http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, June 21, 2020

118 BahujanNama BMFA2 Lokmanthan 21June20


बहुजननामा-118

बुद्ध व मार्क्स: हिंसा-अहिंसा(भाग-2)
-1-
भावबंदकिचे उदाहरण मी यासाठी देत आहे की, कोण हिंसक व कोण शांतता-प्रेमी याचा निर्णय करतांना जो गोंधळ होतो, तो गल्लीपासून जागतिक पातळीवरही कसा सारखा काम करतो व हिंसा-अहिंसा हा विनाकारण महत्वाचा मुद्दा का केला जातो, हे समजून यावे यासाठी हे उदाहरण मी देत आहे.
भावबंधकीचा वाद मिटविण्यासाठी ज्यांना मी न्यायनिवाडा करण्यासाठी गावात बोलावले होते, ते दोघे ‘समाज-न्यायधिश’ आमच्या ‘अ’ गटाशी कोणतीही चर्चा न करताच परतीच्या प्रवासाला निघाले होते. ‘ब’ गटाच्या घरी जेवण करतांना त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली व तटस्थ असलेल्या देवरे गुरूजींनी त्यांना नेमकी काय माहिती दिली असावी, याचा आम्हाला काही बोध होत नव्हता. मात्र तिकडे जेवण घेतल्यावर ते परस्पर परतीच्या रस्त्याला लागले आणी आम्ही बुचकाळ्यातच पडलो. चांगला योगायोग (सुदैव) असा की आमचे घर गावाबाहेर जाणार्‍या रस्त्यावरच होते, त्यामुळे ते परत जात असतांना दिसलेत. तेव्हा मी धावतच त्यांच्यापर्यंत पोहोचलो व त्यांना घरी या म्हणून विनवू लागलो. परंतू ते म्हणाले कि ‘‘आम्हाला घाई आहे, आता वेळ नाही, नंतर केव्हा तरी येऊ’’ पण मी त्यांना म्हणालो की, ‘चहा तयार आहे, फक्त दोन मिनिटांसाठी या व चहा घेऊन निघून जा!’ थोडा वेळ त्या दोघांनी एमेकांकडे पाहिले, तेव्हा मी पुन्हा संधी साधून एक चौकार हाणला. मी त्यांना सांगीतले की ‘‘साहेब हे खेडे गांव आहे. येथील लोक परंपरेला खूप जपतात. आपण आमचे निमंत्रित पाहुणे आहात, जर आपण चहा-पाणी न घेताच परस्पर निघून गेलात तर आमचे बंधू आयुष्यभर स्वतःला दोष देत बसतील व मलाही ते दोष देतील’’ माझ हा चौकार षट्कार ठरला व ते ताबडतोब गाडीतून खाली उतरून माझ्या घराकडे पायीच चालू लागलेत. पण त्यांनी माझ्याकडून वदवून घेतले की, ‘आम्ही फक्त चहाच घेणार व लगेच निघणार! मी फक्त मान डोलावून  होकार दिला. ते घरी आलेत, खाटेवर बसलेत, पाणी घेतले व लगेच चहाही आला. ते चहा पीत असतांना माझा शेतकरी असलेला भाऊ हात पुढे करीत म्हणाला, ‘‘साहेब याच खाटेवर तुम्ही जसे निरागसपणे बसून चहा पीत आहात, तसेच आम्ही तिनही भाऊ खाटेवर बसून सहज गप्पा मारीत होतो. तेव्हा जोरजोराने गल्लीतून आरडा ओरडा ऐकू आला. गल्लीत काय गोंधळ चालला आहे, हे बघण्यासाठी आम्ही घराबाहेर आलो, तर डायरेक्ट आमच्यावर काठीचा वार झाला. आम्ही तिनही भाऊ बेसावध होतो व आमच्या हातात कोणतेही हत्यार नव्हते’’. माझा भाऊ बोलत असतांना मध्येच सराफ साहेबांनी भावाला थांबविले व विचारले की, ‘‘हाणामारी नेमकी कोठे झाली?’’ तेव्हा भाऊ म्हणाले की, ‘‘येथेच आमच्या घराच्या अंगणात झाली.’’ शेतकरी-भाऊचे हे उत्तर ऐकल्याबरोबर ‘सराफ’ साहेब ताडकन उठले व त्यांनी डीके बापूंना ईशारा करीत घराबाहेर नेले. काही अंतरावर जाऊन त्यांनी आपसात कूजबूज केली व बापू तडक ‘ब’ गटाच्या घराकडे जाऊ लागलेत. सराफसाहेब आमच्या घरात आलेत व खाटेवर बसलेत. ते म्हणाले की आम्हाला जेवतांना तटस्थ-अपक्ष देवरे गुरूजींनी अशी माहिती दिली की, तुम्ही सर्व भाऊ फार हिंसक व क्रूर आहात, नेहमी हाणामारीच्या गोष्टी करतात, आतापर्यंत तुम्ही खूप हाणामार्‍या केलेल्या आहेत. आता हे गुरूजीसारख्या सुशिक्षित माणसाने सांगीतल्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास बसला व तुमच्याशी चर्चा न करताच आम्ही निघून जात होतो. परस्पर निघून जाण्याचे आणखी एक महत्वाचे कारण असे की, हाणामारीनंतर ‘ब’ गटाचेच सगळे सदस्य गंभीर जखमी झाले व दवाखान्यात दाखल झालेत. त्यावरून दुसरा मुद्दा हा सिद्ध झाला की, तुम्ही क्रूर आहात व हिंसक होऊन हाणामारी करणे हा तुमचा स्वभाव आहे. त्यावरून आमचा असाही समज झाला की, तुमच्या ‘अ’ गटानेच ‘ब’ गटावर हल्ला केला. परंतू आता तुमच्याशी चर्चा केल्यावर लक्षात आले की, ‘ब’ गटानेच तुमच्या घरी येवून तुमच्यावर बेसावधपणे हल्ला केला आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे परंतू बाकीच्या अवांतर मुद्यांचा आमच्यावर इतका जोराचा मारा करण्यात आला की, मारामारीला सुरूवात कुणी केली व हिंसक बनून कोण धावून आलेत, हे महत्वाचे मुद्दे दडपले गेलेत. मात्र आता सारा मामला आमच्या लक्षात आला आहे.
-2-
सराफ साहेबांकडून अशी प्रतिक्रिया आल्यावर माझे सगळे भाऊ थोडेसे आश्वस्त झालेत. काही वेळ शांतता पसरली, आणी सराफसाहेब पुन्हा विचारते झालेत. ‘‘परंतू तरीही माझ्या मनात एक प्रश्न शिल्लक राहतोच! तुम्ही फक्त 3 भाऊ होते व ते 6-7 सदस्य होते, तरीही त्या सर्वांना तुम्ही कसे काय गंभीर जखमी केले?’ तेव्हा माझे मोठे भाऊ उत्तरले की, ‘‘त्यालाही तेच जबाबदार आहेत’’ भाऊ लढाईचे वर्णन करीत म्हणाले- ‘‘ते जरी 6-7 होते तरी मारामारी करायला येतांना त्यांच्या प्रत्येक दोन सदस्यात एक मिनिटाचे अंतर होते, जो जास्त जोरात धावू शकत होता, तो आधी आमच्यावर वार करायला पोहोचला. आम्ही तिघे असल्याने त्याला आम्ही एका मिनिटातच गारद केला. तो जमिनीवर निपचित पडल्यावर दुसरा आमच्यापर्यंत पोहोचला व त्याला दोन झापड्या अशा काही मारल्या की, तो जीव वाचविण्यासाठी गावाबाहेर जाऊन शेतात लपला. तो पळून गेल्यावर तिसरा आम्हाला भिडला, त्यालाही आम्ही गंभीर जखमी केले. आमच्या जवळ दुसरा काहीच पर्याय नव्हता. आमच्यासाठी तो जीवन मरणाचा क्षण होता. त्यामुळे आम्ही जिवाच्या आकांताने लढलो. गटाचे सदस्य संख्येने जास्त असल्याने ते अतिआत्मविश्वासाने गाफीलपणे लढले. आम्ही जर त्यांना गंभीर जखमी केले नसते, तर ते पुन्हा उठून एकत्रित झाले असते व त्यांनी आमचे मुडदे पाडले असते. किंवा ते येतांनाच सर्वच्या सर्व एकत्रितपणे आले असते तर एकतर्फी मारामारी होऊन आमचे मुडदे पडणे निश्चित होते. कारण आमच्या हातात कोणतेही हत्यार नव्हते व आम्ही बेसावध होतो. आम्ही ही लढाई विना-हत्यार लढलो व जिंकलोत!, परंतू पोलीसांनी केवळ जखमींची संख्या मोजली व आमच्यावर गंभीर गुन्हे नोंदलेत. ब गटावरवर एकही गुन्हा नाही, कारण आमच्या गटाच्या एकाही सदस्याला साधे खरचटलेसुद्धा नाही. आम्ही पोलीसांना सर्व हकीकत सांगीतल्यावरही त्यांनी आम्हालाच गुन्हेगार ठरविण्याचा चंग बांधला आहे.’’ सराफसाहेब मध्येच म्हणाले, ‘‘तटस्थ असलेल्या देवरे गुरूजींनी सांगीतल्याप्रमाणे तुम्ही अ गटवाले जर हाणामारी प्रवृत्तीचे असते, तर तुम्ही धुर्तपणे स्वतःच्याही अंगावर आपल्याच हाताने किरकोळ जखमा करून घेतल्या असत्या, जेणेकरून ‘ब’ गटावरही गुन्हे नोंद झाले असते. परंतू तुम्ही साधी-भोळी माणसं, कायदा आपल्या फायद्याचा कसा करून घ्यावा, हे तुम्हाला माहीतच नाही. त्यामुळेच त्यांनी निवाड्यासाठीची बैठक टाळली, कारण बैठकीत पहिला प्रश्न हा विचारला गेला असता की, ‘मारण्यासाठी कोणकुणाकडे गेले? हाणामारीला सुरूवात कोणी केली व शस्त्रे कोणाकडे होती? या प्रश्नांवर त्यांचे पितळ उघडे पडले असते व त्यांना पोलीस केस मागे घ्यावी लागली असती. परंतू ही पोलीस केसच त्यांच्यासाठी मोठी फायद्याची गोष्ट ठरली आहे. कारण पोलीस, पुरावे व परिस्थिती त्यांच्या बाजून भक्कम आहे. गभीर जखमीमुळे त्यांना मोठी सहानुभूती मिळते आहे, आम्हीही या मुद्यांमुळे फसलो. परंतू आता तुम्ही काहीही चिंता करू नका, मी बरोबर न्याय करतो.’’
आमची सराफसाहेबांबरोबर चर्चा सुरू असतांनाच डी.के. बापू ‘ब’ गटाच्या सदस्यांना घेऊन आलेत. सोबत तटस्थ देवरे गुरूजी होतेच. देवरे गुरूजींना पाहताच आमचे एक भाऊ संतापले व हा गुरूजी बैठकीत नको म्हणून सांगू लागलेत. ‘हाच कळीचा नारद आहे’, असा आरोप लावल्यावर गुरूजी संतापले व बैठकीतून निघून जायला लागलेत. तेव्हा डी.के. बापू व सराफसाहोबांनी त्यांना अडवले नाही. कारण त्यांचीही खात्री झाली होती की आपणास खरी व महत्वाची माहिती या गुरूजीने दिली असती तर केव्हाचाच निवाडा झाला असता व आपल्यावर निवाडा न करताच निघून जाण्याची नामुष्की आलीच नसती.’
बैठक सुरू होण्याआधी आणखी एक महत्वाची घटना घडली. सराफसाहेब माझ्या कानाजवळ येत हळू आवाजात विचारते झाले की, ‘‘तुमच्या ‘अ’ गटात कोणी अद्वातद्वा बोलणारे कींवा शिघ्रसंतापी कुणी आहे काय?’’ ‘‘हो, सर्वात मोठा भाऊ आहे’’ मी उत्तरलो. ‘‘मग त्यांना बैठकीत नका बसू देऊ’’, अशी सूचना मला सराफ साहेबांनी केली. ‘पण तुम्ही सर्वात लहानभाऊ! ते तुमचे ऐकतील का?’, अशी शंका त्यांनी व्यक्त करताच मी म्हणालो, ते करतो मी बरोबर! मग मी माझ्या सर्वात मोठ्या भाऊंना बैठकीत येऊ नका, असे सांगीतले व त्यांनी ते लगेच मान्य केले. सराफसाहेबांनी माझ्या पाठीवर हलकेच शाबासकीची थाप मारली
बैठक सुरू झाल्यावर सराफ साहेबांनी सुरूवीलाच स्वतःचा परिचय करून देतांना म्हणाले की, ‘‘मी तुम्हाला सुटाबुटात दिसत असलो तरी मी नागपूरचा एक नामचीन माफिया-गुंड आहे. आमच्या गँगमध्येही भांडणं व मारामार्‍या होतात. तेव्हा न्यायनिवाडा मीच करतो. मी निवाडा दिल्यावर जर एखाद्या गुंडाने तो मान्य केला नाही, तर माझी माणसे त्याचे हात-पाय तोडून टाकतात. इथे तुमचा न्यायनिवाडा करण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलावलं आहे व तुम्ही दोन्ही गटांनी आम्हाला ‘न्यायधिश’ म्हणून मान्यता दिलेली आहे. इथे जो काही निर्णय होईल तो तुम्हा दोन्ही गटांना मान्य करावाच लागेल, जो कुणी मान्य करणार नाही, त्याचे हातपाय तोडण्यासाठी माझी माणसं 12 तासात येथे येऊ शकतात. आता मुद्यावर येऊ या’’ असे म्हणत सराफसाहेबांनी केक प्रश्न विचारून बैठकीतच सिद्ध करून दिले की ‘ब’ गट हाच आक्रमक-हिंसक व हाणामारी प्रवृत्तीचा आहे. ‘अ’ गटाने स्वसंरक्षणार्थ प्रतिहिंसा केली आहे व ती माफ आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी ‘ब’ गटाला आदेश देत आहे की, याबातची पोलीस केस पूर्णपणे मागे घ्यावी.’’ या प्रमाणे बाकीचे सर्व वादही सराफसाहेबांनी निकाली काढले व ते पूर्ण समाधानी होऊन परतीच्या मार्गाने आपल्या गावाकडे निघून गेलेत.
 (लेखनः 13जून2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 21 जून 20)
लेखक-- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27
27

No comments:

Post a Comment