http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, July 24, 2019

80 BahujanNama Marathadveshta 20July19


बहुजननामा-80

ब्राह्मणद्वेष्टा ते मराठाद्वेष्टा...!    (उत्तरार्ध)

बहुजनांनो.... !
बहुजननामातील लेखांकावरील वाचकांचे आक्षेप व त्यांना पुर्वार्धात दिलेली उत्तरे वाचून काहींनी आणखी नवे आक्षेप नोंदवलेले आहेत. कारकून, इतिहास, भुगोल वगैरेंना मी कमी लेखतो आहे व ते चूक आहे, असा एक आक्षेप नुकताच घेतला गेला आहे. एखादे ऑफिस चालवायचे असेल तर त्यात ऑफिसर (क्लास-वन) जितका महत्वाचा असतो, तितकाच कारकून व शिपाईसुद्धा. ती एक मशिनरी आहे. त्यात नाक, डोळे जितके महत्वाचे तितकेच इतर अवयवसुद्धा महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे मशिनमध्ये चाक, शाफ्ट, नोझल व पिस्टन जितके महत्वाचे असते तितकेच महत्वाचे धूर बाहेर सोडणारे धुराळेही (Exhaust pipe) असते. या धुराळ्याला मागून बूच लावले की, गाडी सुरूच होत नाही. एकवेळ ऑफिसर नसला तरी चालेल पण कारकूनशिवाय कसं चालेल?
एक कॉलेज मी असे पाहिले आहे की, त्याच्या प्राचार्याची पोस्ट 2 वर्षांपासून रिकामी आहे. तेथे प्राचार्य म्हणून काम करायला कोणीच इच्छुक नाही, कारण त्या कॉलेजचा चेअरमन धन-दांडगा व जात-दांडगा आहे. त्या जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांवर लक्ष ठेवणारा जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी महिनाभर रजेवर आहे, कारण त्याचा एकूलता एक मुलगा 12 वीची परीक्षा देतो आहे. त्या जिल्हा-शिक्षणाधिकारीच्या वरिष्ठ रिजनल ऑफिसरची (विभागीय सहसंचालकाची) बदली होऊन एक वर्ष झाले, पण त्या जागी कोणी आलेच नाही, कारण तो ट्रायबल एरिया आहे. रिजनल सहसंचालकाच्या वर एक डायरेक्टर असतो, तो मुंबईच्या हेड ऑफिसमध्ये बसून संपूर्ण राज्याचा शिक्षण-कारभार सांभाळतो. तर ह्या डायरेक्टर पदासाठी MPSC परिक्षेतून निवड झालेला उमेदवार पदभार घेण्यासाठी 2 वर्षांपासून प्रतिक्षेत आहेत, परंतू मंत्रालयातून तसे आदेश काढले जात नाहीत, कारण संबंधित टेबलावरच्या सचिवाची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बरखास्ती झाली आहे व तो मॅटमध्ये गेलेला आहे. कक्ष अधिकार्‍याने डायरेक्टर नियुक्तीची ही फाईल कारकूनामार्फत मंत्रीमहोदयाच्या टेबलावर ठेवलेली आहे, परंतू मंत्रीसाहेब त्या फाईलवर सहीच करीत नाहीत, कारण त्यांच्यापर्यंत थैलीच पोहोचलेली नाही. म्हणजे कॉलेजला प्राचार्य नाही, जिल्ह्याला शिक्षणाधिकारी नाही, रिजनला सहसंचालक नाही, राज्याच्या हेड ऑफिसला डायरेक्टर नाही व मंत्रालयात सचिवही नाही आणी तरीही ही सगळी कार्यालये सुरळीतपणे चालू आहेत. कोणामुळे? अर्थातच कारकुनांमुळे! कॉलेजपासून ते मुंबईच्या हेडऑफिसपर्यंतच्या सर्व कार्यालयांमध्ये जे कर्मचारी काम करतात, त्या सगळ्यांना नियमितपणे एक तारखेला पगार मिळतो, कोणामुळे? अर्थातच कारकुनांमुळे! तर असे आहे, हे अत्यंत महत्वपूर्ण कारकून पद! कारकूनांमुळे ऑफिस सुरळीत चालते व पगारही नियमितपणे मिळतो. मात्र शिक्षणव्यवस्थेत काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील, महत्वाचे बदल करायचे असतील तर तेथे ऑफिसरच लागतो, कारकुन नाही.
मी जे कारकुनाचे उदाहरण दिले आहे ते कोणाला कमी लेखण्यासाठी नाही, तर कामाच्या श्रेणीबद्ध वाटपासाठी दिलेले आहे. आणी प्रत्येक श्रेणीसाठी वेगवेगळी पात्रता लागते व तत्सम शिक्षणही लागते. मात्र काळजी अशी घेतली पाहिजे की, या श्रेण्यांसाठी विशिष्ट जात-पात्रता असू नये. म्हणजे सफाई कामगारसाठी आठवी पास अशी पात्रता असेल तर, नववी नापास झालेल्या सर्व जातींच्या उमेदवारांना सफाई कामगारासारखीच नोकरी मिळाली पाहिजे. मात्र तसे होत नाही. नाशिक महानगरपालिका श्रमिक संघाचे उपाध्यक्ष कॉ. महादेव खुडे यांच्याशी चर्चा केली असता पुढीलप्रमाणे सत्य बाहेर आले. सफाई कामगारांच्या श्रेणीत दलित (SC) कॅटेगिरीचेच पोरं का असतात? नववी नापास झालेला पोरगा ओबीसीचा असेल तर तो शेतात साल-गडी, शेतमजूर बनेल किंवा आपल्या बापाचा पारंपरिक न्हावी-धोबी-मेंढपाळाचा व्यवसाय सांभाळेल! नववी नापास झालेला आदिवासी मुलगा कुठेतरी रोजगार हमीच्या कामावर मजूरी करेल. नववी नापास झालेला मुलगा जर सरंजामदाराच्या पोटी पैदा झालेला असेल, तर तो नगरसेवक बनेल, आमदार बनेल, शिक्षणमंत्रीही बनेल, परंतू तो सफाई कामगार होणार नाही. नववी नापास झालेला मुलगा कोणाच्याही पोटी जन्माला आला असेल, तर तो सफाई कामगारच बनला पाहिजे. या देशात प्रत्येक जातीला जात्याभिमान चिकटलेला आहे. जातीची गुर्मी नष्ट करायची असेल तर प्रत्येक जातीतील नववी नापास व्यक्तीला किमान दोन वर्षांसाठी ‘सक्तीची’ सफाई कामगाराची नोकरी करायला भाग पाडले गेले पाहिजे. हा जात्यंतक कार्यक्रम राबवायचा असेल तर, ते मनूच्या भांडवली लोकशाहीत शक्य नाही, त्यासाठी जात्यंतक साम्यवादी राजवटच हवी! आणी अशी राजवट देशात यायची असेल तर, त्यासाठी जात्यंतक लोकशाही क्रांतीच करावी लागेल.
मराठा आरक्षणातील ओबीसीकरणाला मी सातत्याने विरोध करीत असल्यामुळे मला ‘मराठा-द्वेष्टा’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मराठाद्वेष्टाच्या आधी ‘ब्राह्मणद्वेष्टा’ ही पदवी फार मशहूर होती. ब्राह्मणद्वेष्टा ही शिवी सर्वप्रथम तात्यासाहेब महात्मा फुलेंना देण्यात आली आहे. त्यानंतर ह्या सन्मानाची पात्रता फक्त कॉ. शरद पाटील यांच्याकडेच होती. ज्यांनी ब्राह्मण्य, ब्राह्मणी, ब्राह्मण्यवाद, आर्यभट, पेशवा यासारख्या संकल्पना वापरून ‘टोकदार’ जातीअंताचे विचार किंवा सिद्धांत मांडलेत, त्यांना ब्राह्मण विद्वानांनी ‘ब्राह्मणद्वेष्टा’ ठरविले. परंतू ज्यांनी हिंदू, हिंदूत्ववाद, वैदिकी, सवर्ण, उच्चजातीय या सारख्या मोघम संकल्पना वापरून जातीअंताचे विचार मांडलेत त्यांना ‘द्वेष्टा’ म्हणून कोणतीच पदवी मिळाली नाही. कारण ही मांडणी ब्राह्मणांना सोयीची होती व आहे
ज्यांनी मराठा आरक्षणाला केवळ ‘50 टक्के मर्यादेचे उल्लंघन’ व ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही’ एवढ्याच मुद्द्यांवर विरोध केला व करीत आहेत, त्यांना ‘मराठाद्वेष्टा’ हा सन्मान मिळणार नाही. कारण ही भुमिका मराठ्यांसाठी व पेशव्यांसाठी सोयीची आहे. (उदाहरणार्थ एड.तिरोडकर, एड. सदावर्ते वगैरे व मुर्दाड ओबीसी नेते यांना मराठाद्वेष्टा म्हटले जात नाही.) परंतू जे मराठा आरक्षणाला कॅटेगिरीच्या मुद्द्यावरून विरोध करतात, त्यांनाच ‘मराठाद्वेष्टा’ ही सन्मानजनक शिवी दिली जाते. मराठा आरक्षणाला सरसकट पाठिंबा देणार्‍या बामसेफ सारख्या संघटना, दलित व बौद्ध सघटना आहेत. सरसकट पाठिंबा म्हणजे मराठा समाजाला ओबीसी कॅटेगिरीमध्ये आरक्षण दिले तरी आम्हाला आनंदच आहे, अशी ‘अ-आंबेडकरवादी’ भुमिका घेणारे अर्धवट लोक! याच्यात संधीसाधूपणा असा असतो की, मराठ्यांना जवळ करावे व पेशव्यांना शिव्या द्यायच्या! या मध्ये ‘सुरक्षिततेची’ भित्री-भागूबाईची भावना असते. मराठा व पेशव्यांना एकाच वेळेस युद्धासाठी ‘आव्हान’ देण्याची पात्रता केवळ सच्च्या ओबीसी जातींमध्येच आहे, हे मी उदाहरणासकट अनेकवेळा सिद्ध केले आहे (वाचा- बहुजननामा-68 व 69) त्यामुळे सच्च्या ओबीसी जातींना साधनहीन व शस्त्रहिन करण्यासाठी मराठ्यांना ओबीसी (SEBC) कॅटेगिरी प्रदान केली जात आहे. मराठे कितीही प्रबळ झालेत तरी ते पेशव्यांचे मांडलिक सरदार म्हणूनच काम करणे पसंद करतात. ब्राह्मण-क्षत्रिय युतीची ही परंपराच आहे. छत्रपती शिवराय हे शूद्र जातीत जन्मलेले असल्याने व राजे संभाजी हे जन्मतःच शूद्रधर्मी शाक्त असल्याने त्यांचा कट्टर ब्राह्मणविरोध-सरंजामविरोध हा स्वाभविक होता. परंतू सरंजामदार, वैतनिक जमिनदार हे जन्मतःच क्षत्रिय असल्याने ते ब्राह्मण वर्चस्वाखाली दोन नंबरचे (मांडलिक) स्थान स्वेच्छेने स्वीकारतात.
तर अशा या ब्राह्मण-क्षत्रिय युतीला कट्टर विरोध करणे हे ओबीसी, दलित व आदिवासी कॅटिगिरीचे जन्मसिद्ध कार्य आहे. ऐतिहासिक परंपरा हेच सत्य सांगते. त्यामुळे ब्राह्मण व क्षत्रिय (जाट-पटेल, मराठा वगैरे) यांचा कॉमन शत्रू ओबीसीच आहे व त्याला आत्ताच गाडला नाही तर, तो तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ब्राह्मण-क्षत्रियांना गाडून टाकेल, अशी रास्त भीती ब्राह्मण व मराठ्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांना ‘मराठा ओबीसीकरण’ करून सच्च्या ओबीसी जातींच्या गळ्यात ‘‘गाडगे-मडके’’ बांधायचे आहे.
सच्च्या ओबीसींशिवाय ‘जात्यंतक लोकशाही क्रांती’ शक्य नाही, हे सत्य सर्वप्रथम उमगले ते कॉ. शरद पाटील (शपा) यांना! शपांनी दलित व आदिवासी आरक्षणावर वा त्याच्या कोणत्याही आयोगावर कधीच पुस्तक लिहीले नाही. मात्र ओबीसींच्या आरक्षणावर व मंडल आयोगावर अकाट्य असे तात्विक पुस्तक लिहीले. शपा बामसेफच्या व मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आक्रमकपणे ठोकरून नाकारायचे, कारण त्यांच्या मते ह्या संघटना जातीय आहेत. श्रावण देवरे व अशोक राणा या दोघांनी शपांना ‘कन्व्हीस’ केल्यावर ते नाखूशीनेच मराठा व बामसेफच्या कार्यक्रमांना जायला लागलेत. मात्र श्रावण देवरे ओबीसींच्या सभा व मंडल आयोगाच्या परिषदांना शपांना निमंत्रीत करीत नाही, याबद्दलची उघड नाराजी शपांनी दादाजी माळी (जिभाऊ) यांच्याकडे व्यक्त केली होती. ‘छगन भुजबळांच्या समता परिषदेच्या शिबीरात माझे एक व्याख्यान आयोजित कर’, अशी सूचना शपांनी मला फोनवरून केली होती. परंतू समता परिषदेच्या शिबिरात वक्ता निमंत्रित करणारे संयोजक ‘करंट्या’ बुद्धीचे होते.  या शिबिरांमध्ये कुमार केतकरसारख्या कट्टर ‘मंडल आयोग विरोधी’ वक्त्याला माळ्यांचे प्रबोधन करण्यासाठी बोलावले जात होते. अशा परिस्थितीत या शिबिरांच्या करंट्या संयोजकांना मी शपाचे नाव सुचविण्याची हिम्मत करू शकलो नाही. पण शपाचे ओबीसी-प्रेम पाहता हेच सिद्ध होते की जात्यंतक लोकशाही क्रांतीसाठी सच्चा ओबीसीच साधनयुक्त व शस्त्रयुक्त झाला पाहिजे. ओबीसींसाठी मंडल आयोग हा एक जात्यंतक लोकशाही क्रांतीच्या शस्त्रांचा कारखाना होता व आहे. आणी हा क्रांतीकारी शस्त्रासांचा कारखानाच उध्वस्त करण्यासाठी जाट-पटेल-मराठा ओबीसीकरणाचा ब्राह्मणी सर्जीकल स्ट्राइक केला जात आहे. पेशव्यांचे हे मराठा-षडयंत्र उघडे पाडून त्या विरोधात वैचारिक व मैदानी संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्याला आधी ब्राह्मणद्वेष्टा व नंतर मराठा द्वेष्टा अशा पुरस्कारांनी सन्मानीत केले जाते. कॉ. शरद पाटील (शपा) ‘ब्राह्मणद्वेष्टा’ या महान पुरस्काराने सन्मानीत झालेत. त्यांच्या हयातीत मराठा आरक्षणाचे ब्राह्मणी षडयंत्र केले गेले असते, तर कदाचीत त्यांनाही ‘मराठाद्वेष्टा’ ही महान पदवी मिळाली असती. परंतू एक ‘शपाशिष्य’ म्हणून श्रावण देवरेंसारख्या छोट्या कार्यकर्त्याला ‘मराठा द्वेष्टा’ ही मोठी पदवी मिळाली, धन्य जाहला श्रावण देवरे!
जय जोती, जयभीम... सत्य की जय हो!!!!
(लेखन दिनांक- 17 जुलै 2019 व प्रकाशन 20 जुलै 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग

 Email- 

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

No comments:

Post a Comment