http://shrwandeore.blogspot.in/

Friday, August 30, 2019

85 BahujanNama Dhote 28 Aug 2019


बहुजननामा-85


‘गल्ली-बोळातले’ बळीराज धोटे व
दिल्लीला धडक मारणारे छगन भुजबळ
बहुजनांनो.... !
-1-
बहुजननामा-82 च्या लेखात मी एका मुद्द्याचं स्पष्टीकरण करतांना लिहीले होते की, गल्ली-बोळातील ओबीसी कार्यकर्त्यांवर पाळत ठेवणं, त्याचे फोन टॅप करणे आदि अनेक कारवाया पेशवाई सरकारकडून व त्याच्या मदर (की फादर) ऑर्गनायझेशनकडून केल्या जात आहेत. यावर काही लोकांच्या भुवया उंचावल्या. कार्यकर्ता गल्ली-बोळात काम करतो असं तुम्ही स्वतःच म्हणतात व त्यावर शासकीय पाळत ठेवली जाते, असेही तुम्ही म्हणतात. हे कसं शक्य आहे? ज्यावर पाळत ठेवली जाते तो निश्चतच मोठा नेता असला पाहिजे किंवा दाभोळकर-पानसरेंसारखा सुप्रसिद्ध विचारवंत असला पाहिजे. गल्ली-बोळातला कार्यकर्ता आणी तोही ओबीसी, त्यावर पाळत ठेवण्याची गरज काय? अशाप्रकारे काही लोकांना माझ्या त्या मुद्द्यात विसंगती वाटत होती. मात्र आता ‘बळीराज धोटे अटक’ प्रकरण घडले आणी सर्वांचे डोळे उघडले. आमच्या बहुजनांना प्रत्यक्ष उदाहरण घडल्याशिवाय आमचे मुद्दे पटतच नाहीत.
आतापर्यंत असा शिरस्ता आहे की, शासनाकडून पाळत ठेवणे, फोन टॅप करणे वगैरे प्रकार विरोधी पक्षनेते यांच्याबाबतीत केला जातो. किंवा एखाद्या वर्गीय, जातीय वा धार्मिक संघटनेने मोर्चा, धरणे असे कार्यक्रम आयोजित केले असतील तर तेवढ्या त्या आंदोलनाच्या मर्यादित काळात त्या नेत्यांवर पाळत ठेवली जाते किंवा फोन टॅप केले जातात. नक्षलवादी, खलिस्तानवादी वगैरे सशस्त्र विद्रोही आंदोलकांवर ‘रॉ’ सारख्या बलाढ्य सरकारी एजन्सीज पाळत ठेवणे, फोन टॅपींग करणे, आंदोलनात घुसखोरी करून हेरगिरी करणे, नेते मारून टाकणे वगैरे धाडसी कामे करतात. असे असतांना चंद्रपुरच्या गल्ली-बोळातील कार्यकर्ते असलेले ‘बळीराज धोटे’ यांच्यावर व त्यांच्या सोशल मिडियावर पाळत ठेवली जाते. त्यांच्यावर अनेक ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल केले जातात व त्यांना बेकायदेशीरपणे उचलून सरळ जेलमध्ये टाकले जाते.
वास्तविक बळीराज धोटे हे ग्रामीण व अत्यंत दुर्गम भागातील कुणबी-ओबीसी कार्यकर्ते! त्यांच्या कामाची धडाडी पाहून भाजपने त्यांना पक्षात ओढले व संघटकपदावर नियुक्त केले. बळीराज धोटे यांनी आपल्या धडाकेबाज कामातून भाजपला चंद्रपूर जिल्ह्यात खेडोपाडी नेले. आपल्या कामाची पावती म्हणून त्यांनी खासदारकीचे तिकीट मागीतले तेव्हा ‘गल्ली-बोळातला’ कार्यकर्ता खासदारकीचे स्वप्न पाहतो, असा उपहास करीत भाजपाने त्यांना तिकीट नाकारले. तेव्हा धोटेंमधला ओबीसी जागृत झाला व त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्याकाळी आमचे ‘मंडल आयोगः ओबीसींच्या लोकशाही मुक्तीचा जाहीरनामा’ हा ग्रंथ व ‘ओबीसी जातींसाठी 40 कलमी कार्यक्रम’ हे पुस्तक खूपच लोकप्रिय झालेल होत. त्या काळात बळीराज धोटेंसारख्या अनेक तरूणांनी ही पुस्तके वाचून प्रेरणा घेतली व ओबीसी चळवळ वाढवली. भाजपाच्या दृष्टीने धोटे हे ‘गल्ली-बोळातला कार्यकर्ता’ होते. भाजप सोडून जाईल कुठे? फार झाले तर कॉंग्रेसमध्ये जाईल, राष्ट्रवादीत जाईल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीत ब्राह्मण-पेशव्यांपेक्षाही डेंजर असलेले सरंजामदार बसलेले आहेत. पेशवे किमान गोड बालून ××××× मारतात, मात्र सरंजामदार शिव्या घालून, दांडा उगारून बळजबरी ठोकून घेतात व तुमची सुजवूनही टाकतात. भुजबळसाहेबांचा ताजा अनुभव हेच सिद्ध करतो.
-2-
सेना-भाजपामधून एखादा ओबीसी-दलित कार्यकर्ता ‘गयाराम’ होऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीत ‘आयाराम’ होतो, तेव्हा पुरोगामी लोकांना खूप आनंद होतो. हा आयाराम-गयाराम नेता कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आल्यावर पुरोगामी म्हणून प्रसिद्धीस पावतो. ओबीसींचा नेता किंवा दलितांचा नेता म्हणून त्याला खूप डोक्यावर घेतले जाते. परंतू आमचे तथाकथित पुरोगामी हे विसरतात की, दलित-ओबीसी चळवळी मोडीत काढण्याचे काम भाजपा-सेना आत्ता करते आहे, परंतू हेच काम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मुजोर सरंजामदारांनी 1935 पासून सुरू केले आहे व आजही सुरूच आहे. हा सर्व इतिहास मी माझ्या अनेक पुस्तकांतून वारंवार विश्लेषण करून भाषणात सांगीतलेला आहे, अनेक पुस्तकात लिहिलेला आहे. माझ्यासारख्या ‘गल्ली-बोळातल्या’ कार्यकर्त्याने लिहीलेली ही पुस्तके बळीराज धोटे यांनी वाचली व ते ‘जागृत-ओबीसी’ झालेत, म्हणूनच ते ना कॉंग्रेसमध्ये गेलेत ना राष्ट्रवादीत! धोटेंनी स्वतंत्रपणे ‘स्वाभिमानी ओबीसी’ संघटना स्थापन केली व चंद्रपुरात स्वतःच वाढविलेल्या संघ-भाजापला गाडण्याचे काम सुरू केले. भाजपाचे हंसराज अहिर हे चंद्रपूरचे खासदार म्हणून तीन वेळा सलग निवडून आलेले होते (2004 ते 2014). बळीराज धोटेंनी चंद्रपूरात ओबीसी जागृतीचे धडाडीचे काम केल्यामुळे 2019 ला चौथ्यांदा उभे राहीलेल्या भाजपाच्या हंसराज अहिरांना पराभूत होऊन घरी बसावे लागले. कॉंग्रेसचा एकमेव खासदार धानोरकर चंद्रपूरातून निवडून आला आहे. हे केवळ घडले ‘जागृत-ओबीसी’ म्हणून काम करणार्‍या बळीराज धोटेंमुळे! वंबआचे महाडोळे त्यांना पुरक ठरलेत. बळीराज धोटे व भुजबळसाहेब यांच्या राजकीय इतिहासाची सुरूवात समान आहे. बळीराज धोटेंना भाजपाने वापरून फेकून दिले व भुजबळसाहेबांना सेनेने वापरून फेकून दिलेले. मात्र येथून बळीराज धोटेंनी डिपार्चर घेतले व ओबीसी चळवळीची पुस्तके वाचून ‘स्वामी पेरियारांप्रमाणे’ चंद्रपूरमध्ये स्वतंत्रपणे ओबीसी चळवळ सुरू केली. ज्या भाजपाला धोटेंनी शिखरापर्यंत नेवून यशस्वी केले, त्याच धोटेंनी जागृत-ओबीसी’ बनून त्याच भाजपाला मातीत गाडले. महाराष्ट्रच्या दृष्टीने ‘चंद्रपूर’ म्हणजे गल्ली-बोळच’! या गल्ली-बोळात राहून धोटेंनी संघ-भाजपाला गाडणारी राजकिय क्रांती करून दाखवीली. जर गल्ली-बोळातले धोटे एवढं मोठं काम सहजपणे करू शकतात तर मग विचार करा की, दिल्लीच्या रामलीला मैदानात 10 लाख ओबीसींची धडक मारणारे भुजबळ हे संघ-भाजपाला संपूर्ण देशातून कानाकोपर्‍यातून खेचून बाहेर काढू शकतात व त्याचा दफनविधी करू शकतात. हे घडले असते पण केव्हा? 1991-92 च्या काळात गाजत असलेले आमचे हे पुस्तक भुजबळसाहेबांनीही वाचले असते, तर ते कॉंग्रेस व नंतर राष्ट्रवादीत गेले नसते, बळीराज धोटेंप्रमाणे त्यांनीही प्रामाणिकपणे ओबीसी चळवळीला वाहुन घेतले असते. परिणामी आज पेशवाइने डोके वर काढण्याची हिम्मत केली नसती व आज भुजबळसाहेब स्वकष्टाने, स्व-हिमतीवर ‘ओबीसी मुख्यमंत्री’ झाले असते. ओबीसी विद्यार्थ्यांर्च शिष्यवृत्ती बंदी, क्रिमी-नॉनक्रमी लेयरचा घोळ, आरक्षणकपात, ओबीसीतील मराठा-घुसखोरी वगैरे चिल्लर प्रश्न निर्माणच झाले नसते. या उलट भुजबळांनी तामिळनाडूप्रमाणे 52 टक्के ओबीसींना 52 टक्के आरक्षण जाहीर करून संघ-भाजपाची कबर खोदली असती. परंतू असे घडले नाही, याचे एकच कारण आहे, आणी ते म्हणजे ओबीसी नेत्यांचे ‘सल्लागार’ हे ब्राह्मण-मराठानिर्मित असल्याने त्यांनी श्रावण देवरेंसारख्या ‘गल्ली-बोळातल्या’ कार्यकर्त्यांची पुस्तके भुजबळसाहेंबापर्यंत पोहचू दिली नाहीत. बळीराज धोटेंनी ‘ओबीसी’ पुस्तके वाचून जे काम ‘गल्ली-बोळात’ करून दाखवीले, तेच काम महाराष्ट्र स्तरावर भुजबळांनी केले असते. गल्ली-बोळातील आमच्यासारखे ओबीसी कार्यकर्ते व मुंबई-दिल्ली गाजविणारे भुजबळांसारखे ओबीसी नेते यांची योग्य सांगड घातली गेली, तर या देशातील ‘जात्यंतक लोकशाही’ क्रांतीची पायाभरणी कोणीच रोखू शकत नाही. तसे झाले नाही, याला एकमेव कारणीभूत भुजबळांच्या अवती-भोवती घिरट्या घालणारे विचारवंत(?) सल्लागार होते व आहेत, जे आजही ओबीसीवरील पुस्तके भुजबळांपासून लपवून ठेवत आहेत.

-3-
धोटे हे ‘गल्ली-बोळातले’ कार्यकर्ते असले, तरी ते ‘ओबीसी’ म्हणून जागृत झालेले असल्याने ते पाक-अतिरेक्यांपेक्षाही जास्त डेंजर ठरले होते. त्यांच्या मुस्क्या आवळणे आवश्यक झाले होते. आणी म्हणूनच त्यांच्यावर पाळत ठेवणे, त्यांच्या सोशल मिडियातील अकाऊंट्सवर रात्रंदिन पहारा ठेवणे, त्यांचे फोन टॅप करणे व त्यांना जेलबंद करून जेरबंद करणे, या सर्व कारवाया भाजपा-सेनेला आपले अस्तित्व वाचविण्यासाठी कराव्या लागल्या. तथाकथित पुरोगामी लोक ओबीसी चळवळीची नेहमी टिंगल-टवाळी करतात, परंतू संघ-भाजपाचे अभ्यासकच हे जाणतात की, अज्ञानी ओबीसीच संघ-भाजपाला मोठा करतात व ज्ञानी-ओबीसीच त्यांचा कर्दनकाळ ठरतात, यात काडीमात्र शंका नाही. मुस्लीम नेते-विचारवंत हे जेव्हा संघ-भाजपाविरोधात बोलतात तेव्हा संघ-भाजपाला खूप आनंद होतो. मुस्लीम नेते ओवेसींना टीव्हीवर तेव्हाच दाखवितात, जेव्हा ते संघ-भाजपाला शिव्या देत असतात. दलित कार्यकर्ते-विचारवंत जेव्हा संघ-भाजपाविरोधात लिहीतात-बोलतात तेव्हा तर संघ-भाजपाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. कारण दलित-मुस्लीमांच्या विरोधामुळेच संघभाजपा मजबूत होतात. मात्र हाच विरोध जेव्हा एखादा ‘गल्ली-बोळातला’ ओबीसी कार्यकर्ता करतो, तेव्हा तो संघ-भाजपाच्या अस्तित्वावरच घाव घालत असतो. आणी म्हणून अशा ओबीसीला 1) सोशल मिडियातील पोस्ट आक्षेपार्ह असल्याचे सांगून जेलमध्ये टाकले जाते. 2) दुसर्‍या एका दिग्गज ओबीसीला महाराष्ट्रातून दिल्लीला बोलावून घेतले जाते व अपघात घडवून जीवे मारून टाकले जाते, 3) ओबीसी जनगणनेसाठी दिल्लीपर्यंत धडक मारणार्‍या तिसर्‍या एका ढाण्या वाघाला तीन-चार वर्षे जेलमध्ये डांबले जाते व त्याचे दात-नखे काढून, त्याला ‘उंदीर’ बनवून सोडून दिले जाते. 4) चौथ्या एका ओबीसीला ‘मुख्यमंत्री पदाचा दावेदार’ म्हणून सीबीआय व ईडीच्या जाळ्यात अडकवले जाते व मंत्री पदावरून त्याची हकालपट्टी केली जाते व 5) पाचव्या एका ओबीसी बाईला ‘चिक्कीताई’ म्हणून बदनाम केले जाते व तिचा ‘जनमनातल्या मुख्यमंत्री’ म्हणून असलेला गाजावाजा पुसून टाकला जातो.
गल्ली-बोळातल्या ओबीसी कार्यकर्त्यांपासून मुंबई-दिल्लीपर्यंतच्या दिग्गज ओबीसी नेत्यांच्या बाबतीतच अशा षडयंत्रकारी कारवाया का होतात? दलित-मुस्लीम नेत्यांच्या बाबतीत अशा कारवाया का केल्या जात नाहीत? याचे साधे कारण हे आहे की, संघ-भाजपा दलितांना घाबरतच नाहीत, मुसलमानांना घाबरण्याचा प्रश्नच नाही. ते घाबरतात फक्त ‘जागृत-ओबीसी’ला! त्यामुळे मी नेहमीच प्रामाणिक दलित-मुस्लीम नेत्यां-कार्यकर्त्यांना सांगत असतो की, आपापल्या जाती-धर्माचे चिल्लर प्रश्न 1-2 वर्षांसाठी बाजूला ठेवून, फक्त ओबीसी जागृतीसाठी सर्व ताकद लावून काम केले, तर तुम्हाला संघ-भाजपाला गाडण्याची महान जात्यंतक क्रांती 5 वर्षाच्या आत सुरू झालेली दिसेल, याची गॅरंटी आम्ही देतो. मी दिलेल्या या गॅरंटीचे मर्म समजून घेण्याची क्षमता जोपर्यंत आपल्यात येत नाही, तो सत्य की जय हो!!!!
(लेखन व प्रकाशनः 28 ऑगस्ट 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)



1 comment: