http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, October 12, 2019

90 BahujanNama MssOss 6Oct2019


बहुजननामा-90
भुमिका व कृती-कार्यक्रमः
मराठा सेवा संघ व ओबीसी सेवा संघ

बहुजनांनो.... !
-1-
माननीय प्रदिप ढोबळेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा ओबीसी सेवा संघाची स्थापना झाली, तेव्हा आम्ही दोन धोरणात्मक निर्णय घेतलेत. पहिला निर्णय- आपल्या ओबीसी सेवा संघाच्या प्रत्येक अधिवेशनाचे उद्गाटक बौद्ध वा दलित विचारवंत-अधिकारी असतील. दुसरा धोरणात्मक निर्णय- जर कमवलेली ‘एक भाकर वाटप करायची असेल तर, सर्वात आधी पहिला वाटेकरी असेल आदिवासी, त्यानंतर दुसरा वाटेकरी दलित व ‘खर-ओबीसी तिसरा वाटेकरी असेल! आणी सर्वात शेवटी शिल्लक असलेली भाकरी ब्राह्मण-क्षत्रिय-सरंजाम वगैरे जातींसाठी असेल. हे आहे संवैधानिक वाटप...!
अशी जात्यंतक भुमिका आजवर एकाही संघटनेने घेतलेली नाही. आमच्या या भुमिकेप्रमाणे आतापर्यंत किशोर गजभिये, कुलदिप रामटेके, सुरेश माने, दैठणकर असे अनेक विचारवंत व प्रशासकीय अधिकारी उद्घाटक म्हणून आमच्या ओबीसी सेवा संघाच्या स्टेजवर आलेत व मुख्य मार्गदर्शक म्हणून सन्मानीत झालेत. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष माननीय पुरूषोत्तम खेडेकर अनेकवेळा ओबीसी सेवा संघाच्या स्टेजवर सन्मानीत झालेले आहेत. दुसरे तेवढेच दिग्गज मराठा विचारवंत प्रा. मा. म. देशमुख यांनाही ओबीसी सेवा संघाच्या अधिवेशनात पुरस्कार देऊन गौरवान्वीत केले आहे. ही दिशा आहे फुले-शाहू आंबेडकरप्रणित जात्यंतक क्रांतीची. या उलट मराठा सेवा संघाचे धोरणच असे आहे की, आपल्या स्टेजवर सन्माननीय व मार्गदर्शक व्यक्ती फक्त मराठा व ब्राह्मणच असेल, दुसरे कुणीही नाही. मराठा सेवा संघाचे दुसरे धोरण असे आहे- माझ्या ताटातली भाकरी माझीच आहे आणी दुसर्‍याच्या ताटातली भाकरीही माझीच आहे. मराठ्यांनी ओबीसीच्या ताटातली भाकरी चोर मार्गाने व नंतर अवैध मार्गाने कशी फस्त केली, हे 29 नोव्हेंबर 2018 रोजी विधानसभेत झालेल्या ‘राड्यावरून’ सिद्ध झालेले आहे. या राड्याची बीजे मराठा सेवा संघाच्या वरील धोरणांमध्ये आहेत. तामिळनाडूतील ओबीसी गेल्या 50 वर्षांपासून सत्तेवर आहे. ब्राह्मणवादी कॉंग्रेस-भाजपची गुलामी न करता, हा ओबीसी आजही ताठ मानेने पेरियार-फुले-शाहू-आंबेडकरप्रणित समतेचे राजकारण करीत आहे. याचे एकमेव कारण हे आहे की, त्यांना मिळालेली सत्तेची भाकरी ते दलित-आदिवासींसोबत वाटून खात आहेत. याला म्हणतात संवैधानिकता, नैतिकता व ताठ कणा! महाराष्ट्रातील मराठे 70 वर्षांपासून ब्राह्मणी कॉंग्रेसचे ‘मांडलिक राजे’ म्हणून काम करीत होते, आता पेशवाइचे ‘हुजरे’ बनण्यासाठी त्यांच्यात शर्यत सुरू आहे. याला म्हणतात          अ-संवैधानिता, अ-नैतिकता व तुटलेला कणा!  मराठा जातीची ही वाईट अवस्था होण्याचं एकमेव कारण हे आहे की, त्यांच्या पोटात पेशवाई व ओठावर सरंजामशाही आहे! लोकशाही कुठेही अस्तित्वात नाही. मराठा सेवा संघ (म.से.सं.) मराठा समाजाला फुले शाहू आंबेडकर शिकवेल, समस्त मराठा जात पुरोगामी बनवेल, या अपेक्षेपोटी महाराष्ट्राच्या तमाम दलित व ओबीसी संघटनांनी मराठा सेवा संघाला अक्षरशः डोक्यावर घेतले. पण हाती काय पडलं, पेशवाई? म.से.सं.च्या मूळ धोरणातच पुरोगामित्व नाही, तर ते संघटनेत व जातीत कसे येणार? आडातच नाही, तर पोहर्‍यात कसे येईल?
-2-
मराठा सेवा संघ आपले जातीयवादी धोरण बदलून, पुरोगामी धोरण आजही स्वीकारू शकतो. चांगले कार्य करायला मुहूर्त लागत नाही. माळी समाजाप्रमाणे त्यांनीही बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम सुरू करावे. महाराष्ट्रातील पेशवाई सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन, ब्राह्मणशाहीचे पुनरूज्जीवन करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा ‘वंचित बहुजन आघाडी’ निश्चितच पुरोगामी आहे. मी जेव्हा बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचे नांव घेतो, तेव्हा ते ‘व्यक्ती’ म्हणून घेत नाही. जात्यंतक लोकशाही क्रांतीचे अग्रदल असलेल्या ‘दलित-शक्ती’चे ते एक प्रतिनिधी आहेत. तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर नको असतील, तर माननीय सुरेश माने, प्रा. जोगेंद्र कवाडेसर, विचारवंत सुनिल खोब्रागडे यांच्यापैकी कोणाच्याही एका रिपब्लीकन पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करता येईल. त्यापूर्वी माननीय रामदास आठवलेंसोबत काम करण्याची फार मोठी संधी होती. कारण ते आजही कट्टर ‘मराठा-आरक्षणवादी’ आहेत. पण तुम्हीच ती संधी घालवली. मराठा वर्चस्व असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी आठवलेसाहेबांची ज्या नीच-वृत्तीने फरफट केली, त्याच्या परिणामी आठवले भाजप-सेनेत गेले आहेत. त्याचवेळेस जर मराठा सेवा संघाने रामदास आठवलेंना नेता मानून सामाजिक-राजकीय कार्य केले असते तर, आठवलेंना हीन वागणूक देण्याची हिम्मत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी केली नसती. मराठासकट सर्वच जातींना पुरोगामी दिशा देण्याची क्षमता मराठा सेवा संघात आजही आहे. परंतू त्यासाठी त्यांना गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाला जाहीरपणे त्यागावे लागेल. पेशवाईचे कर्ते-मुखंड म्हणून गडकरी-फडणवीसांना घोषित करावे लागेल. तुमच्या मराठा सेवा संघाच्या अधिवेशानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरेश माने, बाळासाहेब आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रा. माधव सरकुंडे व प्रदिप ढोबळेंसारखे आदिवासी-दलित-ओबीसी नेते सन्मानाने बोलावावे लागतील. तुमच्या अधिवेशनाच्या स्टेजवर छत्रपती शिवरायांसोबत फुले-आंबेडकरांचे फोटो लावावे लागतील. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ओबीसीत घुसखोरीची भुमिका त्यागून संवैधानिक मार्गाने ‘भाकरीचे वाटप’ स्वीकारावे लागेल. यासारखे अनेक कृती कार्यक्रम आहेत, ते मनापासून अमलात आणावे लागतील. हा कृतीकार्यक्रम मराठा सेवा संघाने प्रामाणिकपणे प्रत्यक्षात आणला, तर मी गॅरंटी देतो की,तुम्हाला 2024 च्या लोकसभा व विधासभेत पेशवाई खतम झालेली दिसेल व खर्‍या अर्थाने महाराष्ट्रात तामिळनाडूप्रमाणे ओबीसी-बहुजन सरकार स्थापन झालेले दिसेल. पण हे होणे नाही, त्याचे आतील व बाहेरील कारण हे आहे की, आमचे सर्व ओबीसी-दलित-मराठा नेते जेलमध्ये जायला घाबरतात. पुरूषोत्तम खेडेकरसाहेबसुद्धा ईडीच्या पिडला घाबरतात. परंतू ‘‘भित्यापोटी ब्रह्म-सैतान’’ हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही जोवर काठावर आहात, तोवरच पाण्याची भीती वाटते. पाण्यात उडी मारा, तुमच्या मनातील भीती नष्ट होईल. जो भीतीवर मात करतो, त्याला हात लावण्याची हिम्मत पेशवा कधीच करीत नाही, असे इतिहास सांगतो. पहिल्या पेशवाईच्या काळात मराठा सरंजामदार पेशव्यांना खूप घाबरत होते, कारण पुण्यातील पेशवे मराठा सरंजामदारांना जेलमध्ये टाकून छळत होते. परंतू एक धनगर (ओबीसी) जातीतील यशवंतराव होळकर या मर्दाने आपल्या मनातील पेशवा-दहशत एका झटक्यात संपवीली व बाजीराव पेशव्याला पुण्यातून पळता भूई थोडी केली. यशवंतराव होळकरांच्या भीतीने बाजी पेशवा जीव मुठीत घेऊन अक्षरशः कुत्र्यासारखा रस्त्यांवरून पळत-फिरत होता. ज्या दिवशी मराठा सेवा संघ एक धोरण म्हणून सुनिल खोब्रागडे, सुरेश माने, कवाडे सर किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू करेल, त्याच दिवशी मराठ्यांच्या मनातील पेशव्यांची भीती नष्ट होईल व आधुनिक पेशवाईवर निर्णायक घाव घालण्याची पात्रता मराठा समाजात निर्माण होईल.
-3-
माननीय शरद पवारांनी माननीय सुरेश मानेंना तिकीट देऊन काही चांगली सुरूवात केली आहे, असे बर्‍याच पुरोगामी लोकांना वाटते. परंतू पवारांनी सुरेश मानेंच्या पक्षाला त्यांच्या निवडणूक चिन्हासह सन्मानाने आघाडीत घेऊन, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सीट दिल्या असत्या, तर ते न्यायाचे झाले असते. ‘एक तिकीट’ देउन तुम्ही 14 टक्के दलितांची मते मिळविण्याची अपेक्षा ठेवता, हे योग्य नाही. आठवलेसाहेबांशी तुम्ही याच पद्धतीने वागलेत म्हणून ते भाजप-सेनेत गेले.
मराठा सेवा संघाला आणखी एक विनंती आहे. त्यांनी ‘मराठाद्वेष्टा’सारखे शिक्के मारणे बंद करावे. तात्यासाहेब महात्मा जोतीरावांना ब्राह्मणांनी ‘ब्राह्मणद्वेष्टा’ म्हणून बदनाम केले. भटांच्या मानसिक गुलामीत जखडलेल्या तत्कालीन बहुजनांना ते खरे वाटले व त्यांनी तात्यासाहेब महात्मा जोतीरावांचे म्हणणे ऐकूनही घेतले नाही. आज हेच बहुजन तात्यासाहेबांची पुस्तके विकत घेऊन वाचतात. ‘बैल गेला नि झोपा केला’ या म्हणीप्रमाणे आता पेशवाई डोक्यावर बसल्यानंतर तात्यासाहेब महात्मा फुलेंची आठवण आली आहे. मराठाद्वेष्टा म्हणून शिक्के मारल्याने मराठा समाजाचेच फार मोठे नुकसान होत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
दलित नेतृत्वाखाली काम केले तरच जात्यंत होणार, असा आग्रह धरणारा मी पहिलाच नाही. माझे वैचारिक गुरू असलेल्या फुले-शाहू-आंबेडकरांचाच असा आग्रह आहे. आणी कॉ. शरद पाटलांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या या जात्यंतक सिद्धांताला तत्वज्ञानाच्या पातळीवर नेऊन मांडणी केली आहे! जात-वर्ग-स्त्रीदास्यअंतक ‘सौत्रान्तिक मार्क्सवादी’ तत्वज्ञानाचे जनक कॉ. शरद पाटील यांनी हा आग्रह धरलेला आहे. त्याही पुढे जाउन सांगतो की, जागतिक वर्गांताचे तत्वज्ञान सिद्ध करणारे कार्ल मार्क्स यांनीसुद्धा असाच सिद्धांत मांडलेला आहे. वर्गव्यवस्थेतील सर्वात जास्त शोषित असलेला कामगारवर्गच वर्गांताच्या क्रांतीचे नेतृत्व करू शकतो. चीनमध्ये सर्वात जास्त शोषित शेतकरी होता, म्हणून चीनमध्ये क्रांतीचे नेतृत्व शेतकरीवर्ग करीत होता. त्याचप्रमाणे भारतातील जातीव्यवस्था नष्ट करणारी क्रांती सर्वात जास्त शोषित असलेल्या ‘अस्पृश्य’ जातींच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते. (बाबासाहेब आंबेडकर राईटिंग्ज ऍन्ड स्पीचेस, खंड-5, पान 112-116 व कॉ शरद पाटील, ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ वर्षः8, जुलै-89, पानः26-27)
     1994 पासून मराठा जात स्वतःला ‘शूद्र’ म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न करीत आहे. जर मराठा जात खरोखर शूद्र असेल व या शूद्रत्वाची दिशा पुरोगामी असेल तर त्याची पहिली कसोटी ही आहे की, ‘मराठा जातीच्या नेत्यांनी घटनातज्ञ सुरेश माने, विचारवंत सुनिल खोब्रागडे, कवाडेसर, प्रकाश आंबेडकर यासारख्या दलित नेत्यांच्या नेतृत्वाखाली समाजकारण-राजकारण केले पाहिजे.’ अन्यथा नेहमीप्रमाणे ‘लग्नासाठी देशमुख(D), राजकारणासाठी मराठा(M) व सवलतींसाठी कुणबी(K), हा तुमचा DMK-रंगबदलूपणा तुम्हाला गडकरी-फडणवीसी पेशवाईच्या छावणीकडे नेतो, असे इतिहास सिद्ध करतो.
कॅटेगिरीच्या पातळीवर ओबीसी सेवा संघाने व जातीच्या पातळीवर माळी जातीने दलित नेतृत्वाखाली काम सुरू केले आहे. मराठा जातीला मार्गदर्शक ठरेल, असे जात्यंतक धोरण व कार्य मराठा सेवा संघसुद्धा सुरू करेल, या अपेक्षेसह येथेच थांबतो. पुढील बहुजननामात भेटीला येईलच, तोपर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 4-5 ऑक्टो 19 व प्रकाशनः 6 ऑक्टोंबर 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)


No comments:

Post a Comment