बहुजननामा-117
बुद्ध व मार्क्स: हिंसा-अहिंसा (भाग-1)
-1-
बुद्ध, मार्क्स, फुले, आणी आंबेडकर या चार महापुरूषांचा विचार एकत्रितपणे मांडण्याची अधिकृत सुरूवात सर्वप्रथम डॉ. रावसाहेब कसबे यांनी केली. या विषयावरचा याच नावाचा त्यांचा महाग्रंथ महाराष्ट्रात फारच गाजला. 1967 साली चिपळूणच्या दलित साहित्य संमेलनात एका परिसंवादात आंबेडकर आणी मार्क्स यांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा रावसाहेबांनी मांडला. त्यावेळी राजाभाऊ ढालेंनी त्याला विरोध केला. परंतू ही चर्चा उत्तरोत्तर वाढतच गेली. प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटलांचा जातीअंताच्या भुमिकेवरून कम्युनिस्ट पक्षाशी असलेला संघर्ष याच काळात उघड झालेला होता. अर्थात या चर्चेची बीजे लगतच्या काळातील घडामोडींमध्येही होतीच! कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा ऐतिहासिक भुमिहिनांचा लढा जागतिक पातळीवर गाजला. त्यावेळी दादासाहेबांना कम्युनिस्ट ठरविले गेले व धोतरवाले म्हणून हिणवीले गेले. या घडामोडीचा प्रभाव तरूण विचारवंत रावसाहेबांवर पडणे स्वाभाविक होते. एका बाजूला दादासाहेब, रावसाहेब, ढसाळ, शपा आणी दुसर्या बाजूला बी.सी. कांबळे, ढाले, वर्गवादी-मार्क्सवादी कम्युनिस्ट अशी ही चर्चा किमान तीन पिढ्यांपर्यंत खडाजंगी चालली. याच काळात बाबासाहेबांचे ‘‘बुद्ध व कार्ल मार्क्स’’ हे भाषण ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स’’ असं शिर्षक बदलून प्रकाशित करण्यात आलं.
त्या काळात मतभेदासाठी जे मुद्दे प्रकर्षाने मांडले गेलेत त्यात हिंसा हा कळीचा मुद्दा होता. आज पुन्हा एकदा मी याच महापुरूषांचे संदर्भ घेऊन ‘‘जात्यंतक-वर्गांतक’’ पर्यायी राजकारणाची मांडणी करतो आहे. या भुमिकेला विरोध करण्यासाठी ‘हिंसा-अहिंसा व लोकशाही-हुकूमशाही’ हाच नेहमीचा मुद्दा मांडला जातो आहे. आमचे चळवळीतील जीवा-भावाचे मित्र सुनिल खोब्रागडे यांनी दुसरी बाजू मांडून चर्चेची सुरूवात केली आहे. आजच्या चर्चेत त्यांचा ‘हिंसा-अहिंसा’ हा मुद्दा घेऊ या!
सुनिल खोब्रागडे स्पष्टपणे आपल्या वैचारिक पोस्टमध्ये लिहीतात की, ‘मार्क्सवादी राजवटी हिंसा करूनच स्थापन झाल्या आहेत व प्रचंड कत्तली करून तेथे हुकूमशाही लादली गेली आहे.’ ते पुढे असेही म्हणतात की, मार्क्सच्या हयातीत क्रांतीच झालेली नाही. तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली की, फ्रान्स देशातील पॅरीस कम्युनची क्रांती खूद्द मार्क्सनेच घडवून आणलेली होती व ती लोकशाही मार्गाने निवडणूकीच्या मतपेटीतून आलेली क्रांती होती. ही साम्यवादी क्रांती फसली कारण सत्ता गमावत असलेल्या पराभूत भांडवलदारांनी लष्करी कारवाई करून ती मोडीत काढली. त्यासाठी प्रचंड हिंसाचारही झाला. मार्क्सने तो पर्यंत कुठेही हिंसेचा साधा उल्लेखसुद्धा आपल्या ग्रंथात केलेला नाही. जनतेच्या प्रबोधनातून लोकशाही मार्गानेच निवडणूकांच्या मतपेटीतूनच साम्यवादी क्रांत्या होतील, असा विश्वास बुद्धाप्रमाणेच मार्क्सचाही होता. परंतू बौद्ध राजवटींना 100 वर्षाच्या आतच हिंसेला सामोरे जावे लागले, मार्क्सला मात्र पहिल्याच क्रांतीत हिंसा भेटली आणी त्यानंतर ‘स्वसंरक्षणार्थ प्रति-हिंसा’ हे धोरण म्हणून मार्क्सवादाचा अविभाज्य भाग बनले.
बौद्ध तत्वज्ञानाला मध्यममार्ग का म्हटले गेले? एकीकडे गुलामांवर लादली जात असलेली क्रूर अमानवीय हिंसा व दुसरीकडे जैन महावीराची आत्यंतिक अहिंसा! मच्छराचीही अजाणतेपणे हिंसा होऊ नये म्हणून तोंडाला मास्क बांधणारे जैन! एकीकडे तीव्र शोषण करणारा वैदिक-ब्राह्मणी अध्यात्मवाद व दुसरीकडे चार्वाकाचा शूद्ध भौतिकवाद अशा टोकांच्या भुमिका टाळून बुद्धाने आपले मध्यममार्गी बौद्ध तत्वज्ञान तयार केले. त्यामुळे आवश्यक तेथे हिंसा करायला वा स्वीकारायला बुद्धाने परवानगी दिलेली आहे. जेव्हा मांसव्यतिरिक्त दुसरे कोणतेही अन्न भिक्षा म्हणून मिळत नसेल, तेव्हा भिक्खू संघाला मांसाहाराची परवानगी खुद्द तथागतांनीच दिलेली होती. बौद्ध धम्माला राजाश्रय देणारा एकतरी राजा दाखवा ज्याने सैन्य बाळगलेच नाही. सैन्य म्हणजे हिंसा! मग ती आक्रमणासाठी असो की स्वरक्षणासाठी! तथागत बुद्धाने लष्करातील सैनिकाला भिक्खु संघात प्रवेश का नाकारला? कारण हिंसा करणे हा त्याचा धर्म आहे आणी त्याने तो पाळला पाहिजे, अशीच भुमिका त्यामागे असणार!
सगळ्याच महापुरूषांचे एक फार मोठे दुःखद सत्य (दुर्दैव) आहे आणी ते म्हणजे त्याचा अनुयायी वर्ग! हे अनुयायी आपल्या महापुरूषाच्या तत्वज्ञानातील गाभा कोणता व आवरण कोणते यात प्रचंड गोंधळ माजवून देतात. बुद्धाच्या काळात गणराज्यांमध्ये जी युद्धे होत होती, ती थांबविण्याच्या प्रयत्नातून अहिंसेचे महत्व पुढे आणले. त्याच काळात वैदिक ब्राह्मणांनी यज्ञाच्या नावाने जी प्रचंड प्राणी हिंसा सुरू केली होती, तीला रोखण्यासाठी अहिंसेचे महत्व पुढे आणले. हिंसा-अहिंसेचा मुद्दा बुद्ध तत्वज्ञानाचा अविभाज्य भाग असूच शकत नाही. तसे असते तर एकाही राजाने बुद्ध धम्माला राजाश्रय दिलाच नसता. राजाने बुद्ध धम्म स्वीकारणे म्हणजे त्याने सर्वप्रथम सैन्य बरखास्त करणे व शस्त्रास्त्रांचे कारखाने बंद करणे, जे एकाही बौद्ध राजाने केले नाही आणी तरीही ते बौद्ध राजे म्हणूनच ओळखले जातात. याचा अर्थ स्पष्ट आहे कि अहिंसा हा तत्वज्ञानाचा भाग नाही तर तो केवळ एक प्रासंगिक विषय आहे. परंतू अनुयायांनी मात्र ओढून ताणून अहिंसेच्या मुद्द्याला प्रचंड महत्व दिले. त्याचा परिणाम असा झाला की नंतरच्या ब्राह्मणी प्रतिक्रांत्यांमध्ये बौद्ध राजांची व बौद्ध भिक्खुंची प्रचंड कत्तल झाली.
-2-
वैदिक चाणक्याने शूद्र चंद्रगुप्ताच्या मदतीने कपट कारस्थाने रचलीत व हिंसा करून बौद्ध राजा धनानंदाचा खून केला. त्या काळातील या हिंसक प्रतिक्रांतीला रोखण्यासाठी बौद्ध भिक्खूंकडे काय योजना होती, किमान त्यांची भुमिका तरी काय होती? काहीच नाही. मेलेल्या सैनिकांची प्रेते उचलणे व त्यांचा अंत्यविधी करणे एवढेच ‘अहिंसक’ काम त्यांच्यासाठी उरले होते. अहिंसावादी मार्क्सने लोकशाही मार्गाने क्रांती केली व ती शत्रू असलेल्या भांडवलदारांनी लष्कर टाकून कापून काढली, तेव्हा मार्क्सने धोरण बदलवले व ‘स्वसंरक्षणार्थ’ हिंसेला आपल्या धोरणाचा भाग बनविला. क्रांतीच्या रक्षणासाठी सशस्त्र कार्यकर्त्यांची फौज उभी केली पाहिजे, हे मार्क्सने सांगीतले. बुद्धाच्या मृत्युनंतर 100 वर्षांच्या आतच वैदिक चाणक्याने बौद्ध राजाला हिंसा करून कपटाने मारले. त्यावेळेस तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जीवंत असते तर त्यांनी ताबडतोब भिक्खु संघाची संगिति बोलावली असती व भिक्खुसंघाचे त्वरीत विभाजन करण्याचा ठराव मांडला असता. धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘प्रबोधक भिक्खूसंघ’ व धम्माच्या रक्षणार्थ सशस्त्र भिक्खुंचा ‘हिंसक’ भिक्खूसंघ असे दोन वेगळे भिक्खूसंघ स्थापन करण्याचा ठराव तथागताने संगितीत मंजूर करवून घेतला असता. पण हा क्रांतिकारी निर्णय घेणार कोण? बुद्ध तर जीवंत नव्हते व अनुयायी ‘भक्त’ बनून सुस्त झालेले. भक्तांकडे क्रांतिकारी निर्णय घेण्याची क्षमता नसते. त्याच काळात भिक्खूंचे सशस्त्र सैन्य उभारले गेले असते तर पुष्यमित्र शृंगाची हिंसक प्रतिक्रांती करण्याची हिम्मतच झाली नसती व आज देशाचा वेगळाच इतिहास वाचायला मिळाला असता.
मार्क्सच्या हयातीतच क्रांती झाली व शत्रूने ती हिंसक मार्गाने नष्ट केली. त्यामुळे मार्क्सने अहिंसेचे धोरण बदलून हिंसेचे धोरण स्वीकारले. त्यामुळेच अर्ध्या जगात साम्यवादी क्रांत्या झाल्यात व त्या क्रांत्यांनी मानवाच्या पुढील विकासाची वाट मोकळी करून दिली.
-3-
आता कोणती हिंसा योग्य व कोणती हिंसा अयोग्य, कोणता हिंसक चूक व कोणता हिंसक बरोबर, हे कोण ठरविते? आता या बाबतीतले एक प्रत्यक्षदर्शी म्हणून माझ्याच भावबंधकीचे उदाहरण देतो. माझ्या जन्मगावी देवरेंचे बरेच प्रस्थ आहे. ‘अ’ गटातील देवरेबंधू व ‘ब’ गटातील देवरेबंधू यांचा शेतावरून वाद होता. अधूनमधून कुरबुरी सुरूच असायच्यात. अनेकवेळा हमरीतुमरिवर आलेत. ‘ब’ गटाच्या देवरेंची संख्या थोडी जास्त होती व ते दबंगही होते. त्यांनी ठरविले की या भांडणाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. या देवरे युद्धाचा परिणाम असा झाला की, ‘ब’ गटाचे बहुतेक सर्वच सदस्य गंभीर जखमी अवस्थेत दवाखान्यात दाखल करावे लागलेत. गावातील बरेच लोक ‘‘इतकं मारायचं असतं का?’’ अशी हळहळ जखमी व्यक्तींबद्दल व्यक्त करीत होते व ‘अ’ गटाला दोषी ठरवित होते. कारण ‘अ’ गटाचा एकही सदस्य दवाखान्यात नेण्याइतका जखमी झालेला नव्हता. पोलिस स्टेशन, एफ.आय.आर. वगैरे सर्व प्रक्रिया पार पडली. मात्र खेडे गावात पोलीस, कोर्टकचेरीवर अवलंबून राहून निवाडे होत नाहीत. जातपंचायतच लागते. आता या जातपंचायतीचे स्वरूप बदलले आहे. आता जातसंघटना हे काम करतात. मी दोन्ही गटात समझौता करावा म्हणून माळी महासंघाच्या अध्यक्षांना भेटलो. सुप्रसिद्ध उद्योजक बापूसाहेब डी. के. माळी हे त्यावेळी माळी महासंघाचे अध्यक्ष होते. शांत स्वभावाचे डी.के. बापू एक आदरणीय व्यक्तीमत्व आहेत. त्यामुळे त्यांचा शब्द सहसा कोणी टाळत नाहीत. त्याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डी.के. बापू हे ‘ब’ गटाचे जवळचे नातेवाईक होते. त्यामुळे सर्वांनीच त्यांचा न्यायधिश म्हणून स्वीकार केला.
निवाडा करण्यासाठी जेव्हा बापू गावात आलेत तेव्हा ते साहजिकच ‘ब’ गटाच्या नातेवाईकांकडे गेलेत. त्यांचेसोबत नागपूरचे ‘सराफ’ नावाचे हुशार गृहस्थ होते. त्यांनी ‘ब’ गटाच्या घरी जेवण घेतले तेव्हा अपक्ष असलेल्या देवरे गुरूजींनाही त्यांनी बोलावून घेतले. तेथच त्यांची काहितरी चर्चा झाली व न्यायधिश न्यायनिवाडा न करताच गाडीत बसून परतीच्या रस्त्याला लागलेत.
आता या सत्यकथेचा शेवट आपण पुढील भागात करू या! तो तोपर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 13 जून 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 14 जून 20)
लेखक-- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27270
Mobile – 88 301 27270

No comments:
Post a Comment