http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, July 13, 2019

79 Bahujannama Shanka Samadhan 14 July 2019


बहुजननामा-79
बाळ पाहिजे पण प्रसव वेदना नको...! (पुर्वार्ध)
बहुजनांनो.... !
ईव्हीएम आणी मराठा आरक्षणाच्या विषयावरून एका वेगळ्याच विषयाकडे वळावे लागते आहे. नंतर केव्हा तरी लिहू म्हणूण यावर लिहायचे मी पुढे ढकलत होतो, मात्र आता तक्रारींचा पाढा लांबत जात आहे, म्हणून शंका व तक्रारींना समाधानकारक उत्तरे तर दिलीच पाहिजेत, अन्यथा वाचकांमध्ये गैरसमज वाढू शकतो.
सर्वप्रथम बहुजननामाच्या तमाम वाचकांचे-अभ्यासकांचे मी आभार मानतो की, आपण माझ्यावर व बहुजननामावर जे प्रेम दाखवीत आहेत, त्याबद्दल मी खरेच आपला ऋणी आहे. फेबु व व्हाट्सप वरील चारोळ्या (चार ओळी) वाचता वाचता दमछाक होणार्‍या या काळात आपण माझे लांबलचक बहुजननामा वाचून काढतात, त्यावर कॉमेंट करतात, फोन करतात, चुका दाखवितात व दुरूस्त्याही सुचवतात. यात वाचकांनी घेतलेल्या आक्षेपांवर व्यक्तीशः फोनवरून वा भेटीत चर्चा होते. परंतू हेच आक्षेप इतरही वाचक-कार्यकर्त्यांच्या मनात असू शकतात, म्हणून बहुजननामाचा हा लेखांक ‘शंका आणी समाधान’ या विषयाला अर्पण करीत आहे.
पहिला आक्षेप आमच्या वाचक मित्रांनी घेतला ‘काठिण्याचा’! म्हणाले, तुमचा लेख वाचायला लांबलचक असला तरी समजायला कठिण असतो. लेखात जात्यंतक सारखे कठिण शब्द असतात. सोप्या भाषेत नाही का लिहीता येणार? बरेचसे मुद्दे, नव्या संकल्पना डोक्यावरूनच जातात. आता हा आक्षेप बरोबरच आहे. असेच आक्षेप आमचे गुरू कॉ. शरद् पाटील (शपा) यांच्यावर घेतले जात होते, आजही घेतले जातात. या आक्षेपांना शपांनी सुंदर उत्तर दिलेले आहे. ‘सत्यशोधक मार्क्सवादी’च्या संपादक मंडळातील एक सदस्य म्हणून मी या विषयावर यापूर्वी लिहीलेले आहे. त्यातील काही मुद्दे सारांशाने येथे देत आहे. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक रूटीन जीवन जगणारे. मागच्या पानावरून पुढच्या पानावर ढकलले जाणारे! ‘अद्यात ना मध्यात’ असलेले लोक या पहिल्या प्रकारात मोडतात. आणी दुसर्‍या प्रकारात जगाच्या प्रवाहाला चांगले-वाईट वळण देऊन जगण्याची दिशा बदलणारे असतात! जग बदलणारे क्रांती वा प्रतीक्रांतीकारक! रूटीन जीवन जगायचे असेल तर फारसं डोकं खाजवावे लागत नाही. नर्मदेच्या गोट्यासारखे प्रवाहासोबत वाहत जायचे असते. आलीया भोगासी असावे सादर! जे घडते आहे त्याला निमूटपणे खाली मान घालून सामोरे जाणारे. त्यासाठी फारशा शिक्षणाची गरज नसते. मागच्या पानावरून पुढच्या पानावर ढकलणारा ‘कारकून’ व्हायचे असेल तर इतिहास, भुगोल सारखे सोपे विषय घेऊन पदवीधर व्हावे व कारकूनी सारखी नोकरी पत्करून आयुष्यभर पाट्या टाकत राहावे! आर्ट्स कॉलेज यासाठी पुरेसे असते.
परंतू जर नवनिर्मिती करायची असेल, प्राणी सृष्टीच्या अडचणी, दुःख, व शोषण कमी करून त्यांना सुखसोयीचे जीवन मिळवून द्यायचे असेल तर, त्यासाठी खडतर तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या म्हणजे हिमालयात जाऊन ध्यानस्थ बसणे नव्हे. तपश्चर्या म्हणजे ज्ञानार्जन करणे, प्रयोग करणे. त्यातील निचोड असलेल्या अनुभवजन्य निष्कर्षांना एकत्रीत करून त्यांना शास्त्रशुद्ध तत्व-सिद्धांताचे स्वरूप देणे, त्याचा विस्तार, प्रसार करणे, त्याला सामान्यांपर्यंत पोहचवून जनरलाईज करणे व सर्वांना त्याचा लाभ मिळवून देणे! यासाठी घोर कष्ट करावे लागतात. जगाचा रोष पत्करावा लागतो, मृत्युलाही सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. क्रांतीचे महान तत्वज्ञान प्रसवणार्‍या महामानव बुद्ध व मार्क्सने सांगून ठेवलेले आहे की, ‘जग कसे आहे, हे सांगणारी तत्वज्ञाने खूप आहेत, परंतू जग कसे असावे, हे सांगणारे त्वज्ञान पाहिजे.’ अशी सृष्टीची नवनिर्मिती करणारी, नवरचना करणारी व आमुलाग्र बदल घडवून आणणारी तत्त्वज्ञाने, सिद्धांत व प्रयोग यशस्वी करायचे असतील तर त्यासाठी शास्त्रशूद्ध अभ्यासच करावा लागतो. शास्त्रज्ञ बनून काही नवे संशोधन करायचे असेल तर, सायन्स कॉलेजातच जावे लागते. सर्वच शास्त्रज्ञ ‘न्युटनच्या मार्गाने’ शास्त्रज्ञ होऊ शकत नाहीत. लाखो शास्त्रज्ञात अपवाद म्हणून एखादाच न्युटन असतो की, ज्याला शाळेत जाण्याची गरज नव्हती. बाकीच्यांना तर शास्त्रज्ञ होण्यासाठी सायन्स, मेडिकल वा इंजिनिअरिंग कॉलेजचेच विषय शिकावे लागलेत.
आर्ट्स कॉलेजमध्ये कथा-कांदबर्‍या, इतिहास, भूगोल सारखे घोकंपट्टीचे विषय सहजपणे पास होऊन कारकून होता येते. मात्र मेडिकल, इंजिनियरिंग व सायन्समध्ये गणित, रसायन, भौतिक अशी तर्कशास्त्रावर आधारित विषय घ्यावे लागतात. जग बदलणारे तत्वज्ञानही अशाच प्रकारचे एक शास्त्र असते. मार्क्सच्या काळात स्वप्नाळू समाजवाद मांडणारे अनेक विचारवंत होते, आजही आहेत. मात्र समाजवादाची मांडणी शास्त्रशूद्धपणे करणारा व त्याचे एक मॉडेल तयार करून ते अनेक देशात यशस्वी करणारा एकमेव मार्क्सच होता. बुद्धाच्या काळात सहा तत्वज्ञानी होते. मात्र जगभर मान्यता मिळाली ती एकमेव बुद्ध तत्वज्ञानाला. जे शास्त्रशूद्ध ज्ञानाची कास धरतात तेच जग बदलण्याची क्रांतीकारी कवायत यशस्वी करतात. शास्त्र शिकायचे असेल तर त्यातील संज्ञा, संकल्पना, त्यातील समिकरणे, तर्कशास्त्र इत्यादि कठीण वाटणारच! ते सोपे करून सांगणार कसे? ते आहे तसेच समजून घ्यावे लागतात. घोकंपट्टी करून काहीच पदरात पडत नाही. प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील अशा सोपेकरणवाल्यांना एक उदाहरण नेहमी द्यायचे. ‘‘यांना बाळ पाहिजे, परंतू प्रसव वेदना नकोत!’’
त्यामुळे माझ्या बहुजननामातील शब्द, संकल्पना व मुद्दे समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी मूलभूत अभ्यासाची गरज आहे. मी जात्यंतक चळवळीचा कार्यकर्ता असल्याने माझी सर्व मांडणी फुले, आंबेडकर, मार्क्स या सारख्या शास्त्रशुद्ध समतावादी तत्वज्ञानाची कास धरणारी आहे. आणी ती मांडणी समजून घ्यायची असेल तर वाचकांनी किमान एकदा तरी फुले-आंबेडकर वाचले पाहिजेत. माझ्या बहुजननामातील एखाद्या लेखांकात काही मुद्दे असे असतात की, ते फक्त संदर्भ म्हणून वापरलेले असतात. या मुद्यांचे अधिक स्पष्टीकरण वा विवेचन मी यापूर्वी लिहिलेल्या पुस्तकात अथवा लेखांकात केलेले असत. ते पुन्हापुन्हा रिपीट करणे शक्य नसते. त्यामुळे हे मुद्दे मुळातून समजून घेण्यासाठी माझी पुस्तके वा आधीचे लेखांकही वाचले पाहिजेत.
दुसरा आक्षेप आहे, धरसोडपणाचा! मी माझ्या भुमिकेत बदल करतो वा प्राधान्यक्रम बदलतो असा आक्षेप आहे. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. त्यांचा विचार करू या! मराठा ओबीसीकरणाच्या विरोधात मैदानी लढाई सुरू असतांना मराठा नेते हे आपले पहिल्या क्रमांकाचे शत्रू असले पाहिजेत. येथे शत्रू म्हणजे वैचारिक शत्रू समजावे. मराठा आरक्षणाच्या विरोधात लढणार्‍यांसाठी पहिल्या क्रमांकाचे शत्रू ओबीसीकरणवादी मराठेच असणार! म्हणजे ज्या मराठ्यांना ओबीसी कॅटॅगिरी म्हणूनच आरक्षण हवे आहे, ते आपले शत्रू असणारच! ते स्वाभाविकही आहे. या लढाईचा अत्यंत अटीतटीचा जीवघेणा संघर्ष 15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2018 दरम्यान लढला गेला. या काळात शत्रू म्हणून प्राधान्य क्रमांकावर मराठा नेतेच होते. नंतरच्या लढाईच्या काळातही तेच प्राधान्य क्रमावर राहतील. असे असतांना मी प्रवीण दादा गायकवाड सारख्या शत्रू मराठा नेत्याला पुण्यातून लोकसभा तिकीट मिळावे म्हणून बहुजननामा का लिहीला? हा प्रश्न विचारणार्‍या वाचकांच्या मनात कोणताही वाईट उद्देश नाही. त्यांना कदाचीत ओबीसीवरील अतिप्रेमापोटी माझा राग आला असावा. किंवा माझ्याकडून खुलासा करवून सच्चाई जाणून घ्यायची असावी.
प्रवीण दादा गायकवाड हे आज शत्रूनंबर एकच्या यादीत असले तरी ते पुर्वी मराठा ओबीसीकरणवादी नव्हते. तेव्हा आम्ही मराठा आरक्षणासाठी अनेक कार्यक्रम एकत्र येऊन संपन्न केलेले आहेत. माननीय पुरूषोत्तम खेडेकर यांचा मराठा सेवा संघ, प्रविण दादांची लढाऊ संभाजी ब्रिगेड व किशोर चव्हाणांची मराठा छावा संघटना आदि अनेक संघटनांच्या सोबत माननीय वामन मेश्रामप्रणीत बामसेफ व माननीय प्रदिप ढोबळे, श्रावण देवरे यांनी स्थापन केलेला ओबीसी सेवा संघ हे सर्व मराठा आरक्षणसाठी एकत्रीतपणे संघर्ष करीत होती. त्यातून दलित, ओबीसी व मराठा यांच्यात रासायनिक संयुगाची प्रक्रिया घडत होती व स्ट्रॉंग बॉण्ड असलेला ‘बहुजन समाज’ आकार घेत होता. परंतु नंतर आलेल्या पेशवे सरकारने मराठा आरक्षणाचाच मुद्दा वापरून समाज विघटनाची प्रक्रिया सुरू केली. ज्याप्रमाणे भुजबळसाहेबांना जेलबंद करून त्यांची वाचा बंद पाडली गेली, त्याचप्रमाणे पुरूषोत्तम खेडेकर साहेबांना ‘फेरा’ चा गैरवापर करून ‘जायबंदी’ करण्यात आले व त्यांना दिशा बदलवण्यास भाग पाडण्यात आले. पुरोगामी म्हणविणारे नेतेच मुर्दाड झाल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अलगदपणे सराटेंसारख्या संघीस्ट नेत्यांच्या हातात जाउन पडला. सराटेंसारखे आणखी काही लोक संघाच्या केडर कॅम्पमधून रासायनिक विघटनाचे प्रशिक्षण घेऊन आलेले होते. नंतर पेशवे सरकारप्रणित मराठ्यांचे लाखांचे मोर्चे निघायला लागलेत. त्याला हुरळून जाऊन प्रविणदादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, खेडेकर वगैरेंसारखे पुरोगामी त्यांच्या मागे फरफटत जात आहेत. आधी दलित-ओबीसींचे मित्र असलेले हे सर्व पुरोगामी मराठा नेते आज नकळतपणे शत्रूच्या छावणीत कसे जाऊन बसलेत, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच केले पाहिजे. जिजाऊंचा लाल महाल भक्कम करता-करता अचानक शनिवारवाड्याच्या नव-उभारणीचे कंत्राट या मराठा पुरोगामी(?) नेत्यांच्या खांद्यावर कसं येऊन पडलं, ह्याचा पुनर्विचार त्यांनीच केला तर बरे होईल.
मुद्दा प्रविण दादा गायकवाडांना पुण्याचे लोकसभेचे तिकीट मिळण्यासाठी मी त्यांच्या बाजूने बहुजननामा लिहीला, हा आहे. पुणे मतदारसंघातील कॉंग्रेसच्या तिकीटासाठी सरळसरळ दोन व्यक्तींमध्ये संघर्ष होता. एक जोशी होते व दुसरे प्रवीण गायकवाड होते. ही लढाई केवळ दोन व्यक्तींमधील लढाई नव्हती. ती दोन सामाजिक शक्तींची लढाई होती. माननीय शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याने आपले पूर्ण वजन प्रविण गायकवाडांच्या बाजूने टाकल्यावरही गायकवाडांना तिकीट नाकारले जात होते. याचे एकमेव कारण म्हणजे प्रविण दादा हे ब्राह्मणवादाचे विरोधक आहेत, हे त्यांनी केलेल्या अनेक आंदोलनातून सिद्ध झालेले आहे. ‘दादो कोंडदेव उखाड’ आंदोलन असो की, ‘भांडारकर फोडो’ आंदोलन, प्रविणदादांनी त्या आदोलनांचं नेतृत्व केलेले आहे. पुण्यासारख्या पेशवाईच्या अड्ड्यात हा मराठा बाणा निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे सर्वपक्षीय ब्राह्मण एकत्र येऊन प्रविण दादाला तिकीटापासून वंचित करीत होती. हा ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष होता. याच कारणास्तव मी प्रविण दादाची बाजू घेऊन बहुजननामाचा लेख लिहीला.
आपण कौरव-पांडवांचे नेहमी उदाहरण देतो. आपापल्या हक्कांसाठी आपसात लढत असतील 100 विरूद्ध 5 अशी लढाई होत असते. परंतू बाहेरच्या शत्रूशी लढायचे असेल तर 105 विरूद्ध बाहेरचा शत्रू अशीच लढाई होणार.
शब्दमर्यादा संपल्याने मी येथेच थांबतो. आणखीन काही महत्वाचे आक्षेप आहेत, त्यांचीही समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न मी पुढील लेखांकात उत्तरार्धात करीन. तोपर्यंत जयजोती जयभीम, सत्य की जय हो
(दिनांक- 13 जुलै 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग

 Email- 

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

No comments:

Post a Comment