http://shrwandeore.blogspot.in/

Thursday, July 4, 2019

77 BahujanNama Maratha reservation1 Judgement 2July19


बहुजननामा-77
 मराठा आरक्षण..... जय हो!      (भाग-1)
बहुजनांनो.... !
 -१-
    ईव्हीएम वरील लेखांक मालिका मध्येच तोडून मला आज मराठा ओबीसीकरणाच्या हायकोर्ट जजमेंटवर लिहावे लागते आहे. ओबीसींमध्ये बरेच विचारवंत आहेत, लेखकही आहेत,प्राध्यापक-डॉक्टरेट तर पायलीचे पंधरा सापडतील. त्यांच्यापैकी कुणी लिहीले असते तर मला ईव्हीएमवरील लेखांक मालिका तोडायची आवश्यकता नव्हती. ब्राह्मणांच्या विरोधात वा मोदीच्या विरोधात भरभरून लिहीणार्‍या आमच्या ‘‘मागास’’ बुद्धीमानांना मराठा विरोधात काही लिहायचा विचार जरी मनात आला तरी या बुद्धीमानांची चड्डी पिवळी होते. त्यांच्या मागासलेपणाची ही पहिली कसोटी आहे, आणी या डरपोकपणाच्या कसोटीवर हे ‘मागास बुद्धीमान’ डिस्टिंग्शन घेऊनच पास होतात.
हायकोर्टच्या जजमेंटवर लिहीण्याआधी सर्वप्रथम मी मराठा क्रांती मोर्चाच्या तमाम अभ्यासक, संयोजक, कार्यकर्ते व नेत्यांचे अभिनंदन करतो. त्यात प्रामुख्याने ज्यांची नावे पुढे येतात त्यात विजय काकडे-पाटील, बाळासाहेब सराटे, राजेन्द्र कोंडरे, भैय्या पाटील, आबा पाटील, राजेंद्र दाते-पाटील, विनोद पाटील, किशोर चव्हाण व यांच्यासोबत मैदानात लढणारे असंख्य कार्यकर्ते तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे माननीय पुरूषोत्तम खेडेकर, प्रवीण दादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे यांच्यासारखे अनेक अभ्यासक, विचारवंत यांच्या कट्टरतेला व जात-निष्ठेला मनापासून सलाम! या मराठा नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये विचारवंतांमध्ये जेवढी निष्ठा समाजाप्रती आहे, त्यातील एका अंशाईतकी निष्ठा ओबीसी नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये व विचारवंतांमध्ये असती तर.......?
सगळ्यात मोठे विशेष अभिनंदन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे केले पाहिजे. कारण त्यांनीच अशक्य ते शक्य करून दाखविलेले आहे. आरक्षण देण्यात त्यांचा हातखंडा निर्माण झाला आहे. केवळ जादूच्या कांडीनेच हे शक्य आहे. परंतू त्यांची ही जादूची कांडी ते धनगर आरक्षणसाठी, मुस्लीम आरक्षणासाठी फिरविणार नाहीत. ही कांडी फक्त मराठ्यांसाठी होती व आहे. जर फडणवीस साहेबांना कोणी सांगीतले की, अमेरिकेत बरेच मराठा राहतात, तर फडणवीस साहेब तात्काळ अमेरिकेत जातील व तेथील मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देउनच भारतात परत येतील.
-2-
समाज प्रवाहाच्या नदीचे पात्र खोल व रूंद असते तेव्हा प्रवाह एकाच दिशेने संथपणे, शांतपणे दिमाखाने पुढे जात असतो. पण हाच प्रवाह जेव्हा खडकाळ पात्रातून व दगड-धोंड्यातून वाट काढत जातो तेव्हा तो उथळ होतो, खळखळाट करतो व या ठिकाणी त्याची दिशा बदलण्याची वेळ येते. प्रवाहाची पुढील दिशा डावी असावी की उजवी यावरून पुरोगामी प्रतिगामी यांच्यात संघर्ष सुरू होतो. प्रतिगामी(उजवे) हे प्रतिक्रियावादी असतात, म्हणून ते योग्य वेळ येण्याची वाट पाहात असतात. पुरोगामी(डावे) मात्र लगेच कामाला लागतात. मराठा सेवा संघाने मराठा आरक्षणाचा विषय पुढे आणताच त्याला सर्वप्रथम पाठींबा दिला तो बामसेफने! त्यानंतर ओबीसी सेवा संघाने मराठा आक्षणाला सक्रिय पाठींबा दिला. ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष माननीय प्रदिप ढोबळे यांनी पार्लमेंट्री नचिअप्पन कमिटीचा अहवाल मिळवीला. त्याचा बारकाईने अभ्यास केला व त्यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुरोगामी पद्धतीने सोडविण्याचा उत्तम मार्गही दाखविला. त्याच दरम्यान आम्ही ओबीसी जनगणनासकट सर्व जातीजमातींच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणला. जातनिहाय जनगणनेत मराठा जातीचीही जनगणना होईल व त्यातून समाजाच्या मागासलेपणाच्या ‘फॅक्ट्स अँड फिगर्स’ येतील. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला भक्कम आधार मिळेल. त्यातून मराठा समाजाला ‘मराठा’ म्हणून आरक्षण देणे सोपे झाले असते.
मराठा आरक्षणाचा मुद्दा अशा पद्धतीने दलित व ओबीसींच्या सहकार्याने समाज पटलावर मांडला जात असतांना सामाजिक एकीकरणाची प्रक्रियाही गतिमान झालेली होती. अनेक कार्यक्रमात माननीय वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पुरूषोत्तम खेडेकर, प्रदिप ढोबळे, श्रावण देवरे, प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे एकाच विचारमंचावर दिसू लागलेत. या सर्वांचे विचार एकाच दिशेने व समान पातळीवर समाजापर्यंत जाउन भिडू लागलेत. ही केवळ बेरीज-गुणाकाराची गणिती प्रक्रिया नव्हती. ही वैचारिक मुद्द्यांच्या पातळीवरची विविध समाजांच्या मूलद्रव्यांच्या संयुगाची  (Compound Forming) रासायनिक प्रक्रिया होती. या रासायनिक प्रक्रियेचे सूत्र होते फुले-शाहू-आंबेडकर! या रासायनिक प्रक्रियेला बर्‍यापैकी यशही येत होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मनावर घेतला व प्रत्यक्षात आरक्षण दिले सुद्धा! अर्थात ही प्रश्न सोडविण्याची पॉझिटिव्ह सुरूवात होती. त्यात अनेक त्रुट्या होत्या. त्यानंतरच्या प्रक्रियेत योग्य दुरूस्त्या करून हा प्रश्न मार्गीही लागला असता. पुरोगामी दिशेने आम्ही सर्व जात होतो. दलित+ओबीसी+मराठा असे फुले+शाहू+आंबेडकरी समीकरण घेऊनच आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवीत होतो. बहुजनांच्या संयुगीकरणाच्या केमेस्ट्रीने मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सरकारी ऐरणीवर आणलेला होता.  
परंतू त्यानंतर आलेल्या पेशवाई सरकारने याची दिशाच बदलली. मराठा आरक्षणासाठी बहुजनांची ही ‘केमेस्ट्री’ सुरू असतांना ‘योग्य वेळ’ येण्याची वाट पाहात, दबा धरून बसलेले संघीस्ट-मनुवादी शांत बसलेले नव्हते. मराठा आरक्षणाच्या प्रवाहाला त्यांनी उजवी-प्रतिगामी दिशा देण्यासाठी षडयंत्र रचायला सुरूवात केली. त्यांनी आधी त्यांच्या कॅम्पमध्ये सराटेंसारखे मराठा-केडर तयार केलेत. त्यांना पद्धतशीरपणे ‘मराठा’ नेते म्हणून घुसविण्यात आले. कोपर्डी प्रकरणाला त्यांनी योग्य संधी समजून कारवाया सुरू केल्यात. कोपर्डी गावात रोजच मेळावे भरायला लागले. त्यात संघाचे केडर असलेल्या मराठा नेत्यांनी सूत्रे हाती घेतलीत. ब्राह्मणी मिडिया सोबत होताच!  या मेळाव्यांना भेटी द्यायला अनेक मोठमोठे नेते पाठवले जाऊ लागलेत. त्यांच्या तोंडात बळजबरीने ‘मराठा आरक्षणाचा मुद्दा’ कोंबण्यात आला. वास्तविक ती बलात्काराची व खूनाची घटना होती. जनतेचा असंतोष त्या घटनेचा निषेध करीत होता, गुन्हेगारांना पकडून फाशी द्यायला सांगत होता. तेथे मराठा आरक्षणाचा काहीएक संबंध नव्हता. परंतू समाजप्रवाहाची दिशा प्रतिगामित्वाकडे मनुवादाकडे बदलण्याची हीच योग्य वेळ आहे, असे समजून संघीस्टांनी तयार केलेले केडर अचानक कामाला लागले. कोपर्डीतून त्यांनी आपली रासायनिक विघटनाची प्रक्रिया सुरू केली. पहिली ठिणगी त्यांनी टाकली दलित नेत्यांच्या विरोधात. माननीय रामदास आठवले कोपर्डीला भेट देण्याचे जाहीर होताच, मिडियामधून त्यांच्या निषेधाच्या बातम्या प्रसारित झाल्यात. मराठा आरक्षणाला उघड-उघड पाठींबा देणार्‍या रामदास आठवले साहेबांना कोपर्डी गावाच्या बाहेरच पोलीसांनी रोखले. बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनाही ‘‘कोपर्डी गावात आल्यास परिणाम वाईट होतील’’ असा सज्जड दम देण्यात आला. जणूकाही आठवले-आंबेडकरच कोपर्डीचे गुन्हेगार आहेत, त्यांनाच फासावर लटकावले पाहिजे, असे चित्र जाणीवपूर्वक उभे करण्यात आले. शरद पवारांसाखे दिग्गज नेते हातात कुंचला घेऊन त्यात ‘गडद व भडक’ रंग भरीत होते. वास्तविक शरद पवार साहेब खरेच पुरोगामी असते तर, त्यांनी प्रकाश आंबेडकर वा रामदास आठवले यांना सोबत घेऊन कोपर्डी गावात गेले असते व विघटनकारी सामाजिक प्रक्रिया थांबवीली असती. ‘‘श्रावण देवरे यांच्याकडून राजकारण शिकण्याइतकी वाईट वेळ अजून माझ्यावर आलेली नाही’’ असे भर मिटिंगमध्ये चिडून बोलणार्‍या पवारसाहेबांना तेथे राजकीय ‘पोळी’ शेकायची होती. आणी फडणवीस साहेबांना तर कोपर्डीत ‘पुरणपोळीच’ खायची होती. आधी आठवलेंसोबत जाण्याचे कबूल करूनही फडणवीस साहेबांनी आठवले साहेबांना कोपर्डीच्या बाहेर ठेवून स्वतः एकटे कोपर्डीत गेले. हा डायरेक्ट मेसेज होता मराठा विरूद्ध दलित लावून देण्याचा! मराठा विरूद्ध दलित या विघटनाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मराठा मूक मोर्च्यांची साखळी रासायनिक प्रक्रिया सुरू झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली सर्व फौज या कामाला लावलेली होती. केवळ दलित नेतेच टार्गेट झाले नाहीत, तर या मोर्च्यात ‘ऍट्रासिटी ऍक्ट’ रद्द करण्याची मागणी करून एकूणच दलित-आदिवासी जनतेला दहशतीत आणण्याचा प्रयत्न झाला. त्यातून नाशिक, धुळे यासारख्या अनेक जिल्ह्यात दंगलीही घडवून आणण्यात आल्यात. मराठा जातीला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, ही मागणी पहिल्यांदाच मराठा मोर्च्यातून पुढे आली. त्याच्या परिणामी मराठा विरूद्ध ओबीसी असे भांडण नव्याने सुरू करण्यात आले.
-3-
मराठा आरक्षण देतांना फुले-शाहू-आंबेडकरी सूत्रानुसार ‘बहुजन-संयुगाची रासायनिक प्रक्रिया’ करून आरक्षण दिले पाहिजे ही पुरोगामी भुमिका होती. आमची ही भुमिका काही अंशाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने मान्यही केली होती.  परंतू मराठा आरक्षण देतांना ‘बहुजन विघटनाची रासायनिक’ प्रक्रिया घडवून आणली पाहिजे, ही दुसरी प्रतिक्रियात्मक प्रतिगामी भुमिका संघ-भाजपाची होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले तेव्हा मराठासकट दलित-ओबीसींनी आनंद व्यक्त केला होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठा आरक्षण दिल्यावर कुठेही बामसेफ वा ओबीसी संघटनांनी आनंद व्यक्त केला नाही. इतका मोठा फरक ज्यांच्या लक्षात आला असेल, ते सूज्ञ म्हटले पाहिजे.
उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधिश असलेले माननीय कोळसे पाटील व माननीय पी.बी. सावंत यांनी अजूनही या फडणवीसी मराठा आरक्षणाचे स्वागत केले नाही व आनंदही व्यक्त केला नाही. माननीय बाबा आढावांपासून ते भारत पाटणकरांपर्यंतचे मराठा-समाजवादी व मराठा कम्युनिस्टांनीसुद्धा यावर चुप्पी साधलेली आहे.  याचे कारणच हे आहे की, फडणवीसप्रणित मराठा आरक्षण हे ‘पेशवाई’चा पाया’ भक्कम करणारे षडयंत्र आहे, याची खात्री बहुतेक सर्वच सूज्ञ लोकांना झालेली आहे. अपवाद म्हणून ज्या 2-4 दलित-ओबीसींना मराठा आरक्षणाने आनंद झाला आहे, ते एकतर बिनडोक असल्याने त्यांना हे षडयंत्र समजलेले नाही, किंवा राजकारणातील मराठा-दहशतीपोटी त्यांनी मराठा आरक्षणाचे स्वागत केलेले आहे. काही लोकांकडून बळजबरीने आनंद व्यक्त करवून घेतला आहे, उदाहरणार्थ माननीय उद्धव ठाकरे!
 लेखांकाची शब्दमर्यादा आधीच संपलेली आहे. पुढील मुद्दे पुढील लेखांकात चर्चेला घेऊ या! तो पर्यंत अभ्यासू वाचक मी संपादित केलेले ‘ओबीसी मराठा बहुजनः मोर्चे-प्रतिमोर्चे व पुरोगामी महाराष्ट्राची फरफट’ हे पुस्तक वाचतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण हे पुस्तक वाचल्यानंतर मराठा आरक्षणावरचे लेखांक त्यांना सहजपणे समजतील. आता कडकडीत जयजोती जयभीम घालतो आणी सत्य की जय होघोषित करून थांबतो.
(दिनांक- 2 जुलै 2019) 
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग

 Email- 

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)




No comments:

Post a Comment