यादा संपल्याने मी आटोपते घेतो. उद्याच्या उत्तरार्धात आणखी बरेच मुद्दे चर्चेला घ्यायचे आहेत. विरोधकांच्या पराभवाचे एकमेव कारण ईव्हीएम आहे काय? ईव्हीएम घोटाळा नेमके कोण घडवून आणते? पुन्हा बॅलेट पेपरवरील निवडणूका होऊ शकतात का? त्यासाठी नेमके काय केले पाहिजे? वगैरे प्रश्नांची चर्चा उद्याच्या उत्तरार्धात करू या! परंतू तो पर्यंत काही अभ्यासू वाचक माझे ईव्हीएम पुस्तक वाचण्याची तसदी घेतील,  अशी अपेक्षा व्यक्त करीत कडकडीत जयजोती जयभीम घालतो आणी ‘सत्य की जय हो’ घोषित करून थांबतो.
     ------- प्रा. श्रावण देवरे
           Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
            Email- s.deore2012@gmail.com


No comments:

Post a Comment